बहुरुपी - दिलीप प्रभावळकर

दि

लीप प्रभावळकर! खरंतर 'बस, नाम ही काफी है!' दूरदर्शन मालिका, लेखन, चित्रपट, नाटकं अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटणारे आणि प्रत्येकच प्रकल्पातून सतत नाविन्याचा शोध घेणारे बहुरुपीया! जपानी कार्यसंस्कृतीमध्ये कायझेन नामक एक पद्धती अवलंबिली जाते. आता आहे, त्याहून अधिक परिपूर्ण, सर्वोत्तमाच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी. दिलीप प्रभावळकरांचं अवघं व्यक्तिमत्त्वच ह्या कायझेन पद्धतीसारखं. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात, मग तो अभिनय असो, वाचन असो, लेखन असो, सामाजिक बांधिलकीची जाणीव असो - कायम प्रगल्भतेकडे वाटचालीचा प्रयत्न. कुठल्याही प्रतिमेत न अडकलेला, कुठल्याही खास आवाजाची किंवा व्यक्तिमत्त्वाची देणगी नसलेला हा माणूस कॅमेरा सुरु होताच काय अजब वल्ली बनतो ते नवलच असतं! त्यांना वाचून-पाहून-ऐकूनही हे गूढ तसंच कायम आहे. दिलीप प्रभावळकर या खेळियाशी मारलेल्या गप्पा... खास मायबोलीसाठी.

_dsc6085.jpg

सर्वसाधारणपणे नट आपल्या प्रतिमेची चौकट मोडायला तयार नसतात. तुमच्या बाबतीत मात्र असं म्हणता येत नाही. तुम्ही कुठंही साचेबध्द झाला नाहीत, सातत्याने नवे प्रयोग करीत राहिला आहात. हे कसं जमवलंत?

मी ते मुद्दामून ठरवून केलं कारण मला एका प्रतिमेमध्ये अडकायचं नव्हतं. इमेजमध्ये अडकण्याचा धोका माझ्याबाबतीत अनेक वेळा समोर आला. उदाहरणार्थ स्री पात्र रंगवल्यानंतर, म्हातारा रंगवल्यानंतर इतकंच काय, गांधी रंगवल्यानंतरही मला तशाच भूमिकांच्या ऑफर्स यायला लागल्या. पण शक्यतो मी एकाच इमेजमध्ये न अडकण्याचा माझ्यापरीने प्रयत्न केला. मला वाटतं कलावंताच्या दृष्टीनं भूमिकेची निवड हा मोठा भाग असतो आणि त्या बाबतीत मी पहिल्यापासून चोखंदळ आहे. भूमिका स्वीकारताना माझे स्वतःचे असे निकष असतात, आणि त्या निकषांवर ती भूमिका उतरावी लागते. चिमणरावची माझी इमेज मोडण्याचं काम माझ्याच तीन नाटकांनी केलं. वासूची सासू, एक झुंज वार्‍याशी आणि नातीगोती यामुळे माझी विनोदी नटाची प्रतिमा तुटली आणि मी इतरही प्रकारच्या भूमिका करू शकतो हा आत्मविश्वास मला या नाटकांनी दिला.

दिलीप प्रभावळकर म्हटलं की एखादी भूमिका नव्हे तर बर्‍याच भूमिका येतात डोळ्यासमोर, आणि त्याही त्या वैशिष्ट्यांसह. तुम्ही सातत्याने तुमचा गेटअप भूमिकेनुसार बदलत राहता. म्हणजे कुठलीही भूमिका असली तरी एकाच प्रकारे गेटअप असं नाही. यामागे काय विचार असतो?

स्पेशल गेटअप आहे म्हणून मी कधी ती भूमिका स्वीकारली नाही. जेव्हा भूमिकेची गरज असेल तेव्हाच मी तसं केलं. केवळ एक क्लृप्ती म्हणून कधी केलं नाही. प्रत्येक भूमिकेत मला काहीतरी वेगळेपण सापडलं. एखाद्या भूमिकेच्या तुम्ही जितके अधिक खोलात जाल तितकं त्या भूमिकेमध्ये करण्यासारखं बरंच काही सापडतं. त्यामुळे भूमिकेचं भरपूर वैविध्य मला मिळालं.
दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे मला शोभेल की नाही, बरं दिसेल की नाही, असा विचार मी कधीही केला नाही. भूमिकेची गरज म्हणून मी गोटा करण्यापासून ते कवळी किंवा १२ नंबरचा चष्मा लावण्यापर्यंत सगळं केलेलं आहे. त्याचबरोबरीनं स्पेशल गेटअपविरहित भूमिकादेखील मी खूप केल्या. उदा. नातीगोतीमधील बाप, सरकारनामामधला सांस्कृतिक मंत्री, देऊळ, रात्र आरंभ मधल्या भूमिका. पण मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की गेटअप आणि मेकअप हा भूमिकेला मदत म्हणून असावा, त्याच्या वरचढ ठरू नये.
स्पेशल गेटअप-मेकअपचा एखादी भूमिका करताना, नेहेमीच त्रास झाला असं काही नाही. पण आत्तापर्यंतच्या माझ्या वाटचालीमधली भूमिका की ज्याच्या गेटअप आणि मेकअपला सर्वात जास्त वेळ लागला ती म्हणजे गांधींची. कारण त्या मेकअपला दोन तास लागायचे आणि ते सगळं बर्‍यापैकी वैतागवाणं होतं. कान,नाक कृत्रिम होतं, लॅटेक्स रबर सोल्यूशन लावून सुरकुत्या काढल्या होत्या आणि त्याची खाजही सुटायची. हे सगळं सहन करून करूणामय चेहरा करून वावरणं हे आव्हानात्मक होतं. त्याच भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्याउलट टिपरे करणं सगळ्यात सोपं होतं. कारण फक्त विग आणि चष्मा एवढंच होतं. त्यामुळे बोलता बोलता मी अचानक टिपरेंच्या बेरिंगमध्ये जात असे याचं सहअभिनेत्यांना फार आश्चर्य आणि गंमत वाटायची. तरीही मी जसा आहे तसाच दिसणार्‍या भूमिकाही भरपूर केलेल्या आहेत.

टिपरेंचा उल्लेख झाला तर गंगाधर टिपरे मालिकेनंतर तुम्ही मालिकांमध्ये काम केलेलं नाही, असं का?

प्रायोजित मालिका हा प्रकार मला फारसा आवडत नाही, म्हणून मी त्यात काम करत नाही. कारण मला असं वाटतं की माझ्यासाठी तिथे सर्जनशीलतेला प्राधान्य असेलच असं नाही. तिथे माल पुरवणारा कारखाना सुरु होण्याची शक्यता अधिक असते. गंगाधर टिपरे ही मालिका मी लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच बंद केली कारण लोकांच्या मनात मला त्याची चांगली प्रतिमा ठेवायची होती.

dilip_prabhavalkar.jpg

टिपरेंच्या भूमिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'अनुदिनी' ही तुमची निर्मिती. पण बाकीच्या वेळी एखादी भूमिका दुसर्‍याच्या दिग्दर्शनाखाली करताना तुम्हाला कधी असं वाटलं का की मी ही भूमिका अशा प्रकारे लिहिली असती किंवा असे बदल सुचवले असते..

टिपरेंच्या मालिकेत ती भूमिका मीच लिहिल्यामुळे आबांच्या चेहर्‍यातल्या, स्वभावातल्या छटा मला माहित झाल्या होत्या. पण इतरवेळी तसं होत नाही, कारण मी माझ्या मर्जीने दिग्दर्शन कधी केलं नाही. मला विचारलं गेलं नाही असं नाही. पण मी केलं नाह, कारण मी बर्‍यापैकी दिग्दर्शकशरण अभिनेता आहे. लोकांकडून कामं करवून घेण्याचा माझा स्वभाव नाही. तसंच मी नट म्हणून आत्मकेंद्रित आहे. आपण बरं, आपलं काम बरं असं. दिग्दर्शक हा बॉस आहे हे मनात ठेवून मी काम करतो आणि त्यातून मला काही सुचलंच तर मी दिग्दर्शकाला सुचवतो. हो! मात्र मला माझी भूमिका पटावी लागते नाहीतर मी प्रश्न विचारून आधी समाधान करून घेतो. पण शेवटचा शब्द दिग्दर्शकाचा असावा असं मला नेहमी वाटतं कारण हे त्याचं माध्यम आहे. इतकंच काय, नाटक सिनेमा बघताना मी देखील सामान्य प्रेक्षकाच्या मनोभूमिकेतून त्याकडे पाहतो. मी नट आहे हे मी विसरलेलो असतो. लहान मूल जितक्या अपूर्वाईने बघतं, तशाच तन्मयतेनं मीही बघत असतो.

तुम्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे अगदी जब्बार पटेलांसारखा दिग्दर्शक ते सुजय डहाकेसारखा तरुण दिग्दर्शक. तर आजच्या बदलत्या मराठी सिनेमांबद्दल तुमचं मत काय?

मराठी सिनेमा नक्कीच बदलतोय आणि आता दिग्दर्शकाला बॉक्स ऑफिसची जास्त तमा न बाळगता विषय निवडण्याचं स्वातंत्र्य मिळायला लागलं आहे. मला स्वतःला नेहमी असं वाटंत आलंय की सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्यामुळे दिग्दर्शक जर उत्तम असेल तर तो न-अभिनेत्याला घेऊनदेखील उत्तम सिनेमा देऊ शकतो. अलिकडच्या दिग्दर्शकांना सिनेमा या माध्यमाची जाण अधिक आहे, त्यामुळे आजकालचा सिनेमा हा फक्त बोलपट नसतो तर तो चित्रपट असतो. सिनेमाची चित्रभाषा आत्मसात केलेले दिग्दर्शक आता खूप येऊ लागलेत.

चित्रपट बदलतो आहे, असं असलं तरी भारतीय सिनेमा अजून ऑस्करपर्यंत पोचू शकलेला नाही यामागे नक्की काय कारण असू शकेल असं वाटतं? म्हणजे ऑस्करसाठी आपला सिनेमा कमी पडतो की ऑस्करचा मापदंड चुकीचा आहे?

चुकीचा असेल असं मला वाटत नाही पण आपली गणितं वेगळी आहेत. मनोरंजन हा आपल्या इंडस्ट्रीचा पाया आहे. सिनेमाच्या लांबीपासून ते डान्स ड्रामापर्यंत आपली गणितं वेगळी आहेत, ते कदाचित ऑस्करला रूचत नसावं.

एखादी भूमिका साकारताना आयुष्यात केलेल्या वाचनाचा प्रभाव भूमिका करताना त्यावर जाणवतो का?

फक्त वाचनाचाच असं नाही, पण जर तुम्हाला भूमिकेची तयारी करायला पुरेसा वेळ मिळाला तर बर्‍याच गोष्टींचा परिणाम जाणवतो. पण माझ्याबाबतीत भूमिकेची तयारी करायला मला फारसा वेळ कधीच मिळालेला नाही. चौकट राजासारख्या भूमिकेच्या बाबतीत असं झालं होतं. आधी ती भूमिका परेश रावल करणार होते पण ऐन वेळेला माझ्याकडे आली.
माझी सगळ्यात आव्हानात्मक भूमिका होती ती गांधींची. कारण गांधी जसे होते तसेच या भूमिकेत दाखवणं गरजेंचं होतं. त्याची मात्र मी खूप तयारी केली. अमेरिकन पत्रकार लुई फिशरचं एक पुस्तक मी वाचलं. विधु विनोद चोप्रा आणि राजु हिरानीने मला तयारीसाठी पुस्तकं, गांधींच्या भाषणाच्या ऑडिओ सीडीज, फिल्म्स दिल्या. तर सांगायचा मुद्दा असा की अशा तर्‍हेची तयारी एका बाजूला आणि चौकट राजाची बिनतयारीची भूमिका एका बाजूला असं माझ्याबाबतीत झालं. पण सबकॉन्शस लेव्हलला मात्र मला कुठेतरी आधीच्या सर्जनशीलतेचा उपयोग झाला.
कधीही भूमिकेची सगळी तयारी पूर्ण झाली असं मला कधीच वाटलं नाही. नाटकात काम करताना भूमिकेच्या वेगवेगळ्या छटा दरवेळी सापडत जातात. प्रेक्षक हा मोठा घटक असतो त्यासाठी. मला ती व्यक्तिरेखा पहिल्या प्रयोगाला सापडतेच असं नाही, त्यामुळे प्रयोगशाळा सुरुच राहते.

कलाकार म्हणून वावरताना आजकाल एकूणात सांस्कृतिक दडपशाही वाढतेय असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे 'देऊळ' संदर्भातही वाद उद्भवला होता...

हो. खरं आहे. लोकांचा इनटॉलरन्स वाढत चाललाय. कोणीही कधीही दुखावला जातो. त्यामुळे कधी वाटतं की हे असं असेल तर काही करायलाच नको.

तुम्ही 'एका खेळियाने' या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की स्वतः केलेल्या कुठल्याही इंटेन्स भूमिकेचा तुम्हाला त्रास होत नाही. हे तुम्हाला कसं साधतं किंवा जमतं?

तो सर्वस्वी तंत्राचा भाग आहे, जो सांभाळावा लागतो. कारण तुम्हीच ते कॅरॅक्टर आहात हे लोकांना भासवत ठेवून तुम्हाला त्यापासून स्वतःला वेगळं ठेवावं लागतं. कधी कधी तुम्हाला एखादी भूमिका स्पर्शून जाते, नाही असं नाही. वेगेवेगळ्या व्यक्तीरेखा साकारताना आपल्याही स्वभाववैशिष्ट्यांचा, जाणिवांचा प्रभाव त्यावर पडतोच. पण आदर्श भूमिका तीच जी तंत्रानी केली जाते. तुम्ही तुमच्या स्वतःपेक्षा वेगळी भूमिका जेव्हा करता, तेव्हा तीन व्यक्तिमत्त्व तुमच्या आजुबाजूला वावरत असतात. एक म्हणजे तुम्ही जे आहात ते, दुसरं म्हणजे तुम्ही साकारत असलेलं व्यक्तिमत्त्व आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःला समोरून बघत असता ते. त्यामुळे तुम्हाला ते सजगतेनेच करावं लागतं.

बोक्या सातबंडे ही तुमची गाजलेली निर्मिती. या बोक्याबद्दल थोडं सांगा ना..

आकाशवाणी माध्यमासाठी बोक्या सातबंडे लिहिला गेलं. ज्या भागात टी.व्ही पोचलेला नाही तिथे तर तो ऐकला गेलाच, पण जिथे टी.व्ही. आहे तिथेही तो ऐकला गेला. आकाशवाणीवर 'बालदरबार' म्हणून मुलांच्या कार्यक्रमाचे माधव कुलकर्णी म्हणून निर्माते होते, त्यांच्या सांगण्यावरून मी बोक्या सातबंडे लिहायला सुरूवात केली. त्या कार्यक्रमाची लोकप्रियता बघून राजहंस प्रकाशनच्या दिलीप माजगांवकरांनी मला सांगितलं की श्रुतिकांची पुस्तकं काही कुणी विकत घेऊन वाचत नाही तर तुम्ही याच्या कथा करा. त्याप्रमाणे मी त्यातले संवाद काढून टाकून कथा केल्या. पहिल्या तीन भागातून १५ कथा बाजारात आल्या, तेव्हा वाटलं नव्हतं या पुस्तकाला इतकं यश मिळेल. पण आता बोक्या सातबंडेच्या १६ आवृत्त्या निघाल्या. मग त्याच्यावर विनय आपटेंनी तेरा भागांची मालिका निर्माण केली. त्याच्यावर सिनेमाही निघाला आणि नंतर त्याचे परत पुढचे मिळून असे एकूण दहा भाग आले. इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांचे पालक त्यांना या गोष्टी वाचून दाखवतात. म्हणजे श्रुतिकेपासून सुरू झालेला बोक्याचा प्रवास सगळी माध्यमं फिरून आला.
१० वर्षाच्या मुलाच्या भावविश्वात काल्पनिकपणे फिरून कथा लिहिताना मला खूप मजा आली आणि यातली प्रत्येक कथा काहीतरी सांगून जाते असं मला वाटतं. बोक्या सातबंडेसाठी लहान मुलांच्या विभागातील लिखाणासाठी साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला.

तुमच्या इतर लिखाणाबद्दल काही ...

नर्मविनोदी लेखन करायला मला आवडतं. पण माझी आत्तापर्यंत 'सदरलेखन' या प्रकारात मोडणारी पुस्तकं जास्त प्रसिद्ध झाली आहेत. मी 'अनुदिनी' हे स्तंभलेखन केलं आणि त्याचंही पुस्तक आणि मालिका झाली. सदर लिहिताना मला माहित नव्हतं की याच्यावर मालिका होणार आहे आणि आबांची भूमिका मी करणार आहे. पण त्या लेखनाची शैली चित्रदर्शी होती. कदाचित मी मुळात नट असल्यामुळे हे शक्य झाले असेल. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुढे मी महानगरमध्ये लिहिलेल्या ‘कागदी बाण’ या सदरलेखनाचंही पुस्तक झालं आणि त्याला साहित्यपरिषदेचा चिं.वि.जोशी पुरस्कार मिळाला. म्हणजे ज्या चिं.वि.जोशींचा चिमणराव मी टेलिव्हिजनसाठी केला, त्यांच्या नावचा पुरस्कार मला लेखनासाठी मिळाला. थोडक्यात म्हणजे निमित्तानिमित्ताने माझं लेखन झालं आणि २५ पुस्तकं आत्तापर्यंत होऊन गेली. त्यापैकी ५ किंवा ६ पुस्तकांना साहित्य पुरस्कार मिळाले. मी एकांकिका बर्‍याच लिहिल्या पण नाटक लिहिणं मला जमलं नाही.

तुम्ही नाटक, चित्रपट, मालिका, जाहिराती, लेखन अशा सर्व माध्यमात कामं केली आहेत. तुमचं आवडतं माध्यम कुठलं?

सगळ्या माध्यमांची स्वतःची अशी काही बलस्थानं आहेत तशाच मर्यादाही. तशाच मलाही मर्यादा आहेतच. याच्यापेक्षा ते चांगलं किंवा वाईट असा भेदभाव मला करता येत नाही. खरं सांगायचं तर मीही त्यांच्यामुळे अधिकाधिक शिकत समृद्ध होतो आहे.
अशी ही मैफल अजून सुरुच आहे!

- अनीशा, नेत्रा जोशी-अग्निहोत्री, nda

सौजन्य - सर्व फोटो - www.dilipprabhavalkar.com
कोलाज - बित्तुबंगा
वासूची सासूमधील फोटो- आंतरजालावरून साभार.

प्रतिसाद

मस्त मुलाखत. पण खूपच छोटी वाटली.

छान मुलाखत!

मस्त मुलाखत :)

छान!

डॉ. प्रभावळकरांबद्दल काय बोलायचे...? ग्रेट!
मुलाखत मात्र "अपेक्षित २१" प्रमाणे वाटली.. अपेक्षित प्रश्ण, अपेक्षित ऊत्तरे.. अशा थोर कलावंताची मुलाखत घ्यायची संधी मिळाल्यावर तेही खास दिवाळी अंकासाठी तर अधिक अभ्यास आवश्यक ठरतो. त्यामूळे माझ्यापुरते काहीच नविन या मुलाखतीत सापडेल नाही...

:-)

योगला अनुमोदन. दिलीप प्रभावळकरांची मुलाखत म्हणजे खूपच अपेक्षा उंचावल्या होत्या.. पण काहिच विशेष हाती लागलं नाही... !

छान. माझे आवडते कलाकार.

छान मुलाखत. एक बहुरुपि गुनि कलाकार....