प्रकाशवाटा

आणि खरंच, आठवतो तो दोन वर्षांपूर्वीच्या जानेवारीतला तो दिवस, ज्या दिवशी एका दु:खातून पोळून निघाल्यावर पुन्हा कॅमेरा हाती घेतला आणि त्यादिवशीचे ते अप्रतिम फोटो! कदाचित लोकांच्या वेदनेतून मीही सहप्रवासी होऊन प्रवास केल्यामुळे असेल, का कोण जाणे, पण खरोखर, त्या दिवशी जाणवलं की दुराव्याची ती सर्व शकलं भंगली आणि मी खरी आनंदवनवासी झाले. बाबा यालाच तर pain-friendship म्हणत नव्हते ना!

border2.JPG

Baba Amte and dignitaries.jpg

कॅ

मेर्‍याशी बहुधा माझं नातं फार लहानपणीच जुळलं असावं. कारण तेव्हापासूनच सराईतपणे कॅमेरा हाताळणार्‍या आनंदवनाच्या देशी-परदेशी पाहुण्यांबद्दल मला फार कुतुहल वाटे. या सर्वांचं आमच्या स्वयंपाक्यापासून ते झाडू मारणार्‍या बायकांपर्यंत एक वेगळंच नातं असे. दरवेळी बाबांशी गप्पा झाल्या की अंगणात ते पोतडी उघडून बसत आणि मागील खेपेला काढलेल्या फोटोंचं त्या त्या लोकांमध्ये आवर्जून वाटप करत. त्यात कुणाच्या लग्नाचा फोटो असे तर कुणाच्या खुदकन हसणार्‍या बाळाचा, कुणी बाबांसोबत काढलेला तर कुणाचा त्या पाहुण्यांसोबतचा. ते फोटो घेताना जो आनंद आमच्या पेशंट लोकांच्या चेहर्‍यांवर पसरे तो केवळ अवर्णनीय असे. मला तर हे पाहुणे सांताक्लॉजसारखे वाटत, ज्यांच्या पोतडीत प्रत्येकासाठी त्याच्या त्याच्या आयुष्यातल्या आनंदी क्षणांचं भांडार असे. कदाचित तेव्हापासूनच डोक्यात बसलं असावं की कॅमेरा नावाची ही जादुई चीज आपल्याकडे असायला हवी. बटन दाबलं की समोरचा माणूस खुदकन हसणार आणि नंतरही बराच वेळ स्वतःच्याच फोटोकडे बघत मनातल्या मनात खूष होत रहाणार. खरंच, दुसर्‍यांच्या आयुष्यातल्या अशा सहजपणे निसटून जाणार्‍या क्षणांना फुलपाखरांसारखं पकडून त्यांच्या हवाली करता येतं ही कॅमेर्‍याची किती मोठी करामत! आणि त्या क्षणांचे साक्षीदार बनण्याचं वैभव जर आपल्याला प्राप्त होत असेल तर त्याहून दुसरं समाधान कुठलं?

आज मागे वळून बघताना आठवतात त्या गोष्टी. अभयकाकानं मोठ्या विश्वासानं त्याचा नवा कोरा रोल हाती सोपवून म्हटलेलं 'आगे बढो', अनिलकाकानं एसएलआर मिळवण्यासाठी दिलेलं प्रोत्साहन आणि साक्षात बाबांच्या रुपात सेलिब्रिटी मॉडेल. उभ्या महाराष्ट्राला डॉ. बंग, डॉ. अवचट आणि बाबा आमटे या नावानं परिचित असलेली समाजसेवेतील भारदस्त व्यक्तिमत्त्वं खर्‍या अर्थाने माझी रोल मॉडेल्सच. कॅमेर्‍यासाठी रोल्स पुरवणारी आणि वेळोवेळी मॉडेल म्हणून त्याच्या समोर उभी रहाणारी ही तिघं त्या वळणावर भेटली नसती तर कदाचित खटाखट फोटो काढले असते, पण त्यांमागे लपलेला आयुष्याचा गूढार्थ बहुधा कधीच उलगडला नसता.

मला बोट पकडून (कॅमेरा) चालवायला शिकवलं ते अभयकाकानं. जमिनीवर गळून पडलेल्या करड्या रंगाच्या पानगळतीत उठून दिसणार्‍या एका टवटवीत मोहफुलातील सौंदर्य जे त्यानं उलगडून दाखवलं होतं ते केवळ अलौकिक! टवटवीत पोपटी पानाच्या करवतीसारख्या कडेला लटकणारा पावसाचा तो इवलासा थेंब आणि त्यात पडणारं पलीकडच्या गुलाबकळीचं प्रतिबिंब - ही अतुलनीय सौंदर्यानुभूती फक्त तोच (कॅमेरेश्वर) आपल्याला देऊ शकतो हे कळलं. त्यानंतर मात्र मी अतिसूक्ष्माचा भेद करण्याच्या मागेच लागले. त्यासाठी खास बनवलेली मॅक्रो नावाची लेन्स असते जी आजूबाजूचा नको तो फापटपसारा धूसर करते आणि नेमक्या गोष्टीवर फोकस करुन इष्ट परिणाम साधते, ही ज्ञानात नवी भर पडली. वाटलं, खरोखरच्या आयुष्यात आपल्या डोळ्यावर अशी लेन्स बसवता आली तर! सगळीकडे सौंदर्यच सौंदर्य दिसू लागेल, नाही?

आता खरा प्रॉब्लेम होता कॅमेर्‍याचा. माझ्याकडे याशिकाचा एक कॅमेरा होता. त्याने भराभर पानाफुलांचे जमतील तसे फोटो काढून मित्रांना दाखवले. ते बरे होते. पण एका मित्राने लगेच खिल्ली उडवली. मला कळेना फोटो चांगले की वाईट! तेव्हा नुकताच अनिल अवचटांचा फोटोग्राफीबद्दल एक अप्रतिम लेख प्रसिद्ध झाला होता. मी त्यांना एक भलंमोठं पत्र लिहिलं. आश्चर्य म्हणजे आठवड्याभरात अवचटांचं उत्तर हजर! त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होते की, तुला फोटोग्राफीचा डोळा आहे, तेव्हा हा कॅमेरा फेकून दे आणि जेव्हा एसएलआर घेशील तेव्हाच मला फोटो पाठव.

आली अडचण! तेव्हा मायबापाचा एकत्रित पगार होता रुपये एक हजार. काही सुचेना. काही दिवसांनी अचानक भावाच्या हातात एक पेन्टॅक्सचा कॅमेरा दिसला. पुण्याच्या एका जुन्या फोटोग्राफरने तो संस्थेला देणगी म्हणून दिला होता. त्याने सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरातल्या मुलामुलींचे फोटो भाऊ काढीत असे. मी एकदाच त्या कॅमेर्‍याने एक फोटो काढण्याची हिंमत केली. तेव्हा भावाने खास वैदर्भीय भाषेत तंगडी तोडून हातात देण्याची धमकी दिली होती. मग मी जिद्दीलाच पेटले. तो क्लासला गेला की लपूनछपून रोल आणून पानाफुलांचे फोटो काढत सुटले. खरं म्हणजे त्या कॅमेर्‍याचे तसे बाराच वाजले होते. व्ह्यूफाइंडरला डोळे लावले की किडे चालताना दिसत आणि लेन्सवर तर बुरशीचा बाजार होता. तरीपण पहिल्या रोलचे फोटो फारच मस्त आले. ते मी असंच मजा म्हणून कोणालाही न सांगता अखिल वैदर्भीय फोटोग्राफर क्लबच्या स्पर्धेत पाठवले, तेही बाहेरच्या कोणी घरी सांगायला नको म्हणून भावाच्या आणि एका मित्राच्या नावाने. त्यांतल्या दोन्ही फोटोंना गौतम राजाध्यक्षांनी पहिल्या आणि दुसर्‍या पुरस्कारासाठी निवडलं. मग अजूनच पंचाईत. भावाला हे सर्व उपद्व्याप काहीच माहीत नव्हते. मित्राला तर कॅमेरा कसा पकडायचा हेही ठाऊक नव्हतं. त्यांना समजावता समजावता दोनेक दिवस गेले. दोघेही पुरस्कार घ्यायला जाताना अगदी अवघडून गेले होते. त्यानंतर असले काही उपद्व्याप करायचे नाहीत हे पक्कं ठरवलं. पण त्यावेळेपर्यंत सर्वांना माझ्यातील सुप्त गुणांची चुणूक दिसली होती. भावाचाही कॅमेर्‍यामधला रस बर्‍यापैकी आटला होता. मग मला थांबवणारं कोणीच नव्हतं. तिथपासून खरी फोटोग्राफी सुरु झाली. पुस्तकं वाचून काहीबाही प्रयोग करु लागले आणि ते बर्‍याच प्रमाणात यशस्वीही होत गेले. खरे म्हणजे या कॅमेर्‍यात बर्‍याच कमतरता होत्या. त्यातील बॅटरी आणि सर्किट दोन्ही खराब झाल्याने फक्त शटर आणि अपर्चर यांशिवाय दुसरं काहीही नीट चालत नव्हतं. परिणामी मला फक्त वाचून सर्व सेटिंग करावं लागे. हळूहळू अनुभवाने शहाणी होत गेले. मग आपोआपच भाजीत मीठ जसं घालतो तसं शटर आणि अपर्चरच्या प्रमाणाचा अंदाज येत गेला. बॅटरीच नसल्याने फ्लॅशबीशची काही भानगड नव्हती. त्यामुळे एक बरं झालं, चांगले फोटो काढण्यासाठी चांगलाच कॅमेरा लागतो हा मानसिक ब्लॉक दूर झाला.

त्यानंतर या ना त्या निमित्ताने बरेच फोटो काढत राहिले. काही वर्षांनी डिजिटल युग आलं तेव्हा आम्ही निकॉनचा ४ मेगापिक्सेलवाला कॅमेरा घेतला. त्याने अवास्तव फोटोंवरील खर्च एकदम आटोक्यात आला. पण तरीही माझी पक्की समजूत होती की फुलापानांचे फोटो हीच खरी कला, आपल्यावर हसणार्‍या लोकांना 'कला' काय ते कळत नाही. पुढे ते कधीतरी वाढून 'माणूस हा प्राणी कॅमेर्‍याने नाही तर फक्त बंदुकीने शूट करण्याच्या लायकीचा आहे' इथपर्यंत आले होते. त्यामुळे या छंदावरील सर्व वेळ फक्त फुलापानांवरच खर्च करावा असे वाटू लागले. तेव्हाच्या साधारण तीन वर्षांच्या कालखंडात मी मनुष्यप्राण्याचा एकही फोटो काढला नाही. नंतर मला कळले की, बर्‍याच नवफोटोग्राफरांच्या मनात ही भावना फार प्रकर्षानं असते. आता त्याचं खरंच हसू येतं. तेव्हा कदाचित असंही असेल की, जी माणसं आपल्या फुलापानांच्या छंदावर हसली असतील त्यांचे फोटो काढणं तेव्हा जिवावर आलं असेल.

मग अचानक आमच्याकडे भारतीय स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर आले होते. बाबांच्या खोलीत पडलेले माझे काही फोटो बघून ते वेडेच झाले. त्यांनी अगदी मग त्यांच्या मासिकात माझे फोटो छापून आणले. त्यानंतर त्यांनी लगोलग बँकेच्या मुंबई विभागासाठी तीन हजार कॅलेंडरांची मागणीही केली. ती कॅलेंडरं मस्त झाल्याने बँकेनं आनंदवनाच्या फोटोडॉक्युमेन्टेशनसाठी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून एक निकॉनचा चांगला कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स घेऊन दिली.

आजवर या लेन्सने असंख्य फोटो काढले. फुलांच्या सूक्ष्म परागांचे अंतरंग उलगडणारे, पाण्यावरील प्रतिबिंबांचे, चकाकणार्‍या थेंबांचे, भिरभिरणार्‍या फुलपाखरांचे! बक्षिसं मिळाली, नाव झालं, पण कुठंतरी एक दु:ख अजूनही सलत होतं. माणसांची पोर्ट्रेट्स् काही केल्या जमेनात. त्यात दिसे ते दु:ख, तटस्थता, क्वचित राग. कॅमेरा बदलून नवं मॉडेल घेतलं, लेन्स बदलली, अँगल्स बदलले, पण नैसर्गिक फोटोंची लज्जत व्यक्तिचित्रांना येई ना. तो मानवी बंध त्यात दिसत नव्हता.

collage-children_Sheetal Amte-web.JPG

एके दिवशी जॅस्पर या परदेशी पाहुण्याने काढलेले फोटो बघतना हे कोडं चटकन उलगडलं. त्याला तो बंध किती सहज साधला होता! त्याला ना या लोकांची भाषा येत होती ना कुणाचे नावगाव ठाऊक! पण फक्त त्याच्या कॅमेर्‍यामागच्या निर्व्याज हास्यानं तो सर्वांना क्षणार्धात आपलंसं करी आणि लोकांच्या प्रतिक्रिया कॅमेर्‍यात टिपी. माझ्याकडे मात्र लोक काहीशा आदरयुक्त भीतीने आपली नवी डॉक्टरीणबाई म्हणून पाहत. मी आले की बिचकत. त्यामुळे फोटोंमध्ये एक अस्वस्थता टिपल्या जाई.

त्यांचंही बरोबर आहे. डिग्री घेऊन बाहेर पडलेल्या नवतरुणाच्या भोवती एक इगोचा कोशच तयार होतो. भाषा बदलते, देहबोली बदलते, डॉक्टर असल्यास माणूस म्हणून न बघता पेशंटकडे यांत्रिकपणे बघणं अंगवळणी पडतं. त्यातून निर्माण होतो तो आपल्याच लोकांशी दुरावा. खरं म्हणजे आपले जवळपास सगळे पेशंट खेड्यातले असतात. पण त्यांच्याशी त्यांच्या भाषेत कसं बोलावं, हे कधी शिकवलंच गेलं नाही. त्यामुळे पेशंट काय, पण इतर खेडुतांशीही मनाचे धागे जुळणं कठीण होऊन बसतं.

मग ठरवलं, हे बदलायचं. त्यांची भाषा शिकले. प्रत्येकाचं नाव माहीत करुन घेऊन नावानं त्याला बोलावू लागले. इथली जवळपास सर्व माणसं घरातून हाकलल्यामुळे इकडे आली आहेत. त्यांचे अनुभव विचारू लागले. हळूहळू डॉक्टरीणबाईंची 'बाई', आणि मग 'आमची बाई' झाले. आणि खरंच, आठवतो तो दोन वर्षांपूर्वीच्या जानेवारीतला तो दिवस, ज्या दिवशी एका दु:खातून पोळून निघाल्यावर पुन्हा कॅमेरा हाती घेतला आणि त्यादिवशीचे ते अप्रतिम फोटो! कदाचित लोकांच्या वेदनेतून मीही सहप्रवासी होऊन प्रवास केल्यामुळे असेल, का कोण जाणे, पण खरोखर, त्या दिवशी जाणवलं की दुराव्याची ती सर्व शकलं भंगली आणि मी खरी आनंदवनवासी झाले. बाबा यालाच तर pain-friendship म्हणत नव्हते ना!

त्यानंतर आजवर काढलेल्या प्रत्येक फोटोत दिसू लागलं ते वेगळंच आनंदवन. सुरुवातीला घाबरून दूर पळणार्‍या महारोगी स्त्रिया आता 'आली का गो आमची बाई' करत तोंडभर हसून जवळ येताना खरं किती सुंदर दिसतात! किंवा आमच्या अंधशाळेतल्या छोटुकल्या मुली, डोळ्यांच्या जागी खाचा पण चेहरा किती गोड! आणि ती आमची भेदक पिंगट डोळ्यांची मूकबधीर नूपुर! असे सुंदर डोळे आयुष्यात बघितले नाहीत. जागोजागी दिसणारी रसरशीत, आनंदी चेहर्‍याची अपंग पण स्वाभिमानी माणसं, रंगीबेरंगी गुलालांची उधळण करणारे तरुण तुर्क आणि तितक्याच जोमानं बोटं झडलेल्या हातांनी तबला बडवणारे म्हातारे अर्क! रोज एक आनंदी दिवस, रोज उत्साहाचं उधाण म्हणजे आनंदवन!

बाबा खरंच म्हणायचे, "तुम्हाला जसं अजिंठा-वेरुळच्या भग्न लेण्यांमध्ये सौंदर्य दिसतं तसं मला मानवी भग्नावशेषांमध्ये सौंदर्य दिसलं"... कदाचित ती वेदना अनुभवताच ती सौंदर्यानुभूती मला मिळाली आणि मानवी मनांना जोडणारा तो निखळलेला समान धागा त्यात गवसला. आज तोच धागा पकडून जीवनात पुढं त्या कार्याची साधना करायची ठरवली आहे. माझ्या विकासाकडे, माझ्या प्रकाशाकडे नेणारी. दु:खाच्या मुलुखातील माझ्यासारख्या प्रकाशयात्रींसाठी ती एकच पाऊलवाट आहे...

Anandwan collage.JPG

- डॉ. शीतल आमटे

Taxonomy upgrade extras: