'सोनी' कुडी.

"येय्य.. मला स्कॉलरशीप मिळाली!!" फोन आला.
मी रितसर अभिनंदन केलं.

आमच्या जपानी भाषेच्या वर्गातली सगळीच मुलं-मुली साधारण २०-२२ वर्षांची होती. अपवाद 'ही' कुडी. वय वर्ष १६. ती जपानीची परीक्षा तशी बर्‍यापैकी अवघड असल्याने बहुतेक लोक नापासच होतात, अशी ह्या परीक्षेची ख्याती आहे. 'ती' 'अर्थातच' पास झाली. त्याच दरम्यान 'बारावी' पण होतीच. तिथेही चांगले मार्क्स. मग पुण्यातल्या 'विश्वकर्मा इंजिनीअरिंग कॉलेजात' प्रवेश. इथंपर्यंतही ठिक आहे म्हणता येईल एक वेळ, पण त्यापुढे जाऊन जपानी भाषेमधुन इंजिनीअरिंग करण्याचा विचार करणारी, आणि ते यशस्वीरित्या पुर्ण करुन दाखवणारी व्यक्ति म्हणुन तिनं निवडलेली वाट आणि आत्तापर्यंतचा अनुभव आपल्यासाठी नाविन्यपुर्ण आणि प्रेरणादायक ठरेल अशी आशा वाटते. अभ्यासाबरोबरच, केवळ जपानमधेच येतील असे अनुभवही वेगळे म्हणुन लिहावेसे वाटले.

"नक्की काय आहे ह्या स्कॉलरशिपमधे?" मी म्हटलं होतं.
"पहिल्या वर्षी जपानीचा अभ्यास आहे. तो झाला, की मग पुढची तीन वर्ष इंजिनीअरिंग. म्हणजे, पहिल्या वर्षीही बेसिक म्हणजे फिजिक्स, मॅथ्स वगैरे आहे..."
"म्हणजे इंजिनीरिंगच्य विषयाबद्दल आत्ता काहीच माहिती नाहीये तर... पण तुला कशामधे इंटरेस्ट आहे?"
"मला असं काहीतरी शिकायचं आहे, जे जपानशिवाय इतर कुठंही मिळणार नाही...."
पहिलं वर्ष संपलं आणि आमचं परत बोलणं झालं, तेव्हा " अरे, मी रोबॉटिक्स मधे इंजिनीअरिंग करणार आहे. ". दिप्ती म्हटली होती. पुढच्या तीन वर्षात तिच्याशी नेहेमी बोलणं व्हायचं, त्यामुळेच तिची ही वाटचाल मी नेहेमीच फोनवरुन लाईव्ह ऐकायला मिळाली.

"हे स्कॉलरशिपचं कसं डोक्यात आलं?"
"आपण जपानी शिकत असतानाच, 'मला जपानला जायचंय' ही इच्छा मनात होती. इंजिनिअरिंगनंतर बरेच जण सहसा यु. एस. मधे 'एम.एस.' करतात. हेही करायचं नव्हतं! मग जपानमधे 'चॅलेंजिंग होईल, पण करुन बघायला काय हरकत आहे?' असं म्हणुन 'स्कॉलरशीप मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे?', याचा शोध घ्यायला चालु केलं. तिथेच ह्या स्कॉलरशिपची माहिती मिळाली."
"पण तुला इंजिनिअरिंगनंतरचा पर्याय हवा होता ना?"
"हो, खरं तर. पण जशी जशी माहिती मिळवत गेले, तसं मग 'का नाही?' असं वाटत गेलं.. :) त्याच्या माहितीत,
'टेक्निकल स्कॉलरशिप' साठी बारावीला सायन्स लागतंच आणि एकुण ट्रॅक रेकॉर्डही चांगलं हवं. असं वाचलं. ह्यात तरी काही प्रश्न येईल असं वाटत नव्हतं, 'वय'ही त्यांच्या कक्षेत बसत होतं. खुशीत 'अप्लाय' केलं. इंटरव्ह्यु झाले आणि ऑनर्स स्कॉलरशिप मिळुन जपानला जाण्याचं ठरलं!

"जपानला पोचले, तेव्हा वेगळा देश, वेगळी भाषा, वगैरे नेहेमीची टेन्शन्स होतीच. पण त्याचबरोबर सगळ्यात मोठं टेन्शन होतं, ते म्हणजे 'जपानीमधुन हे सगळं शिकायला खरंच जमेल का?'
इथुन (पुण्यातुन) जे शिकुन चाललीये ते फक्त जनरल गप्पा मारण्याइतकं, किंवा काही ठराविक विषयांमधे बोलु शकणं इतपत झालं. त्याच्या आधारावर 'आता मी इंजिनीअरिंग करते' वगैरे म्हणणं थोडं अवघड वाटत होतं... पण सुदैवानं वाटलं तितकं अवघड नाही गेलं. दोन तीन आठवड्यातच बर्‍यापैकी समजु लागलं आणि मजा येऊ लागली. "
"तिथं 'कॅलिग्राफी' वगैरे शिकलीस का?"
"एकदाच कॅलिग्राफी वर्कशॉपला गेले होते. पण नंतर नाही जमलं... "
heart.jpg

"काल रात्रभर अभ्यास करत बसलेलीस?", शनिवारी सकाळी सकाळी फोन केला तेव्हा समजलं.
"अरे, ते रिपोर्टचं सबमिशन होतं. पण आता हे नेहेमीचंच झालंय. सगळेच जागतात आणि त्यामुळं..."
तो फोन तेवढ्यावरच थांबला होता. मग परत दुपारी फोन झाला तेव्हा, "मग रिपोर्ट जपानीमधुन लिहायचा का सगळा?"
"अर्थात! म्हणजे अगदी सगळ्या कांजी (चित्रलिपी) हातानं लिहीता येण्याची गरज नाही. कॉम्पवर टाईप करायला जमल्या तरी बास असतं. त्यामुळं तितकंही अवघड नाही." ती सहजपणे म्हटली होती.
मला मात्र लगेचच, कामानिमित्त पहिल्यांदा जपानीमधुन डॉक्युमेंट बनवताना उडालेली माझी त्रेधातिरपीट आठवली. तरी बरं, माझं काम फक्त आयटी वालं. ही वेगवेगळ्या विषयातली डॉक्युमेंट्स बनवत होती. त्या-त्या विषयाच्या कांजी वापरुन डॉक्युमेंट्स बनवत होती आणि वरुन 'सोप्पं आहे अरे..' हे होतंच! वरुन, डॉक्युमेंट्स तपासणारे 'जपानी'! म्हणजेच आमिर खानच्या वर परफेक्शनिस्ट! जरा इकडचं तिकडं झालं, की डॉक्युमेंट परत!

"कॉलेज कसं वाटलं एकंदर? म्हणजे कॉलेजमधल्या सुविधा, उपलब्धता, विद्यार्थ्यांकडुन वापर, शिकवणं इत्यादी? "
"आपल्या इथली मोठी मोठी कॉलेजेस आहेत, तिथं असतात त्या सुविधा इथल्या सगळ्याच कॉलेजात आहेत. उदाहरणार्थ प्रशस्त्र लायब्ररी, सुसज्ज लॅब वगैरे. विद्यार्थ्यांचं ते सगळं वापरणंही चांगलंच एकंदर. शिकवण्याबद्दल मात्र काही चांगल्या गोष्टी आणि काही थोड्याश्या वेगळ्या गोष्टी दिसल्या. म्हणजे, लेक्चर चालु असताना काही लोक बिनधास्त बेंचवर डोकं टेकुन झोपलेले दिसतात. त्यांना लेक्चरर काहीही म्हणत नाही. म्हणु शकतच नाही. लेक्चरर आपले येतात, शिकवतात आणि जातात. इथल्या काहीकाही लेक्चरर्सना 'बिचारे' म्हणावं लागेल."
"अशानं फेल झालं तर?"
"म्हणुन तर इथे प्रायव्हेट क्लासेसचं फार प्रस्थ आहे. आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त! आणि फेल झालं, की अर्थातच त्या वर्षाची फी भरायची असतेच. स्कॉलरशीपवर आलेल्यांसाठी तर ती फी फार जास्त असते. त्यामुळे त्यांना नीट अभ्यास करण्याशिवाय पर्याय नसतो."

"तुझ्या 'रोबॉटिक्स' विषयाबद्दल काहीच माहिती नसल्यानं त्याबद्दल काहीच बोलता येणार नाही, पण.."
" 'रोबो'बद्दल म्हटलास, तर आम्ही मागच्या वर्षी एक एक्सपेरिमेंट केला होता. ज्यात एक छोटासा रोबो बनवला होता. त्या कन्सेप्ट साठी ग्रूपला बक्षिस मिळालं होतं, पण नंतर वेळेअभावी तो पुर्णच नाही करता आला. :)
इंजिनिअरिंग संपुन जाईल आणि रोबो कागदावरच! :)"
"आणि त्यासाठी गाईडन्स?"
"ज्या प्रोफेसरांच्या हाताखाली आम्ही काम करतो, ते संपुर्ण गाईडन्स देतात. त्यांच्या मदतीशिवाय काहीच शक्य नाही. आपण उत्साह दाखवला, की मात्र ते प्रोफेसर इतकी मदत करतात, की आश्चर्य वाटतं! "
"मग, वेगवेगळ्या प्रोफेसरांच्या हाताखाली काम करताना, एक भारतीय म्हणुन कशी वागणुक मिळाली?"
"खुप चांगली! भारतीय विद्यार्थी खुप 'सिन्सिअर' असतात असं त्यांचं मत होतं. त्यामुळं ते विशेष लक्ष द्यायचे कायम माझ्याकडे. त्यातुन जपानीही बर्‍यापैकी येत असल्यानं आणखीनच मजा यायची! "

मी टोक्योमधे रहात असल्यानं जपानमधल्या खर्चाची कल्पना होतीच. त्यामुळे, तिला मिळणारी स्कॉलरशिप पुरेशी आहे का, असा प्रश्न पडला होता.
"येऊन शिकण्यासाठी स्कॉलरशिप तर मिळाली होती, पण इथला राहण्याचा, खाण्याचा वगैरे खर्च बघता, 'आरुबाईतो' करण्याशिवाय पर्याय नाही रे! म्हणुन मग आठवड्यातुन तीनचारदा दोन-दोन तास असं 'आरुबाईतो' केलं, की पुरेसं असतं ... पण मग परीक्षेच्या वेळी अजिबात वेळ नसतो तेव्हा मात्र हे जमत नाही. तेव्हा मग घरच्यांचा आधार घेत 'फक्त अभ्यास!' ह्या तीन वर्षात मी तीनचार प्रकारची 'आरुबाईतो' केली. त्यात 'इंडियन रेस्टॉरंटमधे' मदतनीस म्हणुन काम केलं. एका 'सोबा' रेस्टॉरंटमधे वगैरे काम केलं. तिथले मालक फार चांगले होते. आजोबा-आज्जी होते अरे. मी दुसर्‍या देशातुन येऊन इतकं(?!) काम करतीये, शिकतीये म्हणुन ते विशेष काही कामच लावायचे नाहीत. :) कधीकधी असंच काहीतरी खायला आणुन द्यायचे.
* 'आरुबाईतो' हा शब्द जपान्यांनी जर्मन भाषेमधुन घेतला आहे. (arbeit) आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली अर्धवेळ नोकरी म्हणजे 'आरुबाईतो.'
* सोबा : बकव्हीट नुडल्स.

"सगळीच मुलं हे करतात का?" मी विचारलं.
"हो. जवळपास सगळेच! रेस्टॉरंट्स व्यतिरिक्त मग, 'सेव्हन-इलेव्हन', 'लॉसन' या कन्विनिअन्ट स्टोअर्स मधेही काम असतं.. ही स्टोअर्स तर २४ तास चालु असतात ना, आणि तिथं रात्री काम केलं की थोडी जास्त कमाई होते, म्हणुन मीही काही वेळा रात्री काम केलं. रात्री काम करायचं दुसरं कारण असं, की काम नसेल त्या दिवशी असाईनमेंट्स करायला जागावंच लागायचं. त्यामुळं दिवस-रात्रीचं गणित बरेचदा उलटं होऊन जात असे.
ह्या कन्व्हिनिअंट स्टोअर्समधे काम करताना, जपानी कंपन्यांच्या लॉजिस्टिक्सबद्दल थोडासा अंदाज आला. म्हणजे कुठला माल, कुठल्या दिवसात किती प्रमाणात खपतो याचा त्यांनी इतका अभ्यास केला आहे, की काही विचारु नकोस!! सगळं काही त्या अभ्यासावर अवलंबुन असुन, त्यामुळेच सगळं सुरळित चालतं असं म्हणता येईल कदाचित. "
"आणि मग रात्रीची वेळ म्हटल्यावर कंटाळा आला की एखादा डुलका.. :) " मी म्हटलं.
"नाही रे. हे 'आरुबाईतो' तितकंसं गंभीरपणे घ्यायची गरज नाही, असं कोणालाही वाटणं साहजिक आहे. पण प्रत्यक्ष काम करु लागल्यावर किती काम आहे, ते समजलं. गिर्‍हाईक आले नाहीत म्हणुन स्वस्थ बसुन रहा, हा प्रकारच नाही. 'एक्स्पायरी डेटसाठी माल तपासुन पहा. ', 'ठराविक पद्धतीनं रचुन ठेवा.', 'तयार खाद्यपदार्थांची विकायला असतात, त्याची भांडी घासा', 'फ्राईड चिकन फ्राय करा:)' बरंच असतं. मुख्य म्हणजे, 'गिर्‍हाईक आले, की सुहास्यवदने, अतीव नम्रतेने वगैरे त्यांच्याशी बोला!' अशी कित्येक कामं असल्यानं वेळ कसा जातो हेच कळत नाही. " दोन टर्मस च्या मधे असलेल्या सुट्टीमधे, थोड्या पॉकेट मनीसाठी हे सगळे उद्योग करावे लागतात.

"आणि ह्या सगळ्याबरोबरच, इथले मित्र? कसे वाटले? आपल्या इथल्या मित्रांसारखेच का?"
"हो, हो. फार छान वागले सगळे. नियमित 'सरप्राइज' बर्थडे पार्टीज झाल्या. कधी आजारी असताना मदत वगैरे तर असायचीच. काही काही सामान, म्हणजे स्टडी टेबल वगैरे पाहिजे होतं, ते मैत्रिणीनं स्वतःकडचं एक्स्ट्रा होतं म्हणुन दिलं. मलेशिअन, चायनीज, पाकिस्तानी, कोरिअन वगैरे बर्‍याच देशातले लोक होते बरोबर. "

bdday.jpg

तीनचार महिन्यांपुर्वी अचानक "अरे, कॅम्पस इंटरव्ह्युज आहेत आता." असा फोन झाला.
'लाईफलाँग एम्प्लॉयमेंटचं' कल्चर असलेल्या जपानमधे 'कॅम्पस इंटरव्ह्युज' अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे एकदा ठरलं की ठरलं! त्यामुळं त्याची तयारीही तितकीच अवघड. विविध कंपन्यांचे फॉर्म्स अर्थातच जपानीमधुन भरुन पाठवायचे. प्रत्येक कंपनीचे ३-४ इंटरव्ह्युज. सगळं नीट झालं तर मग ऑफर.
"खुप भिती वाटतीये.. नीट होईल सगळं बहुतेक.. पण भिती तर वाटतीये.." ती म्हटली होती.

"आज 'फुकुओका'ला इंटरव्ह्यु आहे एका कंपनीमधे.. तिथे कंपनीचं एक ऑफिस आहे, आणि तिथेच इंटरव्ह्यु आहे."
"एवढं लांब? " जपानच्या दुसर्‍या टोकाला इंटरव्ह्युसाठी जायचं ऐकुन मी म्हटलं होतं. पैसे कोण..
"पैसे देणारेत तेच. मग आपलं काय जातंय ?:) "
चांगल्या/वाईट दैवानं तिथं काम नाही झालं. "कुठेच नाही झालं तर?" असं वाटतंय..
"होईल, होईल.. अनुभव कसा होता पण एकंदर? "
"छानच. मीच जरा कमी पडले रे बोलण्याच्या बाबतीत. इंटरव्ह्युमधे बोलायला लागतं ना फार, त्यात कमी पडले. मार्केटिंगच असतं ना तेही.."
"बरोबर! आता मग एका पेपरवर लिहुन काढणार का सगळं मार्केटिंग :) ? पुढच्या इंटरव्ह्युला जॉईनिंग लेटर घेऊनच बाहेर ये बघ.... "

"आज शिनागावा (टोक्योजवळच) स्टेशनला येणार आहे.." मधेच तिचा फोन आला होता. इंटरव्ह्यु होता, आणि नीट पार पडला. आमची भेट झाली नाहीच.
थोडेच दिवसानंतर अजुन एक इंटरव्ह्यु. मग अजुन एक.
सगळं खुप घाईघाईत चालु असल्यानं बोलणंही होत नव्हतं.
"आज तिसरा इंटरव्ह्यु झाला आणि पुढच्या वेळी ऑफर देऊ म्हटलेत. परत बोलावतील काही दिवसांनी."
"अरे, मस्तच! अभिनंदन! "
"तुला स्वतःल कधी अंदाज आला, की इथे काम होऊन जाईल म्हणुन?"
"पहिल्या इंटरव्ह्यु मधेच. कारण तो माणुस पहिली पाच मिनिटं कॉलेजबद्दल आणि मग ३० मिनिटं ओळख असल्यासारखा बोलत होता. "
"बरोबर. ही सिलेक्शन झाल्याची किंवा पॉझिटिव्ह असल्यचीच खुण असते सहसा..."
"नंतरच्या इंटरव्ह्युमधेही त्या इंटरव्ह्युअरनं शेक-हँड केलं.. आणि जपान्यांनी शेक-हँड करणं म्हणजे खुप मोठं असतं, असं मला माझ्या मित्रांनी सांगितलं. कारण सहसा ते नुसतं थोडंसं वाकुन अभिवादन करतात ना..."
"खरं आहे.. अरे हो, विचारायचंच विसरलो.. ही कंपनी कुठली आहे?" मी विचारलं.
काही हजार अ‍ॅप्लिकेशन्समधुन, साधारण १०० जणांची निवड करण्यात आली. अशी ही 'सोनी' कंपनीमधली भारतीय, 'सोनी कुडी'.

"पुढच्या वर्षी इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्ष पुर्ण होईल आणि नोकरी सुरु होईल. ह्या तीन वर्षांच्या अनुभवाबद्दल कसं वाटतंय? 'वर्थ' होता का? " ह्या प्रश्नाचं उत्तर "हो! अर्थातच!!!" होतं.
"दुसर्‍या देशात, वेगळ्या भाषेतुन शिकायची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. आई-वडिल, शिक्षकांच्या आशीर्वादामुळेच शक्य झालंय. हाच अनुभव आपल्यामधल्या अजुन काही मुलांना मिळाला, तर त्यांनाही बरंच काही शिकायला मिळेल. ही स्कॉलरशीप आणि हा अनुभव एकदम 'ओसुसुमे' अर्थात
'I Recommend!!!'