स्थापत्य कशाला म्हणतात हो भाऊ?

आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण स्थापत्याशी निगडीत असतो. आपला जन्म सूतिकागृहात होतो, वास्तव्य घर वा अपार्टमेंटमध्ये, शिक्षण शाळा-कॉलेज वास्तूंत आणि वसतिगृहांत होतं. पुढे काम, करमणूक, बास्केटबॉलसारखे खेळ वास्तूंच्या छपराखाली चालतात. अस्वास्थ्य घालवण्यासाठी आपण शुश्रुषागृहात जातो. तर स्वास्थ्य लाभावं म्हणून विश्रांतिधामात आणि शेवटी दहनगृहात वा दफनगृहात!

border2.JPG

का अमेरिकन माणसानं मला एकदा विचारलं, “तू आर्किटेक्चर आहेस का?” अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात स्थापत्य (आर्किटेक्चर) आणि स्थपती (आर्किटेक्ट) यांत गल्लत करणारी माणसं आहेत याचं मला आश्चर्य वाटलं. पण मी जेव्हा अकरावीनंतर मुंबईला जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चरला गेलो तेव्हा मलाही स्थापत्य म्हणजे काय ते तितकंसं ठाऊक नव्हतं. जे.जे.मध्ये पहिल्याच दिवशी प्रि. रुबेननं सांगितलं की स्थापत्य सर्व कलांची माता आहे आणि त्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी बाराखडी घोटण्यापासून होणार आहे. दुसर्‍या दिवसापासून ए, बी, सी ते झेड अशा प्रत्येक अक्षराच्या वेलांट्यांच्या त्रिज्यांसकट ड्रॉईंगला प्रारंभ झाला.

page11.jpg

वर्षाअखेर या आणि इतर ड्रॉईंग्जवर रुबेनने सह्या केल्यावर त्याच्या पट्टेवाल्यानं एका जंबियावजा दाभणाने ती भोसकून टाकली; दुसर्‍या कोणी स्वतःची म्हणून दाखल करू नये म्हणून! नंतर प्रा. विजयकरांनी ठोकळ्याचं परस्पेक्टिव्ह कसं काढायचं, सूर्यकिरणांच्या कोनाप्रमाणे त्याच्या सावल्या कशा रंगवायच्या ते शिकवलं.

page12.jpg

त्यामागोमाग सुरु झाला ग्रीक खांबांचा अभ्यास. त्यातील कॉरिंथिअन खांबाच्या ऊर्ध्वदर्शनाच्या ड्रॉईंगनं मला हैराण केलं होतं. त्या खांबांचं मस्तक खालून वर पाहता कसं दिसेल याचं चित्र मला काही केल्या लक्षात येईना. पुढे वास्तुरचनेच्या ड्रॉइंग्जमध्ये प्रत्येक दालनाचे ऊर्ध्वदर्शन (रिफ्लेक्टेड सीलिंग प्लॅन) काढताना या ज्ञानाचा उपयोग झाला.

greek.jpg
ग्रीक ऑर्डर्स

page13.jpg
कॉरिंथिअन कॅपिटल ऊर्ध्वदर्शन
(Reflected Plan)

या सगळ्याचा स्थापत्याशी काय संबंध आहे ते मात्र कळत नव्हतं. त्या भरीला फिजिक्स, केमिस्ट्री, अलजिब्रा, इतिहास हे विषय डोकं आणि वेळ खात होते. कारण आता ते इंग्रजीतून शिकावं लागत होतं. मग हळूहळू कुठे बसचा थांबा, कधी बॅन्डस्टॅन्ड असे डिझाइन प्रॉजेक्ट शिकलो. त्याबरोबर स्ट्रक्चर्स, मेकॅनिक्स, सॉलिड जिऑमेट्री, स्थापत्याचा इतिहास असे विषय भंडावू लागले.

माझ्या सुदैवानं झालेझर ऊर्फ जाल गोभाई नावाचे आर्किटेक्ट मला डिझाइन शिकवायला आले. माझं डिझाइन ड्रॉइंग पाहून त्यानी मनातच एक उसासा टाकला असावा. पण उघडपणे म्हणाले, “माटे, मी तुझा क्लायंट आहे असं समज. माझे विचार म्हणजे या प्रॉजेक्टचा प्रोग्रॅम नीट समजून घे. माझ्या या रचनाप्रकल्पात तुझ्यासारख्या स्थपतीकडून काय अपेक्षा आहेत हे लक्षात घे. माझ्या गरजा अंतर्भूत करून तुझी कल्पना आणि विचारशक्ती वापरून तू माझ्यासाठी काय रचना निर्माण करू शकशील ते मला बघायचं आहे”. (पुढे गोभाईंकडे काम करू लागल्यावर त्यांच्या सांगण्यावरून मी त्यांना 'जाल' म्हणू लागलो.) जाल कधी अमेरिकेत गेला नसला तरी फ्रॅंक लॉइड राईट यांना गुरु मानत असे. मग तो स्थापत्यातील काव्याविषयी बोलू लागला. मी लायब्ररीत जाऊन राईटची पुस्तकं वाचू लागलो.

राईटचे फॉलिंग वॉटर, जमिनीशी सेंद्रिय नातं

राईटचे फॉलिंग वॉटर, जमिनीशी सेंद्रिय नातं

त्याचे विचार, अमेरिकन प्रेअरीवरील सेंद्रिय नात्यानं घडवलेली त्याची कामं, विशेषतः पिट्सबर्गजवळच्या फॉलिंग वॉटरबद्दल वाचून मी भारावून गेलो. (ते पुढे प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा तर एक यात्रा पुरी झाल्यासारखं वाटलं.) प्रेअरी किंवा इतर कोणत्याही जमिनीतून स्थापत्य नैसर्गिकपणे वर आलं पाहिजे असं राईट म्हणत असे. नजर पोहोचेल तेथवर, क्षितिजापर्यंत पसरलेल्या प्रेअरीतून राईटनं जमिनीशी समांतर रेघांची प्रेरणा घेतली. त्यानं डिझाईन केलेली प्रेअरीतील घरं, जॉन्सन कंपनीचं कार्यालय, त्याचे टॅलिझेन, विस्कॉन्सिन व टॅलिझेन, अ‍ॅरिझोना हे आश्रम, ते फॉलिंग वॉटरपर्यंत राईटच्या कामाचं ते एक गमक बनलं. फॉलिंग वॉटर आणि अ‍ॅरिझोना टॅलिझेन या वास्तूंत त्यानं वास्तूखालील खडकच बांधकामात वापरला. टॅलिझेनचं छप्पर तर कॅनव्हासचं आहे. तेथील आश्रमवासी उन्हाळ्यात विस्कॉन्सिनला जात. त्यामुळे असं छप्पर सह्य झालं.

250px-Guggenheim_museum_exterior.jpg

याला अपवाद म्हणजे मळसूत्रासारखी रचना असलेली त्याची न्यूयॉर्कची गगन्हाईम गॅलरी. त्या शहरामधील त्याचं एकमेव काम. अहंभाव आणि विक्षिप्तपणा यात राईटचा हात धरणारा कोणी नसेल. वार्ताहरांनी त्याला या वेगळया डिझाईनबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, 'न्यूयॉर्कवर बाँब पडला तर ही एकच इमारत शिल्लक राहील.'

त्यानंतर रिचर्ड नॉइट्रा, मीज व्हॅन ड रो, कार्बुझिए इत्यादी आर्किटेक्ट्सची पुस्तकं वाचली.

नॉइट्रा
नॉइट्रा

मी नॉइट्राकडून अवकाशाची बचत आणि स्थापत्याचं जमिनीशी नातं शिकलो. भूमध्यसामुद्रिक हवा असलेलं लॉस एंजेलिस ही मुख्यत्त्वे नॉईट्राची कर्मभूमी होती. सरकत्या दारांचा उपयोग करून वास्तूच्या आतील अवकाश व बाहेरील अवकाश यातील भिंतच त्याने अक्षरशः दूर केली. शाळेचा वर्ग असो वा घराची बेडरूम, त्याने 'आत' आणि 'बाहेर' यातील अंतर नाहीसं केलं.

मीज, बार्सेलोना पॅव्हिलिअन, 'कमी तितकं जास्त'
मीज, बार्सेलोना पॅव्हिलिअन, 'कमी तितकं जास्त'

मीजकडून 'कमी तेच जास्त' (less is more) हे तत्त्व म्हणजे वास्तूवरील दागिने काढून टाकणं, तिच्या घटकांचं एकमेकांशी स्वच्छ नातं राखणं या गोष्टी शिकायला मिळाल्या. तपशिलात देव आहे (God is in detail) हे मीजचं आवडतं बोधवाक्य.

कार्बू-रोशां चॅपेल

कार्बूकडून स्थापत्याचं मानवी शरीराशी नातं, वास्तूतील शिल्प या गोष्टी मी शिकलो. मीजनं स्थापत्याचा पोशाख त्रिमितीतून द्विमितीत आणला. थोडी अतिशयोक्ती करून असं म्हणता येईल की, त्यानं उंच इमारतींचा पोशाख कागदाच्या जाडीचा (पेपर थिन) केला. याबाबत स्थपती फिलिप जॉन्सन त्याचा पट्टशिष्य. (त्यानं एकदा लॉस एंजेलिसच्या एका व्याख्यानात स्वतःचा उल्लेख 'वास्तुशिंपी' असा केला होता). याउलट कार्बूनं या पोशाखाला आणि गवाक्षांना जाडी आणि खोली दिली. त्याच्या कामात वास्तूअवकाश आणि पोशाख वेगळे न राहता मानवी शरीर आणि त्वचा जसे वेगळे करता येत नाहीत तसे एकजीव होऊन, त्याची कामं म्हणजे जीवनानं रसरसलेली शिल्पं झाली. उपमा द्यायची झाली तर सुईसारखी सडपातळ यौवना ही मीजची स्त्री-सौंदर्याची कल्पना तर खजुराहोची नितंबिनी ही कार्बूची. मीजच्या उंच इमारतीच्या अंतरंगाला सूर्यप्रकाश न्हाऊ घालतो तर कार्बूच्या वास्तूंच्या अंतरंगात सूर्यप्रकाशाचे कमीजास्त रुंदीचे झोत आतील स्थापत्यघटकांतील, इतकंच नव्हे तर माणसांतील शिल्पं खुलवून दाखवतात. मीज निर्गुणाचा उपासक तर कार्बू सगुणाचा पुजारी.

page25.jpg
चंदीगढ

इंपीरिअल किंवा ब्रिटिश आणि मेट्रिक किंवा फ़्रेंच मापन पद्धतीऐवजी 'मॉड्युलर' ही मानवी शरीरावर आधारित मापनपद्धत त्यानं शोधून काढली. कार्बू चंदीगढचा प्रमुख स्थपती. तेथील वास्तुरचना मॉड्युलरवर आधारित आहे. 'मॉड्युलर'चा गौरव करणारे स्विस नाणे :

'मॉड्युलर'चा गौरव करणारे स्विस नाणे

कार्बूची जी थोडी कामं मी पाहिली, त्यात मॉड्युलर या मोजपट्टीमुळे फूट किंवा मीटर वापरून केलेल्या स्थापत्यापेक्षा काही वेगळा अनुभव आला नाही. पण मॉड्युलरसाठी त्यानं आधारभूत म्हणून वापरलेला ग्रीक 'सुवर्ण आयत' (Golden Rectangle) आणि त्यामुळे आलेली रचनेतील प्रमाणबद्धता मात्र खासकरून जाणवली.

सुवर्ण आयत
सुवर्ण आयत

कॉलेजमध्ये अभ्यासलेला आणखी एक आर्किटेक्ट म्हणजे ऑस्कर निमायर. न्यूयॉर्क यूनो संकुलावर कार्बूबरोबर काम केलेला हा आर्किटेक्ट आज एकशेदोन वर्षांचा असून ब्राझीलवासियांच्या गळ्यातील ताईत आहे. तरी एकेकाळी तो कम्युनिस्ट म्हणून फ्रान्समध्ये परागंदा झाला होता. ब्रासिलिया ही राजधानी त्याचं स्मारक म्हणून ओळखली जाईल.

ब्राझिलियन नॅशनल कॉंग्रेस, ब्रासिलिया, ऑस्कर निमायर
ब्राझिलियन नॅशनल कॉंग्रेस, ब्रासिलिया, ऑस्कर निमायर

निमायरने सिमेंट काँक्रीटच्या लवचिकपणाचा उपयोग करून जी आवासशिल्पं घडवली ती पाहताना सामान्यजन आणि श्रेष्ठी सारखेच स्तिमित होतात. त्याशिवाय त्याने रिओतील गरीब वस्त्यांच्या सुधारणेसाठीही प्रयत्न केले आहेत. त्यामुळे तो अलीकडील काळात सत्ताधीशांचा आणि रिओतील झोपडीवासियांचाही लाडका झाला आहे.

****

page43.jpg

भारतीय स्थापत्याचा इतिहासही कॉलेजात शिकलो. हडप्पा, हळेबीड, अजंठा, कार्ला तसेच मदुराईसारखी देवळं आणि नगररचना यांचा अभ्यास झाला. तुलनेनं पाहता ग्रीक व ईजिप्शियन स्थापत्याप्रमाणे भारतीय गुहांच्या अश्मस्थापत्यांतही लाकडी रचनेचा प्रभाव दिसतो. इटलीत रोमन लोकांनी ख्रिस्तपूर्व काळातच रिइन्फोर्सड काँक्रीटचा शोध लावला. खांब आणि तुळई यांच्या बंधनातून दगडी कमानीनं स्थापत्याची सुटका केली. कमानीच्या वर मधोमध असलेल्या किल्ली दगडाने ('की' स्टोन) वरील वजन बाजूच्या भिंतीवर वा खांबावर पोहोचवायची सोय केल्यानं कमानींनी मोठी अंतरं वेष्टित करणारी अवकाश अवगुंठनं निर्माण करता येऊ लागली. ही कमान तिच्या किल्ली-दगडाच्या अक्षाभोवती फिरवून रोमनांनी घुमट बांधला. घुमटावरून येणार्‍या वजनानं आधार देणार्‍या भिंती वा खांब बाहेर ढकलले जाऊ नयेत, म्हणून घुमटाच्या उड्डाण पातळीवर (Spring Line) त्यानी लोखंडी सळया घातल्या.

पॅन्थिआन‚रोम‚ अंदाजे इ. स. १००
पॅन्थिआन‚रोम‚ अंदाजे इ. स. १००

ही कला भारतात अवगत नसल्यानं देवळांच्या रचनेत चौकोनी खोलीच्या कोपर्‍यांवर चार तुळया ठेवून अष्टकोन करणं, पुन्हा त्याच्या कोपर्‍यांवर तुळया ठेवत जाणं असं करत शिखर बांधणं क्रमप्राप्त झालं. त्यामुळे मुघलांकडून गोल घुमट बांधला जाईपर्यंत भारतात मोठ्या व्यासाची वा रुंदीची दालनं बांधता येत नव्हती.

गोल घुमट
गोल घुमट

गॉथिक स्थापत्यांतील उडत्या कमानी
गॉथिक स्थापत्यांतील उडत्या कमानी (Flying Arches)

नॉत्र दाम या पॅरिसमधील चर्चच्या बाहेरील भिंती सावरून धरण्यासाठी या फ्लाईंग आर्चेसचा सुंदर उपयोग केला आहे. कमानीचं खरं वैभव दिसतं ते पंखकमानीतून निर्माण केलेल्या छतांमध्ये.

पंख्याचे घुमट (Fan Vault).
पंख्याचे घुमट (Fan Vault). यांनी माणसाला जणू पंखच बहाल केले.

जॉन्सन आणि जॉन्सन वास्तूतील 'मश्रूम खांब
राईटच्या जॉन्सन आणि जॉन्सन वास्तूतील 'मश्रूम खांबां'चे फॅन व्हॉल्ट छताशी साधर्म्य.

मध्ययुगात युरोपमध्येही स्थापत्याच्या बहिरंगावर शिल्पांची रेलचेल असे. पण त्या अवगुंठनात विस्तृत अवकाश बांधलेलं असे.

शिल्पालंकृत डुओमो, फ्लॉरेन्स
शिल्पालंकृत डुओमो, फ्लॉरेन्स.

page56.jpg
मीनाक्षी मंदीर

ऐतिहासिक भारतीय देवळांच्या भिंतीवर शिल्प आणि रंग यांची जणू उधळण झालेली असते. मंदिरात खांबांची भाऊगर्दी असते. परंतु मध्ययुगीन कॅथीड्रलच्या आतील भव्यता मात्र नसते. मुघल काळापर्यंत भारतात भव्य अवकाश अवगुंठित करणारं स्थापत्य अभावानंच होतं. वास्तुशास्त्रप्रणित ऐतिहासिक नगररचना मात्र वाखाणण्यासारखी होती. मदुराई हे उदाहरण देता येईल.

***

योग असा की स्थापत्याच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात जाल मला दोन वर्षं शिक्षक म्हणून लाभला आणि त्याच्याकडे मी तीन वर्षे कामही केलं. त्यानं साधून दिलेल्या ओळखीनं मी अमेरिकेत आलो. अमेरिकेतील विद्यापीठात आणि पुढे कचेर्‍यांतून मला गुरूंकडून उत्तम मार्गदर्शन मिळालं. पण जाल मला भेटला नसता तर स्थापत्यसागराच्या किनार्‍यावरच मी डुबकत राहिलो असतो. स्थापत्यात जी काही जाणकारी मला मिळाली त्याचं कारण जालचं सुरुवातीचं मार्गदर्शन.

आपण प्रेयसीवर जितकं प्रेम करू, तितकं तिचं अंतःकरण जास्त समजत जातं, तसंच स्थापत्यकलेचंही आहे. ती चित्रकला आणि शिल्प यांचं आश्रयस्थान तर आहेच पण स्थापत्य वसतिशिल्प आहे. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण स्थापत्याशी निगडीत असतो. आपला जन्म सूतिकागृहात होतो, वास्तव्य घर वा अपार्टमेंटमध्ये, शिक्षण शाळा-कॉलेज वास्तूंत आणि वसतिगृहांत होतं. पुढे काम, करमणूक, बास्केटबॉलसारखे खेळ वास्तूंच्या छपराखाली चालतात. अस्वास्थ्य घालवण्यासाठी आपण शुश्रुषागृहात जातो. तर स्वास्थ्य लाभावं म्हणून विश्रांतिधामात आणि शेवटी दहनगृहात वा दफनगृहात! पण चहाची टपरी आणि जॅपनीज टी हाऊस यांत जसा फरक आहे, तद्वत प्रत्येक इमारत ही स्थापत्याचे उत्तम उदाहरण असेलच असे नाही.

इतर क्षेत्रांप्रमाणे स्थापत्यात ज्ञान आणि विज्ञान आवश्यक असतात. विज्ञान अनेक गोष्टी शिकवतं: क्लायंटच्या गरजा आणि त्याच्या खर्चाचं अंदाजपत्रक, योग्य जमिनीची निवड आणि तिचं सर्वेक्षण, तिथली हवा, पाणी, वारे, बांधकामाचे घटक यांचा समन्वय, देशीय आणि स्थानिक बांधकामांचे कायदेकानू यांची दखल, गरजा आणि खर्चनिर्बंध यांवर आधारित वास्तुरचना, तसंच एखाद्या इमारतीची ड्रॉइंग्ज कशी करायची, तिची स्पेसिफिकेशन्स कशी लिहायची इत्यादी. थिएटर, स्टेडियम, उंच इमारती अशा वास्तूंच्या डिझाईन कालखंडांत सिव्हिल, स्ट्रक्चरल, मेकॅनिकल इंजिनिअर्स, लॅंडस्केप आर्किटेक्ट इत्यादी अनेक कन्सल्टंट आर्किटेक्टच्या अखत्यारीत असतात. त्यांची ड्रॉइंग्ज व स्पेसिफिकेशन्स यांचा एकमेकांशी आणि आर्किटेक्चरल कागदपत्रांशी समन्वय साधणं, त्यांच्याकडून वेळेवर सर्व साहित्य गोळा करून, तपासून बिडिंग वा टेंडरसाठी पाठवणं इत्यादी आर्किटेक्टनं कसं करावं, ते विज्ञान शिकवतं. बांधकाम आणि वेळापत्रक यांकडे लक्ष द्यायचं, कंत्राटदाराला काबूत ठेवून खर्च कसा आटोक्यात ठेवायचा, वास्तू पूर्ण झाल्यावर ती कार्यान्वित कशी करायची हेही विज्ञान शिकवतं. मग ज्ञान काय साधतं? विज्ञान, तर्क आणि विचार यांच्या खांद्यावरून भरारी घेऊन जेव्हा प्रतिभा आपसूकपणे निर्मिती करते, ती किमया ज्ञान साधत असतं.

ताजमहाल

सरकारमान्य गायक आणि लोकमान्य गायक यांत जसा मोठा फरक असतो, किंबहुना मोठ्या गायकाचा चांगला आणि अविस्मरणीय कार्यक्रम यांत जसा फरक असतो तसाच प्रकार स्थापत्यात आहे. क्लायंटच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे अनेक स्थपती आहेत. त्यांच्या वास्तूही देखण्या असतात. पण हृदयाला हात घालणारा जसा एखादाच अनवट राग असतो तद्वत स्थलकालाचं भान हरपवणारी वास्तूही विरळाच असते. ताजमहाल ही एक अशी दुर्मिळ वास्तू आहे. सोळाव्या शतकांत बांधलेल्या या वास्तूचं सौंदर्य प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय पुरतं कळत नाही.

अगदी अलीकडील 'अक्षरधाम' हे असंच वास्तुशिल्प आहे.

अक्षरधाम

सॅन्टिआगो कॅलट्राव्हा हा एक स्पॅनिश आर्किटेक्ट व इंजिनिअर एकामागून एक फार सुंदर प्रकल्प करत आहे. तो स्वतः एक उत्कृष्ट चित्रकार असून ऑपेरा सेट डिझायनरसुद्धा आहे.

कला शास्त्र नगर, व्हॅलेंशिया, स्पेन (कॅलट्राव्हा)
कला शास्त्र नगर, व्हॅलेंशिया, स्पेन (कॅलट्राव्हा)

त्याच्या कल्पनेच्या भरारीला त्याचं इंजिनिअरिंग कौशल्य साथीला असल्यानं मती गुंग करणारी अवकाश अवगुंठनं त्याच्या प्रतिभेतून निर्माण होत असतात. हे टेनरिफ नाट्यगृह. या नाट्यगृहाचं कॅलट्राव्हानं आधी छोटं शिल्प बनवलं होतं.

टेनरिफ नाट्यगृह
टेनरिफ नाट्यगृह

मिलवॉकी संग्रहालय. (कॅलट्राव्हा)
मिलवॉकी संग्रहालय. (कॅलट्राव्हा)
दक्षिणाभिमुखी भिंतीवरील झडपा पापण्यांसारख्या खालीवर होतात.

प्रत्येक माणसात एक बालसुलभ कुतुहल, आश्चर्यचकित होण्याची ऊर्मी आणि स्वप्नसृष्टीत रमण्याची आवड निदान सुप्त स्वरूपात असते. असं म्हणतात की, एका खडकात लपलेलं शिल्प साकार होण्यासाठी मिकलांजेलोच्या परीसछिन्नीची वाट पाहत होतं. तो स्पर्श झाला आणि 'डेव्हिड' हे शिल्प जन्माला आलं. आज शेकडो वर्षं लक्षावधी लोक त्याच्यापुढे उभे राहून स्तिमित होत असतात. काही वेळा जमिनीच्या एखाद्या तुकड्यावरील अवकाश त्यात लपलेलं स्थापत्य प्रकट होण्यासाठी अशाच किमयागार स्थपतीची वाट पाहत असतं.

मोबियस स्ट्रिप
'मोबियस स्ट्रिप' एक अनंतपट्टी असते. तिच्यावर चालणारी मुंगी पट्टीच्या कडा न ओलांडता एका पृष्ठभागावरून दुसर्‍या पृष्ठभागावर चालत राहते. एखादा राईट, नॉईट्रा, मीज, कार्बू, निमायर, कॅलट्राव्हा वा फ्रॅंक गेहरी जेव्हा अशी किमयाकृती घडवतो, तेव्हा एका त्रैमितिक 'मोबियस' घटनेत आपणही असेच गुंतून पडतो.

लू रुव्हो मेंदू चिकित्सोपचार केंद्र
लू रुव्हो मेंदू चिकित्सोपचार केंद्र, लास व्हेगास, स्थपती फ्रॅंक गेहरी

अल्झायमरसारख्या असाध्य रोगानं मेंदूची काय दैना होऊ शकते, संवेदना-गवाक्षांची शिडं असलेलं जहाज या रोगाच्या काळोख्या वादळात भ्रमिष्टतेच्या खडकावर आपटल्यावर काय होऊ शकतं आणि किनार्‍यावरील चिकित्सोपचारांचं प्रकाशघर शुभ्र प्रकाशात वाट कशी दाखवू शकेल, हे व्यक्त करण्यात स्थपती गेहरी विलक्षण यशस्वी झाला आहे. वास्तूचा हेतू स्थापत्यिक परिभाषेतून आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्या त्रैमितिक 'मोबियस'च्या किमयेनं आपलं कुतुहल वाढून आपण प्रथम चक्रावून जातो; मग पदोपदी आश्यर्यचकित होतो; आणि स्थपतीच्या साकारलेल्या स्वप्नांतून आपले मन आणि पाय निघत नाहीत.

लू रुव्हो मेंदू चिकित्सोपचार केंद्र

folded3.jpg

page36.jpg
स्मरणीय आणि स्फूर्तिदायक स्थापत्य हे प्रचंड आणि संस्मरणीय आकाराचंच असावं लागत नाही. एखादी अगदी छोटी वास्तूही तो परिणाम साधू शकते. शतकानुशतकं चालत आलेल्या परंपरेची जॅपनीज टी हाऊस किंवा चहाकुटीरं मनःशांतीची मंदिरंच असतात.

निसर्गपोषक स्थापत्याची निकड:

कमीत कमी ऊर्जेतून वास्तुनिर्मिती आणि वास्तूच्या आयुष्यात कमीत कमी ऊर्जेचा वापर हे या शतकातील मोठं आव्हान आहे. स्थपती हा एक नाटककार व दिग्दर्शक असतो. त्याच्या कल्पना प्रत्यक्षात यायला निर्मात्यांच्या भांडवलाची गरज असते. असा धनको निर्माता पर्यावरणप्रेमी असेल तरच स्थपती शून्यऊर्जा ध्येय असणारी वास्तू निर्माण करू शकतो. सुदैवानं तशी जाणीव असणार्‍या व ती बांधिलकी मानणार्‍या निर्मात्यांची संख्या वाढत आहे.


अनिकेत बागुल, निखिल बोरकर, रोहित चौधरी
शून्य ऊर्जा स्पर्धा, जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर
जे.जे. स्कूलमध्ये मी आयोजित केलेल्या शून्य ऊर्जा स्पर्धेतील एक विजेती संकल्पना. स्थानिक, कमी ऊर्जेत बनवलेले, पुनर्निर्मित आणि पुनरुपयोगी बांधकाम साहित्य, सौर आणि वायू शक्तीतून वीजनिर्मिती, पर्जन्यसंकलन, वापरलेल्या पाण्याचे संस्करण, नैसर्गिक वातानुकूलन इत्यादी अनेक घटकांचा विद्यार्थ्यांनी वापर केला होता
.

जागतिक ऊर्जाभक्षणात औद्योगिक आणि वाहतूक ऊर्जा उपयोगाखालोखाल इमारतींच्या बांधकामासाठी लागणारी आणि त्यांच्या आयुष्यातील वापरली जाणारी ऊर्जा यांचा क्रमांक लागतो. बुद्ध, ख्रिस्त, ज्ञानेश्वर आणि महात्मा गांधी यांनी मानवाचं निसर्गाशी अतूट नातं आहे, असं सांगितलं. स्थापत्यक्षेत्रात राईट, नॉईट्रा, मीज, कार्बू इत्यादींनी स्थापत्य, मानव आणि जमीनअवकाश यांच्यात एकात्मतेचं नातं आहे, असं सांगितलं. हे सेंद्रिय नातं जपण्यासाठी निसर्गपोषक स्थापत्याची चळवळ आता मूळ धरू पाहत आहे. पुढील पिढ्यांसाठी धरती अणि पर्यावरण यांची प्रकृती सुरक्षित राखायची असेल तर स्थापत्य आणि नगरनिर्मितीत 'शून्य उर्जा उपयोग' हे ध्येय ठेवणं क्रमप्राप्त आहे. कोणी म्हणेल की, हे फार उत्तुंग ध्येय आहे. पण ध्येय हे उत्तुंगच असावं लागतं. नाहीतर एरवी आपण सर्व खुजे राहू.

***

टीप: या लेखातील गेहरीच्या कामाची चित्रे लेखकाने घेतली आहेत. शून्य ऊर्जा चित्र विद्यार्थ्याचे आहे. बाकी चित्रे "विकिपीडिया"मधून घेतली आहेत.

- श्रीनिवास नी. माटे

Taxonomy upgrade extras: