तेजस्विनी सावंत

तेजस्विनी सावंत या महिला नेमबाजाने जागतिक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्णपदक पटकावलं, आणि भारताची मान अभिमानानं उंचावली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या आधीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने लक्षवेधी कामगिरी करून भारतीय नेमबाजीची जगाला दखल घ्यायला लावली होती. प्रशिक्षणाचा व नेमबाजीसारख्या महागड्या खेळासाठी आवश्यक असणार्‍या आर्थिक पाठबळाचा अभाव, यांवर मात करत तेजस्विनीनं जे यश मिळवलं आहे, ते खरोखर अद्भुत आहे. तेजस्विनी सावंत या सुवर्णकन्येची ही तेजस्वी यशोगाथा...

border2.JPG

tejaswini.jpg

ला लहानपणापासूनच गणवेशाचं प्रचंड आकर्षण होतं. सैन्यात जावं, किंवा पोलिस व्हावं, असं मला नेहमी वाटायचं. शाळेत, कॉलेजात मी एनसीसीत होते, आणि तेव्हा मला माझी ही हौस थोडीफार पूर्ण करता आली. तिथेच नेमबाजीशी माझी पहिली ओळख झाली. सर्वोत्कृष्ट कॅडेट आणि सर्वोत्कृष्ट नेमबाजाची बक्षिसं मला कॉलेजात मिळाली होती. नेमबाजीची आवड तर होती, पुढे याच खेळात अजून कौशल्य मिळवावं, अशी खूप इच्छाही होती. माझ्या सुदैवाने तेव्हा माझी ओळख श्री. जयसिंह कुसळे सरांशी झाली. श्री. कुसळे सर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाज आणि कोच. 'नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया'चे ते तेव्हा उपाध्यक्ष होते. मूळचे आमच्या कोल्हापूरचे.

१९९९ साली कुसळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी नेमबाजीचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी कोल्हापूरात नेमबाजीच्या सरावासाठी चांगल्या सोयी अजिबात नव्हत्या. आत्ता आपण बसलो आहोत, त्या बालेवाडीतली ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज आहे. जगातल्या सर्वोत्तम सोयी इथे आहेत. पण कोल्हापूरात अगदी प्राथमिक सोयीसुद्धा तेव्हा अस्तित्वात नव्हत्या. कुठल्याही चांगल्या रेंजमध्ये इलेक्ट्रॉनिक पुलीच्या मदतीनं टारगेट पुढेमागे करता येतं. कोल्हापूरातल्या आमच्या रेंजवर आम्हांलाच हातानं हे काम करावं लागे. नंतर काही वर्षांनी मेकॅनिकल पुली आल्या, आणि आता चारपाच वर्षांपूर्वी श्री. नाना पाटेकरांनी इलेक्ट्रॉनिक पुली आम्हांला कोल्हापूरात बसवून दिल्या.

वर्षभर मी कुसळे सरांकडे शिकत होते. दोनतीन स्पर्धांमध्ये बक्षिसंही मिळवली. पण १९९९ साली डिसेंबर महिन्यात सर आजारी पडले, आणि त्याच आजारपणात त्यांचं निधन झालं. त्यामुळे माझं प्रशिक्षणही बंद झालं. दीड वर्षं मी नेमबाजीपासून पूर्णपणे दूर होते. २००१ सालापासून मात्र मी परत नेमबाजीकडे वळले. नेमबाजीपासून दूर राहणं मला शक्यच नव्हतं. काही लोकांकडून थोडी आर्थिक मदत मिळाली होती. पुढची तीन वर्षं मी कोल्हापूरात राहूनच सराव केला. या काळात मी कोणाकडूनही प्रशिक्षण घेतलं नाही. माझा मीच सराव करत असे. काही शंका असतील तर त्यावेळी तिथे सराव करणार्‍यांपैकी कोणालातरी विचारत असे. श्री. राजू वडार सर यांच्याकडून मला मार्गदर्शन अधूनमधून मिळत असे. त्यांची जुनी रायफलसुद्धा त्यांनी मला वापरायला दिली होती. सराव परत सुरू करून दोनतीन महिने झाले असतील आणि मला असनसोल इथे होणार्‍या मावळंकर चषक स्पर्धेबद्दल कळलं. खरं म्हणजे तेव्हा मला अजिबातच आत्मविश्वास नव्हता. शूटिंग रेंजपासून मी बराच काळ दूर राहिले होते. मला धीर देतील, शिकवतील असे कोणी प्रशिक्षकही नव्हते. पण तरी मी या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं, आणि महिला स्पर्धकांमध्ये पाचवं स्थान मिळवलं. प्रशिक्षण, सराव असं काहीच नसताना केलेली ही कामगिरी मला बराच हुरूप देऊन गेली. त्याच्या पुढच्याच वर्षी, म्हणजे २००२ साली, मी इंदौरला होणार्‍या कुमार सुरेन्द्रसिंह स्मृती नेमबाजी स्पर्धेत भाग घेऊन रौप्यपदक मिळवलं. २००४ सालापर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मी भाग घेतला आणि पदकं मिळवली. पाच सुवर्णपदकं माझ्या नावावर तोपर्यंत जमा झाली होती. या कामगिरीच्या जोरावर २००४ साली इस्लामाबादेत झालेल्या नवव्या दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धेसाठी माझी निवड झाली. माझी पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती ही. खूप दडपण होतं. पण माझी कामगिरी माझ्या अपेक्षेपेक्षा उत्तम झाली. मला वैयक्तिक पदक मिळालं नाही, पण भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवता आलं.

या स्पर्धेनंतर मात्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आपली स्वत:ची ओळख निर्माण करायचीच, असं मी ठरवलं. तोपर्यंत सर्व स्पर्धांमध्ये मी प्रशिक्षणाशिवायच सहभागी झाले होते. कोल्हापूरात राहून उत्तम प्रशिक्षण कसं घेता येईल, याच काळजीत मी होते. माझ्या सुदैवानं 'स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडिया'नं हंगेरीहून श्री. लास्झलो शुझॅक यांना आमंत्रित करून त्यांची भारतीय रायफल शूटिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली. भारतीय संघांच्या शिबिरांमधून माझं रीतसर प्रशिक्षण मग सुरू झालं. या प्रशिक्षणामुळे माझा खेळ सुधारायला बरीच मदत झाली. नियमित प्रशिक्षण सुरू झाल्यावर काही महिन्यांतच बँकॉक इथे भरलेल्या पहिल्या एशियन एअरगन नेमबाजी स्पर्धेत मी रौप्यपदक मिळवलं, आणि त्यामुळे १० मी. एअर रायफल स्पर्धांच्या जागतिक क्रमवारीत मला चौदावं स्थान मिळालं.

२००६ सालच्या मेलबर्नला भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा त्यामुळे माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. एवढ्या मोठ्या स्पर्धेत मी पहिल्यांदाच सामील झाले होते, आणि माझ्याकडून अपेक्षाही वाढल्या होत्या. अंजली भागवत, सुमा शिरूर यांसारख्या ज्येष्ठ खेळाडूंऐवजी माझी संघात निवड झाल्यामुळे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रांत बरीच चर्चा झाली होती. त्याचंही खूप दडपण होतं. संघात माझी निवड झाली होती ती माझ्या कामगिरीच्या जोरावर. त्यामुळे ’नवोदितांना संधी दिल्याने कमी पदकं मिळतील’, या चर्चेला काहीच अर्थ नव्हता. आपण कुठेही कमी पडता कामा नये, हे मी पक्कं ठरवलंच होतं. माझ्यावर माझ्या प्रशिक्षकांनी टाकलेला विश्वास मला सार्थ ठरवायचा होता. खूप दडपण असूनही मला या स्पर्धेत दोन सुवर्णपदकं मिळवता आली. मजा म्हणजे, दोन सुवर्णपदकांच्या कमाईपेक्षा पैशासाठी आता फार धावपळ करावी लागणार नाही, याचाच तेव्हा जास्त आनंद झाला होता. गेल्या वर्षी झालेल्या म्युनिखच्या 'इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन'च्या, म्हणजेच आय.एस.एस.एफ.च्या जागतिक स्पर्धेचा अनुभवही छान होता. राष्ट्रकुल स्पर्धेत एकाहत्तर देश सहभागी होतात. या स्पर्धेत मात्र याहून बरेच जास्त देश सहभागी असतात. या स्पर्धेत मला कांस्यपदक मिळालं, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर माझी दखल घेतली गेली. 'ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट'साठीही माझी निवड झाली.

भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत मिळावी, या हेतूने श्री. गीत सेठी आणि श्री. प्रकाश पदुकोणे यांनी 'ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट'ची स्थापना केली. लिएंडर पेस, विश्वनाथन आनंद, वीरेन रस्किन्हा यांसारखे ज्येष्ठ खेळाडू या संस्थेच्या संचालकपदी आहेत. गगन नारंग, मेरी कोम, साएना नेहवाल या खेळाडूंच्या यादीत माझंही नाव आलं, आणि दुप्पट जोमाने माझा सराव सुरू झाला. या वर्षीच्या म्युनिखच्या आय.एस.एस.एफ.च्या जागतिक स्पर्धेत उत्तम कामगिरी करायचीच, असं ठरवूनच मी सराव करत होते. फेब्रुवारी महिन्यात मेलबर्नला एका स्पर्धेसाठी गेले असताना कोल्हापूरला माझ्या पप्पांचं निधन झालं. खूप मोठा धक्का होता हा माझ्यासाठी, आणि त्यातून बाहेर पडायला मला बराच वेळ लागला. जागतिक स्पर्धेत सहभागी होताना आत्मविश्वास जरा कमीच होता. पण महिलांच्या ५० मी. प्रोन गटात मला सुवर्णपदक मिळालं, विश्वविक्रमाची बरोबरी करता आली. जागतिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या गटातलं हे पहिलंच सुवर्णपदक होतं. अजूनही मैदानात झालेला टाळ्यांचा कडकडाट मला आठवतो. शेवटच्या लक्ष्यवेधानंतर सर्व प्रेक्षक उठून उभे राहून टाळ्या वाजवू लागले होते. आपल्याला सुवर्णपदक मिळालं असेल, असं वाटलं होतं. पण आपण विश्वविक्रमाची बरोबरीही केली, हे कळल्यावर मात्र खूप आनंद झाला.

जागतिक स्पर्धेतलं यश हे मला एका रात्रीत मिळालेलं नाही. अनेक वर्षांची मेहनत आहेच. शिवाय गेली दीड वर्षं या स्पर्धेसाठी मी खास तयारी करत होते. गेल्या वर्षी कझाकस्तानाहून आलेल्या श्री. स्तानिस्लाव लेपिडस यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्याकडून घेतलेल्या प्रशिक्षणाची मदत झाली. या स्पर्धेतल्या यशामुळे माझी आर्थिक काळजी कायमची दूर झाली आहे. 'वॉल्दर' या जगप्रसिद्ध कंपनीनं मला प्रायोजकत्व दिलं आहे. अगोदरही मी त्यांचीच रायफल वापरत होते, पण हा खर्च करताना मला अनेक गोष्टींचा विचार करावा लागे. आता ती एक मोठी काळजी मिटली आहे. लंडनला होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळवण्यासाठी आता मला सराव करायचा आहे. शिवाय आशियाई स्पर्धा आहेतच.

नेमबाजी हा अतिशय महागडा खेळ आहे. मी खेळायला सुरुवात केली तेव्हा एअर रायफल गटातल्या एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर कमीत कमी पाच-सात हजार रुपये लागत असत. हा खर्च माझ्यासाठी खूप मोठा होता. पण माझ्या सुदैवाने कोल्हापूरानं मला नेहमीच मदत केली. अनेक संस्था, व्यक्ती माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. स्पर्धेआधी मला कायम आर्थिक मदत मिळत गेली. ’वारणा’ उद्योगसमूहाच्या श्री. विनय कोरे यांची मी कायम ऋणी असेन. अनेकदा ’वारणा’तर्फे त्यांनी मला मदत केली, आणि या मदतीमुळे मी सराव करू शकले, स्पर्धांना जाऊ शकले. एखाद्या स्पर्धेत पदक मिळालं नाही तर पुढच्या स्पर्धेसाठी पैसे मागताना मला खूप संकोच वाटायचा. पण विनयदादांनी कधीही मला मदत नाकारली नाही.

महाराष्ट्रात खेळांना, खेळाडूंना उत्तेजन मिळत नाही, असं म्हटलं जातं. पण हे मला फारसं पटत नाही. उदाहरणच द्यायचं झालं, तर 'महाराष्ट्र रायफल असोसिएशन'ने बरंच चांगलं काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकणारे अनेक नेमबाज महाराष्ट्रातून आलेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वरळीच्या शूटींग रेंजपासूनच झाली आहे. माझा वैयक्तिक अनुभव तर खूपच चांगला आहे. असोसिएशनच्या सचिव असलेल्या शीला कानुंगो मॅडम एकदा कोल्हापूरात आल्या होत्या. रेंजवर माझी त्यांच्याशी भेट झाली. माझा खेळ त्यांनी बघितला. मी जुनीच रायफल तेव्हा वापरत होते. एकदोन स्पर्धांमध्ये तेव्हा मला पदकं मिळाली होती. त्या मला म्हणाल्या, "तेजू, ही तुझी रायफल खूप जुनी आहे. तू आता स्पर्धांमध्ये भाग घेतेस. ही रायफल वापरून तुझा खेळ खूप सुधारणार नाही. तुला नवीन रायफल घ्यायलाच हवी". पण तेव्हा माझ्याकडे अजिबातच पैसे नव्हते. आणि रायफल काही स्वस्त नसते. शीला मॅडमने मला त्यांची स्वत:ची रायफल दिली. ’वर्षभरात पैसे फेड’, असं म्हणाल्या. या नवीन रायफलीमुळे माझ्या खेळात खूप फरक पडला. पुढे त्यांचे पैसे फेडायला मला दोन वर्षं लागली. पण त्यांनी कधीही एका अक्षरानं मला पैशांची आठवण करून दिली नाही. अंजली भागवत, सुमा शिरूर यांसारख्या नेमबाजही महाराष्ट्रातूनच आल्या आहेत. त्यांनीही असोसिएशनच्या वरळीच्या रेंजवर सराव केला आहे. अंजलीदिदी, सुमादिदी यांना आज आम्हांला मिळत आहेत तशा सोयी मिळाल्या नाहीत. पण तरीही त्यांनी जागतिक स्पर्धांमध्ये पदकं मिळवली. सुमादिदींनी विश्वविक्रमाची नोंद केली. या दोघींनीही मला खूप मदत केली आहे. मी बरंच काही शिकले आहे त्यांच्याकडून.

आपल्याकडे बरेचदा असं होतं की, अनेक मुलं उत्तम खेळाडू असतात, पण त्यांनी खेळावं, असं पालकांना वाटत नसतं. पालकांचा भर या मुलांच्या अभ्यासावर असतो. अभ्यासाच्या सक्तीमुळे आपण अनेक चांगले खेळाडू गमावून बसतो. महाराष्ट्रातच असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांचं शालेय शिक्षण कमी झालं असलं तरी खेळातल्या प्रावीण्यामुळे त्यांना प्रतिष्ठा, पारितोषिकं, पैसा हे सारं मिळालं आहे. म्हणून पालकांनी मुलांना उत्तेजन द्यायला हवं, असं मला वाटतं. घरातून मिळणारा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. घरचे पाठीशी उभे असले की वाट्टेल त्या संकटांचा सामना करता येतो. मी आज जी काही आहे, ते फक्त माझ्या कुटुंबामुळे. माझं कुटुंब माझ्यामागे उभं राहिलं नसतं, तर मी रायफल हातात घेऊच शकले नसते.

आमची आर्थिक स्थिती खूप वाईट होती. पप्पांना त्यांच्या व्यवसायात बरंच नुकसान सोसावं लागलं होतं, आणि त्यांची तब्येतही ठीक नसायची. मला दोन बहिणी, आणि आई गृहिणी. आम्हां तिघींचीही शिक्षणं सुरू होती. मला सरावासाठी, स्पर्धांसाठी बरेच पैसे लागायचे. पैसे आणायचे कुठून? माझ्या आई, बहिणी लोकांकडे जाऊन माझ्यासाठी पैसे आणत. कर्जही बरंच काढलं होतं. अनेकदा अशी वेळ येई की, मला स्पर्धेसाठी जायचं असे, हातात तिकीट असे, पण जवळ खर्च करायला दहा रुपयेसुद्धा नसत. मी ट्रेनमध्ये बसल्यावर माझ्या बहिणी धावतपळत येऊन माझ्या हातात पैसे कोंबत. त्यांनी ते पैसे कुठूनतरी उसने आणलेले असत. मला माझ्या कुटुंबाची ही ओढाताण बघवत नसे. आपल्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो, असंही वाटायचं. पण आई मला नेहमी म्हणत असे की, "तेजू, हे दिवस जातील. तुला एकदा यश मिळालं की तू हे सर्व पैसे परत करू शकशील. पण यश मिळवण्यासाठी आत्ता आपल्याला पैशांची गरज आहे. तू देशासाठी खेळते आहेस, हे लक्षात ठेव. तू जितकी चांगली कामगिरी करशील, तितकं आपल्या देशाचं नाव मोठं होईल". त्यावेळी माझ्या आईपप्पांनी, किंवा बहिणींनी 'तेजू, तू खेळू नकोस', असं एकदाही म्हटलं असतं तरी मी रायफल आयुष्यात कधी हाती घेतली नसती. माझ्यामुळे खूपच त्रास होत होता त्यांना. पण त्यांनी चुकूनही कधी या त्रासाबद्दल तक्रार केली नाही. उलट कायम माझ्यासाठी धावपळ केली. प्रोत्साहन तर होतंच.

आज मला जे थोडंफार यश मिळालं आहे ते पाहायला माझे पप्पा मात्र नाहीत. गेल्या काही महिन्यांत मला पदकं मिळाली, माझे अनेक सत्कार झाले, अनेक मोठ्या लोकांनी माझं खूप कौतुक केलं, आणि प्रत्येक वेळी मला पप्पांची उणीव जाणवत होती. पप्पा आत्ता इथे हे सगळं पाहायला हवे होते, असं सारखं वाटत होतं. यापुढेही मी आपल्या देशासाठी जास्तीत जास्त पदकं मिळवायचा प्रयत्न करेन. पण कितीही यश मिळालं तरी ते मला अपूर्णच वाटेल, कारण माझी पाठ थोपटायला, मला आशीर्वाद द्यायला माझे पप्पा नसतील.

tejaswini2.jpg

- चिनूक्स