कला आणि 'न'कला

कुठल्याही कलावंताची अस्सल कलाकृती ही त्याच्या अनुभवांचा, जाणिवांचा मूर्त आविष्कार असते. त्यामागे अनेक वर्षांची कलासाधना आणि विचारप्रक्रिया उभी असते. एखादा नामवंत चित्रकार अमुक चार ठराविक रंग वापरून त्याचं चित्र रंगवत असेल, नेहमी ठराविक प्रतिकं आपल्या चित्रांत वापरत असेल तर आपल्या पॅलेटीवर तेच रंग घेऊन, तीच प्रतिकं तशीच वापरून शैलीची नक्कल करता येते, पण त्या चित्रामागची विचारप्रक्रिया आपल्या कारागिरीत आणता येत नाही.

border2.JPG

'Of the 2,500 authentic works painted by Jean-Baptiste Camille Corot, 7,800 are in american collections alone' - Newsweek, 1940
(जाँ-बातिस्त कामिय कोरो याच्या २५०० अधिकृत कलाकृतींपैकी ७८०० कलाकृती तर केवळ अमेरिकन संग्रहातच आहेत. - न्यूजवीक, १९४०)

collage1_copy.jpg

प्पन वर्षांचा हान फान मीगरेन, चित्रकार आणि कलाविक्रेता (आर्ट डीलर), आपल्या आयुष्यात, व्यवसायात चांगला स्थिरावला होता. त्याच्या चित्रांना, त्याच्या नावाला कलाजगतात मान होता. आपल्या आलिशान बंगल्यामध्ये तो आयुष्य सुखाने घालवत होता. एके दिवशी अलाईड आर्ट कमिशनाबरोबर काम करत असलेले डच फील्ड सर्व्हिशीतले दोन अधिकारी त्याच्याकडे चौकशीला आले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात नाझी फौजांनी लुटून नेलेल्या वस्तू, कलाकृती परत मिळवून मूळ मालकाकडे सोपवायच्या, असं त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्याच संदर्भातलं काम करताना त्यांना प्रख्यात डच चित्रकार वर्मीर याची एक कलाकृती हिटलराचा उजवा हात समजल्या जाणार्‍या हेर्मान ग्यॉरिंगाच्या संग्रहात मिळाली. 'ख्राइस्ट विथ द वुमन टेकन इन अडल्टरी' नावाचं ते चित्र जरी वर्मीराच्या चित्रसूचीत नमूद नसलं तरी ते त्याचंच आहे, याबद्दल अधिकार्‍यांना जराही शंका नव्हती. कारण रोटरडामातल्या प्रसिद्ध बॉयमान्स संग्रहालयाचं आकर्षण ठरलेल्या वर्मीराच्याच 'द सपर अ‍ॅट ईमेइस'च्या शैलीमध्ये आणि या चित्राच्या शैलीमध्ये कमालीचं साम्य होतं. वर्मीराचं हे चित्र हा राष्ट्रीय ठेवा होता आणि या चित्राची विक्री मीगरेनामार्फत झाली असल्याची कागदपत्रं त्यांना मिळाली होती. हे चित्र त्याच्याकडून जर्मनांना अनवधानाने विकलं गेलं, याबद्दल अधिकार्‍यांना काहीच शंका नव्हती. फक्त आता ते चित्र मूळ मालकाला परत करायचं होतं, त्यामुळे मीगरेनाकडून त्यांना त्या व्यक्तीची माहिती हवी होती. मीगरेनानं त्याला नकार दिला. मूळ मालकिणीने आपलं नाव गुप्त राहावं, असं म्हटलं असल्याने त्याला त्या संकेताचा भंग करता येणार नाही, असं त्यानं परोपरीनं समजावलं. त्याचं म्हणणं संशयास्पद वाटू लागल्याने शेवटी त्याला कैदेत टाकलं गेलं. देशद्रोहाचे आरोप त्याच्यावर करण्यात आले. त्याच्यावर एकदा गुन्हा शाबित झाला असता तर देहदंडाची शिक्षा ठरलेली होती. अखेर तब्बल सहा आठवड्यांनी मीगरेनानं तोंड उघडलं, 'मी बनावटकार (फोर्जर, या लेखासंदर्भात आर्ट फोर्जर) आहे आणि ते चित्र मीच चितारलं होतं'.

इस्टर आयलंडावरले दगडी पुतळे ज्यांनी कोरले त्या शिल्पकारांची नावंही कुणाला माहीत नाहीत. भारतातल्या खजुराहोच्या शिल्पाकृती घडवणारे, अजिंठा-वेरुळाची लेणी कोरणारे कारागीर आजही अज्ञात आहेत. कला जेव्हा केवळ पूरक सजावट म्हणून वापरली जाई तेव्हा अशा कलाकारांची नावं जगासमोर आली काय किंवा नाही आली काय, कुणालाच फारसा फरक पडत नसावा. जीव ओतून घडवलेल्या आपल्या कलाकृतींची नक्कल जरी कुणी केली तरी मूळ कलाकारालाही त्याबद्दल फारसा आक्षेप नसावा. तसं पाहू जाता, कलाकृतीची नक्कल ही जवळपास कलेइतकीच जुनी गोष्ट आहे. स्पेनातल्या एका प्राचीन गुहेत सापडलेले गव्याच्या डोक्याचे भित्तिचित्र हे बाजूच्याच एका गुहेत असलेल्या तशाच चित्राची अभ्यासासाठी म्हणा, किंवा केवळ प्रतिकृती बनवायची म्हणून काढलेले चित्र आहे, असे कलाभ्यासकांचे म्हणणे आहे. रोमन शिल्पकारांनी ग्रीक शिल्पकारांच्या शैलीची नक्कल करून अनेक शिल्पे बनवल्याचे चिकार दाखले सापडतात. (अर्थात ती मूळ ग्रीक शिल्पे नाहीत, नकला आहेत, हे ग्राहकांना माहीत होते.) हळूहळू कलाक्षेत्रात कलाकारांच्या नावाला महत्त्व प्राप्त होऊ लागलं. प्रबोधनोत्तर काळात जवळ पैसा बाळगून असलेले आणि कलेची आवड निर्माण झालेले सुखवस्तू मध्यमवर्गीय कलाकृती विकत घेण्यासाठी पैसा मोजू लागले. पुरातन रोमन शिल्पकृती उत्खननात सापडू लागल्या, तसे त्यांसाठी वाटेल तेवढा पैसा ओतणारे 'कलारसिक' पुढे आले. एकाएकी कलेला मोठी किंमत आली. कलाकारांच्या नावाला वलय प्राप्त झालं. एखाद्या प्रसिद्ध कलाकाराने घडवलेल्या कलाकृतींना केवळ त्याच्या नावामुळेही जास्त किंमत मिळू लागली. आणि हळूहळू 'न'कलेने आपले हातपाय कलाजगतात पसरायला सुरुवात केली.

या बनवेगिरीची तीन प्रकारांत वर्गवारी करता येईल. एखाद्या माणसानं स्वतः एखादी कलाकृती एखाद्या नामवंत कलाकाराच्या शैलीत घडवून त्या कलाकाराची अस्सल कलाकृती म्हणून विकणं हा झाला पहिला प्रकार. मीगरेन, डेव्हिड ष्टाइन, एरिक हेबॉर्न असे बनावटकार या वर्गात मोडतात. एखादी कलाकृती नव्यानेच घडवून तिला 'पुरातन' भासवून तिची जास्त किंमत वसूल करणं, हेही याच प्रकारातलं. यातलं ठळक आणि सर्वज्ञात उदाहरण म्हणजे मिकलांजेलोचा 'निद्रिस्त मदन' (दिओ दामोरे दॉरमाँत)! स्वतः घडवलेल्या या शिल्पाला, आपला आश्रयदात्या मेदिसीच्या सल्ल्यावरून त्याच्याच घराच्या आवारात पुरून, नंतर त्याचं 'उत्खनन' करून, त्याला पुरातन(!) कलाकृती म्हणून स्वतः मिकलांजेलोने खपवलं होतं. दुसरा प्रकार म्हणजे, आपल्याकडे असलेली कलाकृती चढ्या किमतीत विकली जावी, म्हणून तिच्याबद्दल खोटी माहिती पसरवणं. 'अमुकतमुक कलाकृती सातव्या शतकातली आहे किंवा इसवीसनापूर्वीची आहे' असं म्हटलं की, आपोआप लोकांचा तिच्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतो. फार फार पूर्वी उलटून गेलेल्या काळाशी नातं सांगणार्‍या गोष्टी तशा दुर्मिळ आणि म्हणूनच मौल्यवान! तसंच, संग्रहातली एखादी कलाकृती एखाद्या नामवंत कलाकाराच्या शैलीतच घडवल्यासारखी असेल तर 'ती त्या कलाकाराचीच अस्सल कलाकृती' म्हणून संग्राहकांनी विकल्याची उदाहरणंही कैक आहेत. तिसर्‍या प्रकारात अंतर्भूत आहेत ते काही कलातज्ज्ञ आणि काही प्रख्यात कलादालनांचे, संग्रहालयांचे संचालक! आपण विकत घेतलेली किंवा परीक्षणासाठी आलेली एखादी कलाकृती अस्सल नाही, बनावट आहे हे कळूनही, तसं उघड न करता पुढे तीच कलाकृती अस्सल म्हणून कुणा तिसर्‍याला विकायचा मार्ग सुकर करणारे! खेरीज त्या कलाकृतीच्या अस्सलपणाची आपणच ग्वाही देणारे! अर्थात पहिल्या दोन प्रकारांतही कलातज्ज्ञांचा महत्त्वाचा वाटा असतोच. कारण, बरेचसे बनावटकार आपल्या कलाकृतीच्या 'अस्सल'पणाविषयी कुणालाच शंका येऊ नये, म्हणून त्या प्रमाणित करून घ्यायला कलातज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींकडेच येतात.

प्राचीन ग्रीसातल्या दोन नामवंत चित्रकारांसंबंधी एक गोष्ट सांगितली जाते. त्या दोघांमध्ये एकदा 'आपल्यात श्रेष्ठ चित्रकार कोण?' असा वाद सुरू झाला. वादाचा निर्णय होईना, तेव्हा दोघांनीही आपापली चित्रं कलातज्ज्ञांच्या मंडळासमोर सादर करायचं ठरवलं. चित्रं पूर्ण झाली तशी धूळ, प्रखर प्रकाश वगैरेंनी खराब होऊ नयेत म्हणून ती कापडानं झाकून ठेवली गेली. ठरल्या दिवशी तज्ज्ञ आले. पहिल्या चित्रावरचं कापड दूर केल्यावर त्या चित्रकारानं अतिशय खराखुरा वाटणारा द्राक्षांचा घोस चितारलेला दिसला. इतका खरा की, काही पक्षी तिथं येऊन घोसावर चोची मारू लागले. तज्ज्ञांचं मत अतिशय अनुकूल झालंच होतं. पक्ष्यांनीच त्या चित्राच्या श्रेष्ठत्वाची पावती दिली नव्हती का? पण तरी त्याआधी दुसरं चित्र पहायचं ठरलं. त्याच्यावरच्या कापडाला बाजूला करण्याचा प्रयत्न करताच तज्ज्ञ चमकले. ते कापड नव्हतंच! त्यावर टाकल्यासारखं दिसणारं कापड हे त्या चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेलं चित्रच होतं. त्रॉम्प लॉय प्रकारातलं! निर्णय स्पष्ट झालाच होता. पक्ष्यांपेक्षा कलेबाबत जास्त जाण असलेले तज्ज्ञही ज्या चित्रातली क्लृप्ती ओळखू शकले नाहीत, ते चित्र निर्विवाद श्रेष्ठ ठरलं. सहसा कलेची आवड, जाण असणारा कलारसिकही अस्सल आणि नकली कलाकृती ओळखू शकत नाही. तज्ज्ञांना मात्र बरेचवेळा ते त्या क्षेत्रातल्या अभ्यासामुळे कळू शकतं. आणि अर्थातच यामुळे या बनावटकारांचे प्रयत्न वरच्या उदाहरणातल्या त्या दुसर्‍या चित्रकाराप्रमाणे तज्ज्ञांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यावर जास्त केंद्रित होतात.

भारतात एम. एफ. हुसेनांना त्यांच्याच एका कलाकृतीची हुबेहूब नक्कल दाखवली असता, त्या दोहोंतली त्यांची मूळ कलाकृती त्यांनाच न ओळखता आल्याचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. ही 'न'कलेची केवळ पहिली आणि सामान्य पायरी झाली. इतरत्र मात्र प्रत्येक नामांकित कलाकृतीसंदर्भात योग्य ते दस्तऐवजीकरण काटेकोरपणे केल्याने तंतोतंत नक्कल करणं आणि ती अस्सल म्हणून खपवणं अशक्यप्राय असतं. मग सुरू होतो बनावटकारांचा एका वा अनेक चित्रकारांची चित्रशैली त्यांतल्या सगळ्या बारकाव्यांसकट आत्मसात करण्याचा प्रवास! हे काम तितकं सोपं नाही. प्रख्यात नकलाकार एरिक हेबॉर्नाने या विषयावर 'द आर्ट फोर्जर्स हँडबुक' नावाचं अख्खं पुस्तक लिहिलं आहे. 'कुठलीही कलाकृती स्वतःहून फसवू शकत नाही, फसवं असू शकतं ते त्या कलाकृतीबाबतचं कलातज्ज्ञांचं मत', हे त्याचं म्हणणं त्याने पुस्तकावर नमूद केलं आहे. हे मत आपल्याला हवं तसं घडवण्यासाठी लागणार्‍या सर्व युक्त्या त्याच्या पुस्तकात आढळून येतात. पुरातन भासतीलशा कलाकृती घडवताना जुना कागद कसा मिळवावा वा कुठली रसायनं वापरून 'जुना' करावा, एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराच्या कालखंडात कुठले रंग वापरले जात, तो चित्रकार स्वतः कुठले रंग वापरत असे, ते कसे बनवावेत, कशात काय मिसळावं याची अतिशय तपशीलवार आणि तंत्रशुद्ध माहिती एरिक देतो. जुने कागद मिळवण्यासाठी चित्रविक्रीची ठिकाणं वा जरीपुराणेवाल्यांची दुकानं कशी धुंडाळावीत, कलाविक्रेत्यांशी तुमची मैत्री असली की, कसे फायदे होतात, हे हातचं राखून न ठेवता तो भावी बनावटकारांसाठी मांडत जातो. त्यात त्याने स्वतःचंच एक उदाहरण दिलं आहे. अठराव्या शतकात होऊन गेलेल्या जी. बी. पिरानेसी या चित्रकाराच्या शैलीत त्याने चितारलेल्या एका बनावट चित्राचा कागद हा खरोखर अठराव्या शतकातला, पिरानेसी वापरत असे तोच कागद होता आणि पुरावा बळकट करायला त्यावर पिरानेसीच्या चित्रांच्या कागदावर असलेला वॉटरमार्कही होता. हे कसं शक्य झालं? तर हेबॉर्नाच्या एका कलाविक्रेत्या मित्राकडे पिरानेसीच्या मूळ रेखाचित्रांची, पक्की बांधणी केलेली पुस्तकं विकायला होती. ती सगळी एकत्र विकण्यापेक्षा एकेक रेखाचित्र सुटंसुटं विकण्यात त्या कलाविक्रेत्याला जास्त फायदा होता, त्यामुळे त्याने ती पुस्तकं सुटी केली. रेखाचित्रांचे कागद वजा जाता, काही कागद हे त्यात कोरेच होते, जे हेबॉर्नानं आनंदानं त्याच्याकडून विकत घेतले.

एकदा अस्सल जुने कागद हाती आले की, पुढे चित्रं काढण्याआधी काय काय तयारी करायची, याचे तपशीलही मग तो पुरवतो. कागदाची नेमकी स्थिती काय आहे, त्याला साफ कसं करावं, त्याला अजून नक्की किती 'जुनं' करावं, हे मांडतो. त्यातलं हे एक उदाहरण अतिशय रंजक आहे. जुन्या, जाड कागदांना वा कॅनव्हासांना सहसा किड्यांनी काही ठिकाणी छिद्रं पाडलेली असतात. अशा जुन्या कागदांवर/कॅनव्हासांवर शाईने वा रंगांनी चित्रं काढताना, त्याचे ओघळ त्या छिद्रांत जाऊ शकतात आणि कलाकृती बनावट आहे हे कळू शकतं. ते टाळण्यासाठी चावून मऊ केलेला कागदाचा लगदा त्या छिद्रात भरावा आणि सोन्याचा पातळ पत्रा बनवताना सोनार जितक्या कौशल्याने, अचूकतेने सोन्याचा तुकडा ठोकेल तसा ठोकावा. मग ते प्रकरण वाळलं की बाहेर असलेला जास्तीचा कागद कापावा किंवा ब्लेडाने काळजीपूर्वक तासून घ्यावा. मग त्यावर आपलं चित्र पुरं करावं आणि शेवटी अतिशय काळजीपूर्वक ती छिद्रं पुन्हा मोकळी करावीत. मात्र हे काम खूप किचकट आणि नाजूक असल्याने शक्यतो टाळावं, असा सल्ला द्यायला हेबॉर्न विसरलेला नाही. पुढे रेम्ब्रां, हाल्स, टिश्यान या प्रबोधनकाळातील बुजुर्ग उस्तादांच्या रंगाच्या पॅलेटींबद्दलही तो लिहितो. कोण कुठले रंग प्रामुख्याने वापरायचा, याची नोंद करून मग बनावटकाराने आपल्या पॅलेटीवर कुठकुठले रंग घ्यावेत, याची काटेकोर यादी तयार होते. बनावट कलेचा तंत्रशुद्ध पाया रचला जातो.

354px-Virgin_with_Child-Forgery.jpg

'व्हर्जिन विथ चाईल्ड'. या 'पुरातन' समजल्या गेलेल्या चित्रात किड्यांनी पाडलेली छिद्रे ही प्रत्यक्षात ड्रिल मशिनाने पाडली गेल्याचे परीक्षणात निदर्शनास आले. छिद्रे सरळ होती, वेडीवाकडी नव्हती. तसेच चित्रातील स्त्रीचा पोशाख हा 'प्रशियन ब्ल्यू' या रंगात रंगवलेला होता, जो चित्राच्या काळाशी सुसंगत नव्हता.

हान फान मीगरेनाचा चित्रकार, बनावटकार ते नामांकित कलाविक्रेता, बनावट चित्रावरून पुढे उद्भवलेलं प्रकरण व त्यापायी घडलेला तुरुंगवास हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे. त्याला चित्रकलेचं चांगलं अंग होतं आणि एक नामांकित व्यक्तिचित्रकार म्हणून त्याने नाव कमावलं. त्याच सुमारास प्रबोधनकाळातली चित्रशैली काहीशी मागे पडून घनवाद(क्यूबिझम), अतिवास्तववाद(सर्रीयलिझम ) अशा चित्रशैलींचा बोलबाला होऊ लागला होता. मीगरेनाच्या त्या धाटणीतल्या चित्रांवर आणि त्याच्या नामवंत चित्रकारांच्या शैलीत चित्रं काढण्याच्या पद्धतीवर कलासमीक्षकांनी सडकून टीका केली. ब्रेडियस हा मीगरेनाच्या काळातला प्रसिद्ध कलातज्ज्ञ. वर्मीराच्या चित्रशैलीचा सखोल अभ्यास केलेला. बायबलातल्या प्रसंगावर आधारित असलेले वर्मीराचे 'ख्राइस्ट इन द होम ऑफ मेरी अँड मार्था' हे चित्र त्यानेच प्रमाणित केले होते. वर्मीराची सुरुवातीच्या काळातली चित्रे व त्याच्याच नंतरच्या प्रगल्भ चित्रांमध्ये जाणवण्याइतपत मोठा मोकळा कालखंड आहे. वर्मीरावर त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कारावाज्ज्योच्या चित्रशैलीचा बराच प्रभाव होता. ब्रेडियसाची त्यामुळे अशी ठाम समजूत होती की, तरुणपणी वर्मीराने इटलीत बरीच भटकंती केली होती आणि त्या प्रभावामुळे बायबलातल्या प्रसंगांवर आधारित वर्मीराची आणखी चित्रे नक्कीच सापडतील. ब्रेडियसाच्या या विधानाने मीगरेनाच्या नकली 'वर्मीरां'ना वाट मोकळी करून दिली. ज्या चित्राने मीगरेनाला प्रचंड पैसा प्राप्त करून दिला ते 'द सपर अ‍ॅट ईमेइस' हे चित्र खुद्द ब्रेडियसाने अस्सल आणि उत्कृष्ट म्हणून प्रमाणित केलं होतं. मीगरेनाने इतरही अनेक चित्रकारांच्या शैलीची नक्कल करून बनावट चित्रं विकली असली तरी मीगरेनाचं नाव घेताच आठवतात ती त्याची नकली 'वर्मीर'चित्रं.

डेव्हिड ष्टाइनाची कथाही फार काही वेगळी नाही. आपण काढलेल्या, आपलं नाव असलेल्या चित्रांना कलाजगतात फारशी किंमत नाही आणि आपल्याला वेगवेगळ्या चित्रकारांची शैली तंतोतंत वापरून चित्रं काढता येताहेत, या दोन जाणिवांनी डेव्हिड ष्टाइनाचं लक्ष बनावट चित्रांकडे वळवलं. मग सुरू झाला वेगवेगळ्या चित्रकारांच्या शैलीत चित्रं काढून, ती अस्सल वाटावीत म्हणून त्यासंबंधी खोटी कागदपत्रं बनवून कलासंग्राहकांकडे वा कलादालनांकडे ती विकण्याचा खटाटोप!

जीर्ट यान यान्सेन आधी एका प्रतिष्ठित कलादालनात नोकरी करत होता. नंतर त्यानं स्वत:ची दोन कलादालनं सुरू केली. ती नीट चालावीत म्हणून त्याला पैसा गरजेचा होता. त्याने कारेल आपेलाचा लिथोग्राफ वापरून पोस्टरं तयार केली आणि त्यावर आपेलाच्या खोट्या सह्या करून ती मूळ चित्रं म्हणून विकली. त्याच सुमारास त्याने आपेलाच्याच शैलीत एक बनावट चित्र तयार केलं, जे मोठ्या किमतीला विकलं गेलं. त्यावरून त्याची भीड चेपल्याने त्याने आणखी एक चित्र लंडनातल्या चित्रांचा लिलाव करणार्‍या संस्थेला पाठवलं. लिलाव करणार्‍या संस्थेने त्याचा फोटो आपेलाला पाठवला असता आपेलाने ते त्याचंच चित्र आहे, अशी हमी दिली. तेव्हापासून यान्सेनाच्या बनावट चित्रांचा अनिर्बंध प्रवास सुरू झाला. मार्क शगालाच्या शैलीतलं एक बनावट चित्र तो कार्ल अँड फेबर या चित्रांचा लिलाव करणार्‍या संस्थेकडे विकायला गेला असताना, सोबत सादर केलेल्या दस्तऐवजांतल्या चुकीच्या शब्दप्रयोगाने त्या संस्थेतल्या एका सदस्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अधिक तपास केला असता ते चित्र बनावट आहे, हेही उघड झालं. पोलिसांनी अखेर त्याच्या ठावठिकाणा शोधला तेव्हा तेथे अनेक नामांकित चित्रकारांच्या शैलीतली अक्षरशः हजारो बनावट चित्रं आढळून आली.

भारतातही तय्यब मेहता, रझा अशांसारख्या चित्रकारांची बनावट कलाकृतींसंदर्भातली उदाहरणं अनेक आहेत. दिल्लीतल्या धूमिमल कलादालनात एकदा चित्रकार रझा यांचं चित्रप्रदर्शन होतं. उद्घाटनाला आयोजकांनी रझा यांनाच पाचारण केलं होतं. प्रदर्शन पाहायला ते दालनात प्रवेशले तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला. समोर असलेल्या 'त्यांच्या' चित्रांपैकी जवळपास एकही चित्र प्रत्यक्षात 'त्यांचं' नव्हतं. केवळ त्यांचं नाव धारण करून, कुणातरी बनावटकाराने चितारलेली चित्रं दिमाखात त्या कलादालनात मिरवत होती. भारतातले काही ख्यातनाम चित्रकार चित्राचं मुख्य काम स्वतः करून, इतर कामं, उदा. चित्रांत रंग भरणे, आपल्या शिष्यवर्गाला पुरी करायला सांगतात आणि तयार झालेलं चित्र आपल्या सहीनिशी विकतात, हेही सर्वज्ञात आहे. गुरूच्या चित्रांवर अशाप्रकारे काम करून 'तयार' झालेला, ती शैली अतिपरिचित झालेला शिष्यवर्ग तशाच पद्धतीने चित्रं तयार करून ती गुरूच्या नावाने विकेल आणि रग्गड नफा कमवेल, हेही मग ओघाने येतं. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये जबर पैसा मिळवलेला नवश्रीमंत वर्ग 'आता कलारसिक म्हणून समाजात स्थान हवं' या इच्छेपोटी नामवंत चित्रकारांच्या चित्रांसाठी लाखोंनी पैसा ओतायच्या तयारीत असतो. आपल्याकडे आलेल्या चित्रावरची सही ही 'एम. एफ. हुसेन' यांची आहे, एवढी बाब समाजात आपलं स्थान 'कलेचा भोक्ता' म्हणून बळकट करायला त्यांच्या मते पुरेशी ठरते, पण अस्सल आणि नकली चित्रांतला फरक दुर्दैवाने त्यांना ओळखता येत नाही. अस्सल चित्रांबरोबरीने मग बनावट चित्रंही त्या जोरावर लाखोंची उलाढाल घडवून आणतात. तय्यब मेहता, हुसेन, गायतोंडे या चित्रकारांच्या चित्रांनी आंतरराष्ट्रीय चित्रलिलावांत दहा लाख डॉलरांचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर मध्ये चढ्या किमतीने विकलं गेलेलं तय्यब मेहतांचं एक चित्र बनावट असल्याचं उघडकीला येणं, त्यामुळे तो लिलाव स्थगित करावा लागणं, संबंधित संस्थेवर खटला दाखल होणं, या सर्व गोष्टी बनावट कलेने आपली पाळंमुळं भारतीय कलाजगतातही खोलवर रुजवली आहेत, ह्याचं निदर्शक आहेत.

शाईचित्रांवर प्रभुत्व असलेला चांग ताछ्यान हा एक नावाजलेला चिनी चित्रकार होऊन गेला. 'मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट, न्यूयॉर्क' इथे असलेले 'द रिव्हरबँक' हे दहाव्या शतकातील तांग राजघराण्याच्या काळातले चित्र हे मुळात त्याने चितारलेले बनावट चित्र आहे, असा एक प्रवाद आहे. तसेच हरवलेल्या सुप्रसिद्ध चित्रांच्या सूचीतून चित्रांची वर्णने वाचून त्याने बनावट चित्रे चितारली व या दस्तऐवजाचा आयताच पुरावा लाभल्याने त्याची बनावट चित्रे उघडकीला येणे कठीण झाले, असे म्हटले जाते.

Van_meegeren_trial.jpg

मीगरेन बनावट चित्राच्या खटल्यात आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी अधिकार्‍यांसमोर त्याचे अखेरचे 'वर्मीर'चित्र चितारताना.

वर्मीराची खोटी चित्रं विकून अफाट पैसा गाठीला बांधलेल्या मीगरेनाची बनावट कला ही शेवटी एका 'वर्मीर'चित्रामुळेच उघडकीला आली आणि आपली बाजू सिद्ध करण्यासाठी त्याला अखेरचं चित्र हे पुन्हा वर्मीराच्या शैलीत कलातज्ज्ञांच्या आणि अधिकार्‍यांच्या मंडळासमोर काढून दाखवावं लागलं. हेबॉर्नाच्या अनेक बनावट कलाकृती यथावकाश उघडकीला आल्या आणि नष्ट केल्या गेल्या, जवळपास प्रत्येकालाच बनावट चित्रांमुळे तुरुंगवासही भोगावा लागला. हे सर्व जाणून घेतल्यावर मनात साहजिकच प्रश्न उभा राहतो की, बोटांत भल्याभल्यांना दुर्मीळ अशी कला असताना तिचा असा वापर का? बनावट कलाकृतींबाबत या 'का?'चं उत्तर सरळसोपं, थेट नाही. खुद्द बनावटकारांबद्दल वेगवेगळे समाजघटक वेगवेगळी मतं मांडताना आढळून येतात. बनावटकार हा कलासमीक्षकांच्या मते कलारसिकांवर सूड उगवत असलेला अतिसामान्य कलाकार असतो, प्रसारमाध्यमांच्या मते पैशासाठी हपापलेला माणूस, काही लोकांच्या मते ज्या कलाकारांची नक्कल त्याने केली त्यांच्या तोडीचा कलाकार, तर काहीजणांच्या मते प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारा बंडखोर नायक. एखाद्या बनावट कलाकृतीचं कलातज्ज्ञच अजाणतेपणी वारेमाप कौतुक करत होते, हे कळल्यानंतर त्या 'न'कलाकाराच्या कामाचा दर्जा जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळेच बनावट चित्रांकडे वळलेल्या कलाकारांबद्दल वाईटही वाटल्याशिवाय राहत नाही.

एखादी कलाकृती सामोरी आली तर तिचं मूल्यमापन कशाच्या आधारावर होतं, हा खरा कळीचा मुद्दा आहे. सहसा लोक (यात तथाकथित कलारसिकही आले!) कलाकृती घडवणार्‍या कलाकाराच्या नावावरून किंवा कलाकृतीशी संबंधित एखाद्या भलत्याच गोष्टीवरून तिचं मूल्यमापन करतात. म्हणून डेव्हिड ष्टाइनाने स्वतःची सही केलेली चित्रं अत्यल्प किमतीला विकली जातात, तर त्याच ष्टाइनाने रंगवलेलं, पण चित्रावर शगालाची सही असलेलं चित्र कलासंग्राहक चढाओढीने जास्त किंमत देऊन हस्तगत करतात. मीगरेनाने काढलेलं एका पाडसाचं रेखाचित्र सुरुवातीला कुणीही विकत घेऊ इच्छित नव्हतं, पण त्याने सहज बोलता बोलता ते पाडस राजकन्या ज्युलियाना हिचं आहे(ही गोष्ट काही अंशी खरी होती. ते पाडस शाही उद्यानातलंच होतं; पण 'राजकन्येचं पाडस' असा उल्लेख केला तरी प्रत्यक्षात तिने ते कधी पाहिलंही नसावं, हीच शक्यता जास्त होती!), असा उल्लेख केला आणि लोकांच्या लेखी एकाएकी त्या चित्राची किंमत वाढली. पण हे असं समर्थन बनावट कलेला योग्य ठरवतं का? कुठल्याही कलावंताची अस्सल कलाकृती ही त्याच्या अनुभवांचा, जाणिवांचा मूर्त आविष्कार असते. त्यामागे अनेक वर्षांची कलासाधना आणि विचारप्रक्रिया उभी असते. एखादा नामवंत चित्रकार अमुक चार ठराविक रंग वापरून त्याचं चित्र रंगवत असेल, नेहमी ठराविक प्रतिकं आपल्या चित्रांत वापरत असेल तर आपल्या पॅलेटीवर तेच रंग घेऊन, तीच प्रतिकं तशीच वापरून शैलीची नक्कल करता येते, पण त्या चित्रामागची विचारप्रक्रिया आपल्या कारागिरीत आणता येत नाही. दिसायला ती कलाकृती त्या नामांकित चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरल्यासारखी दिसते, कलारसिक, कलासंग्राहकच काय पण कलासमीक्षक आणि कलातज्ज्ञही तिला भुलतात. लाखो रुपयांची उलाढाल त्या चित्रापायी होते, पण त्यात मूळ कलाकाराची प्रतिभा नसतेच! असते ती केवळ कारागिरी. मग कोणत्यातरी चाणाक्ष कलातज्ज्ञाला त्या कलाकृतीत राहून गेलेली छोटीशी चूक सापडते, कधी वापरलेला कुठलातरी रंग त्या कलाकाराच्या जीवनकाळात अस्तित्वात नव्हताच हे उमगतं, कधी कागद अथवा कॅनव्हास रसायनं वापरून 'जुना' केल्याचं कळतं कारण कागदाचं जुनेपण आणि त्या कलाकाराचा काळ यांची सांगड जुळत नाही, कधी तथाकथित पुरातन चित्रात 'किड्यांनी केलेली छिद्रं' ही ड्रिल मशिनाची करामत आहे हे उलगडतं, कधी चित्राच्या क्ष-किरण चाचणीत वरच्या रंगलेपनाखाली वेगळंच चित्र दडल्याचा साक्षात्कार होतो, तर कधी 'कार्बन डेटिंग' चाचणीत चित्राचं 'खरं वय' उघडकीला येतं. कधीकधी तर यान्सेनाच्या उदाहरणाप्रमाणे दस्तऐवजातली चूकही बनावट चित्र उघडकीला आणते. बनावट कलाकृती नष्ट केल्या जातात, बनावटकारांना शिक्षा होते. पण 'कलारसिकां'कडून नामांकितांच्या कलाकृतींची मागणी कधीच घटत नाही. आणि बनावटकार नव्या जोमाने बनावट कलाकृती घडवायला सरसावतात.

Goya_Portrait-_Forgery.jpg

फ्रान्सिस्को गोया याचे समजले गेलेले चित्र. क्ष-किरण तपासणीत चित्राखालच्या थरात वेगळेच चित्र असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्या थरात आढळून आलेला 'झिंक व्हाईट' हा रंग गोयाच्या मृत्यूनंतर वापरात आला. बनावट कला व ती ओळखण्यात येणार्‍या अडचणी यांबाबत उदाहरण म्हणून वर दर्शवलेल्या स्थितीतच हे चित्र सध्या आहे. मूळ चित्र अठराव्या शतकाच्या अखेरीस चितारले गेलेले स्पॅनिश चित्र आहे आणि त्यावरचे चित्र हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चितारलेले बनावट चित्र आहे.

पॅरिसवारी करणार्‍या लोकांच्या स्थलदर्शनाच्या यादीत लूव्र संग्रहालय असतंच. कलाक्षेत्रातल्या दिग्गजांच्या तिथे मांडलेल्या कलाकृती लोक डोळे भरून बघतात. त्या कलाकारांच्या असामान्य कलाविष्काराने दिपून जातात. इतर लोकांप्रमाणेच मीही नियमितपणे संग्रहालयांतली, कलादालनांतली चित्रं पाहते. मनाला भावलेल्या कलाकृतीला मनापासून दादही देते. पण त्यापलीकडे अजून माझी मजल जात नाही. एकीकडे न्यूजवीक नियतकालिकातलं कोरोच्या कलाकृतींबद्दलचं वाक्य कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात असतं. 'आपण बनावट कलाकृतींबद्दल बोलताना केवळ सुमार दर्जाच्या बनावट कलाकृतींबद्दल बोलतोय; कारण त्यांचं बनावट असणं उघडकीला आलं आहे. अव्वल दर्जाच्या बनावट कलाकृती तर अजूनही सन्मानानं विविध कलादालनांमध्ये, संग्रहालयांमध्ये विराजमान आहेत', असं प्रख्यात फ्रेंच चित्रकार थिओडोर रुसो म्हणाल्याचं वाचनात येतं. त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाचं हे विधान वाचलं की, माझ्या जाणिवांचं तोकडेपणही मला कळतं. बनावट कलेबद्दल, ते सामावून घेणार्‍या कलाजगताबद्दल जितकी जास्त माहिती मिळत जाते तितका 'आपण दिली ती दाद त्या कलाकाराच्या कलेला की त्याच्या 'न'कलेला?' हा संभ्रम मनात डोकवायला लागतो. अजून बरंच अज्ञान आहे, हे कधीच उमगलेलं असतं पण 'अज्ञानातलं सुख' मात्र उरलेलं नसतं.

संदर्भसूची:
१. द फेक - फोर्जरी अँड इट्स प्लेस इन आर्ट: शांदोर राद्नॉती - अनुवाद: आयर्विन द्युनाई, रोमन अँड लिट्लफील्ड पब्लिशर्स, १९९९, आयएसबीएन ०-८४७६-९२०५-१
२. द आर्ट फोर्जर्स हँडबुक: एरिक हेबॉर्न, कॅसल, १९९७, आयएसबीएन ०-३०४-३४९१४-३
३. आय वॉज वर्मीर: फ्रँक विन, ब्लूम्सबरी, २००७, आयएसबीएन ९७८०७४७५६६८१६
४. फॉल्स इम्प्रेशन्स - द हंट फॉर बिग टाईम आर्ट फेक्स: थॉमस हॉविंग, आन्द्रे डॉयश लि., १९९६, आयएसबीएन ०२३३९९०१५१
५. व्हाय फेक्स मॅटर?: संपादक - मार्क जोन्स, ब्रिटिश म्यूझियम प्रेस, १९९२, आयएसबीएन ०-७१४१-१७२१-८
६. थोर चित्रकार चोर - 'थ्री पिकासोज् बिफोर ब्रेकफास्ट' या पुस्तकाचा स्वैर अनुवाद: अनुवादक - दीपक घारे, मनोविकास प्रकाशन, २००८, आयएसबीएन ९७८-८१-९०७२७४-३-३
७. http://mr.wikipedia.org/wiki/चांग_ताछ्यान
८. http://thisishowitshouldbe.blogspot.com/2009/01/article-1076-my-works-we...

माहितीशोधाकरता रोमन शब्दसूची:
१. हान फान मीगरेन - Han Van Meegeren
२. वर्मीर - Vermeer
३. डेव्हिड ष्टाइन - David Stein
४. एरिक हेबॉर्न - Eric Hebborn
५. दिओ दामोरे दॉरमाँत - dio d'amore dormente
६. मिकलांजेलो - Michelangelo
७. त्रॉम्प लॉय - trompe l'oeil
८. जी. बी. पिरानेसी - G. B. Piranesi
९. रेम्ब्रां - Rembrandt
१०. हाल्स - Hals
११. टिश्यान - Titian/Tiziano Vecelli/Tiziano Vecellio
१२. कारावाज्ज्यो - Caravaggio
१३. मार्क शगाल - Marc Chagall
१४. थिओडोर रुसो - Théodore Rousseau
१५. जीर्ट यान यान्सेन - Geert Jan Jansen
१६. द सपर अ‍ॅट ईमेइस - The Supper at Emmaus
१७. ब्रेडियस - Bredius
१८. चांग ताछ्यान - Zhang Daquian/Pinyin: Zhāng Dàqiān/Wade-Giles: Chang Ta-Chien
१९. फ्रान्सिस्को गोया - Fransisco Goya

चित्रसूची:
१. लेखात वापरलेली इतर प्रताधिकारमुक्त चित्रे 'विकिमीडिया कॉमन्स' येथून साभार.
२. मीगरेनाचे अखेरचे 'वर्मीर'चित्र: 'विकिमीडिया कॉमन्स' येथून 'फेअर यूज' प्रकारांतर्गत साभार.
[Van meegeren trial.jpg:
Description: Room 4 of the Regional Court in Amsterdam
Source: http://web.me.com/schuffelen/Site/vermeer.html
Though this image is subject to copyright, its use is covered by the U.S. fair use laws because:
1. It is a historically significant photo of a famous individual. The following articles mention historic nature of the trial, the painting, and the subject.
The Price of Forgery TIME Monday, Nov. 18, 1946
"Not for Money" TIME Monday, Sep. 18, 1950
2. It is of much lower resolution than the original (copies made from it will be of very inferior quality).
3. The photo is only being used for informational purposes.
4. Its inclusion in the article adds significantly to the article because the photo and its historical significance are the object of discussion in the article.
See Wikipedia:Fair use for more information.]

- श्रद्धा

Taxonomy upgrade extras: