स्पंदन

मी

दहावीत असताना जेव्हा जेव्हा अभ्यास करायचे, तेव्हा माझ्यातली चित्रकार आपली कला दाखवत असे. अभ्यासाच्या प्रत्येक वहीत मी डोळे, नाक, फूल, पानांची चित्रे काढत असे. हे माझ्या आईबाबांनाही समजले. दहावीची परीक्षा झाली. नंतर अकरावीला कुठला विषय घ्यावा, याबद्दल मी फार गोंधळात होते. तेव्हा माझ्या आईने मला समजावले की, तू इतर कुठला दुसरा विषय घेण्यापेक्षा चित्रकला हाच विषय घे आणि त्यातच पुढे काहीतरी कर. मलाही ते पटले. मग मी अकरावी आणि बारावीत चित्रकला हा विषय घेतला. माझे एकच स्वप्न होते की, पुण्यातल्या ’अभिनव कला महाविद्यालया’तूनच चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे. मी त्या दिशेने वाटचाल सुरू केली. उज्जैनला जाऊन 'इंटरमीजिएट'ची परीक्षा दिली आणि बारावी झाल्यावर पुण्यात आले. पण मला ’चित्रलीला कला महाविद्यालय’ इथे पहिले वर्ष करावे लागले आणि दुसर्‍या वर्षी अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला. माझे स्वप्न पूर्ण झाले.

अभिनवमध्ये शिकत असताना खर्‍या अर्थाने चित्रकलेची नव्याने ओळख झाली. सगळे चांगले शिक्षक लाभले. त्यांच्याकडून बरेच चांगले शिकायला मिळाले. त्याच दरम्यान मी आमच्या कॉलेजमधील सिनियर नॅशनल आर्टिस्ट आणि शिक्षक श्री. जयप्रकाश जगताप ह्यांच्याकडे चित्रकला शिकायला जात असे. त्यांच्याकडून चित्रसंरचना कशी करायची, कुठली रंगसंगती वापरायची, चित्रांतील मांडणी कशी करायची, चित्रात नजर कशी खेळती राहायला पाहिजे, अश्या बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या चित्रांकडे बघून मी मंत्रमुग्ध व्हायचे. सर इतक्या सहज इतकी सुंदर चित्रे कशी काढू शकतात, याचे मला फार आश्चर्य वाटायचे.

एन. एस. बेंद्रे, माधव सातवळेकर, डी. डी. दलाल, देऊस्कर, शिवाक्ष चावडा, एम. एफ. हुसेन, रवी परांजपे, जयप्रकाश जगताप, मिलिंद मुळीक हे माझे आवडते चित्रकार आणि श्रद्धास्थाने आहेत.

पुण्यनगरी

पुण्यात राहिल्यामुळे निसर्गचित्रे काढण्यासाठी स्थळांची कमतरता कधी जाणवलीच नाही. मंडईमधली दृश्ये, संभाजी बागेत रोजचा ताणतणाव विसरायला येणारी मंडळी, पुण्यातल्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असणारे वाडे यांचे चित्रण करताना वास्तव चित्रांत उलगडून दाखविण्याचा प्रयत्न असायचा. हळूहळू चित्रांमधील तांत्रिक बाबींचा विचार करून वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. हे सगळे करत असताना चित्रांतील काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास सुरू ठेवला. यात रेषांचा प्रभावी वापर, गोष्टींचा स्थायीभाव, आकार, वेळा इत्यादी गोष्टी चित्रांमध्ये कश्या दाखवता येतील, ह्यावरही भर दिला.

ही माझी काही चित्रे!

चित्रमालिका पाहण्यासाठी खालीलपैकी कुठल्याही प्रकाशचित्रावर टिचकी मारा.

d9.jpg d10.jpg d11.jpg d12.jpg d13.jpg d14.jpg d15.jpg d16.jpg d17.jpg DSC02930.JPG DSC02933.JPG DSC02950.JPG DSC02951.JPG DSC02957.JPG DSC02961.JPG DSC03002.JPG DSC03009.JPG

-धनश्री पेंडसे

Taxonomy upgrade extras: