विश्व सुगंधाचे

सुगंधनिर्माणकला व गंधविक्रीचे तंत्र हे दोन्ही अतिशय मोठ्या व विद्वान लोकांनी घडविलेले विषय आहेत. हे दोन मोठे प्राचीन प्रासाद आहेत असे कल्पिल्यास आपण आज फक्त दार किलकिले करून पाहणार आहोत. मी आहे तुमची राजू गाईड!

border2.JPG

पल्या आवडत्या कवितांच्या पुस्तकात लपवून ठेवलेला बकुळीचा सुकलेला गजरा, परदेशात आपले जीवन घडवत असताना मधूनच कधीतरी येणारी आईच्या पदराची हळवी आठवण, गावाकडे बसविलेल्या गणपतीची सुंदर पूजा व आरास, कॉलेजात असताना आसुसून भेटणार्‍या, पण आता विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या गोड, नाजूक प्रेयसीच्या 'इंटिमेट' नाहीतर 'ब्लू लेडीचा' जीवघेणा सुगंध - जो आजही कधीकधी कातरवेळेला मन अस्वस्थ करून सोडतो, दुपट्यात गुंडाळून नुकत्याच झोपविलेल्या तान्ह्याला येणारा तेलपावडर, दूधकाजळाचा एकत्रित वास, तापलेल्या मातीवर पावसाच्या पहिल्या धारा पडल्यावर येणारा खास भारतीय मृद्गंध या व अशाच काही आपल्या अंतर्मनाशी निगडित असलेल्या आठवणी, संस्कार यात एक समान गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे सुवास.

सुवास, सुगंध किंवा काही नको असलेले गंधसुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. निसर्गातून आलेले फुलांचे, पानांचे वास, प्राणिजगतातून आलेले प्राणिजन्य गंध, मुंबई विमानतळावरून बाहेर पडल्यावर नाकात घुसणारा समुद्र, दाट मानवी वस्ती, मासे आणि रसायन व घाममिश्रित गंध हे आपल्या मनाचे सर्व निर्बंध तोडून अगदी आत पोहोचतात आणि त्यांची अशी एक खास आठवण बनवून ठेवतात. आपल्या वैयक्तिक तसेच सामुदायिक जीवनाचा आढावा आपल्या वासस्मरणांशिवाय पुरा होऊच शकत नाही.

आता आपलेच बघा, कोणीतरी आंबाडीच्या भाजीची पाककृती लिहिते अन् आपण इथे फोडणीच्या वासाच्या आठवणीने कासावीस होतो. उकडीच्या मोदकावर तूप विरघळतानाचा वास, आजीच्या देवघरातला फुले, उदबत्ती व निरांजनाच्या ज्योतीचा एकत्रित वास, ट्रंकेत घडी करून ठेवलेल्या जरीच्या सणंगांना येणारा शालीन, खानदानी सुगंध, दिवाळीतच घरी येणारा मोती साबण आणि तेल लावून आंघोळ करत असताना बाहेर उडणार्‍या फटाक्यांचा धुरकट, जळकट गंध यांनीच तर आपले सांस्कृतिक जीवन समृद्ध होते. आपले मराठीपण अधोरेखित होते. हे सुगंध/परिमळ नसते, तर आपण सगळेच एकसाची, अर्थगामी जीवन जगत राहिलो असतो. यामागेही एक न दिसणारे अदृश्य जग आहे. त्याचीच मी आज आपल्याला ओळख करून देणार आहे.

मनुष्यप्राणी जसजसा उत्क्रांतीच्या अनेक अवस्थांतून पुढे-पुढे येत गेला, तसतसे त्याचे निसर्गाशी, प्राणिजगताशी थेट जैविक पातळीवर असलेले नाते पुसत गेले. फुलांनी, शिंपल्यांनी, चंदनागरूच्या लेपांनी आपल्या शरीराला सुगंधित करणार्‍या युवती/ललना कारखान्यात बनविलेली कृत्रिम सौंदर्यप्रसाधने वापरू लागल्या. शिकेकाई-रिठा, उटणे यांऐवजी नानापरींचे शांपू-साबण आले. कपडे धुण्याचे साबण, पावडरी आल्या. घरी बनविलेल्या अन्नपदार्थांऐवजी डबाबंद, कृत्रिमस्वादयुक्त दूध, चिप्स मुलांना दिले जाऊ लागले. पण कधी विचार केला आहे का, आपण संतूर चंदन किंवा मेडिमिक्स असे साबण, एरिअल, टाइडसारखे डिटर्जंट्स्, पॅराशूट-केसांना लावण्याचे नारळाचे शुद्ध तेल, जॉन्सन बेबी ऑईल व पावडर, लेज चिप्स, कोक-पेप्सी, पर्क चॉकोलेट या व अशा अनंत उत्पादनांचे पॅकेट उघडून प्रथम काय करतो? तर वास घेतो. फ्रूटी शांपूचा वास घेतला की आपण स्पामध्ये जाऊन केसांचे लाड करत आहोत, असे वाटते, तर अमेरिकन चीज व अनियन फ्लेवर चिप्सचे पाकीट उघडले की, सेंट्रल पार्कमध्ये हिरवळीवर बसूनच चिप्स खातो आहे(असे खरेच करता येते का?), असे बिहारमधील खगरिया स्टेशनवर आगगाडीची वाट बघतानाही वाटू शकते.

या तुमच्या अनुभवामागे एक प्रचंड मोठी साखळी कार्यरत असते. त्याचा एक भाग म्हणजे, हे प्रत्यक्ष उत्पादन बनविणारे उद्योग व त्यांना सुगंध पुरविणारे पूरक उद्योग. अगदी नैसर्गिक चाफ्याच्या वासाची उदबत्ती, नैसर्गिक गुलाबाचा सुगंध, इंग्रजी लवेंडरचा सुखद अनुभव वगैरे जाहिरातींनी भुरळ घालणारी ही उत्पादने प्रत्यक्षात कृत्रिम सुगंधांचा वापर करतात. हा सर्व सेंद्रिय रसायनशास्त्राला हाताशी घेऊन घडवलेला चमत्कार असतो, ज्यात नैसर्गिक तेले अतिशय कमी प्रमाणात वापरली जातात.

sugandh4.jpg
विचार करा, गुलाब, चमेली, केशर, वेलची, लवेंडर, व्हॅनिला, यांची अ‍ॅब्सोल्यूट्स् म्हणजे विशुद्ध तेले किंवा अर्क यांची किंमत काही लाख रुपये प्रति किलो असू शकते. मी एक तीन लाख रुपये किलो किमतीचे बेल्जियन रोझ तेल केवळ वास घेऊन सन्मानाने साभार परत दिले होते, कारण ते विकणार कोणाला? कच्चा माल, उत्पादनखर्च, कामगारांचा खर्च व नफा यांचे गणित बसवणारा आमचा ग्राहकवर्ग ते महागाचे तेल घालेल कशात व किती? त्यातून कमविणार किती? या रेट्यातूनच शेवटी नैसर्गिक सुगंधांशी, स्वादांशी मिळतेजुळतेच नव्हे, तर त्याहूनही पुढे जाऊन गंधाच्या आस्वादकाला अभूतपूर्व आनंदाची अनुभूती परवडेल अश्या किमतीत देणार्‍या कृत्रिम सुगंधांची निर्मिती करण्याचे शास्त्र, सुगंधनिर्माणशास्त्र / सुगंधनिर्माणकला (क्रिएटिव्ह परफ्यूमरी) उदयास आले व त्यावर उभारलेले, प्रचंड अब्जावधी डॉलरांची उलाढाल असलेले महाउद्योग! त्यांना रसायने व विशुद्ध तेले/अर्क पुरवणारे छोटे उद्योग व व्यापारी, दलाल व अडते, दुकानदार, त्यांना कच्चा माल पुरविणारे व गवती चहा, जिरेनिअम, पचौली, व्हॅनिला, चमेली, गुलाब यांची लागवड करणारे शेतकरी अशी ही मागे जाणारी साखळी आहे.

सुगंधनिर्माणकला व गंधविक्रीचे तंत्र हे दोन्ही अतिशय मोठ्या व विद्वान लोकांनी घडविलेले विषय आहेत. हे दोन मोठे प्राचीन प्रासाद आहेत असे कल्पिल्यास आपण आज फक्त दार किलकिले करून पाहणार आहोत. मी आहे तुमची राजू गाईड!

सुगंधांची विभागणी साधारणपणे फ्लोरल, लीफी ग्रीन, ओशनिक, वूडी, मस्की, फ्रूटी, स्वीट, फ्रेश या धर्तीवर केली जाते. यातील प्रत्येक नोट विशिष्टपणे मांडणारी रसायने असतात. साधे फ्लोरल घ्या: त्यात जास्मिन, गुलाब, चंपा, चमेली आले, कमळ, पारिजातक आले. लीफी ग्रीन नोट म्हटले तरी त्यात कमीत कमी ६०-७० प्रकार आहेत. एखाद्या पालवीचा वास, पावसाने तृप्त अशा जंगलाचा वास, पाइनच्या जंगलांचा वास वेगळा आणि आपल्या भारतीय ट्रॉपिकल फॉरेस्टचा वास वेगळा. सुकलेल्या हिरव्या पाल्याचा वास वेगळा.

फुलांचे वास एकत्र करून येतो एक बुके नावाचा प्रकार. कस्तुरीमृगाची कस्तुरी, तसेच ऑलिबॅनम, स्टायरॅक्स, तोलू बाल्सम अशा रेझिनॉइड्सचे/गोंदांचे वास.. अशा वेगवेगळ्या झाडांच्या राळी, डिंक, अंबर, ऊद असे गंध साधारणपणे अत्तर बनवताना पाया म्हणून वापरले जातात. समुद्रकिनार्‍यावर गेल्यावर येणारा फ्रेश, खारट सुगंधपण बनविता येतो. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी, चायना बेरी, ऑरेंज, लेमन, लाइम हे झाले फ्रूटी व सिट्रस नोट असलेले सुगंध. व्हॅनिला व चॉकोलेट यांच्याशिवाय गंधनिर्मात्याचे पान हलत नाही, इतकी प्रचंड विविधता या दोन सुगंधांत आहे.

सुगंधांची बांधणी साधारणपणे बेस नोट, मिडल नोट व टॉप नोट या तत्त्वावर केली जाते. त्यासच सोल नोट, हार्ट नोट व हेड नोटही म्हणतात. उदबत्ती लावल्यावर किंवा साबणाचे पाकीट उघडल्यावर जो पहिला वास तुम्ही घेता, तो आहे 'टॉप नोट'. हिचे काम तुम्हाला आकर्षित करणे व बांधून ठेवणे. उत्पादन वापरताना तुम्हांला वेगवेगळ्या 'मिडल नोट्स्'चे वास येतात व तुमचा वापरण्यातील आनंद द्विगुणित करतात.

पीच-पपया शांपूच्या फेसाने डोके भरून गेले की, अगदी सुखद वाटते की नाही? त्यात त्या गरम शॉवरच्या पाण्याचा, वाफेचा, आनंदाने केस साफ करण्याच्या क्रियेचा परमोच्च सुखाचा क्षण साठविलेला असतो. तुम्ही उदबत्ती लावून, नमस्कार करून कार्यालयात निघून जाता. रात्री घरी आल्यावर खोलीत एक मंद सुगंध दरवळत असतो, तो आहे 'बेस नोट' किंवा रेंगाळणारा सुगंध, जो पहिल्या अनुभवानंतर बर्‍याच वेळाने येतो. एखाद्या डेटनंतर मैत्रीण रुमाल विसरते व तिच्या रुमालाला येणार्‍या मस्की सुगंधाने तुम्ही वेडे होऊन रात्रभर जागे राहता. ही ती बेस नोट! मनात घर करून राहणारी.

हे व असे दर्जेदार सुगंध निर्माण करणारे जादूगार आहेत क्रिएटिव्ह परफ्यूमर्स - सर्जनशील अत्तरकलावंत.

क्रिएटिव परफ्यूमरीशास्त्रात भरीव कामगिरी करायची असल्यास प्रशिक्षणाबरोबरच अंतर्गत सर्जनशीलता,
कलासक्त वृत्ती, निसर्गाबद्दल प्रेम, जीवनातील सर्व अनुभव आसुसून घेण्याची मनोवृत्ती आवश्यक आहे.
नवा सुगंध बनविणे, हे एक नवीन कलाकृती घडविण्यासारखेच असते. कधी सांगितल्याप्रमाणे दिलेल्या आर्थिक मर्यादेत राहून काम करावे लागते, तर कधी आपल्या मनात उमटलेले भावतरंग रसायनांच्या माध्यमातून कुपीबंद करायचे असतात. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही विक्रेते सांगतो, "एक हिरवा डिटर्जंट केक आहे, त्याचा बेस अशा प्रकारचा आहे, तो जिल्हापातळीवर, ग्रामीण जनतेसाठी दहा दिवसात लाँच करायचा आहे. एक चांगला, धमाकेदार लेमन सुगंध द्या. अगदी कडक पाहिजे, कपडे स्वच्छ धुतले गेलेत असे गृहिणीस वाटले पाहिजे. आणि हो, किंमत ३०० रु. किलोपेक्षा जास्त झाली ना, तर धंदा हातचा गेलाच!"
बापडा पर्फ्यूमर कामाला लागतो.

कधीकधी कामाच्या धांदलीत असताना अत्तराचा एखादा बाटलीबंद नमुना खाजगी डाकेने/टपालाने येतो. उघडून पाहिले अन् वास घेतला की, तुम्ही सोळा वर्षांच्या होता अन् आपोआप वैशालीसमोर बाईकवाल्या मित्राची वाट बघायला लागता. मनात भावनांचा कल्लोळ उठतो. हनुमान टेकडीवरचे काही मनोरम सूर्यास्त आठवतात, रफी गाणी गुणगुणायला लागतो. तुम्ही आपसूकच तुमच्या उत्तम फ्रेग्रन्स विकत घेणार्‍या ग्राहकाला फोन करता, "बॉस, कल आ जाओ ऑफिस. एक गजब की चीज आयी है. सूँघोगे तो पगलाओगे!"

गंधनिर्माते म्हणजे गंधविद्येमधले ब्लॅकबेल्टधारक विजेतेच! त्यांच्या कारकिर्दीमागे रसायनशास्त्राचे सखोल ज्ञान, अनुभव आणि एक चोख व्यापारी दृष्टिकोन असतो. तर्‍हेतर्‍हेच्या उत्पादनांच्या प्रक्रियांची त्यांना उत्तम माहिती असते. कोणता कच्चा माल काय परिणाम करेल, कच्च्या मालावर कशी नीट प्रक्रिया केली पाहिजे,
अश्या हजारो शंकांची त्यांच्याकडे उत्तरे असतात व ती बाजारपेठेतील युद्धात तावूनसुलाखून निघालेली असतात. माहिती-तंत्रज्ञानात जसे तरुणाईला महत्त्व आहे, तसे इथे नाही. उलट भारतीय रागदारी संगीतात जसे गुरूला, वर्षानुवर्षांच्या साधनेला महत्त्व असते; पूर्वी केलेल्या मैफिलींची जाणीव असते, तसेच साधारण इथे असते. एखादा अनुभवी गंधनिर्माता थोड्याश्याच रसायनांमधून तुम्हांला केवड्याच्या अंतरंगाची अनुभूती देऊ शकतो. कवठीचाफ्याच्या, रातराणीच्या मदमत्त सुगंधाची सहल घडवून आणू शकतो. अगदी मनापासून दाद देण्याचे काम आपले. आणि बाटल्या बुक करू की बॅरल, हे विचारण्याचेही. लेकिन वो किस्सा फिर कभी!

जॉय, शॅनेल नं ५, इंटिमेट, व्हाइट मस्क, ४७११ कलोन, ह्यूगो बॉस, निना रिकी असे व इतर अनेक सुगंध जगभर प्रसिद्ध आहेत. हे खास लावण्याचे व दुसर्‍यांनी वास घेऊन नादखुळा होण्याचे सुगंध. ते बनविणारे परफ्यूमर्सपण तितकेच प्रसिद्ध आहेत. पण लक्स साबण, ड्रीमफ्लॉवर टाल्क, जॉन्सन बेबी पावडर, एरिअल, सनसिल्क शांपू, बजाज आल्मंडड्रॉप ऑईल या व अशा कितीतरी देशी / परदेशी वैयक्तिक वापराच्या उत्पादनांचे सुगंध आपल्याला अगदी सवयीने माहीत असतात, तरी ते बनविणारा पर्फ्यूमर मात्र अज्ञात कलाकारच राहतो. उद्योगजगतात मात्र यांना वेगळाच मान असतो.

कृत्रिम, रासायनिक सुगंधांच्या सृष्टीचा पसारा अवाढव्य व जगभर पसरलेला असला, तरीही त्यात आपल्या
गुणवत्तेने, आकाराने विश्वमान्यता मिळविणारे काही उद्योग आहेत. ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या असून त्यांचा ग्राहकवर्ग मोठा आहे. जिवादन, फर्मिनिक, आयएफएफ, सिमराइज, टाकासागो, सेन्सिएंट, मान, हासेगावा, रॉबर्टेट व फ्रूटारोम ह्या त्या जगातील दहा मोठ्या फ्रेग्रन्स व फ्लेवर बनविणार्‍या कंपन्या आहेत.
जागतिकीकरणाच्या आधीपासूनच यातील काही भारतात हजर होत्या व आता यांच्याबरोबरच इतर
वैशिष्ट्यपूर्ण सुगंधमिश्रण घडवणारे, खास रसायने देणारे उद्योगही भारतात दुकान उघडत आहेत. कारण एकच: येथील मोठा ग्राहकवर्ग आणि वाढीच्या मार्गावर असलेली अर्थव्यवस्था. या उद्योगांची एक खासियत म्हणजे अपरिमित संधी. एखादा नवा सुगंध व उत्पादन बाजारपेठेत क्लिक झाले की, माणूस एका वर्षात यशाच्या अनेक पायर्‍या एकदम चढून जाऊ शकतो. भारतवासी उदबत्ती, रजनीगंधा पान मसाला,
चिक् शांपू ही अशी काही उदाहरणे आहेत. या उद्योगांच्या अर्थकारणात जायला नको, कारण एकतर राजू गाईडकडे एका चलनाचे दुसर्‍या चलनात रुपांतर करण्याची सोय नाही व या लेखाचा मूळ उद्देश हे क्षेत्र किती नवे व मेहनतीचे फळ देणारे आहे, हे सांगणे हा आहे.

सुगंधांची बाजारपेठ, घरगुती साफसफाईची उत्पादने(हार्पिक, लायझॉल, ओडोपिक, इत्यादी), वैयक्तिक वापराची उत्पादने(साबण, घामाची दुर्गंधी घालवणारी उत्पादने, लहान बाळांसाठीची उत्पादने, कृत्रिमस्वादयुक्त अन्नपदार्थ व पेये), फाइन फ्रेग्रन्सेस्(उदबत्त्या, ऊद, धूप, डासांना पळवून लावणारी अशी उत्पादने, किंवा तंबाखू, जर्दा, गुटखा, पानमसाला, गोड सुपारी), स्वच्छतेची उत्पादने जसे कपडे व भांडी धुण्याचे साबण, पावडरी इत्यादींमध्ये विभागलेली आहे. ह्या प्रत्येक विभागात कोट्यवधींची उलाढाल होते व तितक्याच नव्या संधी दरवर्षी उपलब्ध असतात. फक्त तुम्ही योग्य सुगंध, योग्य दरात घेऊन, योग्य जागी व वेळेला उभे हवे. जगभर पसरलेल्या मंदीचा या उद्योगावर फारसा परिणाम झालेला नाही, कारण मंदी आली म्हणून, लोक आंघोळ करायचे, घरी फरश्या पुसायचे, देवासमोर उदबत्ती लावायचे थांबत नाहीत. तरुणाई अत्तर/डिओचे फवारे मारून डेटवर जातेच. बाळांसाठी गरीब देशी स्त्रीदेखील जॉन्सन बेबी सोप व पावडरच आणा, असा आग्रह धरते. पोरेबाळे बिस्किटे खातातच व कोक-पेप्सीसारखेच आपले रसना, थम्सपही चालते. बायका व्हिम बारनेच भांडी व रिन /टाइडने कपडे धुतात. वाटिका तेल लावतात व एक रुपयाचा शांपू सॅशे, तसेच ५० पैशांची गुटख्याची पुडी खपतेच खपते. भारतात जसे बहुराष्ट्रीय कंपन्या ही उत्पादने देतात, तसेच एक अगदी भरभराटीला आलेला देशी उत्पादकवर्ग आहे, जो कायम जनतेला नवनवी उत्पादने कमी पैशांत देत असतो.

स्विट्झर्लंडस्थित 'जिवादन/ जिवादाँ' हा जगातील सर्वांत मोठा अत्तरउद्योग आहे. त्याची स्थापना १८व्या शतकात झाली व रूर, क्वेस्ट अश्या मोठ्या कंपन्यांना सामावून घेऊन हा महाउद्योग आज अनेक देशांत आपले पाय रोवून उभा आहे. त्यांचे परफ्यूमरी स्कूलही आहे. एअर फ्रेशनर्स्, सुगंधित मेणबत्त्या, जमीन पुसण्याची द्रव्ये, तसेच शांपू, डिटर्जंट, साबण इत्यादींमध्ये त्यांचे सुगंध आपल्याला भेटतात. मार्केटिंग शास्त्रानुसार ब्रँड मेसेज ग्राहकापर्यंत पोहोचविण्यात सुगंधांचा महत्त्वाचा सहभाग असतो. फेअर अँड लवलीचा वास घेऊन बघा. फ्लोरल अनुभूती अतिशय सुरेख येते. लिरिल म्हणजे फ्रेश, तर डेटॉल म्हणजे क्लीन. अगदी देवाला लावतो त्या कुंकवामध्ये, अष्टगंधात तुम्हाला सुगंधी अंतरंग भेटेल. अगदी शब्दांवाचून कळले सारे, असाच हा प्रकार आहे. म्हणूनच लोक तर्‍हेतर्‍हेचे डिओ लावून स्वतःचे व्यक्तिमत्त्व बदलायचा प्रयत्न करतात. कधी वाइल्ड तर कधी फ्रेश, कधी फ्लोरल तर कधी सिट्रस. हो की नाही?

'फर्मिनिक' ही स्विट्झर्लंडस्थित खाजगी कंपनी, अत्तर व कृत्रिम स्वाद बनवणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ६४ देशांत मिळून असलेले तिचे ६२००च्यावर कर्मचारी अत्तरे बनवून विकतात. आयएफएफ, तसेच ड्रॅगोको व हर्मन रायमर या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून बनविलेली सिमराइज, ह्या या उद्योगातील आणखी काही मोठ्या कंपन्या.

सुगंधाच्या उत्पादनात भारतात अग्रेसर उद्योग म्हणून एस. एच. केळकर कंपनीस अतिशय मानाचे स्थान आहे. १९२२ साली 'सरस्वती केमिकल वर्क्स' या नावाने सुरू झालेल्या या उद्योगाने आज मुंबईजवळ वाशिवली येथे अत्याधुनिक सुगंध बनवण्याचा कारखाना उभा केला आहे. पूर्णपणे भारतीय, पण जागतिक दर्जाचा हा उद्योग महाराष्ट्रातच नव्हे, तर देशविदेशांत आपल्या उत्पादनांच्या दर्जाच्या जोरावर प्रसिद्ध आहे. ग्राहकांच्या मनात एसएचके ब्रँडबद्दल जी आपुलकी आहे, ती अनुभवण्यासारखी आहे. वासांच्या या अजब दुनियेत कंपनीची फिरदोस, चॅरिअट, फसली गुलाब, फॅन्सी बुके ही व अशी अनेक रत्ने अढळपदी वास करून आहेत. अत्तरे, कृत्रिम स्वाद, उद्गंधासाठीची (अरोमा) रसायने, निर्यात अश्या आघाड्यांवर हा उद्योगसमूह ग्राहकांना चोख सेवा व उत्पादने देत आहे.

रसायनांवर आधारित सुगंधांच्या पलीकडे जाऊन, संपूर्णपणे नैसर्गिक असे सुगंध वापरण्याची एक नवी प्रथा जगातील बाजारपेठेत बघायला मिळते. अर्थात ही चळवळ एका मर्यादित प्रमाणातच यशस्वी आहे,
कारण महत्त्वाची उलाढाल होण्यासाठी उत्पादनाचा खप जेवढा व्हावा लागतो, तेवढा जीव या सुगंधांमध्ये नाही. वैयक्तिक वापरासाठी ही खाशी अत्तरे जरूर घ्यावीत.

'फ्रेग्रन्सेस अँड फ्लेवर्स असो. ऑफ इंडिया' ही संस्था भारतातील अत्तरउद्योगातील लोकांची प्रमुख संस्था आहे. या संस्थेद्वारे सभासदांना वेळोवेळी नवी माहिती पुरविली जाते, कार्यक्रम घेतले जातात. कायद्यातील नव्या तरतुदींची माहिती दिली जाते. वेगवेगळ्या अभ्याससहली आयोजित केल्या जातात. 'इंटरनॅशनल फ्रेग्रन्स असोसिएशन' हेच काम जागतिक पातळीवर करते. त्यांच्या गाईडलाइन्सनुसार कोणती रसायने अत्तर बनविताना वापरावीत, हे ठरविता येते.

असे आहे हे सुगंधांचे विश्व. छोट्याश्या कुपीत सुखानंदाचे ब्रम्हांड साठविणारे, एका श्वासात भावनांची वादळे आणणारे, अंतर्मनात हिंडवून आणणारे अन् कधीच तुमची साथ न सोडणारे.

मन होइ फुलांचे थवे, गंध हे नवे, कुठुनसे येती...

- अश्विनीमामी