ओव्या

अरे संसार संसार

अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर ॥ १ ॥

अरे संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले
लोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥

अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येड्या गयांतला हार
म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एका तोंडामधी कडू
बाकी अवघा लागे गोड ॥ ४ ॥

अरे संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गॊडंब्याचा ठेवा ॥ ५ ॥

देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे
मधी चिकने सागरगोटे ॥ ६ ॥

ऐका संसार संसार
दोन जीवांचा विचार
देतो दु:खाले होकार
अन सुखाले नकार ॥ ७ ॥

देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखादु:खाचा बेपार ॥ ८ ॥

अरे संसार संसार
असा मोठा जादूगर
माझ्या जीवाचा मैतर
त्याच्यावरती मदार ॥ ९ ॥

अरे संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार ॥ १० ॥

गायक/गायिका: 
सुमन कल्याणपूर
संगीतकार: 
वसंत पवार
गीतकार: 
बहीणाबाई चौधरी
चित्रपट: 
मानिनी
अधिक टिपा: 
मानिनी चित्रपटात हे गाणे असले तरी ते पूर्ण नाही. बरीच कडवी वगळली आहेत. तसेच "शुद्धीकरण" केले आहे. चाल पिलू रागावर आधारीत आहे. पडद्यावर रत्नमाला आहेत. त्या भाकर्‍या करताना दाखवल्या आहेत, आणि प्रत्यक्षातही त्या सुंदर भाकर्‍या करत असत, असे दूर्गा भागवत यानी लिहून ठेवलेय.