वेगळ्या वाटेवरची एक 'तालबद्ध' वाटचाल

तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आता-आता दिसू लागलाय. मी २००६मध्ये मेलबर्नला राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांसाठी गेले होते, तेव्हा तिथल्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं होतं. भारतातून कसा काय पंच आला? हा खेळ तिथेही आहे? हे असे प्रश्न त्यांना पडले होते. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, असं माझं मत आहे. मुळात भारतीय स्त्रिया या खूप लवचिक असतात. शरीरानं आणि स्वभावानंसुद्धा! आपल्याकडे असलेली संगीत आणि शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा, त्यातील वैविध्य यांचं परदेशीयांना अतिशय कुतूहल आहे.

border2.JPG

मी

'लहानपणापासून जे शिकले, ज्यात नैपुण्य मिळवलं, अनेक अजिंक्यपदे मिळवली त्याच खेळाला मोठं करण्यासाठी मी झटलं पाहिजे', या ध्यासापायी आपल्यातलीच एखादी स्त्री जेव्हा एका वेगळ्या कार्यक्षेत्रात स्वतःला प्रस्थापित करते, तेव्हा 'ध्येयवेडी' हा एकच शब्द तिच्या वर्णनार्थ लागू होतो.

एखाद्या स्त्रीने पूर्णवेळ व्यवसाय म्हणून एका परदेशी खेळाचं प्रशिक्षकपद आणि परीक्षकपद भूषवणं, ही बाब अजूनही आपल्या पचनी पडणं कठीण आहे. थोडीथोडकी नाहीत तर तब्बल चौदा वर्षं 'जेट एअरवेज'सारख्या प्रतिष्ठित कंपनीत व्यवस्थापकीय पदावर काम केल्यानंतर ती नोकरी सोडून तालबद्ध जिम्नॅस्टिक्स (Rhythmic Gymnastics) या परदेशी खेळाचं प्रशिक्षकपद आणि परीक्षकपद भूषवण्याचं मोठं आव्हान वर्षानं यशस्वीरीत्या पेललंय.

वर्षा उपाध्ये... १९८९-१९९० सालचा, 'जिम्नॅस्टिक्स' या खेळासाठीचा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारी गुणी खेळाडू, आज आपल्या यशाची धुरा पुढच्या पिढीच्या खांद्यावर देण्यासाठी जिवापाड मेहनत घेतेय. तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या परदेशी खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याबरोबरच याच खेळाच्या जागतिक स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या सादरीकरणाचे गुणांकन करणार्‍या पंचमंडळात ती भारताचं प्रतिनिधित्व करतेय.

1_0.jpg

वर्षाची मुलाखत घेण्याच्या निमित्तानं आम्ही तिच्या घरी गेलो असता तिच्या घराच्या दर्शनी भागाची एक संपूर्ण भिंत भरून असलेली प्रशस्तीपत्रकं, सन्मानचिन्हं, तिनं मिळवलेली पदकं तिच्या कर्तृत्वाची साक्ष देत होती. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा अगदी तोंडावर येऊन ठेपल्या होत्या. त्यासाठीच्या सराव स्पर्धा, शिबिरं आणि सततचे परदेश दौरे अशा अतिशय व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून वर्षानं तिच्या या आगळ्यावेगळ्या करिअरबद्दल आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. त्या दिवाळीअंकाच्या निमित्तानं मायबोलीकरांसाठी शब्दरूपात -

तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या खेळाशी तुझी ओळख कधी झाली?

मी वयाच्या सातव्या वर्षापासून दादरच्या ‘श्री समर्थ व्यायाम मंदिरा’त जिम्नॅस्टिक्स शिकायला सुरूवात केली होती. साधारण तेरा-चौदा वर्षांची असताना मी ग्वाल्हेरला जिम्नॅस्टिक्सच्या शिबिरासाठी गेले होते. तिथे तालबद्ध जिम्नॅस्टिक्स शिकवण्यासाठी रशियाहून दोन प्रशिक्षक आले होते. त्यांच्याकडून सर्वप्रथम हा खेळ मी शिकले. त्यानंतरच्या वर्षी जिम्नॅस्टिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी आम्ही गेलो असता तिथे तालबद्ध जिम्नॅस्टिक्सच्याही स्पर्धा होणार आहेत, असं आम्हाला कळलं. तेव्हा, ग्वाल्हेरच्या शिबिरात रशियाच्या प्रशिक्षकांकडून जे काही शिकलो होतो तेच त्या स्पर्धेत सादर करून दाखवलं. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये स्पर्धात्मक पातळीवर हा माझा सगळ्यांत पहिला सहभाग होता.

तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये प्रशिक्षक आणि पंच म्हणून तुझं पदार्पण कधी झालं?

मला खेळाडू म्हणून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला १९८९-१९९० साली. त्यानंतर नोकरी करत असतानाच मी दादरच्या शिवाजीपार्कातल्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात तालबद्ध जिम्नॅस्टिक्सचं प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली होती. या खेळात पुढे जायचं असेल तर या खेळाचे नियम आणि बारकावे आपल्याला माहीत असलेच पाहिजेत या दृष्टीनं मी प्रशिक्षण आणि गुणांकनपद्धतीचा अभ्यास सुरू केला. मी महाराष्ट्राचा संघ घेऊन राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांना जायचे. पंच म्हणून काम करायचे. माझी तिथली कामगिरी पाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर पंचपरीक्षा देण्यासाठी भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेनं माझी निवड केली. २००५ साली आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा मलेशिया इथे घेतली गेली आणि त्या परीक्षेत मी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. त्यानंतर मी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करायला सुरूवात केली.

ही कठीण परीक्षा पार करणारी तू पहिलीच भारतीय आहेस आणि त्यामुळेच पहिली भारतीय महिलासुद्धा. या दुहेरी सन्मानाबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन.
तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या खेळाची माहिती मायबोलीकरांना करून देशील का?

तालबद्ध जिम्नॅस्टिक्स हा केवळ मुलींसाठी/महिलांसाठी असलेला एकमेव ऑलिंपिक मान्यताप्राप्त खेळ आहे. या खेळात वेगवेगळ्या प्रकारची साधनं हातात घेऊन संगीताच्या तालावर आपलं कौशल्य सादर करायचं असतं. ही साधनं पाच प्रकारची असतात - बॉल, रिबन, हूप किंवा रिंग, क्लब आणि रोप.

2_1.jpg

हा क्रीडाप्रकार 'बॅले' (ballet) या नृत्यप्रकारावर आधारित असून जिम्नॅस्टिक्स या खेळाशी समन्वय साधणारा आहे. यात तुमच्या शरीराची लवचिकता, तुमचं अंगभूत कलाकौशल्य, डोळे-हात आणि इतर अवयवांच्या हालचालींचा संगीताशी आणि साधनांशी योग्य आणि अचूक समन्वय, यांची आवश्यकता असते. हा क्रीडाप्रकार आता आपल्याकडे हळूहळू लोकप्रिय होत चालला आहे, कारण मुळातच आपल्याकडे मुलींना संगीत आणि नृत्य या दोन्हींची जन्मतःच आवड असते. हा खेळ शिकल्याने शरीराला आवश्यक असा फिटनेस तर मिळतोच शिवाय बांधा सुडौल राहतो, हालचाली लयबद्ध होतात आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या खेळात अनेक प्रकारच्या हालचालींचा अंतर्भाव असल्यामुळे मनाची एकाग्रताही वाढते. हा क्रीडाप्रकार शिकल्यावर स्पर्धात्मक पातळीवर त्यात भाग घेतलाच पाहिजे, असं नाही. पण या फायद्यांमुळे इतर खेळ शिकलेल्या मुलींपेक्षा तालबद्ध जिम्नॅस्टिक्स शिकलेल्या मुली आपल्याला नेहमीच वेगळ्या ओळखू येतात.

3_1.jpg

वयाच्या साधारण कितव्या वर्षापासून हा खेळ शिकलेला चालतो?

कुठलाही खेळ वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनसुद्धा मुलांनी शिकलेला चालतो. पण अगदी खरं सांगायचं झालं तर इतक्या लहान मुलांना खेळ शिकवण्यासाठी आवश्यक असलेलं सुरक्षित वातावरण, साधनसामुग्री, शिकवण्याच्या पद्धती/प्रकार इत्यादी आपल्याकडे अजून फारसे विकसित झालेले नाहीत. त्यामुळे क्रीडासंस्थासुद्धा अगदी लहान वयाच्या मुलांना दाखल करून घेण्यासाठी फारशा उत्सुक नसतात. आणि आपली मानसिकताच अशी झाली आहे की, मुलांनी ज्या वयात शाळेत जाण्याची तशी आवश्यकता नसते त्या वयात आपण मोठ्ठाल्या फिया भरून त्यांना नर्सरी/प्ले-ग्रूपला पाठवतो, पण खेळासाठी मात्र आवश्यक तेवढं उत्तेजन देत नाही. म्हणजे ती मुलं घरीसुद्धा मस्ती करत असतील, उड्या मारत असतील, तरी आपण त्यांना 'अरे, असं करू नकोस, तू पडशील, तुला लागेल' असं नेमकं उलटंच शिकवत असतो. हे बरोबर नाही. जितक्या लवकर मुलं खेळ शिकतील तितकी त्यांची शारीरिक वाढ चांगली होते, ती मुले सुदृढ होतात, लवचिक होतात.

शारीरिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा खेळ कसा आहे?

दुखापती हा कुठल्याही खेळाचा अविभाज्य घटक आहे. याच खेळात असं नाही, तर कुठल्याही खेळामध्ये खेळाडूंना दुखापतींना तोंड द्यावं लागतं. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्या त्या खेळासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दृष्टिकोन आपण बाळगत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर, एखाद्या मुलाला पोहणं शिकायला पाठवायचं झाल्यास त्याचे हात बळकट आहेत का, सांधे सुयोग्य आहेत का, हे न बघताच त्यानं पाण्यात उडी मारून पोहायला सुरूवातच करावी, अशी अपेक्षा आपण त्याच्याकडून करतो किंवा फूटबॉल खेळायला पाठवायचं आहे तर त्याच्या पायांत किती ताकद आहे, त्याचे स्नायू पुरेसे तयार झाले आहेत की नाही, हे न तपासताच आपण त्याला खेळ शिकायला पाठवून देतो. तिथे तो मुलगा लगेचच कौशल्य (skills) शिकायला सुरूवात करतो, असं बरेचदा बघितलं जातं. साधनं आणि सुरक्षितता (equipments and safety) हा मुद्दा नंतर उपस्थित होतो. पण कुठलाही खेळ शिकण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असते ते खेळण्यायोग्य शरीर तयार करणे (Body Preparation).
आज आपण बघतो क्रिकेट शिकणारे खेळाडू सराव संपल्यावर लगेचच वडापाव खाताना दिसतात. हा अयोग्य आहार आहे. त्यामुळे खेळाडूचं वजन नक्कीच वाढणार. खेळाडूंच्या आहाराच्या बाबतीत प्रशिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन करायलाच हवं. खेळ सुरू करायच्या आधी कर्बोदकं आणि खेळाच्या सरावानंतर प्रथिनं पोटात जाणं अत्यावश्यक असतं. आहाराच्या बाबतीतले नियम पाळले गेले नाहीत तर शरीरातले स्नायू सहकार्य करू शकणार नाहीत, थकवा जाणवू लागेल आणि अपेक्षित आविष्कार खेळाडू सादर करू शकणार नाही. प्रशिक्षकांना खेळाशी निगडित या सगळ्या विषयांबद्दल सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या मते योग्य तो वैद्यकीय आधार घेऊन खेळ खेळल्यास आणि शिकवल्यास होणारे अपघात किंवा दुखापती आणि खेळाचे दुष्परिणाम नक्कीच टाळता येतात.

स्पर्धेदरम्यान सादरीकरण आणि गुणांकनाची पद्धत कशी असते?

स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला सादरीकरणासाठी दीड मिनिटांचा वेळ दिलेला असतो. संगीताच्या तालावर हातात साधन घेऊन आपलं कलाकौशल्य तिनं सादर करणं अपेक्षित असतं. प्रत्येक खेळाडूला एकूण तीसपैकी गुण दिले जातात. गुणांकनासाठी तीन पंचमंडळे नेमलेली असतात. एक मंडळ खेळाडूचं सादरीकरण (execution) तपासत असतं. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये सादरीकरणाला खूप महत्त्व आहे. आपलं कौशल्य सादर करताना खेळाडूचे गुडघे ताठच असले पाहिजेत, पावले पेन्सिलीला टोक काढल्याप्रमाणे टोकदार असलीच पाहिजेत - या अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींमुळे हा खेळ नेत्रसुखद होतो. नाहीतर तो डोंबार्‍याचा खेळ वाटेल. दुसरं मंडळ खेळाडूचं कलाकौशल्य (artistry) म्हणजे नृत्यदिग्दर्शन, संगीताची निवड, खेळाडूचा पोषाख इत्यादी गोष्टी तपासत असतं. आणि तिसरं मंडळ त्या दीड मिनिटांच्या वेळात सादर केलेल्या हालचालींची काठिण्य पातळी (degree of difficulty) आणि खेळातील नैपुण्य तपासत असतं. प्रत्येक मंडळात चार पंच असतात. अशा एकूण बारा पंचांनी दिलेल्या गुणांची सरासरी काढून खेळाडूला गुण दिले जातात. गुणांकनासाठी पंचमंडळाला तीस सेकंदांचा वेळ दिलेला असतो.

एखाद्या क्रीडाप्रकाराशी प्रत्यक्ष खेळाडू म्हणून संबंध असणं आणि एक पंच किंवा प्रशिक्षक म्हणून संबंध असणं यांत काय फरक आहे? पंच किंवा प्रशिक्षक म्हणून काम करताना मुळात एक खेळाडू असण्याचे काय फायदे/तोटे असतात?

पंच हा खेळाडू असलाच पाहिजे असं नाही. पण प्रशिक्षक हा खेळाडू असेल तर तो अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकतो. आमच्यावेळची प्रशिक्षण पद्धत वेगळी होती. आम्ही खुल्या मैदानावर जिम्नॅस्टिक्स शिकलो. मैदानावर जिम्नॅस्टिक्स शिकणं ही संकल्पनाच चुकीची आहे. पण आमच्या प्रशिक्षकांनी एखादी गोष्ट सांगितली की ती करायचीच, त्यांचा शब्द अंतिम, हेच आमच्या डोक्यात भिनलं होतं. पण आजची पिढी स्वतंत्र विचारांची आहे. म्हणजे अगदी चार वर्षांची मुलगीसुद्धा तिच्या मतांशी ठाम असते. मुलींना सराव करायचा नसेल तर त्या एका जागी स्थिर उभ्या राहतील, पण सराव करणार नाहीत. एखादा नवीन व्यायामप्रकार शिकवताना त्यांना तो पटला, त्यांनी मनापासून स्वीकारला तरच त्या शिकण्याची तयारी दाखवतात. मी आधी एक खेळाडू आहे. त्यामुळे मी त्यांची मनःस्थिती समजून घेऊ शकते. मी शिकताना किंवा खेळताना आलेल्या अडचणी टाळून आज अधिक चांगल्या प्रकारे माझ्या मुलींना शिकवू शकते आहे.

पंच म्हणून काम करताना काय जबाबदार्‍या असतात? पंचगिरी करताना निर्णय घेण्यास कठीण असा प्रसंग आत्तापर्यंत कधी तुझ्यावर आला आहे का?

एक आठवण सांगते. २००६ साली मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा झाल्या. त्यावेळी मी तिथे पंच म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. आंतराष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून काम करण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. त्यावेळी गुणांकन करताना एक प्रकारचं दडपण मला जाणवत होतं. स्पर्धा पाहण्यासाठी जवळजवळ पंचवीस-तीस हजार प्रेक्षक प्रेक्षागृहात उपस्थित होते. आणि हजर असलेला प्रत्येक माणूस तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधला जाणकार होता. प्रत्येक खेळाडूचं सादरीकरण झाल्यावर त्याला मिळणार्‍या प्रतिसादावरून, उत्तेजनावरून ते स्पष्ट होत होतं. पंचांबरोबरच प्रेक्षकही मनातल्या मनात खेळाडूला गुण देत होते. त्यामुळे आपण कुठे कमी पडायला नको, ही भावना सतत मनात होती. भारतात असं होत नाही. अजूनही आपल्याकडे स्पर्धा पाहायला आलेले प्रेक्षक मनोरंजनाच्या दृष्टीनेच या खेळाकडे बघतात. पण परदेशात मात्र हा खेळ खूप लोकप्रिय आहे. त्यांना या खेळाचे बारकावे माहीत असतात. त्यामुळे परदेशात जाऊन या खेळाचं परीक्षकपद निभावणं, हे एक मोठं आव्हान असतं.

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्रशिक्षक म्हणून तुझी निवड झाली आहे, त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. त्या स्पर्धेची तयारी कशी चालू आहे?

एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी एकाच संघातल्या, एकाच प्रशिक्षकाच्या तीन खेळाडूंची निवड भारतीय संघात होणं आणि तोच प्रशिक्षक भारतीय संघाचाही प्रशिक्षक म्हणून निवडला जाणं हा आत्तापर्यंतचा एक विक्रमच आहे.

4_1.jpg

माझ्या तिन्ही प्रशिक्षणार्थी मुलींना राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने खूप मोठा अनुभव मिळाला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शिबिराच्या निमित्ताने त्यांना रशियाला जाऊन एक महिना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता आला. परदेशी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळालं. आज एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी भारताला मिळाली आहे, ही भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने खूपच मोठी घटना आहे. या स्पर्धेमुळे खूप सकारात्मक घडामोडी क्रीडाजगतात झाल्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने जागतिक दर्जाची उपकरणं आणि क्रीडासाधनं आज भारतात आली आहेत. स्पर्धेसाठी म्हणून ज्या काही सोयीसुविधा केल्या गेल्या आहेत, त्याचा फायदा भविष्यात भारतीय खेळाडूंनाच होणार आहे. ही एवढी मोठी स्पर्धा भारतात झाली नसती तर यातलं काहीच घडलं नसतं. स्पर्धेच्या आयोजनात त्रुटी आहेत, पण खरं सांगायचं तर त्या सगळीकडेच असतात. फक्त त्या सर्वांसमोर येत नाहीत एवढंच. या सगळ्यांतून आपण काहीतरी शिकलोय हे महत्त्वाचं. एक प्रशिक्षक म्हणून या स्पर्धेकडे मी खूपच सकारात्मक दृष्टीनं बघतेय.

या स्पर्धेची ही दुसरी चांगली बाजू आज आम्हाला कळतेय. यावरून आठवलं, पुण्याच्या बालेवाडी क्रीडासंकुलाबद्दल तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नेहमीच टीका होत असते की, ही अनावश्यक गुंतवणूक आहे. एवढे पैसे खर्च करून संकुल बांधलं, अद्ययावत क्रीडासाधनं मागवली पण आता स्पर्धा होऊन गेल्यावर त्याचा काही उपयोग नाही. याबद्दल तुझं काय मत आहे?

बालेवाडीचं क्रीडासंकुल १९९४ साली राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने बांधलं होतं. १९९४च्या स्पर्धांनंतर तिथे कुठला मोठा क्रीडाप्रकल्प झालाच नाही. बरं, त्यावेळी बालेवाडी हा भागही पुणे शहरापासून तसा लांबच होता. म्हणजे पुण्यातल्या खेळाडूंनासुद्धा तिथे सरावासाठी जाणं तितकं सोपं नव्हतं. आता पुणे शहर विकसित झालंय. त्यामुळे बालेवाडीला जाणं आवाक्यात आल्यासारखं वाटतं.

२००८ साली बालेवाडीला राष्ट्रकुल युवा स्पर्धा घेतल्या गेल्या. तेव्हा त्या संकुलाचं, सोयीसुविधांचं नूतनीकरण आणि डागडुजी केली गेली. आणि आता ते जे नूतनीकरण केलंय, जी उपकरणे आणली गेली आहेत, ती अतिशय उच्च दर्जाची आणि अद्ययावत आहेत. उदाहरणार्थ, तिथल्या वैद्यकीय केंद्रात खेळाडूंच्या स्नायूंमधली नैसर्गिक ताकदसुद्धा तपासता येऊ शकते. अशा प्रकारच्या सोयी तिथे केल्याचा फायदा असा झाला की, आत्ताच्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांची सगळ्या खेळांची सरावशिबिरं बालेवाडीतच घेतली गेली, आणि त्याचा सगळा खर्च केंद्रसरकारनंच केला. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा एकही पैसा खर्च न होता केंद्रसरकारच्या योजनेअंतर्गत संपूर्ण बालेवाडी संकुलाचा, तिथल्या उपकरणांचा, क्रीडासाधनांचा योग्यरीत्या वापर झाला आणि देखभाल केली गेली.
आज माझ्यासारख्या खाजगी प्रशिक्षकानं अशा अद्ययावत संकुलात जाऊन खेळाडूंना प्रशिक्षण द्यायचं ठरवलं किंवा सराव घ्यायचा ठरवला तर ते मला आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखं नाहीये. आणि माझ्यासारखे असे अनेक प्रशिक्षक इतरही खेळांत आहेत. मग क्रीडाप्रशासनानंच त्यादृष्टीनं काही सवलतीच्या योजना राबवल्या तर त्याचा फायदा प्रशासन आणि खेळाडू दोघांनाही होईल. ती क्रीडासाधनं, उपकरणं वापरात राहिल्यामुळे त्यांच्या देखभालीवर प्रशासनाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि अशा अद्ययावत ठिकाणी सराव केल्यामुळे खेळाडूंची कामगिरी उंचावेल.

क्रीडास्पर्धांचं आयोजन नेमकं होण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत?

क्रीडास्पर्धांच्या आयोजनसमितीवर अशी अनुभवी माणसं हवीत, ज्यांना खरोखरच खेळाबद्दल आस्था आहे, तळमळ आहे. मग तो माणूस खेळाडू असू दे नाहीतर राजकारणी... एखादा माणूस कधीतरी एकदा जागतिक स्पर्धा खेळलाय म्हणून त्याला समितीवर बसवलं, याला अर्थ नाही. आज तो खेळासाठी काय करतोय हे विचारात घ्यायला हवं. आपल्याकडे विविध क्रीडास्पर्धांच्या व्यवस्थापन समितींत कितीतरी प्रशासकीय अधिकारी असतात. प्रशासकीय कामांचा त्यांना अनुभव असेल पण क्रीडास्पर्धांच्या आयोजनाचं काय? ते काम त्यांना उत्तमरीत्या जमेलच असं नाही.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंची/पंचांची ठेवली जाणारी व्यवस्था, पुरवण्यात येणार्‍या सो‌यीसुविधा कश्या असतात? म्हणजे क्रिकेट किंवा टेनिस खेळाडूंची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलांमध्ये केली जाते पण इतर खेळांसाठी मात्र तसं नसतं असं आढळून येतं. तर ही तफावत का?

आज क्रिकेट किंवा टेनिस या खेळांमध्ये जो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवलाय ना, तो प्रत्येक खेळासाठी असायला हवा, असं माझं मत आहे. हा दृष्टिकोन त्या संघटनांनी जाणीवपूर्वक रुजवला आहे, आणि म्हणूनच केवळ ते त्यांचा असा दर्जा असा सांभाळू शकतात. अशा प्रकारचे प्रयत्न प्रत्येक खेळाच्या संघटनेने केलेच पाहिजेत.
स्पर्धेदरम्यानची व्यवस्था चांगली असते. त्याबद्दल काही तक्रार नाही. पण एक मात्र आहे की, आम्हांला खेळाडूंना स्पर्धेला घेऊन जायचं असेल तर ट्रेननं न्यावं लागतं. पंधरा-वीस खेळाडूंचा संघ स्पर्धेला विमानाने घेऊन जाणं संघटनेला परवडणारं नाही. ट्रेनचं आरक्षण नव्वद दिवस आधी सुरू होतं. स्पर्धेविषयी घोषणा होते ती पंधरा दिवस आधी. इतक्या कमी कालावधीमध्ये मला पूर्ण संघासाठी कुठल्याही ट्रेनमध्ये आरक्षण मिळणं शक्यच नाही. तात्काळमध्ये आरक्षण मिळणंही सहजसोपं नाही. आणि दहा वर्षांखालील, आठ वर्षांखालील अशा वयाच्या मुलींचे संघ अनारक्षित डब्यातून घेऊन जाणं सुरक्षित वाटत नाही. आमच्याच खेळात असं नाही तर अश्या प्रकारच्या अडचणी सगळ्यांच खेळांच्या बाबतीत येतात. म्हणजे काही वेळेला आम्हांला खेळ शिकवणं खूप सोपं वाटतं, पण या अडचणींना तोंड द्यायला आम्ही अपुरे पडतो. हे सगळं समजून घेऊन शासनाने खेळाडूंना अनुकूल अशा योजना आखाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.

खेळाविषयीची भारतीयांची मानसिकता आणि प्रगत राष्ट्रांतील लोकांचा दृष्टिकोन यांत बरीच तफावत आढळते. भारतात क्रीडाक्षेत्रात चरितार्थाच्या संधी फारच कमी आहेत, हे त्यामागचं कारण असू शकेल का?

परदेशात क्रीडाक्षेत्रात नोकरीच्या किंवा चरितार्थाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आज एखाद्या क्रीडासंस्थेत तालबद्ध जिम्नॅस्टिक्स शिकणारी मुलगी पुढे जाऊन त्याच संस्थेत खाजगी प्रशिक्षकाचं काम करू शकते किंवा स्वतःची प्रशिक्षण संस्था सुरू करू शकते. त्याकरता आवश्यक असणारे स्रोत परदेशात सहज उपलब्ध आहेत. पण भारतात अशा संधी काही ठरावीक खेळांमध्येच उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, क्रिकेट. मी मघाशी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगण्याबद्दल म्हटलं ते हेच... क्रिकेट संघटनांनी ही पावलं अतिशय विचारपूर्वक उचलली आहेत. आपल्या खेळाडूला त्याच खेळात करिअर करता यावं, यासाठी त्या संघटनांनी जे काम केलंय, त्याचा कित्ता इतर खेळांच्या संघटनांनीही गिरवायला हवा. आज मी माझ्या मुलींना सांगतेय की, राष्ट्रकुल स्पर्धांवर लक्ष एकाग्र करण्यासाठी तुमचा अभ्यास थोडा बाजूला ठेवा. त्यामुळेच पुढे जाऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून न ठेवणं, त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देणं हीसुद्धा माझीच जबाबदारी असते. आपल्या खेळाडूंना इतर संस्थांमध्ये शिकवायला पाठवणं किंवा आपल्याच संस्थेच्या शाखा इतर ठिकाणी सुरू करणं अश्याप्रकारच्या संधी त्या त्या खेळाचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या लोकांनीच शोधून काढल्या तरच त्या खेळाला चांगले दिवस येतील, असं मला वाटतं. आणि माझ्या मते तुम्ही उत्तम रिझल्टस् दिलेत की, लोकांचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो.

तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत नेमका कुठे आहे? भारतात हा खेळ अधिक लोकप्रिय करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत?

तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आता आता दिसू लागलाय. मी २००६मध्ये मेलबर्नला राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांसाठी गेले होते, तेव्हा तिथल्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं होतं. भारतातून कसा काय पंच आला? हा खेळ तिथेही आहे? हे असे प्रश्न त्यांना पडले होते. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, असं माझं मत आहे. मुळात भारतीय स्त्रिया या खूप लवचिक असतात. शरीरानं आणि स्वभावानंसुद्धा! आपल्याकडे असलेली संगीत आणि शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा, त्यातील वैविध्य यांचं परदेशीयांना अतिशय कुतूहल आहे. बॉलिवूडचं त्यांना जबरदस्त आकर्षण आहे. एक गंमत सांगते, तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये जागतिक अजिंक्यपद पटकावणारी खेळाडू, तिचं नाव कबायवा, तिनं 'मेरा जूता है जापानी'च्या संगीतावर आपलं सादरीकरण केलं होतं आणि त्या सादरीकरणासाठी तिला सुवर्णपदक मिळालं होतं. आपण भारतीय खूप कष्टाळूपण आहोत. आपला रोजचा आहार चौरस आणि पूरक आहे. भाजी, पोळी, कोशिंबीर, आमटी, भात, दही, ताक यांशिवाय खेळासाठी मुद्दाम वेगळ्या कुठल्याही आहाराची आवश्यकता नाही. म्हणजे या खेळासाठी आवश्यक असलेल्या पन्नास टक्के गोष्टी आपल्याकडे निसर्गतःच उपलब्ध आहेत. त्यामुळे या खेळाचं योग्य आणि अचूक तांत्रिक शिक्षण मिळाल्यास भारतीय मुली या खेळात जागतिक पातळीवर अतिशय उत्तम कामगिरी करून दाखवू शकतील. त्यासाठी लहान मुलींवर आत्तापासूनच योग्य ते संस्कार करायला हवेत. अचूक प्रशिक्षण देऊन त्यांना अधिकाधिक स्पर्धांचा अनुभव द्यायला हवा. खेळासाठी पोषक आणि पूरक वातावरण आपणच तयार करायला हवं. आज जर आपण या खेळासाठी आवश्यक असणारे स्रोत मर्यादित असूनही भारताला संपूर्ण संघ देऊ शकतोय तर मग 'सर्वोत्तम' स्रोतांचा वापर करून पदक का नाही मिळवून देऊ शकणार? क्रीडाप्रशासनाकडून आम्हांला मदत मिळाली तर आम्ही एक परदेशी प्रशिक्षक इथे बोलावू शकू. मदत म्हणजे आम्ही अपेक्षा करतोय की, त्यांनी निदान सरावासाठी एक कायमस्वरुपी जागा आम्हांला उपलब्ध करून द्यावी. एक किंवा दोन मुली परदेशात जाऊन प्रशिक्षण घेणार, तेवढ्याच खर्चात परदेशी प्रशिक्षक इथे येऊन वीस मुलींना शिकवू शकतो. २०१८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून चार-पाच वर्षांच्या मुलींवर आत्तापासून अशाप्रकारे आपण मेहनत घेतली तर तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये भारताला पदक मिळवणं अतिशय सोपं होईल.

5_1.jpg

एक मूलभूत पण महत्त्वाचा प्रश्न: जेट एअरवेजसारखी नोकरी सोडून प्रशिक्षण क्षेत्रात शिरणं नक्कीच सोपं गेलं नसेल... तू तुझं करिअर आणि प्रापंचिक जबाबदार्‍या यांचा समन्वय कसा साधतेस?

खरं सांगायचं तर माझ्या आवडीचं काम मला करता यावं आणि त्याचबरोबर माझ्या मुलाला जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून मी जेट एअरवेजमधली नोकरी सोडून प्रशिक्षणक्षेत्रात शिरले होते. माझी स्वतःची प्रशिक्षणसंस्था चालू केली. पण गेली तीन वर्ष या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीची शिबिरं, निवडचाचण्या, स्पर्धा यांमध्येच इतकी गुंतून गेलेय की, मुलाकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाहीये. खरंच सांगतेय, त्याचे आजीआजोबाच सध्या त्याच्याकडे बघत आहेत. जेट एअरवेजमध्ये असताना मला एकसारखं वाटत असायचं की, मी आज एवढी मेहनत करतेय त्याचा फायदा कंपनीलाच होणार आहे. म्हणजे लहानपणापासून मी जे काही शिकले, ते सोडून मी आज हे काय करतेय? आणि तुलाही अनुभव असेलच, आजकाल या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ताणतणाव प्रचंड वाढलेत. मला आज मुलींना शिकवताना जे मानसिक समाधान मिळतंय ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी सुरू केलेल्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्सच्या प्रशिक्षणसंस्थेला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, असं मला वाटलंच नव्हतं. आज शंभरापेक्षाही जास्त मुली माझ्या प्रशिक्षणसंस्थेत आहेत. पण शिकवण्यासाठी मला अनुभवी माणसं कमी पडत आहेत, आणि त्यामुळे मला प्रवेश देता येत नाहीये. जिम्नॅस्टिक्स हा असा खेळ आहे की, तो तुमच्यासाठी रोज नवनवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने मला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यांच्यावर काम करताना मला जी मजा येते त्याच्यापुढे मला नोकरीत मिळणारा पगार, त्या फ्री ट्रिप्स महत्त्वाच्या वाटत नाहीत. अर्थात, नोकरी सोडल्यावर सुरुवातीला जम बसवणं तसं कठीण गेलंच. दर महिन्याच्या महिन्याला आपल्याला पगार मिळणार नाहीये, यासाठी मनाची जबरदस्त तयारी करावी लागली. पण माझ्या आवडीचं काम मी पूर्णपणे स्वतंत्र राहून माझ्या मनाप्रमाणे आणि त्यामुळेच जास्त चांगल्या तर्‍हेनं करू शकतेय, ही भावना वरचढ ठरली.

----------

निवडलेल्या क्षेत्रातील मार्गक्रमणा यशस्वीपणे होत असतानाही स्वप्नात खुणावणारी, फारशी न मळलेली नवी वाट पकडण्याचं धाडस आज कितीजण दाखवतात? संसारात रमलेल्या, एका मुलाची आई असलेल्या वर्षानं नव्या वाटेवरची अवघड वळणंही यशस्वीरीत्या पार करून दाखवली आहेत. वर्षाच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तालबध्द जिम्नॅस्टिक्सच्या सांघिक स्पर्धेत भारतानं पाचवं स्थान प्राप्त केलं. तिच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या मुंबईच्या पूजा सुर्वे या खेळाडूनं वैयक्तिक सादरीकरणात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर मुंबईच्याच अक्षता शेट्ये या खेळाडूनं वैयक्तिक अठरा गुणांचा अडथळा पार केला. हे करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

वर्षाशी बोलत असताना तिच्यात असलेला जबरदस्त आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा आपल्यावरही जादू करतात आणि आपल्याला स्वप्न बघायला लावतात ते ऑलिंपिकचं...! होय, तालबद्ध जिम्नॅस्टिक्सच्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी पात्रता फेर्‍या सुरू आहेत. आशियाई क्रीडास्पर्धेसाठी सराव करत असतानाच या ऑलिंपिक पात्रतेच्या पहिल्या फेरीचा अडथळाही भारतीय संघानं पार केला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती दुसर्‍या फेरीच्या निकालाची.

राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणेच भारतीय संघ वर्षाच्या मार्गदर्शनाखाली तालबद्ध जिम्नॅस्टिक्सच्या पुढील सर्व स्पर्धांमध्येही नेत्रदीपक कामगिरी करेल, यात शंकाच नाही. त्यासाठी वर्षाला आणि तिच्या संघाला अनेक शुभेच्छा!

----------

मुलाखत मार्गदर्शन : चिन्मय दामले
मुलाखत साहाय्य : ललिता_प्रीति, रैना
प्रकाशचित्रांचे सर्व हक्क वर्षा उपाध्ये यांच्याकडे राखीव.

- मंजूडी