मुमताज जहाँ नावाचा ताजमहाल

तिचं खट्याळ हास्य वर्षांनुवर्षांच्या सीमा पार करून आजही मनावर गारूड करतं. तिचा अभिनय आजही जुन्या हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो. रस्त्याच्या कडेला हिंदी चित्रपटतार्‍यांची पोस्टर्स विकणार्‍याकडचं तिचं पोस्टर आजही हृदयाचा ठोका चुकवतं आणि तिची कहाणी आजही डोळ्यांत पाणी आणते. तिच्यासारखी तीच. कोण होती ती?

border2.JPG

चाँद, तू इस तरह इतराकर ना देख,
हमने भी कई चाँद देखें हैं|
तुम में तो दाग़ है,
हमने तो बेदाग़ देखें हैं|

हा शेर लिहिला गेला होता तो बहुतेक 'मुमताज़ बेग़म जहाँ दहलवी'साठी. ओळख पटली का? अंहं, गुगलायचं नाही हं अजिबात! ती होती लाखो-करोडो रसिकांच्या हृदयाची धडकन, स्वर्गातून उतरलेली खूबसूरत परी आणि एक अप्रतिम अदाकारा. तिचं खट्याळ हास्य वर्षांनुवर्षांच्या सीमा पार करून आजही मनावर गारूड करतं. तिचा अभिनय आजही जुन्या हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो. रस्त्याच्या कडेला हिंदी चित्रपटतार्‍यांची पोस्टर्स विकणार्‍याकडचं तिचं पोस्टर आजही हृदयाचा ठोका चुकवतं आणि तिची कहाणी आजही डोळ्यांत पाणी आणते. तिच्यासारखी तीच. कोण होती ती? मुमताज़ म्हणून जन्माला आलेली ती लाखो-करोडो मनांत कायमचं घर करून राहिली, ती देविकाराणींनी तिला दिलेल्या 'मधुबाला' या नावाने. पहा, तुमचा फुललेला चेहराच सांगतोय तुम्हीही तिचे चाहते आहात. चला तर मग, तुमच्या आमच्या लाडक्या मधुबालाच्या आठवणींत आज काही क्षण घालवूया.

तशी मधुबालाची चित्रपट कारकीर्द तिच्या वयाच्या नवव्या वर्षी सुरू झाली, पण तिला खर्‍या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती १९४९ साली आलेल्या 'महल' या चित्रपटानं. असं म्हणतात की, या चित्रपटामुळे मधुबाला आणि लता मंगेशकर या दोघींनी सुरैय्याच्या अभिनेत्री आणि गायिका या दोन्ही स्थानांना मोठा धक्का दिला. एक रहस्यपट म्हणूनही 'महल' हा हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाच्या वेळी मधुबाला उणीपुरी सोळा वर्षांची होती. खरं सांगायचं तर खूप उत्सुकतेनं मी हा चित्रपट पाहिला होता.. पण पाहून प्रचंड निराशाच पदरात पडली होती.. अशोककुमारचा चेहेर्‍यावरची रेषाही हलू न देणारा नायक मला अजिबात आवडला नव्हता आणि चित्रपटाची कथाही फारशी पटली नव्हती. कदाचित पिढ्यांचा फरक असावा! तरीही, क्षणात झोक्यावर आणि दुसर्‍याच क्षणी तळ्यातल्या नौकेत दिसणारी कामिनी तिच्या गूढरम्य अस्तित्वामुळे लक्षात राहिली होती. आजही टीव्हीवर 'आयेगा आनेवाला' लागलं, की मी खिळून राहते. 'ना जाने दिलकी कश्ती कब तक लगे किनारे' या ओळींनी तिच्या येणार्‍या आयुष्याची कथाच सांगितली होती का?

'हुस्न के लाखो रंग' म्हणतात ते काही खोटं नाही.. मधुबालाने तर या लाखो रंगांत आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या कित्येक छटा भरल्या. आता हेच बघा ना.. पावसाळा हा ऋतू आपल्यापैकी कित्येकांचा लाडका.. चोहोकडून भरून आलेलं आभाळ, मधूनच चमकणार्‍या विजा आणि सुटलेला थंडगार वारा.. प्रेमात पडलेल्यांना आपल्या प्रियतमेची आठवण होतेच. पण जे अजून प्रेमात पडलेले नाहीत तेसुद्धा या ऋतूत वेडेपिसे होऊन जातात. अशाच पावसाळी रुमानी हवेत आपल्या मैत्रिणींबरोबर बागडणारी मधुबालेसारखी रूपगर्विता दिसली तर काय अवस्था होईल पाहणार्‍याची? 'शामसे उनके तसव्वूरका नशा था इतना, नींद आयी है तो आँखोंने बुरा माना है' अशी हालत करून टाकणारं तिचं 'मिस्टर अँड मिसेस ५५'मधलं गाणं होतं- 'थंडी हवा काली घटा'

याच रुपगर्वितेला मग कुठेतरी, कधीतरी भेटतो असाच एक चितचोर.. बघता बघता तिच्या हृदयाचा ताबा घेऊन टाकतो तो.. बरं, त्याच गावातला असेल तर निदान रोज गाठीभेटी होतील. पण तो तर कुठल्या दूरदेशीचा मुसाफिर, थोड्या दिवसांचा पाहुणा. एक दिवस तो निघून जातो आणि हिचं मन त्याच्याबरोबरच जातं. 'फागुन' चित्रपटात हा चितचोर साकारला होता भारत भूषणनं. मागे राहिलेल्या प्रेमिकेची व्यथा मांडणारं सुरेख गाणं होतं- 'इक परदेसी मेरा दिल ले गया'.

या परदेसीसारखीच एक दिवस ही अस्मानीची परीसुद्धा अकाली आपल्यातून निघून गेली आणि मागे राहिलेले तिचे चाहते फ़राज़च्या ओळी म्हणत राहिले -

उस शक़्सको तो बिछडनेका सलिक़ा भी नहीं फ़राज़,
जाते हुए ख़ुद को मेरे पास छोड़ गया|

सौंदर्याच्या याच भावविभ्रमातलं एक रूप रुसलेल्या प्रियकराची समजूत काढणार्‍या प्रियतमेचं. हा रुसवा यायला एक का कारण असतं! ती 'येते' असं सांगून आलीच नाही म्हणून, उशिरा आली म्हणून, लवकर चालली म्हणून.. कारण काही का असेना पण तो रुसून गाल फुगवून बसतो, बोलत नाही, हसत नाही, पुन्हा भेटायला येणार नाही असं म्हणतो! मग तिला कळून चुकतं की आता सपशेल हार पत्करण्यावाचून पर्याय नाही. हा रुसलेला प्रियकर आहे 'काला पानी'मधला देव आनंद आणि त्याची मनधरणी करणारी त्याची प्रियतमा आहे मधुबाला. गाणं ओळखलं असेलच तुम्ही-अच्छा जी मैं हारी. नानाविध प्रकारे देवची समजूत काढू पाहणार्‍या मधुबालाला पाहून 'नशीबवान आहे लेकाचा...' अशीच भावना ही गाणं पहाणार्‍या प्रत्येक तरुणाची तेव्हा झाली असेल, आजही होते आणि पुढेही होतच राहील.

माणसाला जन्माला घालण्यापूर्वी ब्रह्मदेव म्हणे त्याचे श्वास मोजून देतो.. त्याच्या वाट्याला किती सुख यावं आणि किती दु:ख यावं, हेसुध्दा तो मोजून देत असावा. माझी खात्री आहे की मधुबालाने आपल्या वाटणीचं सुख आपल्या दानशूर स्वभावानुसार वाटून टाकलं असणार.. म्हणूनच पदरात न मावणारं दु:ख घेऊनच ती जन्माला आली.. आधी गरिबीचे चटके, मग लेकीच्या जीवावर चैन करणार्‍या वडिलांपायी लहान वयात तासन् तास करावं लागणारं काम, प्रेमभंगाचं जळजळीत दु:ख आणि लाखात एकालाच होतो असा, पण जीवघेणा आजार.

ग़मोंने बाँट लिया है मुझको आपसमें,
के जैसे मैं कोई लूटा हुआ ख़जाना था|

तिच्या जीवनाची हीच कहाणी असली, तरी ती काम करत राहिली. आपल्या रूपाची, अभिनयाची मोहिनी रसिकांवर घालत राहिली. हीरो तर सोडाच पण चित्रपटातल्या व्हिलन्सनाही तिचा मोह न पडला तरच नवल. म्हणूनच 'हावड़ा ब्रिज'मध्ये 'आईये मेहरबाँ, बैठिये जानेजाँ' म्हणत तिनं के. एन. सिंगचा पुरता मामा करून टाकला. तोही बिचारा दिलके हाथों मजबूर! म्हणून तर हे गाणं आपल्यासाठी नसून शेजारच्या टेबलाजवळ बसून स्मितहास्य करणार्‍या अशोककुमारसाठी आहे हे लक्षात आलं तरी तो फक्त एक भुवई उडवतो. एवढ्या सुंदर स्त्रीवर का रागवता येतं?

मधुबालाची म्हणे एक खासियत होती. तिच्या मनावर फार ताण आला की ती छोट्याछोट्या कारणांनी हसत सुटायची. मग तिचं हे हसू थांबता थांबत नसे. आता तिच्या खट्याळ हास्यावर फिदा असलेल्या चाहत्यांना ही पर्वणीच वाटेल, पण सेटवर मात्र काम खोळंबून राहत असे. सेटवर त्या वेळी असलेल्या एका तरी माणसाला हसणार्‍या मधुबालेला बघून फ़राज़च्या ओळी आठवल्या असतील का नाही कोणास ठाऊक, पण मला तरी फ़राज़नं त्या जणू तिच्यासाठीच लिहिल्यासारख्या वाटतातः

सुना है ज़िंदगी इम्तहाँ लेती है फ़राज़,
पर यहाँ तो इम्तहानों ने ज़िंदगी ले ली|

मधुबालाची आणि माझी पहिली ओळख 'चलती का नाम गाडी'ची. किशोरदांची जबरदस्त फॅन असल्यानं त्यांच्या 'मनू'साठी आणि चित्रपटातल्या गाण्यांसाठी हा चित्रपट मी सर्वप्रथम पाहिला खरा, पण नंतर अनेक वेळा पाहिला तो त्याचं 'पाँच रुपय्या बारा आना'चं बिल थकवणार्‍या त्याच्या प्रेयसीसाठीसुद्धा. 'चलती का नाम गाडी'तलं सर्वांत आवडतं गाणं कोणतं, असं विचारलं तर शंभरातले नव्व्याण्णव लोक 'एक लड़की भीगी भागीसी' हेच सांगतील. मीही अपवाद कसा असणार? पण या गाण्यासोबतच माझं अतिशय लाडकं गाणं म्हणजे 'हाल कैसा है जनाब का'. दरवेळी हे गाणं पाहताना मला हा प्रश्न किशोरकुमारसाठी नसून मधुबालाच्या दर्शनाने दिपलेल्या प्रेक्षकांसाठी आहे असंच वाटतं. आम्हां प्रेक्षकांचं काय हो?

तमाम उम्र तेरा इंतज़ार कर लेंगे,
मगर ये रंज रहेगा के ज़िंदगी कम है|

..अशी आमची हालत. तिचं आयुष्य तर कमी होतंच, आमचंही फार आहे अशातला भाग नाही.. पण या छोट्याशा आयुष्यातही काही हिरवळीच्या जागा आहेत, त्यातल्या एकीचं नाव 'मधुबाला' आहे, ही दैवाची कृपा काही कमी नाही.

तिला प्रत्यक्षात पाहिलेले लोक म्हणे म्हणायचे की, ती पडद्यापेक्षा कैकपटीने प्रत्यक्षात दिसायला सुंदर होती. हे लोक तिला कधी विसरू शकले असतील, असं मला तरी वाटत नाही. मागे एकदा एका एफएम चॅनलवर मधुबालाच्या एका बहिणीने एक किस्सा सांगितला होता. मधुबालाच्या शेवटच्या दिवसांत त्या दोघी टॅक्सीने कुठेतरी चालल्या होत्या. त्या टॅक्सीत बसताच काही वेळाने ड्रायव्हरने रेअर व्ह्यू मिररमध्ये बघत तिला ती मधुबाला आहे का? असं विचारलं. आजाराने खंगलेल्या मधुबालाच्या मनात त्यावेळी नक्की काय आलं असेल?, असं मला तेव्हाही वाटलं होतं. आपण पडद्यावर दिसत नाही तरी आपले चाहते आपल्याला विसरले नाहीत, याचा आनंद झाला असेल, की अशा अवस्थेत आपल्या चाहत्यांना आपल्याला पहावं लागतंय याचं शल्य असेल? काहीही असो, माझी खात्री आहे की तो टॅक्सीवाला जिवंत असेतो ही भेट त्याच्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा बनून राहिली असेल! उगाच नाही 'बरसात की रात'मध्ये भारत भूषण म्हणत 'ज़िंदगीभर नहीं भूलेगी वो बरसात की रात'.

चंद होते हैं जो सीने में उतर जाते हैं,
सबकी कमी महसूस हो ये जरुरी तो नहीं|

अशा अनेक लोकांच्या हृदयात प्रेमदेवतेचं स्थान मिळवलेल्या मधुबालाला वैयक्तिक जीवनात निखळ प्रेम मिळू नये हा कसला दैवदुर्विलास आहे मला माहीत नाही. कोणाला प्रेम मिळावं आणि कोणाला मिळू नये, याबद्दल नियतीचे काही नियम असतील तर ते निदान माझ्यातरी आकलनाबाहेरचे आहेत. मग आपण उगाच 'सगळ्यांना या जगात थोडंच सगळं मिळतं' असं काहीतरी बोलून स्वतःची समजूत घालतो. नको ना मिळू देत सगळं, पण निदान काय हवंय आणि काय नको, हे तरी ठरवण्याचा हक्क माणसाला हवा की नको? तो पण नाही मिळत. मग आपण सगळेच जन्मभर कोणत्या ना कोणत्या तरी मृगजळामागे धावत राहतो - पैशाच्या, प्रेमाच्या, निखळ मैत्रीच्या.. आत्ता नाही मिळालं, तर मग मिळेल या आशेपायी प्रयत्न करत रहातो. पण आपली अवस्था 'सीने में सुलगते हैं अरमाँ, आँखों में उदासी छायी है' अशीच असते.

दिवंगत अभिनेत्री मीनाकुमारीचा एक शेर आहे:

आग़ाज़ तो होता है, अंजाम नहीं होता,
जब मेरी कहानीमें वो नाम नहीं होता|

मधुबालाचं नाव काढलं की अशीच दोन नावं हमखास सोबतीनं येतात. त्यातलं एक किशोरकुमारचं - तिच्या पतीचं, तर दुसरं दिलीपकुमारचं. मधुबाला-दिलीपकुमार ही नावं जोडीनं घेतली की मागोमाग उल्लेख येतो तो के. असिफच्या 'मुग़ल-ए-आज़म'चा. मला स्वतःला दिलीपकुमार अजिबात आवडत नाही. मी 'मशाल' पाहिला आणि नंतर त्याचा एकही चित्रपट पहायचा नाही, असं ठरवून टाकलं. काही वर्षांपूर्वी 'मुग़ल-ए-आज़म' रंगीत होऊन आला होता तेव्हा मात्र हा नियम मोडून आईबाबांबरोबर मीही उत्साहानं पहायला गेले होते. पण पृथ्वीराज कपूर आणि दिलीपकुमार या दोघांचेही अभिनय पाहून त्या काळातल्या प्रेक्षकांच्या सहनशक्तीबद्दलचा माझा आदर वाढला. तुमच्यापैकी काही जण म्हणतील 'बंदर क्या जाने अद्रकका स्वाद'! हे खरं असेलही. पण या चित्रपटातल्या माझ्या लक्षात राहिलेल्या दोन व्यक्तिरेखा म्हणजे दुर्गा खोट्यांनी साकार केलेली जोधाबाई आणि मधुबालाची अनारकली - शीशमहालात निर्भयपणे 'जब प्यार किया तो डरना क्या' असं म्हणत हिंदुस्थानच्या बादशहासमोर राजपुत्र सलीमवरच्या आपल्या प्रेमाची कबुली देणारी एक मामूली क़नीज़. थिएटरमधून बाहेर पडले तरी बहारला बाणेदारपणे दिलेल्या उत्तरातले अनारकलीचे शब्द कानात घुमत राहिले:

मुहब्बत हमने माना ज़िंदगी बरबाद करती है,
ये क्या कम है की मर जानेमें दुनिया याद करती है|

पुन्हा एकदा गीतकाराने त्याच्याही नकळत मधुबालाच्या आयुष्याची चित्तरकथाच शब्दांतून मांडली. हा चित्रपट सुरू होताना बहरात असलेली मधुबाला-दिलीपकुमारची प्रेमकथा तो पूर्णत्वास जाईतो संपलेली होती.. एका कोर्टकेसमध्ये मधुबालाने वडिलांच्या दडपणाखाली येऊन दिलेल्या खोट्या साक्षीने हे नाजूक नातं कायमचं करपून गेलं होतं.. सलीम-अनारकलीची शोककथा खर्‍या जीवनात घडली होती.. अनारकली आयुष्यात एकाकी झाली होती.. आजही १४ फेब्रुवारी या तिच्या जन्मदिवशी सगळी एफएम चॅनल्स तिची गाणी लावतात तेव्हा वाटतं, दिलीपकुमारला तिची आठवण होत असेल का?

कौन देता है उम्रभरका साथ फ़राज़,
लोग तो जनाज़ेमें भी काँधे बदलते रहतें हैं|

नियतीला माहीत होतं की, मधुबालाला आयुष्यात अनेक जीवघेणे धक्के सहन करावे लागणार आहेत, म्हणूनच तिच्या हृदयाला आधीच विदीर्ण करून तिनं तिला या जगात पाठवलं. लहानपणापासून नीट निदान न झालेला हा आजार पुढे उपचारांचा फायदा होऊ न देण्याइतपत बळावला आणि वयाच्या केवळ छत्तीसाव्या वर्षी मधुबाला हे जग सोडून गेली ते रसिकांच्या स्मृतीत कायम एक चिरयौवना म्हणून राहायलाच. तिच्या लहानपणी म्हणे एका फकिराने तिच्या अकाली मृत्यूचं भविष्य वर्तवलं होतं. पण ते खोटं ठरावं असं त्यालाच काय पण मधुबालाच्या लाखो चाहत्यांनासुध्दा वाटलं असेल.

रोज हजारो-लाखो लोकांना घेऊन जाणारा मृत्यू त्याबद्दल कधी फारशी खंत करत असेल, असं मला वाटत नाही. पण माझी खात्री आहे की, मधुबालाला न्यायला आला तेव्हा त्यालासुद्धा 'आपण का आलो?' असंच वाटलं असेल. तिच्या आयुष्यासाठी त्यानेही दुवा मागितली असेल..

किसीकी बज़्म-ए-तरबमें हयात बँटती थी,
उमीदवारोमें कल मौतभी नज़र आयी|

मुमताज़महलसाठी फक्त शहाँजहाननं ताजमहाल बनवला, पण या मुमताज़साठी तुमच्याआमच्यासारख्या रसिकांच्या मनात लाखो-करोडो ताजमहाल उभे होते, आहेत आणि यापुढेही रहातील. जागेची सदोदित टंचाई असलेल्या मुंबईत मधुबालाची संगमरवरी कबर या वर्षीच तोडण्यात आली. जिवंत माणसांना जागा नाही तर या जगातून निघून गेलेल्यांना कुठून मिळणार? पण मधुबालाने याची चिंता करायचं काहीच कारण नाही.. सलीमपुढे उभ्या असलेल्या संगमरवरी पुतळ्याप्रमाणे या अनारकलीची छबी तिच्या चाहत्यांच्या मनात आहे. तिच्या जमिनीतल्या कबरीवर कुराणातल्या आयता कोरल्या होत्या. चाहत्यांच्या मनातली तिची छबी मात्र म्हणतेय -

मौजुदगी ज़रुरी नहीं, ज़रुरी एहसास है,
हम कहीं दूर नहीं, आपके आस-पास हैं,
देखिये तो ज़रा मन की आँखोंसे,
हम हर क़दम आपके साथ हैं|

-----

तळटीप - या लेखातल्या सर्व शेरांच्या ओळी एसएमएसमधून आलेल्या आहेत.

- स्वप्ना_राज

Taxonomy upgrade extras: