'बॉ
र्डरलेस'चं नाव प्रथम ऐकलं ते २०११मध्ये. मायबोली टीशर्ट विक्री उपक्रमातून जमा झालेली रक्कम संस्थेला दिली जाणार होती, आणि तशी घोषणा त्यावेळी टीशर्टांच्या बातमीफलकावर करण्यात आली होती. मात्र ती ओळख तेव्हा तितकीच राहिली. खरं सांगायचं तर 'अधिक कदम आणि बॉर्डरलेस' हे नावही मनामध्ये व्हायला हवं तितकं रजिस्टर झालं नाही.
त्यानंतर एकदा टीव्ही पाहताना, ह्या चॅनेलवरुन त्या चॅनेलवर उड्या मारताना नॅट जिओपाशी थबकायला झालं. चॅनेलवर निळी, हिरवी दूरस्थ हिमालयाची शिखरं आणि झुळझुळणारं पाणी पाहून जीव सुखावला होता. हिमालयाबद्दलची काही डॉक्युमेंटरी चाललेली दिसते आहे, पाहूयात म्हणून बघायला बसले, पण डॉक्युमेंटरी होती ती 'बॉर्डरलेस' ह्या संस्थेबद्दल, आणि त्यांच्या काश्मीरमधल्या कामाबद्दल. त्यावेळी डॉक्युमेंटरी पाहून खरंच थक्क व्हायला झालं. ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढत 'बॉर्डरलेस'ने काश्मीरसारख्या संवेदनाशील भागात आपलं काम निरलसपणे सुरू ठेवलं होतं आणि आहे, त्याबद्दल अधिक माहिती करुन घ्यायची इच्छा झाली होती.
मायबोलीच्या २०१२ च्या दिवाळी अंकामधे, सामाजिक बांधिलकी म्हणून एखाद्या सामाजिक प्रश्नावर काम करणार्या संस्थेची माहिती किंवा मुलाखत असावी असा विचार केला गेला तेव्हा आपोआपच एक नाव प्रामुख्यानं विचारात घेतलं गेलं - ते म्हणजे 'बॉर्डरलेस' चं.
मुलाखतीसाठी वेळ घेण्यासाठी मी श्री. अधिक कदम ह्यांच्याशी बोलले. त्यांच्या व्यग्र जीवनशैलीमधून, कामकाजामधून मायबोलीसाठी मुलाखत देण्यासाठी त्यांना वेळ असेल का अशीही शंका वाटत होती आणि मीही पहिल्यांदाच मुलाखत घेत होते, त्यामुळे असावं, मनावर मुलाखतीबद्दल एक दडपणही होतं. मात्र कदम ह्यांच्याशी बोलल्यावर आणि पुढे संस्थेशी निगडित अशा व्यक्तींशी बोलताना हे दडपण हळूहळू नाहीसंही झालं. अत्यंत अकृत्रिम सहजपणा ह्यां सर्वांच्या वागण्याबोलण्यात जाणवला होता. अधिक कदम संस्थेच्या कामानिमित्त प्रवास करत असल्याने श्री. बिपिन ताकवले ह्यांच्याशी बोलावं, असं कदम ह्यांनी सुचवलं, आणि रीतसर वेळ घेऊन मी बिपिन ताकवले ह्यांना मुलाखतीसाठी भेटले.
'बॉर्डरलेस' बद्दल जाणून घेण्यासाठी बिपिन ताकवले ह्यांच्याशी केलेली ही बातचीत.
'बॉर्डरलेस'ची कल्पना कशी सुचली?
जेव्हां अधिक स. प. महाविद्यालयात सायकॉलॉजी आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन शिकत होता, तेव्हां कॉलेजमध्ये काश्मीरमधले काही विद्यार्थीही शिकायला होते. काश्मीरमधील तेव्हाच्या परिस्थितीबाबत कॉलेजमध्ये झालेल्या एका परिसंवादामध्ये काही विद्यार्थ्यांनी तेथील परिस्थितीचा आँखोदेखा हाल मांडला. ते सर्व ऐकताना अधिक अस्वस्थ झाला आणि काश्मीरसारख्या भागात जायला हवं, तिथली परिस्थिती पाहून आपण तिथे काहीतरी करायला हवं हे त्याला प्रकर्षानं जाणवायला लागलं. ह्यातूनच पुढे तो पुण्यातल्या काही संस्थांबरोबर तसंच भारती ममानी ह्यांच्याबरोबर काश्मीरमध्ये त्यांच्या कामामध्ये सहभागी होण्यासाठी गेला आणि आणि त्याने त्यांच्याबरोबर काम सुरू केलं. तरीही, कामाचा एकूण आवाका पाहता, पुण्यात राहून काश्मीरसाठी काम करणं त्याला पटलं नाही, म्हणून थेट काश्मीरला जायचं आणि तिथे राहूनच तिथल्या लोकांसाठी काम करायचं, असं त्याने ठरवलं. त्याला ते अधिक उचित वाटलं.
पुढे काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात, जो काश्मीरमधला सीमेलगतचा आणि जिथे दहशतवादी कारवाया अत्याधिक प्रमाणात चालत असत, असा भाग आहे - भारती ममानींबरोबर काम करताना टिथवाल नावाच्या गावात एकदा अधिक आणि भारती पोहोचले. किशनगंगा नदीच्या एका काठावरचं, काश्मीरातलं, कुपवाड्यातलं, टिथवाल हे एक छोटसं गाव आहे, आणि दुसर्या काठावर, पाकव्याप्त काश्मिरातलं चिलियाना नावाचं गाव आहे. फाळणीपूर्व काळात, दोन्ही काठांवर मिळून एकाच घराण्यातली कुटुंबं तिथे रहात होती. आता फाळणीनंतर मात्र त्यांच्यामध्ये नदीच्या काठांबरोबरीनेच बॉर्डरही आहे! बॉर्डरमुळे कुटुंबांचं एकजिनसीपण नाही म्हटलं तरी आता मोडकळीला आल्यासारखं झालं होतं, आणि तरीही तिथे अधिक आणि भारती ह्यांनी दोन्ही बाजूंची कुटुंबं एकमेकांच्या आनंदाच्या आणि दु:खाच्या प्रसंगी सहभागी होताना पाहिली. ह्यातूनच खरं तर 'बॉर्डरलेस'ची कल्पना सुचली. कोणत्याही कुंपणाशिवाय एकमेकांशी संवाद साधता यावा, एकत्र येता यावं.. ही त्यामागची संकल्पना. साधारण ९८-९९मधली ही गोष्ट आहे.
थोडंसं 'बॉर्डरलेस'बद्दल सांगतो. आमची संस्था २००२मध्ये स्थापन झालेली असून रजिस्टर्ड, नॉन गव्हर्मेंटल, नॉन प्रॉफिट संस्था आहे. आमचं काम मुख्यत्वे भारताच्या सीमा भागांमधून चालतं आणि आमचं मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे, सीमाभागातल्या अनाथ मुलींना पुन्हा एकदा सावरण्यासाठी दिशा दाखवणं. मुलीच का? तेही सांगतो. अधिक जेव्हा काश्मिरात फिरला, तेव्हां त्याला जाणवलं की दहशतवादामुळे सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त होत होते आणि मुख्य म्हणजे लहान मुलांच्या डोक्यावरचं आईवडिलांचं, घरातल्या वडीलधार्यांचं छत्र, ते कोणाच्या तरी गोळीला बळी पडल्यामुळे नाहीसं होतं होतं. अशा वेळी निदान मुलांसाठी अनाथाश्रमांचा पर्याय उपलब्ध तरी होता, पण मुलींसाठी असे अनाथाश्रमही अस्तित्वात नव्हते. अशा मुलींना मग कोणीच त्राता नसे आणि कल्पनाही येणार नाही अशा भयानक परिस्थितीला त्यांना मग सामोरं जावं लागायचं! तेव्हां ह्या मुलींसाठी काहीतरी करायला हवं हे अधिकच्या मनाने घेतलं, आणि 'बॉर्डरलेस' मुख्यत्वे मुलींसाठी काम करणार, हे नक्की ठरलं.
सुरुवातीच्या काळात काम करतानाचे अनुभव कसे होते? काय कामापासून सुरूवात केली?
सुरुवातीच्या काळात सगळ्याच अडचणी होत्या खरं तर. पैशाची अडचण होतीच. आम्ही अधिकची जी काही दोस्त मंडळी होतो ती आणि स्वतः अधिकही काही फार उच्च आर्थिक स्तरामधून आलो नव्हतो, घरातून पैसे मागावेत अशीही परिस्थिती नव्हती. पुन्हा ज्या भागामध्ये जाऊन काम करणार होतो, तो भागही संवेदनाशील होता. तिथले राहणारे लोक- स्थानिक, पोलीस, लष्कर आणि अगदी दहशतवादीही आमच्याकडे संशयी नजरेने बघत होते. स्थानिकांना वाटायचं, आम्ही कोणी हिंदुत्ववादी संघटनेची माणसं आहोत का? त्यांना धर्मबदल करायला भाग पाडू का, आम्हांला एकदम भारताच्या ह्या कोपर्यात येऊन काम करावसं का वाटतं आहे?
पोलिस, लष्कर ह्यांना संशय होता की आम्ही नक्की कोण आहोत? दहशतवाद्यांपैकीच तर कोणी नाही ना? तर दहशतवाद्यांना नेमका उलटा संशय. त्यामुळे स्थानिक, पोलीस आणि लष्कर ह्यांच्या मनात आमच्याबद्दल विश्वास पैदा करणं फार गरजेचं होतं.
सर्वांत आधी पैशाची अडचण दूर करायचा प्रयत्न केला. घरून प्रत्येकाने काही पैसे उधार घेतले. काश्मीरात जाऊन तिथून काश्मीरी वस्तू आणून त्यांचं प्रदर्शन मांडून त्या वस्तूंची विक्री केली. जे काही पैसे मिळाले, त्यातून नफा वजा करता घेतलेली उधारी फेडून टाकली. थोडे पैसे जमले. लोणावळ्याच्या खुर्शिद म्हणून एक मॅडम आहेत, त्यांनी केवळ आमच्या शब्दावर विश्वास टाकून सुरूवातीच्या काळात आम्हाला तीन लाख रुपयांची लाख मोलाची मदत केली. ती मदत आमच्यासाठी तेव्हां खूपच महत्त्वाची होती.
अगदी सुरूवातीला लोकही बिचकायचे. संशयाने पाहायचे. पण संस्थेजवळ कुपवाड्यामध्ये आता एक घर होतं आणि आमच्यापाशी दोन मुली सांभाळण्यासाठी म्हणून आल्या... आणि आमच्या कामाची सुरुवात झाली.
दहशतवाद्यांकडून काही त्रास?
खरं सांगू का, अधिकची आणि आमचीही मनापासून अशी भावना आहे, की हे जे काही काम चाललं आहे ना, त्यासाठी कोण्या शक्तीने, नियतीने आमची निवड केली आहे. अधिक तर म्हणतोच, की मी काही कोणाला मदत करत नाहीये, हा माझाच प्रवास आहे, स्वतःचा स्पिरिच्युअल प्रवास. साधना आहे माझी ही. आता हेच पहा, आजवर अठरा वेळा तरी वेगवेगळ्या प्रसंगी अधिक दहशतवाद्यांना सामोरा गेलाय, भारतीलाही पकडलं होतं, पण दरवेळी त्यांना कसलीही इजा न होता, ते सहीसलामत सुटले आहेत, जे काही काम सुरू केलं होतं ते पुढे नेणं आजही शक्य होतं आहे...
अगोदर खूप त्रास व्हायचा, आता नाही होत इतका. शेवटी तीही माणसंच असतात हो.
काहीजण जाणूनबुजून त्यात उडी घेतात, काहीजण ओढले जातात.. तो फार किचकट आणि वेगळा विषय आहे, पण त्यांनाही एकदा त्या प्रवाहात ओढलं गेल्यावर दोन-तीन महिन्यांपेक्षा अधिक आयुष्य नसतं...
जो काही विरोध होता, तो मावळला आहे का? कसा?
हो, आता स्थानिकांचा तर अजिबातच विरोध नाहीये. जसंजसं आमचं काम स्थानिक
पाहत गेले, तसतशी त्यांची आमच्याबद्दल खात्री पटत गेली. कोणताही छुपा हेतू न ठेवता, आम्हाला खरोखरच तिथल्या मुलींसाठी काम करायची इच्छा आहे, हे जसंजसं त्यांच्या लक्षात यायला लागलं, तसा त्यांचा पाठिंबा मिळत गेला. ज्या मुलींच्या डोक्यावरलं छत्र नाहीसं झालेलं आहे, अशा मुलींना मग आमच्याकडे आणून पोचवायला लागले. पोलीस, लष्कराचं सहाय्यही ह्यासाठी आम्हाला मिळायला लागलं आणि आजही मिळतंय.
आता तर आमच्या कामामध्येही स्थानिकांचा सहभाग असतो, वेगवेगळ्या कमिट्यांवर ते काम करतात. आम्हीही त्यांच्याशी सल्लामसलत करतो..
कोणत्या वयोगटातल्या मुली इथे आहेत? त्यांचे शिक्षण व इतर रोजचा दिनक्रम कसा असतो?
सध्या संस्थेमध्ये १५० मुली आहेत, त्यांची काळजी घ्यायला ३० जणांचा स्थानिक कर्मचारी वर्ग आहे. कुपवाडा, अनंतनाग आणि बिरवाह येथे संस्थेने घरं भाड्याने घेतली आहेत. आम्ही ही घरं भाड्याने घेऊन कामाची सुरूवात केली होती. एक गोष्ट आवर्जून सांगतो की आम्ही अनाथाश्रम चालवत नाही. हे अनाथाश्रम नाहीयेत. ही आमच्या मुलींची, आमची घरं आहेत. बसेरा-ए-तबस्सुम आणि फा (faah) अशी आमच्या घरांची नावं जाणून बुजून ठेवली आहेत. बसेरा-ए-तबस्सुमचा अर्थ आहे, हास्याचं माहेरघर. आमच्या लेकींच्या निर्मळ हास्याचं माहेरघर. हा असा अर्थ या नावातून अभिप्रेत आहे. फा चा अर्थ आहे जोपासना - to nurture ह्या अर्थी.
इथल्या अगदी लहानग्या बाळींपासून ते सतरा - अठरा वर्षांपर्यंतच्या मुली इथे एक कुटुंब म्हणून, कुटुंबाचा भाग बनून राहतात. एकमेकींची काळजी घेतात, एकमेकींना आणि आम्हालाही भय्या, भय्या म्हणून जीव लावतात. तसंच जम्मूमध्येही एक घर आहे. फा म्हणालो ते. हे काश्मिरी पंडितांच्या मुलींसाठी. ह्या सगळ्या मुली एकमेकींकडे जातात, भेटतात. सगळ्यांचं एक भलं मोठं कुटुंब आहे आमचं. आमच्या एका मुलीचं तर आता लग्नही झालंय आणि आम्ही आजोबाही झालोय!
ह्या मुली हसतखेळत रहाव्यात हा उद्देश तर आहेच पण त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणाकडेही आम्ही लक्ष पुरवतो, वेगवेगळ्या स्थानिक शाळांमधून ह्या मुली शिकत आहेत. समजा, एखादीला पुढे खूप शिकायची इच्छा नसेल, तिचा पुस्तकी शिक्षणाकडे ओढा नसेल, तर तिला व्यवसायोपयोगी शिक्षण दिलं जातं. एका मुलीने असं कपडे शिवण्याचं प्रशिक्षण घेऊन तिच्या गावी व्यवसाय सुरू केला आहे आणि तिच्याकडे तिच्याच काय, अजूबाजूच्या गावांतल्याही बायका कपडे शिवून घ्यायला येतात, कारण, याआधी त्या भागात कोणी स्त्री हा व्यवसायच करत नव्हती. एक जण सध्या पुण्यात शिकते आहे, अतिशय हुशार अशी ही आमची लेक - तिला भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जायची इच्छा आहे आणि ती नक्कीच जाणार!
काश्मीरमधल्या ह्या मुलींचं बाल्य परिस्थितीमुळे फार लवकर संपतं, कोमेजून जातं. ते पुन्हा एकदा त्यांना अनुभवायला मिळावं हा आमचा प्रयत्न असतो. दु:खद भूतकाळ मागे टाकून पुन्हा एकदा ह्या लेकींना सक्षम बनवून स्थानिक जीवनप्रवाहात सामील होण्याची तयारी करुन घेणं, हे आमचं ध्येय आहे. ह्या आमच्या लेकीच इथलं जीवनमान सुधारायला त्यांच्या परीने हातभार लावणार आहेत.
तुम्ही कोणत्या प्रकारचे उपक्रम चालवता? आतापर्यंत काय साध्य करून झालं आहे? काय सुरू आहे? पुढे काय योजना आहेत?
जसं आधी म्हणालो, तसं मुलींसाठी काम तर करतोच आहोत. इतके दिवस आमच्या मुली भाड्याच्या घरांमध्ये राहत होत्या, आता संस्थेने स्वतःची जागा घेतली आहे. तिथे आता आमच्या संस्थेचं स्वतःचं घर आम्ही उभं करतो आहोत. आमच्या लेकींचा हक्काचा निवारा. पुढे भविष्यात संस्था स्वतःची जमीन घेऊन शेतीही करणार आहे.
ह्या मुलींना आम्ही भारतात शैक्षणिक सहलींसाठीही घेऊन जातो. पुण्यामध्येसुद्धा ह्या मुली येतात, नाशिकमध्ये आल्या होत्या, सुरुवातीला आमच्या ओळखींच्या घरांमधून आम्ही त्यांची सोय करायचो, आता मुलींच्या राहण्याची सोय करण्यासाठी इतर सेवाभावी संस्थांचीही आम्हाला मदत होते. मुलींची दृष्टी अधिक व्यापक बनावी, भारताची त्यांना ओळख व्हावी हा उद्देश अशा सहलींमागे असतो. वेगवेगळी वर्कशॉप्स् आम्ही त्यांच्यासाठी चालवतो.
मध्यंतरी २००८मध्ये फोटोग्राफीच्या वर्कशॉपमध्ये भाग घेऊन आमच्या मुलींनी नॅशनल कौन्सिल ऑफ ए़ज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ह्या संस्थेने घेतलेल्या अखिल भारतीय पातळीवरच्या फोटोग्राफीच्या स्पर्धेमध्ये पहिली चार बक्षिसं पटकावली. २००९ -१० मध्ये आमच्या चार मुलींना स्कॉलरशिप्स् मिळाल्या आहेत.
ह्याचबरोबर पूर्व भारतातही काम सुरू करायचा मानस आहे.
लोक तुमच्या कामात कोणत्या प्रकारे सहभाग घेऊ शकतात?
लोकांचा सहभाग आम्हांला हवाच आहे पण त्याबाबत आम्ही काही खबरदारीही बाळगतो. आमच्यापैकी कोणीही सवंग प्रसिद्धीच्या मागे नाही, त्याची इच्छाही नाही. उगाच काहीतरी भावनिक आवाहनं किंवा त्या प्रकारचं काही करुन आम्हांला आमचं काम पुढे न्यायचं नाहीये. आम्ही लो प्रोफाईल ठेवून पण सातत्याने आमचं काम सुरू ठेवण्याला अधिक महत्त्व देतो. ज्या संवेदनाशील भागांमधून आम्ही काम करतो, ते पाहता आम्हांला जबाबदारीने आणि निरलसपणे काम करणारे लोक हवेत. कोणाला प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करायला जमणार नसेल, तर शक्य असल्यास आर्थिक मदतही करता येऊ शकेल. आर्थिक सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे आणि आम्हांला त्याची गरजही आहे, कारण सरकारकडून आम्ही काहीही मदत घेत नाही.
परंतु पैशापेक्षाही अधिक मह्त्त्वाचे आहेत ते मनापासून दिलेले आशीर्वाद! कारण जेव्हा समोरून अचानक बंदुकीची गोळी येत असते, तेव्हा हे आशीर्वादच आमच्या कामी येतात, अशी अधिकची दृढ श्रद्धा आहे!
आमच्या वेबसाईटवरही तुम्ही आमच्या कामांमध्ये कशा प्रकारे सहभागी होऊ शकाल ह्याची माहिती उपलब्ध आहे.
****
साधारण तास, दीड तास आम्ही 'बॉर्डरलेस'बद्दल बोलत होतो. 'बॉर्डरलेस'चं काम, त्याचा आवाका आता कुठे माझ्या लक्षात येत होता. देशातल्या एका संवेदनाशील भागाला आपली कर्मभूमी मानून सातत्याने आणि कोणत्याही पुरस्काराची, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, तिथे काम करणारे हे काही तुमच्या आमच्यातलेच सर्वसामान्य लोक. पण आता ह्यांना सामान्य तरी कसं म्हणावं?
काश्मिरातल्या धगधगत्या परिस्थितीच्या बळी ठरलेल्या लेकी. एकेकाळी त्यांच्यासाठी कोणाला वेळ नव्हता, त्यांचं साधं अस्तित्वही कोणाच्या खिजगणतीत नव्हतं. आता मात्र त्यांचा अधिकभैय्या त्यांच्या खुशहालीची स्वप्नं बघतोय आणि त्याच्याचसारखी आणखी काही मंडळी ही स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याची साथ देत आहेत...
'बॉर्डरलेस' ला मनापासून शुभेच्छा.
प्रतिसाद
मस्त मुलाखत. इतक्या प्रतिकूल
मस्त मुलाखत.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या 'बॉर्डरलेस' ला मनापासून शुभेच्छा.
धन्यवाद शैलजा.
मोलाचे कार्य. धन्यवाद शैलजा.
मोलाचे कार्य.
धन्यवाद शैलजा.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या 'बॉर्डरलेस' ला मनापासून शुभेच्छा. >> +१
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या 'बॉर्डरलेस' ला मनापासून शुभेच्छा>> +१.
मोलाचे कार्य. धन्यवाद
मोलाचे कार्य.
धन्यवाद शैलजा>>+१ :)
'बॉर्डरलेस' ला मनापासून शुभेच्छा>> +१ :)
असं काही वाचल्यावर प्रत्येक वेळी प्रकर्षाने जाणवतं ते एकच "प्रश्न प्रत्येक कामात असतात, लक्ष उत्तरावर/ उद्दिष्टांवर ठेवलं तर वाटचाल अवघड असली तरी अशक्य रहात नाही" हॅटस ऑफ त्यांच्या प्रयत्नांना
छान मुलाखत
छान मुलाखत
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या 'बॉर्डरलेस' ला मनापासून शुभेच्छा. >> +१
अगदी वेगळच काम करणारी
अगदी वेगळच काम करणारी संस्था...इतक्या प्रतिकुल परिस्थितीत..त्यांना मनापासून शुभेच्छा!
त्याम्च्या वेबसाईट चा पत्ता इथे देता येईल का?
बॉर्डरलेसला मनापासुन शुभेच्छा
बॉर्डरलेसला मनापासुन शुभेच्छा !!!!!!!
छान मुलाखत. पण अचानक
छान मुलाखत. पण अचानक संपल्यासारखी वाटली!
बॉर्डरलेसला शुभेच्छा !
फारच उमदा उपक्रम आहे!
फारच उमदा उपक्रम आहे! बॉर्डरलेसला शुभेच्छा!!
>>असं काही वाचल्यावर प्रत्येक
>>असं काही वाचल्यावर प्रत्येक वेळी प्रकर्षाने जाणवतं ते एकच "प्रश्न प्रत्येक कामात असतात, लक्ष उत्तरावर/ उद्दिष्टांवर ठेवलं तर वाटचाल अवघड असली तरी अशक्य रहात नाही" हॅटस ऑफ त्यांच्या प्रयत्नांना
well said..
या मुलाखतीमार्फत "बॉर्डरलेस" ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
>>असं काही वाचल्यावर प्रत्येक
>>असं काही वाचल्यावर प्रत्येक वेळी प्रकर्षाने जाणवतं ते एकच "प्रश्न प्रत्येक कामात असतात, लक्ष उत्तरावर/ उद्दिष्टांवर ठेवलं तर वाटचाल अवघड असली तरी अशक्य रहात नाही" हॅटस ऑफ त्यांच्या प्रयत्नांना
well said..
या मुलाखतीमार्फत "बॉर्डरलेस" ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
खडतर प्रवास आणि महान ध्येय!
खडतर प्रवास आणि महान ध्येय! 'बॉर्डरलेस'ला सलाम!
धन्यवाद शैलजाताई.
सर्व प्रतिसादकांचे आणि
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार.
बॉर्डरलेसची लिंक - http://bwfindia.org.in/aboutus.php