लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख : काही विचार-तरंग

मुलगी की मुलगा? स्त्री की पुरुष? त्यानुसार अगदी गर्भावस्थेपासून बाळाविषयीचे जे समज - ठोकताळे सुरू होतात ते पार ते बाळ मोठे होते, पूर्ण आयुष्य जगून वार्धक्याने मृत्यू पावते तरी स्त्री की पुरुष यानुसार त्या व्यक्तीने कसे राहावे, कसे वागावे, कसे बोलावे, कसे आयुष्य घालवावे याविषयीची जगाची गृहीतके संपतच नाहीत!! ठरलेल्या चौकटींतच आपल्या बाब्याने किंवा बाबीने राहावे - चालावे यासाठी त्याची किंवा तिची बाल्यावस्थेपासून जडण-घडण सुरु होते.

'असे रंग मुलींनाच बरे दिसतात. तू नको घालूस या रंगाचा शर्ट! लोक हसतील तुला!'

'त्याच्या घरी त्याला उशिरा का आलास म्हणून नसतील विचारत, पण तू तर मुलगी आहेस ना, मग तुला नको तेवढी अक्कल?'

'मर्द आहेस गड्या तर मर्दासारखा वाग.... असं बाईवाणी मुळूमुळू रडू नकोस!'

'अरे मुलगा असून भातुकली - बाहुलीशी काय खेळतोस? मुलींच्यात सारखा कशाला घुटमळतोस? मोठेपणी हेच करणार का? त्यापेक्षा मर्दानी खेळ खेळत जा.'

'बाईच्या जातीला जन्माला आलीस तर बाईप्रमाणे निमूट राहा. तोंड वर करून बोलू नकोस!'

कोण करते स्त्रीपुरुषांविषयीची ही गृहीतके, हे 'नियम' तयार? ढोबळपणे 'समाज' असे उत्तर दिले तरी तो समाज आपल्यासकट कैक स्त्रीपुरुषांचा बनला आहे. ह्याच स्त्रीपुरुषांनी या गृहीतकांच्या - नियमांच्या निर्माणात वा त्यांना पुष्टी देण्यात आपल्या वागण्याबोलण्यातून, विचारांतून दिशा दिलेली असते. मग अगदी ती घरातील मंडळी असोत, परिचित, स्नेही, नातेवाईक किंवा सहकारी असोत... अथवा समाजातील अग्रगण्य असोत. आणि अशा तर्‍हेने तयार होतात स्त्रीपुरुषांबद्दलचे, त्यांच्या आचार-विचार-उच्चारांविषयीचे, व्यक्तिमत्त्वाविषयीचे चौकटीबद्ध संकेत!

ज्याप्रमाणे बाईच्या वागण्या-राहण्या-विचार करण्याविषयी, आवडी-नावडी-छंद-कार्य यांविषयी लिखित-अलिखित स्वरूपातील नियम ठरतात, तसेच ते पुरुषाबाबतही ठरतात. त्यात त्यांना कसे व्यक्त व्हायचे आहे यापेक्षा त्यांनी कशा प्रकारे व्यक्त होणे अभिप्रेत आहे, याबद्दलच्या अपेक्षा, मापदंड ठरविले जातात. अशा अपेक्षांनुसार त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडविले जाते. उदाहरणार्थ, काही समाजांत स्त्रीला उत्तम पाककला, घरकाम, बालसंगोपन, साजशृंगार, आदरातिथ्य इत्यादींचे धडे मिळतात तर पुरुषांना अंगमेहनतीची कामे, व्यापारउदीम, व्यावसायिक कौशल्ये यांमध्ये तरबेज केले जाते. स्त्रीने नाजूक, सुंदर, आतिथ्यशील, कामसू, वत्सल, आकर्षक इ. असावे तर पुरुषाने आग्रही, कठोर, निर्णयक्षम, शक्तिशाली, कर्तबगार इ. असावे, अशी गृहीतके तिथे बांधली जातात. त्यानुसार त्यांची 'प्रतवारी' केली जाते. आणि जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीला किंवा मुलाला त्यांच्या ठरविल्या गेलेल्या 'रोल्स'चा स्वीकार करावा लागतो. त्या 'रोल'बाहेरच्या किंवा चाकोरीबाहेरच्या वर्तनाला अनेकदा टीका, संशय, अपवाद, आक्षेप, आरोप सहन करावे लागतात.

शरीर व मनाच्या दृष्टीने विचार केला तर, काही स्त्रियांमध्ये तथाकथित पुरुषी गुण किंवा प्रवृत्ती ज्याप्रमाणे प्रबळ असू शकतात त्याचप्रमाणे पुरुषांमध्येही बायकी प्रवृत्ती असू शकतात. पण म्हणून पुरुषी गुणांमुळे जशी ती स्त्री 'पुरुष' ठरत नाही तसाच एखादा पुरुष तथाकथित बायकी गुणांमुळे 'स्त्री' ठरू शकत नाही. आणि त्या प्रवृत्तीबरहुकूम किंवा वेगळेपणाच्या आसेतून जर ते स्त्री-पुरुष ठरविलेल्या साच्यापेक्षा वेगळे वागले तर ते 'अनैसर्गिक' किंवा 'अस्वाभाविक' ठरविण्याचे काम समाज प्रामाणिकपणे करत असतो.

'मी स्त्री आहे म्हणजे मी कसे वागले पाहिजे? कसे बोलले पाहिजे? कसे राहिले पाहिजे?' असे प्रश्न मुलींच्या मनात येतात. इथे माणूस किंवा व्यक्ती म्हणून विचार करणे खुंटते आणि तेथील सामाजिक संकेतांनुसार, अनुकरणातून, निरीक्षणातून त्या प्रश्नांची उत्तरे स्त्रिया, मुली शोधत जातात किंवा आयती स्वीकारतात. हेच पुरुषांच्या बाबतीतही घडते. एखाद्या व्यक्तीच्या सर्वोपांगी विकासात व नातेसंबंधांत असे विचार, आचार खीळ घालू शकतात.

लिंगनिरपेक्ष ओळख म्हणजे माझ्या मते मनुष्याने स्वतःला एक व्यक्ती म्हणून मानणे. परंतु ती व्यक्ती कधी कधी आपले 'व्यक्तित्व' बाजूला ठेवून 'स्त्री' किंवा 'पुरुषा'च्या भूमिकेतून जगाकडे पाहणे, व्यवहार करणे, रूढ संकेत पाळणे हेही करत असणारच! ठरावीक काळापुरते, ठरावीक परिस्थितीत व ठरावीक व्यक्तींसोबत लिंगनिरपेक्ष होऊन वावरणे शक्य आहे असे माझा अनुभव सांगतो. परंतु जगाशी व्यवहार करताना सातत्याने ती ओळख सांभाळणे शक्य वाटत नाही.

शिवाय एक प्रश्न मनात येतो : जिथे आपली स्त्री-पुरुष अशी ओळखच विरून जाते, तिथे लिंगनिरपेक्षता येते का?
गिर्यारोहक, अंतराळवीर, शास्त्रज्ञ, कलाकार यांपासून ते अगदी सर्वसामान्य मजूर, कामगार, शेतकरी आपले काम तन-मन लावून, त्या कामाशी एकरूप होऊन करतात तेव्हाच्या काळापुरते ते लिंगनिरपेक्षच असतात की! एखाद्या कार्याला वाहून घेतलेले स्वयंसेवक जेव्हा झपाटून काम करत असतात तेव्हा कोठे असते ही स्त्री किंवा पुरुष म्हणून ओळख? त्या सांघिक भावनेत तुम्ही स्त्री/पुरुष आहात ह्यापेक्षा तुम्ही करत असलेल्या कामाला, कार्याला जास्त महत्त्व असते.

जी मैत्री 'स्त्री' किंवा 'पुरुष' असण्याच्या, स्त्री-पुरुषांमधील रूढ नात्यांच्या (बाप, बंधू, पिता, प्रियकर, पती, पुत्र - माता, भगिनी, प्रेयसी, पत्नी, पुत्री) पलीकडे, रूढ वर्तन-संकेतांच्या पलीकडे असते, पोहोचू पाहते किंवा पोहोचते, ती मैत्री लिंगनिरपेक्ष म्हणता येईल. शारीरिक आकर्षण ह्या मैत्रीत असू शकते. आणि तसे असले तरी ते त्या मैत्रीचा आवश्यक भाग नाही. फक्त शारीरिक आकर्षणावर आधारित मैत्री लिंगनिरपेक्ष म्हणता येणार नाही. मात्र मनाचे आकर्षण, गुण-कौशल्य-भावना-विचारांचे आकर्षण किंवा आधाराचे आकर्षण असेल तरच अशी मैत्री आकारास येईल व टिकेल हे माझे मत.

माणसांमधील मैत्रीचे नाते हे मुळात निर्माण होते ते आकर्षणातून किंवा सहवासातून! कधी एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, किंवा समान आवडीच्या व्यक्तीबद्दल जवळीक वाटते. कधी एखाद्या व्यक्तिमत्त्वाकडे - त्या व्यक्तीच्या रूपा-गुणांकडे- ऊर्जेकडे आपण आकर्षिले जातो म्हणून काही मैत्रीची नाती निर्माण होतात. तर कधी एकमेकांच्या सहवासात काही काळ घालवल्यावर, ओळखीचे परिचयात व परिचयाचे परस्परस्नेहात रूपांतर झाल्यामुळेही मैत्रीचे नाते निर्माण होते. कोठे त्याला समविचारांचा, समान आवडींचा रंग असतो तर कोठे अगदी आपल्या स्वभावाच्या विरुद्ध प्रकारचे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे निर्माण झालेले आकर्षण असते! कधी आधाराची देवाणघेवाण असते, तर कधी एखाद्या परिस्थितीत एकत्रितपणे घेतलेला अनुभव असतो व त्यातून जोपासलेल्या स्मृती. म्हणजे तिथेही आधाराचे किंवा स्मृतींचे आकर्षण असते. मैत्रीचा धागा विणला जाणे हे मुळात कोणत्या ना कोणत्या आकर्षणावर अवलंबून आहे हे मान्य केले तर लिंगसापेक्ष मैत्रीबरोबरच लिंगनिरपेक्ष मैत्रीलाही वेगळे आयाम प्राप्त होतात.

तसेच प्रत्येक मैत्रीत काही क्षण पूर्णपणे, सर्वस्वी 'लिंगनिरपेक्ष' असतात...जिथे तुम्ही स्त्री वा पुरुष आहात इत्यादीला कोठेच स्थान नसते. असते ते फक्त मैत्र!! परंतु ही स्थिती कायम टिकू शकते का? माझ्या मते, नाही. तसेच लिंगनिरपेक्ष मैत्रीतही काही क्षण निश्चितच असे येतात जिथे तुमचे 'स्त्री' किंवा 'पुरुष' असणे त्या मैत्रीत वरचढ ठरतात.

दोन समानलिंगी व्यक्तींमधील मैत्रीही लिंगनिरपेक्ष असू शकते. परंतु त्या मैत्रीच्या नात्यात येणार्‍या अपेक्षा, होणारी देवघेव ही लिंगाधारित नाही, असे तरी कसे म्हणणार? ज्याप्रमाणे दोन मित्रांना परस्परसंवादात फार भावनिक होण्याची, खूप खासगीतील शेअर करण्याची गरज न वाटणे त्या मैत्रीची लिंगाधारितता अधोरेखित करते, त्याचप्रमाणे दोन मैत्रिणींना एकमेकींशी संवाद साधताना भावनिक, खासगीतील विचार शेअर करण्याची गरज वाटणे, हेही त्यांच्या मैत्रीच्या लिंगाधारिततेला अधोरेखित करते, नाही का? एका अभ्यासानुसार असे आढळले की मैत्रिणी आपापसात ज्या प्रकारे आपल्या भावना, मनातील विचार, गुपिते मांडतात, सल्ले-मार्गदर्शन-मदत घेतात - देतात त्या तुलनेत मित्र एकमेकांपाशी मोकळेपणाने मनातील भावना उघड करत नाहीत, खासगी गोष्टी बोलत नाहीत. त्याच वेळी स्त्रीपुरुषांमधील मैत्रीच्या अभ्यासावरून असे दिसले की, स्त्रीपुरुषांमधील मैत्रीत स्त्रिया अनेकदा मानसिक आधार देणे, ऐकून घेणे, सहानुभूती देणे, सल्ला देणे अशी भूमिका निभावतात. परंतु बदल्यात त्यांचे मित्र त्यांच्याबाबतीत ती भूमिका पार पाडतीलच असे नाही! त्यासाठी, आपले मन मोकळे करण्यासाठी बहुतांशी स्त्रिया पुन्हा मैत्रिणीचा आधार घेतात.

मैत्रीमध्येदेखील कल्पनेतील मैत्री व वास्तवातील मैत्री यांच्यात फरक असू शकतो. जी मैत्री कल्पनेत व विचारांत लिंगनिरपेक्ष असू शकते - भासू शकते, ती व्यवहारात लिंगसापेक्ष रूप धारण करत असल्याचेही कैक दाखले आहेत. तसेच, दोन जीवलग मित्र किंवा दोन जीवलग मैत्रिणी ज्याप्रमाणे एकमेकांशी / एकमेकींशी कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकतात, वाद-विवाद-चर्चा-रुसणे-समेट करू शकतात, रस्त्यावरून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडू फिरू शकतात, एकमेकांच्या घरी जाऊन हक्काने राहणे, वैयक्तिक वापराच्या वस्तू निवांतपणे ढापणे, जोडीने प्रवास - एकमेकांसोबत एका छताखाली मुक्काम, आपल्या हृदयातील गूज एकमेकांना सांगणे इ. करू शकतात तसेच ते आपल्या भिन्नलिंगी मित्र-मैत्रिणींसोबत वागू शकतात का? तेवढ्या निकटतेने वावरू शकतात का? सज्ञ वयातील जीवलग मित्रमैत्रिणींची अशी उदाहरणे मी तरी आजूबाजूला पाहिलेली नाहीत. आणि अशी जी उदाहरणे पाहिली त्यांची नंतर परस्परांशी लग्ने झाली व पुन्हा एकदा आपल्या 'लिंगाधारित' (बाई/बुवा) भूमिकेनुसार ती मंडळी एकमेकांशी वागू लागली!! कदाचित पाश्चात्य देशात, किंवा जिथे स्त्री-पुरुषांचे आपापसातील संबंध उदारमतवादी - मुक्त आहेत तिथे वेगळे दृश्यही असेल!

'युनिसेक्स' जीवनशैली उत्पादने जशी बाजारात आली त्याप्रमाणे युनिसेक्स नीतिमूल्ये व विचारपद्धती त्या प्रमाणात प्रचलित झाली नसल्याचा हा परिणाम असेल का, हेही शोधावे लागेल. काही अशी अभारतीय मंडळी परिचयाची आहेत ज्यांत नवरा - बायको व बायकोचा प्रियकर एकाच घरात एकत्र राहतात व सर्वजण एकमेकांचे घनिष्ठ मित्र-मैत्रीण आहेत. व्यवहारात त्यांची ही मैत्री कसे स्वरूप घेते याचे कुतूहल जरी माझ्या मनात असले तरी त्यांना तसे थेट विचारण्याइतपत माझा व त्यांचा दृढ परिचय नाही. परंतु ती मैत्री इतक्या वरवर पाहून तिला लिंगनिरपेक्ष म्हणावे का याबद्दल माझ्या मनात संदेह हा आहेच!

समाजाच्या तथाकथित लिंगसापेक्ष संकेतांपासून भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही लहान मुले बर्‍याचदा मुक्तपणे वावरताना दिसतात. कदाचित एका ठराविक निरागस वयापर्यंत मुलामुलींना एकमेकांशी मोकळेपणाने वागायची 'मुभा' मिळतही असेल. परंतु ते मूल वयात येण्याची लक्षणे दिसू लागली की, सर्व संकेत बदलू लागतात. शरीराचा बाह्य आकार बदलतो, अंतर्गत बदल तर होत असतातच, हार्मोन्स जागे होतात, मुलामुलींच्या मनातील विचार - एकमेकांविषयीच्या भावनाही बदलू लागतात. स्पर्श बदलतात. समोरची व्यक्ती ही आपला जीवलग मित्र / मैत्रीण असली तरी ती एक स्त्री आहे किंवा तो एक पुरुष आहे याची नकळत जाणीव होऊ लागते. त्यानुसार रूढ सामाजिक संकेतांनुसार वागण्याचे मनावर नकळत एक दडपण, बंधन येऊ लागते. मैत्रीतील नैसर्गिक भाव कमी होतो. कोणी म्हणेल की ही कदाचित मैत्रीच्या सच्चेपणाची किंवा परिपक्वतेची कसोटी ठरेल. असेलही तसे कदाचित! पण या 'व्यावहारिक बंधनांच्या' कसोटीला उतरून, वेळप्रसंगी मान तुकवून, तडजोड करून टिकवलेल्या - बदलत्या भूमिका स्वीकारलेल्या व त्यातून दृढ झालेल्या मैत्रीला 'लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख' असे नाव देता येईल का, हाही सवाल आहेच!

ही मला दिसलेली एक छटा! दुसर्‍या छटेत दोन परिपक्व व सक्षम व्यक्ती परस्परांच्या स्वभावामुळे, सामायिक आवडीनिवडी-तळमळीमुळे, सामायिक ध्येयाने - प्रेरणेने, कार्यामुळे एकमेकांच्या सहवासात आल्यावर मैत्रीच्या धाग्यात गुंफल्या जातात. आदर्शतः ह्या नात्यात 'स्त्री' व 'पुरुष' असा भेद येत नाही. कदाचित सुरुवातीला हा भेद असेलही! परंतु त्या व्यक्तीची ओळख पक्की झाली व मैत्रीचे सूर जुळले की एकमेकांशी वागताना-बोलताना ते भेद आड येत नाहीत. त्यांत परस्परांच्या सक्षमतेची, परिपक्वतेची यथार्थ जाणीव असते, आदर असतो. ह्या वळणावरची मैत्री ही स्त्रीवादाच्या संकल्पनेशी सुसंगत वाटते. कारण तिथे स्वतःची जाणीव आहे. स्वतःच्या क्षमतेची खात्री आहे. मैत्री ही एका 'व्यक्ती'शी केली आहे, 'स्त्री' वा 'पुरुषा'शी नव्हे. एकमेकांचे अवकाश जपलेले आहे. ही जाणीव जेव्हा मैत्रीतील दोघांनाही असते तेव्हा एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थाने व कमजोर जागा माहीत होऊनही त्यामुळे मैत्रीत फरक पडत नाही. उलट एकमेकांपासून प्रेरणा घेतली जाते.

अशा मित्रमैत्रिणींना आपल्या अभिव्यक्तींत कोणत्या म्हणून बंधनांचे वा विषयांचे वावडे नसते किंवा नसावे. तरी एकमेकांच्या खासगी आयुष्यात कितपत ढवळाढवळ करायची, मैत्रीच्या कोणत्या पायरीवर आपले नाते ठेवायचे / थांबवायचे, भावनिक गुंतवणूक किती ठेवायची, सामाजिक व्यवहारांत मैत्री आणायची अथवा नाही, हे सर्व व्यक्तिसापेक्षच असते. आणि काही अंशी परिस्थितीवर किंवा काळावर अवलंबून!

अर्थात ही 'आदर्श'वादी संकल्पना आहे हेही मान्य आहेच! वास्तवात यातील सर्वच गोष्टींना टिकमार्क मिळत नाही. कधी कोठे उन्नीसबीस होत राहते. शिवाय या सर्वांचे ना कोणते नियम आहेत, ना पाऊलखुणा. अशा प्रकारच्या मैत्रीतील प्रत्येक व्यक्तीला ही वाट आपली आपणच चोखाळावी लागते. कोठे अडलेपडले, दुखलेखुपले तर परस्पर आधाराने तर कधी स्वतःचे स्वतः सावरावे लागते. आणि म्हणूनच मैत्रीचा हा मार्ग म्हटला तर थोडा बिकटच समजला पाहिजे! त्यात कोठेही 'सुरक्षित लँडिंग'ची गॅरंटी नाही. विशेषतः जेव्हा मैत्रीच्या समीकरणात इतर निकटवर्तीय व्यक्तींच्या आयुष्यावर प्रभाव पडेल असे निर्णय येतात तेव्हा परस्परांमधील मैत्री जरी कायम राहिली तरी तिच्या स्वरूपावर, आकारावर मर्यादा आल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसते. आपल्या मित्र-मैत्रिणीच्या जोडीदाराच्या, घरच्यांच्या किंवा पोटच्या मुलांच्या मनात आपल्या मैत्रीविषयी जर गैरसमज निर्माण झाले तर त्याचे होणारे सर्वदूर परिणाम लक्षात घेता अनेक स्त्री-पुरुषांनी आपली मैत्री औपचारिक स्वरूपात किंवा व्यवहारमान्य चौकटींत मर्यादित केल्याचे मी पाहिले आहे, अनुभवलेही आहे. किंवा जर करियरमध्ये, व्यवसायात त्या मैत्रीवर आक्षेप घेतला जाऊन त्याचा त्रास होत असेल तर नाईलाजाने अशा मित्र-मैत्रिणींनी आपल्या मैत्रीतील घनिष्ठता कमी केली असल्याचेही पाहिले आहे.

तिसरी छटा आहे आयुष्याच्या उत्तर-पर्वातील! आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा दोन व्यक्ती 'स्त्री' किंवा 'पुरुष' संज्ञेच्या पलीकडे जाऊन परस्परसहवासातील, मैत्रीतील निखळ आनंद घेतात तेव्हा त्यांच्यातील मैत्री ही लिंगनिरपेक्ष मैत्रीच का म्हणू नये? एकमेकांना समजून उमजतील अशी सुखदु:खे, एकटेपणा, आयुष्यातील चढउतार, छंद, आंतरिक तळमळ यांचा ठाव घेणारी, परस्परांना आधार देणारी व समृद्ध होत जाणारी मैत्री हीदेखील लिंगनिरपेक्ष मैत्रीच की! 'तू बाई आहेस म्हणून तू असेच वागले पाहिजेस', किंवा 'पुरुष म्हणून तू अशाच प्रकारे वागणे अपेक्षित आहे' यांसारख्या परस्परअपेक्षांतून व विचारांमधून जे लोक बाहेर आलेले असतात ते ह्या मैत्रीचा निखळ आनंद घेऊ शकतात.

मला पौर्वात्य तत्त्वज्ञान व आध्यात्मातील 'तुम्ही म्हणजे फक्त तुमचे शरीर नाही, तुम्ही चेतनास्वरूप आहात', हा विचार फार आवडतो व पटतो. शरीराने आणि समाजाने घातलेल्या व घालून घेतलेल्या बंधनांतून हा विचार मुक्त करतो. 'स्व'ची ओळख पटू लागली की स्त्री असणे किंवा पुरुष असणे व त्यानुसार वावरणे ही फक्त एक कालसापेक्ष 'भूमिका' उरते, आणि ती भूमिका बाजूला सरली की जे उरते ती तुमची ओळख असते. परमोच्च आनंदाचे क्षण, गाढ निद्रा, ध्यान व समाधीमध्ये तुमची स्त्री, पुरुष व व्यक्ती म्हणून असलेली ओळखही मिटते. आणि हे केवळ अनुभवसिद्ध ज्ञान आहे. तर्काच्या आधारावर त्याला जोखणे बरोबर होणार नाही. अशा प्रकारच्या 'लिंगनिरपेक्ष' अवस्थेतील अस्तित्व आपल्याला 'स्त्री' किंवा 'पुरुषाच्या' भूमिकेतून बाहेर पडण्याची दिशा दाखविते.

- अरुंधती कुलकर्णी

प्रतिसाद

अकु, अक्षरश: दे टाळी, असे म्हणावेसे वाटतेय. आपल्या दोघांच्या लेखातले बरेचसे
मुद्दे समान आहेत. (चला म्हणजे आपली मैत्री आहे, म्हणायची.)

मस्त. मस्त. अकु.

कित्येक वाक्यांना 'अगदी अगदी' झाले. :-)

मस्त लिहलंय!

मस्त मुद्दे अनेक

विचार तरंग हे शीर्षक सार्थ

लेख आवडला.

छान लेख ! आवडला !!

सगळी निरीक्षणे अगदी अगदी पटलीच.
<मैत्रीमध्येदेखील कल्पनेतील मैत्री व वास्तवातील मैत्री यांच्यात फरक असू शकतो. जी मैत्री कल्पनेत व विचारांत लिंगनिरपेक्ष असू शकते - भासू शकते, ती व्यवहारात लिंगसापेक्ष रूप धारण करत असल्याचेही कैक दाखले आहे>
इथे माझे मत जरा वेगळे आहे. स्वानुभवावर/निरीक्षणावर आधारित आहे : मैत्री ही एखाद्या पोकळीत नसते. तिला एक पार्श्वभूमी असते. त्या पार्श्वभूमीशी अनुकूल असे रूप ती मैत्री सहजच घेते. आपण समाजात वावरताना आपल्या मैत्रीचे रूप समाजाला खटकणार नाही असे होणे हे त्या मैत्रीच्या परिपक्वतेचे लक्षण मानायला हवे.

<लिंगनिरपेक्ष मैत्रीतही काही क्षण निश्चितच असे येतात जिथे तुमचे 'स्त्री' किंवा 'पुरुष' असणे त्या मैत्रीत वरचढ ठरता> असे क्षण त्या दोघांपुरते खाजगी असतील आणि तरीही स्त्री-पुरुष असणे वरचढ ठरत असेल तरच.

<स्त्रिया अनेकदा मानसिक आधार देणे, ऐकून घेणे, सहानुभूती देणे, सल्ला देणे अशी भूमिका निभावतात. परंतु बदल्यात त्यांचे मित्र त्यांच्याबाबतीत ती भूमिका पार पाडतीलच असे नाही. त्यासाठी, आपले मन मोकळे करण्यासाठी बहुतांशी स्त्रिया पुन्हा मैत्रिणीचा आधार घेतात> हे व्यक्तिसापेक्ष आहे बरं. मैत्री लिंगनिरपेक्ष असू शकते याचा साक्षात्कार मला अशाच एका प्रसंगात झाला; जेव्हा माझ्या मैत्रिणीने एका कठोर क्षणी मोकळे होण्यासाठी दुसर्‍या मैत्रिणींऐवजी माझी निवड केली. हाच अनुभव पुन्हा अन्य एका मैत्रिणीबाबत आला.
मानसशास्त्रज्ञ, स्त्री-पुरुषांचे मेंदू विशिष्ट पद्धतीने चालतात की त्यातही काही लैंगिकता आहे याचे संशोधन करत आहेत. पण ही एक साखळीच नाही का? मुळात लिंगसापेक्ष विचार/वर्तन करण्याचे संस्कार होत असतील तर धाग्याचे टोक मिळावे कसे? मी अलीकडेच एक मानसशास्त्रीय चाचणी पाहिली ज्यात प्रत्येक गोष्टीत स्त्रीचा मेंदू एका प्रकारे तर पुरुषाचा दुसर्‍या प्रकारे (जास्त)चालतो असे ठोकताळे होते. उदा: वस्तूंची बदललेली जागा स्त्री जास्त चटकन पकडू शकते.

मला जे म्हणायचेय ते शब्दांत उतरलेय का याबद्दल साशंक आहे.

वा अकु, अनेक पातळ्यांवरची मैत्री खूप छान उलगडून दाखवली आहेस. आवडला लेख.

छान लेख अरुंधती. मला वाटते सुरुवातीला उल्लेख केलेले कंडीशनिंग / संस्कार केले नाही तर स्त्री आणि पुरुषाचा मेंदू एकमेकांहून फार काही वेगळा वागणार नाही.

मस्त लिहिलेस अरुंधती :)

लेख आवडला अकु!

खूपच सुंदर लेख...

अरुंधती,

अगदी मनातलं बोललात तुम्ही. शेवटचा परिच्छेद तर खासंच! आत्म्याची शक्ती व्यक्त करण्याची स्त्री आणि पुरुष ही दोन रूपे आहेत.

वीज वेगवेगळ्या उपकरणांतून वाहू शकते. त्यापरत्वे दिव्याची वीज वेगळी आणि पंख्याची वीज वेगळी. याचा अनुभव आपण यथोचित बटणे दाबून घेऊ शकतो. मात्र विद्युतप्रवाहाचं मूळ स्वरूप दिव्यावर वा पंख्यावर अवलंबून नसतं. तद्वत आत्मा पुरुष वा स्त्री नसतो.

त्यामुळे आत्मा (=मूळ चेतना) हाच लिंगनिरपेक्षतेचा आधार आहे.
happy.gif

आ.न.,
-गा.पै.

लेख आवडला अकु.

फारच छान लेख! सगळया मुद्दयांशी एकदम सहमत. :)

लेख आवडला!

सुंदर लेख!!

निरिक्षणे, अनुभव आणि विचार मंथन अगदी सुयोग्य पद्धतीने केलंय.
बरेचसे मुद्दे पटण्यासारखे आहेत. लेख आवडला.

शेवटचा परिच्छेद मात्र इथे अप्रस्तुत वाटतो.

उत्तम लेख! सगळेच मुद्दे स्पष्ट आणि पद्धत्शीरपणे मांडले आहेत. शेवटचा परिच्छेद तर ह्या सुंदर शीरावरचा सुवर्णमुकूट वाटतो :)

खुपच पटला आणि आवडला लेख.

लेख मनाला स्पर्शून गेला.

छान

खूप छान लेख अरुंधती.

अरुन्धति मैत्रिचे प्रत्येक पैलु उलगडुन त्यावर सविस्तर महिति दिली अहेस. खुपच छान... :)