श्री. मोहित टाकळकर

'छोट्याशा सुट्टीत', 'फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम', बेड के नीचे रहनेवाली', 'तू', 'चारशे कोटी विसरभोळे', 'गार्बो', 'नाणेफेक', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर' अशा दर्जेदार नाटकांमुळे मोहित टाकळकर म्हणजेच सकस नाट्यानुभव, हे समीकरण आता रूढ झालं आहे. एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून त्याने ओळख तयार केली आहे. 'आसक्त' या संस्थेद्वारे त्याने उत्तम नाटकं व कलाकार रसिकांसमोर आणले आहेत. महाराष्ट्रातील नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात मोहितचा फार मोठा वाटा आहे. मोहितच्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होणं, ही एक अतिशय महत्त्वाची घटना आहे. मोहितच्या नाटकांना प्रेक्षकांनी, समीक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहेच, शिवाय अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा तो मानकरीही आहे.

border2.JPG

mohit.jpg

ज मी जेव्हा नाटक करतो तेव्हा मराठी रंगभूमी नावाचं मोठ्ठं ओझं माझ्या मानेवर आहे, असं मला सतत वाटत असतं. मराठी रंगभूमीच्या इतिहासाचं एक ओझं आहे, कारण मराठी रंगभूचीची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावरच आहे, हे ऐकायला येतं. आता मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला तर आधी संगीत नाटकं होती, मग दिवाणखान्यात घडणारी नाटकं आली. या परंपरेला छेद देणारी तेंडुलकरी नाटकं मग पुढे आली. तेंडुलकरांच्या नाटकांमुळे नाटकातला जडपणा जो होता, तो निघून गेला. संवाद साधे, सोपे, सुटसुटीत झाले. तेंडुलकरांची नाटकं नसती, तर आज रंगभूमीची स्थिती काय असती, याची कल्पना करणंसुद्धा अवघड आहे. एलकुंचवार, आळेकर यांनी मग रंगभूमीला वेगळं वळण लावायचा प्रयत्न केला. या मंडळींनी नाटकं लिहिली आणि ही नाटकं रंगभूमीवर आली म्हणून खरं तर आम्ही आज नाटक करू शकतो.

पण आज विचार केला तर असं वाटतं की, तेंडुलकर, एलकुंचवार वगैरे नाटककारांवर आर्थर मिलरसारख्या परदेशी नाटककारांचाच प्रभाव होता. आळेकर हे याला अपवाद. अस्सल 'मराठी' अशी रंगभूमी या नवीन वाटेनं तयार झाली नाही. तसं बघायला गेलं, तर तेंडुलकर, एलकुंचवार यांच्या नाटकांचा टप्पा मला पॉइन्ट ऑफ लिबरेशन वाटतो. पण त्यामुळे रंगभूमी परत परदेशी प्रभावाखाली अडकून राहिली, असंही वाटतं. कारण, 'नवीन आहे' म्हणून तशाच साच्यातली नाटकं लिहिली गेली. तेंडुलकरांनंतर आलेल्या नाटककारांनीही नवीन म्हणून परत तेंडुलकरांच्या नाटकांच्याच आवृत्त्या लिहिल्या. त्यामुळे दुर्दैवानं आपल्याकडे नवीन असं काहीच तयार झालं नाही. प्रयोगक्षम म्हणून जी नाटकं लिहिली गेली, ती नाटकंही पाश्चिमात्य नाटकांच्या गरीब आवृत्त्या होत्या, असं म्हणता येईल. या प्रकारची नाटकं तिकडे ५०-६०च्या दशकांत किंवा त्याही आधी लिहिली गेली होती.

त्यातही प्रायोगिक आणि व्यावसायिक अशी दुर्दैवी विभागणी झाली. चांगली आणि वाईट अशी विभागणी असायला हवी फक्त, ती झाली नाही. आपलं एवढंसं महाराष्ट्र नावाचं राज्य, त्यात किती थोडे लोक नाटकाशी संबंधित, आणि तशातच हे असे दोन गट पडले. शिवाय मुंबईचे प्रायोगिकवाले, पुण्याचे प्रायोगिकवाले हे आलंच. यामुळे केवळ विघटन होत गेलं. काही सकस असं पदरात पडलं नाही.

अजून एक दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्याकडे नाटकांचं दस्तऐवजीकरण केलं गेलेलं नाही. विजया मेहता, अरविंद मेहता, दामू केंकरे यांच्याबद्दल, त्यांनी केलेल्या नाटकांबद्दल आपण फक्त ऐकत आलो आहोत. ही नाटकं आपल्या पिढीतल्या कोणी बघितली आहेत? बघायला मिळाली नाहीत, त्या नाटकांची प्रक्रिया काय होती, हे ऐकायला, वाचायला मिळालं नाही कारण दस्तऐवजीकरण केलं गेलं नाही. या रंगकर्म्यांनी खूप मोठं काम करून ठेवलं आहे. त्या काळी रूढ असलेल्या संकेतांना छेद देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी केलेली नाटकं वेगळी होती. ही नाटकं आज वाचली तरी त्यांचं वेगळेपण लक्षात येतं. पण ही मंडळी, त्यांची नाटकं दंतकथा बनून राहिल्या आहेत. किंबहुना आमच्यासाठी मिथकं आहेत ही, आणि मिथकं भंगतातही फार लवकर.

कधीतरी कुठल्याशा महोत्सवात 'अरे, ते ग्रेट दिग्दर्शक स्वतः नाटक बसवणार आहेत इतक्या वर्षांनंतर', असं ऐकायला येतं. आणि आपण जेव्हा त्यांचं काम बघतो, तेव्हा प्रतिमा भंग पावते. वाटतं, 'या लोकांनी पूर्वी इतकं ग्रेट काम केल्याचं आपण ऐकतो, मग आत्ताचं हे काम असं का?' मग आम्ही आदर्श म्हणून कोणाकडे बघायचं? विजया मेहता या थोर दिग्दर्शिका आहेत हे मान्य. पण त्यांचे फार कमी लेख आज उपलब्ध आहेत. त्यांची भाषणंही अशीच फार थोडी आहेत. मग आज आमच्यासाठी उरतं काय? तर दोन-तीन दिवसांची एक कार्यशाळा. त्यातून आमच्यापर्यंत पोहोचणार किती, आणि आम्ही त्यातून घेणार किती? बाईंकडे एकेकाळी काम केलेले नटही आज टीव्हीवरच्या मालिकांत भीषण काम करताना आपण बघतो. या मंडळींबाबत जी मिथकं तयार झाली होती, ती आज फार लवकर भंगताना दिसतात. त्यामुळे मी जेव्हा आज काम करायला उभा राहतो, तेव्हा माझ्या पूर्वसुरींकडून नक्की काय घ्यावं, हे मला कळतच नाही. अर्थात मी काही स्वयंभू नाही. मी सगळं स्वतःच शिकून रंगमंचावर आलो, आणि नाटक केलं, असं झालेलं नाही. माझ्या पूर्वसुरींचा माझ्यावर प्रभाव आहेच. तेंडुलकरांनी तीस-चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेल्या नाटकांमुळे आज मला माझी नाटकं करायला मिळतात, हे मला मान्य आहे. संदेशनं (संदेश कुलकर्णी) 'स्नेहसदन'ची जी चळवळ सुरू केली त्यामुळे कोणालातरी 'सुदर्शन' सुरू करावंसं वाटलं, आणि एक छोटीशी का होईना, पण चळवळ सुरू झाली, प्रेक्षकवर्ग तयार झाला, आणि म्हणून मी नाटक करू शकतो. हे ऋणही मी मान्य करतो. पण आज आपल्या नाटकांद्वारे माझ्या कामावर प्रभाव पाडू शकेल, अशी एकही व्यक्ती माझ्या आसपास मला दिसत नाही. केवळ नाटकांमध्येच रमून, भरपूर नाटकं करून भरघोस काम केलेला एकही मराठी रंगकर्मी आज नाही. अपवाद फक्त चेतन दातार आणि अतुल पेठे यांचा. यांचा माझ्यावर प्रभाव किती, ते मला ठाऊक नाही. कारण चेतनचं आणि माझं नाटक निराळं होतं. अतुलचं आणि माझं नाटक निराळं आहे. पण या दोघांनीही उत्तम काम केलं आहे, आणि मला त्या कामाचा आत्ता उपयोग होतो आहे.

आज चेतन असता तर खूप मजा आली असती. मी त्याच्यासमोर बच्चा. अजून तीन-चार वर्षांनी त्याच्याबरोबर काम करण्याइतपत अनुभव माझ्या गाठी जमा झाला असता. पण आता हे शक्य नाही. त्यामुळे आज काम करताना कोणाकडे बघायचं, कशाचा आधार घ्यायचा, हे कळत नाही. तेंडुलकर काही दशकांपूर्वी ज्या प्रभावाखाली अडकले होते, त्याच प्रभावाखाली आम्हीही अडकतो आहोत का, अशी भीती वाटते. कारण चांगलं मराठी साहित्य, चांगली मराठी नाटकं, चांगले मराठी चित्रपट, चांगलं मराठी संगीत, चांगली मराठी चित्रं आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. मग सहज उपलब्ध काय असतं? तर चांगले पाश्चिमात्य चित्रपट, त्यांचं चांगलं संगीत, त्यांची चांगली चित्रं, त्यांची चांगली नाटकं. कुठे इराणमध्ये कोणीतरी एक नाटक केलं असेल, ते मला आज इथे पुण्यात बघायला मिळतं. थोड्या उशिरानं मिळतं, पण मिळतं. या अ-मराठी गोष्टींचा प्रभाव माझ्या कामात डोकावेल, आणि पुढे पन्नास वर्षांनंतर आज मी तेंडुलकरांवर असलेल्या पाश्चिमात्य प्रभावाबद्दल बोलतो, तसं माझ्यावर असलेल्या पाश्चिमात्य प्रभावाबद्दल बोललं जाईल, ही भीती मला वाटते. मोहित तेव्हा पाश्चिमात्य प्रभावाखाली होता, म्हणून आज आम्हांला मराठी असं काही करता येत नाही, असं पन्नास वर्षांनंतर माझ्याबद्दल बोललं जाऊ नये.

आजचे तरुण नाटककारही तेंडुलकर, एलकुंचवारांच्या प्रभावातून बाहेर पडलेले नाहीत. हा अमुक परिच्छेद तेंडुलकरांसारखा, तो दुसर्‍या अंकातला तिसरा प्रवेश एलकुंचवारांसारखा, हे असं लक्षात येत असतं. या नाटककारांपैकी काही आळेकरांकडे शिकले आहेत. त्यामुळे त्यांची एखाद्या प्रसंगाकडे पाहण्याची दृष्टी ही आळेकरांकडून आलेली आहे, हेही कळतं. यातून मी अगोदर जो मुद्दा मांडला तोच परत समोर येतो. आपल्याकडे मराठी अशी रंगभूमी नाहीच. या रंगभूमीकडे स्वतःची भाषा नाही. स्वतःची शैली नाही. जे काही आहे, ते पाश्चात्यांच्या प्रभावाखालीच केलं गेलं आहे.

दुर्दैवानं संगीत रंगभूमी आज अस्तित्वात नाही, आणि संगीत नाटकं मी करू शकलो नाही, याचं मला वाईट वाटतं. लोकरंगभूमीही अस्तंगत होत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ, मणिपूर या राज्यांच्या तुलनेत आपली लोकरंगभूमी कुठेच नाही. आणि माझ्यासारख्या शहरी लोकांना लोकरंगभूमीत रस नाही. लोकरंगभूमी म्हणजे काय, याचा गंध नाही. कारण माझ्या जाणिवा या शहरी आहेत.

माझ्या लहानपणी मुंबईपेक्षा पुणं वेगळं होतं, आणि पुण्यापेक्षा कोल्हापूर आणखी निराळं. आज ही सगळी शहरं सारखी झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी बरिस्ता, लिवाइजची दुकानं. सगळं सारखं. कोणत्याही शहराला स्वतःची म्हणून वेगळी ओळख नाही. त्यामुळे माझ्यासारख्या अनेकांची महाराष्ट्राच्या कोणत्याही परंपरांशी नाळ जोडली गेलेली नाही. आणि तशी ती जोडली जावी, अशी इच्छाही आता नाहीये. मग आपण आपलं आणि पॅरिसमध्ये राहणार्‍या कोणाचं आयुष्य कसं सारखं आहे, यात आनंद मानतो. हे चूकही असू शकतं, पण आपण तिकडे नातं जोडायचा प्रयत्न करतो. इथे नातं तयार करावं, असं आपल्याला वाटत नाही. त्यामुळे आपल्या नाटकांत महाराष्ट्र, मराठी कुठे दिसत नाही. अख्य्ख्या भारतात डंका पिटला जातो की, रंगभूमी म्हटलं की महाराष्ट्र आघाडीवर. पण तसं काही नाहीये.

मला खटकणारी अजून एक गोष्ट म्हणजे आपली रंगभूमी अतिशय शब्दबंबाळ आहे. रंगभूमीवरच्या दृश्यात्मकतेचा शोध घ्यायला काही वावच नाहीये. रंगभूमीची जी वेगळी भाषा असते, तिचा वेध घ्यायला जागाच नाही. आपलं सगळंच शब्दप्रधान असल्यानं शब्द तेवढे महत्त्वाचे, आणि बाकी सारं दुय्यम. राष्ट्रीय पातळीवर जरी विचार केला तरी आपण कुठेच इतर राज्यांतल्या नाटकांशी स्पर्धा करू शकत नाही, कारण प्रत्येक भावना ही शब्दांद्वारेच व्यक्त केली जाते. आणि याच कारणामुळे जागतिक रंगभूमीवरही आपल्याला कुठेच स्थान नाही. शिवाय आपण त्यांनी खूप पूर्वी केलेले प्रयोगच आज करत आहोत.

दुसरा एक अडसर मला जाणवतो तो असा की, प्रायोगिक नाटकं करतानाही व्यावसायिक गणितं सांभाळावी लागतात. 'आपण नाटक फार प्रायोगिक करायला नको, नाहीतर प्रेक्षक येणारच नाहीत सुदर्शनला', हाच जर विचार आपण करणार असू, तर प्रायोगिक नाटक कशाला म्हणायचं? ही नाटकं बालगंधर्व रंगमंदिर किंवा शिवाजी मंदिरात करता येत नाहीत, म्हणून त्यांना प्रायोगिक म्हणायचं का? प्रायोगिक नाटक करायचं म्हणजे प्रयोगशाळेत काम करायचं. यात प्रेक्षकांचा विचार करायचा नसतो. 'याच्या नाटकांना सुदर्शनच्या खाली लोक गर्दी करून असतात, म्हणून हा असं म्हणतो', असं म्हणतील काही, पण प्रायोगिक नाटक करताना खरंच प्रेक्षकांचा विचार करू नये, असं मला वाटतं. माझ्या कित्येक नाटकांच्या सुरुवातीच्या प्रयोगांना तेरा, आठ, दहा असे प्रेक्षक होते. पण त्यामुळे मी नाटक करायचा थांबलो नाही. प्रेक्षक नाहीत म्हणून तुम्ही प्रयोग करणार नसाल, तर प्रायोगिक चळवळीला अर्थच नाही. म्हणजे मग तुम्ही व्यावसायिक नाटकांची छोट्या जागेतली गरीब आवृत्ती काढणार. हे मला योग्य वाटत नाही.

पण महाराष्ट्रातला मराठी प्रेक्षक प्रयोगांचं स्वागत करतो. प्रेक्षकांची संख्या खूप कमी असेल, पण असे प्रेक्षक आहेत. दुर्दैवानं परदेशातल्या मराठी प्रेक्षकांबद्दल असं म्हणता येणार नाही. त्यांना उत्तम संगीत, नाटक, चित्रपट तिथे उपलब्ध आहे. ते सुंदर चित्रं बघू शकतात, उत्तम रशियन संगीत ऐकू शकतात, जर्मन नाटकं पाहू शकतात. सर्व उत्तमोत्तम गोष्टी सहज उपलब्ध असतात. पण मराठी नाटकं मात्र त्यांना विनोदीच हवी असतात. अजूनही ही मंडळी वेगळ्या वाटेची नाटकं स्वीकारायला तयार नाहीत. अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळाला माझं 'तू' किंवा 'चारशे कोटी विसरभोळे' आवडणार नाही, त्यांना एखादं हलकंफुलकं मराठी नाटकच हवं असेल. जर तुम्ही इतर भाषांमध्ये होणारे प्रयोग स्वीकारू शकता, तर मराठी भाषेच्या बाबतीतच असं का होतं? अजूनही परदेशात असणारी मराठी मंडळी ६०-७०च्या दशकातच का अडकून पडली आहेत, हे कळत नाही.

मी आजवर केलेल्या प्रत्येक नाटकात वेगळेपण असावं, ही माझी इच्छा होती. आज विचार केला तर वाटतं की, तसं काही झालं नाही. मी जे शोधत होतो ते मला काही नाटकांमध्ये सापडलं. काही नाटकांमध्ये जे मला गवसलं नाही, ते मी नंतरच्या नाटकांमध्ये शोधायचा प्रयत्न केला, आणि आधी जे केलं त्याचीच री ओढली. त्यामुळे माझ्या नाटकांबद्दल समाधानी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एक मात्र खरं की, त्या त्या वेळी मी त्या नाटकात स्वतःला १००% झोकून दिलं होतं. त्यावेळच्या माझ्या पूर्ण कुवतीनुसार मी काम केलं होतं. तेव्हा मी किती वाईट काम केलं होतं, हे मला आज जाणवतं. प्रसिद्धी, नाव, पुरस्कार लवकर मिळत गेल्यानंही असं होतं. तुम्ही पाच नाटकं करता आणि अचानक तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर वगैरे असता. आपल्याला आता सगळंच कळतं, असंही वाटायला लागतं. 'हाच तो दिग्दर्शक ज्याची आपण वाट पाहत होतो', 'हीच ती लेखिका जी आता उत्तम नाटकं लिहिणार आहे', असं काहीतरी कानावर पडतं, आणि नंतर तो माणूस काहीही काम करत नाही. कारण अपेक्षांचं जीवघेणं ओझं असतं.

tu.jpg

'तू'

आजवर मी केलेल्या कुठल्याही नाटकाबद्दल मी समाधानी नाही. पण त्यातल्या त्यात मला सती भावेनं लिहिलेलं 'तू' हे नाटक चांगलं वाटतं. अर्थात, हेही नाटक फार चांगलं झालं नाही, असं आज वाटतं. रुमी या सूफी कवीच्या काव्याबद्दलचं हे नाटक होतं. हे काव्य रंगमंचावर आणणं अवघड होतंच, पण मुळात ते रंगभूमीवर का आणावं, हा प्रश्न होता. त्या काव्याला रंगमंचावर आणल्यावर त्यातलं सूफीपण संपलं. पण आमच्यासाठी हा फार मोठा प्रयोग होता. इतर मराठी नाटकांसारखं हे नाटक शब्दबंबाळ नव्हतं, आणि या नाटकाला अवकाशाचं बंधन नव्हतं. पण या नाटकाचं खरं श्रेय सतीचं आहे, कारण तिनं ते काव्य रंगमंचावर आणलं. 'बेड के नीचे रहनेवाली' हे नाटकही आम्हांला तसं समाधान देऊन गेलं. मुळात लहान मुलांसाठी आपल्याकडे चांगली नाटकंच केली जात नाहीत. थोडीफार नाटकं होतात, म्हणजे 'टमटमपूरच्या जंगलात' किंवा 'अमुकनगरचा राजपुत्र' अशा नावांची, त्या नाटकांचा आजच्या मुलांच्या भावविश्वाशी किती संबंध असतो, हे बघावंच लागेल. आजची लहान मुलं ही उद्याचे प्रेक्षक आहेत. त्यांच्यापैकी काहींना नाटक करावंसंही वाटू शकतं. आणि म्हणून त्यांच्यासाठी चांगली नाटकं सादर केली गेलीच पाहिजेत. 'बेड के नीचे..' आम्ही म्हणूनच केलं आणि यापुढेही दरवर्षी निदान एकतरी नाटक मुलांसाठी करायचं आम्ही ठरवलं आहे.

bed.jpg

'बेड के नीचे रहनेवाली'

काही दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या 'तू', 'गार्बो', 'चारशे कोटी विसरभोळे', 'बेड के नीचे..' या सगळ्यांच नाटकांचे प्रयोग बंद केले. या नाटकांच्या प्रयोगांना भरपूर गर्दी होत होती. अजून अनेक प्रयोग करता आले असते, पण आम्ही सगळेच प्रयोग बंद करायचं ठरवलं. त्याचं झालं असं की, मागे एकदा आम्ही नाटककार मकरंद साठेशी बोलत होतो. त्याच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली की, एक ऐवज म्हणून मला नाटक समजतं, कळतं. माझ्याकडे नाटक सादर करण्याची कारागिरी, कला, ताकदसुद्धा आहे. पण त्यापलीकडे जाऊन नाटक उत्तम होण्यासाठी ही कला अजून सफाईदारपणे वापरली गेली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते वाचन होतं आहे का, संशोधन होतं आहे का, असे काही प्रश्न मकरंदने उपस्थित केले, आणि या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नव्हती. मी मग यावर बराच विचार केला. मकरंदशी झालेल्या चर्चेतून बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. त्याच वेळी रामू रामनाथनचं 'काश्मीर काश्मीर' हे नाटक तेव्हा हाती आलं होतं. रामूही फार बुद्धिमान आहे, त्याच्याशीही चर्चा केली. त्याच्याशी बोलून बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या. 'काश्मीर काश्मीर'च्या वेळी मग आम्ही भरपूर वाचन केलं. मी काश्मीरला जाऊन आलो. नाटकासाठी संशोधन करायचं म्हणून नव्हे, तर खरोखरच मला तिथल्या परिस्थितीची जाणीव नव्हती म्हणून.

या सगळ्यांतून असं वाटलं की, मी आता थोडं थांबावं. मी खूप काम केलं होतं असं नाही, पण मी सतत काम करत आलो होतो. आम्हांला जर अजून चांगलं काम करायचं असेल, तर मी, आम्ही स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करणं आवश्यक आहे. सतत काम करताना वाचन बंद होतं, गाणी ऐकणं बंद होतं, चित्रं पाहणं बंद होतं. दुसर्‍यांचं काम बघणं बंद होतं. आपल्यालाच सगळं कळतं, असं वाटायला लागतं. इतरांची सर्वच नाटकं वाईट, असं वाटायला लागतं. असं झालं तर माझं नाटक सध्याच्या इतर नाटकांपेक्षा काय वेगळं असेल? काहीतरी नवीन शिकायचं, नवीन लोकांबरोबर काम करायचं, आणि परत ताजेतवाने होऊन एकत्र यायचं, असं 'आसक्त'मधल्या आम्ही सर्वांनीच ठरवलं. राधिका (आपटे) कलरी शिकायला गेली. आशिष (मेहता) 'पृथ्वी'बरोबर काम करायला गेला. ओंकार (गोवर्धन) कन्हैय्यालालांच्या एका कार्यशाळेसाठी गेला.

मला इंग्लंडला नाट्यशिक्षणासाठी एक शिष्यवृत्ती मिळाली आणि मी वर्षभरासाठी तिकडे गेलो. तिकडे नटांच्या प्रशिक्षणावर भर असतो. शारीरिक प्रशिक्षणही त्यात अंतर्भूत असतं. याचा मला माझ्या नाटकांसाठी आता बराच फायदा होईल, असं वाटतं. या वर्षभरात मला नाटकांकडे वेगवेगळ्या कोनांतून बघण्याची सवय लागली. अनेक उत्तमोत्तम नाटकं पाहता आली. आपल्याकडे सध्या अजिबात होत नसलेल्या नृत्यनाटिका बघता आल्या. नाटकाला एका चौकटीतच बघण्याची मला सवय होती, पण तो केवळ एक मोकळा चौकोन आहे, तिथे मी वाट्टेल ते करू शकतो, ही ताकद मला तिकडे मिळाली. वाचन खूप झालं. केलेल्या वाचनावर भरपूर विचार करता आला. थोडे दिवस मी जपानची बुतो शैली शिकलो. शेकोव्हियन शैली, ग्रोटोस्कियन शैली यांचं शिक्षण मिळालं.

इथे परत आल्यावर मी पूर्वी केलेल्या कामाची मला लाज वाटायला लागली. याचा अर्थ असा नाही की, मी आता जे काम करेन ते फार थोर असेल. पण जुनं काम पाहून आता खूप असमाधान वाटतं, हेही खरं. ही नाटकं आम्ही केली तेव्हा आम्ही सगळे अजून जरा तरुण होतो. आपण फार गोंधळलेले आहोत, आपल्यावर चहूबाजूंनी अनेक प्रश्नांचा मारा होतो आहे, असे काही रोमँटिक समज होते, आणि ते सारं या नाटकांमध्ये उतरलं होतं. ही नाटकं फार व्यक्तिकेंद्रित होती. आता थोडं सामाजिक-राजकीय भान आल्यावर या नाटकांच्या वेळी केलेले विचार खुजे वाटू लागले. म्हणून आम्ही सर्वांनी ही नाटकं बंद करून नवीनच काम करायचं ठरवलं. तसंही, एका नाटकाचे जास्तीत जास्त पंचवीस प्रयोग करावेत, या मताचा मी आहे.

एलकुंचवारांनी मौजेत चारपाच वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता 'नेक्रोपोलिस' या नावाचा. ते पाकिस्तानात एका नेक्रोपोलिसला (नेक्रोपोलिस - मृत, केवळ थडगी असलेलं शहर) गेले होते, तेव्हाच्या अनुभवावर तो लेख होता. त्या लेखाचा रंगमंचीय आविष्कार करण्याचा आम्ही सध्या प्रयत्न करतोय. याशिवाय 'तिची सतरा प्रकरणं' या नावानं एक नवीन प्रयोग आम्ही करत आहोत. एकाच घटनेचे वेगवेगळे दृष्टिकोन सांगणारे यात सतरा प्रसंग आहेत. आलोक राजवाडे, सारंग साठ्ये, निपुण धर्माधिकारी, वरुण नार्वेकर या चौघांनी चारचार प्रसंग वाटून घेतले आहेत, आणि ही चौघं त्यांचं दिग्दर्शन करणार आहेत. बावीसतेवीस वर्षांची ही मंडळी आहेत, आणि फार मस्त काम ते सध्या करत आहेत. दिग्दर्शकाला अतिशय विचार करायला लावणारं असं हे नाटक आहे. या प्रयोगातही त्यामुळे खूप काही नवीन आणि वेगळं दिसेल, असं मला वाटतं. रामू रामनाथनने एक नवीन नाटक लिहिलं आहे 'कॉम्रेड कुंभकर्ण' या नावाचं. ते नाटक मी जानेवारी महिन्यात करेन. शिवाय 'तू' लिहिणार्‍या सतीनं 'आदिबंध' हे नवीन नाटक लिहिलं आहे. विष्णूच्या अवतारांच्या कथा आपण लहानपणापासून ऐकतो. या कथांमध्ये जबरदस्त ताकद आहे. त्या कथांवर तिने नाटक लिहिलंय आणि मी ते दिग्दर्शित करणार आहे.

माझ्या नाटकांमध्ये संगीत, नृत्य फार नसतं. त्यामुळे यापुढे जी नवीन नाटकं मी करेन, त्यांत संगीत, नृत्य यांचा समावेश करण्याचा माझा प्रयत्न असेल. 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर' या नाटकांमध्ये मी नवीन तंत्रज्ञानाचा, मल्टिमीडियाचा थोडा वापर केला होता. हे असं तंत्रज्ञान नाटकांमध्ये आवर्जून वापरलं जावं, असं मला वाटतं. आपल्याकडे खरं म्हणजे उत्तम अ‍ॅनिमेटर आहेत, आणि त्यांची मदत आपण घेऊ शकतो. पपेटस्, वेगवेगळे नृत्यप्रकार यांचा अंतर्भाव करून आपण नाटक श्रीमंत करू शकतो. नाहीतर होतं काय की, पात्रं नाटककारानं लिहिलेली वाक्यं फक्त बोलत राहतात, आणि उरतात फक्त शब्द. नाटकात इतर कलाप्रकार एकत्र आले की प्रेक्षकांना नाटक अधिक समर्पक व टोकदार वाटेल, असं वाटतं. असंही होऊ शकतं की या सगळ्याची एखाद्या नाटकाला आवश्यकता नसेलही. पण प्रयोग न करताच हे कसं कळेल?

मी आजवर पंधरा-सोळा नाटकं केली म्हणजे खूप काम केलं, असं मला वाटत नाही. विजयाबाई, सत्यदेव दुबे यांनी जे काम करून ठेवलं आहे, त्याच्या तुलनेत हे काहीच नाही. पण मराठी रंगभूमीवर लक्षवेधी असं काही घडतच नसल्यानं एक जरी चांगलं नाटक केलं तरी डोक्यावर घेतलं जातं, आणि पुढचं नाटक वाईट झालं की खाली खेचलंही जातं. यात न अडकता मला काम करत राहायचं आहे.

garbo.jpg

'गार्बो' 'चारशे कोटी विसरभोळे'

- चिनूक्स