विनायक इज नाऊ ऑन फेसबुक

‘V

inayak is now on Facebook.’

फेसबुकने ठळक बातम्यांचा रतीब घातला. त्या झरझर चाळून घेताना ह्या वाक्यापाशी नजर अडखळली. तसंही इथे अनोळखी लोकांच्या हालचालींकडेच खुट्ट झालं तरी जास्त लक्ष जातं. हा कोण विनायक आणि त्याचा माझ्याशी काय संबंध? जुन्या पेपरवाल्याने दारात चुकीचा पेपर टाकल्याने यावा तसा वैताग आला मला. ई-जगातलं सगळं जितकं क्षणिक असावं तितकाच क्षणिक तो वैतागही होता. दुसर्‍या कोणाच्यातरी फोटोबद्दल त्रागा करावा म्हणून पुढे सरकणार इतक्यात पुढ्यातलं निळं पांढरं पान पुन्हा एकदा लकाकलं. त्याने आणखी एक बातमी पुढ्यात वाढली- `Vinayak updated his profile picture’. अख्खं वाक्य वाचण्याआधीच मी फोटो उघडला.

पांढरे केस, ओळखीचा चष्मा, प्रेमळ सुरकुत्या... माझे आबा! कसं शक्य आहे हे? इथे कसे? कशासाठी? एकटे आलेच कसे ते ह्या गर्दीत? कोणीतरी मदत केलीच असेल! आणि कोणाच्या परवानगीने फेसबुकने माझ्या आबांशी एकेरीवर येऊन सलगी दाखवली होती? निदान ‘श्री. विनायक’ तरी म्हणायचं होतं ना!

घरच्यांनी फेसबुकवर येणं हा कित्येक दिवस आमच्या मित्र-मैत्रिणींमधला अगदी नाजूक विषय होता. इंटरनेटवरच्या स्वतःची नव्याने लपवालपवी करायला लागेल अशी सगळ्यांना भीती होती... का कोणास ठाऊक, भलत्या व्यक्तीने आपले फोटो आणि प्रोफाइल पाहिल्याचं सुख होतं पण असली मुभा घरच्यांना देववत नव्हती. त्यामुळे आईची 'रिक्वेस्ट' आल्यावर मी श्वास घ्यावा इतक्या सहज ती 'अ‍ॅक्सेप्ट' केली हा आमच्यात चर्चेचा विषय होता. बाबांनी तर फेसबुकवर हजेरी लावल्यावर मलाच निरोप पाठवला होता, “I’m on Facebook, don’t add me.” त्यावरही आम्ही सगळ्यांनी एकत्रित आ वासला होता. आणि आता आबा पण आले!

किती दिवस साचलेल्या गोष्टी मला त्रास द्यायला लागल्या. म्हणावं तितकं बोलणं होत नाही का हल्ली माझं त्यांच्याशी फोनवर? कित्येक वर्षांत पत्र नाही पाठवलं. आजी-आबांच्या कुशीत बसून गप्पा मारायच्या असतात, त्यांना ई-मेल नसतेच ना पाठवायची! आम्ही मुलं फेसबुकवर असतो, तर आमच्याशी इथे तरी बोलता येईल म्हणून यावं लागलं का त्यांनाही? मंथन सुरूच राहिलं...

vinayak_f.jpg

माझं अमाप आश्चर्य आणि मोजून-मापून आनंद सावरत मी त्यांच्या फेसबुकच्या कुंपणाला माझी चिंधी बांधून आले. “इकडे कसे काय? मजा वाटली तुम्हाला इथे बघून, कसे आहात?” मिनिटाचाही विलंब न लावता त्यांचा ‘लाईक’ आणि उत्तर आलं होतं. अरेच्या! इतक्या लवकर आबा ‘असे’ कसे होतील; आमच्यासारखे? हायसं वाटलं. एकटे आले नाहीयेत म्हणजे... मामा गाडी मार्गी लावून देतोय! आजी असेल नक्की शेजारीच. आमचे फोटो एकत्र बघत असतील. त्यांनी आपापसात केलेली चेष्टा आणि कौतुक ऐकू येत नव्हतं. पण कुठल्याही smiley शिवाय मला त्यांच्या हावभावांची कल्पना येत होती.

त्यांचं फेसबुकवर असणं माझ्या अंगवळणी पडत नव्हतं. आजी-आबा लाड करतात, समजावतात, गप्पा मारतात, अजूनही गोष्टी सांगतात, जवळ घेतात... आणि ह्या गुणधर्मांमधे ते ‘फेसबुकवर येतात’ हा गटात न बसणारा वाक्प्रचार म्हणून वेगळा काढावा असाच होता! त्यांच्याशी आपलं आणि आपल्याशी त्यांचं वागणं किती खरं खरं असतं... ‘‘Hi dear, hws u?’’ म्हणून ई-गळ्यात पडणार्‍या आणि प्रत्यक्षात भेटल्यावर तोंड फिरवणार्‍या जमावात कशाला यायचं त्यांनी? पण शेजारी बसून समजूत घालावी तसा त्यांचा फेसबुकवरचा वावर मला शांत करत गेला. प्रत्यक्षात भेटल्यावर घरचे सगळे जसे त्यांच्याभोवती गोळा होतो तसे इथेही त्यांच्या अवतीभोवती गोळा व्हायला लागलो. मुलं आणि नातवंडं मिळून त्यांच्या फेसबुकवरही धुडगूस घालायला लागलो. एकमेकांशी बोलताना हमखास ‘‘आज पाहिलंस का आबांनी वॉलवर काय लिहिलंय?’’ किंवा ‘‘हे नक्की आजीने लिहायला सांगितलेलं असणार, छान वाटतंय!’’ असे उल्लेख बोलण्यात सर्रास यायला लागले. स्क्रीनवर उजव्या कोपर्‍यात दिसतात म्हणून नव्हे, प्रेमाने लक्षात ठेवलेल्या वाढदिवसासाठी शुभेच्छा द्यायला दुसर्‍याच्या वॉलवर लिहिण्याऐवजी ते स्वतःच्याच वॉलवर तो निरोप लिहायचे. मला फार मजा वाटायची. आपापल्या वाढदिवसासाठीच्या शुभेच्छा कलेक्ट करायला आपण त्यांच्या वॉलवर जायचं अशी मनात नोंद करून ठेवली मी. पण हेच बरोबर होतं. नमस्कार करायला आपण जायचं असतं, नमस्कार करून घ्यायला त्यांनी आपल्याकडे यायचं नसतं!

असंख्य फोटोंपैकी एका फोटोवर त्यांची पहिल्यांदा कॉमेंट आली तेव्हा मी किती उत्साहाने ती वाचायला सरसावले... दररोज फेसबुकवर जाणार्‍या मित्रमैत्रिणींनी, बहीणभावंडांनी वाटेत दिसलेल्या फोटोवर हसरे चेहरे, बदाम, अशा कौतुकाच्या पावत्या दिल्या होत्या; त्या खूप आवडत होत्या. आजीआबांनी त्याखाली “अर्निका, अगदी छान” असं कळवलं होतं. इतकंच! कॉमेंट तुटक वाटू नये म्हणून पुढे तीन टिंब नव्हती, प्रेम दाखवणारा बदाम नव्हता, डोळा मारणारा चेहरा नव्हता की ‘lots of love’ अशी ग्वाही देणारं लेबल नव्हतं. तरी त्यांच्या एका कॉमेंटने मनातल्या मनात फोटोची सुवर्णतुला पूर्ण झाली होती.

मामाच्या मदतीने त्यांनी ब्लॉग तयार केला, त्यावर लिहिल्यानंतर फेसबुकवर कळवलं, नातवंडांच्या रक्षाबंधनाचे फोटो लावले, आणि एकटयाने आईला नेटवरून भेटकार्ड पाठवलं. आजवर आजीआबांबद्दल कायम अभिमान, आदर आणि प्रेम वाटलं होतं, पण आज त्यांच्याबद्दल, म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीबद्दल कौतुकाने डोळे भरून येणं किती जादुई होतं...

“बाप रे! तेवढंच राहिलं होतं तुमच्याकडे!”, “कमाल आहे हं त्यांची!”, “एवढं सगळं नवीन आणि तेही virtual ! कसं जमतं त्यांना?” असं आजूबाजूच्या लोकांकडून कानावर येत राहायचं. नाविन्याची लहर आली की रातोरात फेसबुकवर घडणारे बदल त्यांना कसे समजत असतील? उगाच अनोळखी लोकांना त्यांची वॉल बघता येत नसेल ना? ते फोटो सगळ्यांना दिसतीलसे नाही ना ठेवले त्यांनी? असल्या विचारांनी माझीही अधेमधे चुळबूळ व्हायची. पण माझ्या मते ते तरबेज झाले होते. मला झालेला आनंद मी दरवेळी त्यांना बोलून दाखवत होते. फेसबुकवरच्या त्यांच्या लकबींची, स्वभावाची मला नव्याने सवय झाली होती. त्यांनी तिथेही ‘असण्याची’ सवय झाली होती.

काही दिवसांनी त्यांना फोन केला. हसणं, आवाज ऐकून, उत्तराची वाट न बघता घडघडा बोलून एक शांत समाधान वाटलं. आपली माणसं अजूनही त्या जुन्या जागांवरही आपल्याला भेटतात ह्याचं समाधान असेल कदाचित...
मग माझा वाढदिवस आला. मी दिवसातून चारदा त्यांच्या वॉलवर शुभेच्छांच्या शोधात गेले. रात्र होईपर्यंत मेलची, फेसबुकची वाट पाहिली. आईला किती सुंदर कार्ड पाठवलं होतं आणि माझा मात्र वाढदिवस चक्क विसरले होते. फुरंगटून मी दुसर्‍या दिवशी फोन केला.

“आबा, आजी, किती वाट पाहिली मी काल!”
“काय मग आवडलं का कार्ड? तुझं काही उत्तर नाही अर्निके!”
“कुठलं कार्ड? मला नाही मिळालं!”
“ई-मेल वर पाठवलं ना. तुझा तो डॉट नेट पत्ता आहे त्यावर.”
“काहीही काय? डॉट नेट असा पत्ताच नाहीये माझा... चुकीचा पत्ता आहे तो. असं काय करता? आणि तुम्ही पूर्वी बरोबर पत्त्यावर उत्तरं पाठवलेली आहेत! नेमकं आज कसं चुकवलंत?” माझ्या ई-अपेक्षा वाढल्या होत्या... त्यांना फार हळहळ वाटून घ्यायला लावली होती. जुजबी बोलून काहीशा रुसव्यानेच मी फोन ठेवला.

सकाळची तयारी करून कॉम्प्यूटर हातात घेतला. डॉट कॉम वर हजेरी लावली. आलेली सगळ्यात ताजी चिठ्ठी ‘विनायक’ कडून होती.
“प्रिय अर्निका,
काल तुला कार्ड मिळाले नाही. आईच्या वाढदिवसाला कार्ड पाठवायचं जमल्याने कॉन्फीडन्स वाढला होता पण तुझा पत्ता लिहिताना चूक झाली. तुला हॅप्पी बर्थडे आणि खूप आशीर्वाद.
तुझे,
आजी आबा.”
शेवटपर्यंत मजकूर वाचताच आला नव्हता...
दुपारी आईने विचारलं, “लिहिलंस का गं उत्तर त्यांना?”
मी काहीच बोलले नाही. उत्तरात काय लिहावं मला समजेनासं झालं होतं. कारण माझ्याइतका इतका वरमलेला स्माईली मला कुठेच सापडत नव्हता...

- अर्निका

प्रतिसाद

एकदम सुंदर अर्निका! मस्त लिहीले आहे.

नमस्कार करायला आपण जायचं असतं, नमस्कार करून घ्यायला त्यांनी आपल्याकडे यायचं नसतं!>>>
तरी त्यांच्या एका कॉमेंटने मनातल्या मनात फोटोची सुवर्णतुला पूर्ण झाली होती.>>> आवडले :)

शैलजा - फेसबुकवाले चित्रही छान.

अर्निका
सुरेख लिखाण.

शैलजा - छायाचित्र अगदी चपखल. :)

आपली माणसं अजूनही त्या जुन्या जागांवरही आपल्याला भेटतात ह्याचं समाधान असेल कदाचित... << :)
छान लेख.

छान लिहिलय. आवडलं.

अतिशय सुरेख लिहिले आहेस अर्निका. फार आवडले.
शैलजा, फेसबुकवाल्या चित्राची कल्पना छान आहे पण तो धूसर चेहेरा पांढर्‍या केसांचा, चष्मा लावलेला, सुरकुतलेला चेहेरा हवा होता का तिथे ?

छान लिहिलय अगदी.

छान लिहीलेस अर्निका. :-)

अप्रतिम! स्पर्शून गेलं आत कुठेतरी...
भरपूर शुभेच्छा... :)

अर्निका, मस्तच गं! खुप छान लिहीलं आहेस!
(खुप दिवसांनी तुझं वाचायला मिळाल! असं करु नकोस मुली! :) ! लिहीत रहा!)

अमोल, धन्यवाद.
अगो, मॉडर्न आजोबा ;) गंमतीचा भाग जाऊदेत, पण थोडे पांढरे केस चालले असते आणि सुरकुत्याही. :)

सुरेख लिहिलय अर्निका

मस्त मस्त :)

आवडलं !

मस्तच. :)

आवडेश.

छान!

सुरेख अर्निका! डोळ्यात पाणी आणलंस बघ..

सुरेख लिहिलयस :)

सुरेख लिहिलंय

आभार मायबोलीकर, मनापासून आभार प्रत्येकाचे :)
शैलजा, केसांचं तुम्ही म्हणता तसे थोडेसे पांढरे चालले असते पण ते चित्र धुसर केलं आहेत ते मला फार आवडलं... थीम ला धरून अगदी!

सुंदर! खूप आवडलं!

माझे सासरे, वय वर्ष ७६, नुकतंच त्यांनी आपलं एक इ-मेल अकाऊण्ट उघडलं आहे. रोज टायमर लावून तासभर इण्टरनेटवर बसतात; ४ ओळींचा मजकूर टाईप करण्यात त्यांचा अर्धा तास जातो, पण स्वत:च स्वतः धडपडत शिकत असतात. मग आम्ही त्यांना निरनिराळे एक्सरसाईझ देतो - अ‍ॅटॅचमेण्ट कशी उघडायची, ड्राफ्ट म्हणून मजकूर सेव्ह कसा करायचा, फाईल डाऊनलोड कशी करायची, राईट क्लिक / लेफ्ट क्लिक कधी आणि कसं वापरायचं इ.
त्यांची सर्वात धाकटी नात (इ. ६ वी) ही त्यांची टीचर आहे या बाबतीत.
भारतीय हवाईदलातून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना थकित पेन्शन्सची कामं करून देण्यासाठी ते नियमित मदत करतात. त्यासाठीची वेळोवेळी निघणारी पत्रकं हवाईदलाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करावी लागतात. या कामात ते आता पटाईत झालेले आहेत.

आवडलं अर्निका!

अर्निका, खूप खूप आवडलं.

मस्त लिहिलं आहेस अर्निका.