ग्रेसची कविता

ग्रेसची अभिव्यक्तीची शैली ही शब्दसंपन्न , प्रतिमासंपन्न आहे. त्यात भाषेचं वैभव ठायी ठायी दिसून येतं. त्यांच्या प्रतिमा या उपमा आहेत का रूपक या भानगडीत न पडता त्या प्रतिमा म्हणून स्वीकारल्या तर रसिकाच्या दृष्टीनं अधिक श्रेयस्कर ठरतं. ग्रेसच्या कवितेत झरा, आकाश, संध्याकाळ, दगड यांसारख्या प्रतिमा सतत आढळून येतात, पण त्यांचे संदर्भ कवितेनुसार बदलत जातात. त्यांचे अर्थ बदलत जातात.
ग्रेसच्या कवितांमधून एक अनाकलनीय दु:ख जाणवत रहातं. त्याच्या कवितेतल्या दु:ख आणि वेदना वाचकाच्या मनावर जखमा करून जातात.

border2.JPG

मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल,
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल...

ग्रे

स. आपल्या कवितेवर प्रचंड विश्वास असलेला आणि त्यामुळेच दुसर्‍यांच्या टीकेने जराही विचलित न होता त्या कवितेची कास न सोडणारा कवी. ग्रेसची कविता म्हटलं की बरेच लोक एकतर दुर्बोध काव्य म्हणून त्याच्यापासून दूर तरी पळतात, नाहीतर 'छे! हे काय काव्य आहे!' असं म्हणून नावं तरी ठेवतात. पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना ग्रेस मनापासून आवडतो. आता 'का?' असा प्रश्न विचारला तर उत्तरंही बरीच निरनिराळी येतात. काही म्हणतात, त्यात फार गहन अर्थ असतो; काही लोक म्हणतात त्यात वेगळ्या शब्दांचा वापर असतो; तर काही असे लोकही मला भेटले आहेत जे म्हणतात की मला ग्रेस कळत नाहीत म्हणून आवडतात.

मग मीही विचार केला की मला ग्रेसच्या कवितेत काय आवडतं? मुळात, मला ग्रेसची कविता खरंच आवडते का? याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे. तरीही, ग्रेसच्या कवितेबद्दल मला काय काय वाटतं हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच.

तसे ग्रेसवर दुर्बोध कवी, आत्ममग्न कवी असे बरेच आरोप झाले आहेत. पण मग ग्रेस खरंच दुर्बोध आहे का? माझ्यामते आहे. ग्रेस आत्ममग्न कवी आहे का? बहुधा आहे. त्याच्या बर्‍याचशा कविता याला खतपाणी घालतात. पण मग काव्य दुर्बोध असणं आणि कवीचं आत्ममग्न असणं त्या कवीला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ बनवतात का? खचितच नाही. मग ग्रेसच्या कवितेत असं काय आहे जे या कवीला श्रेष्ठ ठरवतं? त्याचे शब्द आणि प्रतिमा, त्यांचे पैलू, त्यांची गुंफण हे तर आहेच; पण माझ्या मते ग्रेसची कविता वेगळी ठरते ती त्या कवितेच्या नजरेमुळे.

ग्रेसची कविता वाचताना बर्‍याचदा पहिल्या काही वाचनांमध्ये फक्त शब्दच देऊन जाते. उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांची 'निष्पर्ण तरूंची राई' ही कविता आणि त्यातल्या विशेषत: या ओळी -

ते झरे चंद्रसजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

पहिल्या वाचनात या ओळींचा अर्थ खरंच कळतो का? तर नाही. या ओळी वाचताना नकळत दाद निघून जाते ती त्या शब्दांना. त्यांतल्या अर्थाला नाही. मग आपण या शब्दांवर विचार करायला लागतो. त्यांतल्या प्रतिमा आपल्यासमोर उभ्या राहायला लागतात. आपण विचार करायला लागतो की बहुधा कवी कलत्या संध्याकाळचं वर्णन करत असावा. क्षितिजावर भगवा प्रकाश पसरला आहे, आकाशात धरतीचा साजण चंद्र उगवला आहे, वगैरे वगैरे..

छे! काहीतरी चुकतंय...
मग परत आपण त्या शब्दांकडे वळतो. कवितेच्या पहिल्या कडव्याचा आधार घेतो...

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

अरे हो की, कवी तर आयुष्याच्या संध्याकाळच्या आपल्या मनःस्थितीचं वर्णन करतोय. एकीकडे विरक्ती त्याला खुणावत आहे, पण विरक्तीची कल्पना त्याच्या मनात एक अनामिक भीती उत्पन्न करते आहे आणि मग त्याला त्याच्या आईच्या आठवणी व्याकूळ करून सोडताहेत.

मग आपल्या समोर एक वेगळा अर्थ उभा राहायला लागतो...

ते झरे चंद्र सजणांचे ... इथे चंद्र हा झर्‍याचा साजण आहे. त्यांची भेट मात्र कधीच होत नाही आणि मग झर्‍याला फक्त चंद्रकिरणांचाच आधार आहे तसंच माझं आणि माझ्या आईचं नातं झालं आहे आणि आता तिच्या आठवणीच माझ्या सोबतीस आहेत. आणि कदाचित माझ्यासाठी बंधन ठरताहेत.

ती धरती भगवी माया
..

धरती किंवा आईची माया ही खरंतर नश्वर आहे पण तीच भगव्या रंगाचं म्हणजे विरक्तीचं रूप घेऊन आल्याने कवी कितीही बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू लागला तरी ही माया त्याला जखडून ठेवते आणि मग कवी म्हणतो,

झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया..

मृत्यूनंतर परत जीवन आणि परत मृत्यू या वर्तुळात आपण फिरत राहतो.

ग्रेसची कविता हा असा वाचकाच्या रसिकतेचा कस लावते. त्याला परत परत विचार करायला भाग पाडते की खरंच आपल्याला कविता कळली आहे का? की आपल्या नजरेतून काहीतरी सुटतंय? मला तर अजून वाटतंय की या कवितेत मला न कळलेलं बरंच काही आहे. कदाचित मी लावलेला या कवितेचा अर्थ हा पूर्णपणे चुकीचाही असेल. पण तरीही या कवितेने मला आनंद दिलाय. माझ्या बुद्धीला, रसिकतेला या कवितेने आव्हान दिलं आहे. कदाचित मला ते पेलता आलं नसेल. पण या हरण्यातही लढण्याचं, झगडण्याचं समाधान आहे.

ग्रेसच्या कवितेचं अभिव्यक्ती, आशयघनता आणि विषयनिष्ठा या गुणांवर मूल्यमापन करायचं झालंच तर ग्रेसची आत्मनिष्ठ किंवा आत्ममग्न कवी म्हणून प्रतिमा ठळक होते. ग्रेसच्या बर्‍याच कविता आत्मकेंद्रित किंवा मातृकेंद्रित आहेत. आणि तरीही त्याच्या कवितांमधून दिसणारी आई ही इतर कवींच्या कवितांमधून दिसणार्‍या आईपेक्षा फार वेगळी आहे.

उदाहरणादाखल त्यांच्या या दोन वेगळ्या कवितांमधल्या ओळी बघा -

ते चंद्रगंध विटले चोळी दुधात भिजली
पाठीत वाकतांना आई गळ्यात हसली
आभाळ सावल्यांचे झाले नदीत गोळा
आई घरी मुलांना वाटून दे उन्हाळा
देशी कुण्या विदेशी भुलली कळे न सांज
आई निजे दुपारी उलटी करून शेज

-----------------------------

आडवाच झोपलो असतो
मीही गर्भाशयात तर
येऊ दिले असते का
तुझ्या वाटेला माऊलीचे भाग्यपण?

-----------------------------

या दोन्ही कवितांमध्ये इतर कवींच्या कवितांमध्ये आढळणारं पवित्र नातं दिसून येत नाही. त्यांत प्रेम, जिव्हाळा, माया आहे, तरी ते भव्यदिव्य नाही. ते रोखठोक आहे. किंबहुना हाच ग्रेसच्या कवितेचा स्थायीभाव आहे. ग्रेसच्या इतर कविताही अशाच रोखठोक आहेत, सत्यवादी आहेत. त्यात कधीही तडजोड झालेली दिसत नाही.

ग्रेसची अभिव्यक्तीची शैली ही शब्दसंपन्न, प्रतिमासंपन्न आहे. त्यात भाषेचं वैभव ठायीठायी दिसून येतं. त्याच्या प्रतिमा या उपमा आहेत का रूपक या भानगडीत न पडता त्या प्रतिमा म्हणून स्वीकारल्या तर रसिकाच्या दृष्टीनं अधिक श्रेयस्कर ठरतं. ग्रेसच्या कवितेत झरा, आकाश, संध्याकाळ, दगड यांसारख्या प्रतिमा सतत आढळून येतात, पण त्यांचे संदर्भ कवितेनुसार बदलत जातात. त्यांचे अर्थ बदलत जातात. ग्रेसच्या कवितांमधून एक अनाकलनीय दु:ख जाणवत राहतं. त्याच्या कवितेतलं दु:ख आणि वेदना वाचकाच्या मनावर जखमा करून जातात.

ग्रेस म्हणतो,
त्या दु:खाची नजर मिटविता
बुबुळांमधला उडतो पारा
मनात तडकून पडतो उघडा
नक्षत्रांचा शिल्पपिसारा

पण या दु:खाचं कारण मात्र रसिकाच्या समोर दार किलकिलं करूनच उभ राहतं. ते सताड उघडं कधीच पडत नाही. ग्रेसची कविता त्या दु:खाबरोबर जगायला सांगते. सुखाची वाट पाहणं हेही तिच्या अंगी नाहीये.

पाऊसपाखरे जेव्हां
देशांतर करुनी येतिल
मग असे सुखाचे सजणे
मेंदूहुन रंगित खोल

ग्रेसच्या कवितेतली आशयघनता ही माझ्या मते पूर्णपणे चाहत्यांच्या रसिकतेवर किंवा त्यांच्या ग्रेसच्या कवितेबद्दलच्या समजेवर अवलंबून आहे.

जाता जाता मला एका ब्लॉगवर वाचलेली मर्ढेकरांची एक ओळ आठवली. 'जर तुम्हांला कविता कळली नसेल तर ती तुमच्यासाठी नाहीये'. त्यामुळे जर का कुणाला ग्रेसची कविता कळत नसेल तर ती त्याच्यासाठी नाहीये, असं समजावं आणि त्या कवितेला किंवा स्वतःच्या बुद्धीला दोष न देता फक्त त्या कवितेतल्या शब्दांचा आनंद घ्यावा आणि पुढे जावं.

अजून एक मित्रत्त्वाचा सल्ला - ग्रेसची कविता कुणाकडूनही समजावून घेण्याचा प्रयत्न करू नका.
गुरूदेव म्हणतात,
'Take my wine in my own cup, friend,
It loses its wreath of foam when poured into that of others
'.

- देवा

Taxonomy upgrade extras: