टू किल अ मॉकिंगबर्ड

या कादंबरीत आपले आयुष्य गमवावे लागलेला टॉम रॉबिन्सन, विक्षिप्त आणि हट्टी वडिलांमुळे घराबाहेरच्या आयुष्याला पारखा झालेला आर्थर रॅडली आणि बालपणातली निरागसता, भाबडा विश्वास संपलेली स्काऊट असे किमान तीन तरी मॉकिंगबर्डस् आहेत. पहिला सामाजिक पातळीवर; तर बाकी दोघे वैयक्तिक, खाजगी पातळीवर. पण एकाच पुस्तकात कुठेही मुद्दामहून रचल्याचा संशयही न येता या तीन अपरिहार्य कहाण्या एकाच कथानकात फार सुरेखपणे गुंफल्या गेल्या आहेत.

border2.JPG

'टू

किल अ मॉकिंगबर्ड' ही हार्पर ली या लेखिकेने १९६० साली लिहून प्रसिद्ध केलेली कादंबरी. कृष्णवर्णीय नागरिकांच्या समान हक्कांसाठी झगडणारी 'सिव्हिल राईट्स मूव्हमेंट' ऐन भरात येण्याआधी प्रसिद्ध झालेले हे पुस्तक रसिकांइतकेच जाणकारांकडूनही नावाजले गेले. १९६१ च्या पुलित्झर पारितोषिकासोबतच अनेक सन्मान या कादंबरीला मिळाले. ग्रेगरी पेकची भूमिका असलेला चित्रपटही तीन ऑस्कर पुरस्कार जिंकून गेला. या कादंबरीत ज्या बदलांचे, ज्या संघर्षाचे चित्रण झाले आहे, त्याचे संदर्भ अजूनही कमीअधिक प्रमाणात कायम आहेत. बालपणीच्या निरागस वृत्तीने टिपलेले सभोवतीच्या समाजातले संस्कार व्यक्त करताना प्रौढ वयातल्या विश्लेषक जाणिवेचीही अधूनमधून जोड देणारी, नर्मविनोदाची पखरण असणारी या कादंबरीची निवेदनशैली अजूनही लक्षावधी वाचकांना भुरळ घालत आलेली आहे. या कादंबरीचा परिचय करून घेण्याचा हा एक छोटा प्रयत्न.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच्या काही वर्षांतला अमेरिकन समाज हे एक खदखदते रसायन होते. कृष्णवर्णीयांना गुलामीतून मुक्त करण्याच्या हेतूने लढले गेलेले यादवी युद्ध संपून सात-एक दशके उलटली असली तरी दक्षिणेतल्या राज्यांत त्यांच्या स्थितीत फारसा फरक पडला नव्हता. तुलनेने उदारमतवादी असलेल्या उत्तरेकडच्या राज्यांत मिळेल त्या मार्गाने कृष्णवर्णीय गुलामांचे स्थलांतर चालू होते. ('ग्रेट मायग्रेशन' या संज्ञेने ओळखल्या जाणार्‍या या सामाजिक उलथापालथीच्या काळात जवळजवळ पन्नास लाख कृष्णवर्णीय गुलाम उत्तरेतील राज्ये आणि कॅलिफोर्निया राज्यात निसटून जाण्यात यशस्वी ठरले.) अशातच जागतिक मंदीत अमेरिका आणि त्यातही औद्योगिकदृष्ट्या पिछाडीवर असलेली दक्षिणेतली राज्ये होरपळून निघत होती. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडून आलेले फ्रॅंकलिन रूझवेल्ट त्यांची प्रागतिक, क्रांतिकारक धोरणे धडाक्याने राबवत होते. युरोपावर दुसर्‍या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. सामाजिक सुधारणा घडून येण्यासाठी जे पोषक वातावरण लागते, त्याची वानवा असली तरी थोडी दारे किलकिली होऊ लागली होती. १९३२ ते ३५च्या या कालावधीत दक्षिणेतल्या अलाबामा राज्यात, मेकॉम्ब नावाच्या एका काल्पनिक नगरात ह्या कादंबरीचे कथानक आकार घेते.

पहिल्याच काही पानांत निवेदनातले दुहेरी आवाज/दृष्टिकोन वाचकाला सांधेबदल जाणवूही न देता वापरण्याचे हार्पर लीचे कौशल्य दिसून येते. हा किस्सा सांगताना सुरुवात कुठून करायची, यावर आपल्या भावाचे मत खोडून काढताना एका सात-आठ वर्षांच्या मुलीच्या नजरेतून लिखाण उतरते; तर युरोपातल्या छळाला कंटाळून अमेरिकेत स्थायिक झालेल्या सायमन फिन्च या मूळ पुरुषाने कृष्णवर्णीय गुलामांना कामाला जुंपून बस्तान कसे बसवले, यामागची विसंगती न बोलताही दाखवून देण्यामागचे प्रौढ स्त्रीचे निवेदनही जवळजवळ त्याच सुरात येते.

Atticus-and-Scout.jpgसात-आठ वर्षांची स्काऊट, तिच्याहून चार वर्षांनी मोठा भाऊ जेम, घरातली कृष्णवर्णीय दाई कॅलपर्निया आणि पन्नाशीकडे झुकलेले वडील अ‍ॅटिकस फिन्च ही फिन्च कुटुंबातली मंडळी. दोन वर्षांची असताना आई निवर्तल्यावर गावात प्रतिष्ठित वकील असणार्‍या वडिलांच्या सुसंस्कृत वळणात वाढलेल्या स्काऊटची मूळची थोडी हूड, बंडखोर वृत्तीही अधूनमधून उफाळून येत असते. मग तो 'काय मुलीसारखी वागतेस?', म्हटल्यावर डिवचली जाण्याचा प्रसंग असो की शेजारच्या रॅडली कुटुंबाच्या घरात बंदिस्त असणार्‍या आर्थर रॅडलीबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी रात्री त्यांच्या मळ्यातून जाऊन खिडकीतून डोकावून पाहण्याचा प्रसंग. त्यांचे गाव मेकॉम्ब हे तालुक्याचे ठिकाण. छोटे गाव असल्यामुळे प्रत्येक कुटुंब इतरांना केवळ नावानिशी ओळखते असेच नाही, तर प्रत्येकाच्या वागण्याच्या तर्‍हाही सर्वांच्या परिचयाच्या.

अशा गावात स्काऊटच्या घराशेजारी राहणारे रॅडली कुटुंब मात्र अगदी वेगळे. इतरांत अजिबात न मिसळणारे. अशा घरातल्या आर्थर या मुलाला त्याच्या कुमारवयातल्या पुंडाईबद्दल गावातल्या अधिकार्‍याने शिक्षा केल्यावर, त्याच्या वडिलांनी त्याला घरात बंदिस्त केलेले असते. गेली कित्येक वर्षे त्याचे नखही कुणाच्या दृष्टीस पडलेले नसते. परिणामी आसपासच्या लहान मुलांमध्ये त्याच्याबद्दल भयमिश्रित कुतूहल असतं. आर्थर हे त्याचे मूळ नाव मागे पडून लहान मुलांत एक बागुलबुवा म्हणून ’बू रॅडली’ हे नाव रूढ झालेले असते. शाळेत जाताना स्काऊट आणि जेमही वाटेवरचे हे घर कायम जीव मुठीत धरून धावतपळत ओलांडतात. त्याच्याबद्दल अनेक दंतकथा गावात प्रचलित आहेत. कधी न पाहूनही जेम त्याचे वर्णन ’भयानक दिसणारा, साडेसहा फूट उंच, काळोख्या रात्रीं इतरांच्या खिडकीवर नखाचे ओरखडे काढणारा, खारींसारखे प्राणी कच्चे खाऊन जगणारा’ असे करतो. शेजारी आलेल्या त्यांच्याच वयाच्या डिल नावाच्या मुलाने डिवचल्यावर तिघे मिळून ’बू’ कसा दिसतो, हे पाहण्याचे दोन-तीन निष्फळ प्रयत्न करतात.

बू रॅडलीबद्दल लहान मुलांत आणि काही अपवाद वगळता गावात पसरलेली मते ही प्रतीकात्मक आहेत. बहुमतापेक्षा वेगळे असणार्‍या, आपले जीवन स्वेच्छेने वेगळ्या प्रकारे जगू पाहणार्‍यांबद्दल एक अनामिक दहशत बहुसंख्यांना वाटत असते. त्या भीतीची प्रतिक्रिया म्हणून मग त्या व्यक्तीशी किंवा समूहाशी ज्यांचा दूरान्वयेही संबंध नाही, अशांच्या दुरवस्थेला जबाबदार असण्याचा आळ तिच्यावर घेणे हेही नेहमीचेच. इंग्रजीतल्या 'कॉल अ डॉग मॅड, अ‍ॅंड शूट इट' या वाक्याप्रमाणे समाजाची बव्हंशी असणारी वागणूकच इथे प्रतिबिंबित झालेली दिसते.

आपल्या मुलांच्या या वागण्याकडे, चुकांकडे पाहण्याचा अ‍ॅटिकसचा दृष्टिकोन त्यांनी चुका करत करत शिकले पाहिजे असा आहे. शक्यतो उपदेशाचे डोस न पाजण्याकडे कल असणारा अ‍ॅटिकस, स्काऊटला दुसर्‍यांच्या नजरेतून जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करण्याचा आणि निरुपद्रवी जिवांना त्रास न देण्याचा सल्ला देतो. एरवी पापपुण्याची भीती न घालणारा तो, नाताळची भेट म्हणून खेळण्यातला बंदुका घेऊन दिल्यावर मात्र मॉकिंगबर्डससारख्या आपल्या गाण्याने रिझवणार्‍या, पिकांची वा बागांची नासाडी न करणार्‍या पक्ष्यांची शिकार करणे हे पाप आहे, असे बजावून सांगतो.

Jem-and-Scout1.jpgकादंबरीचा हा पहिला भाग बिल्डुंग्जरोमान (Bildungsroman) या प्रकारात - म्हणजे ज्यात कथेतल्या मुख्य पात्राचा निरागस बालपणाकडून प्रौढपणाकडे होणारा अटळ प्रवास चित्रित केलेला असतो, अशा स्वरुपाच्या पुस्तकांत मोडतो. कथानकात याच सुमारास अ‍ॅटिकसने स्वीकारलेल्या एका वादग्रस्त वकीलपत्राची चाहूल लागते. एका गौरवर्णीय स्त्रीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या कृष्णवर्णीय गुलामाच्या बाजूने कोर्टात लढण्याचे परिणाम आपल्या मुलांवर काय होतील, यावरचे त्याचे विचार 'द इयर्लिंग' किंवा 'पाडस'मधल्या ज्योडीच्या बापाच्या धडपडीची आठवण करून देतात. एकीकडे मुलांना बाहेरच्या जगाची झळ लागून नये, त्यांचे निरागस बालपण तसेच रहावे, ही धडपड आणि दुसरीकडे हे फार वेळ टिकणार नाही, बाहेरच्या जगाचे टक्केटोणपे खाऊन शहाणपण अटळपणे शिकावे लागेल, ही जाणीव अशा द्विधा अवस्थेत सापडलेले दोन्ही सुजाण बाप. फरक शोधायचाच झाला तर एकोणिसाव्या शतकातल्या, फ्लोरिडातल्या जंगलात राहणार्‍या पेन बॅक्स्टरला आपल्या मुलाला निसर्गाच्या दयामाया न दाखवणार्‍या रूपाची ओळख करून द्यावी लागते, तर अ‍ॅटिकस फिन्चला माणसांच्या जंगलातल्या त्याहूनही अधिक क्रूर गोष्टींबद्दल.

कादंबरीचा दुसरा भाग बराचसा टॉम रॉबिन्सन या गुलामावर चालवलेल्या खटल्याने व्यापला आहे. खटला सुरू होण्यापूर्वी त्याला गावातल्या तुरुंगात ठेवलेले असताना, तो फोडून स्वतःच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याकरता रात्री आलेला जमाव, अवचित तिथे पोचलेल्या स्काऊटने आपल्या वर्गातील एका मुलाच्या वडिलांना ओळखल्यावर त्याला समूहाच्या बेभान मानसिकतेतून बाहेर पडून आलेले भान, अ‍ॅटिकसने परिस्थितीजन्य पुराव्यांनिशी त्याचा निरपराधीपणा सिद्ध करण्याचा केलेला प्रयत्न हे सारे मुळातून वाचण्याजोगे आहे. काहीही काम न करता सरकारी मदतीवर, उकिरड्यावर पोरांचे लेंढार घेऊन जगणार्‍या बॉब यिवेलनेच आपल्या मुलीला टॉम रॉबिन्सनला मोहाच्या जाळ्यात ओढताना पाहून कशी मारहाण केली आणि गोर्‍या माणसाचा शब्द हा काळ्या माणसाच्या साक्षीपेक्षा ग्राह्य धरला जाईल, या खात्रीपायी उलट बालपणी अपघातात एक हात निकामी झालेल्या टॉमनेच बलात्कार केल्याचा बनाव कसा रचला, हे ज्युरींपुढे मांडूनही अखेर टॉमला दोषी ठरवले जाते.

असे असले तरी, शहरातील अनेक सुशिक्षितांना टॉमच्या निरपराधीपणाची खात्री पटलेली असते. वैयक्तिक हितसंबंध दुखावले जाऊ नयेत म्हणून किंवा काहीएक निर्णय घ्यायला जे धाडस लागते, ते अंगी नाही म्हणून ज्युरींत बसायचे नाकारणार्‍या या वर्गाला अ‍ॅटिकस फिन्चने त्यांची लढाई लढायला हवी असते. परिणामी निर्णय आपल्या बाजूने लागला तरी गावात आपली छी:थू होते आहे, हे बॉब यिवेलला जाणवते. त्याचा सूड म्हणून तो स्काऊट आणि जेम शाळेतल्या हॅलोवीनच्या समारंभानंतर रात्री परतताना त्यांच्यावर हल्ला करतो. त्या प्रसंगी, आत्तापर्यंत वर्षानुवर्षे केवळ आपल्या घरात बसून असणारा आणि शेजारच्या या दोन मुलांनी आगळीक करूनही झाडाच्या ढोलीत त्यांच्यासाठी लहानसहान भेटवस्तू ठेवून त्यांच्याशी मूक संवाद साधणारा बू रॅडली त्यांच्या मदतीला धावून येतो. झटापटीत त्याच्या हातून बॉब यिवेलचा खून होतो. असे असले तरीही, बचावासाठी केलेली झटापट आणि मुख्य म्हणजे बू रॅडलीचा खाजगीपणा जपण्याचा अधिकार अबाधित रहावा म्हणून, अ‍ॅटिकसचा विरोध डावलून पोलिस अधिकारी टेट या मृत्यूची बॉब यिवेलचा आपल्याच चाकूवर पडून झालेला मृत्यू अशी नोंद करतो.

इतके दिवस ज्याला प्रत्यक्ष न पाहताही आपण ज्याची धास्ती घेतली होती, त्या आर्थर रॅडलीला स्काऊट प्रथमच पाहते. सगळा गोंधळ संपून आर्थर रॅडलीला त्याच्या घरी पोचवून परत येताना तिला आपले घर, घरासमोरचा रस्ता यापूर्वी न पाहिलेल्या कोनातून दिसतो आणि इतकी वर्षे अपरिचित असणारा आर्थर रॅडली कसा विचार करत असेल, हे समजून घेण्याचा; नकळत आपल्या वडिलांनी सांगितलेला सल्ला कृतीत आणण्याचा ती प्रयत्न करते. वेगळ्या संदर्भात सांगायचे तर या 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे'च्या टप्प्यावर कादंबरी संपते.

. . .

थोडा विचार केला तर या कादंबरीत आपले आयुष्य गमवावे लागलेला टॉम रॉबिन्सन, विक्षिप्त आणि हट्टी वडिलांमुळे घराबाहेरच्या आयुष्याला पारखा झालेला आर्थर रॅडली आणि बालपणातली निरागसता, भाबडा विश्वास संपलेली स्काऊट असे किमान तीन तरी मॉकिंगबर्डस् आहेत. पहिला सामाजिक पातळीवर; तर बाकी दोघे वैयक्तिक, खाजगी पातळीवर. पण एकाच पुस्तकात कुठेही मुद्दामहून रचल्याचा संशयही न येता या तीन अपरिहार्य कहाण्या एकाच कथानकात फार सुरेखपणे गुंफल्या गेल्या आहेत. जे काही सांगायचे आहे, ते आतापर्यंत अनेकदा सांगून झालेले असले ('व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' इ.) तरी सांगण्याची ही निराळी शैली गालिबच्या 'अंदाज-ए-बयॉं और'प्रमाणे या कादंबरीच्या अनेक बलस्थानांपैकी एक.

दुसरे म्हणजे, यात कुठेही उसना क्रांतिकारक आव नाही. कृष्णवर्णीय हे आपल्यापेक्षा वेगळे, कमी दर्जाचे आहेत, ही समजूत पिढ्यानपिढ्या दक्षिणेतील गौरवर्णीय समाजात इतकी खोलवर रूजलेली होती की, अचानक एका भाषणाने संपूर्ण शहराचे हृदयपरिवर्तन झालेले दाखवणे, वस्तुस्थितीशी फारकत घेणारे ठरले असते. 'श्यामची आई'मधल्या, कुणबिणीला सहृदयपणे वागवूनही जनरीतीप्रमाणे घरदार बाटल्याचा आळ येऊ नये म्हणून, अंगावर पाणी घेऊन मगच घरात येण्याच्या प्रसंगाची आठवण करून देणारे काही प्रसंग या पुस्तकात आहेत.

कुठल्याही प्रभावी पुस्तकाप्रमाणे या कादंबरीचाही तिच्या प्रकाशनावेळी असलेल्या सामाजिक परिस्थितीशिवाय सुटा, वेगळा विचार करणे हे अपूर्ण ठरेल. १९६० साली जेव्हा ही कादंबरी प्रथम प्रसिद्ध झाली तेव्हा 'सिव्हिल राईट्स' चळवळ नुकतेच बाळसे धरू लागली होती. हार्पर लीच्या आधी अनेक लेखकांनी कृष्णवर्णीयांवर होणार्‍या जुलमांना साहित्यातून वाचा फोडली असली तरी दक्षिणेतल्या अलाबामा राज्यात वाढलेल्या एका गौरवर्णीय स्त्रीने बहुतांशी आपल्या बालपणात घडलेल्या घटनांवर बेतलेले इतके प्रभावी परंतु त्याचवेळी अनाग्रही चित्रण करणारे पुस्तक प्रसिद्ध करणे, हे अपूर्व होते. इतर अनेकांनी दाखवलेल्या धैर्याप्रमाणे आणि अनेक इतर गोष्टींप्रमाणे एका लहान मुलीच्या नजरेतून ही अन्याय्य विसंगती दाखवून देणार्‍या या पुस्तकाचाही कृष्णवर्णीयांना आपला हक्क मिळवून देण्यात खारीचा वाटा आहे.

अर्थात त्यापलीकडेही आज वेगळ्या संदर्भात या पुस्तकात चित्रित झालेला संघर्ष अजूनही चालू आहे. याच आठवड्यातील बातम्यांवर नजर टाकली तर बळी पडलेले असे कैक मॉकिंगबर्डस् दिसतील. मग ती समलिंगी म्हणून चिडवले गेल्यामुळे आत्महत्या केलेली अमेरिकेतली सहा महाविद्यालयीन वयाची मुले असोत किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग असूनही अ‍ॅबओरिजिनल (आदिवासी) जमातीतील असल्यामुळे ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या अमानुष छळाला तोंड द्यावे लागलेला माणूस असो. कदाचित उत्क्रांतीच्या ओघात राहून गेलेल्या, जे जे आपल्यापेक्षा वेगळे ते दुय्यम, धोकादायक मानण्याच्या आदिम प्रवृत्तीचा हा दोष असावा. या प्रवृत्तीचे चित्रण करण्याचा प्रयत्न, तिच्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्याने साहित्यात होत आला आहे. या प्रयत्नांतून जी काही मोजकी पुस्तके स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून टिकून राहतात; त्या अक्षरकृतींमध्ये 'टू किल अ मॉकिंगबर्ड'चा नक्कीच समावेश होतो.

- नंदन

Taxonomy upgrade extras: