कॅटवॉक

'जन्माचे साध्य वगैरे काहीही बोलू नकोस. असलं काहीही नसतं. आपण चालत राहायचं. डौलाने, ऐटीत. फॅशन शोमध्ये चालल्यागत. आकांतांचे आणि आवेगांचेही थांबे असतात. ते मांजराच्या पावलाने येतात. पण प्रचंड होऊन येतात. त्यांचाही स्वतःचा एक डौल, ऐट, रुबाब आणि वेग असतोच. आपणही तितक्याच ऐटीत त्यांना झेलायचे, पार पाडायचे. ते करताना स्वतःला निरखत राहायचं. वन्स-इन-अ-लाईफ असा तो अनुभव असतो. तो भोगायचा-जगायचा..!!'

border2.JPG

२२ जुलै

हो

स्टेलचा पहिलाच दिवस अंगावर येऊ नये म्हणून काल रात्री बाबा मुक्कामाला होते. आज सकाळी त्यांनी निरोप घेतला तेव्हा भलतंच असाहाय्य वाटलं. बाबा निग्रहाने पाठ फिरवून चालत गेल्यासारखे दिसले. होस्टेलची वाट चालत असताना मी थोड्या वेळाने मागे वळून पाहिलं तेव्हा डोळ्यांत तरळलेल्या पाण्यात बाबा दिसेनासे होत होते. रस्त्याच्या वळणावर असतील बहुधा. मग समोर माझ्या रस्त्याकडे पाहिलं, तर सरळ रस्त्यातदेखील वळणे सुरू झाल्याचा भास झाला.

संध्याकाळी होस्टेलमध्ये रॅगिंगचं वातावरण होतं. आमच्या घराशेजारी राहणारा प्रफुल्ल इथेच सेकंड इयरला आहे. बाबांनी प्रयत्न करुन त्याच्याच रुममध्ये अ‍ॅडमिशन केलेली. त्याने बाबांना आश्वासन दिलेलं कालच की, मला रॅगिंगचा त्रास होणार नाही याची काळजी तो घेईल म्हणून.

संध्याकाळी ओळख परेड मात्र करावीच लागली. त्या तिथल्या रांगेत उभे असताना बाबांनी आजच्या, म्हणजे माझ्या सतराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या पत्रातली वाक्ये आठवत राहिली..

२३ जुलै
रॅगिंगमध्ये आज एकाहून एक किस्से. सकाळी कॉलेजात जात असताना लेडीज होस्टेलकडून येणारी फ्रेशर्सची रांग पाहिली. सार्‍यांच्या पायांतल्या सॉक्समध्ये खोचलेल्या सलवार - अशी ती वरात होती. मुलींच्यात पण रॅगिंग होते- याची गंमत वाटली.

संध्याकाळी होस्टेलमध्ये एकाला सिनियर्सशी उद्धटपणा केल्याची अभिनव शिक्षा मिळाली. अख्ख्या सेकंड फ्लोअरच्या फरश्यांत पंचवीस पैशांची किती नाणी मावतील - ते मोज म्हणे! रात्री साडेबाराला तो धापा टाकू लागला, तेव्हा बिचार्‍याच्या पाच-पंचवीस फरश्यादेखील मोजून झाल्या नव्हत्या. मग उरलेली मोजणी उद्या कर, अशी सूट त्याला मिळाली.

८ ऑगस्ट
थेअरीची लेक्चर्स कधीच चालू झाली होती. आज प्रॅक्टिकल्सपण चालू झाली. प्रॅक्टिकलसाठी माझी पार्टनर म्हणून माझ्यानंतर लगेचचा रोल नंबर असलेली ऊर्मी उपाध्याय. हिला मी सर्वांत पहिल्यांदा बघितलं, तेव्हा मला माईआत्याच्या अलकेचाच भास झाला - ही तेव्हा गंमतच वाटली होती.

१२ ऑगस्ट
स्टॅटिक्स मला इंटरेस्टिंग वाटतेय. डायनॅमिक्सला अजून टाईम आहे. पण ती भलीमोठी गणिते आणि आकृत्या बघून जरा भीती वाटतेय.

१४ ऑगस्ट
दोन दिवसांपासून दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षांच्या मुलांचा स्ट्राईक चालू आहे. कशासाठी देव जाणे. पण त्यांना आमचाही पाठिंबा. हे म्हणजे लेक्चर्स बुडवायला कारण. गिरीश आणि अमेय म्हणाले, हे चुकीचं आहे. अशी मस्ती बरोबर नाही.

एचओडीने सर्वांना बोलावून झाप झाप झापलं. तेव्हा चुपचाप सारे क्लासला बसले. ऊर्मी हळूच म्हणाली, 'सरांकडे नीट बघितलंस का? गळ्याच्या शिरा ताणताणून ओरडत होते, स्वतःच्याच जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखं. तेही प्रचंड एकाग्रतेने! इतक्या रागातही त्यांना लहान पोराला आवडतं खेळणं सापडल्यावर कसा आनंद होतो, तसं वाटतंय की काय, असं वाटत होतं. मला तर त्यांचा ऑर्थोग्राफिक व्ह्यूच काढावासा वाटला त्यावेळी..! '

मला काही ते तसं वाटलं नव्हतं. ती गालांत हसत राहिली, अन् मी तिच्याकडे पाहत राहिलो. प्रत्येक गोष्ट हिला इतरांपेक्षा वेगळीच कशी दिसते, ते एक देवालाच ठाऊक.

२५ ऑगस्ट
'थ्री नॉन-पॅरलल फोर्सेस इन इक्विलिब्रियम अ‍ॅक्टिंग इन द सेम प्लेन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ ट्रँगल ऑफ फोर्सेस' या थेरमच्या आधारावरच बॉलीवूडच्या तमाम त्रिकोणी प्रेमकथांनी जन्म घेतला असेल, असं ऊर्मी म्हणाली. आणि माझी हसू दाबताना पुरेवाट झाली. 'मास्तर बघतोय, गप', असं म्हटलं, तर गांभीर्याचा आव आणून ती म्हणाली, 'मास्तर एखाद्या त्रिकोणी प्रेमकथेत कसा दिसेल बरं?'

माझ्या डोळ्यांसमोर उगीचच आपली मिशी कापून हिटलरछाप केलेला, आणि तरीही डोळ्यांत स्वप्नील वगैरे भाव असलेला मास्तर तरळून गेला.

१ सप्टेंबर
सबमिशनची गडबड सुरू झाली. मास्तर लोक चुका काढून काढून जर्नल्स पुन्हा पुन्हा लिहायला लावतात, हा एक महान वैताग आहे.

२९ सप्टेंबर
माईआत्याची तब्येत बिघडल्याचा फोन आलेला. हार्टअ‍ॅटॅक आलेला. मला एकदम बाबांनी सांगितलेल्या तिच्या लग्नातल्या गोष्टीच आठवल्या. अख्खे अंगण भरून बुंदी सुकवण्यासाठी घातलेली. अख्ख्या गावात मेजवान्या, मिरवणूक आणि टिपर्‍या खेळण्याचा धडाका.. अन् बरेच काही. उशांवर रांगोळ्या काढून मग त्या छतांवर चिकटवलेल्या तर त्यानंतर किती वर्षे दिसत होत्या.

१ ऑक्टोबर
आत्या मला सापडली नाही. अंत्यविधीदेखील नाही. जिकडेतिकडे शोक आणि सुतक लागलेल्या त्या घरात गेल्यागेल्या डोळे सर्वांत आधी अलकेला शोधत राहिले. ती दिसली, तेव्हा थबकून तिच्याकडे बघत राहिलो. शांत, स्तब्ध आणि कोरा चेहरा होता तिचा. तिला वेड लागलंय, असं क्षणभर वाटलं. मग भिंतीचा आधार घेत तिथेच उकिडवा बसून राहिलो, तर जाणवलं - तीच या सर्वांत शहाणी आहे.

३ ऑक्टोबर
'निम्मं आयुष्य तिनं विधवा म्हणून काढलं. चाळीस म्हणजे काही मरायचं वय नाही. काहीतरी अपूर्ण इच्छा असतीलच ना तिच्या. कुठं जाताना नीट तयारी करायची, तेव्हा किती सुंदर दिसायची. माझ्यात तर केसभरही तिचं काही उतरलं नाही, असं समज. अशी नजर लागण्यासारखी सुंदर दिसू लागली, की वाटायचं हिला कुणीतरी छान, सुंदर जोडीदार मिळायला हवा. पण अर्थातच हे स्वप्नच राहिलं माझं. तिचं स्वप्न होतं का, तेही कळलं नाही. भलभलत्या लोकांशी गावानं तिचं नाव जोडलं. कुचाळक्या केल्या. घरात चोर्‍या केल्या. तिला मोहिनीविद्या येत असल्याच्या अफवा पसरवल्या. किती म्हणून सांगू..' अलका भान विसरून बोलत होती, आणि मी तिच्या नितळ चेहर्‍याकडे बघत होतो. आता तिच्या डोळ्यांत टिपूसही नव्हता. उलट लक्षलक्ष दिवे लागल्यागत तिचे डोळे दिसत होते. मला भीती वाटून आवेगाने मी तिच्या गालाला हात लावला. आवेगाने म्हणालो, 'तू रड बघू. मी आल्यापासून बघतो आहे. तू शून्यात बघत असतेस. कोरी नजर लावून बसतेस. काही बोलत नाहीस. आज बोललीस, तेवढंच मी ऐकलंय आल्यापासून. तू रड. इथे. फक्त माझ्यासमोर.'

४ ऑक्टोबर
मला घरात अक्षरशः श्वास गुदमरल्यासारखं होतंय. सारखे पाहुणे. त्यांच्याशी बाबांचं, काकांचं आणि आप्पाआजोबांचं तेच तेच बोलणं. त्यांनाही कंटाळा आलाच असेल. आणि दु:ख तर त्याहून. पण सांगतील कुणाला..?

स्वयंपाकघरातही चहाची मोठमोठी आधणं, बघावं तेव्हा स्वयंपाक, जेवणावळी, भांड्यांचे-बायकांचे आवाज आणि सारी कामं तिन्हीत्रिकाळ चाललेलीच. रात्री उशिरा जरा घर शांत झाल्यागत वाटतं न वाटतं, तोच पहाटेची लगबग लगेचच चालू.

५ ऑक्टोबर
मळ्यात काही सामान पाठवायचं होतं. अलकाही सोबत यायला तयार झाली. तोच कोरा नितळ स्वच्छ चेहरा. तिने खूप रडावं, ओरडावं, असं मला वाटत होतं. आणि हा चेहरादेखील हवासा, बघत राहावासा वाटत होता. आता जाणवलं की, इतक्या वर्षांत तिचा हा असा चेहरा कधीच आपल्याला दिसला नाही. किंवा जाणवला नाही, म्हणायला हवं.

'एखादी छोटी गोष्टही जीव लावून, सर्वस्व ओतून करण्यात काय गंमत असते माहितीये तुला..?' अलका अचानक म्हणाली. 'साधं साडीच्या निर्‍या नीट करताना, किंवा एखादं तुटलेलं बटण शिवतानादेखील आईचा तो मग्न चेहरा, विसरलेलं भान पाहत राहावंसं वाटायचं. त्या रोहिदासला मी तर पाहिलेलं नाही, पण आईने त्याच्यावरही असंच अफाट जीव ओतून प्रेम केलेलं असणार आहे. मला तिला विचारायचं होतं हे सारं. तिला प्रेमाबद्दल काय वाटतं.. ती रोहिदासशी काय काय बोलली.. मला मन लावून, ती तोडायची, तस्संच अगदी जीव तोडून ते सारं ऐकायचं होतं. ती हे कुणाजवळ आणि कधीच बोलू शकली नसेल आणि नसतीही. मी होते की तिची लेक. माझ्याजवळ बोलली असती कधीतरी. मी ऐकलं असतं मन लावून सारं..' ती आणखी बरंच काय-काय बोलत होती. ओसंडून. वाहून जाऊन.

मी न राहवून शेवटी तिचा हात धरला, तेव्हा तो तसाच ठेवून त्यावर दुसर्‍या हाताची बोटे फिरवत ती म्हणाली, 'तू आल्यापासून मला रडायला सांगतो आहेस. पण माझं रडून झालं आहे. आयुष्यभराचा आकांत माझा करून झाला आहे. त्याच दिवशी, आई घरात अचेतन होऊन पडली होती तेव्हा. कितीही क्षुद्र काम असो, आई त्याला 'आयुष्यातलं सर्वांत महत्वाचं काम' समजायची. हे एकदाच आणि अखेरचं करायचं असल्यागत ती जीव, मन लावून ते करायची. आई गेल्याचा दिवस संपल्यावर मलाही कळलं - हे एकदाच होतं. ती जाणं आणि माझं जीव तोडून आकांत करणं.. ते शेवटचं होतं. पुन्हा नाही.'

मी तिच्याकडे पाहिलं, तर तिची मान खाली होती, आणि तिची नाजूक जिवणी फक्त दिसत होती. थोडी भीती वाटून मी तिची हनुवटी उचलली, तर अश्रूंनी गच्च भरलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, 'तुला खरं सांगू? ती गेली, तो सोन्याचा दिवस होता. मला हवाय तो पुन्हा. ती मला पुन्हा जायला हवी आहे. आयुष्यात एकदाच झालेला तो आकांत - मला आता पुन्हा हवा आहे. शक्य नाही हे माहीत आहे मला. पण म्हणूनच पुन्हा हवे आहे ते मला सारे..!'

२८ ऑक्टोबर
सुतक असल्याने दिवाळी झालीच नाही. आजच होस्टेलवर आलो. सार्‍यांचे बॅगा भरून खाऊ आणि कंटाळा येईस्तोवर गप्पा.

मी सरळ वरती टेरेसवर जाऊन बसलो. तिथून ते इतक्या दिव्यांचं आणि दिवाळीच्या अजून शिल्लक असलेल्या रोषणाईचं भलंमोठं शहर बघत माईआत्याला आठवत बसलो.

५ नोव्हेंबर
प्रफुल्ल उगीचच ऊर्मीवरून चिडवत असतो. आज त्याने अतिच केलं. हे असं खोडसाळ बोललेलं मला आवडत नाही. मला काहीही बोलायला हरकत नाही. पण तिचा काय संबंध?

सारं विसरून अभ्यास करायला हवा.

९ नोव्हेंबर
परीक्षा जवळ आलीय, आणि इथे पोरांना पिक्चर आणि पार्ट्या सुचताहेत. मला नाईलाजाने जावेच लागले. दारू कधी प्यायला सुरुवात करेन, ते माहीत नाही; पण आजही प्यायलो नाही. गोंधळ खूप वाढल्यावर मी न राहवून बाहेर गेलो, आणि ऊर्मीला फोन केला, तेव्हा बरं वाटलं.

पण ती म्हटली, 'अभ्यास पण होईलच की. आता मित्रांत आहेस ना, तर तिथे अस. एन्जॉय कर. उद्या येऊन मला सांग सारी मजा!'

मी गोंधळून पुन्हा आत गेलो तर तिथे गोंधळ आणखीच वाढलेला. तिथे जाऊन गप्प बसून राहिलो. उगाचच मग माईआत्याच्या लग्नात दादा कसे टिपर्‍या खेळले असतील, त्याची कल्पना करत राहिलो, तर बरं वाटलं. दादांनी तिची लग्नाच्या आदल्या दिवशी शर्टपँट घालून घोड्यावरून मिरवणूक काढली होती आणि आप्पाआजोबा कसे चिडले होते त्याची दादांनी वर्णन करून सांगितलेली गोष्ट आठवली.

मग जेवताजेवता अलकेचे भरून आलेले डोळे आणि नाजूक जिवणी आठवली. मग लक्षात आलं, आत्याबद्दल डायरीत खूप लिहायचं आहे, डायरीला सारं सांगायचं आहे, पण राहून जातंय.

१४ नोव्हेंबर
होस्टेलच्या मेसवर अत्यंत वाईट जेवण. अशाने झोप कशी लागणार नि अभ्यास कसा होणार? दोघातिघांचं भारीच कडाक्याचं भांडण झालं तिथं. मग रेक्टर त्रिवेदी सर दाढी कुरवाळत येऊन म्हणाले, मी बघतो. तुम्ही जा, अभ्यास करा.

पण त्यामुळे राडा करण्याची तीव्र इच्छा असणार्‍यांचा पोपट झाला.

१६ नोव्हेंबर
आत्या-अलका-ऊर्मी.

पुस्तकाच्या ओळींच्या मध्ये नेहमीच काहीतरी दिसायला हवं, असा काही नियम आहे का?

सतत कुणाचा तरी, कशाचा तरी मनावर अनभिषिक्त अंमल असायलाच हवा, असा काही नियम आहे का?

१९ नोव्हेंबर
परवा पेपर. आणि आज पिक्चर पाहिला. ही स्ट्रेस मॅनेजमेंट थेरपी आहे, असं पार्टनर म्हणाला. पिक्चर संपल्यावरच नेमका दादांचा फोन आला- हे नशीब. इतका ट्रॅफिकचा आवाज कसा, म्हणून बाबांनी विचारलं, तेव्हा सांगावं लागलं, लायब्ररीत चाललो आहे, रस्त्यात आहे.

आमचं एक काय होणार, ते काय कळत नाही.

२५ नोव्हेंबर
बाबांची सारखी तब्येत बिघडते आहे. लवकर थकतातसुद्धा आणि आजकाल. फोन केला की ते स्वतःच सांगतात, काळजी करू नकोस. पण मग अभ्यासातलं लक्ष उडतंच.

प्रफुल्ल, अमेय आणि शशी लायब्ररीतच बसतात. ऊर्मी म्हणाली, रूमवरचा अभ्यास बंदच कर. लायब्ररीत करायचा रोज. मला ती पुस्तकांची कपाटे सारखे डोळे वटारून बघत असल्यागत वाटायची. पण ती म्हणते की, होस्टेलमधली सर्वांत मोठी रूम तुला मिळाली आहे, खूप मोठी, आणि ही आजूबाजूची असंख्य पुस्तके म्हणजे गप्पा मारायला बसलेले पार्टनर्स, मित्र आहेत, अशी कल्पना लायब्ररीत बसून करून बघ बरं!

ऊर्मीचे कधीतरी काहीतरीच विचित्र असते. पण एखादे काम असल्यासारखे त्यावर इमानेइतबारे विचार करत बसणे, हे काही सुटत नाही.

२० जानेवारी
अनंत वादविवाद होऊन शेवटी गॅदरिंग व्हायचं ठरलं. मला बळजबरीने गाण्यात भाग घ्यायला सांगितलं गेलंय. दुपारी ऊर्मीला सांगितलं, तेव्हा ती म्हणाली, तिलाही तिच्या ग्रूपच्या फॅशन-शोमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.

स्टेजवर कधीच गायलो नाही, असं म्हटल्यावर म्हणाली, 'मी तरी काय रोज रँपवर चालते की काय? कुठलाही प्रसंग एकदाच असतो. बहुतेक वेळा पहिल्यांदा आणि शेवटचा. नथिंग लाईक इट, इफ यू बी इन द परफेक्ट हार्मनी विथ इट!'

धन्य.

Catwalk copy.jpg

२ फेब्रुवारी
ऊर्मी आणि तिच्या ग्रूपचा फॅशन शो मी विंगेत थांबूनच पाहिला. ही अशी, इतकी सुंदर ऊर्मी याआधी कधी दिसलीच नव्हती मला. इतकी रेखीव. इतकी चित्रासारखी. रोज लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्समध्ये थेरम्स आणि एक्सपेरिमेंट्सची खिल्ली उडवणार्‍या आणि प्रत्येक गोष्टीची अ‍ॅप्लिकेशन्स आधी सांगा, आणि मग शिकवा, असं रोखठोक सांगणार्‍या ऊर्मीपेक्षा ही काहीतरी वेगळीच होती.

'छान केलेस आणि छान दिसतेसही..' असं काहीतरी ती विंगेत आली तेव्हा मी पुटपुटलो. ती हसली, आणि जवळ येऊन म्हणाली, 'यू वेअर टू गुड. सही गायलास. मला आता खूप गाणी ऐकायची आहेत तुझ्याकडून'. मी तिच्या डोळ्यांत बघितले, तर त्यावेळच्या तिच्या काळ्याभोर डोहासारख्या डोळ्यांचे माझ्याकडे बघणे मला असह्य झाले. व्हेरी इंटेन्स! तीव्र प्रकाशझोत डोळ्यांवर आल्यागत मी मान वळवली, तेव्हाही दोन क्षण ती समोरच उभी होती.

ती पुन्हा हसली, आणि तिथून निघून गेली. ती जाताना मी बघितले, आणि मघाचे तिचे ते फॅशन शोमधले वावरणे-चालणे पुन्हा आठवले. शक्तिपात झाल्यागत मी कितीवेळ तिथे उभा होतो कोण जाणे. पण भानावर आलो, तेव्हा बर्‍यापैकी सामसूम झालेली. विंगेच्या मागच्या बाजूने मग मी बाहेर जायला निघालो, तर मेकअप आणि तयारी करण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या छोट्या क्युबिकल्समधल्या एकात पुन्हा मला ती दिसली. पाठमोरी. आरशात बघत. केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत.

कुठूनतरी शक्ती मिळाल्यागत तीरासारखा मी तिच्या दिशेने गेलो. आरशात मला बघून काहीतरी बोलण्यासाठी ती वळली, तर मी बेभान होऊन गुडघे टेकले. तिच्या कमरेत धरून तिला फिरवले, आणि तिच्या पाठीच्या पन्हाळीवर वेड्यासारखे, आसुसून ओठ टेकले.

मग थरकापल्या शरीराने होस्टेलवर आलो, आणि आपण नक्की काय केलं त्याचा अंदाज घेत राहिलो, पुन:पुन्हा आठवत राहिलो. पण तिने त्या सार्‍यानंतर काय केलं, ते आठवलं नाहीच.

४ फेब्रुवारी
धड अभ्यास होत नाही. धड झोपही पूर्ण होत नाही. रात्रभर स्वप्नांचा फुकट सिनेमा. कशाला कशाचा मेळ नाही. सकाळ झाली की, सारे काही फॉर्मॅट. ताप येणार असं वाटतं सारखं, पण येतच नाही साला. परवाचा तो अफाट दिवस पुन्हा नाही का येणार?

बाबांच्या तब्येतीची काळजी वाटते. हा विषय मनात आला की, काहीतरी अपराध केल्यागत लगबगीने उठून हातात पुस्तक घ्यायला होतं.

७ फेब्रुवारी
तो मत्स्यगंध मला अजूनही अस्वस्थ करतो. काही सुचत नाही. स्वप्नांतही हा गंध येऊ लागलाय, म्हणजे कमालच आहे. मला उगीचच राजा शंतनू असल्यागत वाटते आहे. तो गंध मला नाकाछातीत भरून घ्यायचाय. नेहमीसाठी.

१६ फेब्रुवारी
गेले काही दिवस खूप अवघडल्यासारखं वाटत होतं ऊर्मीसमोर. आज अभ्यास, प्रॅक्टिकल्स वगैरेवर बोलल्याने मोकळं वाटलं. पण तिच्याबद्दल नक्की काय वाटतं, ते कळण्याइतका अजून मॅच्युअर नाही झालो, असं वाटतं. तिला काय वाटतं ते कळणं तर दूरच.

क्लासरूममध्ये, प्रॅक्टिकल्सच्या वेळी ती शेजारी असताना तो विशिष्ट गंध अस्वस्थ करत राहतो, आणि मी माझा राहत नाही.

सतराशे विषय आपल्या डोक्यात, बघावं तेव्हा सैरभैर. कुठली एक गोष्ट सलग दोन मिनिटे डोक्यात राहत असेल तर शपथ.

२४ फेब्रुवारी
रूमवर आलो, तर चोरी झालेली. कुलूप फोडलेले आणि सगळ्या बॅगा उचकटलेल्या. संदीपचे पैसे गेलेले. कॅलक्युलेटरं तशीच पडलेली बघून मात्र नवल वाटलं.

ऐन परीक्षेच्या वेळेस आम्हा बिचार्‍यांची गच्छंती नको, म्हणून चोराने दया केलेली दिसतेय.

बाबांची पुन्हा तब्येत बिघडली.

१ मार्च
ते स्टॅटिक्स-डायनॅमिक्स वगैरे ठीक आहे. पण त्याचे व्यवहारातले उपयोग पण लगेच आणि त्याच वेळी शिकवले पाहिजेत. इतकेच काय, पण फील्डवर शिकवले पाहिजेत हे सारे विषय, असं आज ऊर्मी पुन्हा एकदा म्हणाली.

मी तिच्या चेहर्‍याकडे बघत राहिलो, तर ती लॅबमधल्या सिंपल पेंड्युलमचे नाजूक झोके जगाचे भान विसरल्यागत बघत होती. गॅदरिंगच्या त्या दिवसापेक्षा ती आज पुन्हा वेगळीच दिसत होती. संपूर्ण वेगळी.

मला क्षणभर 'मला तो दिवस पुन्हा हवाय' म्हणणार्‍या स्वतःत बुडालेल्या अलकेचा भास झाला.

१८ मार्च
गाणं.
फॅशन शो.
माईआत्या.
मॅट्रायसेस. कॅल्क्युलस. डेरिव्हेटिव्हज.
बाबा.
पाठीची पन्हाळ.
कोइफिशंट ऑफ फ्रिक्शन.
'मरण्याचा' तो दिवस 'जगून' घेणारी अलका.
मेकॅनिक्सचे व्यवहारातले उपयोग.
मत्स्यगंध.
डीएम चौकातल्या पोरी. रूममधली चोरी.

एक ना धड भाराभर चिंध्या. तिन्ही प्रतलांत अस्ताव्यस्त घुमणारा पेंड्युलम झालाय आमचा.

अभ्यासा, मला माफ कर.
डायरी, मला माफ कर.
झोपे, तू पण माफ कर. आणि प्लीज ये आता.

२६ मार्च
चौकातल्या देवीच्या मंदिरात कसलासा उत्सव चालू झालाय. मंदिरात गेलो, तर प्रचंड गर्दी. हे मंदिर मला फार आवडतं. तासन् तास बसून राहिलं तरी बोअर होत नाही. मी कधी देवीकडे मागत मात्र काहीच नाही. तुला योग्य वाटेल ते कर, असं सांगतो फक्त.

आज मात्र सांगितलं - बाबांना बरं कर.

१ एप्रिल
लाईट्स गेलेत. त्यामुळे सगळीकडे अंधारबुडूक. रूमच्या खिडकीबाहेर बघत बसलो. प्रफुल्लला सहज म्हणालो, 'किती सुंदर दिसतंय नाही? ही समोरची नारळाची झाडं, त्यापलीकडचा वाटोळा चंद्र, रस्त्याच्या पलीकडल्या विजूच्या चहाच्या टपरीवरची सेक्सी बत्ती आणि तिथनंच ऐकू येणारी गाणी, शेजारच्या मोकळ्या प्लॉटवर उगवलेलं गवत आणि त्यात चरणारी पांढरी-करडी गाढवं, बाजूच्या बंगल्याचा अंधारातला आकार, त्यावरची वेलफुलं.. अहाहा! आपण हे कधीच बघत नाही. आज लाईट्स गेले म्हणून दिसतंय..'

तर तो म्हणाला, 'तू आजकाल चक्रम झाला आहेस.'

मी म्हणालो, 'दॅटस् ग्रेट'.

मग तो पुन्हा म्हणाला, 'तू वायझेड पण झाला आहेस'.

मी म्हणालो, 'ओक्के'.

७ एप्रिल
बाबांना मुंबईला नेलंय.

८ एप्रिल
आभाळ कोसळलं. बाबांना कॅन्सर आहे. शेवटचे महिने किंवा दिवस उरलेत. हा निरोप सांगायला आणि मला सांभाळायला आलेल्या मामांच्या कुशीत मी धाय मोकलून रडून घेतलं.

मी का जन्माला आलोय नक्की? आकांत हेच प्रत्येक जन्माचे साध्य आहे काय?

१० एप्रिल
मध्येच पाऊस. खिडकीतून पावसाचे बारीक थेंब टेबलावर उडतात. सोबत कुठूनतरी रानतुळसेचा उग्र वास येतो आहे. का कुणास ठाऊक, या तीव्र गंधाबरोबर नेणिवेतून कसकसल्या भावना, आठवणी उसळतात. समोरच्या पॅडवर तयार झालेल्या बारीक थेंबांच्या नक्षीवर बोट फिरवतो - आवेगाने, बळजबरीने. काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण जमत नाही. नक्षीच बिघडते. चेकाळल्यासारखं होतं.

काहीच हातात नाही आपल्या. सारेच निरर्थक. फोल. आपण फार भुक्कड. आणि दीडदमडीचे.

न राहवून ऊर्मीला फोन केला.

११ एप्रिल
मी आणि ऊर्मी बसलो होतो तिथून जेंटस होस्टेल, मेसची इमारत, लायब्ररी, सिव्हिल डिपार्टमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, मेन बिल्डिंग, वर्कशॉप, पॉलिटेक्निक, मेकॅनिकल डिपार्टमेंट आणि लेडीज होस्टेल अशा अर्धवर्तुळाकृतीत नीट मांडलेल्या कॉलेजच्या इमारती बघून नवल वाटलं. या नजरेने कधीच बघितलेच नव्हते, हे लक्षात आलं. वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं एक वेगळंच, अजब समाधान वाटत राहिलं..

ऊर्मी म्हणत होती, 'जन्माचे साध्य वगैरे काहीही बोलू नकोस. असलं काहीही नसतं. आपण चालत राहायचं. डौलाने, ऐटीत. फॅशन शोमध्ये चालल्यागत. आकांतांचे आणि आवेगांचेही थांबे असतात. ते मांजराच्या पावलाने येतात. पण प्रचंड होऊन येतात. त्यांचाही स्वतःचा एक डौल, ऐट, रुबाब आणि वेग असतोच. आपणही तितक्याच ऐटीत त्यांना झेलायचे, पार पाडायचे. ते करताना स्वतःला निरखत राहायचं. वन्स-इन-अ-लाईफ असा तो अनुभव असतो. तो भोगायचा-जगायचा..!!'

वीज चमकली. आणि सारा आसमंत लखलखून निघाला. अंधारातले झाडांचे, इमारतींचे आकार तेवढ्या एका क्षणात दिसले; आणि एखाद्या घडत असलेल्या शिल्पातला नको असलेला भाग झटक्यात निघून जावा, आणि रेखीव शिल्प डोळ्यांसमोर यावे तसं क्षणभर वाटलं. त्याच एका क्षणात माझ्याकडे रोखून बघत असलेल्या डोळ्यांत आकांताची आसुसून वाट बघणार्‍या अलकेच्या शांत, स्निग्ध डोळ्यांचा भास झाला. विजेत चमकून गेलेल्या त्या अवाढव्य शिल्पाच्या स्फूर्तीचे मूळ तिच्यामध्ये असल्यागत मला वाटलं.

साक्षात्कार झाल्याच्या आणि साध्य मिळाल्यानंतरच्या थकव्याने, समाधानाने काठोकाठ भरून जाऊन मी जागेवरून उठलो, तेव्हा ऊर्मीही उठून माझा हात घट्ट पकडून म्हणाली, 'मी कॅटवॉक करू? तुझ्यासोबत? तुझ्यासाठी? फक्त तुझ्यासाठी??'

- साजिरा