श्री. तेजस मोडक

श्री. तेजस मोडक हे भारतातले अग्रगण्य ग्राफिक नॉव्हेलिस्ट व चित्रकार आहेत. २००८ साली प्रसिद्ध झालेल्या 'प्रायव्हेट-आय अनॉनिमस - द आर्ट गॅलरी केस' या त्यांच्या पहिल्या ग्राफिक नॉव्हेलाला वाचकांनी, रसिकांनी भरपूर दाद दिली. पेंग्विन व आकृती पब्लिकेशनातर्फे लवकरच त्यांची दोन ग्राफिक नॉव्हेलं प्रसिद्ध होत आहेत. हिन्दुस्तान टाइम्स, द टाइम्स ऑफ इंडिया यांसारख्या अनेक नामांकित वृत्तपत्रांसाठी, प्रकाशनांसाठी त्यांनी चित्रं रेखाटली आहेत. २००९ साली 'कॉस्च्यूम्स' या त्यांच्या कार्टूनमालिकेला अठराव्या दीजेआँ आंतरराष्ट्रीय कार्टून स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं होतं.

border2.JPG

Tejas_Modak.jpg

ग्रा

फिक नॉव्हेल म्हणजे नक्की काय, असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. ग्राफिक नॉव्हेल हे कॉमिकबुकापेक्षा खरं तर खूप वेगळं नाही. अनेक वर्षांपूर्वीपासून पाश्चिमात्य देशांत कॉमिकबुकं लोकप्रिय आहेतच. मात्र एक वेळ अशी आली होती की, कॉमिकबुकं फक्त लहान मुलांसाठीच आहेत, असा समज तयार झाला. त्याचा परिणाम असा झाला की, एक बराच मोठा वाचकवर्ग कॉमिकबुकांपासून लांब राहू लागला. त्यामुळे कॉमिकबुकांचा विकास खुंटल्यासारखा झाला. या व्यवसायाला एक पठारावस्था प्राप्त झाली. जी मंडळी मोठ्यांसाठीच्या गोष्टी मोठ्यांसाठीच्या कॉमिकबुकांमध्ये लिहीत होती, त्यांच्यासमोर मोठाच प्रश्न उभा राहिला. प्रकाशकांच्या व्यवसाय चालावा, आपली पुस्तकं विकली जावीत, वाचकांनी ती वाचावीत, म्हणून या लेखक-चित्रकारांनी मग मोठ्यांसाठीच्या कॉमिकबुकांना ग्राफिक नॉव्हेल असं नाव दिलं. हे नवीन नाव मिळाल्यानंतर मग या मोठ्यांच्या कॉमिकबुकांच्या स्वरुपात काही बदल झाले. छोट्यांची कॉमिकबुकं जरा जास्त रंगीबेरंगी असायची. ग्राफिक नॉव्हेलांत जरा सौम्य रंग वापरले जाऊ लागले. पानांची सजावट मोठ्यांच्या अभिरुचीला धरून असे. मजकूरही लहानांसाठी नसायचा. तसं पाहायला गेलं तर चित्र आणि लेखनाचा एकत्रित वापर हजारो वर्षांपूर्वीच्या भित्तिचित्रांत आढळतो. पण या माध्यमाचं आजचं स्वरूप जे आहे, त्याची परंपरा फार प्राचीन नव्हे.

ग्राफिक नॉव्हेल हे माध्यम मला लेखन आणि चित्रकला या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी वापरायची संधी देतं. मला लहानपणापासून कॉमिक्स वाचायचं वेड होतं. पुढे त्या वेडानं पूर्णपणे झपाटून टाकलं आणि कॉलेजातच ठरवलं की आपण ह्या क्षेत्रात काम करायचं.

प्रायव्हेट-आय अनॉनिमस ही व्यक्तिरेखा मला अभिनव कला महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असताना सुचली. उत्तीर्ण झाल्यावर एक वर्षभर या व्यक्तिरेखेच्या ग्राफिक नॉव्हेलावर काम केलं आणि २००८ साली ऑक्टोबरमध्ये वेस्टलॅण्ड बूक्स या प्रकाशकांनी हे पुस्तक बाजारात आणलं.

pvt_eyeanon.jpg

या माध्यमात गोष्ट सांगायचं काम चित्र आणि शब्द ही दोन्ही अंगं बरोबरीनं करत असतात. कथेतला कोणता भाग चित्रांवर सोपवायचा आणि कोणता शब्दांवर, हे ठरवावं लागतं. स्वर आणि सूर जसे एकत्र आले की गाणं तयार होतं, तसंच शब्द आणि चित्र एकत्र आले की तयार होतं एक ग्राफिक नॉव्हेल! तर चित्रं आणि शब्द यांचा वापर अचूक कसा करायचा, याचं भान ठेवावं लागतं. कथा लिहितानाच मी चित्रं कुठे आणि कशी वापरायची, याची नोंद करतो. शक्य असलं तर लगेच एखादं छोटं चित्रही शेजारी काढून ठेवतो, कारण ग्राफिक नॉव्हेलांमध्ये शब्दांचा अतिरिक्त वापर टाळायचा असतो. उदाहरणार्थ, 'तो तिकडे गेला', असं वाक्यही लिहायचं, आणि तो तिकडे गेलेला दाखवायचासुद्धा, याला काही अर्थ नाही. माझ्या पुस्तकांबाबत बोलायचं झालं तर प्रायव्हेट-आय अनॉनिमस - द आर्ट गॅलरी केस ही एक विनोदी हेरकथा आहे. हेरकथेचे दोन महत्त्वाचे घटक असतात - कथानक आणि वातावरण. म्हणजे गुन्हा कुठे झाला आणि कसा झाला, हे महत्त्वाचे भाग असतात. माझ्या पुस्तकात कथा पुढे सरकवण्याचं काम शब्द करतात आणि वातावरणनिर्मिती होते चित्रांमुळे.

माझं अजून एक पुस्तक लवकरच प्रसिद्ध होतं आहे. चेतन जोशी या माझ्या मित्राबरोबर मी ते केलं आहे. २००६ साली त्याचं ब्लाइंड मॅन्स ब्लफ नावाचं लघुकथांचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यात एकूण पंचवीस लघुकथा आहेत. त्यांपैकी चार कथा या प्राण्यांच्या आहेत. या कथांमध्ये दृश्यात्मकता भरपूर आहे, असं आम्हां दोघांनाही वाटलं, आणि या कथांचं ग्राफिक नॉव्हेलीकरण करावं, असा विचार डोक्यात आला. मी मग या कथांवर काम केलं, आणि बंगळुरूच्या आकृती पब्लिकेशनातर्फे हे ग्राफिक बूक आता या महिन्यात प्रकाशित होईल. या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे या रुपककथा नाहीत. आपल्याकडे प्राण्यांच्या कथा या मुख्यत्वे कुठलातरी संदेश देण्यासाठी रचल्या जातात. या कथा मात्र असा काही संदेश देत नाहीत. या कथांपैकी एक प्रेमकथा आहे, एक गूढकथा आहे. या वेगळेपणामुळे मला या ग्राफिक बुकात बरेच प्रयोग करता आले. प्रत्येक कथेत मी वेगळेपण राखण्याच्या प्रयत्न केला आहे. प्रत्येक कथेच्या चित्रांची शैली वेगळी आहे. एका कथेची चित्रं मी फक्त वॉटरकलरमध्ये केली आहेत. एका कथेत फक्त पेन्सिल वापरली आहे. ही चित्रं करताना त्यामुळे खूप मजा आली. या चार वेगवेगळ्या कथा आणि वेगवेगळी चित्रं, यांमुळे या पुस्तकाला आम्ही अ‍ॅनिमल पॅलेट असं नाव दिलं आहे.

animal_palette.jpg

या क्षेत्रात खूप काही करण्यासारखं आहे. मुद्रण तंत्रज्ञानात झालेली प्रगती आता तुम्हांला वाट्टेल ते प्रयोग करण्याची मुभाही देते. वेगवेगळे विषय अतिशय कल्पकतेनं या माध्यमात हाताळले जाऊ शकतात. माणूस दृश्यांनी, चित्रांनी, रंगांनी आकर्षित होतो. कदाचित म्हणूनच आजकाल पुस्तक वाचणार्‍यांपेक्षा टीव्ही पाहणारी मंडळी अधिक. एक नेहमीची तक्रार पालक करतात की, मुलं वाचन करत नाहीत. पण पुस्तकांमध्येही चित्रं असली, रंग असले, तर नक्कीच वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होऊ शकते, आणि हे फक्त लहान मुलांपुरतंच मर्यादित नाहीये, कारण ग्राफिक नॉव्हेलं आजकाल मुख्यत: मोठ्यांसाठीच तयार केली जातात.

मला या माध्यमाद्वारे खूप गोष्टी सांगायच्या आहेत. चित्र आणि लेखन एकत्र करून एक अतिशय वेगळा आणि नवीन अनुभव वाचकांना द्यायचा आहे. ग्राफिक नॉव्हेलांना एक अंग (चित्राचं) सामान्य पुस्तकांपेक्षा जास्त असतं. गोष्ट सांगण्यात त्याचा योग्य त्या प्रकारे वापर कसा होईल ह्या शोधात मी कायम असतो. केवळ चित्रं काढायला आवडतात म्हणून माझ्या पुस्तकात चित्रं असण्यापेक्षा खरंच माझ्या गोष्टीला चित्रं पूरक असायला हवीत, हे ध्यानी धरून मी लेखन करतो. ग्राफिक नॉव्हेलांमध्ये तुमच्या लेखनात दृश्यात्मकता असायला हवी, म्हणजेच तुम्ही लिहिलेलं कथानक हे चित्रांना वाव देणारं असलं पाहिजे.

लेखन आणि चित्रकला या दोन्ही क्षेत्रांतल्या अनेक लोकांच्या कामाचा माझ्यावर प्रभाव पडला, अजून पडतो. दोन्ही क्षेत्रांत इतकं प्रचंड आणि अफाट काम केलं गेलंय की, इथे मानसगुरूंची कमतरता नाही. पुलं, वपु इत्यादी दिग्गज मंडळी मराठी मनावर राज्य करतातच, पण कधीतरी असंही होतं की कोण्या अनोळखी व्यक्तीनं लिहिलेली एखादी कविता, एखादा लेख मनावर ठसा उमटवून जातो. इंग्रजीचीही तीच बात. वूडहाऊससारखे लोक भारावून टाकतातच, पण एखाद्या रद्दीच्या दुकानाच्या दौर्‍यात एखाद्या अनामिक व्यक्तीनं असं काही लिहिलेलं सापडतं की ते पुस्तक तुमच्या संग्रहातली अजून एक पोथी होऊन जातं. असंख्य लोकांचं काम पाहून मी शिकलो आहे आणि अजूनही शिकतोच आहे. वॅन गॉ मला प्रचंड आवडतो. याशिवाय एक महत्त्वाचा उल्लेख करावासा वाटतो तो आपल्या अमर चित्र कथा या मालिकेचा. या पुस्तकांत चित्र काढणारे प्रताप मुळीक आणि राम वाईरकर हे दोन चित्रकार माझे अतिशय आवडते. गिपी, जोआन स्फार, क्रिस्तोफ ब्लेन आणि योशिताका आमानो या ग्राफिक नॉव्हेलिस्टांचं काम मला खूप आवडतं. माझ्या लहानपणापासून मी अ‍ॅस्टेरिक्स, टिनटिन, ओबेलिक्स यांचा चाहता आहे. ही सगळी कॉमिकबुकं माझ्या संग्रहात आहेत. मी ग्राफिक नॉव्हेलिस्ट होण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. हल्ली इंटरनेटामुळं जगभरातली कला तुम्हांला बसल्या जागी पाहता येते. आपल्याला नावही माहीत नसलेल्या कलावंतांची कला आपल्या समोर पडद्यावर असते, आणि त्यातून बरंच नवीन शिकता येतं. मात्र प्रभाव पडला तरी छाप पडू नये, हा एक छोटासा प्रयत्न मी सतत करत असतो.

या क्षेत्रात मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. एवढंच म्हणू शकेन की एखाद्याला चित्रकलेची, लेखनाची, गायनाची आवड असली तर योग्य तिथून आणि योग्य तितकं प्रोत्साहन मिळणं अतिशय महत्त्वाचं. उद्याचा एखादा वॉल्ट डिझ्ने आई-बाबांच्या आग्रहाखातर नेमका मेडिकलला गेला म्हणून जग त्याच्या उत्कृष्ट कलाकृतीला मुकलं, असं होऊ नये एवढी खबरदारी घ्यायला हवी...

- चिनूक्स