'सोनी' कुडी

'एकाच संस्थेत आजीवन नोकरी' अशी संस्कृती असलेल्या जपानमध्ये 'नोकरी शोधा मोहीम' अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे एकदा ठरलं की ठरलं! त्यामुळं तिची तयारीही तितकीच अवघड. विविध कंपन्यांची आवेदनं अर्थातच जपानीमधून भरून पाठवायची. प्रत्येक कंपनीच्या तीन-चार मुलाखती. सगळं नीट झालं तर मग पैसे, रुजू होण्याची तारीख वगैरे .
"खूप भीती वाटते आहे.. नीट होईल सगळं बहुतेक.. पण भीती तर वाटते आहे..", ती म्हणाली होती.

border2.JPG

"ये

य्य.. मला 'ती' शिष्यवृत्ती मिळाली!!" तिच्या ऑर्कुट प्रोफाईलवर पाहिलं आणि मी रीतसर अभिनंदन केलं.

२००५ मधली गोष्ट आहे. पुण्यातल्या आमच्या त्या जपानी भाषेच्या वर्गातली सगळीच मुलं-मुली साधारण वीस-बावीस वर्षांची होती, अपवाद 'ही' कुडी. वय वर्षे सोळा, म्हणजे अकरावीत. ती जपानी भाषेची परीक्षा तशी बर्‍यापैकी अवघड असल्याने बहुतेक लोक नापासच होतात अशी त्या परीक्षेची ख्याती आहे. पण 'ती' अर्थातच पास झाली. त्याचदरम्यान बारावीची परीक्षा पण होतीच. तिथेही चांगले गुण. मग पुण्यातल्या 'विश्वकर्मा अभियांत्रिकी कॉलेजा'त प्रवेश. इथपर्यंतही ठीक आहे म्हणता येईल एकवेळ, पण त्यापुढेही जाऊन जपानी भाषेमधून अभियांत्रिकीचा अभ्यास करण्याचा विचार करणारी आणि ते यशस्वीरीत्या पूर्ण करुन दाखवणारी व्यक्ती म्हणून तिनं निवडलेली वाट आणि आत्तापर्यंतचा अनुभव आपल्यासाठी नावीन्यपूर्ण आणि प्रेरणादायक ठरेल, अशी आशा वाटते. अभ्यासाबरोबरच, केवळ जपानमधेच येतील असे अनुभवही वेगळे म्हणून लिहावेसे वाटले.

"नक्की काय आहे या शिष्यवृत्तीमध्ये?", मी म्हटलं होतं.
"पहिल्या वर्षी जपानीचा अभ्यास आहे. तो झाला की मग पुढची तीन वर्षं फक्त अभियांत्रिकी. म्हणजे, पहिल्या वर्षीही सर्वासाधारण विषय म्हणजे भौतिकशास्त्र, गणित वगैरे आहे..."
"म्हणजे त्यातल्या अभियांत्रिकीच्या विषयाबद्दल आत्ता काहीच माहिती नाहीये तर... पण तुला काय शिकायची आवड आहे?"
"मला असं काहीतरी शिकायचं आहे, जे जपानशिवाय इतर कुठंही मिळणार नाही...."

ही शिष्यवृत्ती २००७पासून चालू होणार होती. दरम्यान २००६च्या शेवटी, कंपनीच्या कामानिमित्त मीच जपानला आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत मी जपानमधेच असल्याने, तिच्या या वाटचालीबद्दल मी नेहमीच 'थेट दूरध्वनीवरून' ऐकत आलो आहे. पहिलं वर्ष संपलं आणि आमचं परत बोलणं झालं तेव्हा, " अरे, मी रोबॉटिक्सचा अभ्यास करणार आहे", दिप्ती म्हणाली होती.

"ही शिष्यवृत्ती मिळवावी, असं का डोक्यात आलं?"
"आपण जपानी शिकत असतानाच, 'मला जपानला जायचंय' ही इच्छा मनात होती. अभियांत्रिकीनंतर बरेच जण सहसा अमेरिका किंवा इंग्लंडला जाऊन 'एम.एस.' अर्थात पदव्युत्तर शिक्षण घेतात. शक्यतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं! मग जपानमधे 'त्रास होईल थोडासा कदाचित, पण करुन बघायला काय हरकत आहे?' असं म्हणून शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिथेच ही माहिती मिळाली."
"पण तुला अभियांत्रिकीच्या नंतरचा पर्याय हवा होता ना?"
"हो, पण जशी जशी माहिती मिळवत गेले, तसं मग 'का नाही?' असं वाटत गेलं.. त्या माहितीनुसार 'तांत्रिक शिष्यवृत्ती'साठी बारावीला विज्ञान लागतंच आणि आत्तापर्यंतच्या शिक्षणात नेहमी चांगले गुण आवश्यक असतात.
यात तरी काही अडचण येईल असं वाटत नव्हतं, वयही त्यांच्या कक्षेत बसत होतं. खुशीत नोंदणी केली. पात्रता चाचणीच्या मुलाखती झाल्या आणि मानद (ऑनर्स) शिष्यवृत्ती मिळून जपानला जाण्याचं ठरलं!

"जपानला पोचले, तेव्हा वेगळा देश, वेगळी भाषा वगैरे नेहमीचे प्रश्न होतेच. पण त्याचबरोबर सगळ्यांत मोठी काळजी होती ती म्हणजे 'जपानीमधून हे सगळं शिकायला खरंच जमेल का?' ही!"
इथून (पुण्यातून) जे शिकून चाललीये ते फक्त जनरल गप्पा मारण्याइतकं किंवा काही ठरावीक विषयांमध्ये बोलू शकणं इतपत झालं. त्याच्या आधारावर 'आता मी अभियांत्रिकी करते' वगैरे म्हणणं थोडं अवघड वाटत होतं... पण सुदैवानं वाटलं तितकं अवघड नाही गेलं. दोनतीन आठवड्यांतच बर्‍यापैकी समजू लागलं आणि मजा येऊ लागली. "
"मग, जपानमध्ये 'कॅलिग्राफी' वगैरे शिकलीस का?"
"शिकले नाही, पण एकदा प्रयत्न करून बघितला होता. त्या दिवशीच्या कार्यक्रमात विविध देशांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या देशातली एखादी कला सादर करून दाखवायची होती. जपानच्या प्रतिनिधींनी तेव्हा 'कॅलिग्राफी'चं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. तेव्हा मीही करून बघितलं होतं."
"अच्छा. आणि तुझं प्रात्यक्षिक?"
"मी योगासनं करून दाखवली!"

heart.jpg

"काल रात्रभर अभ्यास करत बसली होतीस?", मी म्हटलं. त्या शनिवारी सकाळी सकाळी दूरध्वनीवरून संपर्क केला तेव्हा समजलं.
"अरे, ते रिपोर्ट द्यायचे होतं. पण त्यात विशेष नाही काही, नेहमीचंच झालंय. सगळेच जागतात आणि त्यामुळं..."
तो संवाद तेवढ्यावरच थांबला होता. मग परत दुपारी संपर्क झाला तेव्हा, "आणि मग हा रिपोर्ट जपानीमधून लिहायचा का सगळा?"
"अर्थात! म्हणजे अगदी सगळ्या कांजी (चित्रलिपी) हातानं लिहिता येण्याची गरज नाही. संगणकावर लिहिता आल्या तरी बास असतं. त्यामुळं तितकंही अवघड नाही", ती सहजपणे म्हणाली होती.
मला मात्र लगेचच, कामानिमित्त पहिल्यांदा जपानीमधून दस्तऐवज बनवताना उडालेली माझी त्रेधातिरपीट आठवली. तरी बरं, माझं काम फक्त संगणकक्षेत्राशीच निगडित होतं. ही वेगवेगळ्या विषयातले दस्तऐवज बनवत होती. तेही त्या-त्या विषयाच्या कांजी वापरून आणि वरुन 'सोप्पं आहे अरे..' हे होतंच! त्यात ते दस्तऐवज तपासणारे जपानी! म्हणजेच आमिर खानपेक्षा परफेक्शनिस्ट! जरा इकडचं तिकडं झालं की बसा सुधारत!

"आणि महाविद्यालय कसं वाटलं एकंदर? म्हणजे तिथल्या सुविधा, साधनांची उपलब्धता, विद्यार्थ्यांकडून वापर, शिकवणं इत्यादी?"
"आपल्या इथली मोठी मोठी महाविद्यालयं आहेत, तिथं असतात त्या सुविधा इथल्या सगळ्यांच महाविद्यालयांत आहेत. उदाहरणार्थ, प्रशस्त ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा वगैरे. विद्यार्थ्यांचं ते सगळं वापरणंही चांगलंच एकंदर. शिकवण्याबद्दल मात्र काही चांगल्या गोष्टी आणि काही थोड्याशा वेगळ्या गोष्टी दिसल्या. म्हणजे, तास चालू असताना काही लोक बिनधास्त बाकावर डोकं टेकून झोपलेले दिसतात. त्यांना प्राध्यापक काहीही म्हणत नाहीत. म्हणजे म्हणूच शकत नाहीत. ते आपले येतात, शिकवतात आणि जातात. इथल्या काहीकाही प्राध्यापकांना खरंच 'बिचारे' म्हणावं लागेल, इतके साधे असतात."
"पण मग अशानं विद्यार्थी नापास होत असतील?"
"होतात काही. पण नापास झालं की त्यांना 'गोकाईसेई' म्हणतात. सरळसरळ भाषांतर केलं तर, 'पाच वर्षवाले विद्यार्थी' म्हटलं जातं. मग त्या पाचव्या वर्षाची फी पंधरा लाख जपानी येन. म्हणजे सध्याच्या येन-रुपये दराप्रमाणे साधारण साडेसात लाख रुपये! आणि नोकरीच्या वेळचे 'कॅम्पस इंटरव्ह्यूज' वगैरे पण नाहीत.. "
"हम्म!.. म्हणजे शिष्यवृत्तीवर आलेल्यांसाठी तर ती फी फारच जास्त असते. त्यामुळे त्यांना नीट अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही."

"तुझ्या 'रोबॉटिक्स' विषयाबद्दल काहीच माहिती नसल्यानं त्याबद्दल काहीच बोलता येणार नाही. तूच सांग!"
"'रोबो'बद्दल सांगायचं तर आम्ही मागच्या वर्षी एक प्रयोग केला होता ज्यात एक छोटासा रोबो बनवला होता. त्या संकल्पनेसाठी आम्हांला बक्षिस मिळालं होतं ,पण नंतर वेळेअभावी तो पूर्णच नाही करता आला. म्हणजे आता होईल असं की, हे वर्ष संपून जाईल आणि रोबो कागदावरच!"
"आणि त्यासाठी मार्गदर्शन?"
"ज्या प्राध्यापकांच्या हाताखाली आम्ही काम करतो, ते संपूर्ण मार्गदर्शन करतात. त्यांच्या मदतीशिवाय काहीच शक्य नाही. आपण उत्साह दाखवला की, ते इतकी मदत करतात की आश्चर्य वाटावं!"
"मग, वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या हाताखाली काम करताना, एक भारतीय म्हणून कशी वागणूक मिळाली?"
"खूप चांगली! भारतीय विद्यार्थी फार अभ्यासू असतात, असं त्यांचं मत होतं. इंग्रजीमधून एखादं चांगलं सादरीकरण केलं की मग तर ते फार कौतुक करत.. त्यातून जपानीही बर्‍यापैकी येत असल्यानं आणखीनच मजा यायची! "

मी स्वतः टोक्योमधे रहात असल्यानं जपानमधल्या खर्चाची कल्पना होतीच. त्यामुळे, तिला मिळणारी शिष्यवृत्ती पुरेशी आहे का, असा प्रश्न पडला होता.
"येऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती तर मिळाली होती, पण इथला राहण्याचा, खाण्याचा वगैरे खर्च बघता, 'आरुबाईतो' करण्याशिवाय पर्याय नाही रे! म्हणून मग आठवड्यातुन तीनचारदा दोन-दोन तास असं 'आरुबाईतो' केलं की पुरेसं असतं ... ('आरुबाईतो' हा शब्द जपान्यांनी जर्मन भाषेमधून [arbeit] घेतला आहे. आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली अर्धवेळ नोकरी म्हणजे 'आरुबाईतो.') पण मग परीक्षेच्या वेळी अजिबात वेळ नसतो तेव्हा मात्र हे जमत नाही. तेव्हा मग घरच्यांचा आधार घेत फक्त अभ्यास! या तीन वर्षांत मी तीनचार प्रकारची 'आरुबाईतो' केली. त्यात भारतीय उपाहारगृहात मदतनीस म्हणून काम केलं. एका 'सोबा'च्या (सोबा म्हणजे बकव्हीटच्या नूडल्स) दुकानामध्ये काम केलं. तिथले मालक फार चांगले होते. आजोबा-आजी होते अरे. मी दुसर्‍या देशातून येऊन इतकं(?!) काम करते आहे, शिकते आहे म्हणून ते विशेष काही कामच करायला लावायचे नाहीत. कधीकधी असंच काहीतरी खायला आणून द्यायचे.
"सगळीच मुलं हे करतात का?" मी विचारलं.
"हो. जवळपास सगळेच! उपाहारगृहाव्यतिरिक्त मग 'सेव्हन-इलेव्हन', 'लॉसन' या कन्विनअन्स स्टोअर्समध्येही काम असतं.. कन्विनअन्स स्टोअर्स म्हणजे तर २४ तास चालू असतात ना आणि तिथं रात्री काम केलं की थोडी जास्त कमाई होते, म्हणून मीही काही वेळा रात्री काम केलं. रात्री काम करायचं दुसरं कारण असं की, काम नसेल त्या दिवशी अभ्यासासाठी जागावंच लागायचं. त्यामुळे दिवस-रात्रीचं गणित बरेचदा उलटं होऊन जात असे.
या कन्विनअन्स स्टोअर्समधे काम करताना, जपानी कंपन्यांच्या लॉजिस्टिक्सबद्दल थोडासा अंदाज आला. म्हणजे कुठला माल, कुठल्या दिवसात किती प्रमाणात खपतो याचा त्यांनी इतका अभ्यास केला आहे की काही विचारु नकोस!! सगळं काही त्या अभ्यासावर अवलंबून असून, त्यामुळेच सगळं सुरळीत चालतं असं म्हणता येईल कदाचित."
"आणि मग रात्रीची वेळ म्हटल्यावर कंटाळा आला की एखादी डुलकी.. " मी म्हटलं.
"नाही रे. हे 'आरुबाईतो' तितकंसं गंभीरपणे घ्यायची गरज नाही, असं कोणालाही वाटणं साहजिक आहे. पण प्रत्यक्ष काम करू लागल्यावर किती काम आहे, ते समजलं. गिर्‍हाईक आले नाहीत म्हणून स्वस्थ बसून रहा, हा प्रकारच नाही. प्रत्येक पदार्थावर त्याची 'वैध तारीख' छापलेली असते ना, मग वैध तारखेसाठी माल तपासून पहा, ठरावीक पद्धतीनं रचून ठेवा, तयार खाद्यपदार्थ असतात ना विकायला, त्याची भांडी घासा, फ्राईड चिकन तयार करा, असं बरंच असतं. मुख्य म्हणजे, गिर्‍हाईक आले, की सुहास्यवदने, अतीव नम्रतेने वगैरे त्यांच्याशी बोला, अशी कित्येक कामं असल्यानं वेळ कसा जातो हेच कळत नाही. दोन सत्रांमधे असलेल्या सुट्टीत, थोड्या वरखर्चासाठी म्हणून हे सगळे उद्योग करावे लागतात."

मग या सगळ्यांमधलं तुझं सगळ्यांत आवडतं 'आरुबाईतो' काय होतं?
ते तर अर्थात 'इंग्रजी शिकवणी'च म्हणायला लागेल. आठवतंय ना ते? एकदा सांगितलं होतं, इथल्या काही मध्यमवयीन स्त्रियांना इंग्रजी शिकवायला जाते आहे म्हणून... ते फार छान होतं. त्या सगळ्याजणी फार फार उत्साहाने शिकायला यायच्या आणि आपल्यापेक्षा लहान मुलगी, दुसर्‍या देशात जाऊन तिथे इंग्रजीमध्ये बोलते आहे, शिकवते आहे, याचं त्यांना भारी कौतुक होतं. मजा यायची शिकवायला.."
"अच्छा.. आणि ह्या सगळ्याबरोबरच, इथले मित्र कसे वाटले? आपल्या इथल्या मित्रांसारखेच का?"
"हो, हो. फार छान वागले सगळे. नियमित 'सरप्राइज' देऊन वाढदिवस साजरा करणं झालं. कधी आजारी असताना मदत वगैरे तर असायचीच. काही काही सामान, म्हणजे अभ्यासाचं टेबल वगैरे पाहिजे होतं, ते मैत्रिणीनं स्वतःकडचं दिलं. तिच्याकडे दुसरं होतं, पण असं देणंही व्हायला हवं ना? बाकी मलेशिअन, चीनी, पाकिस्तानी, कोरिअन वगैरे बर्‍याच देशातले लोक होते बरोबर. "

bdday.jpg

ही २०१० मधली गोष्ट. तीनचार महिन्यांपूर्वी अचानक दूरध्वनीवर, "अरे, नोकरी शोधायची वेळ आली आता..." ती म्हणाली होती. 'नोकरी शोधा मोहीम!'
'एकाच संस्थेत आजीवन नोकरी' अशी संस्कृती असलेल्या जपानमध्ये 'नोकरी शोधा मोहीम' अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे एकदा ठरलं की ठरलं! त्यामुळं तिची तयारीही तितकीच अवघड. विविध कंपन्यांची आवेदनं अर्थातच जपानीमधून भरून पाठवायची. प्रत्येक कंपनीच्या तीन-चार मुलाखती. सगळं नीट झालं तर मग पैसे, रुजू होण्याची तारीख वगैरे .
"खूप भीती वाटते आहे.. नीट होईल सगळं बहुतेक.. पण भीती तर वाटते आहे..", ती म्हणाली होती.

"आज 'शिझुओका'ला मुलाखत आहे एका कंपनीमध्ये.. तिथे कंपनीचं एक कार्यालय आहे आणि तिथेच मुलाखत आहे."
"एवढं लांब?", जपानच्या दुसर्‍या टोकाला मुलाखतीसाठी जायचं ऐकून मी म्हटलं होतं, "आणि याचे पैसे कोण देणार?"
"पैसे देणारेत तेच. मग आपलं काय जातंय ?"
चांगल्या/वाईट दैवानं तिथं काम नाही झालं. "कुठेच नाही झालं तर?" असं वाटतंय.. " ती म्हटली होती.
"होईल, होईल.. अनुभव कसा होता पण एकंदर?"
"छानच. मीच जरा कमी पडले रे बोलण्याच्या बाबतीत. मुलाखतीमध्ये बोलायला लागतं ना फार, त्यात कमी पडले. स्वतःबद्दल किती काय काय बोलायचं असतं ना तिथे. ते जमलं नाही.."
"बरोबर! आता मग एका कागदावर लिहून काढणार का सगळे 'माझ्याबद्दल' मुद्दे? मी सांगतो, पुढच्या मुलाखतीहून येताना 'रुजू होण्याची तारीख' काढूनच बाहेर ये बघ.... "

"आज शिनागावा (टोक्योजवळच) रेल्वे स्थानकाला येणार आहे.." मधेच दूरध्वनीवर बोलणं झालं. तिची मुलाखत होती आणि नीट पार पडली. आमची भेट झाली नाहीच.
थोड्याच दिवसांनंतर अजून एक मुलाखत. मग अजून एक. सगळं खूप घाईघाईत चालू असल्यानं बोलणंही होत नव्हतं.
"आज तिसरी मुलाखत झाली आणि त्याप्रमाणे पुढच्या वेळी 'हो किंवा नाही सांगू' म्हटलेत. परत बोलावतील काही दिवसांनी."
"अरे, मस्तच! अभिनंदन! तुला स्वतःला कधी अंदाज आला का इथे काम होऊन जाईल म्हणून?"
"पहिल्या मुलाखतीमध्येच. कारण तो माणूस पहिली पंधरा मिनिटं महाविद्यालयाबद्दल, अभ्यासाबद्दल आणि मग तीस मिनिटं ओळख असल्यासारखा बोलत होता."
"बरोबर. ही पक्कं झाल्याची किंवा त्या मार्गावर असल्याचीच खूण असते सहसा..."
"नंतरच्या मुलाखतीमध्येही त्या मुलाखतकारांनी हस्तांदोलन केलं.. आणि जपान्यांनी इतरांबरोबर आपणहून हस्तांदोलन करणं म्हणजे खूप मोठं असतं, असं मला माझ्या मित्रांनी सांगितलं. कारण सहसा ते नुसतं थोडंसं वाकून अभिवादन करतात ना..."
"खरं आहे.. अरे हो, विचारायचंच विसरलो.. ही कंपनी कुठली आहे?" मी विचारलं.
दहा हजार अर्जांमधून, साधारण दोनशे जणांची निवड करण्यात आली. त्यात जपानी नसलेले सहा जण. अशा तर्‍हेने दीप्ती जपानच्या 'सोनी' कंपनीमधे सामील झाली, म्हणून ती 'सोनी कुडी'.

"पुढच्या वर्षी अभियांत्रिकीचं शेवटचं वर्ष पूर्ण होईल आणि नोकरी सुरु होईल. या तीन वर्षांच्या अनुभवाबद्दल कसं वाटतंय? 'अपेक्षा पूर्ण करणारा' होता का? "
या प्रश्नाचं उत्तर "हो! अर्थातच!!!" होतं.
"दुसर्‍या देशात, वेगळ्या भाषेतून शिकायची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. आईवडील, शिक्षकांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालंय. हाच अनुभव आपल्यामधल्या अजून काही मुलांना मिळाला, तर त्यांनाही बरंच काही शिकायला मिळेल. ही शिष्यवृत्ती आणि हा अनुभव एकदम 'ओसुसुमे' अर्थात 'नक्की करून पहा!!!' मदत लागली तर माझ्या परीने मदत करायला मी आहेच!

'सोनी' कुडी : - दीप्ती पानसे.

- ऋयाम