संगीत 'कट्यार काळजात घुसली'

संगीत हे पिढ्यान् पिढ्या टिकून राहिलं आहे, अजरामर आहे, कारण ते कोणा एकाच्याच मालकीचं नाही, कोणाचंही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असं जे आहे, ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. पण ते जपणारी, ते गाणारी, ते जाणणारी माणसं, त्यांचं काय? ते असं मानतात का? संगीताचा मुक्तात्मा ते जपतात का?

border2.JPG

'क

ला’ म्हणजे काय? तिची व्याख्या काय आहे? कलेला कशाचं बंधन असतं? धर्म, जातपात, लिंग या सर्वांच्या पलीकडेही जी जाणीव उरते तीच फक्त कला. मग ती कला कोणत्याही स्वरूपात असो - चित्रकला, शिल्पकला, गायनकला, अथवा अजून कुठलीही. कलेचा उपासक हा फक्त त्या कलेशी बांधील असतो. एखाद्याचं घराणं, हुद्दा, सामाजिक स्तर पाहून कला एखाद्याला प्रसन्न होत असते का? तो साधक कोणीही असो, कसाही असो, कष्ट आणि फक्त कष्ट ह्यांशिवाय कोणती कला त्याला खर्‍या अर्थाने प्रसन्न होईल?

संगीतकला ही अत्यंत प्राचीन कला.. शास्त्रीय संगीत हा आजही आदराचा विषय. शास्त्रीय संगीत शिकणार्‍यांकडे कौतुकाने, सन्मानाने पाहिलं जातं. शास्त्रीय संगीत शिकायच्या अनेक पद्धती आहेत. संगीतकलेच्या पद्धतींचा आपापल्या परींनी ध्यास घेतलेली अनेक घराणी होऊन गेली. ह्या घराण्यांनी एका विशिष्ट प्रकारची गायनकला सुरू केली, जोपासली आणि रसिकांसमोर ती पेश करून, तिला समाजमान्यताही मिळवली. ही वैशिष्ट्यं म्हणजे त्या त्या घराण्यांची ओळख झाली. पिढ्यान् पिढ्या ही संगीतकला पेश करण्याची पद्धत, हा वारसा नवनवीन उपासक शिकत राहिले.

पण खरंच संगीत असं घराण्यांत वाटलं जाऊ शकतं का? एक घराणं यमन राग एका पद्धतीने गात असेल, दुसरं दुसर्‍या पद्धतीने, पण यमन रागाचे सूर, मात्रा, लय हे घराण्यांप्रमाणे बदलतात का? यमन हा यमनच असतो ना? भैरवी ही भैरवीच असते ना? ती कोणीही गावी, मनापासून गावी, रसिकांना मैफलीची सांगता कायमची स्मरणात राहावी अशी गावी. अमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो, म्हणून त्याची श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत. संगीत हे पिढ्यान् पिढ्या टिकून राहिलं आहे, अजरामर आहे, कारण ते कोणा एकाच्याच मालकीचं नाही, कोणाचंही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असं जे आहे, ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. पण ते जपणारी, ते गाणारी, ते जाणणारी माणसं, त्यांचं काय? ते असं मानतात का? संगीताचा मुक्तात्मा ते जपतात का?

'संगीत कट्यार काळजात घुसली’ हे श्री. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या लेखणीने, पंडित जितेन्द्र अभिषेकींच्या संगीताने नटलेले संगीतनाटक ह्याच प्रश्नांवर भाष्य करतं. कला मोठी की कलाकार, गायन महत्त्वाचं की घराणं, ह्या प्रश्नांचा ते वेध घेतं. हे नाटक ज्या काळात घडतं त्या काळात संगीतातली घराणी संगीतापेक्षा श्रेष्ठ समजली जायची. एखाद्या घराण्याचा गायक त्याच्या गुरूंनी शिकवलेली गायकी, त्या घराण्याची परंपरा प्राणपणाने जपायचा, वाढवायचा आणि रसिकमान्यता मिळवायचा.

ही कथा आहे पंडित भानुशंकर आणि खाँसाहेब आफताब हुसेन ह्यांच्या दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची! पंडित भानुशंकरजी हे एका संस्थानातले राजगायक. ह्या संस्थानात पंडितजींनी दहा वर्षं 'राजगायक' हे पद भूषवलं आहे आणि आपल्या गायकीची छाप तिथल्या रसिकांवर टाकली आहे. लोकांना त्यांचं गाणं, ते पेश करण्याची पद्धत नुसती आवडतच नाही, तर अंगवळणी पडली आहे. गाणं असेल, तर पंडितजी गातात तसंच, इतका ठसा पंडितजींनी तिथे उमटवला आहे.

खाँसाहेब आफताब हुसेन ह्या दुसर्‍या घराण्याच्या गायकाला मात्र पंडितजींचं हे यश खुपतंय. त्यांनी सलग दहा वर्षं पंडितजींकडून ’राजगायक’ हा खिताब मिळवण्यासाठी संघर्ष केलाय. ते पद आपलं व्हावं, पंडितजी त्या पदावरून पायउतार व्हावेत ह्यासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले आहेत, बारा-बारा तास रियाझ केला आहे. तरीही पंडितजींना हरवण्यात अजून त्यांना यश आलेलं नाही! सतत दहा वर्षं त्यांच्याकडून हरल्यानंतर मात्र अकराव्या वर्षी एक नवल घडतं! त्या वर्षी खाँसाहेबांच्या गायनानंतर पंडितजी गायलाच बसत नाहीत.. त्यांच्या तानपुर्‍यामधून सुरावट झंकारत नाही, तर डोळ्यांमधून केवळ आसवं ओघळतात! एक ओळही न गाता ते मैफल अर्धवट सोडून अज्ञातवासात निघून जातात. ते असे अर्धवट मैफल सोडून निघून गेल्यामुळे खाँसाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं! ’राजगायक’ हा खिताब त्यांचा होतो! इतकंच नाही, तर ती हवेली, ज्यात पंडितजींचं वास्तव्य होतं, तो मानमरातब, ते राजगायकाचं मानधन सगळं सगळं त्यांचं होतं!

खाँसाहेबांना पंडितजींचा जनमानसावर असलेला ठसा संपूर्णपणे मिटवून टाकायचा आहे. त्यांना पंडितजींच्या गायकीची शैली बिलकुल आवडत नाही. पंडितजींची शैली मृदू, आर्जवी, थोडी भक्तिरसपूर्ण अशी आहे. खाँसाहेबांची शैली मात्र पूर्ण भिन्न आहे. त्यांच्या मते गाणं म्हणजे सळसळत्या नागिणीसारखं हवं. आक्रमक, हरकती-मुरकतींनी युक्त, रसिकांना लयीवर, तालावर डोलायला लावणारं! एक आव्हान म्हणून ते पंडितजींचं अत्यंत सुप्रसिद्ध भजन आपल्या, संपूर्णपणे वेगळ्या आणि आवेशयुक्त चालीत बांधतात. त्या भजनावरचा पंडितजींचा अंमल नाहीसा केल्यानंतर कुठे त्यांना बरं वाटतं. ते भजन असतं

’घेई छंद मकरंद
प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद
स्वच्छंद हा धुंद
मिटता कमलदल
होई बंदी हा भृंग
परी सोडी ना ध्यास
गुंजनात दंग
घेई छंद मकरंद..’

पंडितजींच्या गायकीपेक्षा आपली गायकी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून दाखवण्याचा एक ध्यास सोडला, तर बाकी खाँसाहेब हाडाचे कलाकार आहेत. पंडितजींच्या मुलीच्या हवेलीवरच राहिलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवरही त्यांचा राग नाही. आपण मुसलमान, हा देव हिंदू, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही. कारण त्यांच्या मते श्रीकृष्ण म्हणजे आद्य कलाकार. आपल्या बासरीने मुक्या जनावरांनाही वश करून घेणारा असा तो.. ते त्याच्याकडे आदरानेच बघत असतात!

नेमक्या ह्याच वेळी सदाशिव गुरव नावाचा युवक हवेलीवर येतो. तो मिरजेहून आलेला असतो. बारा वर्षांपूर्वी पंडितजींचं वास्तव्य मिरजेस असतं, त्यावेळेस सदाशिवाची संगीताप्रती असलेली निष्ठा पाहून पंडितजींनी त्याला त्यांचा गंडाबंध शिष्य करून घेण्याची तयारी दाखवलेली असते. पण काही अडचणींमुळे सदाशिवास तेव्हाच गायनकलेस वाहून घेता येणं शक्य नसतं. त्याच्या व्यापात बारा वर्ष सरतात.. तो वेडा जीव पंडितजींच्या शिष्यत्वासाठी बारा वर्षं कशीबशी ढकलतो आणि पंडितजींच्या आसर्‍यास येतो. पण दुर्दैव त्याचं!! पंडितजी नेमके तेव्हाच बेपत्ता झालेले असतात. पण सदाशिवाला त्याची पर्वा नाही! जाणकार गुरूकडून संगीत शिकणे हेच त्याचेही ध्येय आहे. तो खाँसाहेबांना त्याला शिकवण्यासाठी गळ घालतो!

खाँसाहेब अस्वस्थ होतात. ज्या पंडितजींची सावलीही त्यांना अप्रिय आहे, तिथे हा त्यांच्याच गायकीच्या आधारे बारा वर्ष तपस्या केलेला शिष्य ते कसा खपवून घेणार? सदाशिवाचा गळा तयार आहे ते पंडितजींचं गाणं गाण्यासाठी, खाँसाहेबांचं नव्हे! ते त्याला शिकवण्यास स्पष्ट नकार देतात.

पण हार मानेल तो सदाशिव कसला! त्याला फक्त गाणं शिकायचं आहे, तेही एका नावाजलेल्या गुरूकडून. आधी परिस्थिती अनुकूल नाही म्हणून त्याला कोणा गुरूकडून शिकता आलेलं नाही, आणि आता परिस्थितीला वश करून तो शिकायला आला, तर गुरूच नाहीत! ह्या विचित्र चक्रातून तो बाहेर पडण्यासाठी धडपड करतो. त्याचं एकच स्वप्न आहे - आपल्या गुरूकडून मनसोक्त गाणं शिकावं, दिवसरात्र फक्त गावं, गात राहावं आणि गुणीजनांनी, मान्यवरांनी भरलेल्या सभेत आपलं गाणं पेश करून त्यांच्याकडून शाबासकी मिळवावी, आशीर्वाद मिळवावा - 'जीते रहो, गाते रहो!’

त्याची राजगायक बनण्याची महत्त्वाकांक्षा नाही की, गायकीवर दौलत कमावून श्रीमंत होण्याची इच्छा नाही. त्याला तळमळ आहे ती एकच - गुरूकडून गाणं शिकणं, बस्स! पण हे पूर्ण कसं व्हावं? मग तो एकलव्याप्रमाणे स्वशिक्षणास प्रारंभ करतो. खाँसाहेबांच्या महालावरून त्यांच्या रियाझाच्यावेळी तो घिरट्या घालू लागतो. अशा वेळी कानावर येणारे दोनचार सूर, लकेरी, ताना, मुरक्या ह्यांवर समाधान मानून त्याच घरी येऊन घोटवू लागतो.. तो म्हणतो, ’मी एखाद्या गायीसारखा आहे, आधी मिळेल ते गिळतो आणि मग सावकाश सगळ्याचा रवंथ करतो..’

इकडे खाँसाहेब राजगायक होतात खरे, पण त्यांचं मन आता त्यात रमत नाही. राजेसाहेबांनी बोलावलं की प्रसंगी रियाज सोडून तडक त्यांच्या दरबारी हजर व्हायचं, ते म्हणतील ते राग, ते म्हणतील तितका वेळ गायचा, त्यातली शुद्धता, वेळ, नियम न पाळता आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली की हवेलीवर परत यायचं! नाव काहीही घेतलं, तरी असतात ते राजेसाहेबांचे नोकरच. त्यांच्या इच्छेचा सन्मान करणं त्यांचं कर्तव्यच असतं. पण हे मनातून पटत नसतं. त्यांचा मूळ पिंड हा गायकाचाच असतो. मनातला सल आता स्वस्थ बसू देत नसतो. एक बेचैनी, एक अस्वस्थता सतत घेरून असते. मन रमवण्यासाठी रियाझ चालू असतो. पण रियाझाच्यावेळी त्यांच्या शिष्यांनी केलेली सुमार गायकी, चालढकल, कंटाळा ह्याचा त्यांना राग येत असतो. त्यांनी जरी सदाशिवाला शिष्य म्हणून नाकारलं असलं तरी त्यांच्या प्रत्येक मैफिलीला हजर राहून तो त्यांच्या गायकीतले बारकावे शोषून घेत असतो. त्याची कळकळ पाहून मनातून आपल्याला सदाशिवासारखा एकही शिष्य मिळाला नाही, ज्याने आपल्यानंतर आपलं गाणं, आपलं घराणं जिवंत ठेवलं असतं, अशी खंत त्यांना छळते. खरंतर सदाशिव आजही तयार असतो त्यांच्याकडून विद्येचं दान घ्यायला, पण घराण्याचा अभिमान आणि पंडितजींशी असलेलं मनात घट्ट रुतून बसलेलं शत्रुत्व त्यांना तसं करण्यास परवानगी देत नाही..

सदाशिवाचं खाँसाहेबांकडून गाणं शिकण्याचं वेड इतक्या थराला जातं की, तो चोरून खाँसाहेबांच्या हवेलीत शिरून त्यांच्या रियाझाच्या वेळी तिथे बसायला लागतो. अर्थातच चोरी ती. एके दिवशी तो पकडला जातो, मात्र विचित्र परिस्थितीत! त्यांच्या हवेलीतल्या एका चोरवाटेवरून रोज सदाशिव लपून लपून खाँसाहेबांच्या रियाझाच्या वेळी त्यांचं गाणं ऐकत असतो आणि नंतर घरी जाऊन तेच घोटत असतो. एके दिवशी खाँसाहेबांचं गाणं चालू असतं-

तेजोनिधी लोह गोल
भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने
झगमगले भुवन आज

हे गाणं ऐकता ऐकता सदाशिव इतका तल्लीन होतो की, त्याच्याही नकळत तो त्यांच्याबरोबर गाऊ लागतो! खाँसाहेबांच्या कानावर त्याची रवाळ तान जाते आणि सदाशिवाचं बिंग फुटतं! खाँसाहेब रागाने वेडेपिसे होतात. ज्याला विद्या द्यायची नाही असा दृढ निश्चय केला, तोच असा दग्याने ती घेऊ पाहतोय!! कसंबसं रागावर नियंत्रण आणून ते सदाशिवाला सोडून देतात.

पण सदाशिवाची तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो त्या वेड्या भृंगासारखा आहे, ज्याला माहीत आहे की, कमलदल मिटताक्षणी आपण कैदी होणार आहोत, तरी त्याला कमलदलाचा मोह सुटत नाही! सदाशिव ह्या खेपेस चक्क हवेलीतला नोकर म्हणून वेषांतर करून हवेलीवर रहायला येतो. एक मुका नोकर! गायनकलेच्या ध्यासापायी तो वेडा चक्क मुक्या माणसाचे सोंग घेतो. ज्या गळ्यातून ताना यायच्या, तो गळा जीवाचा कान करण्यासाठी सदाशिव मूक करतो. दोन वर्षं अविरत खाँसाहेबांची तो सेवा करतो.. त्यांच्या सहवासात ऐकलेला प्रत्येक शब्द हृदयावर कोरून घेतो.. अत्यंत गुप्तपणे रियाझ करतो.. आणि अपघाताने ही चोरीदेखील उघडकीस येतेच! ह्या वेळी तर खाँसाहेबांच्या पायाशीच बसून तो समाधिस्थ अवस्थेत गाऊ लागतो! जी बंदिश ते गात असतात, ती त्यांच्या घराण्याची शान आहे, त्यांच्या घराण्याची खास पेहचान आहे.. आधी कधीच पेश न केलेली ही बंदिश ते आळवून आळवून गात आहेत-

सूरत पीयाकी छिन बिसरायी
हर हरदम उनकी याद आयी..

मुका नोकर अचानक गाऊ लागल्यानंतर सारेच चमकतात! ह्या खेपेस मात्र खाँसाहेबांकडे माफी नाही! ते सदाशिवाला मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावतात. सदाशिवाला गाण्यापुढे जीवाची तमा नाही. तो मृत्यूला सामोरा जाण्यासाठी सज्ज होतो, पण मरणापूर्वी त्याची एकच इच्छा आहे की, त्याने मुक्तपणे गावं आणि खाँसाहेबांनी त्याला मुळीच न अडवता गाऊ द्यावं!

त्याची तळमळ अखेर खाँसाहेबांच्या कलाकार हृदयाला पाझर फोडते आणि ते त्याला गायला परवानगी देतात! बस्स! गुरूचा आशीर्वाद मिळाल्यावर आणखी काय पाहिजे? त्यांना वंदन करून सदाशिव गायला सुरूवात करतो, आत्ता, केवळ एकदाच ऐकलेली बंदिश.. त्याचे गाणे, त्याची तयारी पाहून खाँसाहेब थक्क होतात! केवळ श्रवणभक्तीवर हा मुलगा इतका तयार झाला! काय ह्याची आकलनशक्ती, काय ह्याची क्षमता! नकळत त्यांच्या तोंडातून निघून जातं- "बेटा, और गाओ.." पण सदाशिवाला त्या पुढचे माहीतच नाहीये.. तो परत एकदा त्यांना विनंती करतो, "खाँसाहेब, मला शिकवा, मी तुम्ही म्हणाल ते ऐकेन, करेन, पण मला गाणं शिकवा.."
खाँसाहेबांचं मात्र एकच उत्तर- "नामुमकिन!"

हार पत्करून शेवटी सदाशिव त्याच्या कल्पनेनेच पुढचा अंतरा जुळवतो आणि त्या जुळवलेल्या अंतर्‍यात तो अशी काही कलाकारी दाखवतो की, खाँसाहेब तृप्त होतात. सार्‍या जगाचं भान विसरून, सर्व बंधनातून मुक्त होऊन अखेर आज समोरासमोर केवळ संगीताचे दोन सच्चे उपासक बसतात.

शेवटी गाणं संपतं.. खाँसाहेब सदाशिवाच्या जवळ येतात.. त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवतात आणि त्याला आशीर्वाद देतात- "बेटा, जीते रहो, गाते रहो!" सदाशिवाचं आयुष्याचंच इप्सित साध्य होतं! खुद्द गुरूकडून गायनाची पावती मिळाली! आता अजून काय हवं? तो कबूल केल्याप्रमाणे मृत्यूला तयार होतो.. खाँसाहेबही उसन्या अवसानानं हातातली कट्यार उगारतात, पण त्यांची दृष्टी अंधारते, हात गळून पडतात.. सुरांच्या सच्च्या भक्तासमोर घराणेशाहीचा अभिमान माथा टेकवतो!

सदाशिवाच्या रूपाने समोर कट्टर, किंवा कदाचित तुल्यबळ प्रतिस्पर्धी समोर उभा ठाकलेला असताना आणि हातात कट्यार असतानाही अंतत: खाँसाहेब ती कट्यार चालवू शकत नाहीत! कारण त्यांना जाणवतं की, ती कट्यार सदाशिवाच्या काळजातून आरपार गेल्यानंतर जे रक्त वाहिलं असतं, ते फक्त एका सच्च्या गायकाचंच वाहिलं असतं - एका गरिबाचं, एका लाचाराचं नव्हे. उलट सगळी सुखं हात जोडून जवळ असूनही त्या क्षणी गरीब आणि लाचार ठरतात ते खाँसाहेब. वृथा अभिमान बाळगून ते केवळ सदाशिवाला अव्हेरत नाहीत, तर ते संपूर्ण गायनकलेचा अपमान करतात.. सदाशिवाचा जन्म मात्र त्याला मिळालेल्या गुरूंच्या आशीर्वादाने धन्य होतो! खाँसाहेब त्याला हाकलून देतात, पण तो मात्र पुढे गात राहतो, शिकत राहतो, गाण्यात रमत राहतो.. हार मात्र होते ती खाँसाहेबांची, त्या घराणेशाहीची जिच्यामुळे गायनाचा वसा विसरून तिचे भक्त गायनाला वर्ज्य असलेल्या कणसूर शत्रुत्वात गुंततात!

कधी विचार केलाय की, सृष्टीच्या रचनाकाराने गाता गळा हा बरोब्बर मेन्दू आणि हृदयाच्या मधोमध का ठेवलाय? कारण संगीत हे भावना आणि हुशारी ह्यांचं अलौकिक असं मिश्रण आहे.. संगीत हाच आत्मा, संगीत हेच तत्त्व! चराचरात भरून राहिलंय ते फक्त संगीत. त्याला कोणत्याही सीमा बांधून ठेवू शकत नाहीत.. घराण्याच्या, शिष्टाचाराच्या, अहंकाराच्या, प्रतिष्ठेच्या, रीतीरिवाजांच्या अशा कोणत्याही बंधनात हे बद्ध नाही. संगीतकला ही अशी विद्या आहे जी जितकी द्याल तितकी वाढेलच.. तिच्यात अपार समाधान, सुख आणि शांतता देण्याची शक्ती आहे.. तिच्या अंतरंगातल्या वाटा तिच्या सर्व साधकांना खुल्या आहेत.. ज्याचं मन जिथे रमेल तिथे त्यानं जावं, साधना करावी, त्यात हरवून जावं.. तिच्यात घराणेशाहीच्या क्षुद्र भिंती उभारून साधकांना तिच्या वाटा बंद करू नका. तिची वंचना करू नका, तिच्या साधकांचा अपमान करू नका.. आनंद घ्या आणि आनंद द्या हा संदेश हे संगीत नाटक अत्यंत प्रभावी पद्धतीने आपल्याला देतं.. नाटकाचा शेवट म्हणजे एक शोकांतिका आहे. घराणेशाहीची शोकांतिका, जी आपल्या हृदयाला चटका लावून जाते!

- पौर्णिमा

Taxonomy upgrade extras: