सचिन रमेश तेंडुलकर !

सचिन 'वन्डर किड' आहे आणि वन्डर 'किड'च राहणार. त्याच्याबरोबरच्या खेळाडूंच्या पिढ्या बदलल्या, तरी हा मात्र अजून तितकाच तरूण राहत, तेवढ्याच तडफेने खेळतो आहे. तुम्ही काही म्हणा हो, तेंडल्या, सच्या, सचिन भाई, पाजी की अन्य काही, सचिनचा खेळ बघत लहानाचे मोठे झालेल्या आम्हाला सचिन म्हणालं की काही गोष्टी समोर दिसायला लागतात. त्यातील पहिली म्हणजे त्याचे निरागस हसू अन दुसरे म्हणजे त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह.

border2.JPG

भा

रत विरुद्ध इंग्लंड, सन १९९०, मैदान ओल्ड ट्रॅफर्ड, लंडन.

गूच, आथरटन, स्मिथ हे तिघेही शतकं ठोकतात. इंग्लंडचा संघ ५१९ एवढी धावसंख्या नोंदवतो. उत्तरादाखल भारत सर्व बाद ४३२; त्यात अझरच्या लक्षणीय १७९. दुसर्‍या डावात इंग्लंडच्या ३२०. आधीची आघाडी व आत्ताच्या धावा मिळून भारतासमोर ४०८ धावांचे लक्ष्य आणि थोड्याच वेळात भारत ५ बाद १२७. सर्व मोठे खंदे वीर, म्हणजे अझर, मांजरेकर, सिद्धू, शास्त्री वगैरे तंबूत परतलेले! पूर्ण दिवस बाकी आणि अशा वेळी मैदानावर भारताचा शेवटचा 'नियमित फलंदाज' म्हणून एक बारकासा पोरगा उतरतो. वय वर्षे १७. आकाशाकडे पाहत तो मैदानात येतो, सलग चार तास घाम गाळत, ५ विकेट गेलेल्या असूनही अजिबात निराश न होता, दडपण न घेता हा वामन आधी कपिलदेव अन् नंतर मनोज प्रभाकरच्या साथीने किल्ला लढवतो. दिवसअखेर भारताची धावसंख्या ३४३ आणि त्यात त्याच्या ११९. सामना अनिर्णित अवस्थेत संपतो. कसोटी वाचवल्यामुळे सामन्यात एकूण पाच इतर शतकवीर असताना सामन्याचा मानकरी ठरतो तोच... सचिन !

भारत विरुद्ध श्रीलंका, सन २०१०, मैदान पी सारा ओव्हल, कोलंबो.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमधली पहिली भारताने गमावलेली असते, दुसरी अनिर्णित तर तिसरीत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ४२५ धावांचा डोंगर उभा केलेला असतो. पहिल्या डावात भारताचे सर्व बाद ४३६. नंतर दुसर्‍या डावात श्रीलंकेने २५८ धावा उभ्या केलेल्या असतात, पण खेळपट्टीचं स्वरूप बदलून बॉल प्रचंड वळायला लागतो. भारताने चौथ्या दिवसअखेर कशाबशा ४९ धावा, त्या पण तीन महत्त्वाच्या गड्यांच्या मोबदल्यात जमवलेल्या असतात. शेवटचा दिवस महत्त्वाचा; काहीही होऊ शकेल अशी परिस्थिती असते. संघातला सर्वांत अनुभवी फलंदाज सचिन आणि जोडीला लक्ष्मण. दोघे मिळून हातभार वळणारे बॉल खेळून काढत पहिले सत्र टिकवतात. तेंडल्याच्या फक्त ५४ धावा पण अतिशय महत्त्वाच्या. भारत जिंकतो!

हा लेख लिहीपर्यंत सचिनने खेळलेली ही शेवटची कसोटी. वर लिहिलेली पहिली कसोटी ही त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळींपैकी आहे; तर दुसरी मला सर्वोत्कृष्ट वाटते कारण त्या घटकेला २-० की १-१ हा प्रश्न होता. मी अशा कितीही खेळी दिल्या तरी त्या कमीच पडणार. कारण १९८९ ते २०१० अशा प्रदीर्घ कालावधीत हा माणूस तितक्याच उत्साहाने, तडफेने खेळत आहे. 'सर्वोत्कृष्ट' म्हणता येतील अशा कितीतरी खेळी या वीस वर्षांत होऊन गेल्या आहेत.

sachin_tendulkar.jpgदिवाळी अंकासाठी नियोजित विषयांपैकी एकावर लेखन करायचे ठरले. तरुणाईसंबंधी विषय समोर दिसल्यावर विषय नक्की झाला, 'सचिन रमेश तेंडुलकर' ! आता तुम्ही विचाराल हा माणूस ३७ वर्षांचा आहे, त्याचा नि तरुणाईचा काय संबंध? महाराजा, सचिन 'वन्डर किड' आहे आणि वन्डर 'किड'च राहणार. त्याच्याबरोबरच्या खेळाडूंच्या पिढ्या बदलल्या, तरी हा मात्र अजून तितकाच तरूण राहत, तेवढ्याच तडफेने खेळतो आहे. तुम्ही काही म्हणा हो, तेंडल्या, सच्या, सचिन भाई, पाजी की अन्य काही, सचिनचा खेळ बघत लहानाचे मोठे झालेल्या आम्हाला सचिन म्हणालं की काही गोष्टी समोर दिसायला लागतात. त्यातील पहिली म्हणजे त्याचे निरागस हसू अन दुसरे म्हणजे त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह. आपण तर त्याचा बॅटीइतकेच त्याच्या व्यक्तिमत्त्वावरपण फिदा आहोत. पुरुषोत्तमांत जसा राम तसा क्रिकेटमध्ये आमचा सच्या! दुसरा रामच जणू. हां, हे फक्त मी म्हणत नाही बरं का, हे पहा - 'In India, where cricket is worshiped by people of every caste, colour and creed, Tendulkar is the symbol of something more then a game.' - Joe Leahy, The Financial Times.

काय आठवू नि किती आठवू हा प्रश्न लता आणि सचिन दोघांच्याही बाबतीत पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सचिनवर लिहायचं असं ठरवलं खरं पण सुरुवात कुठे करावी आणि थांबवावं कुठे हे मला काही केल्या कळेना. म्हणजे नक्की कशाबद्दल लिहायचं? त्याच्या फलंदाजीबद्दल, गोलंदाजीबद्दल की एकूणच भारतीय क्रिकेटमधल्या त्याच्या योगदानाबद्दल? त्याच्या कप्तानपदाच्या फसलेल्या कारकीर्दीबद्दल बोलायचे की टेनिस एल्बोबद्दल? नक्की कुठली मालिका, कुठली खेळी निवडायची, असे फार प्रश्न पडले. पण हर्षा भोगले मदतीला धावून आला. "He looks upon this game as a vehicle of fulfillment, as a servant rather then a master. There is a delicious irony to it. One of the most humble devotees of the game is himself an idol to so many" - हर्षा भोगले.

'उतणार नाही मातणार नाही, फालतू बॉल सोडणार नाही', असा वसा घेतलेला आपला सच्या. आजकालचे खेळाडू चार पैसे गाठीला पडले की लगेच 'हम करे सो कायदा' म्हणतात. त्यांना म्हणे आता अनिल कुंबळे 'पैसे मिळाल्यावर पण बॅलन्स्ड की काय ते कसे राहायचे' हे शिकवणार. खुद्द सचिन त्यांच्या सोबत असतो, त्याच्याकडून शिका म्हणावं. मी जरा वाहवत गेलो नाही का? होतं असं. काय करणार सचिन है भाई!
तर आज मी त्याच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेत, त्याच्याविषयीच काही 'जाणकार' लोक 'सचिन मॅच विनर नाही' किंवा 'एन्डुलक'र वगैरे सारखी बडबड करत फिरत असतात, त्याबद्दल लिहायचा प्रयत्न करणार आहे. हा लेख लिहिता लिहिता आठवणींतील काहीच खेळी मी लिहिणार आहे. त्याच्या अनेक उत्कृष्ट खेळींबद्दल मी इथे लिहू शकणार नाही, पण म्हणून त्या उत्कृष्ट नाहीत असे नाही तर केवळ विस्तारभयास्तव मी त्यांबद्दल लिहिणार नाही.

सचिनची फलंदाजी ही एकुणातच भारतीय फलंदाजीपेक्षा वेगळी आहे. खास करून 'क्लासिकल मुंबई बॅटिंग' पद्धतीच्या अगदी विरुद्ध असणारी. जेव्हा सचिन भारतीय क्रिकेटमध्ये आला तेव्हा क्रिकेटमधलं 'ब्लू ब्लड' समजला जाणारा मांजरेकर, रवी शास्त्री, त्या आधी सनी गावस्कर हे सर्व खेळाडू 'क्लासिकल मुंबई बॅटिंग' पद्धतीने खेळणारे होते. खेळाच्या सुरुवातीचे एक-दोन तास गोलंदाजीबद्दल आदर दाखवत खेळून काढायचे व त्यानंतर पूर्ण दिवस गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायचे. सचिनच्या आधी, एखादा चांगला चेंडू किती उत्तम तंत्राने खेळला गेला किंवा एखाद्याचा ऑफ ड्राईव्ह किती नियमपुस्तिकेप्रमाणेच होता अशा चर्चा क्रिकेटजगतात व्हायच्या. पण यात झाले काय होते की, सर्वजण या 'टेक्निक'मध्ये अडकून बसले. पण 'आऊट ऑफ बॉक्स' (किंवा मी त्याला 'आउट ऑफ कॉन्फिडन्स झोन' म्हणेन) फटके कोणीही मारायचे नाहीत. पण सचिनने हे बदलले. आक्रमक गोलंदाज असला की तो त्याचा अंदाज येईपर्यंत अवधी देतो व नंतर त्याच्या गोलंदाजीची पिसं काढतो. 'हिटिंग थ्रू द लाईन' हेच मुंबईकर फलंदाजांचे वैशिष्ट्य असताना हा माणूस बेफिकिरीने तो बॉल मैदानात कुठेही भिरकावून देतो, अचाट अन् पुस्तकात नसणारे शॉट्स् प्रत्यक्षात खेळून दाखवतो. मला ऑस्ट्रेलियाविरुध्दची मागची मालिका आठवतेय. त्यात ब्रेट ली वगैरे मंडळी भरधाव वेगात बाउन्सर्स टाकत होती. सच्याने पहिले दोन बाउन्सर्स 'वाचले', तिसर्‍याला स्लिप व किपरच्या डोक्याच्या वरुन नुसती हलकीशी बॅट लावून सीमापार केले. ली थक्क! या त्याच्या वैविध्यपूर्ण, अनोख्या शॉट्समुळेच कदाचित त्याचा स्वतःचा उत्साह आजही वीस वर्षांनंतर कायम राहिला असावा. साहजिक आहे, खुद्द सचिन ज्याला खेळातील 'रोल मॉडेल' माणतो तो जॉन मॅकॅन्रो नेहमीच 'आऊट ऑफ बॉक्स' खेळायचा.

सचिन खेळायला येताना उद्दिष्ट ठरवून येतो व ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. तो फार आग्रही माणूस आहे. उदाहरणादाखल त्याची शारदाश्रम शाळेतली मॅच आठवा. सेंट झेव्हियर्स विरुद्ध ६६४ धावांचा विक्रम होताना त्याला व विनोद कांबळीला त्यांच्या कोचने अनेकदा बोलावून डाव घोषित करायला सांगितला. सचिनने त्या वयातदेखील ठामपणे 'नाही' हे उत्तर देऊन ही विक्रमी भागीदारी रचली. असं म्हणतात की 'वंडर किड्‌स्‌ अनाऊन्स देमसेल्व्ज्‌' आणि सचिनने वयाच्या पंधराव्या वर्षी स्वतःला असे 'अनाऊन्स' केले असावे. मी या खेळीबाबत एक मजेशीर उतारा 'If Cricket is Religion, Sachin Is God' या पुस्तकात वाचला आहे ज्याचा उल्लेख केल्याशिवाय हा मुद्दा स्पष्ट होणार नाही. पी. जी. वुडहाऊसच्या एका गोष्टीतील माईक अशाच प्रकारची इनिंग खेळून २२७ धावा काढतो, त्यालाही इनिंग डिक्लेअर करावीशी वाटत नाही, तो कोचशी भांडतो. सचिन आणि कांबळीची ही इनिंग वेल डॉक्युमेंटेड आहे. वुडहाऊस सचिनने वाचले नसावे कदाचित, पण कादंबरीतील माईकला प्रत्यक्षातील सचिनने उभे मात्र केले. पुस्तक लिहिणार्‍यांनी एकदम मस्त उदाहरण शोधून काढले आहे.

आंतरराष्ट्रीय पदार्पण

सचिन खरा पदार्पण करायचा तो विंडीजविरुद्ध आणि ते ही विंडीजमध्येच. १९८८-८९मध्ये विंडीजकडे एक नव्हे चारचार मुलूखमैदान होत्या. मार्शल, अ‍ॅम्ब्रोज, बीशप आणि वॉल्श. भारताचा या दौर्‍यात ३-० ने पराभव झाला. खेळाडू एकदा विंडीज दौर्‍यावर गेला की हातपाय शाबूत न राहताच परत यायचा. म्हणून भारतानं सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पदार्पण विंडीजमध्ये घडवून आणलं नाही. तो खेळला असता तर कसा खेळला असता हे चित्र मात्र मी मनात अनेकदा रंगवतो. पण लगेच सुरू होणार्‍या पाकिस्तान दौर्‍यावर मात्र त्याला पाठवले गेले. तिथेही इम्रान खान, वासिम अक्रम, वकार युनूस आणि अब्दुल कादिर हे वीर होतेच. पण त्यांची गोलंदाजी त्यानं लीलया खेळून काढली. मुश्ताक अहमद, जो तेव्हा नवीन होता, त्याला एका प्रदर्शनीय सामन्यात सच्याने दोन षटकार मारले. तर लगेच कादिर येऊन त्याला म्हणाला, "बच्चे को मार रहा क्या, जरा मुझे मार के दिखा". कादिरच्या त्या ओव्हरमध्ये काय झालं ते पहा - ६,०,४,६,६,६. एका तळपत्या सूर्याचा जन्म झाला होताच, पण तो सूर्य आहे हे तिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वीरांसमोरच कळले.
दॅट प्रूव्हज् हू'ज् द बॉस!

विसाव्या वर्षापर्यंत त्याने पंचवीस कसोटी सामन्यांत ४४.७६ च्या सरासरीने १५२२ धावा ठोकल्या. पाच शतकं आणि आठ अर्धशतकं, ती पण ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड अशा बलाढ्य प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध! नुसत्या आकडेवारीत राम नसतो हे मान्य केलं तरी ही आकडेवारी विसाव्या वर्षी? त्यातील पर्थमधल्या शतकाबद्दल रिची बेनाँने खुद्द ऑस्ट्रेलियात एका ऑस्ट्रेलियन नसणार्‍या व्यक्तीची सर्वोत्तमांमध्ये गणना केली. ते साल होतं १९९३. आणि १९९६मध्ये तर खुद्द सर डॉन ब्रॅडमन यांनी त्याची एक खेळी टिव्हीवर पाहत असताना आपल्या पत्नीला बोलावून 'हा मुलगा माझ्यासारखा खेळतो' असं सांगितलं. १९९६च्या आसपास सचिनची तुलना सर डॉन ब्रॅडमनबरोबर सरसकट सर्वच जण करू लागले. सचिन तेव्हा एकदिवसीय सामन्यांमध्ये मधल्या फळीतच खेळत असे. ५६ सामन्यांमध्ये त्याने तोपर्यंत १५२० धावा गोळा केल्या होत्या. गंमत म्हणजे त्याची तुलना ज्या आजीमाजी दिग्गज खेळाडूंशी केली जाते वा जात होती त्या ब्रायन लारा, पॉन्टींग, द्रविड, गिलख्रिस्ट, स्टिव वॉ या सर्वांनी त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत एकही कसोटी वा एकदिवसीय सामना खेळला नव्हता !

वीस वर्षांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीत तो अनेकदा यशाच्या शिखरावर गेला व तिथून परत आला. त्या सर्वच शिखरांबद्दल मी लिहायची गरज नाही. रवी शास्त्री म्हणतो, १९९६ साल हा सचिनचा 'पीक' होता, कारण ५३.७०च्या सरासरीनं त्या एका वर्षात १६११ धावा त्यानं काढल्या. १९९६ हे विश्वचषकाचं वर्ष. त्यानं वर्ल्डकपमध्ये त्या वर्षी धावांचा विक्रम केला. मग तसं पाहिलं तर २००३चा विश्वकप तरी का विसरा? त्याने त्या विश्वकपमध्येही विक्रमी धावा केल्या आहेतच. (एकूण फक्त ६७३!! ). हवं असल्यास त्याच्या धावांची ही वर्षनिहाय कामगिरी बघा.

तक्ता - सचिन : एक सिंहावलोकन

sachin Chart ek sinhavalokan.gif

२०१०मधील आकडेवारी ही सप्टेंबरपर्यंतचीच आहे. दोन्ही प्रकारांत मिळून त्याने एका वर्षात २०००च्या वर धावा कितीदातरी केल्या आहेत. १९९६ ते २००२ पर्यंत सलग २०००च्या आसपास धावा दरवर्षी आजपर्यंत किती जणांनी काढल्या आहेत? किंवा अगदी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत सलग सहा वर्षं कामगिरीत इतकं सातत्य कुणी दाखवलं असेल? म्हणूनच सचिनचे अनेक 'पीक' होते असं मला स्वत:ला वाटतं.

त्याचा पहिलावहिला 'ओपनर' म्हणून खेळलेला एकदिवसीय सामना. २७ मार्च १९९४ हा दिवस प्रत्येक क्रिकेटप्रेमी लक्षात ठेवेल. त्यादिवशी प्रथमच सचिन ओपनर म्हणून येत होता, ते पण न्यू झीलंडविरुद्ध. त्यानं ४९ चेंडूंमध्ये ८२ धावा काढल्या. पुढे जे काही झालं ते सर्वांना ज्ञात आहे. त्या दिवसापासून एकदिवसीय सामन्यांमधली दुसर्‍या क्रमांकाची जागा सचिनने कधीच सोडली नाही. विस्डेनने त्याची वेस्ट इन्डिजविरुद्धची कलकत्ता येथे केलेलेली १७६ धावांची खेळी 'बेस्ट टेस्ट इनिंग' म्हणून घोषित केली आहे. ४ बाद ८७ अशी धावसंख्या असताना सचिन आणि लक्ष्मण दोघे उभे राहिले आणि सामना वाचवला. अशा किती खेळी लक्षात ठेवाव्यात? गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौर्‍यावर आला होता तेव्हा ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ३५० धावा केल्या. प्रत्युत्तरार्थ भारताने ३४७ धावा केल्या, तेंडुलकरने १७५! तो बाद झाला तेव्हा ३ षटकांमध्ये १८ धावा काढायच्या होत्या आणि दोन मुख्य फलंदाज खेळत होते तरी भारत हरला. तो खेळपट्टीवर नसण्याची किंमत म्हणजे हातातले सामने जातात. रवींद्र जडेजा नावाच्या स्वतःला फलंदाज म्हणविणार्‍याकडून त्या धावा झाल्या नाहीत. पण सचिनने दडपणातही ४७ षटकं उभं राहून १७५ धावा काढल्या.

ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणं त्यानं सहजशक्य करुन दाखवलं आहे. १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियातील पहिलावहिला कसोटी मालिका विजय पण भारताने नोंदवला आहे. १९९८ या त्याच्या 'पीक'मध्ये एकूण सहा अंतिम सामन्यांत त्यानं भारताला जिंकून दिलं आहे आणि त्या वर्षभरात अंतिम सामन्यांमध्ये १५५.५ च्या सरासरीने चार शतकं ठोकली आहेत. (त्याला 'डेझर्ट स्टॉर्म इनिंग्ज्‌' म्हणतात. आठवा... शारजातील ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन्ही सामने! दोन्हींत सचिननं शतकं ठोकली होती.)

बॉडीलाईन टू बोअरिंगलाईन

क्रिकेटच्या इतिहासात विरुद्ध संघाच्या फक्त एका खेळाडूला लक्ष्य करुन संपूर्ण संघाची व्यूहरचना ठरवण्याची वेळ दोनदाच आली आहे आणि दोन्ही वेळेस इंग्लंडनंच असं केलं आहे. क्रिकेटमधील 'बॉडीलाईन बोलिंग' कोणाला आठवणार नाही? बॉडीलाईनबद्दल मी बोलणार नाही, फक्त आठवण करुन देतो कारण या दोन्ही लाईन (बॉडी व बोअरींग) टाकणारे वीर होते इंग्लंडचे व या दोन्ही सहन करणारे वीर जगातील महान फलंदाज म्हणून ओळखले जातात. एक सर डॉन ब्रॅडमन, दुसरा आपला सच्या!!

या दोन्ही लाईन चालविणार्‍यांमध्ये भारत हा दुवा आहे हा केवळ योगायोग म्हणावा का? बॉडीलाईन चालविणारा डग्लस जार्डीन अन बोअरिंगलाईन चालवणारा नासिर हुसेन - दोघंही जन्माने भारतीय! नासीर म्हणतो, "I wanted (Matthew) Hoggard to bowl a yard outside off-stump to him (Tendulkar) with an 8 -1 field. I wanted Freddie Filntoff to come rount the wicket to him every now and then and try to hit him in the ribs, with two men out on the hook and a short leg to unsettle him". नासीर दुसरं काय करु शकत होता? तेंडल्या वाट्टेल तिथे रन काढू शकत होता; मग अशी बोअरिंग लाईन टाकून इंग्लंडचा पराभव तरी टाळता येणं शक्य होतं. भारत दौर्‍याआधी इंग्लंडनं सपाटून मार खाल्ला होता. इंडिया ए विरुद्धचा सामना झाल्याबरोबर BBC Sports Lineमध्ये रिचर्ड जॉन्सनने लिहिले होते, "The positive for the bowlers was that they're working out their game plans more clearly". मॅथ्यु हॉगर्डने काही षटकं ९ -१ ने टाकली होती. तेंडुलकरला अशी गोलंदाजी टाकून तो आऊट होणार नाही हे हॉगर्डने पहिला बॉल टाकायच्या आधीच सर्वांच्या लक्षात आलं होतं. तेंडल्याने त्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ७६.७५ च्या सरासरीनं ३०७ धावा काढल्या. नासीरने ३-० ऐवजी १-० अशी हार पत्करली यातच समाधान मानलं. तेंडुलकर याबद्दल म्हणतो, "There was no stage where he broke any laws. He was a great tactician." सचिनला असणारा दुसर्‍या खेळाडूबद्दलचा आदरच यातून दिसून येतो.

Walking Wicket / Endulkar Era

२००५-०६ चा काळ तेंडुलकरसाठी इतका खराब होता की 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये 'Endulkar' नावाचा लेख आला होता. गेल्या दोन-एक वर्षांपासून राहूल द्रविड ज्या स्थितीन जातोय, अगदी तशाच स्थितीतून तेंडुलकर २००५ ते २००६च्या अंतापर्यत जात होता. २००५मधली त्याची कसोटी सरासरी २७.९१, तर २००६मध्ये ३३.१६ होती. या काळात तो 'चालती फिरती विकेट' होता. कुणी नवशिका गोलंदाजही त्याची विकेट लीलया घेत असे. त्यामुळे 'क्रिक इन्फो इंग्लंड'च्या एका वार्ताहरानं त्याला 'वॉकिंग विकेट' अशी पदवी बहाल केली. त्याला कारणही तसंच होतं. खुद्द मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यानं पहिल्या डावात एकवीस चेंडूंवर (फक्त) एक धाव काढल्यावर प्रेक्षक वेडे झाले. मुंबईमध्ये वानवखेडेवर तो आला की त्याच्या प्रत्येक धावेला 'सच्या सच्या' अशी साद घातली जाते. पण त्याला त्याच्या घरच्या, त्याच्या आवडत्या मैदानावर मानहानी पत्करावी लागली. त्या आधी २००६च्या जानेवारीत अख्ख्या पाक सिरीजमध्ये त्यानं फक्त ६३ धावा काढल्या. त्यात सर्वांत जास्त किती तर २६! इतकंच नाही तर मोईन खानसारख्या टुच्च्या खेळाडूनं लिहिलं की, "शोएब अख्तरच्या गोलंदाजीला सचिन घाबरतो. त्यामुळे तो यायच्या आधीच सचिन आऊट होतो."

हा पूर्ण कालावधी सचिनसाठी खराब होताच पण त्याचं मानसिक विश्लेषण करता जे दिसून येतं, ज्याला 'झॉम्बी इन द ब्रेन' हे नाव आहे, त्यावर श्री. व्हि. एस. रामचंद्रन आणि सॅन्ड्रा ब्लॅकेस्ली यांनी अभ्यास केला आहे. गंमत म्हणजे मी ते वाचलं अन अहो आश्चर्यम!.. वय वर्षं तेहेतीस हा फॅक्टर सोबर्स, गिलख्रिस्ट, हेडन, गावस्कर, बायकॉट, द्रविड, मियांदाद, ग्रेग चॅपल या सर्वांनाही लागू झाला होता. या काळात डोळ्यांना दिसणारा चेंडू, मेंदूद्वारे हातापर्यंत पोहचायच्या आत निघून गेलेला असतो. त्यामुळे फटके नीट खेळले जात नाहीत. महान तेंडुलकरपण त्याची शिकार झाला असण्याची शक्यता आहे.

अशातच २००७चा 'वर्ल्डकप फियास्को' झाला. आणि इयान चॅपलचे ते कुप्रसिद्ध वाक्य प्रसिद्ध झाले. "If Tendulkar had found an honest mirror and asked the question: ‘Mirror, mirror on the wall who is the best batsman of all?’ It would’ve answered: ‘Brian Charles Lara’. If he asked that same mirror right now: ‘Mirror, mirror on the wall should I retire?’ The answer would be: ‘Yes.”

इयान चॅपलचं हे आव्हान त्यानं स्वीकारायचं ठरवलं. लगेच पुढच्या २००७च्या मोसमात त्याचा खेळ असा होता.

तक्ता : २००७मधील त्याच्या धावा.

sachin chart runs scored in 2007.gif

सचिन बडबड करण्यापेक्षा बॅटीने सर्वांना गप्प करण्यावर विश्वास ठेवतो. आता विचारा, "Mirror mirror on the wall, should I retire? Mirror would reply, "Are you kidding, Chappell?"

सचिनवरचे इतर आरोप

एक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे तेंडुलकर हा मॅच विनर नाही, तो सरासरी वाढवण्यासाठी खेळतो. हा आरोप इम्रान खानने सर विव्हियन रिचर्ड्‌स्‌शी तुलना करत तेंडुलकरवर लावला आहे. तर तेंडुलकर महत्त्वाच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगला खेळत नाही असं कपिल देव म्हणाला आहे.

मला आठवतो हिरो कपमधला उपांत्य सामना! भारत हरल्यातच जमा होता. दक्षिण अफ्रिकेला एका षटकात फक्त ६ धावा हव्या होत्या अन त्यांचे दोन फलंदाज शिल्लक होते. अझर, कपिल आणि सचिन एकत्र येउन चर्चा करत होते. लक्षात घ्या सन १९९३ आणि सचिनचं मत, तेव्हाही तो तुलनेने लहान असताना, कपिल, अझरसारखे दिग्गज विचारात घेत होते आणि अचानक सचिनला हातात चेंडू घेताना पाहिलं. लिहितानादेखील काटा उभा राहतोय अशी ती मॅच. पहिल्या चेंडूवर डि व्हियर्स रन आऊट झाला, पुढचे तीन चेंडू त्याने डॉट टाकले आणि उरलेल्या दोन चेंडूंवर आफ्रिकेला एक, एक धावच घेता आली. असे होऊन भारत जिंकला. भारतासाठी सचिननं आपली कारकीर्द पणाला लावलेली पाहिली. ही ओव्हर तुम्हाला http://www.youtube.com/watch?v=MiUWDiDE9Zg इथे पाहायला मिळेल. अजित वाडेकर तेव्हा भारताचा प्रशिक्षक होता. त्यानं त्याच्या आठवणींत सांगितलं की त्यानं अझरला निरोप पाठविला होता की कपिलला शेवटची ओव्हर टाकूदेत, पण सचिननं व संघानं ते ऐकलं नाही. पुढे इतिहास घडला. दुर्दम्य आत्मविश्वास व स्वतःबद्दलची खात्री या माणसाकडे आहे आणि तो असेपर्यंत काहीही होऊ शकतं असं म्हणतात तेच खरं !

याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या सामन्यांबद्दल मी लिहू इच्छितो. २००२मधली त्याची लीड्‌स्‌वरील १९३ धावांची खेळी घ्या किंवा आपल्या वीरुच्या त्रिशतकामुळे गाजलेला मुलतानचा सामना घ्या. त्यात सचिनने १९४ धावा काढल्या होत्या हे विसरता येत नाही. वा जोहान्सबर्गमधील केवळ ४४ धावांची खेळी घ्या. त्या सामन्यात आपण दक्षिण अफ्रिकेला केवळ ८४ धावांमध्ये बाद केलं होतं. चेन्नईमधली कुठलीही खेळी अगदी डोळे झाकून घ्या. सचिन डिलिव्हर्स!

२००३मध्ये आपण विश्वकप जिंकलाही असता पण अंतिम सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना आपल्या गोलंदाजांनी दबावाखाली गोलंदाजी केली आणि तिथेच सामना संपला. या सामन्याबाबत लाराची आठवण येथे सांगावी लागेल. सचिन पहिल्याच षटकात बाद झाला अन् लाराने टिव्ही बंद केला. लाराला ऑस्ट्रेलियात वर्णभेदी वागणूक मिळाल्यामुळे तो अर्थातच भारताच्या बाजूने होता. पण सचिन गेल्यावर अगदी त्याचाही धीर संपला. हवंच तर २०००मधील ICC नॉकाउट फायनलचे उदाहरण घ्या, तिथे ओपनिंग पार्टनरशिप (गांगुली आणि सचिन) १४१ धावांची होती, ज्यात ६९ बॉल्समध्ये सचिनने ८३ धावा काढल्या आणि इतकी चांगली ओपनिंग होऊनही सचिन गेल्यावर डाव कोसळला व भारताच्या फक्त २६४ धावा झाल्या. त्या मॅचमध्ये सचिनने १० ओव्हर्स टाकून केवळ ३८ धावा देत एक विकेट घेतली. पाँटिंग, लारा किंवा रिचर्डस ह्यांनी असे केले आहे का? किंवा २००४मधली कोलंबोची फायनल घ्या. लंकेने फक्त २२८ धावा काढल्या, प्रत्युत्तरार्थ भारत कसा खेळला बघा, सचिन १०० बॉल, ७४ धावा, त्यानंतर सर्वांत जास्त झहिर खानने धावा काढल्या, त्या किती? तर २८ आणि भारत ९ बाद २०३, निकाल हार. सचिन - १० षटकांमध्ये ४० धावा २ गडी बाद केले. असे असल्यावर मग मला सांगा सचिनला दोष कसा देता येईल? क्रिकेट संघामध्ये ११ लोक असतात व त्यांनी सांघिक खेळ करायला पाहिजे तरच जिंकता येईल.

सचिन मॅच विनर ठरतो की नाही हे अजून एका पद्धतीने पाहता येईल. आपण एकदिवसीय सामन्यांबद्द्लचा 'मोस्ट प्लेअर ऑफ द मॅच' हा तक्ता पाहू. 'सामनावीर' पुरस्कार सर्वाधिक वेळा मिळालेल्या पहिल्या १० खेळाडूंची ही यादी आहे.

sachin Chart Most Player of the Match Awards.gif

तक्ता असे सुचवतो की सचिनची तुलना ज्यांचा सोबत केली जाते उदाहरणार्थ पाँटिंग, लारा, रिचर्ड इत्यादी, हे सर्व टॉप १०मध्ये तर आहेत पण टॉप वर नाहीत. नं १वर अजूनही ६१ वेळेस मॅन ऑफ द मॅच मिळवून सचिनच आहे.

त्याची इतरांच्या दृष्टीने कमी महत्त्वाची पण त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची मॅच आठवतेय. त्याच्या आदल्या दिवशी रमेश तेंडुलकर वारले, सचिनने केनियाविरुद्ध १४० नाबाद खेळी केली. तसेच १९९७मध्ये केपटाऊनला भारत ५ बाद ५८ असताना त्याने व अझरने केलेले शतक कोणी कसे विसरेल? (सचिन १६९ आणि अझर ११५). अशा किती मॅच आठवायच्या?

शिवाय हा तक्ता बघा.

sachin-chart-sachin richards comparison.gif

ह्यातील जिंकण्याच्या टक्केवारीवर भर देण्यात आला. सर्वच तुलना निव्वळ आकडेवारी पाहून होत नाही, त्याची पार्श्चभूमीही पाहावी लागते हे तुलना करणार्‍यांना कोण सांगणार? हा मुद्द्याबद्दल मी पुढे सर विव्हियन रिचर्डच्या तुलनेत उत्तर देईन.

सचिनवरचा आणखी एक आरोप म्हणजे त्याचा महत्त्वाच्या अशा फायनल्समधील खेळी. एप्रिल १९९९पासून सप्टेबर २००५पर्यंत भारत एकूण २१ फायनल खेळला पण त्यातील किती जिंकल्या? फक्त एक. ह्या फायनल्सच्या आकडेवारीतून सचिन फायनल खेळताना डिलिव्हर करत नाही, असा एक प्रचार सुरु झाला. त्यात मांजरेकर, किर्ती आझाद, मनिंदरसिंग अशांनी भाग घेतला. इतकेच नाही तर परत २००७मध्येच इयान चॅपल हे त्याला तो फक्त आकडेवारीसाठी खेळतो असेही म्हणाले.

मध्यंतरी सचिन आऊट झाला की लोक टिव्ही बंद करुन चालायला लागत असत. म्हणजे सचिन खेळत असला तर भारताला अजूनही जिंकण्याची संधी आहे हे जनता गृहित धरत होती हे कशाचं द्योतक म्हणायचं? म्हणजे आम्ही आमचा एकच खेळाडू तुमच्या ११ प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळवणार व तुम्ही वर म्हणणार की सचिन आकडेवारीसाठी खेळतो हे किती योग्य?

आणखी एक आरोप म्हणजे तेंडुलकरने आजपर्यंत चौथ्या इनिंगमध्ये चांगलं खेळून संघाला विजय मिळवून दिला नाही. ( हा आरोप मी लेखाच्या सुरुवातीच्या भारत श्रीलंका मॅचचे उदाहरण देऊन खोडला आहे.) पण हा आरोप करणार्‍याने द्रविड, पाँटिंग, लारा इत्यादींचे चौथ्या इनिंगमधील अ‍ॅव्हरेज घेतले व त्याची सचिनसोबत तुलना केली आहे. वरील आरोपात काही तथ्य आहे का? की उगीच मिळतं ना बसवायला आरोपीच्या पिंजर्‍यात, मग बसवा आणि मारा आकडेवारीच्या गोळ्या त्यावर असे काहीसे आहे हे. आपण ह्याबद्दल सचिनच्या बाजू मध्ये पाहू.

सचिन द ग्रेट! त्याची बाजू.

चॅपल महाराजांचे सर्वच निराळे आहे. २००४मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिरीजमध्ये त्याने एक दुहेरी शतक मारले होते त्याबद्दल लिहताना चॅपल म्हणतात, "His double century at the SCG was a classic case of great player really struggling. He is out of form .. .. .. .. There are enough average players around that you don't want to see a class one reduced to that. " आणि त्याच इनिंग बद्दल शेन वॉर्न काय म्हणतो ते पाहा, "I placed him very slightly ahead of Lara because I found him slightly tougher mentally. It is such a close call, but here is an example of what I mean; in Australia, he was worried about getting out cover driving so he decided to cut out the shot. I saw the wagon wheel for his next innings; he scored 241 without a single cover drive"

म्हणजे ज्या इनिंगमध्ये लिजंडरी कव्हर ड्राईव्ह नाही म्हणून चॅपल शिव्या देतात, तीच इनिंग शेन वॉर्न म्हणतो की त्याने ठरवून खेळली. I stand corrected - सचिन नेहमी ठरवून येतो काय खेळायचे अन त्या बाबतीत तो कायम आग्रही असतो.

एके ठिकाणी शेन वॉर्न म्हणतो, "I don't think anyone, apart from Don Bradman, is in the same class of Sachin Tendulkar". लक्षात घ्या वॉर्न, ब्रॅडमन ह्यांना सचिनच्या क्लासचा म्हणतोय.

सामने जिंकणं हे फक्त बॅट्समनच्या हातात नसतं. सेहवाग दोन महिन्यापूर्वी म्हणाला होता, "बांग्लादेश आम्हाला टेस्टमध्ये हरवू शकत नाही कारण ते आमच्या २० विकेट सध्यातरी घेऊ शकत नाहीत". एक ग्रेट बॅट्समन हे म्हणतो म्हणजे गोलंदाजांप्रती त्याचा मनात किती आदर आहे ते दिसते. आता हेच सचिनच्या अन् रिचर्ड्सच्या तुलनेत पाहू. रिचर्ड्सकडे मार्शल, अ‍ॅम्ब्रोज, अ‍ॅन्डी रॉबर्ट्स वॉल्श, बीशप, मायकल होल्डींग, गार्नर व पुढे पॅटरसन यांसारखे महान गोलंदाज होते, केवळ ह्यांच्या जोरावर रिचर्ड्स ह्यांनी कितीतरी मॅचेस जिंकल्या आहेत. सचिन असलेल्या संघामध्ये कोण होते? सलग ६ ओव्हर्स जोरात न टाकू शकणारा जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी आणि वेकंटपथी राजू!! कशी तुलना करणार? क्रिकेट हा टीम गेम आहे. इथे प्रत्येक खेळाडू तुल्यबळ हवा. बरं तेही सोडून देऊन आपण एका मिनिटासाठी बॅटिंगकडे येऊ. रिचर्डस् असलेल्या संघात डेसमंड हेन्स व गॉर्डन ग्रिनीज यांसारखे ओपनर होते आणि आपण त्यांची तुलना सिद्धू आणि रवी शास्त्री यांच्याबरोबर करु शकतो का? शास्त्री तर वनडेमध्ये पण टेस्टपेक्षा भयानक खेळायचा. आता क्षणभर डोळे मिटून तेंडुलकरच्या जागी रिचर्ड्सना ठेवा, मग किती मॅचेस गेल्या २० वर्षांत रिचर्डसच्या भारतीय टीमने जिंकल्या असत्या? खुद्द रिचर्ड्स ह्यांनी तेंडल्यापेक्षा कमी मॅचेस स्वतःच्या बॅटीवर जिंकलेल्या आहे. (त्यांचाबद्दल कुठेही अनादर नाही, पण तुलना करणारे चुकीची तुलना करत आहेत हे दाखवून द्यायचे आहे.) आता उलट करा, आपल्या सर्व बॉलर्सऐवजी विंडीजचे बॉलर्स भारताच्या टीममधून खेळले तर सचिन किती मॅच जिंकेल?

पुढे नंतर त्याच्या जोडीला गांगुली, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे आल्यावर आपली टेस्टमधील प्रगती / आकडेवारी सुधारली. क्रिकइन्फोवर स्टॅटगुरु नावाचा प्रकार आहे, तिथे जाउन प्रत्येक दशकातील भारताची गोलंदाजी व फलंदाजीमधील आकडेवारी बघा, त्यात २०००-२०१०मध्ये प्रचंड सुधारणा दिसेल.

विस्डेनमध्ये टॉप १०० वनडे इनिंग प्रसिद्ध केल्या. त्यात सचिनचे नाव खूप खालच्या नंबरवर होते. हा पण एक मोठा आक्षेप त्याच्यावर आहे की प्रसिद्ध १० इनिंगमध्ये तो नाही. आता विस्डेनने टॉप १००मध्ये सचिनच्या तब्बल चार खेळी घेतल्या आहेत, हे मात्र विसरले गेले. गंमत म्हणजे त्याची शारजाह मधली ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल मॅचची १४३ धावा असणारी खेळी नाही पण झिंबाब्वेमधील एक शतकी खेळी आहे, ह्यावरुन गदारोळ उठला होता. ती फायनलमधली सॅन्डस्ट्रॉम म्हणून सुप्रसिद्ध असणारी इनिंग खरेतर पहिल्या दहामध्ये यायला हवी, कदाचित विस्डेन लिस्ट बनविणार्‍यांचा दृष्टीने ती महत्त्वाची नसेल, पण झिंबाब्वेची वाटली ह्यातच त्यांचे अगाध ज्ञान दिसून येते. पण त्याच विस्डेनने सन २००२मध्ये ग्रेटेस्ट बॅटमनची यादी प्रसिद्ध केली, त्यात टेस्टमध्ये नं. १ सर ब्रॅडमन, वनडे नं. १ व्हिवियन रिचर्ड्स तर दोन्हींत नं. २ वर सचिन आहे हे मात्र विसरले गेले.

चॅपल पुढे २००८मध्ये परत म्हणाले की लाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जी कामगिरी केली तशी सचिनने नाही केली. कोणी इतके खोटे कसे बोलू शकते, हे कळत नाही, कारण ऑस्ट्रेलियामध्ये येऊन ऑस्ट्रेलियाला सिरीजमध्ये हरवणे लाराला जमले नाही, पण सचिनने ते केले आहे ह्याकडे चॅपल दुर्लक्ष करतात. ते असेही म्हणाले की, सचिनचे अ‍ॅव्हरेज जास्त कारण सचिन लारापेक्षा जास्त वेळा नाबाद राहिला आहे. आता मात्र हद्दच झाली. अहो प्रतिस्पर्धी तुम्हांला बादच करु शकला नाही, निदान ह्याचे तरी क्रेडीट त्या फलंदाजाला द्या, ते देणे दूर, उलट तुम्ही त्या धावा काढून बाद झाल्यानंतरचे अ‍ॅव्हरेज घ्या, असा ओरडा करता, ह्याला केवळ दुःस्वास असेच म्हणावे लागेल. थोडक्यात सचिनने फक्त काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०० नाबाद धावा काढून विक्रम केला, पण चॅपल म्हणतात त्या २०० धावा पाँटिंग व लाराविरुद्धच्या अ‍ॅव्हरेज मध्ये नका घेऊ कारण सचिन नाबाद आहे. बरं बाबा तुम्ही म्हणाल ते!

तक्ता : सचिनची वनडेमध्ये एकूण कामगिरी व त्यातल्या त्यात प्रमुख विरोधी देशांबरोबरची कामगिरी पाहा. सर्वांत जास्त शतके आणि धावा ऑस्ट्रेलियाविरुद्धच आहेत.

Sachin Chart One Day record.gif

Sachin Chart One Day record against each country.gif

आता जरा आपण टेस्ट अ‍ॅव्हरेजकडे बघू. खालील तक्त्यात परत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वांत जास्त रन्स दिसतील.

तक्ता : सचिनची टेस्टमधील कामगिरी

Sachin Chart Test record.gif

Sachin Chart Test record against each country.gif

क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांमध्ये सचिनने सर्वांत जास्त रन्स ऑस्ट्रेलियाविरुद्ध काढल्या आहेत. इतर लोक अ‍ॅव्हरेज वाढविण्यासाठी केनिया, बांग्लादेशचा वापर करतात तसे सचिनने केले नाही. तो नेहमीच बेस्ट टीमविरुद्ध चांगला खेळत आला आहे. इतकेच नाही तर तक्त्यामधील शेवटच्या दोन ओळींकडे लक्ष द्या. होम आणि अवेमध्ये सचिनचे टेस्टमधील अवेचे अ‍ॅव्हरेज आणि शतकं दोन्ही जास्तच दिसतील.

१०० कोटींच्या आपल्या देशात एखादा क्रिकेटपटू होणे अवघड, झालाच तर जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू होणे सोपे, पण १०० करोड लोकांच्या भावना, प्रेम व राग ह्यांच्या अपेक्षांचे ओझे सतत बाळगत मैदानावर २० वर्षे बॅट तळपत ठेवणे निराळे. एक सचिनच ते करु जाणे, म्हणूनच तो सचिन रमेश तेंडुलकर आहे... चिरतरुण आहे !

- केदार

माहितीचा स्रोत.
१. पाहिलेल्या मॅचेस
२. क्रिकइन्फो लेख
३. क्रिकइन्फो स्टॅटगुरु
४. टाईम्स ऑफ इंडिया
५. सचिनवरील अनेक पुस्तकं