सरणार कधी...

गाडी बाहेर काढायला त्याला किमान अर्धं मिनिट तरी लागणार होतं.
तेवढ्या वेळातच तीनही इमारतींचा डोलारा जमीनदोस्त झाला तर... ज्याच्या भीतीपोटी गेले दोन तास आपण इथे असे उभ्याउभ्या घालवले? त्या पंचवीस-तीस सेकंदांच्या अवधीतच धरणीमातेला तिच्या पोटातली खदखद असह्य झाली तर..........?
दोन तासांपूर्वीच्या त्या घबराटीनं पुन्हा एकदा सारिकाचा ताबा घेतला...

border2.JPG

ताड उघडी रात्र, चार भिंतींच्या कोंदणात न मावणारी...! आसपास जाग असूनही भेडसावणारी, रस्त्यांवर दिवे चालू असूनही काळोखी भासणारी!
सारिका शून्य नजरेनं पाहत होती.
खुल्या आकाशाखाली अशा कित्येक रात्री तिनं पूर्वीही काढल्या होत्या - एखाद्या गडाच्या माचीवर, डोंगरातल्या, कडेकपार्‍यांतल्या गुहेत किंवा बालेकिल्ल्याच्या उरल्यासुरल्या अवशेषांच्या संगतीत. आत्ता अवतीभवती होते शेजारपाजारी, तर तेव्हा बरोबरचे सवंगडी, उत्साही सखे-सोबती आणि सुनयना!
रात्रीच्या शांततेत सर्वांचं कुजबुजत, दबक्या आवाजात बोलणं दोन्हीकडे सारखंच. होता फक्त एकच फरक... मनाला झोके घ्यायला बोलावणारा तेव्हाचा स्वच्छंदीपणा आणि त्याच मनाला बधीर करून सोडणारी आत्ताची ही अनिश्चितता!
खरंतर मेंदूनं भराभर विचार करायला हवा होता. भावनेच्या आहारी जाणार्‍या मनाला ताळ्यावर आणायला हवं होतं. पण यातलं काहीही होत नव्हतं. सारिका नुसती शून्य नजरेनं पहात होती.
डोक्यावरती होतं तेच ते काळं आकाश. वर्षानुवर्षांच्या परिचयाचं. नेहमीसारखंच चांदण्यांचं प्रदर्शन मांडून बसलेलं. पण खाली काय चाललंय हे त्याच्या गावीही नव्हतं. आणि पायाखाली... त्याक्षणी जमीन होती. पण पुढच्या क्षणी असेल की नाही ते सांगता येत नव्हतं.
त्या विचारानं सारिकाच्या अंगावर सरसरून काटा आला.
या पायाखालच्या जमिनीवर किती विसंबून असतो आपण. किती गृहीत धरतो आपण तिला. लहान मूल तिच्या आधारानंच पहिलं पाऊल टाकतं, चालायला शिकतं, दुडदुडतं, बागडतं, धावतं. कधी अडखळून पडलं, तर सावरायला आई-वडील धावतात. पण त्याआधी हीच पायाखालची जमीन त्याला आधार देते, तोलून धरते. तिच्याच आश्वासक साथीनं माणूस मोठा होतो. स्वावलंबी होतो. आपल्या पायांवर उभा राहतो. दमल्या-थकल्यावर पाठ टेकायला, घटकाभर विसावायला हीच जमीन त्याला हवी असते.
... आणि याच पायाखालच्या ‘आपल्या’ वाटणार्‍या जमिनीनं कालपासून हजारो लोकांना वार्‍यावर सोडून दिलंय आणि आता आपली साथसोबतही करणार नाही म्हणतेय ती!
आता पुढे काय? ही रात्र काळरात्र ठरणार की उद्या सकाळचा सोनेरी सूर्योदय दाखवणार? कोण देणार होतं या प्रश्नाचं उत्तर?
दिङ‌्मूढ व्हायला झालं होतं. संकट कोसळलंय म्हणावं तर, नाही. पण उत्पात दारात उभा होता! सर्वकाही सुरळीत आहे म्हणावं, तरीही नाही. कारण उद्याची भ्रांत होती! काय करायचं असतं, कसं बाहेर पडायचं असतं या परिस्थितीतून? उद्याची भ्रांत पाचवीला पुजलेले काय करतात अशा वेळेला? आता आपण त्यांच्याकडून हे धडे घ्यायचे की काय! पण धडेही तेव्हा घेऊ, जेव्हा उद्याचा दिवस उजाडेल आणि तो बघायला आपण जिवंत असू...
काहीच सुचत नव्हतं. जे होईल ते पाहत रहायचं, अशी स्वतःचीच समजूत काढावीशी वाटत होती. पण ते होत नव्हतं. काही म्हणता काहीच सुचत नव्हतं.

खांद्यावर झोपलेल्या सईनं थोडी चुळबूळ केली. तिच्या हाता-गालांवर बसलेल्या एकदोन डासांना सारिकानं हाकललं. हातातल्या रुमालानं तिला थोडा वारा घातल्यासारखं केलं. रोजच्यासारखं संध्याकाळी बागेत खेळून झाल्यावरही आईनं रात्री पुन्हा तिला खाली आणलं म्हटल्यावर तिला तर ती पर्वणीच होती. जोडीला तिची रोजची मित्रमंडळीही होतीच. त्यांच्याबरोबर गेला तास-दीडतास खेळून ती इतकी दमली होती की, एका क्षणी येऊन सारिकाच्या कडेवर झोपी गेली होती. आजच का, कसं, मग रोज का नाही, इतके सगळे विचार त्या लहानग्यांच्या मनाला शिवलेही नसतील खेळताना...
डास पुन्हापुन्हा त्रास देत होते. सारिका रुमालानं पुनःपुन्हा ते हाकलत होती. सईच्या वजनानं हाता-खांद्याला रगही लागली होती. असं अजून किती वेळ उभं रहावं लागणार होतं, कोण जाणे! अचानक काहीतरी सुचून तिनं आजूबाजूला पाहिलं. नीरजसाठी तिची नजर भिरभिरायला लागली. एका बाकावर तो बसलेला तिला दिसला. हातातली प्लॅस्टिकची पिशवी त्यानं आपल्या छातीशी कवटाळून धरली होती. डोक्यात कसलेतरी विचार पिंगा घालत असणार. त्याच्या चेहर्‍यावर ते स्पष्ट दिसत होतं. कसला विचार करत असेल नीरज आत्ता? या अचानक उद्भवलेल्या प्रसंगाचा की... संध्याकाळचा? संध्याकाळची आठवण येताच नीरजच्या दिशेला उचललेलं पाऊल सारिकानं परत मागे घेतलं. संध्याकाळचं त्याचं ते वाक्य... जिव्हारी झोंबलेलं... तोल जाताजाता तिनं मनावर ठेवलेला ताबा... सईसमोर वादावादी नको, म्हणून धरलेला अबोला... त्या सगळ्यावर विचार करायला सवड मिळाल्यासारखंच झालं तिला.
पुन्हा एक डास चावला आणि सईनं आपला पाय झोपेतच जोरात झटकला. मग मात्र सारिकाला राहवेना. तिनं सईचं डोकं डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर घेतलं आणि ती नीरजच्या समोर जाऊन उभी राहिली.
"नीरज..." नाईलाज झाला म्हणूनच, नाहीतर नीरजशी बोलायची तिची मुळीच इच्छा नव्हती.
"हं?" नीरजनं मान उंचावून तिच्याकडे बघितलं.
"खूप डास आहेत, सई झोपत नाहीये शांतपणे..." आवाजात शक्य तितका कोरडेपणा आणत ती म्हणाली.
"मग?"
"गाडी इकडे घेऊन ये. गाडीत ठेवते तिला."
नीरज काही न बोलता उठला आणि पार्किंगलॉटमधल्या त्यांच्या गाडीच्या दिशेनं चालायला लागला.
जवळच उभ्या असलेल्या जमदाडेनं ताबडतोब त्याची बाकावरची जागा पटकावली. जणू तो त्यासाठीच वाट पाहत असावा. बाकावर टेकता टेकता त्यानं सारिकाकडे एक नजर टाकली. पण ते सहज घडलेलं नव्हतं. मुद्दामहून रोखून रुतवलेला दृष्टिक्षेप होता तो... नेहमीसारखाच!
नीरजच्या दिशेनं पाहत असल्याचा बहाणा करून सारिकानं त्याच्याकडे पाठ फिरवली. पण त्याला तेही चालण्यासारखं होतं. तसंही पुढे ओढणी, कडेवर झोपलेली मुलगी, तिला पेलण्यासाठी एकावर एक आडवे ठेवलेले दोन्ही हात... काही वावच नव्हता कशाला. मागून कसा नजरेला कुठलाही अडसर नव्हता. त्यातून हिचा फिक्या रंगाचा ड्रेस! केस पण वर बांधलेले. उंच, बारीक मान माझ्यासारख्यांना बोलावणार नाय तर काय!
आपल्याला जमदाडे मागूनही न्याहाळतो आहे, हे सारिकाला कळत होतं. पण तिनं त्याच्या त्या लगट करणार्‍या नजरेचा सराव करून घ्यायला कधीचीच सुरूवात केलेली होती. दिवसभरात जिन्यात, लिफ्टमध्ये, पार्किंगमध्ये कधी ना कधी, कुठे ना कुठेतरी तो समोर यायचाच. कायम त्याला टाळणं शक्यच नव्हतं.
खरंतर जमदाडे हा मनुष्य त्याला एकेरी संबोधण्याच्या वयाचा नव्हता. चांगला तीन पोरींचा बाप होता. त्याच्याशी सारिकाचा कधी संबंधही आला नसता कदाचित. पण एकदा सई बागेत खेळताना पाय घसरून पडली. सारिका तिथेच आसपास कुणाशीतरी बोलत उभी होती. तिनं जाऊन सईला उचलायच्या आतच कुठून कोण जाणे आधी हा जमदाडेच तिच्याजवळ पोहोचला. त्यानं तिला उचलून घेतलं, स्वतःच्या रुमालानं तिच्या हातापायाला लागलेली माती पुसली. तिला सारिकाकडे परत देत असताना त्यानं अगदी हेतूपूर्वक सारिकाच्या हाताला स्पर्श केला. आभाराचे दोन शब्द कसेबसे पुटपुटत ती तिथून सटकली. पण त्या दोन-तीन मिनिटांच्या भांडवलावर त्यानंतर तो दरवेळी येताजाता हसायचा, तिच्याशी काहीतरी बोलायचा, सईचा गालगुच्चा घ्यायचा आणि दरवेळची त्याची ती नजर...!
स्वतःच्या मुलींकडेतरी हा जन्मदात्याच्या नजरेनं पाहत असेल का?- सारिकाच्या मनात आलं. तिनं उगीचच एकदा डाव्या खांद्यावरची ओढणी सारखी केली. जमदाडेची एकाग्रता भंगली. तिच्या मानेवर रेंगाळलेली त्याची नजर खाली घसरली... आजकाल ही छोट्या, टाईट कुडत्यांची फॅशन बरी आलीय... एक से एक विमानतळ दिसतात सगळे! आपलं घरातलं विमानतळ मात्र असल्या कपड्यात अजूनच बेढब दिसेल... कुणालाही लँड व्हावंसं वाटणार नाही तिथे...जमदाडे स्वतःशीच हसला. आयला तिच्या...! मुलगा तर दिलाच नाही, वर तीन-तीन पोरी काढून नुसती फुगत गेली... नवर्‍याचा काही विचार?? आता बसलेली असते शिर्डी अन्‌ शेगाव करत! पण आता काय उपयोग? ही असली मान, असा चेहरा एकदाही आपल्या हातात आला नाही तो नाहीच! त्यानं नकळत स्वतःशीच मानही झटकली.
पाठीवरच्या जमदाडेच्या नजरेशी झुंजताना एकीकडे सारिका नीरजकडे पाहत होती. भांडण झालेलं असलं तरी स्वतःच्या नवर्‍याकडे एकटक बघायला कुणाची चोरी नव्हती.

त्यांचा पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट आणि त्यामुळे त्यांची गाडीही जिथे होती ती सोसायटीची ‘ए’ विंग रस्त्याला लागून होती. तिच्या मागे ‘बी’ आणि ‘सी’, अशा आठ-आठ मजली तीन इमारती एका ओळीत उभ्या होत्या. सारिका आणि सोसायटीतले इतर लोक आत्ता जिथे उभे होते, ती बाग आवारातल्या मागच्या भागात होती. बागेच्या एका कोपर्‍यात दोन जुनी भलीथोरली वडाची झाडं होती. त्यांच्या पारावर संध्याकाळच्या वेळी म्हातार्‍या मंडळींचा अड्डा जमे. काही लोकांना ती झाडं तोडून तिथे पोहण्याचा अद्ययावत तलाव बनवून घ्यायचा होता. जमदाडे त्यात आघाडीवर होता. त्याच्या सातव्या मजल्यावरच्या घराच्या बाल्कनीतून ती जागा अगदी व्यवस्थित दिसायची हेच कारण असावं त्यामागे. त्यावरून सोसायटीतल्या काही बायका जमदाडेला आपापसांत फिदीफिदी हसल्याही होत्या.

‘सी’ विंग ओलांडून नीरज आता ‘बी’ विंगजवळ पोचला होता. ‘बी’ विंगला लागूनच वॉचमनची केबिन होती. तिथून त्याला तीनही इमारतींवर लक्ष ठेवणं सोपं जात असावं. केबिनसमोरून जाताना नीरज क्षणभर तिथे थबकला. वॉचमन त्याच्याशी काहीतरी बोलला बहुतेक किंवा नीरजनंच त्याला गाडीच्या पुढ्यातल्या मोटरसायकली वगैरे काढायला सांगितलं असावं..
उत्तर प्रदेशातल्या कुठल्यातरी दुर्गम खेड्यातून आलेला वॉचमन... कालच्या उत्पाताच्या बातम्या अजून त्याच्या घरच्यांपर्यंत पोचल्याही नसतील कदाचित... त्यांना पत्ता तरी असेल का, आत्ता त्यांचा मुलगा, भाऊ किंवा नवरा कुठल्या परिस्थितीत आहे ते... ते आता कदाचित त्याला पुन्हा कधीच पाहू, भेटू शकणार नाहीत...
पण काय फरक पडतो? आपल्या घरचे तर कालपासून सगळं पाहतच असतील टी.व्ही.वर, पण ते तरी कुठे खात्री देऊ शकतात की उद्या आपण जिवंत असू की...
सारिकाचं मन विचार करत भरकटत होतं. अचानक तिला काहीतरी जाणवलं. एक निराळीच विचित्र भावना डोक्यात वळवळायला लागली. काय होतं? काय झालं होतं? काय होणार होतं? पुढे होऊन जे थांबवणं गरजेचं होतं... काय? काय??
ती अजूनही नीरज गेला त्या दिशेलाच पाहत होती. क्षणार्धात तिचा चेहरा झरझर बदलला.
नीरज! नीरज!!
saranar-kadhi.jpg
तो तिला आता दिसत नव्हता. पार्किंग लॉटमध्ये पोचला असावा कदाचित. बहुधा गाडीत बसून त्यानं ती सुरूही केली होती. कारण तिकडून दिव्यांचा मोठा झोत येताना दिसत होता. पण गाडी बाहेर काढायला त्याला किमान अर्धं मिनिटतरी लागणार होतं. तेवढ्या वेळातच तीनही इमारतींचा डोलारा जमीनदोस्त झाला तर... ज्याच्या भीतीपोटी गेले दोन तास आपण इथे असे उभ्याउभ्या घालवले? त्या पंचवीस-तीस सेकंदांच्या अवधीतच धरणीमातेला तिच्या पोटातली खदखद असह्य झाली तर..........?
दोन तासांपूर्वीच्या त्या घबराटीनं पुन्हा एकदा सारिकाचा ताबा घेतला...
एखादा गौप्यस्फोट करावा, अशाप्रकारे वर्देकाकूंनी येऊन ती बातमी सांगितली. सारिकाच्या डोक्यात तेव्हा संध्याकाळचेच विचार चालू होते. त्यामुळे आधी त्याकडे तिचं तसं दुर्लक्षच झालं होतं थोडं. पण हळूहळू बाहेर जिन्यात, पार्किंगमध्ये, सोसायटीच्या आवारात लोक गटागटानं जमायला लागले, गडबड वाढली आणि पुढ्यात काय वाढून ठेवलंय त्याची तिला प्रथम जाणीव झाली होती. त्यापुढच्या दहा-पंधरा मिनिटांत काय केलं, कसं केलं, ते काहीही कळलं नव्हतं. दुसरंच कुणीतरी तिच्याकडून ते करवून घेतलं होतं जणू.
मनाला एकच गोष्ट आता माहीत होती- कसंही करून पहाटे चार वाजेपर्यंत वेळ काढायचा आहे.
पण तोपर्यंत त्रास देणार होती एकच जाणीव - भीतीची!
भीती पडझडीची, दुखापतीची!
भीती जिवाची!
ते सगळं आठवलं आणि काही न सुचून सारिकानं नीरज गेला त्या दिशेला तरातरा चालायला सुरूवात केली. पण दहा-पाच पावलं जाईपर्यंतच ‘बी’ विंगला पूर्ण वळसा घालून गाडी घेऊन येणारा नीरज तिला दिसला आणि ती जागच्या जागीच खिळली. काही सेकंदांच्या डोक्यातल्या विचारांच्या थैमानानं तिला एकदम गळून गेल्यासारखंच झालं. नको त्या वेळेला त्याला गाडी काढायला पाठवलं, हा तिचा वेडेपणा होता की तो नजरेआड झाल्यावर तिची जी घालमेल झाली तो? संध्याकाळी तिच्या डोक्यात तिडीक गेली होती ती त्याच्यामुळेच; त्यापायी तिनं अबोला धरला होता तो त्याच्याशीच! ती जाऊन बोलली नसती तर रात्रभर तोही कदाचित बोलायला आला नसता. संध्याकाळच्या त्याच्या त्या वाक्यातून तेच तर दिसलं!
पण मागचापुढचा विचार न करता असं बोलूच कसं शकला तो? तो जे बोलून गेला होता ते त्राग्यापायी होतं की खरंच? त्याला त्यातनं गर्भित इशारा द्यायचा होता की केवळ मनावरचा ताबा सुटला एवढंच कारण होतं? आणि संध्याकाळी डोक्यात संतापाचा आगडोंब उसळल्यावर आत्ता तिचं त्याच्यासाठी कासावीस होणं तरी कुठल्या तर्काला धरून होतं?
पण घटनाच अशा घडत होत्या की, तर्काची सगळी गणितं कोलमडून पडावीत. सैरभैर व्हायला झालं होतं. काही कळेनासंच झालं होतं. गेले दोन तास काय चालू होतं; संध्याकाळपासून काय चालू होतं आणि सुनयनाची परत भेट झाल्यापासून गेले काही दिवस काय चालू होतं... काही म्हणता काहीच कळेनासं झालं होतं!

सुनयना. दहावीच्या परिक्षेनंतर एका ट्रेकला सारिकाची तिच्याशी भेट झालेली...
सारिका त्या ट्रेकला सहज गंमत म्हणून गेली होती. तशी तिला भटकंतीची आवड होती, पण ध्यास कधीच नव्हता. सुनयना तिच्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठी पण ट्रेकिंगमध्ये तोपर्यंत चांगलीच मुरलेली. ओळख झाली आणि मनमुराद भटकंतीच्या समान धाग्यानं दोघींना बांधून टाकलं. पुढची पाच-सहा वर्षं सारिका तिच्या संगतीनं निरनिराळ्या ग्रूप्सबरोबर भरपूर फिरली. नंतर गिर्यारोहणाच्या पुढच्या प्रशिक्षणासाठी सुनयना मनालीला निघून गेली आणि सारिकाशी असलेला तिचा संपर्क हळूहळू कमी होत गेला. उच्चशिक्षण, लग्न, संसार, मुलंबाळं हे सारं बाजूला सारून सुनयनानं गिर्यारोहण हेच आपलं ध्येय ठरवून टाकलं होतं. ते एकच वेड तिच्या डोक्यात भिनलं होतं. जन्मजात कौशल्याला झुकतं माप देत तिनं त्यातच प्रावीण्य मिळवायचं ठरवलं होतं. तिनंच सारिकाला ट्रेकिंगची गोडी लावली आणि विस्मृतिच्या झिरझिरीत पडद्याआड अलगदपणे जाऊन बसलेल्या त्या सगळ्या आठवणींना तिनंच पुन्हा बाहेर काढलं.
अनेक वर्षांनंतर अचानक तिची पुन्हा भेट झाली म्हटल्यावर खरंतर सारिकाला आनंद व्हायला हवा होता. प्रथम तो झालाही होता. मात्र तिच्याशी बोलल्यापासून, तिच्या प्रशिक्षणादरम्यानच्या रसभरित कहाण्या ऐकल्यापासून सारिका काहीशी अस्वस्थ झाली. फावल्या वेळेत तिच्या डोक्यात कसकसले विचार यायला लागले... आपलं नीरजशी लग्न ठरलं, तेव्हा तिकडे सुनयना हिमालयातल्या गिर्यारोहणाच्या नवीन जगाशी ओळख करून घेत होती... स्वयंपाकाची काहीही सवय नसताना आपण ओट्याशी झुंजत होतो, तेव्हा ती तिकडे प्रशिक्षणात मग्न होती... सईच्या वेळेला आपण नोकरी सोडायचा निर्णय घेतला, तेव्हा ती हिमालयातलं कुठलंतरी शिखर पादाक्रांत करत होती... आपण आपले छंद जोपासायचं विसरूनही गेलो आणि तिच्या पाठीवर शाबासकीची थाप पडत होती... मनात नकळत तुलना व्हायला लागली.. सारखं वाटायला लागलं की हातातून काहीतरी सुटतंय, ते एकदा गेलं की परत येणार नाहीये, त्याला थांबवायला हवंय. काय ते कळत नव्हतं. पण त्या विचारानं आतून हळूहळू ढवळून निघायला होत होतं. त्या मंथनातून कुठलं नवनीत अवतरणार होतं देवाला ठाऊक! त्या नवनीताला तरी अवतरण्यासाठी आता पुरेशी संधी मिळणार होती की नाही कोण जाणे!
आता फक्त उद्याचा दिवस उजाडायला हवा होता. मग त्या सगळ्याबद्दल विचार करायला भरपूर वेळ होता. पण तेच होईल की नाही हे माहीत नव्हतं!
आता फक्त आला क्षण ढकलायचा होता. तो एक क्षणच शाश्वत होता. त्या एका क्षणी तिला, नीरजला, सईला, वॉचमनला, त्या जमदाडेला, वर्दे काका-काकूंना, आजपर्यंत ज्यांतले अनेक चेहरे तिनं पाहिलेही नव्हते, अशा सोसायटीतल्या इतर लोकांना, आसपासच्या सोसायट्यांमधल्या अनेकांना... जिवंत रहायचं होतं!
उभ्याउभ्या पाय दुखायला लागले, तर त्या एका क्षणात ती बसायला जागा शोधणार होती, गवतात काही किडा-मुंगी चावली तर कळवळणार होती, रात्र जशी वाढत जाईल तशी डोळ्यांवरची झोप परतवणार होती, मधूनच डोकावणार्‍या तहानभुकेच्या जाणिवेला बाजूला सारणार होती, काहीच न करता नुसती उभी राहून कंटाळणार होती, जांभया देणार होती, आसपासच्या लोकांचं निरीक्षण करत त्या कंटाळ्यावर विरंगुळाही शोधणार होती आणि...
पहाटेचे चार वाजायची वाट बघणार होती!

कंपाउंडच्या भिंतीलगत एका दिव्याखाली नीरजनं गाडी उभी केली. गाडीचं मागचं दार उघडून सीटवर ठेवलेली पिशवी त्यानं उचलली. सीट सईला झोपवण्यासाठी मोकळी केली.
पारावर टेकलेल्या वर्देकाकू मघापासून हे सगळं पाहत होत्या. त्या तिथून उठल्या आणि त्यांच्या दिशेनं यायला लागल्या. ते पाहताच नीरज सारिकाशी काहीही न बोलता तिथे वर्देकाकांच्या शेजारी जाऊन बसला. वर्देकाका त्याच्याकडे पाहून पुसटसं हसले. त्यानंही त्यांच्याकडे पाहून हसल्यासारखं केलं. त्याच्या हातातल्या पिशवीत काय आहे त्याची काकांना चौकशी करावीशी वाटली. पण त्यांनी तो विचार सोडून दिला. हातांची बोटं एकमेकांत गुंफून, डोळे अर्धवट मिटून, डाव्या पावलावर तिरकं ठेवलेलं उजवं पाऊल संथ लयीत हलवत ते बसून राहिले. त्यांच्या पायाखालची एक-दोन वाळकी पानं त्यांच्या चपलेला घासत त्याच लयीत आवाज करत राहिली. पण त्यांना ती बाजूला सारावीशी वाटली नाहीत. कुणीतरी पानमसाला तोंडात भरून, त्याची रिकामी पुडी दोन्ही हातांच्या तळव्यांत चुरगाळल्याचा आवाज मध्येच त्या पानाच्या आवाजात मिसळला.
कॉलेजवयीन पाच-सहा मुलं पाण्याच्या टाकीवर चढून कोंडाळं करून बसली होती. त्यांच्या कुजबुजण्याचा, मधूनच दबक्या हसण्याचा आवाज येत होता. त्यातलंच कुणीतरी हातातल्या बॉलपेनाशी चाळा करत होतं त्याचा किटीक-किटीक आवाज वेगळा कळत होता. एका बाकावर ‘सी’विंगमधल्या तिघीजणी बसलेल्या होत्या. त्या सतत एकत्रच दिसायच्या. बघावं तेव्हा बडबड करत असायच्या. हळू आवाजात का होईना पण आत्ताही त्यांचं तेच चालू होतं. वॉचमनचा छोटा रेडिओ बारीक आवाजात सुरू होता. तीनचार गाणी, जाहिराती, मध्येच थोडक्यात बातम्यांसारखं काहीतरी असं त्या दिशेनं ऐकू येत होतं...... परिसरावर नाही म्हटलं तरी एक स्तब्धतेचं पांघरूण पसरलं होतं. पण कुठल्या क्षणी ते भिरकावून द्यावं लागेल, पृथ्वीच्या पोटातली खदखद कुठल्या क्षणी खडबडून जागं करेल, हाहाःकाराचा गजर कधी कानात ठणाणा करेल, ते कुणीच सांगू शकत नव्हतं.

इकडे सारिकानं सईला अलगद मागच्या सीटवर झोपवलं आणि गाडीचं मागचं दार नुसतं ढकलून ठेवलं. वर्देकाकू तोपर्यंत तिथे पोचल्याच.
"मला वाटलं कुठे निघालात की काय!"
"नाही हो काकू. कुठे जाणार आपलं घर सोडून? सईला डास चावत होते म्हणून..."
"बरंय गं, तुमच्याकडे गाडी आहे."
"काकू, तुम्ही पण बसता का आत? इतका वेळ इथे तिथे ताटकळून कंबर-पाठ अवघडली असेल."
सारिकानं हे अगदी मनापासून विचारलं होतं, पण वर्देकाकू त्याला नकार देणार हे तिला पक्कं माहीत होतं. गाडीत बसून राहायचं तर बाहेर काय चाललंय, कोण काय बोलतंय यांतलं काहीही त्यांना कळलं नसतं. एकवेळ काकू अन्न-पाण्याविना दिवसभर राहिल्या असत्या, पण सोसायटीतल्या बारीकसारीक घडामोडी कळल्या नसत्या तर त्यांचा प्राण तडफडला असता. कुठल्या प्रसंगी कोण काय बोललं, त्यावर कुणी काय प्रतिक्रिया दिली, कुणी चेष्टा केली, टोमणे कुणी मारले, कुणाला त्याचा राग आला हे सगळं जाणून घेण्याची काकूंना अतोनात हौस होती. मुळात त्यांचा स्वभावच असा होता की दोन्ही मुलींची लग्नं झाल्यानंतरचं आलेलं रिकामपण घालवायला त्या हे करायच्या कोण जाणे?
"अगं, असू दे. आहे आम्हांला सवय. बसमधून उभं राहूनच प्रवास केला इतकी वर्षं. ऑफिसमधे दिवसभर बैठं काम. संध्याकाळी परतलं की, उभ्यानं स्वयंपाक. तेव्हा कधी अवघडली नाही पाठ-कंबर; ती आता कशानं अवघडणार आहे?"
"काकू, पण आता तुम्ही रिटायर झालात. तेव्हाची गोष्ट वेगळी होती."
"हो गं. तेव्हाची गोष्ट वेगळीच होती.", काकूंचा स्वर अचानक बदलला, "...मुलींची लग्नं करायची आणि स्वतःचं घर घ्यायचं, एवढंच होतं डोक्यात. कधीच इतर कुठलीही छानछोकी केली नाही की कुठे हिंडण्या-फिरण्यावर फारसा खर्च केला नाही. पण तीन खोल्यांचंच घर घ्यायला जमलं शेवटी. गाडी तर आवाक्याबाहेरचीच राहिली."
"जाऊ द्या हो काकू..."
"दोघींचीही लग्नं लावून देताना माझा अगदी कटाक्ष होता की, चांगली बंगले-गाडीवाली स्थळंच बघायची. मुलींच्या नशिबी तीन खोल्यांतला संसार नको. आणि दोन्ही स्थळं अगदी हवी तश्शी मिळाली. मोठीचा बंगला नाहीय अर्थात, पण चांगला तीन बेडरूम-स्टोअररूम-टेरेस असलेला प्रशस्त फ्लॅट आहे. शिवाय एक सोडून दोन-दोन गाड्या आहेत. पण..."
"तिच्या घरी काही...?"
"छे! छे! तसलं काही नाही. देवाच्या कृपेने दोन्ही जावई सद्‍गुणी आहेत अगदी! पण..."
सारिका बघायलाच लागली. सगळं चांगलं होतं तरी काकू आपल्या पुन्हापुन्हा 'पण...'च्या वळचणीला जात होत्या.
"आजकाल त्यांच्या घरी गेलं ना, की मला फार परक्यासारखं वाटतं गं! सारखं वाटतं की मुलींना आम्ही आता नकोसे तर नाही ना झालोय..."
"काकू, काहीतरीच काय!"
"त्यांची घरं इतकी चकाचक, झकपक असतात आणि आमचे हे असे अवतार! वर जेव्हा जातो तेव्हा बसनंच दमून-घामेजून तिथे जातो आम्ही. मग त्या श्रीमंती थाटाच्या घरांमधे उपर्‍यासारखंच वाटायला लागतं!"
"काकूऽऽ, अहो..."
"चांगल्या सोसायटीत छोटं का होईना घर झालं, तशीच एखादी गाडीही घरात आली असती तर..."
".........."
"फार वाटतं गं, पण ह्यांना यातलं काहीही सांगून उपयोग नाही; मग मी तरी हे कुणाजवळ बोलणार? तूच सांग."
त्यावर त्यांची जणू समजूत काढावी अशा सुरात सारिका म्हणाली, "ही गाडी तरी आमची स्वतःची घेतलेली कुठे आहे, काकू? कंपनीकडून मिळाली आहे नीरजला."
"पण फिरताय ना गाडीतून तुम्ही! ते महत्त्वाचं!!"
चारचाकी जवळ बाळगणं, हा काकूंनी इतका प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता हे सारिकाला प्रथमच कळत होतं. मुळात त्या हे सगळं आत्ता का बोलत होत्या?
"काकू, पण आता घर काय, गाडी काय, तुम्ही-आम्ही काय, उद्यापर्यंत कदाचित सगळंच संपलेलं असेल..."
आपण काकूंना सांगतोय की स्वतःचीच समजूत काढतोय ते सारिकाला सांगता आलं नसतं.
बोलता बोलता तिनं मान उंचावून वर बघितलं. तीनही इमारतींचे बहुतेक सगळे मजले अंधारात बुडलेले होते. कुणी एखाद्या खोलीत मंद दिवा सुरू ठेवून आलं होतं, कुठे एखाद्या बाल्कनीतला दिवा सुरू होता. जिवाच्या भीतीपायी घराबाहेर मोकळ्या जागेचा आसरा शोधण्यापूर्वी घरातले मोठे दिवे, पंखे, टी.व्ही. बंद करायचं भान लोकांनी ठेवलं होतं. आपापल्या घरांना व्यवस्थित कड्या-कुलुपंही लावली होती. म्हणजे एकीकडे आपल्या घरा-संसाराचा डोलारा डोळ्यांदेखत कोसळलेला बघण्यासाठी हिंमत गोळा करायची होती, मृत्यूला तोंड देण्याची तयारी करायची होती आणि त्याचवेळी आपापल्या घरी सुखरुप परतायची चिवट आशाही पाठ सोडत नव्हती.
राहिले असते सगळ्या खोल्यांमधले दिवे सुरू, तर काय होणार होतं? सगळं मातीमोलच होणार असेल तर त्याची चिंता कशाला करायची? पण जर धडधाकट राहणार असू तर? वीजबिलाचा विचार नको का करायला? जर प्राणच जाणार असेल तर कशाला हवीत दारांना कड्या कुलुपं? पण जर जिवंत राहणार असू तर? आपण बाहेर असेपर्यंत तेवढ्यात घरात शिरून कुणी हात साफ करून घेतला तर...? त्यांना ती संधीच कशाला द्या?
‘आहे’ आणि ‘नाही’च्या उंबरठ्यावर असतानाही आसक्तीलाच झुकतं माप देण्याची ही वृत्ती विलक्षण होती!
नीरजनं तरी काय वेगळं केलं होतं? घराबाहेर पडण्यापूर्वीच्या गडबड-गोंधळातही कपाटातल्या महत्त्वाच्या चार-पाच फाईल्स सोबत घ्यायला तो विसरला नव्हता. त्याच त्या फाईल्स, ज्या गेले अडीच-तीन तास तो छातीशी कवटाळून बसलेला होता. काय होतं त्यांत? केवळ काही कागद, बँकेच्या खात्यांचे, जीवनविम्याचे, स्वतःच्या बायोडेटाचे! पण त्यांचाच त्याला मोठा आधार वाटत होता. न जाणो, पण सगळं उद्ध्वस्त झालं असतं, तर पुन्हा शून्यातून सुरूवात करण्यासाठी ते कागदच त्याच्या मदतीला येणार होते. घर उध्वस्त झालं तरी प्राण बचावलेले असणार हे गृहीतक होतं त्याच्यामागे पण आणीबाणीच्या प्रसंगीही उद्याच्या भौतिक आयुष्याचा विचार नीरजनं आधी केला एवढं खरं!
संध्याकाळी सारिकाला खट्‌कन तोडून टाकताना मात्र तिला काय वाटेल, याची त्यानं जराही तमा बाळगली नव्हती. त्यांच्या एका सरळ, साध्या संभाषणाला भांडणाचं वळण लागलं होतं आणि त्याला अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरली होती सुनयना!

सुनयनानं काही दिवसांपासून सारिकापाशी एक आग्रह चालवला होता- भटकंतीची नव्यानं सुरूवात करण्याचा. पहिला एक छोटा ट्रेक करायचा आणि हळूहळू पुन्हा सराव करायचा. अर्थात, तिनं तिची स्वतःची भटकंती कधीच थांबवलेली नव्हती. नव्यानं सुरूवात झाली असती ती सारिकासाठी.
सारिकाच्या पुढ्यात तिनं पुन्हा एकदा सगळा पट उलगडून ठेवला... उन्हातान्हात गडकिल्ले पालथे घालायचे, पाठीवरचं ओझं वागवत घामेघूम व्हायचं, घशाला शोष पडलेला असताना हातातल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या हलवत हलवत गडावरची पाण्याची टाकी शोधायची, थकतभागत डोंगरमाथा गाठायचा, विस्तीर्ण खोर्‍याकडे बघत जोरजोरात ओरडायचं, एकमेकांना हाका मारायच्या, त्याचे प्रतिध्वनी ऐकून आनंदून जायचं, गडावरच्या मंदिरात भक्तिभावानं हात जोडायचे, रात्री तिथेच विसावायचं, स्वच्छ, निरभ्र आकाशातल्या चांदण्या बघत डोळे गपागप मिटेस्तोवर गप्पा मारायच्या, सूर्योदय पहायला पहाटे धडपडत उठायचं, शिखरावरून खाली पसरलेली धुक्याची दुलई पाहायची...
एकएक जुनी गोष्ट आठवून सारिकाचं मन आसुसून उठत होतं. दुसरीकडे सईचं कारण सांगून ती सुनयनाला धुडकावून लावत होती. एकीकडे पुन्हा एकदा स्वच्छंदी व्हावंसं वाटत होतं; तर दुसरीकडे त्यासाठी सईची आबाळ करावी लागेल, या विचारानं अपराधीही वाटत होतं. शिवाय, मधल्या आठ-दहा वर्षांच्या खंडानंतर आपल्याला जमेल का ही शंका होतीच. पण सुनयनानं प्रयत्न सोडले नव्हते.
अखेर सईला नीरजजवळ ठेवून एका रविवारच्या ट्रेकला येण्यासाठी तिनं सारिकाचं मन वळवलं. संध्याकाळी सारिका तेच नीरजच्या कानावर घालायला म्हणून गेली होती.
कामावरून परतलेला नीरज टीव्ही पाहत सोफ्यावर पसरला होता.
saranar-kadhi2.jpg
"नीरज,"
".........."
"मी पुढच्या रविवारी दिवसभर बाहेर गेले तर सईला सांभाळशील?"
"मला चहा हवाय..."
"आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे."
"काऽय?"
"याचा अर्थ, तुझं लक्षच नाहीय माझ्याकडेऽऽ..."
".........."
"मला सुनयनाबरोबर ट्रेकला जायचंय."
"कोण सुनयनाऽऽ?? हां हां, ती तुझी भटकी मैत्रीण?" बातम्यांची चॅनल्स्‌ बदलत तो म्हणाला.
"तिला भटकी वगैरे म्हणायचं काम नाही. माऊंटेनिअरिंगचं रीतसर प्रशिक्षण घेतलंय तिनं. एकदम पटाईत गिर्यारोहक आहे ती..."
"हो, पण मग ते पटाईत-एक्स्पर्ट वगैरे त्यांचे ते जातील ना कुठे जायचं तेऽऽ; तू त्यांच्याबरोबर जाऊन काय करणार आहेस?" जाहिराती सुरू झाल्यावर नीरजनं स्पोर्टस्‌ चॅनल्स्‌ लावली.
"म्हणजे काय?? मला आवड आहे म्हणून मी जाणार. किती वर्षं झाली, मला असं कुठे जाताच आलेलं नाहीये! एखादा दिवस सईला तू सांभाळलंस, तर काही आकाश कोसळणार नाहीये!"
"आख्खा दिवस? ती कशी राहील तुझ्याशिवाय?"
"त्यात काय झालं? पुढचा एक रविवार कर कसंही मॅनेज..."
"पुढच्या रविवारीऽऽ? म्हणजे १८ तारखेला??", नीरज एकदम उठून बसला.
"हो. का?"
"नाही जमणार. आमच्या ऑफिसची त्यादिवशी पार्टी आहे."
"कसली?", सारिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"मेहताच्या प्रमोशनची."
"मग तू नको जाऊस, सिंपल! तो मेहता तर तुझ्या डिपार्टमेंटचाही नाहीये."
"नाही! नाही! मी त्याला 'येणार' असं सांगितलंय."
"तसं तर मीपण सुनयनाला सांगितलंय."
"मला न विचारता का सांगितलंऽस?"
"मेहताला सांगण्यापूर्वी तू मला विचारलंऽऽस??"
"तुला विचारायची मला गरज वाटली नाही आणि मी काही ब्रह्मदेव नाही, तू तोच रविवार नेमका निवडणार हे आधीच कळायला..."
"पण आता कळलंय ना? मग थांब आता घरात."
".........."
"तुझ्या तोंडून पटकन ‘हो’ काही निघत नाहीये."
"नाही जमणाऽऽर!"
"तुझ्यापायी मला माझ्या कितीतरी गोष्टी बाजूला साराव्या लागतात आणि तू मात्र..."
"नको सारत जाऊस मग..."
"?????"
"साराव्या लागतात म्हणे...!"
"नीरऽऽज!"
"असली उपकाराची भाषा ऐकवणार असलीस तर मुळात ते सो-कॉल्ड उपकार करूच नकोस. गरज नाही त्याची!"
"नुसतं बोलायला तुझं काय जातंय? एखादा दिवस मी असहकारच पुकारते, थांब. मगच कळेल तुला..."
"कळायचंय काय? आंऽऽ? काय कळायचंय??"
"नीरज! उगीच ओरडू नकोस."
"ओरडायला तू लावतीयेस मला. पण तुझा सहकार आणि असहकार... मला कशाचीच गरज नाही, कळलं? माझं तुझ्याविना काहीही अडत नाही!"
ते ऐकलं मात्र, झिण्ण झालं सारिकाच्या डोक्यात!
अपमानानं ती उभ्याउभ्या थरथरली. संतापानं डोकं भिरभिरायला लागलं. दोघांच्या चढलेल्या आवाजांमुळे सई कावरीबावरी झाली. ते लक्षात येताच ती तिथून तडक उठली. चहा-बिहा करायचा आता काही प्रश्नच उद्भवत नव्हता. तिरीमिरीत तिनं नुसता वरण-भाताचा कुकर लावला आणि ती एकटीच बेडरूममध्ये जाऊन बसली. सई तिच्या मागोमाग गेली. थोडावेळ तिथेच उभी राहिली. पण आई लक्षच देत नाही, म्हटल्यावर ती पुन्हा बाहेर आली.
सईच्या भुकेची वेळ झाल्यावर मात्र सारिकाला उठून स्वयंपाकघरात येणं भाग होतं. तिनं स्वत:चं आणि सईचं ताट वाढलं. सईला शेजारी बसवून भात भरवायला सुरूवात केली.
"आणि बाबाऽ?", तिसरं ताट दिसलं नाही म्हटल्यावर सईचा प्रश्न आलाच.
"बाबाला भूक नाहीये. ‘आ’ कर पट‍कन...", सारिका तिच्यावर खेकसली.
नीरज अजूनही सोफ्यावर पसरलेला होता. टीव्हीही सुरू होता. सगळी बातम्यांची चॅनल्स्‌ आदल्या दिवशीच्या भूकंपाच्या भीषण दृष्यांनी व्यापलेली होती. हाहाःकार माजलेला, कुटुंबं देशोधडीला लागलेली! ज्यांनी नुसता धक्का अनुभवला होता त्यांचीही भीतीनं गाळण उडाली होती. मग ज्यांच्यावर खरी आपत्ती कोसळली त्यांचं काय झालं असेल याची कल्पनाच करवत नव्हती. मेलेले सुटले होते. अडकलेले, जिवंत राहिलेले कमनशिबी ठरले होते. पण ते पाहून हळहळण्याचं, चुकचुकण्याचंही भान नव्हतं सारिकाला. हातातलं ताट तिथेच टाकून कुठेतरी लांब पळून जावंसं वाटत होतं. अज्ञातवासात! जिथे आपल्याला कुणीही ओळखणार नाही, आपण कुणालाही बांधील असणार नाही; कुणीही आपल्याला तोंडाला येईल ते ऐकवणार नाही...
आणि तितक्यातच वर्दे काकूंनी येऊन ती बातमी सांगितली...
‘ए’ विंगमधल्या सर्वांत वरच्या मजल्यावरचं एक घर अनेक दिवस बंदच होतं. घरमालकानं गुंतवणूक म्हणून घेऊन ठेवलेलं. त्याला भाड्यानं द्यायचं होतं. काहीजण त्या दृष्टीनंच ते बघायला आले होते. त्याची किल्ली होती वर्देकाकूंकडे. वॉचमननं त्यांच्याकडून किल्ली घेतली आणि तो आलेल्या लोकांना ते घर दाखवायला घेऊन गेला. घराचं निरीक्षण करताना त्या लोकांना तिथल्या छताला मोठे तडे पडलेले दिसले. ते आदल्या दिवशीच्या भूकंपाच्या जोरदार धक्यामुळेच असणार असा निष्कर्ष निघाला आणि बघताबघता ही बातमी सोसायटीत पसरली.
भूकंपाचा केंद्रबिदू अवघ्या काहीशे किलोमीटर्सवरच होता. त्या सर्वच परिसराला मुख्य धक्क्यानंतरचा धोका अजूनही होताच. दुसर्‍या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत अतिदक्षतेचा इशारा त्याआधीच देण्यात आलेला होता. त्यामुळे साहजिकच छताला पडलेले ते तडे सोसायटीत एकच घबराट पसरवून गेले. ती संपूर्ण रात्र सर्वांनी बाहेर खुल्या जागेत काढायची असं ठरलं. तेच लोण आसपासच्या सोसायट्यांमध्येही पसरलं.
बहुतेक घरांमधे तेव्हा रात्रीची जेवणं चालू होती. पण पुढच्या जेमतेम अर्ध्या तासात लपलपत्या अंतःकरणांनी एकएक करून लोकांनी आपापली घरं सोडली. आपला जीव वाचवायचाय, इतकंच आता कळत होतं! पण संपूर्ण घराकडे एकदा नजर टाकून दरवाजा ओढून घेताना प्रत्येकाच्या पोटात तुटलं...
लग्नाचा पहिला वाढदिवस म्हणून कालच नवीन डिनर सेट आणलाय... अजून उद्‌घाटनही नाही केलंय त्याचं!
बहीण अमेरिकेहून उद्या फोन करणार होती... तिच्या बाळाचे फोटो पाठवणार होती!
परदेशी युनिव्हर्सिटीतल्या मुलाच्या अ‍ॅडमिशनचं पत्र एक-दोन दिवसांत येणारच होतं...
मेडिकल चेक-अपचे रिपोर्टस्‌ उद्या मिळणार होते...
पण आता ते सगळं कळायला, पाहायला या घरात आपण परतू शकणार आहोत का? ठाऊक नाही!
उद्या यावेळेला आपण कुठे असणार आहोत? माहीत नाही!
कोण असणार आहोत? मृत्यूनं सुटका केलेले की त्यानं गाठेपर्यंत दगडविटांच्या ढिगार्‍याचा भार सहन करणारे? सांगता येत नाही!
शेवटी सगळ्यातून मृत्यूच सोडवणार आहे का? तोच सगळ्यांवर हुकूमत गाजवतो का? मग काळवेळ न बघता पुढ्यात ठाकलेली ही आपत्ती, तोंडचं पाणी पळवणारी, क्षणभंगुरतेच्या, आपण निसर्गाच्या दयेवर जगतोय या जाणिवेच्या सुया टोचणारी... तिला काय म्हणायचं? ती तर मृत्यूलाही वाकुल्या दाखवतेय...
ती दृष्यं, तो सगळा गोंधळ सारिकाला पुन्हा आठवला.
त्यावर आता तीन-चार तास उलटून गेले होते. पण काळजातली कालवाकालव कमी झालेली नव्हती!
परिस्थिती माणसाला किती बदलून टाकते! नाहीतर नीरजशी अबोला धरलेली, अपमानानं आतून धुमसणारी सारिका एव्हाना सईला दामटवून स्वतःही झोपी गेली असती.
मृत्यू कायमची सुटका करत असेल तर झोपेमुळे तात्पुरती सुटका होत असेल बहुतेक. अशीच एक झोप घ्यावी आणि उद्या सकाळी उठल्यावर सर्वकाही सुरळीत असलेलं दिसावं नजरेसमोर... एवढी एकच आंतरिक इच्छा होत होती आता.
जागेपणी स्वप्नरंजन चाललं होतं आणि रात्र पुढे सरकता सरकत नव्हती.

टाकीवरच्या मुलांच्या कोंडाळ्यात आता अजून एक-दोघंजण सामील झाले होते. किटकिटणारं बॉलपेन आता हाताच्या तीन बोटांमधे गोलगोल फिरत होतं. वर्देकाकांच्या पायापासच्या वाळक्या पानांचे तुकडे झाले होते. काका आता पारालाच टेकून खाली गवतात डोळे मिटून बसले होते. बाकांच्या मागे पानमसाल्याच्या रिकाम्या पुड्यांसोबत सिगरेटची थोटकं येऊन पडली होती.
वॉचमनचा रेडियो आता शांत झाला होता. तसंही आता पहाटे चार वाजेपर्यंत बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवला काय, न ठेवला काय, फारसा फरक पडणार नव्हता. सतत एकत्र असणार्‍या त्या तिघी अजूनही बडबडत होत्या. मगाशी मध्ये बसलेली आता उठून उरलेल्या दोघींच्या पुढ्यात उभी होती. आपल्या साडीचा पदर आता तिनं दोन्ही खांद्यांवरून लपेटून घेतला होता. जमदाडे बसल्या जागेवरून तिच्याकडेच टक लावून पाहत होता.
स्तब्धतेचा दुसरा प्रहर सुरू झाला होता.

मरगळलेल्या चेहर्‍यानं आणि तितक्याच मरगळलेल्या मनानं सारिका गाडीत सईजवळ जाऊन बसली.
मगाशी थोडावेळ तिच्याशी बोलून निघून गेलेल्या वर्देकाकू पुन्हा तुरूतुरू तिच्या दिशेनं आल्या. त्यांना नक्कीच काहीतरी सांगायचं होतं.
"सारिका, माझ्याऐवजी तिच्या मुलांना बसू दे का गं गाडीत?", गाडीच्या खिडकीजवळ वाकून त्यांनी तिला विचारलं.
"तिच्या? म्हणजे कुणाच्या?", सारिकानं वेड पांघरलं, पण तिच्या चेहर्‍यावरची नाराजी लपली नाही.
"अगं, म्हणजे बिंदियाच्या...", बोलताना काकू नकळत डावीकडे हात दाखवत होत्या.
"काकू, मी तुम्हाला आत बसा म्हटलं होतं... सगळ्या जगाला नव्हे!"
सारिकाचा उपरोधिक स्वर काकूंच्या लक्षात आला नाही.
"बघ ना गं, बिचारी दोघंही तिच्याजवळ इतकी निमूटपणे बसलीयेत की, बघूनच मला कीव येतेय गं त्यांची. धाकटा तर कधीचा पेंगतोय..."
सारिकाच्या चेहर्‍यावरची नाराजी अजूनही तशीच होती. कीव करणं तर दूरच, तिला बिंदियाचा आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा, अगदी तिच्या नावाचाही, राग यायचा. फक्त राग!
ती काकूंना काहीतरी उत्तर देणार इतक्यात प्रवेशद्वाराच्या दिशेनं काहीतरी गडबड ऐकू आली. काय चाललंय ते बघायला काकू पुन्हा मागे वळल्या. पाण्याच्या टाकीवर बसलेल्यांची कुजबूज थांबली. बोटांत फिरणारं पेनही थांबलं. बडबडणार्‍या तिघीही एकदम गप्प झाल्या. सगळ्यांच्याच माना तिकडे वळल्या. एक रिक्षा येऊन थांबली होती. एक दारुडा उतरून पैश्यांवरून रिक्षावाल्याशी भांडत होता. शिवीगाळ करत होता. थोड्याच वेळात रिक्षा निघून गेली. दारुडा तसाच काहीतरी बरळत प्रवेशद्वारातून आत शिरला.
केबिनमधे कोपर्‍यात बसून डुलक्या घेणारा वॉचमन त्या आवाजाने उठून बाहेर आला. पण दारुडा कोण आहे ते कळताच आल्या पावली मागे वळला. बाकावरच्या तिघींनी अचानक आपला गप्पांचा विषय बदलला. तोंडाचा चंबू करून, डोळे मोठे करत दारुड्याबद्दल त्या आपांपसांतच काहीतरी सांगायला लागल्या. वर्देकाकांनी दारुड्याकडे नुसतं एकदा बघितलं आणि स्वतःशीच मान हलवत पुन्हा डोळे मिटून घेतले. नीरजनं हातातल्या फाईल्सना पुन्हा एकदा चाचपलं. त्यापलिकडे त्याला इतर कुठलीही प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नाही.
पुढे गेलेल्या वर्देकाकू मध्येच मागे वळून गाडीच्या दिशेला पाहत होत्या. गाडीच्या खिडकीतून सारिकाही दारुड्याच्या दिशेला पाहत होती. पण तिला तेव्हाच गाडीच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. तिनं वळून पाहिलं. गाडीच्या मागच्या बाजूला एक बाक होता. तिथे बसून पेंगणार्‍या, आपल्या हातावर रेललेल्या मुलाला बाजूला सारून बिंदिया उठून उभी राहिली होती. मगाशी काकूंचं बोलताबोलता डावीकडे हात दाखवणं, आताचं मागे वळून पाहणं या सगळ्यांचा सारिकाला आता उलगडा झाला. बिंदिया या इथे येऊन बसली होती तर! अर्थात इतका वेळ सारिकाला तिच्या उपस्थितीची दखल घेण्याचं काहीच नडलं नव्हतं.
झोपमोड झाल्यामुळे बिंदियाचा मुलगा कुरकुरायला लागला. पण मोठीला त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगून ती प्रवेशद्वाराच्या दिशेनं चालायला लागली. सर्वांदेखत आपल्या दारुड्या नवर्‍याला सावरायचं दिव्य तिला पुन्हा एकदा करायचं होतं! तिच्या हालचालींत एक थंड, मख्ख कोरडेपणा होता. सर्वांच्या नजरा आपल्यावरच खिळल्या असणार, याची तिला जाणीव होती पण पर्वा नव्हती.
चारचौघींसारखी तीही एक विवाहित स्त्री. वयही फार काही जास्त नव्हतं तिचं. पण तिच्या रडण्याभेकण्याचे दिवस आता मागे पडले होते कदाचित. मुलं लहान, छोट्या गावातलं माहेर, स्वतः नोकरी करून घर चालवत असूनही घराच्या दारावर लटकणारी दारुड्या नवर्‍याच्याच नावाची पाटी या सगळ्या गोष्टी तिला इतर चारचौघींपासून वेगळं काढत होत्या...
इतकी वर्षं मजल्यावर समोरच रहात असूनही तिच्याशी धड चार वाक्यंही कधी बोलली गेली नव्हती; बोलावीशी वाटलीच नव्हती. पण आता मात्र ती दृष्टीक्षेपात असेतोवर गाडीतून तिचं नीट निरीक्षण करायची मुभाच जशी काही सारिकाला मिळाली. पुन्हा मनात नकळतच तुलना सुरू झाली.
सुनयना मनालीला जाण्यापूर्वीच्या शेवटच्या ट्रेकला आपण धमाल करत होतो, तेव्हा कदाचित हिचा नवरा प्रथम दारू पिऊन घरी आला असेल...
संध्याकाळी आपलं आणि नीरजचं भांडण झालं, तसंच कधीतरी दारू पिण्यावरून यांचंही झालं असेल..........
आपल्याला ऑफिसमधे पहिल्यांदाच बढती मिळाली, त्यादिवशी कदाचित हिला नवर्‍यानं प्रथम मारहाण केली असेल...
घरात बागडणार्‍या लहानग्या सईचे फोटो काढण्यात आपण गर्क होतो, तेव्हा हिची मुलं बापाचा अवतार बघून कोपर्‍यात भेदरून बसली असतील...
सारिकाला बिंदियाच्या चेहर्‍यामागची काहीतरी ओळख पटतेय असंच वाटायला लागलं अचानक. नाईलाजावर कोरेपणाचा मुलामा चढवणारा तो चेहरा, सर्वकाही ठीकठाक असल्याचं दाखवू पाहणारा!
सईला डास चावायला लागल्यावर आपण नीरजशी बोलायला गेलो, तेव्हा आपला चेहराही असाच होता का? या विचारासरशी सारिका चपापलीच एकदम.
बिंदियावरची नजर तिनं काढून घेतली. स्वतःला बिंदियापासून लांबच ठेवायचं होतं तिला. दोघींमधली काही साम्यस्थळं ही कल्पनाच तिला नकोशी वाटली. नकळत तिचं लक्ष गाडीतल्या लाल रंगात लुकलुकणार्‍या घड्याळाकडे गेलं. रात्रीचे एक वाजून एकोणसाठ मिनिटं आणि छप्पन्न सेकंद झाले होते.
आता फक्त दोन तास! मनाशी पटकन हिशोब झाला. पण सारिकानं स्वतःशीच शोधलेला हा काडीचा आधार कितपत कामाला येणार होता? तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनी धोका कायम असणार होता; तर मग चार वाजून एक मिनिटांनी? तो टळणार होता?? निसर्गाला मानवनिर्मित घड्याळ कसं कळावं? पहाटेचे चार काय आणि पाच काय- विज्ञानाच्या आधाराने वर्तवलेले ते केवळ अंदाज. निसर्गाच्या पुढ्यात असल्या अंदाजांच्या लक्ष्मणरेषा कुणी आणि किती खेचायच्या?
पण माणसाला तरी निसर्गाच्या लहरी स्वभावाचा थांग कसा लागावा? आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर असे ठोकताळे बांधण्यापलीकडे त्यानं तरी काय करावं? खरंतर मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक भाग. मग तो आपल्यातल्याच एका घटकाची अशी परीक्षा का पाहतो? की हे सगळं नैसर्गिकच आहे, असं म्हणून फक्त त्याला निमूटपणे तोंड देण्याचं काम माणसानं करायचं? विचारक्षमता, सदसद्‌विवेकबुद्धी साथीला असूनही ऐन कसोटीच्या क्षणी माणूस का हबकतो? ज्याचं त्याचं विधिलिखित निसर्गानंच ज्याच्या त्याच्या निर्मितीच्या वेळी योजून ठेवलेलं. मग जन्माचा सोहळा, मृत्यूचा शोक का केला जातो?
की ऐन कसोटीच्या क्षणी सगळी सूत्रं निसर्गाच्या हातात जातात, माणसाच्या हातांत काहीच राहत नाही म्हणून तो शोक, ते हबकणंही नैसर्गिकच? मग तर माणसाच्या सर्वच भावभावनांना हा नियम लागू करायला हवा. प्रेम, आपुलकी, आनंद, जिव्हाळा, ममता यांना कुठल्याही काठीची गरज नाही. पण राग, लोभ, द्वेष, मत्सर, असूया, चीड... भावभावनांचे हे आविष्कारही नैसर्गिकच म्हणायला हवेत!
सारिकानं सुनयनाशी केलेली स्वतःची तुलना, नीरजशी केलेलं भांडण, त्याचा सईवर काढलेला राग, वर्देकाकूंची गाडीची अपुरी राहिलेली इच्छा, बिंदियाच्या नवर्‍याचं व्यसन, तिची सोशिकता... सगळंच नैसर्गिक! सगळंच आपापल्या जागी योग्य!
अगदी जमदाडेचं बायकांना न्याहाळणंसुद्धा!
दारुच्या नशेत बिंदियाचा नवरा रिक्षातून उतरल्यापासून जमदाडे नेमकं तेच करत होता. बिंदियावर पक्की नजर ठेवून होता. अगदी नीरजकडून पटकावलेल्या बाकावरच्या जागेचा तिच्यासाठी त्याग करायचीही त्याची तयारी दिसत होती. कारण ती जागची उठलेली पाहताच तिच्याकडे लक्ष नसल्याचं दाखवत तोही उठला. टाकीवरच्या कोंडाळ्यातल्या पेन फिरवणार्‍यानं आपल्या शेजारच्याला काही न बोलता कोपरानं नुसतं ढोसलं. त्यानं मागे वळून पाहिलं आणि तिसर्‍याचं लक्ष तिकडे वेधलं. एकएक करत ते सगळे जमदाडेकडे बघून तोंड दाबत हसायला लागले. तोंडाचा चंबू करून बोलणार्‍या तिघींना पुन्हा आपला गप्पांचा विषय बदलावा लागला. डोळ्यांनी एकमेकींना इशारा करत त्या चेहर्‍यावरचं कुत्सित हसू लपवायचा प्रयत्न करायला लागल्या.

‘ए-१०३ श्री. प्रकाश अ. जावळे.’ भिंतीवरच्या यादीतल्या आपल्या नावाकडे हेंदकाळणार्‍या नजरेनं पाहत बिंदियाचा नवरा इमारतीत शिरायला लागला. वॉचमन आपला कर्तव्य म्हणून पुन्हा उठून केबिनच्या बाहेर आला. चार पावलं पुढे झाला. पण त्याच्या किंवा बिंदियाच्या आधी जमदाडेनंच धावत जाऊन जावळेला सावरलं. त्याच्या खांद्याभोवती हात टाकून त्याला जवळपास ढकलतच इमारतीपासून दूर आणलं. जावळे त्याला सारखा विरोध करत होता. जड जीभेनं काहीतरी बरळत होता. ‘...मग मलाही घरी जाऊ दे, घरी जाऊ दे’ म्हणत होता. मधेच बिंदियाचा उल्लेख करून घाणेरड्या शिव्या देत होता.
त्याच्या बरळण्यातले काही शब्द वॉचमननं नेमके टिपले आणि पहिल्या मजल्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून तो लगबगीनं वर्देकाकूंजवळ आला.
"आपके सामनेवाले एकसोचारके वो बूढे अंकल-आँन्टीके घर का लाईट दिख रहा है! तुम्ही तर म्हणत होतात की, ते घरात नाहीयेत..."
"?????"
"हा जावळे म्हणतोय की, ते घरात आहेत तर मला का तुम्ही आत जाऊ देत नाही!"
"सिंग आजी-आजोबा घरात आहेत??", वर्देकाकूंना ते ऐकून आश्चर्यमिश्रित धक्का बसला.
"लाईट तो चालू है उनका...!"
त्यावर त्या काही बोलल्या नाहीत. सिंग आजी-आजोबा जाताना नेहमी त्यांना सांगून जायचे. कालही तसेच गेले होते दुपारी. नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलानं गाडी आणि नोकर पाठवला होता. आता ते दोन-तीन दिवस तरी परतणार नव्हते. पण हा वॉचमन म्हणतोय ते खरं असेल तर ते परत आलेले आपल्याला कळले कसे नाहीत याचं काकूंना आश्चर्य वाटलं. बाहेरचा सगळा गोंधळही आजी-आजोबांना ऐकू कसा गेला नाही ते समजत नव्हतं. सिंग आजी सतत आजारी, निजूनच असायच्या. त्यांनी दिवसभर कामाला एक बाई ठेवलेली होती. ती त्यांचा रात्रीचा स्वयंपाक करून सात-साडेसातला निघून जायची. तीही कदाचित आली नसणार आज! काय करावं? वर्देकाकू क्षणभर गडबडल्या. एरवी तरातरा जाऊन त्यांनी सरळ आजी-आजोबांच्या दारावरची बेल वाजवली असती; त्यांचं दार ठोठावलं असतं; त्यांना हाका मारल्या असत्या. पण आता.... इमारतीत आत शिरायचं म्हणजे... त्या तर इमारतीच्या जास्त जवळ जायलाही बिचकत होत्या. पण आजी-आजोबांची चौकशी करणं तर गरजेचंच होतं.
त्यांनी वॉचमनला खालूनच आजोबांना हाका मारायला सांगितलं.
वॉचमन बाहेर रस्त्यावर आला. आजी-आजोबांच्या घराची एक बाल्कनी रस्त्याच्या दिशेला उघडत होती. घरात एक दिवा चालू असलेला दिसत तर होता. त्याच बाल्कनीच्या साधारण पुढ्यात उभं राहून त्यानं रस्त्यावरूनच आजोबांना हाका मारायला सुरूवात केली.
तो आवाज ऐकून वर्देकाका उठून उभे राहिले. काकूंजवळ येऊन समोर काय होतंय ते पहायला लागले. पाण्याच्या टाकीवरचं टोळकं उठलं आणि एकएक करून त्यातले सगळे बाहेर वॉचमनपाशी येऊन उभे राहीले. त्याच्या आवाजात आवाज मिसळून आजोबांना हाका मारायला लागले. रस्त्यावरही गटागटानं लोक उभेच होते. ते सावध झाले. आसपासच्या सोसायट्यांमधूनही माणसं डोकावली. ‘काय झालं? काय झालं?’ची कुजबूज वाढली.
दहा-पंधरा मिनिटं हाकांचा सपाटा लावल्यानंतर वरच्या बाल्कनीचं दार हळूहळू उघडलं गेलं. दाराच्या चौकटीला, भिंतीला धरत धरत आजोबा बाहेर आले. खाली इतकी गर्दी पाहून त्यांना काहीच कळेना.
‘काय झालंय’ अशा अर्थानं हात हलवत त्यांनी वॉचमनकडे बघितलं.
"अंकल, नीचे आओ। ये बिल्डिंग गिरनेवाली है...", वॉचमननं जाहीरच करून टाकलं.
"अर्थक्वेक... अंकल, अर्थक्वेक ऽऽ"
"खाली या आजोबा... घरात थांबू नका."
"सगळे खालीच आहेत. तुम्हाला आणि आजींनापण खाली यावं लागेल."
सर्वांनी एकच गलका केला.
ते ऐकून आजोबांनी आसपास नजर टाकली. त्यांच्या अधू होत जाणार्‍या डोळ्यांनी ही अवेळीची गजबज टिपली. क्षण-दोन क्षण स्तब्धतेत गेले आणि मान आणि हात नकारार्थी हलवत आजोबा मागे फिरले. रस्त्यावरचे सर्वजण एकमेकांकडे पाहायला लागले. त्यांच्या हाकांकडे दुर्लक्ष करत आजोबांनी बाल्कनीचं दार पुन्हा लावून घेतलं. खोलीतला दिवा बंद केला आणि ते पुन्हा आजी झोपल्या होत्या, त्या खोलीकडे वळले.
खोलीत आमोरासमोर दोन पलंग होते. एका पलंगावर आजी झोपल्या होत्या. झोपेची औषधं रोजच्याप्रमाणेच आपलं काम चोख बजावत होती. त्या आता अजून तीन ते चार तास जाग्या होणार नव्हत्या. त्यांच्या कृश झालेल्या शरीरकुडीच्या मानानं तो पलंग खूपच मोठा भासत होता. पलंगाभोवती औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकीटं यांचा गराडा होता. एका कोपर्‍यात कॅथेटरची पिशवी लटकत होती.
आजींकडे एक थकलेली नजर टाकत आजोबा आपल्या पलंगावर पुन्हा लवंडले. डोक्याशी लटकणारं बटण दाबून त्यांनी खोलीतला दिवा विझवला आणि डोळे मिटून घेतले. बाथरूमच्या बाहेर जळत असलेल्या दिव्याचा पांढुरका प्रकाश पुन्हा घरभर पसरला. भूकंपाचा धोका, अर्थक्वेक... आजोबांच्या कानांतले लोकांचे आवाज क्षीण क्षीण होत गेले.

काय करावं ते न सुचून, वॉचमनसहित सगळं टोळकं थोड्या वेळानं पुन्हा आत आलं. बडबडणार्‍या तिघींनी त्यांच्यापैकी काही जणांना हटकलं. काय झालं, आजोबा काय म्हणाले ते त्यांना विचारलं. वर्देकाका-काकूही त्यांना जाऊन मिळाले. तिथेच कोंडाळं करून सर्वांचं पुन्हा कुजबुजत बोलणं सुरू झालं.
दरम्यान जमदाडेनं जावळेला कोपर्‍यातल्या एका बाकावर आपल्याशेजारी बसवून घेतलं होतं. ते बघून बिंदिया अर्ध्या वाटेतूनच परत फिरली होती. पुन्हा आपल्या मुलांजवळ येऊन बसली होती. ती आता मांडीवर पेंगुळलेल्या मुलाला थोपटायला लागली. मोठी मुलगी शेजारी तिच्या हातावर रेलली.
सारिकानं गाडीत बसल्या बसल्या मागे डोकं टेकून डोळे मिटून घेतले.
नीरजनं हातातली फाईल्सची पिशवी अजूनच कवटाळून धरली.....

- ललिता-प्रीति

Taxonomy upgrade extras: