कोलाहलाचा रंगीत कोलाज

जाणिवांचे हे असेच परिणाम व्हावेत हा अट्टाहास नाही. या उघड प्रवाहांच्या विपरीत, कलावंताशी अद्वैत सांगणारा तितकाच दमदार, जाणिवांचा अंतस्थ प्रवाहही असतोच. कलावंताच्या स्वांतसुखाय प्रकृतीला साजेसा हा प्रवाह जेव्हा सशक्त आणि अभिजात आविष्कार घडवतो तेव्हा कालातीत कलाकृती जन्माला येते.

border2.JPG

त्क्रांतीदरम्यान शेपूट गळून माकडाचे मानवप्राण्यात रूपांतर होणे हा एक मोठा टप्पा मानला, तर आदिमानवाने शारीर संवेदनांच्या पल्याडच्या जाणिवांचा केलेला कलाविष्कार, हा तितकाच मोठा टप्पा मानला पाहिजे. आदिमानवाने काढलेली गुंफाचित्रे असोत वा मोत्झार्टच्या रचना असोत, जाणिवांचे प्रवास आणि त्यांचे कलांवर होणारे परिणाम अगदी लख्ख दिसून येतात. एक बोधचित्रं म्हणून पुढील चित्र पाहा:

Samved 1.jpg

या जाणिवांच्या प्रवासाची असंख्य उदाहरणे देता येतील. कलावंताचे कोश दाट असले तरीही बाह्य जाणिवांचे परिणाम टाळणे सर्वांनाच जमते असे नाही. रविवर्म्याने काढलेली राजघराण्यांतील व्यक्तींची चित्रे, गोयाचे एक्स्जिक्युशन ऑफ मॅड्रीड डीफेन्डर्स (Execution of the Madrilenos) किंवा पिकासोचे गेर्निका ही राजकीय/सामाजिक जाणिवांच्या कलेवर होणार्‍या परिणामांची उत्तम उदाहरणे होत. कलात्मक जाणिवांमुळे होणार्‍या राजकीय/सामाजिक परिणामांची उदाहरणे कमी असली तरी अत्यंत प्रभावशाली आहेत. आपल्या शाळांमधून वर्षानुवर्षे ज्या सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन होते, ते रविवर्म्याचे एक चित्र आहे हे आपण साफ विसरुन गेलो. ज्या भारतात पुरुषांच्या मिश्या सत्ता, वर्चस्व आणि सनाथ असण्याच्या ग्वाही देत, तिथेच केवळ रविवर्म्याच्या कृपेने आम जनतेने एकदिलाने तुळतुळीत चेहर्‍याच्या युरोपिअन धाटणीच्या प्रतिमांना देव म्हणून देवघरात जागा दिली. दुसरे सशक्त आणि जागतिक स्तरावरचे उदाहरण द्यायचे तर शांततेचे प्रतीक म्हणून वापरले जाणारे कबूतर. ख्रिश्चन पुराणातून आलेले ऑलिव्हच्या डहाळीचे संदर्भ आणि नोह आणि आर्कच्या कथेतून आलेले कबूतर पिकासोने चपखलपणे शांततेच्या प्रतीकात बसवले आणि पिकासोचा लिथोग्राफ शांततेचे एक सर्वमान्य प्रतीक झाले. (मूळ लिथोग्राफ फक्त कबुतराचा आहे. त्यात ऑलिव्हची डहाळी नाही. ती नंतरच्या रेखाटनात आली)

जाणिवांचे हे असेच परिणाम व्हावेत हा अट्टाहास नाही. या उघड प्रवाहांच्या विपरीत, कलावंताशी अद्वैत सांगणारा तितकाच दमदार, जाणिवांचा अंतस्थ प्रवाहही असतोच. कलावंताच्या स्वांतसुखाय प्रकृतीला साजेसा हा प्रवाह जेव्हा सशक्त आणि अभिजात आविष्कार घडवतो तेव्हा कालातीत कलाकृती जन्माला येते. एमिली डिकीन्सन, रायनर मारिया रिल्के इ. सारी कलावंत मंडळी या पायवाटेवरची.

Samved2.jpg
जाणिवांच्या या उलटसुलट प्रवाहांना कलावंत म्हणून यशस्वीपणे हादरवणारे एक रसायन म्हणजे पाब्लो पिकासो. १८८१ मध्ये जन्माला आलेला हा स्पॅनिश चित्रकार सर्वार्थाने यशस्वी चित्रकारांपैकी एक मानला जातो. जवळजवळ पन्नासएक हजार कलाकृती (चित्रे, शिल्पे आणि बरेच काही), 'बॉय वुईथ पाईप'सारखी $ दहा कोटीचा टॅग मिरवणारी अत्यंत महागडी चित्रे, पाचशेच्या वर चोरीला गेलेल्या कलाकृती असा साराच छाती दडपून टाकणारा मामला. सारी सांख्यिकी क्षणभर बाजूला ठेवली तरी पिकासोचे कलंदर कलावंतपण जमिनीच्या वीतभर वर राहतेच.

टप्प्याटप्प्यांमध्ये जगणार्‍या आपल्यासारख्या लोकांनी पिकासोचीही विभागणी काही टप्प्यांमध्येच केली आहे.

ब्ल्यू-पिरियड- निळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर हा या काळाचा विशेष. तरुण पिकासो प्रस्थापित चौकटी मोडू पाहत होता. माणसासारखी दिसणारी माणसे रंगवण्यात त्याला गम्य नव्हते. (पिकासोच्याच शब्दांत : I paint objects as I think them, not as I see them.) कलावंताची आदर्श प्रतिमा म्हणजे दुःख, नैराश्य, वैफल्य यांनी ग्रासलेला गांजेबाज, तुटक पण प्रतिभावंत प्राणी असण्याचा तो काळ. अशा उदास, उद्ध्वस्त काळासाठी प्रातिनिधिक रंग तो निळा. या काळातील बरीचशी चित्रे एकटेपणा, मृत्यू यांचे चित्रण करतात. लाईफ, टू सिस्टर्स ही काही या काळातील गाजलेली चित्रे.

रोज पिरिअड - पिकासोच्या ब्ल्यू-पिरिअडचे वर्गीकरण जसे स्पष्ट होते, नेमके तसेच रोज पिरिअडबद्दल सांगता येणार नाही. ब्ल्यू-पिरिअड ते क्युबिझम यांच्या दरम्यान पसरलेल्या रोज पिरिअडमधे (दरम्यान, समांतर म्हणावा असा ब्लॅक पिरिअडही सुरु होताच) रेषांचा सुस्पष्ट वापर ठळकपणे दिसून येतो. ज्या सादरीकरण-परिणामकारकतेसाठी (एक्सप्रेशनिझम)पिकासो प्रसिद्ध झाला, त्याचा पाया त्याने केलेल्या रेषा आणि सादरीकरणाच्या प्रयोगांत होता. ब्ल्यू-पिरिअडमधल्या चित्रांकरवी भावनांचा उद्रेक निवल्यानंतर पिकासोच्या चित्रांमध्ये व्यक्तीसापेक्ष भावनांचे सादरीकरण कमी कमी होत गेले. भावभावनांचे विषयनिष्ठ ते वस्तुनिष्ठ आविष्कार असा रोज पिरियडमधला त्याचा प्रवास सुरू झाला आणि या प्रयोगाचा शेवट क्युबिझममध्ये झाला.

ब्लॅक पिरियड- या काळात पिकासो आफ्रिकन कलेच्या प्रभावाखाली होता. आफ्रिकन मुखवट्यांसारखी दिसणारी पसरट, फताड्या नाकांच्या माणसांची अनेक चित्रे पिकासोने या काळात काढली.

क्यूबिझम- त्रिमित आकार द्विमित कॅनव्हासवर काढताना दृश्यकोनांची होणारी ओढाताण पिकासो (आणि जॉर्ज्स ब्राक) यांनी क्युबिझमच्या माध्यमातून सोडवली. एकाच चित्रात विविध कोपर्‍यांतून दिसणार्‍या प्रतिमांना रंगवणे हे क्युबिझमचे वैशिष्ट्य. अमूर्त चित्रकलेचा पाया क्युबिझमच्या काळापासून रुजला असं म्हणतात.

अतिवास्तववाद (सरिअ‍ॅलिझम)- कोणत्याही पूर्वग्रहांपासून मुक्त, केवळ आणि केवळ विचारांची प्रतिक्रिया व्यक्त करणे हे अतिवास्तववादाच्या काळाचे वैशिष्ट. गेर्निका हे या प्रभावाखालचे सर्वांत महत्त्वाचे चित्र.

Samved 3.jpg

पिकासोने काही हजार चित्रे काढली किंवा त्याच्या चित्रांचे कित्येक कोटी डॉलर्स मिळतात हे फार महत्त्वाचे नाही. त्याने जाणिवांचे सारे प्रवाह जोखले हे महत्त्वाचे. दिसते तसे उतरवणार्‍या इंप्रेशनिस्ट पिढीच्या पुढे जाऊन प्रकाशाचे आणि दृश्यकोनांचे प्रयोग केले. 'I have a horror of people who speak about the beautiful. What is the beautiful? One must speak of problems in painting!' असे म्हणत त्वचेखालची माणसे, क्वचित क्रूरपणेही रंगवली. माध्यम आणि शैलीच्या मोहात न पडता जाणिवा आणि संवेदनांचे चित्रण करताना अभिव्यक्तीच्या नव्या भाषा तयार केल्या. क्यूबिझम, कोलाजच्या माध्यमातून नव्या शक्यता शोधताना प्रस्थापित चौकटींची बंधने उडवून लावली. भारतीय डोळ्यांना सवय नसणारी पिकासोची चित्रशैली पाहिली की काहींना प्रश्न पडतो खरंच का तो इतका मोठा होता?

पिकासोनं त्याचेही उत्तर देऊन ठेवले आहे -

My mother said to me, "If you are a soldier, you will become a general. If you are a monk, you will become the Pope." Instead, I was a painter, and became Picasso".

- संवेद

Taxonomy upgrade extras: