लांडगा आला रे आला ?

तब्बल दोन उन्हाळे अन् एक हिवाळा लांडग्यांच्या सहवासात सबआर्क्टिक प्रदेशात दक्षिण किवाटिन आणि उत्तर मनिटोबा या प्रांतांत काढून मोवॅटने आपल्या निरीक्षणांच्या आधारे 'नेव्हर क्राय वुल्फ' हे पुस्तक लिहिलं अन् या सगळ्या तक्रारखोर जनतेतच नव्हे, तर अन्य शास्त्रज्ञ म्हणवणार्‍यांतही हाहाःकार उडाला. काहीजणांनी ही कपोलकल्पित कथाच आहे, असा दावा केला तर काहीजणांचं म्हणणं होतं की, मोवॅटकडे एकही डॉक्टरेट पदवी नाही, त्यामुळे मुळात तो शास्त्रज्ञच नाही.

border2.JPG

हानपणी आपण सर्वांनीच 'लांडगा आला रे आला' ही गोष्ट ऐकलेली असते. त्या गोष्टीतून घ्यायचा बोध जरी काही निराळाच असला, तरी हाही निष्कर्ष आपण मनोमन काढलेला असतो की, 'लांडगा' हा एक क्रूर, विध्वंसक प्राणी आहे. तो आला की, पळ काढणं हेच इष्ट असतं.

नेमक्या याच गोष्टीवर संशोधन करण्यासाठी 'फार्ली मोवॅट' या कॅनडा सरकारच्या सेवेत असलेल्या जीवशास्त्रज्ञाला, सरकारने एका खास मोहिमेवर पाठवलं होतं. त्यांच्या लोकसभेत लांडग्यांविषयी तक्रारी करणारे, एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल सदतीस तक्रारनामे दाखल झाले होते. अन् या तक्रारींना वेगवेगळ्या प्राण्यांच्या अन् माशांच्या शिकारी करणार्‍या संघटना, त्यासाठी शस्त्रसाठा पुरवणारे धंदे यांनीही पाठिंबा दिला होता. लांडगे सगळी हरणे मारून टाकत आहेत अन् इतर 'बिचार्‍या' शिकारी नागरिकांच्या वाट्याला ती कमी-कमी येत आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या त्या!

Wolf copy.jpg

तब्बल दोन उन्हाळे अन् एक हिवाळा लांडग्यांच्या सहवासात सबआर्क्टिक प्रदेशात दक्षिण किवाटिन आणि उत्तर मनिटोबा या प्रांतांत काढून मोवॅटने आपल्या निरीक्षणांच्या आधारे 'नेव्हर क्राय वुल्फ' हे पुस्तक लिहिलं अन् या सगळ्या तक्रारखोर जनतेतच नव्हे, तर अन्य शास्त्रज्ञ म्हणवणार्‍यांतही हाहाःकार उडाला. काहीजणांनी ही कपोलकल्पित कथाच आहे, असा दावा केला तर काहीजणांचं म्हणणं होतं की, मोवॅटकडे एकही डॉक्टरेट पदवी नाही, त्यामुळे मुळात तो शास्त्रज्ञच नाही.

कालांतराने मात्र मोवॅटने लांडग्यांच्या वर्तनाबद्दल जे काही लिहिलं होतं, ते याच शास्त्रज्ञांनी (ज्यांनी त्याला 'कपोलकल्पित' म्हटलं होतं!) परत नव्याने शोधून काढून त्याला दुजोरा दिला आणि यथावकाश सहा विद्यापीठांनी मोवॅटला सन्माननीय डॉक्टरेट पदव्या प्रदान केल्या. 'नेव्हर क्राय वुल्फ' म्हणजे उगीचच खोटी आवई उठवू नका, अर्थात इथे खरंच लांडग्यांविरुद्ध असं म्हणणार्‍या मोवॅटने असं शोधलं तरी काय होतं, ते या पुस्तकात जरा डोकावून बघूया.

'फॉर अँजेलिन - द एंजल' अशा अर्पणपत्रिकेसारख्या मजकुरावर नजर टाकत, 'असेल कोणीतरी याची प्रेयसी, मैत्रीण नाहीतर बायको' असं मनात म्हणत प्रस्तावना वाचायला सुरुवात केली. पण मनात कुठेतरी 'कोण बरं असेल ही अँजेलिन?' हा प्रश्न रुजलेला होताच. मुळात हे पुस्तक मोवॅटला सरकारी अधिकार्‍यांची खिल्ली उडवण्यासाठी लिहायचं होतं, तसंच थोडंफार तथाकथित शास्त्रज्ञांची टर उडवण्यासाठीही. लिहिता लिहिता तसं करण्यातला त्याचा रस हळूहळू नष्ट होऊन त्याची जागा मुळात दुय्यम असलेल्या 'लांडगा' या पात्रानेच घेऊन टाकली.

कॅनडा सरकारच्या या 'ल्युपाइन प्रोजेक्ट'ची (कोल्हे, लांडगे किंवा तत्सम प्राण्यांचा अभ्यास) सुरुवात कशी झाली, हे सांगण्यासाठी मोवॅट थेट त्याच्या आजीच्या घरातल्या बाथरूममधल्या त्याच्या बालपणातल्या आठवणींपासून करतो.

सर्व सजीव प्राण्यांमध्ये त्याला वाटणारी गोडी ही त्याच्या वयाच्या ५व्या वर्षी सुट्टीत आजीकडे गेला असताना त्याला जाणवू लागली. याची सुरुवात कसकशी झाली अन् त्यात त्याने काय काय उपद्व्याप करून ठेवले, याची सुरस अन् चमत्कारिक कथा मोवॅटच्या लेखणीतूनच वाचावी. त्याच्या लेखनशैलीला विनोदाची झालर आहे. कधीमधी जरी ती नर्म आणि निखळ विनोदासारखी वाटली तरी मुख्यत्वेकरून मात्र ती उपरोधिकच आहे.

लहान वयापासून निसर्गात आणि जीवसृष्टीत रस असणार्‍या मोवॅटने जीवशास्त्रज्ञ व्हावं, ते ओघाने झालंच. पण पुढे कोणत्या क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवायचं, हा त्याला पडलेला एक यक्षप्रश्नच होता. त्याच्या ओळखीच्या सगळ्या जीवशास्त्रज्ञांना प्रयोगशाळेत जाऊन मृत प्राण्यांचा अभ्यास करण्यातच रस होता. मोवॅटला मात्र जिवंत प्राणी नैसर्गिक वातावरणात, आपापल्या घरकुलात कसे राहतात, वावरतात याचे निरीक्षण आणि अभ्यास करण्याची आवड होती. अखेर त्याने 'वन्य प्राणी सेवा' या कॅनडा सरकारच्या खात्यात नोकरी पत्करली. तिथली त्याची पहिलीच कामगिरी म्हणजे हा 'ल्युपाईन प्रोजेक्ट'.

या सरकारी खात्याचं, तिथल्या वातावरणाचं अन् त्यांनी दिलेल्या प्राथमिक प्रशिक्षणाचं वर्णन करताना मोवॅटची उपरोधिक शैली अगदी बहरून येते. त्याच्या या पहिल्या मोहिमेसाठी अत्यावश्यक अश्या गोष्टींची यादी सरकारी अधिकार्‍यांनी करून दिली, त्यात अगदी टॉयलेट पेपरासारख्या लहानसहान गोष्टींचा समावेश कसा होता अन् त्यावर उद्बोधक(?) अशी गंभीर सरकारी चर्चा कशी घडली, याचं बहारदार वर्णन मोवॅटच्या लेखणीतून अवतरलं आहे.

त्याला या मोहिमेसाठी एक छोटीशी, घडी करता येण्याजोगी बोट दिलेली असते. ती दोन्ही बाजूंचे शेवटचे भाग नसलेल्या बाथटबसारखी दिसत असते आणि सरकारकृपेने बोटीचे गायब झालेले दोन टोकांचे भाग पोचतात भलतीकडेच - वाळवंटात राहून रॅटलस्नेक्सचा अभ्यास करणार्‍या एका जीवशास्त्रज्ञाकडे! याशिवाय २ रायफली, १ रिवॉल्व्हर, दारूगोळा, २ शॉटगन, अश्रुधुरासाठी नळकांडे, धुरासाठी जनरेटर, लांडगे मारण्यासाठी अजून काही औषधं, ५ गॅलन १००% ग्रेन अल्कोहोल, तंबू, झोपण्याच्या बॅगा, स्टोव्ह, ७ कुर्‍हाडी (यावर मोवॅटची टिप्पणी अशी की, तो वृक्षहीन प्रदेशात चाललेला असतो, त्यामुळे तिथे खरंतर एकही कुर्‍हाड लागणार नसते. अन् तरीही ७ कुर्‍हाडी का दिलेल्या आहेत, हे त्याच्याही आकलनाबाहेरचं होतं), स्की, रेडिओ ट्रान्सरिसीव्हर अश्या अनंत, अगणित वस्तूंचा त्याच्या सामानात समावेश असतो. हे असलं चित्रविचित्र सामान घेऊन तो कुठे अन् कशासाठी चाललेला आहे, याचे त्याला 'चर्चिल' या ठिकाणी सोडणार्‍या एयरफोर्सच्या वैमानिकाला फारच कुतूहल असतं. पण 'लांडग्यांमधे राहून त्यांचा अभ्यास करण्यासाठी' हे मोवॅटचे उत्तर ऐकल्यावर मात्र त्याला धक्काच बसतो. चर्चिलला पोचल्यावर पुढे दुसरे विमान घेऊन, जिथे पुरेसे लांडगे असतील, अशा ठिकाणी उतरून तिथे बेस कँप (मूळ तळ) ठोकावा, अशी त्याला सूचना असते. विविध कारणांनी त्याला तिथून विमानच मिळत नाही, तेव्हा शेवटी तो 'आता काय करू?' असा एक रेडिओ संदेश ऑफिसला पाठवतो.

त्याचं सहा दिवसांनी 'तत्काळ' उत्तर येतं: 'तुला दिलेल्या सूचना अगदी स्वच्छ आणि नेमक्या आहेत. त्या पाळल्यास कोणतीही अडचण येऊ नये. अत्यंत महत्त्वाच्या कामाखेरीज रेडिओ संदेश पाठवू नये व तो दहा शब्दांपेक्षा मोठा असू नये. तुझ्याकडे अर्धीच बोट आहे, याचा अर्थ काय? तुझ्या रेडिओग्रामचा खर्च तुझ्या पगारातून कापण्यात येत आहे. '

चर्चिलमध्येच चुपचाप वाट बघत, तिथल्या लोकांकडून 'वुल्फ ज्यूस' (अ‍ॅडल्टरेटेड बीयर) प्यायला शिकत आणि लांडगे कधीच गरोदर एस्किमोंवर हल्ला चढवत नाहीत, असल्या चित्रविचित्र समजुती ऐकत तो काही दिवस घालवतो अन् अखेर त्याला एक अक्षरश: तुटकेफुटके विमान असलेला वैमानिक भेटतो, जो त्याला भरपूर लांडगे असतील अश्या त्याच्या इच्छित ठिकाणी पोचवायचं कबूल करतो. खरंतर विमानाची अवस्था पाहाता, त्याने त्याचं काही सामान कमी करावं असं वैमानिकाने सुचवलेलं असतं, विशेषत: ती अर्धवट बोट आणि त्याने विकत घेतलेलं ते 'वुल्फ ज्यूस' बनवायचं साहित्य. पण तरीही तो ते सामान लपवून नेतोच अन् वैमानिकही त्याला उदार अंतःकरणाने क्षमा करून टाकतो. मात्र इंधन संपत आल्याने परतीस पुरेसं इंधन ठेवून वैमानिक त्याला मध्येच कुठेतरी उतरवून देतो आणि आपण त्याला नक्की कुठे उतरवलंय, हे त्या वैमानिकालाही माहीत नसतं.

त्याला मिळालेली सूचना अशी असते, की तो ज्या वेळी पोचेल, तेव्हा सर्वत्र बर्फ वितळून पाणी झालेलं असेल, तेव्हा त्याने त्या बोटीतून सर्व भागांची पाहणी करावी. पण आता पंचाईत अशी झालेली असते की, बर्फ इतका काही घट्ट असतो की, कित्येक दिवस तो वितळेल अशी काही चिन्हं नसतात. पण त्याला प्राथमिक प्रशिक्षणात शिकवलेलं असतं की, कधीही दुसर्‍या खात्याने पुरवलेल्या माहितीला आव्हान द्यायचं नाही. रेडिओसंदेश पाठवून 'काय करू?' हे विचारावं, म्हणून तो त्याला दिलेलं उपकरण उघडतो तर त्याला फक्त २० मैल संदेश जाऊ शकणारं अन् फॉरेस्ट रेंजरसाठी उपयुक्त, असं उपकरण दिलेलं आढळतं. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, खुडबूड करताकरता त्याला चक्क एक पेरूतला माणूस रेडिओवर भेटतो. त्याचं मोडकंतोडकं इंग्लिश अन् याचं अर्धवट स्पॅनिश अशी झटापट होऊन 'व्हर्ली मॉन्फॅट' या नावाने संदेश पोचतोही, पण त्यातही बर्‍याच गमती घडतात अन् ऑफिसकडून संदेश त्याच्याकडे येण्याआधीच त्याच्या रेडिओतल्या बॅटर्‍या संपून जातात.

एवढं सगळं होईपर्यंत काळोख होऊ लागलेला असतो अन् त्याला लांडग्यांच्या टोळीचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. त्याने त्याआधी कधी जरी तो आवाज अशा उजाड, उघड्या प्रदेशात ऐकलेला नसला, तरी काऊबॉयच्या चित्रपटांमध्ये ऐकलेला असतो. आता अनायासे 'लांडग्यांशी संपर्क साधावा' या सूचनेचं पालनही होणार असतं. पण त्याच्या पिस्तुलात सहाच गोळ्या असतात अन् बाकी कुठे ठेवल्यात, ते त्याला त्याक्षणी अजिबात आठवत नसतं. त्याच्या पूर्वीच्या वाचनावरून त्याला हे माहीत असतं की, लांडग्यांच्या एका टोळीत ४ ते ४० लांडगे असू शकतात. पण आताच्या या आवाजावरून यात ४०० तरी असावेत, असा त्याला संशय येऊ लागतो. शेवटी उलट्या ठेवलेल्या बोटीखालीच तो लपून बसतो. या प्रसंगातील खुमासदार शैलीतील वर्णनात्मक वाक्यं लिहावीत तर ती मोवॅटनेच! नमुन्यादाखल एक वाक्य अशा स्वरूपाचं आहे: 'त्याला त्रास देणारी एक गोष्ट इतकी वेगळी होती - मानवी मनावर योग्य शिस्तबद्ध नियंत्रण नसताना ते कसे तर्कहीन भरकटू शकतं याचं उदाहरण म्हणून मुद्दाम सांगण्यासारखी - त्या तशा परिस्थितीत त्याला त्यावेळी आपण एक गरोदर एस्किमो असावं, असं अगदी असोशीने वाटू लागलं होतं.'

शेवटी तो सगळा कळप निघतो चौदा हस्कींचा (एस्किमोंचे कुत्रे) अन् त्यांच्याबरोबर असतो एस्किमो - गौरवर्णीय संबंधातून जन्मलेला माईक. माईकची तिथे एक कामचलाऊ केबिन असते अन् त्यात मोवॅट आपला डेरा टाकतो. पण आपण काय करणार आहोत, हे सांगण्याच्या प्रयत्नात तो माईकला जे-जे काही दाखवतो, त्याने माईक घाबरून जाऊन, 'आपली आई आजारी झालीय' असं सांगून पळच काढतो. अन् मोवॅट परत एकटाच राहतो. या वैराण प्रदेशात माईकला त्याची आई आजारी झालीय हे कळलं तरी कसं?, या प्रश्नाचे उत्तर मात्र मोवॅटला सापडत नाही.

त्याला लांडग्यांचं प्रथम दर्शन होतं, तो प्रसंगही त्याने अगदी हलक्याफुलक्या तर्‍हेने रंगवला आहे. त्यानंतर त्याला लांडग्यांची गुहा कुठे आहे, हेही समजतं. पण एकापाठोपाठ एक असे तीन प्रसंग घडतात की, त्याला समजतच नाही की, तो लांडग्यांना न्याहाळतो आहे की लांडगे त्याला. या तिन्ही प्रसंगांतील त्याच्या मनात उठलेले विचारतरंग, विविध भावना, त्याला जाणवलेले अपमानास्पद क्षण, त्याची उडालेली भंबेरी हे त्याने मार्मिक शब्दांत अगदी अचूक पकडलेलं आहे. अन् तेसुद्धा हे सगळं वर्णन अजिबात कंटाळवाणं न होऊ देता. त्याला त्या परिसरात तीन मोठे लांडगे - २ नर आणि १ मादी व ४ छोटी पिल्लं राहताना आढळतात.

आपण आतापर्यंत सिनेमा, टेलिव्हिजन अशांमधूनच लांडगे फक्त दुरून पाहिलेले असतात, त्यामुळे त्यांच्या आकारमानाची, ताकदीची आपल्याला काही कल्पना येत नाही. मोवॅटला त्याच्या खात्याने दिलेल्या वाचन साहित्यात 'लांडगा हा त्याच्या जातीतील सर्वांत मोठा प्राणी असून त्याचे वजन १०० पौंड व नाकापासून शेपटीच्या टोकापर्यंत लांबी ८ फूट ७ इंच, खांद्यांपर्यंत उंची ४२ इंच व एका बैठकीत ३० पौंड कच्चे मांस खाऊ शकणारा, अगदी जबरी सुळे असणारा, भयंकर, जिवे मारू शकणारा व ज्याला माणसाने अगदी सकारण घाबरलंच पाहिजे, ज्याचा द्वेष केला पाहिजे असा' असं दिलेलं होतं.

मात्र या लांडग्यांचं निरीक्षण करताना मोवॅटला काही गोष्टी नव्यानेच जाणवल्या. तिथे लांडग्यांच्या मादीसाठी मांसाचा साठा करून ठेवलेला होता. त्याच्या जवळच कोल्ह्यांचं एक कुटुंबही राहत होते. अन् ते अधूनमधून त्या मांसावर ताव मारत असत. पण लांडगे त्यांची काहीही दखल घेत नव्हते. तीनवेळा लांडग्यांच्या अगदी जवळ जाऊन मोवॅटवर फजितीचे प्रसंग आले, पण तो लांडग्यांच्या अगदी टप्प्यात असूनही त्यांनी त्याला काहीही केलं नाही. हे सगळं निरीक्षण अन् विचारमंथन करून तो अखेर ठरवतो की, आपण लांडग्यांच्या गुहेजवळ तंबू ठोकून, जास्तीत जास्त जवळ जाऊन नोंदी करायच्या. तसं ठरवून, अगदी अत्यावश्यक गोष्टी अन् एक टेलिस्कोप घेऊन कोणत्याही प्रकारचं हत्यार न घेता तो राहू लागतो आणि आपले कार्य चालू ठेवतो.

त्याच्या या निरीक्षणप्रयोगांतील एक गंमत तर सांगायलाच हवी. त्याने उभारलेला हा तंबू लांडग्यांच्या शिकारीला जाण्यायेण्याच्या वाटेवरच होता. लांडग्यांनी त्याबद्दल तशी काहीच नाराजीही दर्शवली नव्हती. पण ते त्याची काही दखलही घेत नव्हते. मोवॅटला त्यांना आपले अस्तित्व जाणवून देण्याची इच्छा होतीच. कुत्र्यांना जशी आपल्या परिसराभोवती लघुशंका करून हद्द आखायची सवय असते, तसेच हे लांडगेही आठवड्यातून एकदा करत असत. ते बघून मोवॅटच्या मनातही स्वत:ची हद्द रेखण्याची भन्नाट कल्पना आली. त्याचा तंबू मधोमध ठेवून साधारण तीन एकरांच्या भागाची हद्द त्याने आखली, पण हे करायला त्याला एक अख्खी रात्र लागली आणि सतत भरपूर चहा ढोसावा लागला. लांडग्यांनीही त्याची हद्द मान्य केली, पण मोवॅटच्या हद्दीलगत स्वत:ची हद्द नव्याने आखूनच. हे काम त्या लांडग्याला फक्त १५ मिनिटांतच, अगदी काटकसरीने, न थांबता करताना पाहून मोवॅटला कळलं की, हद्द आखणीचं काम कसं एका फटक्यात आणि सतत कुठलंतरी पेय न ढोसता कसं करता येतं ते!

लांडग्यांचं निरीक्षण करताकरता त्यांच्या जीवनक्रमाबद्दल बर्‍याच गोष्टी मोवॅटच्या ध्यानात आल्या. नर लांडगे रोज रात्री शिकारीला जायचे आणि पहाटे परत यायचे. जवळजवळ ३० ते ४० मैल किंवा शिकार न मिळाल्यास त्याहूनही अधिक लांब. आई अन् पिल्लं मात्र घरीच राहायची. गुहेच्या अगदी जवळ मांस साठवलं जायचं नाही. ते निदान अर्धा मैल तरी लांब ठेवलं जायचं आणि ते मुख्यत्वेकरून पिल्लांना वाढवणार्‍या आईसाठी असायचं. आई पिल्लांशी खेळायची. एकूणात काय, मोवॅट अगदी २४ तास निरीक्षण करू शकेल अश्या घडामोडी तिथे चालू असायच्या. पूर्ण दोन दिवस अन् दोन रात्री निरीक्षण करून थकायला झाल्यावर मोवॅटला वाटलं की, यावर काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. लांडगे कसे पाच-पाच, दहा-दहा मिनिटांनी सतत आपली कूस बदलत छोटी-छोटी झोप काढून ताजेतवाने राहू शकतात, तसं त्यांची नक्कल करून बघायला त्याने सुरुवात केली. त्यात त्याला यश आलंही, पण त्या प्रकाराची त्याला इतकी सवय लागली की, पुढे समाजजीवनात परत आल्यावर त्याच्या या सवयीमुळे त्याची एक मैत्रीण वैतागून, 'तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा एखाद्या रिकेट्स झालेल्या टोळाबरोबर राहणं परवडेल' असे म्हणून त्याला सोडून गेली.

जसजसा मोवॅट लांडग्यांच्या रोजच्या जीवनाला सरावला, तसतसं त्यांच्याबद्दल 'तटस्थ वृत्ती' ठेवणं त्याला अवघड वाटू लागलं. त्या सगळ्या लांडग्यांना त्यांची त्यांची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं होती. त्याने त्या लांडग्यांना नावंही ठेवली होती. विशेषत: त्यातली मादी, तिच्या अंगभूत गुणांमुळे आणि आई, बायको, प्रेयसी अशा विविध भूमिका उत्तमरीत्या निभावायच्या तिच्या क्षमतेमुळे, त्याला इतकी आवडायची की, ते सगळे गुण असलेली स्त्री आपल्याला कधी ना कधीतरी भेटेल, अशी त्याला आशा लागून राहिली होती. त्यातील कुटुंबप्रमुख लांडगा होता 'जॉर्ज' अन् त्याची घरधनीण होती 'अँजेलिन'! इथे आता त्या अर्पणपत्रिकेचा अर्थ उलगडला.

अँजेलिन अन् जॉर्ज, मोवॅटच्या मतानुसार अगदी अनुरूप जोडपं होतं, अतिशय प्रेमळ आणि एकमेकांशी लडिवाळपणे वागणारं. लांडग्यांमध्ये शरीरसंबंध फक्त उन्हाळ्यात, मार्च महिन्यात २ ते ३ आठवडेच होतात. पण त्यांच्यात एकनिष्ठा अतोनात असते. आयुष्यभर लांडगी फक्त एकाच नराशी संबंध ठेवते. तसंच नराचंही आहे. ते एकपत्नी असतात. दोन वर्षांच्या होईपर्यंत सर्व माद्या कुमारिका असतात. कुत्र्यांसारखे स्वैर संबंध त्यांच्यात नसतात. कुत्री याबाबत आपल्या मालकांची नक्कल करतात, असं यावर मोवॅटने केलेले भाष्य आहे. तिसरा लांडगा कोण?, याबद्दल मोवॅटला कुतूहल होतंच. तर तो निघाला त्यांच्याबरोबर राहणारा, मुलांना वाढवण्यात मदत करणारा, मुलांशी खेळणारा असा प्रेमळ, मोवॅटच्याच शब्दांत 'अल्बर्टकाका'.

मोवॅटला मुळात पाठवण्यात आलं होतं, ते त्या प्रदेशातील कॅरिबूंची (तिथली हरणं) संख्या रोडावत चालली होती म्हणून. शिकारी, प्राणी पकडणारे, त्याविषयक धंदा करणारे या सर्वांनी सरकारदरबारी तक्रारी दाखल केल्या होत्या की, याला हे लांडगेच जबाबदार आहेत. त्यामुळे खरंतर मोवॅट लांडग्यांविरुद्ध पुरावेच शोधत होता. पण अजूनपर्यंत त्याला तसं काहीच आढळलं नव्हतं. त्या सुमारास सगळे कॅरिबू हे स्थलांतर करून उत्तरेकडे गेले होते, जवळजवळ दोनतीनशे मैल दूर. मग हे लांडगे कसे जगत होते हे मोवॅटला पडलेले कोडंच होतं. सगळा विचार करूनही मोवॅटच्या लक्षात याचं उत्तर काही येईना. जवळजवळ सगळ्या प्राण्यांनी स्थलांतर केलेलं होतं. थोडेसे ससे होते, पण अगदी कमी अन् अति चपळ. पक्षी होते पण ते उडू शकायचे अन् पाण्यात मासे होते, पण ते मोठ्या प्रमाणात पकडणं लांडग्यांना शक्य नव्हतं. दिवसचे दिवस जात होते आणि मोवॅटला हे कोडं काही उलगडत नव्हतं. लांडगे तर अगदी छान खात्यापित्या घरचे दिसत होते. रोज रात्री दोन्ही नर शिकारीला जात, पण त्यांनी परत काही आणल्यासारखं दिसत नसे. मोवॅटला वेड लागायची पाळी आली. जणू काही लांडगे हवापाण्यावर जगत आहेत, असं त्याला वाटू लागलं. त्याने तर उपाय म्हणून पाच पावाच्या लाद्या भाजून लांडग्यांच्या रस्त्यात ठेवल्या. पण लांडग्यांनी ही भेट नुसतीच धुडकावून लावली नाही, तर जणू काही हे पाव मोवॅटच्या हद्दीतील नवे मैलाचे दगड असल्यासारखे समजून त्यावर स्वत:ची हद्दही अधोरेखित केली.

जुलै उजाडला तसे सर्वत्र उंदीर दिसू लागले. मोवॅटची शैली अन् त्यातला विनोद असा काही सूक्ष्म आहे की या उंदरांचं अन् त्यांच्या हालचालींचं वर्णन करताना त्याने म्हटलंय की, 'उंदरांनी अजून काही गोष्टी अन् त्याही कैकवेळा केल्या असल्या पाहिजेत. कारण जून मावळून जुलै उजाडता-उजाडता सगळा भूभाग लहान लहान उंदरांनी जिवंत झाल्यासारखा झाला.' शेवटी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की, लांडगे उंदीर खाऊन जगत होते. हे आजपर्यंतच्या समजुतींशी अन् लांडग्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाशी भलतंच विरोधी होतं. पण एक दिवस त्याने अँजेलिनला प्रत्यक्ष शिकार करताना बघितलं. तरीही आधी त्याला वाटलं की ती गंमत म्हणून, चवबदल म्हणून तसं करते आहे. इतका शक्तिशाली मांसाहारी प्राणी अन् उंदीर खाईल? पण तिने थोडेथोडके नव्हे, तर चक्क तेवीस उंदीर खाल्ले. तरीही त्याला कळत नव्हतं की, ते पिलांसाठी हे उंदीर किंवा त्यांचं मांस कसे काय नेतात? नंतर जेव्हा माईकचा एक नातेवाईक, ऊटेक, त्याला भेटला तेव्हा त्याला कोडं उलगडलं. ऊटेक मोवॅटचा अगदी जवळचा मित्र झाला. जरी त्याने औपचारिक शिक्षण घेतलेलं नसलं, तरी मोवॅटच्या मते तो प्रथम दर्जाच्या निसर्गतज्ज्ञापेक्षा काही कमी नव्हता. ऊटेककडून त्याला कळलं की, लांडगे हे सगळं अन्न पोटातूनच वाहून आणतात आणि मग ते वर काढून पिल्लांना खायला देतात. आता मोवॅटच्या नशिबी उंदरांचाही अभ्यास करणं आलं. सापळे लावून तो उंदीर पकडू लागला. एकदा जॉर्जच्या पायालाही त्या सापळ्यांचे चिमटे बसलेच, पण मोवॅट म्हणतो, 'जॉर्जच्या विनोदबुद्धीमुळेच आमचे संबंध बिघडले नाहीत. जॉर्जने बिचार्‍याने तो प्रसंग मनुष्याने केलेला एक प्रॅक्टिकल विनोद म्हणून हसण्यावारी नेला.'

त्यावेळी माईक आसपास नव्हता. नाहीतर त्याच्याकडच्या दोन कुत्र्यांना पकडून त्यांना उंदीर व बाकीच्यांना दुसरं अन्न असं खायला घालून मोवॅटने सप्रयोग सिद्ध केलं असतं की, उंदीर खाऊन कसं जगता येतं ते. विचार करकरून प्रयोगासाठी दुसरं कोणी जवळ नसल्याने त्याने स्वत:वरच तो प्रयोग करायचं ठरवलं. उंदीर पकडून, ते खाऊन, त्यावर जगून तो निरीक्षणं नोंदवू लागला. चवही चांगली होती पण काहीशी सपक. म्हणून मग तो निरनिराळ्या पाककृती बनवू लागला. त्याने तर बारा लठ्ठ उंदीर घेऊन करायची एक पाककृतीही चक्क या पुस्तकात दिली आहे. अगदी शिस्तशीर अन् सगळ्या सामुग्रींसह लिहिलेली! त्याच्या या सगळ्या प्रयोगांचं वर्णनही अगदी वाचनीय आहे.

ऊटेक हा एस्किमोंच्या टोळीतील एक थोडेसे मंत्रतंत्र अवगत असलेला, आत्म्यांशी संवाद वगैरे साधू शकणारा धर्मगुरू. त्याचं आणि मोवॅटचं अगदी छान जुळलं. मोवॅटसारखाच त्यालाही लांडग्यांमधे खूपच रस होता. पण ऊटेकने त्याला लांडग्यांविषयी जे-जे काही सांगितलं ते-ते पुरावे नसल्याने मोवॅट स्वीकारू शकत नव्हता. पण जेव्हा कधी तसा पुरावा मिळण्याची संधी प्राप्त झाली, तेव्हा तेव्हा त्याला कळलं की, ऊटेकचं नेहेमी बरोबरच होतं. ऊटेककडून त्याला समजलं की, लांडगे हे खारीसुद्धा खातात. इतकंच नव्हे तर अगदी तर्‍हेतर्‍हेच्या क्लृप्त्या वापरून मासेही पकडतात. ऊटेकने त्याला एक विलक्षण वाटणारी पारंपरिक गोष्ट सांगितली, जिचा असा मथितार्थ होता की, लांडगे हे निरोगी, सशक्त कॅरिबूंच्या वाटेला जात नाहीत, तर फक्त रोगी, अशक्त कॅरिबूच मारून खातात. पण या सिद्धांतानुसार, माईकच्या केबिनच्या जवळपास अन् इतरत्रही पसरलेल्या मोठ्या अन् निश्चितच सशक्त कॅरिबूंच्या हाडांच्या सापळ्यांचा मोवॅटला उलगडा होत नाही. पण माईकशी चर्चा करून त्याला कळतं की, माईक आणि त्याच्यासारख्या इतर १,८०० प्राणी पकडणार्‍या लोकांनी हे कॅरिबू मारलेले आहेत. गणित करून दरवर्षी जवळजवळ १,१२,००० कॅरिबू हे लोक मारतात, असा त्याचा निष्कर्ष निघाला. पण ठोस पुराव्याअभावी तो हे अहवालामध्ये लिहू शकला नाही.

आतापर्यंत मोवॅटने लांडग्यांच्या आवाजातले, ओरडण्यातले विविध फरक, बारकावे नोंदवून घेतलेच होते. पण ऊटेकने त्याच्या ज्ञानात बहुमूल्य भर घातली. ऊटेकला लांडग्यांची भाषा कळते, असा त्याचा दावा होता. मोवॅटचा या दाव्यावर अर्थातच विश्वास नव्हता आणि त्याची खिल्ली उडवण्याकडेच त्याचा कल अधिक होता. पण एक-दोन प्रसंग असे घडले की, त्याचा ऊटेकच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. लांडगे जेव्हा शिकारीला निघत, तो प्रसंग अन् त्यावेळी त्यांच्या वर्तनातले बदल अगदी लक्षणीय असे होते. निघण्यापूर्वी ते एकत्र जमून वर्तुळ करून डोकी वर करून 'गाणं' गात. सर्वप्रथम जेव्हा मोवॅटने ते ऐकलं, तेव्हा त्याच्या अंगावर भीतीने शहारा आला होता. पण कालौघानुसार त्याला ते आवडू लागलं, इतकंच नव्हे तर तो त्याची उत्सुकतेने वाट बघू लागला.

इतके दिवस अँजेलिन पिल्लांच्या देखरेखीसाठी मागे राहायची. हळूहळू तिचा मूड बदलू लागला. ती थोडं थोडं अंतर का होईना, बाहेर जाऊ लागली. जॉर्जही तिने यावं म्हणून, तिची मनधरणी करत असे. मध्येच एक दिवस तिने एकेक पिल्लू उचलून नेत आपलं घरच बदलून टाकलं. मोवॅटला काही कळेचना. हेही कोडं ऊटेकनेच सोडवलं. आणि मोवॅटला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत नवीन घरही दाखवलं. लांडग्यांच्या आयुष्याबद्दल भरपूर नवीन माहितीही दिली. उदाहरणार्थ, त्यांचं आयुष्य हे कुत्र्यांपेक्षा जास्त असतं. अगदी १६ ते २० वर्षांपर्यंत. लांडगा अतिशय कुटुंबवत्सल असतो आणि त्यांच्यात अनाथ पिल्लू असं नसतंच. कोणाची आई गेली तर, आपापसांत संवाद साधून दुसरं कुटुंब त्या पिल्लांना आपल्यात सामावून घेतं अन् अगदी आपल्या पिल्लांप्रमाणे वाढवतं. याविषयी एक खरी घडलेली गोष्ट ऊटेकने सांगितली. ती अगदी हृदयद्रावक वगैरे वाटली तरी मोवॅटने त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. पुढे मात्र एका गोर्‍या निसर्गशास्त्रज्ञाने त्याला तत्समच गोष्ट सांगितली तेव्हा मात्र त्याने त्यावर शंकाही घेतली नाही. यावर त्याचे स्वत:चेच उद्गार असे आहेत की, त्या गोर्‍या तज्ज्ञाच्या शब्दाला, ऊटेकच्या शब्दांपेक्षा (असा ऊटेक, जो स्वतःच एक लांडगा असण्याइतका लांडगामय होता!) जास्त महत्त्व मी का देऊ करावं, याचं स्पष्टीकरण माझ्याकडे नाही. ऊटेकला त्याने हेही विचारून घेतलं की, लांडगे मनुष्याच्या बाळाचा सांभाळ करतात, या आपण कित्येक दिवस ऐकत आलेल्या गोष्टीत कितपत तथ्य आहे? पण त्यावर ऊटेकचं उत्तर असं होतं की, हे शक्य नाही. लांडगे मनुष्याच्या बाळाला वाढवू शकणार नाहीत, उलट ते मरून जाईल. पण माणसातील स्त्री मात्र लांडग्यांच्या पिल्लाला दूध पाजून वाढवू शकते, त्याने अशा दोन तरी घटना प्रत्यक्ष बघितलेल्या आहेत.

असं सगळं निरीक्षण आणि संशोधन चालू असताना मोवॅटला थोडाथोडा कंटाळा येऊ लागतो, त्यातून त्याची सुटका करतो अल्बर्टकाका, ते ही प्रेमात पडून! मोवॅटला लांडग्यांच्या प्रेमाची, शरीरसंबंधांचीही निरीक्षणं करायचीच असतात. माईकच्या कुत्र्यांच्या टोळीतील एक कुत्री वयात अन् प्रेमाच्या रगीत आलेली असते. या संधीचा फायदा घेत तो ते सगळं कसं घडवून आणतो, याचं मजेशीर वर्णन त्याने केलं आहे. सुरुवातीस जॉर्जही अल्बर्टबरोबर जाऊ लागतो, पण अँजेलिन त्याला कशी पाडते, अल्बर्ट कसे वेडे वेडे चाळे करतो हे सगळं वर्णन करताना मोठया मिस्किलपणे मोवॅटने लिहिलं आहे की, या संपूर्ण घटनेचं माझ्याकडे अगदी सविस्तर वर्णन आहे. पण मला अशी भीती वाटते की, मी ते लिहिलं तर ते अती क्लिष्ट आणि शास्त्रीय परिभाषेतील वर्णन होईल. म्हणून मी अगदी थोडक्यातच एकाच निरीक्षणात शेवट करून समाधान मानतो की, अल्बर्टला ते कसं करायचं हे चांगलं ठाऊक होते. सगळी घटना घडून गेल्यावर जेव्हा अल्बर्ट परत आपल्या साथीदारांबरोबर शिकारीपूर्वीच्या गाण्यात भाग घेतो, तेव्हा त्याच्या आवाजात पूर्वी कधी न ऐकलेली नरमाईची, संतुष्टीची झाक असल्याचं मोवॅटला जाणवतं.

अँजेलिन पिल्लांसाठी खाद्य आणून, ते पोटातून बाहेर काढून पिल्लांना कसं भरवते, याचं वर्णन करताना एक मोठा गमतीशीर प्रसंग मोवॅटने लिहिला आहे. निरीक्षण करताकरता त्याच्या पोटातून नेहेमीच्या सवयीनुसार कसे आवाज येऊ लागतात, अँजेलिन कशी बुचकळ्यात पडते, शेवटी आवाजाच्या अनुरोधाने त्याच्याकडे येऊन कशी तुच्छतेने कटाक्ष टाकून जाते अन् त्याला क्षमा मागायची संधीही कशी मिळत नाही, इत्यादी इत्यादी. मोवॅट हा त्या लांडग्यांच्या कुटुंबात इतका काही मिळून मिसळून गेल्यासारखा दिसतो की, पुस्तक अधूनमधून वाचलं तर जॉर्ज, अँजेलिन, अल्बर्ट ही माणसंच आहेत की काय अशी शंका यावी!

असे दिवस जात असता मोवॅटला चुकून त्याला दिलेल्या कामांची यादी सापडते आणि त्याच्या लक्षात येतं की, बरीच कर्तव्यं करायची अजून बाकी आहेत. त्याला एकूण लांडग्यांची जनगणना करायची असते, लांडगे अन् कॅरिबू यातील 'शिकारी व भक्ष्य' हे नातं उलगडून बघायचं असतं. त्यामुळे एके दिवशी तो आणि ऊटेक हे काम करायला निघतात. खात्याच्या आधीच्या माहितीनुसार तिथे ३०,००० लांडगे असतात. म्हणजे ६ स्क्वेअर मैलांना १ लांडगा, आणि डोंगर आणि पाणी असा प्रदेश वगळला तर चक्क २ स्क्वेअर मैलांना १ लांडगा असा हिशेब येत होता. पण मोवॅटच्या लक्षात येत असलेली वास्तविकता वेगळीच होती. एकूणच गणना फक्त ३,००० होत होती अन् त्यात सुद्धा मोवॅटला जरा अतिशयोक्तीच वाटत होती. ऊटेकच्या सांगण्यानुसार लांडग्यांची संख्या ही नैसर्गिकरीत्याच नियंत्रित व संतुलित राहत होती. प्रत्येक कुटुंबात एखाददोन अविवाहित काका किंवा मावश्या असायच्याच. लांडग्यांना स्वत:च्या घरासाठी, कुटुंबासाठी भूभाग मिळाल्याखेरीज ते जोडीदार शोधत नसत. तसा जेव्हा तो मिळत नसे, तेव्हा ते दुसर्‍या कुटुंबाबरोबर त्यांच्या मुलांना वाढवत, मदत करत तसेच राहत. एकूणच लैंगिक समाधानाचा काळ हा वर्षातील ३ आठवडेच असल्याने, या लांडग्यांना जोडीदाराची जास्त उणीव भासत नसे. त्यांची कुटुंबात राहायची, कुटुंबजीवन, एकमेकांचा सहवास उपभोगायची इच्छा आपोआपच पुरी होत असे.

जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असे किंवा लांडगेच कमी असत, तेव्हा एकावेळी जन्मणार्‍या पिल्लांची संख्या अधिक असे, याउलट अन्न कमी प्रमाणात असे किंवा लांडगे अधिक असत अशा परिस्थितीत एकावेळी जन्मणार्‍या पिल्लांची संख्या कमी होत असे. असंच इतरही आर्क्टिक प्राण्यांबाबत खरं आहे. शिवाय साथीचे रोगही लांडग्यांच्या अतिवाढीला आळा घालत. यात मोवॅटने रेबीज झालेल्या प्राण्यांविषयीही भाष्य केलं आहे. ते आपण समजतो तसे वेडे होत नाहीत, तर त्यांची चेतासंस्था अशी काही बदलते की, ते अनाकलनीय, अनपेक्षित वागू लागतात. भीतीच्या नुसत्या कल्पनेनेच आपोआप जे संरक्षण मिळू शकतं, त्याला ते मुकतात.

अश्या तर्‍हेने फिरत फिरत काम करत असताना ऊटेकला त्याच्या टोळीतलं एक कुटुंब भेटतं अन् त्यांच्याबरोबर शिकारीला जाऊन हिवाळ्यासाठी मांसाचा साठा करून ठेवण्याची त्याला इच्छा असते, म्हणून तो मोवॅटला काही दिवस तिथेच राहण्याची विनंती करतो. मोवॅट एक दिवस उकडत असतं, म्हणून पोहायला जातो आणि तसाच काठावर येऊन सूर्यस्नान करत असतो. त्यावेळी त्याला उत्तरेकडे चाललेले ३ लांडगे दिसतात. त्यांचा पाठलाग करण्याची त्याला इच्छा होते. प्रश्न असा असतो की, त्याचे कपडे पलीकडे असतात अन् त्याच्याकडे फक्त त्याचे बूट व दुर्बिणच असते. त्याच अवस्थेत आपल्याला इथे कोण बघतंय, म्हणून तो पाठलाग करू लागतो. त्यात त्याला असं दृश्य दिसतं की, हरणं सगळी आरामात चरताहेत, त्यांच्यामधून लांडगे जात आहेत, पण कोणीच कोणाची दखलही घेत नाही. हे त्याला चक्क चुकीचंच वाटतं. हीच हरणं तो जवळ आल्यावर मात्र सैतानाने पाठलाग केल्यासारखी पळतात. जोपर्यंत नर हरणं दिसत असतात, तोपर्यंत लांडगे विशेष काही करत नाहीत. पण हरणांच्या माद्या अन् बछडे दिसू लागल्यावर मात्र त्यांच्या आविर्भावात बदल होतो. पण प्रत्येकवेळी लांडग्यांनी पाठलाग केल्यावर हरणं त्यांच्याहून अधिक वेगाने पळतात. लांडगे तो पाठलाग अर्धवट सोडून देतात. मोवॅटचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. त्याला चक्क असं वाटू लागतं की, शिकार कशी करावी हे आपणच आता या लांडग्यांना शिकवायला हवं. असा संतापाने फुरफुरत पाठलाग करता करता तो एकदम त्यांच्या मधेच जाऊन पडतो. लांडगे सैरावैरा धावत सुटतात अन् त्यामुळे हरणंही घाबरून उधळतात. जे दृश्य शिकारीच्या वेळचं म्हणून बघायची त्याची इच्छा असते ते त्याला अखेर अश्या तर्‍हेने, तो स्वत:च त्या दृश्याचं कारण ठरून दिसतं.

पण ऊटेकला हे लांडग्यांचं वरील वागणं सांगितल्यावर त्याच्याकडे त्याचे स्पष्टीकरण असतंच. त्याचं म्हणणं लांडगे हे फक्त रोगी, अशक्त, दुबळ्या हरणांना मारतात. अशा तर्‍हेने हरणांना पळायला लावून जी वेगाने पळू शकतात, ती सशक्त, निरोगी आहेत हे ध्यानी घेऊन ते त्यांचा पाठलाग सोडून देतात. अर्थात जेव्हा हरणं कमी असतात, पटकन मिळत नाहीत तेव्हा ते वेगवेगळे उपायही योजत असतातच. पण कॅरिबू हे लांडग्यांचं खाद्य/अन्न असलं तरी लांडगे फक्त रोगी, अशक्त कॅरिबूंना मारून इतरांना आपोआपच सशक्त रहायला मदत करतात. एकदा शिकार केली की ते मांस संपल्याखेरीज व भूक लागल्याखेरीज परत शिकारीला जात नाहीत. माणसं अन् लांडगा यातला मोठ्ठा फरक म्हणजे लांडगे मजा म्हणून कधीही शिकार करत नाहीत. भुकेची गरज म्हणूनच करतात व अशी शिकार करणं, हे त्यांच्यासाठी फार ताकदीचं अन् वेळखाऊ काम असतं. पण ती गरज भागली की, ते आपला वेळ विश्रांतीत, खेळण्यात, भेटण्यात घालवतात. तसंच आधीच्या प्रचलित समजुतींनुसार ते हरणांची तंगडी पकडून कधीही शिकार करत नाहीत तर बरोबरीने धावून खांद्यांवर झेप घेतात.

ऊटेकचं अशक्त, रोगी हरणांच्या शिकारीबद्दलचं वर्णन ऐकून मोवॅटने लांडग्यांनी मारलेल्या हरणांचं मांस काढून घेऊन त्याचं विश्लेषण केलं. वेळप्रसंगी लांडग्यांना तिथून हाकलून देऊनसुध्दा. ती हरणं रोगजंतूंनी, जंतांनी इतकी काही भरलेली होती की, त्याला ऊटेकचं म्हणणं पूर्णतः पटलं. लांडगे कुटुंबवत्सल असतात, याचं पूर्ण निरीक्षण तर मोवॅटने केलेलंच होतं. तसंच, ते आपल्या पिल्लांना शिकारीचं कसं यथास्थित प्रशिक्षण देतात, हेही मोवॅटला बघायला मिळालं.

त्याच्या लांडग्यांच्या निरीक्षणात अजूनही काही गोष्टींचा समावेश होता. धातूची रिंग फेकून ती पडेल तिथल्या वनस्पतींचा अभ्यास, लांडग्यांच्या विष्ठेचा अभ्यास, इत्यादी. हे सगळं कसकसं केलं अन् हे करताना घडलेले काही मजेशीर प्रसंग मोवॅटने अगदी मस्त रंगवले आहेत.

शिकारी, सापळा लावून प्राणी पकडणारे व परवानगी देणारं सरकारही, या लांडग्यांची हत्या कशी करतात, लांडग्यांविरुद्ध त्या बिचार्‍यांनी काहीही केलं नसताना कशी हुल्लड माजवली जाते, आरोप केले जातात आणि सापळे लावून, विष पेरून, इतकंच नव्हे तर प्रसंगी विमानाने पाठलाग करूनही त्यांना कसं मारलं जातं, याबद्दलही मोवॅटने सविस्तर लिहिले आहे. अन् लांडग्यांनी जरी काही केलं नसलं तरी, तसा अहवाल सादर करूनही सरकार त्याची दखलही कशी घेत नाही, हेही मुद्दाम नमूद केलं आहे.

मोवॅटच्या पुस्तकातला सर्वांत शेवटचा लेख अत्यंत हृदयस्पर्शी आहे. मोवॅटशी किंवा त्याच्याकडून काहीच संवाद साधला जात नाही, यात मोवॅट हरवलाय यापेक्षा सरकारची ४,००० डॉलर किमतीची यंत्रसामुग्री गायब झालीय, यावरून चर्चा चालू असते. त्याला चर्चिलला नेणारा पहिला वैमानिकही सापडत नाही, त्यामुळे अफवांचं पीक आलेलं असतं. अश्यातच दुसरी एक पाहणी करणार्‍या वैमानिकाला निव्वळ योगायोगानेच मोवॅट सापडतो. त्याच्याबरोबर मोवॅट आपल्या खात्याला संदेश पाठवून, आता इथून जायचं म्हणून त्याचं उरलेलं काम, म्हणजे लांडग्यांच्या गुहेचं आतून दर्शन आणि मोजमाप करण्यासाठी जातो. तसं जात असताना तो वैमानिक त्याच्या अगदी जवळून विमान नेऊन त्याला त्या प्रचंड आवाजाने चांगलीच धडकी भरवतो. गुहेत उतरताना मोवॅटकडे फक्त त्याचा टॉर्च अन् टेप असते. ४५ अंशांच्या कोनातून त्याला जवळजवळ ८ फूट सरपटत जावं लागतं आणि मग डावीकडे वरच्या दिशेस वळून गुहा येते. तिथे त्याला ४ हिरवे डोळे लुकलुकताना दिसतात. त्या गुहेत कोणी असेल अशी त्याला आधी अजिबात कल्पनाच नसते. पण अँजेलिन आणि तिचे एक पिल्लू तिथे असतात. मोवॅट इतका घाबरतो की, तो हालचालही करू शकत नाही. पण ते दोन्ही लांडगे साधं गुरगुरतही नाहीत. कसाबसा स्वसंरक्षणाच्या ओढीने तो बाहेर येतो. लांडगे कधीही मागून झडप घालतील, अशी त्याला भीती वाटत असते. पण पाठून त्याला हालचालींचा साधा आवाजही येत नाही. मग त्याला असं वाटतं की, जर हातात बंदूक असती तर भीतीतून जन्मलेल्या रागापोटी आपण त्या दोन्ही लांडग्यांची नक्कीच हत्या केली असती. थोडं शांत झाल्यावर त्याला वाटतं की, लांडग्यांच्या नुसत्या नजिकच्या दर्शनाने त्याचा आपण स्वत: माणूस असल्याचा, जास्त श्रेष्ठ प्राणी असल्याचा अहंभाव जागृत झाला अन् या सगळ्या राग, भीती असल्या भावना आपोआप प्रकट झाल्या. त्याचबरोबर हेही जाणवून त्याला जबरदस्त धक्का बसतो की, इतके दिवस लांडग्यांबरोबर राहून तो जे काही शिकला ते तो किती तत्काळ, क्षणार्धात विसरू शकला. अँजेलिन आणि ते पिल्लू, बहुतेक विमान अगदी जमिनीलगत नेल्याने आलेल्या प्रचंड आवाजाला घाबरून दडून बसले असणार. त्याला स्वत:चीच शरम वाटते. दूरवर कुठेतरी जॉर्जचा आवाज येतो, बहुधा अँजेलिनची पृच्छा करणारा. पण मोवॅटला मात्र तो आवाज त्याच्यापासून हरवलेल्या जगाचं प्रतिनिधित्व करणारा वाटतो. एकेकाळी आपल्या सर्वांचंही असलेलं जग, पण मग आपणच त्यापासून विलग झालो... असं जग ज्याचं मोवॅटने थोडंबहुत दर्शन घेतलं, त्यात डोकावला, आणि मग स्वतःमुळेच त्यापासून अलगही झाला.

१९५८-५९ला याच 'वन्य सेवा विभाग' या कॅनडा सरकारच्या खात्याने अनेक अधिकारी नेमून लांडग्यांची वस्ती असलेल्या असंख्य गुहांजवळ विषारी सापळे अन् आमिषं पेरली. पण परत जाऊन काय परिणाम झाला, हे मात्र ते तपासू शकले नाहीत, त्यामुळे त्या परिणामांबद्दल माहिती उपलब्ध नाही.

या उपसंहाराबरोबरच हे पुस्तक संपतं. पुस्तक नि:संशय वाचनीय ठरायची कारणं असंख्य आहेत. एक तर विषय, जो आपल्या रोजच्या परिघाबाहेरचा असा आहे. या विषयावर इतर पुस्तकं असतीलही, पण सर्वसामान्य वाचकाला कळेल, एवढंच नव्हे तर मनोरंजक वाटेल अश्या भाषेत ही असली पुस्तकं मिळणं कठीणच. दुसरं म्हणजे मोवॅटची लेखनशैली, अधूनमधून विनोदाचा शिडकावा अन् सहजसुलभ वर्णनं करायची हातोटी. सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे मोवॅटला पुस्तकाच्या प्रमुख विषयाबद्दल वाटणारी आत्मीयता. ज्या तर्‍हेने संपूर्णतः झोकून देऊन, अत्यंत तन्मयतेने मोवॅटने काम केले आहे, ते या पुस्तकातून ठळकपणे उठून दिसतं. त्याच्या उद्दिष्टासाठी त्याने काय वाट्टेल ते करायला मागेपुढे पाहिलेलं नाही. आणि सर्वांत शेवटचं म्हणजे सगळ्या वर्णनांतून दिसणारा त्याचा कमालीचा प्रामाणिकपणा! स्वत:वर ओढवलेले फजितीचे प्रसंग, स्वतःमधले काही दुर्गुण, आळशीपणा, सवयी, प्रसंगी वाटलेली भीती, मनात उद्भवलेल्या शंका या सर्वांवर त्याने अगदी पारदर्शी प्रामाणिकपणे अन् आत्मीयतेने भाष्य केलेलं आहे. त्यामुळेच हे पुस्तक नुसतंच वाचनीय ठरत नाही तर प्रदीर्घ काळ मनात रेंगाळत राहतं.

- मऊमाऊ

Taxonomy upgrade extras: