स्वरांचा प्रवाहो चालिला...

रल्याप्रमाणे मी डॉ. सुचित्रा आणि श्री. सुनील कुलकर्णी यांच्या टुमदार बंगल्याच्या दारात उभी होते. घंटी वाजवल्यावर डॉ.सुचित्रा आणि श्री. सुनील कुलकर्णी दोघेही हसतमुखाने स्वागताला हजर होते.
डॉ. सुचित्रा कुलकर्णी म्हणजे पूर्वाश्रमीची संजीवनी सबनीस आणि माझी बालमैत्रीण, संजू! मध्यंतरीच्या काळात आपापल्या सांसारिक जबाबदार्‍या निभावताना आमचा संपर्क थोडासा कमी झाला असला तरी आमच्यातली मैत्रीची वीण काळाबरोबर अधिकच घट्ट होत गेली. या संवादानिमित्ताने मलाही या संगीतवेड्या कुटुंबाबद्दल बर्‍याच नवीन गोष्टी समजल्या. समीप आणि सानिया या दोघा मुलांच्या कलेचा आस्वाद घेत घेतच त्यांना दोघांनाही आपापल्या क्षेत्रात मोठं होताना मी पाहत आले आहे. या कुटुंबाशी गप्पा मारताना हे पदोपदी जाणवत होतं की, या कलाकारांच्या कलेला उपजत कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि परिश्रमांची सुयोग्य जोड मिळाली आहे.


आमच्या गप्पा चालू असतानाच समीप, संजूचा सतारवादक लेक, आणि नंतर सून रमाही आम्हांला सामील झाली. मंडळी, तुम्ही फसाल बरं का समीपला पाहून! कुठल्याच कोनातून तो एवढा 'पहुँचा हुवा' सतारवादक वाटत नाही. अगदी फार फार तर महाविद्यालयीन विद्यार्थी वाटेल.

असो. संपूर्ण घरात ठायीठायी संगीतक्षेत्रातील पाऊलखुणा दिसत होत्या. घरातल्या शोकेसेस आणि कानेकोपरे, मुलांना मिळालेली पदकं, बक्षिसं, मानचिन्हं अभिमानाने मिरवत होत्या. कोपर्‍यात गवसणीतला तानपुरा अगदी झोकात उभा होता.
हळूहळू आम्ही सर्व स्थानापन्न झालो.
चला तर मग सुरू करूया गप्पा?

संजू, मला तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत आहे. आपण सारे शाळेत असताना , तुझी मोठी बहीण मा. गानसरस्वती किशोरीताईंकडे संगीताची तालीम घेत होती. त्यामुळेच किशोरीताईंची गाणी रेडिओवर ऐकण्याआधी आम्ही तुझ्या तोंडून ऐकत होतो. आणि आठवतं? शाळेत तुझं गाणं ऐकायला आम्ही अगदी उत्सुक असायचो. 'जाईन विचारित रानफ़ुला' आणि 'हे शामसुंदर' खूपच छान म्हणायचीस तू. त्यामुळे तुझ्याकडून आलेला संगीताचा वारसा दोन्ही मुलांनी पुढे चालवला आहे, हे तर दिसतंच आहे. पण सुनीलबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. मुलांच्या सांगीतिक प्रवासात वडील या नात्याने त्यांचा सहभाग..

सुनील कुलकर्णी: मी सांगतो. माझ्याकडेही घरात सगळ्यांनाच शास्त्रीय संगीताची आवड. आणि आई व्हायोलिन वाजवायची. तिच्यामुळे मीही व्हायलिन वाजवायला लागलो. काही वर्षं उस्ताद फ़ैयाज खान यांच्याकडेही मी तालीम घेतली. रोजच्या रियाजाने त्यात भर टाकत गेलो. आता तर आम्ही दोघे बापलेक जुगलबंदीत रमतो. समीपची सतार आणि माझं व्हायलिन!

सानिया पाटणकर, तुमची लेक! सध्या टीव्हीवर दिसणारा सुपरिचित चेहरा. तिने आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा झेंडा अगदी अटकेपार फडकवला आहे. आपल्या कर्णमधुर गाण्याने रसिकांवर अगदी मोहिनीच टाकली आहे. तिच्याबद्दल सांगा. तिच्यातल्या विशेष प्रतिभेची जाणीव तुम्हाला केव्हा झाली?

श्री.सुनील: मी व्हायलिन वाजवायचो, तर ते तिला आवडायचं. एकदा सहज गंमत म्हणून माळ्यावरची पेटी (संवादिनी) खाली काढली. सानिया तर सुरुवातीला त्याच्यावर नाचली. ही पेटी आम्ही तिच्या स्वाधीन केली होती. त्यानंतर ती पेटी अगणित वेळा दुरुस्त करावी लागली, हे ओघानंच आलं! पण आम्ही कधी मुलांना हे करू नको, ते घेऊ नको; मोडेल, अशी बंधनं घातली नाहीत. त्यामुळे सानू हळूहळू आपली चिमुकली बोटं फ़िरवायला लागली त्या पेटीवरून! मला वाटतं अगदी तीन वर्षांचीच असेल तेव्हा.

saniya_1_0.jpg

सौ. सानिया (कुलकर्णी) पाटणकर


डॉ. सुचित्रा: हो ना! तिचं स्वरांशी असलेलं नातं हळूहळू आमच्याही लक्षात येत गेलं. मग आम्ही तिला श्री.चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे पाठवू लागलो, फ़क्त नाट्यसंगीतासाठी. तिचं बोबड्या बोलातलं, पण अगदी सुरातलं 'सुजन कसा मन चोरी' अजून कानात घुमतंय माझ्या! भूप अगदी व्यवस्थित समजला होता तिला, हे तिच्या गाण्यातून बरोब्बर कळत होतं. गाण्याबरोबर पेटीवादनही चालू होतं तिचं. 'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला' वगैरे बालगीतंही ती पेटीवर छान वाजवत असे. त्यानंतर वयाच्या सहाव्या वर्षापासून कै. श्रीमती लीलाताई घारपुरे यांच्याकडे तिने शास्त्रीय संगीताचे अगदी प्राथमिक धडे गिरवले. तिथे तिचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का झाला.

घरात असे कलाकार घडवताना घरातील सदस्यांवर, अर्थातच तुम्हां सर्वांवर काही बंधनं आली का? किंवा तुमच्या या दोन्ही मुलांनी इतक्या लहान वयातच इतका मोठा पल्ला गाठलाय, तर ही भरारी मारताना, हा पल्ला गाठताना त्यांची नेहमीची दिनचर्या कशी असायची? त्यांना खूप काही विशेष मेहनत घ्यावी लागली का? की त्यांचं बालपणही इतर चारचौघांसारखंच होतं?

डॉ. सुचित्रा: हो, तसं आम्हा सर्वांनाच काही छोट्याछोट्या गोष्टींत तडजोडी कराव्या लागल्या. थोडासा त्याग करावा लागला. पण तेव्हा आम्हांला त्या तडजोडी जाचक नाही वाटल्या. तो आमच्या जीवनशैलीचाच एक भाग बनला होता. सानूला विचारा! ती म्हणते, ''आत्ताचं या मुलामुलींचं हँगआऊट प्रकरण आमच्या दिनचर्येत नव्हतंच. ते परवडलंही नसतं. आम्हाला तर 'रूपाली, वैशाली' माहीतसुद्धा नव्हतं.'' अर्थातच मी वर म्हटल्याप्रमाणे तेव्हा किंवा आत्ताही हे आठवून खंत नाही वाटत. ही एक फक्त आठवण आहे.

श्री. सुनील: हो आणि मुलांना शाळेत नेणं-आणणं, त्यांचे क्लासेस, हळूहळू सुरू झालेली मंचसादरीकरणं.. या साठी संजूने खूप मेहनत घेतलीये. स्वतःचा व्यवसाय सांभाळून! मुलांचे मंचावरील सादरीकरण खूपच लहान वयात चालू झाले आणि सतत चालू राहिले. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मंचभय हा प्रकारच संपून गेला. अर्थात त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे, स्वतःच्या कलेबद्दल एक आत्मविश्वासही अंगी बाणत गेला.

आता समीपबद्दल बोलू. त्यालाही शास्त्रीय संगीताची आवड कशी काय निर्माण झाली असं न विचारता, मी विचारेन की, समीपचं सतारवादन कसकसं विकसित होत गेलं? कारण आता माझ्या हे लक्षात आलंय की, दोन्ही घराण्यांमधून वाहत आलेला स्वरांचा प्रवाह अगदी सहज, अलगदपणे झेलून या दोन्ही मुलांनी स्वतःमध्ये सामावून, अविरत आणि सुरेलपणे पुढे चालवला आहे. त्यामुळे 'संगीत हे त्यांच्या धमन्यांतूनच वाहत आहे' असं म्हणायला हरकत नाही.

Sameep%20Kulkarni_01_1_0.jpg

सॉफ्टवेअर सितारिया समीप कुलकर्णी


डॉ. सुचित्रा: समीपला अगदी प्राथमिक शाळेत असताना तबलावादनाच्या शिकवणीला घातलं होतं. त्याचा हेतू जरा वेगळा होता. सानियाला घरचाच तबलजी मिळेल हा अंतस्थ हेतू! काही वर्षं तो शिकलाही. त्यातही त्याला गोडी निर्माण झाली. पण नंतर बुद्धिबळाने काही काळापुरती तबल्यावर मात केली.

श्री. सुनील: हो, पण समीपच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणजे, एकदा त्याने उस्ताद विलायत खाँसाहेबांची सतारवादनाची ध्वनिफीत ऐकली. त्यानंतर झपाटल्यासारखा तो सतारवादन शिकू लागला. पहिली चौदा वर्षं तो उस्ताद उस्मान खाँसाहेब यांच्याकडे सतारवादन शिकला. नंतर आता गेली सात वर्षं तो उस्ताद शाहिद परवेझ यांच्याकडे सतारवादनाची तालीम घेतो आहे.



आता समीप आलेला आहे तर त्यालाच विचारते. तू उस्ताद शाहिद परवेझ यांच्याकडे शिकतोयस त्याविषयी सांग.

समीप: शाहिद परवेझ यांच्या वादनाबद्दल मी काय बोलू? माझ्याकडे शब्दच नाहीत. गुरू म्हणून ते फारच शिस्तप्रिय आणि काटेकोर आहेत. एखादा आलाप असा म्हणजे असाच आला पाहिजे. त्यांच्या मनासारखा एखादा राग उतरेपर्यंत तो तेवढा रियाज करावाच लागतो. याचा मला खूप फायदा झाला. कशातही परिपूर्णतेचाच ध्यास लागला. वादनातही परफेक्शनचा ध्यास लागला. पूर्वी मी रोज श्री. शाहिद परवेझ यांच्याकडे जात होतो. आता फक्त शनिवार, रविवारी जातो. ही सतार शिकण्याची प्रक्रिया अगदी अविरत चालणारी आहे. रोज काहीतरी नवीनच प्रत्यय येत राहतात.

संजू, तुझ्या दोन्ही कलाकार मुलांची शैक्षणिक पार्श्वभूमीही अगदी उल्लेखनीय आहे.

डॉ. सुचित्रा: हो, समीपला बी.ई.ला आणि सानियाला एम.कॉम.ला डिस्टिंक्शन आहे. आणि नंतर सानियाने कंपनी सेक्रेटरीचाही इंटरपर्यंतचा कोर्स पूर्ण केला आहे. पण तोपर्यंत तिने शास्त्रीय संगीतातही बराच लांबचा पल्ला गाठला होता.

तिच्या गुरूंबद्दल सांग ना थोडं..

डॉ. सुचित्रा: सानियाच्या या वाटचालीत तिच्या गुरू, जयपूर घराण्याच्या डॉ.सौ.अश्विनी भिडे-देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. गेली जवळजवळ १३/१४ वर्षं ती त्यांच्याकडे जयपूर-अत्रौली घराण्याची रीतसर तालीम घेत आहे. त्यांना साथ करण्यासाठी, त्यांच्याबरोबर ती संपूर्ण भारतभर फ़िरली आहे.

श्री. सुनील: अश्विनीताईंचाही भर शिक्षण पूर्ण करण्यावर होताच. त्यांनीही तिच्या मनावर शिक्षणाचं महत्त्व बिंबवलं. संगीताच्या शिक्षणाबरोबर एखादी चांगली पदवीही तुमच्या हातात हवी, असं त्या अगदी ठासून सांगत. आणि सानिया ही शिक्षणातही पहिल्यापासूनच हुशार आणि कुशाग्र विद्यार्थ्यांमध्ये गणली जायची.

हो ना, पण त्यामुळेच नक्की करिअर कशात करायचं, हा प्रश्न तुमच्यापुढे किंवा मुलांपुढे कधी उभा राहिला का?

श्री.सुनील: सानूचा हा सांगीतिक प्रवास तिच्या शालेय/महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर असा चालू राहिला होता, की संगीत हे शिक्षणापुढे दोन पावलं पुढं जाऊन कधी उभं राहिलं, कळलंच नाही. ती आपोआपच या करिअरकडे वळली. तो निर्णय आपोआप घेतला गेला. तोपर्यंत तिच्या अनेक मैफ़ली रंगत गेल्या. मध्यंतरीच्या काळात ती 'संगीत विशारद'देखील झाली, विशेष योग्यतेसह.

सानियाच्या गायकीबद्दल सांगा.

सुनील: सानिया एखाद्या रागाचा पद्धतशीर विस्तार जो करते तो अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतो. तिच्या तानांमध्येही खूपच वैविध्य असते. आणि इतक्या वर्षांच्या रियाजाने तिच्या ताना, पलटे अगदी सहज उलगडत जातात. तिचा आवाजही अगदी तीनही सप्तकांमधे लीलया फिरतो. आणि याला कारण खूप काटेकोरपणे केलेला रियाज.



नक्कीच. सानियाचं नुसतं गाण्याचं व्याकरणच पक्कं आहे असं नाही, तर तिचं गाणं ऐकणं म्हणजे एक सौंदर्यानुभूतीच असते, हे आम्हीसुद्धा अनुभवलं आहे. हं, मग तिची घोडदौड चालूच राहिली, शिरपेचात एकेक तुरा अगदी अलगद खोवत! आकाशवाणीची श्रेणीप्राप्त कलाकार तर ती आहेच. मग एकेक मैफल आणि असंख्य पारितोषिकं ती जिंकत गेली. ती यादी इथं करणंही अवघड आहे, इतकी मोठी आहे. तरी काहींचा उल्लेख करू. संजू, तू सांग ना!

डॉ. सुचित्रा: काहींचा उल्लेख करते. बालगंधर्व रसिक मंडळ, रोटरी, लायन्स यांच्या स्पर्धांतली पहिली बक्षिसं, ऑल इंडिया रेडिओच्या काही मान्यताप्राप्त स्पर्धांतली बक्षिसं, अशी कित्येक. आणि पारितोषिकं म्हणशील तर सूरसिंगारचं 'सूरमणी', 'पंडित जसराज', शारदा संगीत विद्यालयाचं, 'पं. वि.दि. पलुस्कर पारितोषिक' आणखी बरीच मोठी यादी आहे. तिला केंद्र सरकार, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, गानवर्धन-पुणे यांच्या शिष्यवृत्त्याही मिळाल्या आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की, तिला गंगूबाई हनगल, बेगम परवीन सुलताना, पं. विश्वमोहन भट, पं. जसराज अशा मान्यवरांचे आशीर्वाद मिळाले आहेत.

मला वाटतं, सानियाने शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीतातही अगदी प्रावीण्य मिळवलेलं आहे.

श्री. सुनील: हो, तिचा ठुमरी, गजल, नाट्यसंगीत, टप्पा, वगैरे प्रकारांचाही चांगला अभ्यास आहे. हे उपशास्त्रीय प्रकारही सादर करायला तिला खूप आवडतं.



नुसता अभ्यासच काय, आम्ही जितकं तिला ऐकतो आहोत तितकं तिचं या उपशास्रीय गायनातलं प्रभुत्वही प्रकर्षाने जाणवत आहे. मध्यंतरी सह्याद्रीवरचा मल्हार रागावरचा कार्यक्रम ऐकला. कार्यक्रमाला सानियाच्या गायनाने अगदी 'चार चाँद' लागले. समीप, आता तू जरा तुझ्याबद्दल सांग. तू तर अगदी सेलेब्रिटीच बनला आहेस सध्या!

समीप: मी सध्या दुहेरी कार्यक्षेत्रात आहे. मी एका सॉफ्टवेअर कंपनीत सिनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स इंजिनीअर म्हणून काम करतो आहे.

तुझी पदवी कोणत्या क्षेत्रात आहे?

समीप: मी अभियांत्रिकीचा पदवीधर आहे. Instrumentation and Control Engg.मध्ये बी.ई. केलं आहे. विथ डिस्टिंक्शन आणि मी ज्या कंपनीत काम करतो ती माझी कंपनी खूपच सहकार्य करते. गंमत सांगतो, खूप दिवसात जर मी रजा मागितली नाही तर माझा मॅनेजरच मला विचारतो, ’अरे समीप, तुला रजा-बिजा काही हवीये का?कार्यक्रमासाठी?’ त्यामुळे मी माझ्या या छंदाला खूप वेळ देऊ शकतो. सतत कार्यक्रम करायचे तर रजा हवीच. आणि या क्षेत्रात रियाजाला पर्याय नाही. रोज कमीतकमी ५/६ तास रियाज करायलाच हवा!

पण दोन्ही कसं संभाळतोस? मग नोकरीमुळे तुझ्या सतारवादनाच्या करिअरकडे दुर्लक्ष नाही का होत? किंवा उलट?

समीप: नाही. मी दोन्ही गोष्टी खूप एन्जॉय करतो. आणि गंमत म्हणजे माझ्या कंपनीला आत्तापर्यंत तीन वेगळ्या कंपन्यांनी टेकओव्हर केलंय, पण मी मात्र तिथेच घट्ट चिकटून आहे. माझ्यावर, विशेषतः माझ्या सतारवादनावर, त्याचा काहीही परिणाम मी होऊ दिलेला नाही. उलट झाला असेल तर चांगलाच. माझी दोन्ही करिअर्स एकमेकांना पूरक आहेत म्हटलं तरी चालेल.

तू या तरूण पिढीत भलताच लोकप्रिय आहेस. एकदम स्टार परफॉर्मर आहेस. तुझ्या ऑर्कुट प्रोफाईलवरून लक्षात येतं. केवढे ते फॅन्स! किती प्रोफाईल्स आहेत तुझी तिकडे! पण तुला काय वाटतं, तरूण पिढीत शास्त्रीय संगीताची आवड कितपत आहे? आणि ती वाढावी म्हणून तू तुझ्या वादनात काही प्रयोग करतोस का?

समीप: हो, वाद्यसंगीताचं म्हणाल, तर यात भाषेचा तसा काही संबंध किंवा अडथळा नसल्याने सुरांवर मनापासून प्रेम करणारा कोणीही रसिक याचा आनंद घेऊ शकतो. तरी मलाही वाटतं की, माझ्या पिढीने या संगीताचा आस्वाद घ्यावा, तरुणांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावषयी आवड निर्माण व्हावी! त्यासाठी चालू असतात प्रयत्न! मी 'साज' नावाच्या एका फ्यूजन ग्रूपचा संस्थापक सदस्य आहे. या ग्रूपचे कार्यक्रम विशेषतः तरूण पिढीला भावतात.

तू २००६ साली अमेरिकेत गेला होतास, तिथली एखादी आठवण सांग ना.

समीप: मी अमेरिकेत गेलो असताना तिथे एका कार्यक्रमात जरा एकदम जलद लयीत आणि जरा जॅझी वाजवायला सुरवात केली, कारण बहुसंख्य अमेरिकनांनीच कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती. तर काही वेळाने श्रोत्यांनी सांगितलं की, ते सगळे फक्त शुद्ध शास्त्रीय संगीतातील आलापी ऐकण्यासाठीच आलेले आहेत. मी त्यांच्या विनंतीला मान देऊन बिलावल रागातली आलापी सुरू केली. तर सर्वांनी ध्यानमुद्रा धरून डोळे मिटून ध्यान सुरु केले. इट वॉज अ ग्रँड सक्सेस अँड अ ग्रेट एक्स्पीरिअन्स! एक मात्र आहे की, पाश्चिमात्य देशात सतार लोकप्रिय करण्याचं श्रेय पं. रविशंकरांनाच जातं.

व्वा! छान वाटलं ऐकून! पण आपल्या देशात काय परिस्थिती आहे?

समीप: अहमदनगरचा अनुभव सांगतो. 'पाडवा पूर्वसंध्या' हा कार्यक्रम खुल्या रंगमंचावर होता. तिकडे अगदी प्रचंड प्रमाणात प्रेक्षकवर्ग उपस्थित होता. संध्याकाळची वेळ असल्याने मी यमनची आलापी सुरू केली.. आणि अहो आश्चर्यम्! लोकांनी अगदी उचलून धरला तो कार्यक्रम. तरूण पिढी अगदी रंगून गेलेली दिसत होती. छान होता तो अनुभव.. एका छोट्या गावातला!

काय सांगतोस! याचा अर्थ तरूण पिढीलाही शास्त्रीय संगीतात रस आहे.

समीप: हो. मला तरी वाटतं की, शास्त्रीय संगीताला खूप चांगले दिवस आले आहेत आणि अजून चांगले येणार आहेत. याला कारण तंत्रज्ञानाचा विकास. पहा, संगीतात जितकी श्रवणभक्ती कराल, तितकं संगीत तुमच्या मनात आपोआप उलगडत जातं आणि हळूहळू तुमची कला आतून साकार होत जाते. मी तर म्हटलं ना, हल्ली ऑफ़िसात काम करतानाही आम्ही पूर्णवेळ संगीत ऐकू शकतो. तेही मोबाईलवरून. मी अगदी १६ एमबीचा मोबाईल घेतला आहे त्यासाठी. त्यात मी सगळ्या जगातलं सगळ्या प्रकारचं संगीत घेतलं आहे महाजालावरून. काम करताना श्रवणभक्ती चालू राहते.

तुझ्या या दुहेरी करिअरमध्ये तू कुटुंबाला वेळ देऊ शकतोस का? विशेषत: तुझं लग्नही एवढ्यातच झालंय. रमाला (बायकोला) वेळ देऊ शकतोस का?

समीप: खरं म्हणजे कलाकारांना हल्ली सप्ताहांतांनाच कार्यक्रम असतात. आणि जे फक्त संगीतातच करिअर करतात, त्यांना मग सोमवारपासून पुढे बर्‍यापैकी वेळ मिळतो, व्यासंगासाठी, इतर कामांसाठी! पण मी शनिवार-रविवारी कार्यक्रमात व्यग्र असतो आणि सोमवारपासून पुन्हा मला ऑफ़िसला जावं लागतं. रमाला या सगळ्या गोष्टींची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे तिचा मला पूर्ण पाठिंबा आहे. आणि तिलाही तिची नोकरी आहे, तीही पुढे काही शिकतीये, त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना सांभाळून घेतो.

संजू, तू स्वतः रीतसर गाणं शिकलेली आणि सुनील व्हायलिन वादक. असं असताना मुलांच्या कार्यक्रमांनंतर, त्यांच्या सादरीकरणाविषयी तुम्हां चौघांत काही मतभिन्नता असते का? किंवा जेवताना वगैरे हाच विषय सतत चर्चेला असतो, असं होतं का?

डॉ.सुचित्रा: मुलांच्या सादरीकरणाबाबत बोलायचं झालं, तर बहुतांशी आम्ही त्यांचे टीकाकारच असतो. कोणत्याही कार्यक्रमानंतर आम्हां सर्वांची त्यावर सांगोपांग चर्चा होतेच. आम्ही मुलांना 'वा, वा' म्हणत नुसतं प्रोत्साहन कधीच दिलं नाही. आणि हो, केवळ डायनिंग टेबलावरच नाही तर आम्ही सगळे एकत्र असताना फिरून फिरून याच विषयावर येतो. कारण शास्त्रीय संगीत हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक; आमचा श्वासच म्हणेनास का, बनला आहे.

व्वा! छान! सुनील, तुम्ही व्हायलिन वाजवता. तुम्ही काय सांगाल लेकाच्या वादनाबद्दल?

sunil_1_0.jpg


श्री. सुनील कुलकर्णी


श्री. सुनील: समीप सतार गायकी अंगाने वाजवतो. तो सध्या इटावा घराण्याची तालीम घेतोय. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की, इतक्या लहान वयातच मींडेवर त्याचं चांगलंच प्रभुत्व आहे. विशेषतः जलद गतीतील मींड! आणि लहानपणीच तबलासाधना केल्यामुळे त्याची तालावरची पकडही वाखाणण्यासारखी आहे. विशेषतः त्याची तिहाई अगदी वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याच्या वादनातले मूर्च्छनेतले प्रयोगही अनुभवण्यासारखे आहेत.



समीप, तू तरूण पिढीला शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करून घेण्यासाठी काही खास प्रयत्न करतोस का?

समीप: आता पहा, जिथे अगदी बैठकच असेल, तिथे तर मी फ़क्त शास्त्रीयच वाजवतो. पण मी वर अहमदनगरच्या खुल्या रंगमंचावरील मैफलीचा उल्लेख केला होता ना, तसाच एखादा असा मिक्स्ड कार्यक्रम असेल तर तिथे मी खूप जॅझी वाजवतो. प्रयोग करतो. सतारीवर गिटार वाजवतो. फ्यूजन हा तर हल्लीचा मंत्र झाला आहे. तेही करतो. बर्‍याच वेगवेगळ्या वाद्यांबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रमही मी केले आहेत. तरूण पिढीला ते खूप आवडतात. हो, मी आणि सानिया दोघं जुगलबंदीही सादर करतो.आम्ही आमच्या 'साज' या फ्यूजन ग्रूपमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो. त्याचंही लोकांना अप्रूप वाटतं. विशेषतः तरूणाई ते एन्जॉय करते.

सानियाप्रमाणेच तुझीही बक्षिसं, पारितोषिकं‍ इतकी आहेत की, इथे जागाच पुरणार नाही लिहायला, तरी काहींचा उल्लेख करू या. मला माहिती आहे, तुझ्या मैफलीही असंख्य झाल्या आहेत. संपूर्ण भारतात सतत चालूच असतात.

समीप: गानवर्धनचं, काँप्युटर सोसायटीचं बेस्ट आर्टिस्ट, व्हर्व्ह, पुणे येथलं Best Instrumentalist आणि बरीच आहेत.

श्री सुनील: पुणे फेस्टिवल, मूड इंडिगो, पुणे रेडिओ काँपिटिशन, फिरोदिया करंडक वगैरे कार्यक्रमांतही त्याला बक्षिसं मिळाली आहेत. आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो 'रोटरी चाइल्ड' असल्याने त्याने चॅरिटीसाठीही अनेक प्रोग्रॅम केलेत. त्याचे दोन सोलो अल्बम्स आणि एक ध्वनिफीत प्रकाशित झाली आहे. आणि सानियाच्याही काही ध्वनिफिती प्रकाशित झाल्या आहेत. एक अलूरकरांनी आणि दुसरी म्युझिशियन्स गिल्डने प्रकाशित केली आहे.

संजू, घरात चौघांच्या कुटुंबात तू सोडून उरलेले तीन सदस्य सतत गात आणि वाजवत असतात, याचा तुला कधी एक गृहिणी म्हणून कधी त्रास झालाय का? किंवा 'हे जरा आता अतिच होतंय' असं कधी वाटलं का?

डॉ.सुचित्रा: अगं, काही विचारू नको. मी माझे क्लासेस करून क्लासमधल्या नाठाळ मुलांवर आरडाओरडा करून घरी यायची, तर बर्‍याचवेळा तीन खोल्यांत तिघे आपापला रियाज करत बसलेले असायचे. अगं, मी पण अगदी संगीतप्रेमीच आहे गं, तरी कधीकधी खूप शांततेची गरज असतेच ना! म्हणजे बघ. ह्यांचं व्हायलिनवादन, सानियाचा कंठसंगीताचा रियाज आणि समीपची सतार. कल्पना कर.

KOJAGIRI%201_1_0.jpg


डॉ. सौ. सुचित्रा कुलकर्णी , सिद्धांतसमवेत.


हो गं, आपले फोन चालतात तेव्हा मी ऐकते ना ते सगळं!

श्री. सुनील: मग आम्हीच आमचे वेळापत्रक ठरवून घेतले की, अमुक इथून पुढे रियाज बंद. तरी बर्‍याच वेळा केलेले नियम आपण मोडतोच ना!

समीप: म्युझिक इज इन देअर ब्लड म्हणताना, आई साहित्यातली डॉक्टर आहेच पण उस्ताद सयीदुद्दिन डागर यांच्याकडे सहा वर्षं शास्त्रीय संगीत शिकली आहे, हे सांगायचं राहून जाईल म्हणून सांगतो. नाहीतर तिचे वरील विधान वाचून कुणाला वाटेल, यांची आई अगदी 'औरंगजेब' आहे की काय?

अरे, काय सांगतोस समीप? हे नव्हतं मला माहीत. पण मग संजू, तुला कधी सादर करावंसं नाही का वाटलं? आफ्टरऑल म्युझिक इज अ परफॉर्मिंग आर्ट! आणि मला शालेय/महाविद्यालयीन स्पर्धांमधून आणि इतरत्रही गाणारी संजू चांगली आठवतेय.

डॉ. सुचित्रा: अगं, मी पूर्वी करत होते छोटे-मोठे कार्यक्रम, कधी गझल, कधी नाट्यसंगीत. आणि तुला म्हणून सांगते, अजूनही मी ख्याल चांगला अर्धा तास, वगैरे गाऊ शकते. पण माझा व्यवसाय, माझे क्लासेस.. सगळंच कसं जमणार? त्यात मुलांच्या गाड्याही जोरात सुटलेल्या!

बरोबर आहे! मला वाटतं, सुनील आधी किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी करत होते आणि नंतर तेही तुला सामील झाले.

समीप: हो, आईचा क्लासचा व्याप वाढत गेला आणि बाबा मॅथेमॅटिशियन असल्याने ते सामील झाल्यावर विद्यार्थीवर्गाला दोघांचा खूप फ़ायदा झाला.

सानियाचंही लग्न झालंय, एका छोट्याची, 'सिद्धांत'ची ती आई आहे. तर हे सगळं ती कसं काय सांभाळते?

डॉ. सुचित्रा: सानियाचं लग्न ठरण्यात तिच्या संगीताचा खूप मोठा वाटा आहे. तिचे पती धीरज यांनाही शास्त्रीय संगीताची खूपच आवड आहे. त्यामुळे त्यांचा आणि सानूच्या सासू-सासर्‍यांचाही तिच्या या वाटचालीत फ़ार मोठा हातभार आहे. आणि आम्ही दोघे आहोतच ना! त्यात आता आम्ही आमचे क्लासेस बंद केलेत. आणि जमेल तेव्हा सिद्धांतला सांभाळण्याचं गोड काम करतो. सानिया कार्यक्रमांसाठी २००५ साली अमेरिकेत गेली, तेव्हा त्याला आमच्याजवळच ठेवून गेली होती. तेव्हा त्याला तितकंसं कळत नव्हतं, पण मागील वर्षी ती ऑस्ट्रेलियात गेली, तर मात्र त्याला सांभाळणं आम्हा सर्वांना जरा अवघडच झालं होतं. कारण आता तो मोठा झाला आहे. त्यालाही आईची आठवण यायची आणि आईला मुलाची! सानियाने अमेरिकेत तेव्हा ३२ सोलो कार्यक्रम केले होते.

समीप, भारताबाहेर किती साली आणि कुठेकुठे कार्यक्रम केलेत त्याबद्दल सांग.

समीप: मी अमेरिकेत २००६ साली गेलो होतो. तिथे मी बर्‍याच प्रांतांत कार्यक्रम केलेत. अगदी बरीच अमेरिका पालथी घातली म्हणायला हरकत नाही. माझ्या नोकरीमुळे मला दहा वर्षांचा अमेरिकेचा परवाना मिळाला आहे. २००९ साली मी यूकेतही लंडन, मँचेस्टर वगैरे ठिकाणी कार्यक्रम केले. तिथल्या लोकांचा प्रतिसादही अगदी अवर्णनीय होता.

डॉ. सुचित्रा: सानिया जेव्हा २००५मध्ये अमेरिकेला गेली होती तेव्हा, तिथल्या मिशिगन युनिव्हर्सिटीत शास्त्रीय संगीतावर तिने एक कार्यशाळाही घेतली होती. आयसीसीआरनं तिची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची जागतिक पातळीवरील प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.

संजू आणि सुनील, तुमच्या दोन्ही मुलांनी इतक्या लहान वयातच एवढं मोठं यश मिळवून सुद्धा त्यांची पावलं जमिनीवर घट्ट रोवलेली आहेत, हे अगदी जाणवतं आणि अगदी अभिमान वाटतो. संजू, आता तुला आयुष्याच्या या वळणावर कसं वाटतंय?

डॉ. सुचित्रा: मुलांनी आमचं बोट धरून या प्रवासाला सुरवात केली आणि आता ती कुठल्याकुठं पोचलीयेत. हो, पण त्यांनी धरलेलं हे बोट सुटलेलं नाही, याचा खूप आनंद वाटतो. त्यांना आणि आम्हां दोघांनाही पूर्ण जाणीव आहे की, अजून खूप पल्ला गाठायचा आहे. या दोघांचाही हा सुरेल प्रवास असाच चालू रहावा, असं मनापासून वाटतं.

खूप छान गप्पा झाल्या. तुम्हां सर्वांना, विशेषतः समीप आणि सानिया यांना पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा!

Sameep%20Kulkarni_06.jpg

समीप कुलकर्णी

=================================================
सानियाचे संकेतस्थळ:
www.saniyapatankar.com

समीपचे संकेतस्थळ:
www.sameepkulkarni.multiply.com
www.wix.com/sameepkulkarni/sameepkulkarni
VIDEO CHANNEL : www.youtube.com/sameepkulkarni (>300 videos)
http://en.wikipedia.org/wiki/Sameep_Kulkarni
http://www.wix.com/sameepkulkarni/sameepkulkarni

- मानुषी
Taxonomy upgrade extras: