मी 'रिलेट' करू शकलो (नाही)

माझ्या मते असे आपल्या ओळखीचे शोधणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. ती समजून घेतली तर त्या प्रक्रियेच्या मर्यादा ध्यानात येतील. हे करणे आवश्यक आहे, कारण मानवाची सर्व प्रगतीच या नैसर्गिक मर्यादा ओलांडण्यावर अवलंबून असते. सर्वसाधारण प्राणी आणि मानवप्राणी यांतील मोठा फरक हाच.

border2.JPG

त्यनारायणाच्या कथाकहाण्या आणि परीकथा यांच्यात फरक काय? म्हटले तर काहीच नाही. दोन्हींमध्ये चमत्कृतीपूर्ण व अद्भुत घटना आहेत. पुढील जन्म बेडकीचा लाभू शकतो, मुसळाचे मुलात रूपांतर होऊ शकते, एखाद्याचा जीव कुठल्यातरी गुप्त जागी ठेवलेल्या गुलाबात असू शकतो. दोन्हींमध्ये व्यक्तिरेखांची समानधर्मी हाताळणी असते. कोणीतरी सद्गुणांचा पुतळा/ळी, कोणीतरी फक्त दुर्गुणांनी युक्त. अधलेमधले, मानवी असे शक्यतो नाहीच. दोहोंमध्ये कथाभाग सारख्याच रूळांवरून धावतो. सुरुवातीला नेहमीच दुर्गुणांनी केलेला अथवा परिस्थितीवश झालेला सद्गुणांचा छळ आणि शेवटी सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळवलेला विजय. यात एक सूक्ष्मसा फरक मात्र जाणवतो. परीकथांमध्ये दुर्गुणांकडून मुद्दामच सद्गुणांचा छळ केला जातो. कथाकहाण्यांमध्ये त्याबरोबरच परिस्थितीजन्य दुरवस्था हीसुद्धा बर्‍याच वेळा आढळते. उदा. 'आटपाट नगरात गरीब ब्राह्मण राहत होता...' इत्यादी. म्हणजे 'गरीब असणे' या परिस्थितीमुळे त्या कुटुंबाची परवड होत असते. दुसरा सूक्ष्मसा फरक म्हणजे, बहुतेक वेळा परीकथांमध्ये शेवटी दुर्गुणयुक्त व्यक्तींचा नाश होतो. कथाकहाण्यांमध्ये उपरतीला वाव असतो. दुर्गुणयुक्त व्यक्तीला बर्‍याच वेळा पश्चात्ताप होतो व ती व्यक्ती सुधारते. त्याअर्थी, कहाण्यांमध्ये दुर्गुणांचा नाश होतो. म्हणजे 'गुन्ह्याचा तिरस्कार करा, गुन्हेगाराचा नव्हे' या उक्तीला अनुसरून हे धोरण दिसते (किंवा ती उक्ती या कहाण्यांचा एक परिपाक असेल).

मला आता परीकथा वाचायला आवडत नाहीत, पण कहाण्या मात्र अजूनही वाचायला आवडतात. घरी आईवडील दोघेही कर्मकांडांबाबत पूर्णपणे उदासीन. त्यामुळे मलासुद्धा लहानपणापासूनच देव, पूजा, देवपूजा वगैरेंबाबत मुळीच आवड नाही. नावडच, असे म्हटले तरी चालेल. घरी गौरीगणपती, दसरादिवाळी इ. सणांना पूजा असायची. ती एकतर आजोबा करायचे आणि नंतर आजीआजोबांना बरे वाटावे, म्हणून मी करायचो. माझ्या लेखी केवळ त्यांना बरे वाटावे म्हणून करण्याचा तो एक उपचार होता. ते करायला मी थोडा नाखूषच असायचो. घरी कहाण्यांचे पुस्तक होते, पण माझ्या आठवणीत घरी कधीच कहाण्यांचे जाहीर वाचन झालेले नाही. एकंदरीत देवपूजा-कहाण्या या गोष्टींशी माझी नाळ कधीच जोडली गेली नाही. त्यांच्याशी निगडित काही सुरम्य, दरवळणार्‍या, कौटुंबिक घाऊक-भावूक आठवणी तर मुळीच नाहीत. कहाण्यांशी मी 'रिलेट' करू शकलो नाही. तरीसुद्धा तेव्हा वाचलेल्या रमेश मुधोळकर, राजा मंगळवेढेकर इ. लेखक/लेखिकांच्या परीकथा आणि गोष्टी म्हणूनच वाचलेल्या कहाण्या, यांपैकी मला कहाण्या अजूनही वाचायला आवडतात.

**

टेड (TED) ही स्वयंसेवी, 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर कार्य करणारी संस्था विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने जगभर आयोजित करते. मानवी जीवनाला स्पर्श करणार्‍या सर्व (आणि म्हणूनच, खरोखर 'सर्व') क्षेत्रांतील तज्ज्ञांचा यात समावेश असतो. या व्याख्यानांबरोबरच टेड दरवर्षी उन्हाळ्यात ऑक्सफर्डमध्ये 'टेडग्लोबल' नावाची जागतिक परिषद आयोजित करते. २००९ सालच्या जागतिक परिषदेत एलिफ शफाक (Elif Shafak) नावाच्या एका आगळ्याच लेखिकेने व्याख्यान दिले. तिचा विषय होता - कथाकादंबर्‍यांचे राजकारण (Politics of fiction). भाषण म्हणण्यापेक्षा त्याला संभाषण म्हणणे संयुक्तिक ठरेल, कारण त्या भाषणाने विचाराला मोठीच चालना दिली, डोक्यात मंथन सुरू झाले आणि इतरांशी काही देवाणघेवाण झाली. एलिफ ही तिच्याच भाषेत एक 'storyteller' अर्थात कथाकार आहे. एलिफ वर्तुळांच्या शक्तीबद्दल बोलते. एखाद्या गोष्टीभोवती तिला वेढून टाकणारी भिंत बांधली तर काय होईल? शत्रूने वेढा घातल्यावर एखाद्या ठिकाणाचे जे होईल, तेच. बाहेरील जगाशी सर्व दळणवळण ठप्प होऊन शेवटी सर्वंकष नाश.

आपणसुद्धा आपणच बांधलेल्या भिंतींमध्ये जगत असतो. देश-धर्म-संस्कृती यांनी आपल्याभोवतीच वेढा घातलेला असतो. आपल्यासारखेच असलेले आपले कुटुंबीय, आपले नातेवाईक, आपला समाज यांच्यात आपण रमतो. आपल्या नकळत आपण स्वतःभोवती भिंती बांधत असतो. शेवटी आपण निर्माण करतो एक कोश. कोशातील अळी कोश फोडून स्वच्छंद झेपावते हा निसर्गनियम मात्र आपल्याला लागू नाही. या कोशाबाहेरील जगाशी आपला संपर्क तुटला, या कोशाबाहेरील जगाशी आपले दळणवळण तुटले की, आपली समृद्धी थांबली. वेढा घातलेल्या शहराच्या नाड्या आवळल्यावर शहराची कुचंबणा होते, शहर कुपोषित होते, कुजायला लागते. हळूहळू आक्रसून जात शेवटी संपून जाते.

अंतर्स्फोट म्हणजे तरी दुसरे काय? शहरे म्हणा, जीव म्हणा, आपले माणूसपण म्हणा... आपण आपल्या कोशात रमलो की, थांबलो म्हणून समजा. मग प्रत्येक समाजाचे कोश निर्माण होतात. एवढेच नव्हे, दुसर्‍या समाजाच्या कोशाबाबत समज तयार होतात. 'आपले आपण बरे' इथपासून 'आपले तेच बरे' इथपर्यंत आणि त्याहीपुढे अंतिमतः 'आपले तेच खरे' हा प्रवास घसरगुंडीइतका सहज होतो. या असल्या समानशीलेषु समानव्यसनेषुंच्या समूहांसाठी एलिफने 'communities of the like-minded' असा समर्पक शब्दप्रयोग केला आहे. आश्चर्याची आणि तितक्याच दुर्दैवाची बाब म्हणजे, या जागतिकीकरणाच्या जमान्यातसुद्धा आपल्याला हे समूह दिसतात. नवनवीन जन्माला येताना दिसतात, आहेत ते वाढताना दिसतात.

भिंती मोडायच्या, त्यांना खिंडारे पाडायची तर आपल्याकडे शक्ती पाहिजे. ही स्नायूंची शक्ती नाही, तर कल्पनाशक्ती पाहिजे. आपली कल्पनाशक्ती एका चौकटीतून निर्माण होते. ही चौकट म्हणजे आपले संस्कार, आपली संस्कृती, आपले आईवडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यापासून तयार झालेली असते. कधी ही चौकट अगदी ढोबळ असते तर कधी अगदी ठळक, कधी लवचिक असते तर कधी कठीण. पण आपण चौकट नाकारू शकत नाही. याचा परिणाम आपल्या कल्पनाशक्तीवर होतो, कारण आता आपली कल्पनाशक्तीसुद्धा या चौकटीचा एक भाग झालेली असते.

एका चित्रकाराचे उदाहरण सांगतात. त्या चित्रकाराच्या वैयक्तिक आयुष्याची ससेहोलपट होण्यास सुरूवात झाली. हळूहळू त्याचे स्वतःच्या आयुष्यावर असलेले नियंत्रण त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी-कमी होऊ लागले. त्याच सुमारास त्याच्या चित्रांमध्येसुद्धा बदल दिसू लागला. त्याची चित्रे जास्त भौमितिक होऊ लागली; त्यात सरळ रेषा, कोन, भूमितीतील त्रिकोण, चौकोन इत्यादींचा आढळ वाढला. एकंदरीत त्याच्या चित्रांमध्ये आखीवरेखीव आकार वाढले. याचे कारण असे सांगतात की, जसजसे स्वतःच्या आयुष्यावरील नियंत्रण सुटत गेले, तसतशी ती उणीव त्याने चित्राकारांवर वाढते नियंत्रण आणून, त्यांना अधिक नियमबद्ध करून भरून काढली. त्याच्या जाणिवांच्या चौकटीने त्याच्या कल्पनाशक्तीला ठोस आकार दिला... तोच कागदावर उतरला.

पण हे अगदी एखाद्या कलाकाराबाबतच घडते, असे मुळीच नाही. हे तुमच्याआमच्याबाबतही अगदी सहजपणे घडते. मला एखादी काल्पनिक कथा अथवा कादंबरी आवडते, तेव्हा मी बर्‍याच वेळा म्हणतो, 'अमुक अमुक मला आवडले कारण मी त्याच्याशी रिलेट होऊ शकलो.' हे वाक्य किती मोठा अर्थ आणि मोठा इतिहास घेऊन आले आहे! कधी हे विधान मला स्वच्छ, स्पष्ट जाणवलेले असते; तर कधी मला स्पष्टपणे जाणवलेले नसते, पण त्याचा परिणाम मात्र झालेला असतो. म्हणजे 'एखादी कलाकृती आवडली तर का?' याचे मी खूप नीट स्पष्टीकरण देऊ शकत नाही आणि तरीही ती आवडलेली असते. पण अगदी स्वतःच्याच खनपटीला बसले तर परत जाणवायला लागते की, हां, अमुक एका बाबीशी मी रिलेट होऊ शकलो. म्हणजे परत आपण त्या अनोळखी, काल्पनिक प्रदेशात आपल्याच ओळखीचे काही शोधत असतो. कल्पनाशक्तीच्या कितीही भरार्‍या मारल्या तरी आपली मुळे आपण विसरत नाही. मी कोण? तर मुळे घेऊन उडणारे एक झाड. जमिनीची नाळ तुटता तुटत नाही आणि जिथे जाईन तिथे मी माझ्या ओळखीची जमीन शोधत राहतो.

माझ्या मते असे आपल्या ओळखीचे शोधणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. ती समजून घेतली तर त्या प्रक्रियेच्या मर्यादा ध्यानात येतील. हे करणे आवश्यक आहे, कारण मानवाची सर्व प्रगतीच या नैसर्गिक मर्यादा ओलांडण्यावर अवलंबून असते. सर्वसाधारण प्राणी आणि मानवप्राणी यांतील मोठा फरक हाच. म्हणजे माझी कल्पनाशक्ती या चौकटीतून मुक्त करणे आवश्यक आहे, अर्थात, माझा चष्मा काही काळ काढून ठेवण्याची गरज आहे. हे प्रचंड अवघड आहे. यासाठी फार जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मला इथे एक स्पष्ट करायचे आहे. असे या नैसर्गिक चौकटीतून पाहणे, चौकटीसकट जगणे यास मी चूक/बरोबर असली लेबले लावत नाहीये. ती पायरी फार फार पुढे येईल. मी ज्या प्राथमिक पातळीवर विचार करतोय, तिथे ही लेबले लावली तर पुढेच जाता येणार नाही. मुळात, ही लेबले लावण्याची पायरी अगदी उशिरात उशिरा यावी, हाच तर या मंथनाचा मुख्य उद्देश आहे. तेव्हा असे जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आले.

इंग्रजीमध्ये 'comfort zone' असा एक सुरेख शब्दप्रयोग आहे. म्हणजे कूपमंडूकवृत्तीच, पण थोडा कमी बोचणारा शब्द. 'हे छान आहे, हे मला आवडले, कारण ह्याच्याशी मी रिलेट होऊ शकलो', हे जेव्हा मी सतत म्हणू लागतो तेव्हा समजायचे की, आपण आता आपल्या कोशात गेलो आहोत. असे जेव्हा आपले प्रत्येक कलाकृतीबाबत व्हायला लागते, तेव्हा शक्यता हीच जास्त असते की, आपण आता फक्त आपल्याच कूपात इतरत्र बघत आहोत. मग साहजिकच सर्वकाही आवडणार. मग तेच तेच वाचले जाते, तेच तेच पाहिले जाते आणि तेच तेच परत परत आवडले जाते. 'मी रिलेट करू शकलो (आणि म्हणून मला आवडले)' हे विधान सातत्याने आले की, माझ्या डोक्यात धोक्याची घंटी वाजते. हा स्वतःच स्वतःला नकळत दिलेला इशारा असतो, 'बाबा रे! आता चौकट मोडून बाहेर पडण्याची वेळ आली आहे'. स्वतःचा खासा प्रदेश सोडायचा असेल तर स्वतःला ताणावेच लागेल. पण स्वतःचा देश सोडणे म्हणजे दिग्विजयाच्या आवेशात निघूनही चालत नाही. दिग्विजयाच्या आवेशात निघालो, तर जे प्रदेश जिंकेन त्यांना माझीच चौकट चढवेन, त्यांना माझ्याच वेशींमध्ये बसवेन. मला वेशींमध्ये कोंबून बसवायचे नाही, मला पेशींमध्ये पचवायचे आहे. तेव्हा स्वतःचा कूप सोडताना मलंगवृत्तीने, फकिरीवृत्तीनेच सोडावा लागेल, त्यासाठी विंदांच्या उक्ती अंगी भिनाव्या लागतील --

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे

स्वतःचा प्रदेश सोडायचा, म्हणजे माझ्या जाणिवा विस्तारल्या पाहिजेत, माझी कल्पनाशक्ती भयमुक्त, भयगंडमुक्त झाली पाहिजे. जाणिवा आणि कल्पनाशक्तीचे नातेसुद्धा किती वैशिष्ट्यपूर्ण आहे! मी विश्वाकडे पाहत असताना त्या नजरेद्वारे माझ्यात निर्माण झालेल्या जाणिवा, त्या जाणिवांपासून तयार झालेली माझ्या मनाची एक चौकट अथवा साचा, या चौकटीत जन्माला आलेली माझी कल्पनाशक्ती आणि याच कल्पनाशक्तीने परत बदललेला माझा 'नजरिया'... असे हे स्वपोषक आवर्तन (Feedback Loop) आहे. असे आवर्तन सतत चालू ठेवले, सतत जिवंत ठेवले, तर हे वाढत्या परिघाचे वर्तुळ होईल. इथे परत मला एलिफचे वर्तुळ दिसते. जाणिवा-कल्पनाशक्तीचे हे वाढते वर्तुळ म्हणजेच सृजनाचे खेळघर नव्हे काय? अभिजात कलेचा उगम कसा होतो? कुठे होतो? जिथे कुठे आणि जसा कसाही होत असेल, तिथे व तेव्हा असे नेहमीच दिसेल की मानवाच्या जाणिवांना कल्पनाशक्तीचे पंख फुटले होते.

माझी चौकट

शाळेत असल्यापासून वेड एकच - वाचनाचे. घरी असलेले झाडून सर्व काही वाचायचो. अगदी 'माणूस', 'सोबत', 'साधना', 'किस्त्रीम' इ. नियतकालिकांपासून 'आनंद', 'किशोर'पर्यंत आणि मंगळवेढेकर, मुधोळकर, भा.रा. भागवतांपासून यदुनाथ थत्ते, सावरकर यांच्यापर्यंत. काहीही वाचायला घरी आडकाठी नव्हती. वाचायचो त्यातले ८०% कळायचे नाही. पण वाचत राहिलो. समजून घेण्याची आस होती, पण त्याहीपेक्षा 'हे वाचून तर बघू' ही आस जास्त तीव्र होती. 'निषिद्ध असे काही नसते' हे बाळकडू घरच्यांनी अप्रत्यक्षरीत्या पाजले. आता कळते की, त्यामुळे आपले वर्तुळ लवचिक राहायला मदत झाली आहे. बाकी कला आणि त्यांच्या जाणिवांबद्दल आनंदच होता. इतका, की घरचे औरंगजेब म्हणायचे.

ज्युनिअर कॉलेजात गेलो तेव्हा एकदा कधीतरी जाणवले की आपल्याला संगीतात काहीच रस नाहीये. पण असे जाणवले की, आपण तेच तेच करतोय आणि आपले मित्रसुद्धा. किंबहुना, म्हणूनच ते आपले मित्र आहेत. मग गाणी ऐकायला सुरुवात केली. हिंदी, मराठी, इंग्रजी गाणी सहज उपलब्ध होतीच. तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतसुद्धा. त्याच सुमारास टाईम्स म्यूझिकने काही सीडी प्रकाशित केल्या - †हांदेल, बाख, मोत्झार्ट, बीथोवन, इत्यादींच्या रचना; लुई आर्मस्ट्राँग, एला फिट्झजेराल्ड यांचे जाझसंगीत, वगैरे. त्या मुद्दाम मागवल्या. (बाबांना विचारल्यावर बाबा तत्क्षणी 'हो' म्हणाले). त्या ऐकायला सुरूवात केली. आता इतक्या वर्षांनंतर मला अजूनही राग-ताल-लय वगैरे कळत नाही. शास्त्रीय संगीत अजूनही काही वेळा कंटाळवाणे होते. बी फ्लॅट, एफ शार्प हे अजूनही तितकेच अगम्य आहेत. पण तरी इमानेइतबारे ऐकत राहतो. उद्देश हाच की, स्वतःला ताणत रहावे. चौकट कठीण होऊ नये.

तीच गोष्ट चित्रकलेचीसुद्धा. शाळेत असताना झाडून सर्व स्पर्धात्मक परीक्षा मी दिल्या आहेत. अगदी भूगोल प्रज्ञाशोध वगैरेसुद्धा. पण चित्रकलेची मात्र मुळीच नाही, कारण तो विषय मला सर्वांत अवघड जाणारा आणि अतिअगम्य. अभियांत्रिकीला असताना धातूनिर्माणशास्त्र हा विषय होता. त्यात धातूंच्या अंतर्गत रचनेची चित्रे काढायची असतात. ती मोजूनमापून काढायची नसतात. ती काढताना एके दिवशी अचानक साक्षात्कार झाला की, अरेच्चा! ही साधी चित्रे काढतानासुद्धा का भीती वाटते? मग जे संगीताबाबत केले तेच चित्रकलेबाबतसुद्धा करायला लागलो. काही प्रदर्शने आवर्जून जाऊन पाहिली. रवी परांजप्यांचे लेख आवर्जून वाचायला लागलो. परदेशांतली संग्रहालयेसुद्धा पाहिली. या क्षेत्रात मात्र माझी संगीतापेक्षाही घोर वाईट परिस्थिती आहे.

'जमिनीवर राहा, वास्तवात राहा', असे सल्ले नेहमीच दिले जातात. कल्पनाशक्तीचा वारू अगदीच अनिर्बंध भटकायला लागला की, वास्तव आणि अवास्तव यांच्यातील सीमारेषा धूसर होते. पण म्हणून वास्तव आणि कल्पनाशक्ती हे विरुद्ध नव्हेत, तर उलट ते परस्परपूरक आहेत, त्याचे कारण म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीचे आपल्या जाणिवांशी असलेले नाते. जाणिवांद्वारे झालेल्या ज्ञानाचा वापर कल्पनाशक्ती करते आणि कल्पनाशक्तीतून आलेल्या अनुभूती आपले ज्ञान 'संपादित' करतात. याची अनेक एकाहून एक सरस उदाहरणे विज्ञानात आढळतात.

Snake_final_1.jpg

∑केक्यूले नावाचा एक रसायनशास्त्रज्ञ 'बेन्झीन' या रासायनिक पदार्थावर संशोधन करत होता. बेन्झीनचे अनेक गुणधर्म माहीत होते, त्यावरून बेन्झीनमध्ये काय असेल याचा त्याला अंदाज होता. पण तो रेणू नक्की कसा असेल, त्याची रचना कशी असेल, असा त्याच्यापुढे मोठा गहन प्रश्न होता. गोष्ट अशी सांगतात की, त्याला एकदा घरातील शेकोटीसमोर झोप लागली. तेव्हा त्याला स्वप्नात आगीच्या ज्वाळांनी तयार झालेली एक चक्राकृती दिसली. जागा झाल्यावर त्याला ते स्वप्न आठवले आणि बेन्झीनचा रेणूसुद्धा असा चक्रासारखा असेल, हे त्याला सुचले. सत्य कळायला कल्पनाशक्ती कामी आली.

इथे आपण एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. केक्यूलेने कल्पनाशक्ती आणि त्याच्या जाणिवा यांचा मेळ घालून सत्याकडे प्रवास केला खरा. पण या प्रवासात एक अत्यंत महत्त्वाचा पडाव होता - प्रातिभविचाराचा (intuition). प्रातिभविचार हे तर मूलगामी प्रतिभेचे व्यवच्छेदक लक्षणच. कित्येक वेळा आपल्याला हे अनुभव येतात. एखाद्या न सुटणार्‍या प्रश्नाचे उत्तर अंधारातून अज्ञात तिरीप यावी तसे झळकते. ती तिरीप कोठून आली? माग काढत गेलो तर परत स्वतःपाशीच पोहोचतो. हा प्रातिभविचार कोठून आला?

मी नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात शिकत असताना केटरसन नावाचा एक प्राध्यापक होता. घनभौतिकी (Solid State Physics) या विषयातला दादा माणूस. दर शुक्रवारी आम्हांला एखाद्या बाहेरील प्राध्यापकाचे त्याच्या संशोधनावर आधारित व्याख्यान असायचे. व्याख्याता भौतिकशास्त्रामधल्या कुठल्याही एका क्षेत्रातील संशोधक असायचा. त्याला बहुतेक सर्व प्राध्यापक, पीएचडीचे विद्यार्थी उपस्थित असायचे. यात केटरसन हमखास त्या प्राध्यापकांना प्रश्न विचारायचा. आता त्याने त्याच्याच विषयावर व्याख्यान असता प्रश्न विचारणे यात काही आश्चर्य नाही. पण विशेष म्हणजे कुठलाही विषय असो, केटरसन प्रश्न विचारायचा आणि बहुतेक वेळा ते प्रश्न अतिशय नेमके, मूलगामी असायचे. म्हणजे ते प्रश्न तसे आहेत, हे व्याख्यात्यानेच मान्य केलेले आम्ही अनेकवेळा ऐकले आहे. हे कसे शक्य आहे? कारण केटरसनकडे प्रातिभविचाराची शक्ती होती. तो स्वतः त्याच्या क्षेत्रात खोल घुसला होता. असे अगदी खोल घुसण्यासाठी त्याने जे प्रयत्न केले होते ते करताना, किंबहुना, ते केल्यामुळेच, त्याची प्रातिभशक्ती विस्तारली होती, तीक्ष्ण झाली होती. अशी कैक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात आढळतात. केक्यूलेने जे केले तेसुद्धा प्रातिभच होते.

तीन मितींना, म्हणजेच x, y, z अक्षांना डोळ्यांसमोर आणणे मुळीच अवघड नाही. एखाद्या पेटार्‍याचा एक कोपरा व त्यापासून निघालेल्या तीन कडा म्हणजेच हे अक्ष. असे म्हणतात की, ßरॉजर पेनरोज हा थोर गणिती चार मितींना (x, y, z हे अवकाशाचे अक्ष आणि चौथा काळाचा अक्ष) डोळ्यांसमोर आणून काम करू शकतो. त्याचे पुरावे त्याच्या गणिती कामामध्ये दिसतात. आता असे दृष्यस्वरूप आणता येणे जाणिवेतून तर मुळीच शक्य नाही. पण हा केवळ कल्पनाशक्तीचा आविष्कारसुद्धा नव्हे. हाच तो प्रातिभविचार. तज्ज्ञांमध्ये तो खूप वाढलेला असतो, कारण तज्ज्ञांचा सखोल व सविस्तर अभ्यास. या अभ्यासामुळे त्यांचा जाणिवा-कल्पनाशक्तीचा घेर अत्यंत विस्तृत असतो आणि अशा विस्तृत घेरात इतर निर्माणाबरोबर खुद्द प्रातिभविचाराचेही सृजन होत असते. यालाच आपण 'विषय आवाक्यात येणे' असे म्हणतो. गंमत म्हणजे ही प्रातिभशक्तीची वाढ आणि तिचा वापर एकरेषीय मुळीच नसतात. ही वाढ आणि वापर 'एकास दोन म्हणून आठास सोळा' अशी प्रमाणबद्ध नसते. त्यामुळे एका विशिष्ट क्षेत्रातील प्रातिभशक्ती आजूबाजूच्या क्षेत्रातही आपोआप वापरली जाते, जशी केटरसनकडून वापरली जायची तशीच.

एकदा बहिणीकडे गेलो असता तिच्या बैठकीच्या खोलीमध्ये एक चित्र पाहिले. चित्र अमूर्त होते. त्याकडे काही वेळ बघत बसलो. 'बरे वाटले आणि हॉलमध्ये बरे दिसले' एवढ्याच हेतूने बहिणीने आणलेले चित्र. मी निरखून बघतोय म्हणून तिने विचारले, 'काही कळतंय का?' मला कळले काहीच नव्हते, अजूनही नाहीये. पण का कोण जाणे, त्या चित्रात मला एक घर दिसले. साधे घर नाही, तर युद्ध, स्फोट, गोळीबार अशा कारणांमुळे उद्ध्वस्त झालेले आणि त्या दुर्दैवी खाणाखुणा अंगावर वागवत असलेले घर. तेच घर मला त्या अमूर्त चित्रात का दिसले? मी नंतर मुद्दाम मागील काही दिवसांची वृत्तपत्रे पाहिली. त्यात कुठेही काश्मीर अथवा तत्सम प्रदेशातील हिंसाचाराच्या बातम्या नव्हत्या. मी याला प्रातिभविचार म्हणणार नाही, कारण चित्रकलेबाबत प्रातिभशक्ती यावी, एवढा माझा अभ्यास मुळीच नाही. ते मला उपजतसुद्धा नाही. असाच एक प्रसंग एका प्रदर्शनात घडला. कॅडबरीच्या वेष्टनांपासून बनवलेली एक कलाकृती होती. तिच्याकडे काही वेळ बघत रहावेसे वाटले. त्यात मला काहीच दिसले नाही. तरी चित्रकाराला भेटून 'चित्रात काहीतरी असल्याचे वाटले' असे सांगावेसे वाटले. तिनेही मंद हसून स्वीकार केला. चित्र कळले आहे का?, मला अजूनही माहीत नाही. ते महत्त्वाचे वाटत नाही. या दोन्ही वेळी माझ्या जाणिवांनी चित्रकलेचे बोट धरल्याचा भास झाला. हे महत्त्वाचे वाटते.

ज्याच्याशी मी रिलेट होऊ शकत नाही, ते शोधत राहणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. ते जे काही आहे ते स्वतःला आवडणे महत्त्वाचे नाही. 'स्वतः' हा प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळी केंद्रस्थानी नसावा. खरेतर तो बहुतेक वेळा नसतोच, पण आपण ते मान्य करत नाही. ज्यात 'मी' दिसत नाही, असे आरसे शोधावेत. सतत आरशासमोर उभे राहणे, हे कुठल्याच मानवी संस्कृतीत प्रगल्भतेचे लक्षण मानले जात नाही. असे स्वतःच्याच रुपाच्या प्रेमात पडण्याचा कोणत्याच मानवी समाजाने पुरस्कार केलेला नाही. मग आयुष्यात इतरत्र तरी स्वतःचीच प्रतिबिंबे का शोधावीत?

'द इंटरनॅशनल' या चित्रपटातली एक व्यक्तिरेखा दुसर्‍या व्यक्तिरेखेला म्हणते, 'Well, this is the difference between truth and fiction. Fiction has to make sense'. मानवी स्वभावाची गंमतच ही की, आपल्याला अज्ञात प्रदेशसुद्धा पूर्णपणे अज्ञात चालत नाहीत. अगदी कल्पनेतसुद्धा. कल्पनाशक्तीला जाणिवांचे जोखड आणि जाणिवांना कल्पनाशक्तीची वेसण अशी आपली अवस्था... स्वतःचेच शेपूट गिळणार्‍या सर्पासारखी. जाणिवा-कल्पनाशक्ती-प्रातिभविचार यांचे अनादि-अनंत चक्र आणि त्या चक्राच्या नाभीपाशी होणारे सृजन यांचे कोडे अवघड आहे खरे, पण ते सोडवायचा प्रयत्न का करावा? प्रयत्न एकच असावा, स्वतःशी 'अनरिलेटेड' गोष्टी शोधण्याचा. स्वतःला ताणण्याचा. ते अनादि-अनंत चक्र सतत वाढवत नेण्याचा. त्या जगड्व्याळ चक्रावर फक्त फिरत राहण्यातून जो आनंद मिळतो, तोच इतका समृद्ध करणारा आहे की, खुद्द सृजनदेखील साध्य न होता, साधन होते.. स्वत:च्या समृद्धीकरणाचे.

सत्यनारायणाच्या कहाण्या मला अजूनही वाचाव्याशा वाटतात, याचे मला थोडे बरे वाटते. त्याचबरोबर बरीच भीतीसुद्धा. अजून बाकी खूप आहे. ओरिगामीसारखी हस्तकला आहे, नृत्यकला खुणावते आहे. निसर्ग खूप बघतो, पण छायाचित्रे बघायची राहूनच जात आहेत. चित्रपट, नाटके खूप बघतो, पण नेपथ्य, वेशभूषा बघायचे राहून जाते. अजून बाकी खूप आहे. अजून बाकी खूप आहे.

- अरभाट

* http://www.ted.com/talks/lang/eng/elif_shafak_the_politics_of_fiction.html
† Handel, Bach, Mozart, Beethoven, Louis Armstrong, Ella Fitzgerald
∑ Kekulé
ß Roger Penrose

Taxonomy upgrade extras: