मराठी वेबसाईट्सचे दुकान चालवताना

मराठी भाषेत उत्कृष्ट, दर्जेदार व अत्याधुनिक वेबसाईट्स तयार करायच्या हेतूने मी 'मराठी वेबसाईट्स डॉट कॉम' ही कंपनी सुरू केली, याला आता दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. या दोन वर्षांत माझ्यापासून सुरू होऊन आता २० जणांची टीम झाली आहे आणि एका छोट्या वेबसाईटने सुरुवात करून आजवर ४५ मराठी वेबसाईट्स आम्ही तयार केल्या आहेत.

border2.JPG

prasad-mic-small.jpg

मी

निवडलेली आणि चालत असलेली ही वाट 'वेगळी वाट' आहे का हे मला माहीत नाही. मात्र काही नवी क्षितिजे शोधण्याच्या प्रवासातले अनुभव इथे मांडायचा हा प्रयत्न!

खरंतर मी पाहिलेली पहिली अस्सल मराठी वेबसाईट म्हणजे आपली मायबोली! बारा वर्षांपूर्वी मी बेल्जियममध्ये असताना, आणि तिथल्या डचभाषक संस्कृतीमध्ये कमालीचा एकटेपणा अनुभवताना माझ्या आयुष्यात मायबोली उमलली. मी वाचायला लागलो, जगभर विखुरलेल्या मायबोलीकरांशी बोलायला लागलो. पुढे मी लंडनला असताना माझ्या आयुष्यात मायबोली बहरली. मी लिहायलाही लागलो. मायबोलीकरांशी, पर्यायाने आपल्या आजच्या मराठी पिढीशी संवाद साधायला लागलो. या सगळ्यांमुळे इंटरनेटचा आणि त्यावरील साहित्य मराठीमध्ये असण्याचा आपल्या आयुष्यावर काय कमालीचा परिणाम होऊ शकतो, हे मी अनुभवलं.

लंडनमध्ये असताना मी, माझी पत्नी अल्पना हिच्यासोबत, 'राणीच्या राज्यात' हे ई-मासिक सहा-आठ महिने चालवलं. मराठीमध्ये इंटरनेटवर काहीतरी करण्याचा हा माझा पहिला प्रयत्न! हे मासिक प्रकाशित करण्यासाठी मी मराठी डॉट ऑर्ग डॉट यूके ही छोटेखानी मराठी वेबसाईट तयार केली होती. युनिकोड फाँट वापरून तयार केलेल्या जगातल्या पहिल्या काही मराठी वेबसाईट्सपैकी ती एक असावी. नोकरी आणि महाराष्ट्र मंडळाचं काम हे व्याप सांभाळून संध्याकाळ आणि शनिवार-रविवारी काम करत आम्ही हौसेनं 'राणीच्या राज्यात'साठी साहित्य गोळा करणं, त्याचं संपादन करणं, टायपिंग करणं असे उद्योग करायचो. हे मासिक तसं बरं चाललं. आम्हाला चांगले लेखकही मिळाले आणि हजारेक वाचकही... पुढे आम्ही भारतात यायचं ठरवलं आणि 'राणीच्या राज्यात' बंद पडलं.

sadha-sopa-small.pngभारतात आल्यावर इथला प्राधान्यक्रम होता नोकरी आणि घर. पण तरीही हे करतानाच, मी माझ्या कविता प्रकाशित करण्यासाठी साधं-सोपं डॉट कॉम तयार केली. आणि यातच मराठी वेबसाईट्स तयार करण्याच्या सध्याच्या व्यवसायाचं कदाचित बीज होतं. २००२पासून मी मायबोली आणि नंतर मनोगतावर बर्‍यापैकी लिहिलं होतं. (बर्‍यापैकी हा शब्द दर्जाविषयी नसून संख्येविषयी आहे!) हे सारं लिखाण कुठेतरी एका ठिकाणी प्रकाशित करावं, असं वाटत होतं. बरं, प्रकाशकांच्या दारी हेलपाटे मारून पुस्तकबिस्तक काढावं, असं वाटत नव्हतं (आजही वाटत नाही!). मग हे सारं लिखाण प्रकाशित करण्यासाठी स्वतःची वेबसाईट करावी, असं ठरवलं आणि तसं करून टाकलं! साधं-सोपं डॉट कॉमला सुरुवातीपासूनच वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला (आणि तो अजूनही मिळतो आहे). यामुळे उत्साह वाढला आणि पुढच्याच वर्षी मराठी गझलेला वाहिलेली 'मराठी गझल डॉट कॉम' तयार केली. मराठी गझल डॉट कॉम तयार करताना आपले लाडके मायबोलीकर गझलकार वैभव जोशी सोबत होते. वैभवमुळे मराठी गझल डॉट कॉमसाठी मिलिंद, नचिकेत, स्वाती, जयंतराव असे अनेक मित्र जोडले गेले आणि मराठी गझल डॉट कॉमही बाळसं धरून चालायला लागली. मग मराठी गझल डॉट कॉमवर आम्ही ऑनलाईन गझल कार्यशाळेपासून ऑनलाईन ऑडिओ गझल मुशायर्‍यापर्यंत अनेक वेगवेगळे प्रयोगही केले.

marathiwebsites_com_.pngअसं सारं हौसेनं सुरू असताना कधीतरी मी माझ्या नोकरीला जाम कंटाळलो होतो आणि स्वतःचा काही व्यवसाय सुरू करायच्या विचारात होतो. याच सुमारास डिसेंबर २००८मध्ये प्रकाशित झालेला, इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचा इंटरनेट इन वर्नाक्युलर लँग्वेजेस हा अहवाल माझ्या हातात पडला. यातील आकडेवारी वाचून मी थक्क झालो. या अहवालानुसार, मराठी भाषा जगातली पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे जी दहा कोटी लोक बोलतात, हे कळलं. असं असून मराठीमध्ये शंभराहून कमी वेबसाईट्स आहेत (तेव्हा होत्या - त्या अहवालानुसार!) याचाही शोध लागला आणि पेटून उठायला झालं. दहा कोटी मराठी बांधवांसाठी शंभरसुद्धा वेबसाईट्स नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट असेलही, पण त्याहीपेक्षा जास्त ही मोठी व्यावसायिक संधी आहे असं वाटलं आणि पुढच्या काही मिनिटांत मी मराठीवेबसाईट्स डॉट कॉम हे डोमेन नेम रजिस्टरही केलं!

नोकरी सोडून धंदा/व्यवसाय करणं हे नोकरदार पार्श्वभूमीच्या मराठी माणसाला बर्‍यापैकी अवघड असतं आणि नोकरी सोडल्यानंतर पहिले काही महिने अवघड जातंही. महिन्याच्या एक तारखेला बँकेत घसघशीत पगार जमा व्हायची सवय असते, ती खाडकन मोडते! आपण मराठी माणूस असूनही व्यवसाय सुरू केला म्हणून आपला कोणी सत्कार वगैरे करेल अशी अपेक्षा असली तर ती कधी पूर्ण होत नाही! त्यातून आपण मराठी भाषेसंबंधी व्यवसाय करत असल्याने आपल्याला काही सरकारी अनुदान वगैरे मिळेल असं वाटत असेल तर तसंही काही नसतं! आपण व्यवसाय करत आहोत ती आपली हौस म्हणून, इतर कोणावर उपकार म्हणून नाही हे पक्कं ध्यानात ठेवूनच काम करावं लागतं, आणि हाच विचार डोक्यात ठेवून मी सुरुवात केली. सुरुवातीला हौसेनं आणि हट्टानं स्वतःची वेबसाईट, व्हिजिटिंग कार्ड्स्, लेटरहेड्स, पाकिटं असं सर्व व्यावसायिक साहित्यसुद्धा मराठीमध्ये करून घेतलं (आजही तेच वापरतो आहे!), एक लॅपटॉप घेतला, घराची आणि अर्थार्जनाची सगळी जबाबदारी अल्पनावर टाकली आणि घरातून कामाला सुरुवात केली!!

कोणताही व्यवसाय सुरु केल्यानंतर पहिले पाच ग्राहक मिळवणं अत्यंत जिकिरीचं काम असतं. आपला व्यवसाय नवा असतो, केलेल्या कामांचे नमुने नसतात, आपल्या क्षमतेचा काही पुरावा नसतो, टीम, पायाभूत सुविधा असं काहीच आपल्याजवळ नसतं. असतो तो केवळ अफाट उत्साह आणि आपण काम करू शकू असा विश्वास... अशावेळी आपल्याला फक्त आपले मित्रच मदत करू शकतात. माझ्या सुदैवाने माझ्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात असे अनेक मित्र मदतीला धावून आले आणि त्यांची स्वत:ची किंवा त्यांच्या ओळखीतून पहिली काही कामंही मिळाली. या कामांमध्येही "मिळून सार्‍याजणी" सारखं दर्जेदार मासिक ऑनलाईन करणे, "महर्षी विनोद" यांच्या जीवन व साहित्यावर आधारित वेबसाईट तयार करणे आणि "सुयश वधूवर "या पुण्यातील प्रख्यात वधूवरसूचक मंडळासाठी पहिले अस्सल मराठी वधूवर सर्च इंजिन तयार करणे, अशी अव्वल कामं मिळाली. याच सुमारास माझा जुना मित्र आणि वेबसाईट निर्मितीक्षेत्रामधला पुण्यातला दादा, दिमाख सहस्रबुद्धे याने त्याच्याकडची काही कामंही दिली. मग पहिल्या एकदोन महिन्यांतच कामं कशी मिळवायची याची चिंता सोडून आलेली कामं पूर्ण कशी करायची, याची चिंता भेडसावायला लागली!

व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसांत आपण सर्वेसर्वा असतो. म्हणजे सर्व काही आपल्यालाच करायला लागतं! चपराशापासून मालकापर्यंत सगळ्याच जबाबदार्‍या आपल्या... माल खपवण्यापासून ते ग्राहकापर्यंत पोचेस्तोवर... कायदेशीर बाबी पाहण्यापासून ते हिशेब तपासण्यापर्यंत सर्वकाही... हळूहळू टीम तयार होऊ लागते किंवा तुम्हांला जमवायला लागते. एकेक माणूस पारखून घ्यावा लागतो. तुम्ही एकट्याने करत असलेली कामं इतरांना वाटून देऊन त्यांच्याकडून करून घ्यावी लागतात. सुदैवाने मला पहिल्या टीममेंबरपासून ते आजवर कधीही गुणी लोकांसाठी वणवण करावी लागली नाही. याच्या त्याच्या ओळखीतून, माहितीतून एक एक गुणी आणि वाहून घेतलेला माणूस मिळत गेला. एकत्र काम करताकरता माझं एकट्याचं असलेलं स्वप्न वीस जणांचं सामाईक स्वप्न बनून गेलं!

गेल्या दोन वर्षांत आम्ही अनेक प्रकारच्या मराठी वेबसाईट्स तयार केल्या. कविता, साहित्यापासून ते मासिकं, प्रकाशकांपर्यंत! गुंतवणूक सल्ल्यांपासून ते साहित्यसंमेलनापर्यंत, राजकीय पक्ष, उमेदवारांपासून ते सोशल नेटवर्किंग पोर्टल्सपर्यंत! या अनेक प्रकारच्या वेबसाईट्स तयार करताना वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या अनेक नामवंतांशी संबंध आला, संवाद झाला आणि मैत्रीही झाली. मनोरंजनक्षेत्रातले कौशल इनामदार, प्रसाद ओक असोत किंवा साहित्य क्षेत्रातले विभा, माधवीताई... प्रकाशनक्षेत्रातले 'राजहंस'चे माजगावकर असोत किंवा राजकारणातले डॉ. सतीश देसाई, रोहित टिळक किंवा श्री. उद्धव ठाकरे.. प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातले सचिन परब किंवा सामाजिक कामाच्या क्षेत्रातल्या दिग्गज विद्याताई, गीतालीताई... या आणि अशा शेकडो लोकांबरोबर झालेला संवाद, मारलेल्या गप्पा आणि जोडलं गेलेलं एक मराठीपणाचं नातं ही गेल्या दोन वर्षांतली प्रमुख कमाई!

अर्थात फक्त इतरांसाठी साईट्स तयार न करता, जेथे आवश्यक आहे असं वाटलं आणि शक्य झालं तिथे आम्ही स्वतःच्या मराठी साईट्सही करत गेलो आणि करतो आहोत. सुरुवात केली मराठी मनोरंजन क्षेत्रापासून. हिंदी किंवा हॉलीवूड तारे-तारकांचे ब्लॉग्ज् आणि फॅन क्लब्ज् असतात, तसे मराठीमध्ये कुठे दिसत नव्हते, म्हणून मराठी तारे-तारकांचे अधिकृत ब्लॉग्ज् आणि फॅनक्लब्ज् असलेलं पोर्टल आम्ही 'मराठी मनोरंजन डॉट कॉम' नावाने तयार केलं. हे पोर्टल करताना आमच्या टीमच्या तांत्रिक क्षमतेला जोड मिळाली ती पुण्याच्याच लीड ग्रूपच्या विनोद सातव आणि अश्विनी तेरणीकर यांच्या क्रिएटिव आणि मार्केटिंग टीमची. मराठी मनोरंजन डॉट कॉमच्या माध्यमातून मराठी चित्रपटांच्या ऑनलाईन प्रसिद्धीपासून ते पुरुषोत्तम करंडकातील एकांकिकांच्या ऑनलाईन परीक्षणांपर्यंत अनेक वेगवेगळे प्रयोग केले. याचबरोबर अनेक मराठी तारे-तारकांचे अधिकृत ब्लॉग्जही होस्ट केले!


marathimanoranjan.png

यापुढच्या प्रकल्पांमध्ये आहे, काँप्युटर किंवा मोबाईल स्क्रीन्ससाठी सुंदरसे मराठी 'वॉलपेपर्स' देणारी मराठी वॉलपेपर्स डॉट कॉम ! ही साईट सध्या प्रकाशनाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. (हा लेख प्रकाशित होईपर्यंत कदाचित ही साईट प्रकाशितही झाली असेल!)

निव्वळ व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं तर फक्त मराठीमध्ये वेबसाईट्स तयार करणं, हा काही प्रचंड मोठा आर्थिक फायदा देणारा व्यवसाय नाही. हे अर्थातच दोन वर्षांच्या अनुभवातून आलेलं शहाणपण! म्हणूनच आर्थिक फायदा कमावण्यासाठी आम्ही इंग्रजी वेबसाईट्सची कामं करतो, द्रुपलमधल्या थीम्स करतो, वेबसाईट्सची पॅकेजेस् करून विकतो. असे अनेक उद्योग करतो आणि करतही राहू. पण तरीही एखादी नवीन मराठी वेबसाईट करायला घेतली की आत कुठेतरी दरदरून हालतं, मोहरून जायला होतं! नवी मराठी वेबसाईट करायला घेतली की, माझ्याच नाही तर माझ्या बहुसंख्य टीम मेंबर्सच्याही अंगात काहीतरी वेडं वारं संचारतं!

प्रत्येक नवी वेबसाईट करताना आपण एक छोटंसं रोप लावतोय, असं आम्हांला वाटतं. आणि अशी किमान हजारेक रोपं आम्हांला लावायची आहेत. हजार रोपं लावली तर त्यातली निदान शंभरेक टिकतील. आणि आठ-दहा बहरून त्यांचे वृक्ष होतील.... त्या वृक्षांमधून मिळणार्‍या माहिती, ज्ञान आणि परस्परसंवादरुपी फळांनी पुढच्या पिढीतल्या काही लोकांपर्यंत तरी मराठीची अमृतवेल आपण पोचवू शकू, असा वेडा विश्वास आम्हांला आहे...

याच विश्वासामुळे, प्रेरणेमुळे रोज सकाळी मी कामाला सुरुवात करतो!

- प्रसाद शिरगांवकर