अज्ञातवास

दा उर्फ सदानंद देव उर्फ सँडी डेव उर्फ डॉक्टर मयंक पटेलचे विमान आता मुंबई शहरावर घिरट्या घालू लागले होते. पायलटने विमान उतरण्याची सूचना दिली आणि विमानाची चाके बाहेर उलगडण्याचा आवाज आला. रात्रीचे दहा वाजत आले होते. सदाने खिडकीतून खाली नजर टाकली. मुंबई शहराचे दिवे दिसू लागले होते. पिवळ्या रंगामध्ये लाल रंगाचे दिवे आणि निऑनच्या जाहिराती दिमाखाने लखलखत होत्या. मुंबई शहर झळाळून निघाले होते. मधून मधून रांगेने मुंग्या चालाव्यात तसे मोटारींचे दिवे सरकताना दिसत होते. मध्येच आतिषबाजी होत होती, फटाक्यांचा प्रकाश अचानक नजरेस पडत होता. आकाशातून इतक्या दूरवर सुद्धा त्याला दिवाळीच्या परिचित वातावरणाची प्रकर्षाने जाणीव झाली. जवळजवळ चौदा वर्षांनंतर सदा परत येत होता आणि आता त्याचे न्यूयॉर्कवरून सुटलेले विमान मुंबईत उतरण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. सदाला त्याच्या हृदयाची स्पंदने वाढल्याची जाणीव झाली. त्याला फटाक्यांच्या, उटण्याच्या आणि दिवाळीतील फराळाच्या अशा सर्व संमिश्र गंधांची अनुभूती झाली आणि त्याचे मन त्याच्या इच्छेविरुद्ध भूतकाळात गेले.

आई आणि बाबा सदा लहान असतानाच गेले आणि त्यांची अगदी पुसटशी सुद्धा आठवण त्याला कधी झाली नव्हती. त्याच्या साठी वहिनी आणि दादा हेच त्याचे आईवडील होते. दादा आणि वहिनीला मूल झाले नाही का त्यांनी आपल्याला मूल होणे टाळले, हे तो खात्रीने सांगू शकत नव्हता. त्याला वाहिनीला माई म्हणायला कोणी शिकवले कोण जाणे परंतु कोणी त्याला तुझी आई कोठे आहे असा प्रश्न विचारल्यावर तो माईकडे बोट दाखवत असे. आई या उद्गाराशी फक्त माईची प्रतिमा जोडली गेली होती आणि जर कधी प्रत्यक्ष आई जरी समोर उभी राहिली असती तरी पळत जाऊन त्याने माईच्या पदराआड आडोसा घेतला असता. प्रत्येक वेळेला माईच्या फक्त आठवणीने त्याचा कंठ दाटून येत असे आणि काही काळ मनातल्या नाजूक भावना लपवून त्याच्या नेहमीच्या खणखणीत आवाजात बोलणे त्याला जड जाई.

माईच्या पदराला नेहमी एक आगळा वास असे. त्यात स्वयंपाकातील फोडणी पासून शाळेत जाताना त्याच्या चेहेर्‍याला लावून पदराने टिपलेल्या सुगंधी पावडरीपर्यंत अनेक छटा त्या वासात दडलेल्या असत. त्या वासात एक सुरक्षिततेचे कवच होते. बाहेर कधी मस्ती करून आल्यावर, कोणाची तक्रार असेल तर किंवा अगदी दादा जरी त्याच्यावर रागावला तरी, माईच्या पदराच्या वासाचे कवच त्याला संकटातून वाचवत असे. माई गोरी होती आणि तिच्या कपाळावर कुंकवाच्या जागी हिरव्या गोंदणाची बारीक खूण होती जी लाल टिकलीने झाकून जात असे. तिची सडपातळ ठेंगणी मूर्ती सदाला भिंतीवरच्या कॅलेन्डर मधल्या सरस्वतीसारखी वाटे. कितीदा तरी त्याने लहान असताना माईला “हे तुझे चित्र आहे का ग?” असा प्रश्न केला होता आणि तिच्या उत्तराने त्याचे समाधान झाले नव्हते. माई ही त्याची स्त्रीची प्रतिमा होती आणि बहुतेक म्हणून पुढे त्याला, त्याच्या नकळत विभा आवडायला लागली होती.

माई त्याची आईच नव्हती तर शिक्षक आणि मित्र सुद्धा होती. माई फार काही शिकलेली नसावी पण तिचे अक्षर अगदी मोत्यासारखे होते. तिचे पाठांतर चांगले असावे, कारण तिला पाढे येत आणि अनेक कविता व श्लोक म्हणता येत. माई पाचवारी साडी नेसत असे पण घरात असताना नेहमी केर काढताना साडी कसे वर खोचतात, तशी खोचलेली असे. त्यामुळे त्याला माई ही सदा सर्वदा युद्धाला तयार असल्यासारखी दिसे. पण तिचा सर्वात आवडीचा विषय म्हणजे कविता. आणि कविता शिकवताना ती खोचलेली साडी ठीक करत असे, केसावर हात फिरवून जसे काही प्रेक्षकांसमोर कविता वाचन आहे या अविर्भावात ती कविता वाचायला सुरुवात करी. दररोज संध्याकाळी चाळीतील मुलांबरोबर उनाडक्या करून दमल्यावर माई त्याचा अभ्यास घेत असे. दादा रात्री बँकेतून घरी येण्यापूर्वी अभ्यास आणि जेवण झाले असले पाहिजे हा नियमच होता तो सदा कॉलेजला जाईपर्यंत मोडला नाही. सदा हे सोपे नाव बहुदा माईने ठेवले असावे कारण दादा रागावला की त्याला सदानंद अशी हाक मारत असे पण खुशीत असेल तर हाकेचे सदाभाऊ असे रूपांतर होई.

माईला एक मोठा भाऊ होता. सदाला माईने त्याला भाऊमामा म्हणायला शिकवले होते. भाऊमामा क्वचितच येई कोकणातील कुठल्यातरी गावाहून, पण तो कधी मुक्कामाला राहिला नाही. त्याला गावी कसली तरी पूजा असायची. त्याचे अनेक यजमान होते आणि म्हणे त्याला गावी गोरे गुरुजी म्हणत. भाऊमामा होताच खूप गोरा. तो धोतर नेसत असे आणि त्याच्या कपाळावर नेहमी गंधाचा टिळा असे. दादा बँकेतून संध्याकाळी घरी यायच्या आत तो माईचा निरोप घेई. माई नेहमी तो जाताना रडे पण तिच्या हुंदक्यांचा आवाज येत नसे. भाऊमामा माईशी नेहमी काहीतरी जोरजोरात बोलत असे, पण काय बोलतो ते कधी कळले नाही. जाताना भाऊमामा लिमलेटच्या गोळ्या देई आणि गोड आवाजात प्रश्न करी “काय रे सदा, तुला एक छोटी बहिण हवी का नाही?” असे म्हणून तो माईकडे पाही, पण सदाला जाणीव असे कि माई पदर तोंडाला लावून रडते आहे. भाऊमामा सदाला फारसा आवडत नसे आणि त्याला खात्री होती की दादाला तर तो अजिबात आवडत नाही. हळूहळू भाऊमामा घरी यायचा बंद झाला.

दादा फार अबोल होता. रात्री बँकेतून आला की हातातली जेवणाच्या डब्याची पिशवी माईच्या हातात देऊन विचारात असे “ जेवण तयार आहे का? भूक लागलेय.“ एवढे म्हणून उत्तराची वाट न बघता हात पाय धुऊन कपडे बदलत असे. पँट, शर्ट काढून व्यवस्थित घडी करून ठेवी. विजार आणि गंजीमध्ये दादा खूप बारीक दिसे. भिंतीवरच्या गणपतीच्या फोटोला उदबत्ती ओवाळून दादा जेवायला बसत असे. जेवणापूर्वी नेहमीचा प्रश्न, “सदा जेवला का? अभ्यास केला का नुसताच खेळत होता?” एवढ्या चौकशीनंतर दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत दादा कडून काही विचारणा होण्याची शक्यता नसे. जेवणानंतर दादा कॅरम खेळायला बाहेर जात असे. माई नेहमीच शेवटी जेवत असे. तिची कामे रात्रीपर्यंत संपत नसत पण त्या पूर्वी सदाला थोपटत गोष्ट सांगणे हे तिचे नेहमीचे काम होते आणि सदाला तिच्या हाताचा मृदु स्पर्श कपाळावर झाल्याशिवाय झोप लागत नसे. मोठ्ठा झाल्यानंतर सुद्धा सदाला कधी कधी भयानक स्वप्नातून दचकून जाग आल्यावर माईच्या थोपटण्याची आठवण येई.

गिरगावातल्या चाळीतील रूम मोठ्ठा नव्हता पण त्या काळी सदाला मोठ्ठा वाटत असे. चाळीतील घराला रूम का म्हणत आणि चाळीतील लोक मराठीत रूमला पुल्लिंगी का संबोधतात हे कोडे उलगडण्यासारखे नाही, पण सदाचे घर छोटे नव्हते. सर्वसाधारण कोणत्याही चाळीत दिसते तशी लांब आळी, आत एक मोठ्ठी खोली, त्याच्या आत दुसरी खोली. आतल्या खोलीत स्वयंपाकघर आणि आंघोळीसाठी न्हाणीघर. संडास मात्र बाल्कनीच्या शेवटला कॉमनमध्ये होता. तीन माणसांच्या कुटुंबाला घर कधी अपुरे वाटले नाही.

कॉलेजला जाईपर्यंत सदाला आजूबाजूच्या जगाची फारशी जाणीव झाली नव्हती. माईच्या छायेखाली त्याचे आयुष्य अगदी उबदार होते. शाळेत आणि चाळीत मित्र होते. क्रिकेट जवळच्या मैदानावर खेळले जायचे. रविवारी दूरदर्शनवर सिनेमा असे आणि सर्व जण चाळीतल्या शानबागांच्या एकुलत्या एका टी.व्ही. भोवती जागा अडवून बसत. माईपण येऊन जाऊन खिडकीतून सिनेमा अर्धवट बघत असे आणि नंतर सदाला सर्व स्टोरी तिला समजून सांगायला लागे. मुलांच्या बरोबर मुली पण कलकलाट करत सिनेमा बघत. त्या एवढ्या मुलींमध्ये कोण कुठल्या घरातून येते आणि कुणाचे नाव काय या कठीण प्रश्नाचे उत्तर शोधण्यात सदाला कधीच स्वारस्य वाटले नाही म्हणून अगदी कॉलेजमध्ये जाईपर्यंत त्याचे लक्ष विभाकडे गेले नव्हते.

सदा एसेस्सी पास होईपर्यंत या तीन माणसांच्या कुटुंबावर कुठलाही मोठ्ठा निर्णय घेण्याची वेळ आली नव्हती. सदा बिनतक्रार शाळेत जातो आणि पास होतो याच्या व्यतिरिक्त दादाला त्याच्या प्रगतीविषयी माहिती नव्हती. स्वतः मॅट्रिक झाल्यावर त्याने बँकेत नोकरी धरली आणि मुंबईतच राहायला मिळावे म्हणून बदली आणि प्रमोशन नाकारले. त्याने सदासाठी बँकेत शब्द टाकून ठेवला होता. एसेस्सीच्या निकालानंतर आणि सदा पास झाल्यावर त्याला बँकेत नोकरी पक्की होती.

एसेस्सीच्या निकालानंतर चित्र पूर्ण बदलून गेले. सदाला चांगले गुण मिळाले आणि विद्यामंदिर शाळेत तो पहिल्या दहा विद्यार्थ्यात आला होता. शाळेच्या प्रमुखांनी या गुणी आणि हुशार मुलांच्या पालकांना बोलावून त्यांचे अभिनंदन केले होते आणि मुलांना पुढे शिकण्याचे प्रोत्साहन दिले होते. दादा गोंधळून गेला होता आणि माईचा आनंद गगनात मावत नव्हता. सदाने कॉमर्स कॉलेजला दाखला भरला आणि दादाने गंभीर मुद्रेने आता पुढे कसे काय होणार या मुद्रेने होकार दिला. सदाने माईला आणि एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सिडनहॅम कॉलेजने सदाला शिष्यवृत्ती देऊ केली होती. शाळेत पहिल्या दहात तीन मुली आहेत, हे सदाला कळले होते पण उत्साहाच्या भरात त्याने कोण मुली आणि कुठल्या वर्गातल्या याची पण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. या तीन मुलींपैकी एक विभा बोरकर आहे हे त्याला विभा कॉलेजच्या क्लासमध्ये भेटली तेंव्हा कळले.

कॉलेजचे दिवस अतिशय आनंदाचे गेले. सदा स्कॉलर होता आणि मनमिळावू होता. दिसायला पण गोरा गोमटा, साधेच कपडे घालायचा पण आठवणीने इस्त्री केलेले. त्यात सर्वांना अभ्यासात मदत करायला सदैव तयार. मुलींना तर तो अतिशय आवडायचा. त्याच्या मुलींशी वागण्यात कोणताही अनैसर्गिकपणा नव्हता आणि इतर टारगट पोरांसारखी तो मुलींची टिंगल करत नसे का छेड काढत नसे. मुलींना त्याच्याशी बोलताना संकोच वाटत नसे. काही धीट मुली तर कधीकधी त्याचीच चेष्टा करत. विभा त्याच्या अवतीभोवती घुटमळत असे. त्याने लेक्चर बंक केले की ती पण करत असे. सदा कॉलेजच्या लायब्ररीत वाचत बसला की विभा त्याच्या समोर हजर! वाचत असताना कधीकधी सदाची नजर वर गेलीच तर त्याला भास व्हायचा की विभा त्याच्याकडे कौतुकाने पहात आहे. जिथे तिथे त्याच्या बरोबर राहण्याचा तिचा प्रयत्न! मैत्रिणींशी बोलताना जर सदाचा विषय निघाला तर विभा अचानक बोलकी होई आणि आपल्याला सदाची प्रत्येक गोष्ट कशी माहीत आहे, हे दाखवून देण्याचा प्रयास करी. एकदा तर कॉलेजच्या पिकनिकला सदा येणार असेल तरच मी येईन हे तिने मुलींना सांगून टाकले होते. कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाअखेरीस वर्गातल्या मुलींना तरी माहीत झाले होते की विभा सदावर “फिदा” आहे.

विभा दिसायला सामान्य होती. तिच्याहून चांगल्या दिसणार्‍या कितीतरी मुली कॉलेजमध्ये होत्या. विभात दोष काढण्यासारखे काही नव्हते. तिचा रंग उजळ होता म्हणजे सदासारखा गोरा नव्हता पण सावळा पण नाही. कॉलेजमध्ये बहुतेक मुली पंजाबी ड्रेस घालत पण ज्या काही थोड्या मुली साडी नेसत त्यात विभा होती. दोन वेण्या, कपाळावर लाल टिकली आणि दोन काळेभोर डोळे यामुळे विभा इतर मुलींपेक्षा सुंदर नसेल पण वेगळी दिसत असे. सदाला कधीकधी संशय यायचा की विभा माईची तर कॉपी मारत नाही नं !

सदासारखी फार थोडी मुले कॉलेजमध्ये होती. एक तर रिझर्व कोट्यातून आलेली मुले सहज ओळखून येत. कोट्यातील मुले दिसायला वेगळी दिसत आणि त्याचे कपडे पण झटाक असत. एकाची तर पँट निमुळती आणि पिवळ्या रंगाची होती. ही मुले केस लांब वाढवत आणि त्यांच्या मनगटांवर अनेक रंगांचे दोरे बांधलेले असत. ही मुले आपल्याच ग्रूपमध्येच असायची आणि सतत मुलींकडे पाहत असायची. सर्वजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत.

बहुतेक मुले सधन कुटुंबातील असावीत असे जाणवत असे. फार थोडी मुले सदाप्रमाणे खाकी पँट आणि पांढरा शर्ट घालत. काही मुले मोटर-सायकलवरून येत आणि थोडी तर त्यांच्या गाड्या घेऊन. ही मुले सुद्धा आपला ग्रूप करून असत. पण जशी परीक्षा जवळ येत असे तशी सदाची गरज या सर्व प्रकारच्या ग्रूपना भासे. किरीट मेहताची ओळख अशीच परीक्षा ऐन तोंडावर आल्यावर झाली होती. किरीट बड्या बापाचा मुलगा होता. त्याचे वडील मुंबईच्या शेअर बाजारात दलाल होते आणि किरीट सुद्धा या व्यवसायात जाणार होता. किरीट उनाड किंवा छचोर मुलगा नव्हता पण त्याला अभ्यासात काही स्वारस्य नव्हते. तो आता फक्त कॉलेज संपून पदवी मिळण्याच्या प्रतिक्षेत होता. त्याचे लग्न पण ठरले होते आणि त्याच्या भावी सासर्‍याने तो ग्रॅजुएट होताच लग्न करायचे आश्वासन दिले होते. किरीट वयाच्या अठराव्या वर्षापासूनच वडिलांच्या पेढीवर जायला लागला होता. शेअर बाजारातील खाचखळगे शिकण्यामध्ये त्याचे लक्ष होते पण परीक्षा पास होणे जरुरीचे होते.

सदाला किरीट पहिल्या भेटीतच आवडला. किरीटचा नम्रपणा सदाच्या आवडण्याला कारणीभूत असावा कारण सधन मुलांच्या ग्रूपचा सदाला नेहमी एक प्रकारचा दबदबा वाटत असे. एका श्रीमंत मुलाने आपल्याला एवढे महत्त्व द्यावे याचाच सदाला आनंद झाला होता आणि किरीटच्या गाडीतून जाताना कॉलेजची इतर मुले पाहताहेत या जाणीवेने आणखीनच त्याची मान उंचावली होती. विभाला ही गोष्ट सांगताना तो जरा उत्तेजित झाला होता. किरीट कसा त्याला अनेक प्रयत्नानंतर सुद्धा सदा म्हणू शकत नव्हता तर त्याच्या तोंडून कसे “सडा” असा उच्चार येई, हे सांगताना सदाला खूप हसू फुटले होते आणि विभा त्याच्याकडे तिच्या काळ्याभोर आणि मोठ्ठ्या डोळ्यांनी पाहत राहिली होती. शेवटी किरीटने सदाला “सँडी” म्हणायचे ठरवले आणि तेंव्हापासून सदाला मित्र मंडळीत “सँडी डेव “ म्हणून घ्यायला गंमत वाटू लागली. तेंव्हा त्याला माहीत नव्हते की पुढे त्याच्या नशिबात “सदा देव” पेक्षा “सँडी डेव“ म्हणवून घेणे लिहिले आहे.

कॉलेज मधले दिवस कसे स्वप्नवत गेले. माई सदाकडे कशी खूप कौतुकाने बघत असे. तिच्या पाहण्यात आणि विभाच्या त्याच्याकडे पाहण्यात, साम्य होते का असा संभ्रम सदाला पडे. माई आता थकल्या सारखी वाटे. तिला सतत सर्दी खोकला होई आणि अधेमधे ताप पण असे. वैद्यबुवानी दिलेल्या काढ्याचा उपयोग होताना दिसत नव्हता. विभाच्या त्याच्या घरी फेर्‍या वाढल्या होत्या. ती बराच वेळ माईबरोबर असे. सुट्टीच्या दिवशी सदा मित्रांबरोबर गल्लीत क्रिकेट खेळून आला की त्याला विभा घरात अभ्यास करताना किंवा माईला स्वंयपाकात मदत करताना दिसे. सदाला जाणवले की दादा आणि माईला विभा आवडत असावी. नाहीतरी त्यांना मुलगी घरात नसल्याची उणीव होतीच. बऱ्याचदा बाहेरून आल्यावर सदा हाक मारत असे “माई, पाणी दे ग. तहान लागलीये ” तेंव्हा हातात पाण्याचा पेला घेऊन विभा समोर येई “माईना बरे वाटत नाही म्हणून जरा पडल्या आहेत.“ सदाला अशाच एका दिवशी जाणीव झाली की विभा हातात पाण्याचा पेला घेऊन त्याच्या चेहेर्‍याकडे पाहत उभी आहे आणि ते सुद्धा अगदी जवळ. त्याला तिच्या शरीराची ऊब आणि कंपने, दोन्ही जाणवली. पेला त्याच्या हातात देताना तिचा हात थरथरला आणि त्याच्या हातातून सुद्धा पेला निसटला. दोघेही जेंव्हा खाली वाकले तेंव्हा त्यांचा एकमेकांना हवा हवासा स्पर्श झाला.

ग्रॅज्युएशन नंतर दादाच्या इच्छेविरुद्ध सदाने बँकेतली नोकरी नाकारली. दादाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की काही वर्षांतच बँकेच्या परीक्षा देऊन सदा कसा ऑफिसर होऊ शकतो. तरीही सदाने किरीट मेहताच्या ऑफिसमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दादाने पुन्हा विषय काढला नाही. तसेही विचार केले तर त्याला खाजगी नोकरी काय आणि कशी असते हे कुठे कळत होते? त्याने एका चाकोरीतून आयुष्याचा प्रवास केला होता.

“मेहता अँड मेहता शेअर अँड स्टॉक ब्रोकर” मध्ये कामाचे स्वरूप खूप विलक्षण होते. हा उद्योग किरीट मेहताच्या खापर पणजोबांनी सुरू केला आणि मेहता कुटूंबात तो पुर्वापार चालत आला होता. कंपनी जुनी असल्यामुळे बरेचशी गिर्‍हाईके पण जुनी होती आणि त्यात नव्या गिर्‍हाईकांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच चालली होती. कमिशनचा धंदा होता त्यामुळे जितकी शेअरची खरेदी विक्री तितके कमिशन. सुरवातीला हे सगळे सदासाठी नवीन होते. पण आता सदा किरीटला शिकवण्याऐवजी किरीट सदाला शिकवू लागला होता. किरीटचे धंद्यातील ज्ञान पाहून सदा चकित झाला होता आणि होणार्‍या पैशाच्या व्यवहाराचे विराट रूप पाहून त्याचे डोळे दिपले होते. त्याला आता उलगडा होत होता की काही माणसे एवढी श्रीमंत का होत असावीत. सदाला दादाची आणि चाळीतील इतर नोकरदार वर्गाची कीव येऊ लागली. त्याच्या मनात आपण पण एके दिवशी असेच श्रीमंत व्हायची स्वप्ने आकार घेऊ लागली.

सदा हुशार होता, मेहनती होता आणि त्याच्यात शिकण्याची खूप उमेद होती. पहिल्या महिन्याचा पगार घरी घेऊन आला आणि प्रथम माईच्या हाती ठेवला. माईला एवढे पैसे एकत्र पाहून घाबरे फुटले होते. तिने सारे पैसे देवघरात ठेवले ते दादा घरी येईपर्यंत कोणी हलवले नाहीत. दादाला सुद्धा एवढी रक्कम पाहून आश्चर्य वाटले. इतक्या वर्षांच्या नोकरी नंतरसुद्धा त्याचा पगार सदाच्या पहिल्या वहिल्या पगारा एवढा नव्हता. त्याला प्रथम हर्ष झाला आणि नंतर चिंता वाटू लागली. त्याने सदाला एकच प्रश्न विचारला “ तुमची कंपनी काही गैर व्यवहार करत नाही नं म्हणजे स्मगलिंग वगैरे? “ सदाच्या उत्तराने त्याचे समाधान झाले नसावे म्हणून त्याने सल्ला दिला “ सावध रहा.”
माईने सारे पैसे बँकेत ठेवायला सांगितले आणि “जास्त खर्च करू नकोस रे बाबा“ असे चिंतित स्वरात उद्गार काढले. सदाने सारे सल्ले धुडकावून माईसाठी एक साडी आणि दादासाठी पँटचे कापड खरेदी केले. अर्थात या खरेदी साठी त्याला विभाची मदत घ्यावी लागली. खरेदीहून परत येताना त्याने विभासाठी गजरा विकत घेतला आणि स्वतःच्या हातानी तिला माळला, त्यानंतर त्या दोघांनी आईस्क्रीम खाल्ले होते. विभाच्या चेहेर्‍यावरचा आनंद उघड होता.

जितक्या वेगाने सदाची नोकरीत उन्नती होत होती त्याच वेगाने माईची प्रकृती ढासळत चालली होती. विभाचे वडीलसुद्धा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने गेले. ते लवकरच पोर्ट ट्रस्ट मधून रीटायर होणार होते. विभाच्या आईने मुंबईत काही उरले नाही म्हणून गोव्याला परत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिचे सारे भाऊ आणि बहिणी होत्या, गावी घर होते आणि मुंबईतील दोन खोल्या आता तिला खायला उठल्या होत्या. विभाने गोव्याला जायला चक्क नकार दिला. माईची ढासळणारी प्रकृती हे तिला एक कारण होतेच पण तिने अजून जॉब कुठे बघितला होता? तिने गोव्यात एका खेडेगावात राहायला नकार दिला. तिच्या आईने मन शांत झाल्यावर लवकरच परत येते म्हणून गोव्याची बस घेतली. जाताना माईला“ तुझ्याकडे माझी पोर सोडून जाते हो ! तिची काळजी घे!” असे डोळ्यातले अश्रू पुसून सांगितले.

एखादा स्पंज जसा पाणी शोषून घेतो, त्या प्रमाणे सदा शेअर बाजाराचे ज्ञान आत्मसात करात होता. त्याला गुंतवणूक करणारे भेटत होते आणि खूप चर्चा आणि अफवा त्याला ऐकू येत असत. पूर्ण दिवस आजूबाजूला माणसे, फक्त पैसा आणि पैशाच्या गोष्टी बोलत आणि जगत. त्याला हे जग अचंबित करणारे होते. त्याच्या तरुण मनाला यात पैशाचा हव्यास किंवा आधाशीपणा दिसत नव्हता तर लोक कसे आयुष्यात पुढे जातात हेच दिसत होते. त्याला वाटू लागले की शेअर बाजार एक जादुई दुनिया आहे आणि तिथे कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. त्याला आपला पगार तुटपुंजा वाटू लागला होता. दादाने त्याला नंतर कधी त्याच्या नोकरी विषयी किंवा पगारा विषयी विचारले नाही. एकदा सदाने दादाला टी.व्ही. बदलण्यासाठी पैसे देऊ केले तेंव्हा दादा त्याच्यावर भडकला होता. जुन्या टी.व्ही.त काय वाईट आहे असा प्रश्न रागाने त्याने माईकडे बघून केला आणि तो घराबाहेर निघून गेला.

माई सुद्धा हळू आवाजात म्हणाली ‘ बाबा रे, तुझ्या दादाला तू घरात पैसे दिलेले आवडणार नाही. आपण आहोत तसे सुखी आहोत. आपल्याला काय कमी आहे ? तुझी बायको येईल तेव्हा तिला पैसे दे आणि तोपर्यंत तिच्यासाठी बँकेत ठेव.” या दिवसानंतर तिसर्‍याच दिवशी संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला विभा नव्या टी.व्ही. समोर बसून मराठी सिनेमा पाहताना दिसली. माई म्हणाली “ तुला हवा म्हणून तुझ्या दादाने हप्त्याने टी.व्ही. आणला आणि जुन्याचे सुद्धा काही पैसे मिळाले. पण तुझ्यापेक्षा आम्ही दोघीच टी.व्ही. जास्त बघू.“ दोघीही बायका खुश दिसत होत्या. सदाला त्यांचे हे छोटे जग पाहून त्यांची कीव आली आणि त्याला वाटले की त्याच्यावरच्या दादा आणि माईच्या ऋणामध्ये आणखी भर पडली आहे.

शिर्के आणि मुसा हे दोघेही कंपनीचे गिर्‍हाईक होते. ते नेहमी किरीटच्या वडिलांना भेटत. त्यांचा व्यवहार खूप मोठा असावा कारण किरीटचे वडील त्यांना अतिशय नम्रतेने वागवत. त्यांच्यासाठी स्पेशल चहा मागवला जाई. सदाने एकदा त्यांच्या विषयी विचारले तेंव्हा किरीट उद्गारला “ डेंजर लोक छे ! केश नु व्यापार “

शिर्के आणि मुसा यांचा अकाऊंट सदाकडे नव्हता तर शिलोत्रीकडे होता. शिलोत्री त्याच्यापेक्षा वयाने खूप मोठ्ठा होता आणि कंपनीत सुद्धा जुना. शिलोत्री अतिशय भित्रा माणूस होता. तीन मुलींचा बाप आणि वृद्ध आई वडिलांची जबाबदारी यामुळे त्याच्या वृत्तीत एक प्रकारचा सावधपणा आला होता. किरीटच्या वडिलांनी नुसते केबिनमध्ये बोलावले तरी तो रुमालाने घाम पुसत असे. त्याच्या भित्रेपणामुळे म्हणा किंवा त्यामुळे आलेल्या सचोटीमुळे किरीटचे वडील शिलोत्रीला गोपनीय कामे सांगत असत. शिलोत्री, शिर्के आणि मुसा या दोन महत्त्वाच्या पार्ट्यांची खाती सांभाळत असे. खाती कसली! सर्व बिन हिशोबी व्यवहार.

शिलोत्री बोलायला चांगला माणूस होता पण प्रत्येक वेळेला त्याचे बोलणे समजेलच याची खात्री नसे. कधी कधी तो खूप गूढ बोलतो असे सदाला वाटे. शिलोत्री वयाने काका म्हणावे एवढा मोठ्ठा होता पण सदा किरीटभाईचा वर्ग मित्र असल्यामुळे शिलोत्रीने त्याला नावाने हाक मारायची मुभा पहिल्यापासूनच दिली होती. डोक्याला टक्कल असल्यामुळे शिलोत्री वयापेक्षा अधिकच जास्त मोठ्ठा वाटायचा. स्टाँक एक्स्चेंजच्या कँटीनमध्ये एकत्र चहा पीत असताना सदाने त्याला विचारले होते, “तुम्ही शेअरमध्ये इन्वेस्टमेंट करता का हो? “ तेंव्हा अंगावर शहारा आल्याचा अविर्भाव करून शिलोत्री म्हणाला, "मराठी माणूस आहे. आपली नोकरी बरी. “ सदाने विचारले “ अहो, असं काय म्हणता? केवढे पैसे आहेत यात!”
शिलोत्रीने एक अगम्य पण लांबलचक उत्तर दिले “ बाबारे, मराठी माणूस तलवारी आणि बंदुकीला भीत नाही. वाघ अंगावर आला तरी डगमगत नाही. त्याला गरीबीची लाज वाटत नाही. एक वेळ मुलाने कोणाशी तरी मारामारी करून डोके फोडले आणि पोलीस त्याला घेऊन गेले तरीही बाप ताठ मानेने पोलीस स्टेशनच्या वार्‍या करेल आणि मुलगा सुटून आल्यावर त्याचे घरात युद्धावरून विजयी होऊन परत आल्यासारखे स्वागत होईल. परंतु साधा बनिया जरी थकलेली बाकी वसूल करायला दारात उभा राहिला तर आपला मराठी माणूस घरात लपेल आणि बायकोला दरवाज्यावर पाठवील. कर्जाचा हप्ता चुकला तर त्याला घाम फुटेल आणि जर कर्जाचा डोंगर आवाक्याबाहेर गेला तर आत्महत्या करेल. मराठी माणसाला पैशाच्या मोठ्या व्यवहारांची अतोनात भीती वाटते. अशा मराठी माणसाने शेअर बाजाराचा धोकादायक गेम खेळू नये हेच खरे.'' या एवढ्या मोठ्ठ्या उत्तराचा अर्थ काय हे सदाला समजण्याअगोदर शिलोत्री उठला आणि पुढचे बोलणेच खुंटले. सदाला एवढे मात्र जाणवले की त्याच्या गिर्‍हाइकांच्या यादीत शहा, मेहता, मोतीवाला, भंसाली, जैन, कपूर, चावला, मोटवानी, रुनझुनवाला, अगरवाल वगैरे वगैरे अनेक नावे होती पण त्याला पाटील, भोसले, कुलकर्णी, आपटे, गोखले अशी परिचित नावे काही आठवली नाहीत.

माईची तब्येत अधिकाधिक खालावत होती आणि दादाच्या बोलण्यात स्वेच्छानिवृत्तीचा उल्लेख येऊ लागला. एके दिवशी संध्याकाळी दादाच्या बँकेतले चिटणीस माईच्या तब्येतीची चौकशी करायला घरी आले. विभाने त्यांना चहा दिला तेंव्हा विभा आत गेल्यावर त्यांनी सदाला प्रश्न केला “भावी वधू वाटतं? छान छान, लग्नाला बोलवा हां!“ उत्तराची वाट न पाहता त्यांनी जास्त गंभीर विषयाला हात घातला. दादाला संबोधून ते म्हणाले “अरे विनायक, रिटायर कसला होतोस? नुकसान होईल. पे स्केल वाढणार आहेत. मी तर म्हणतो, आमच्या सोसायटीत जॉइन हो. ठाण्याला तीन रूमचे ब्लॉक बांधतोय. बँक कर्ज देतेय, तू नाही तर सदा फेडेल पण मोठे घर तर होईल. नाहीतरी सदाच्या लग्नानंतर एक बेडरूम तर हवीच ना? “ एवढे बोलल्यावर त्यांनी मिश्कीलीने सदाकडे पहिले. सदा पूर्ण निरुत्तर झाला होता. महिन्याभरात चिटणीसांनी सारी कागदपत्रे पूर्ण करून घेतली होती. सदाने बँकेत साठलेले पैसे सोसायटीला भरले आणि बाकी दादाच्या नावावर बँकेचे कर्ज मिळाले. ठाण्याला इमारत झपाट्याने तयार होत होती आणि दोन तीन मेंबर कमी पडत होते म्हणून दादाचा चान्स लागला होता आणि लवकरच मेंबर्समध्ये फ्लॅट नंबर काढायची लॉटरी होणार होती. सगळे कसे सुरळीत चालले होते.

एके दिवशी अनपेक्षित पणे माईने सदाकडे लग्नाचा विषय काढला. सदा काही बोलायच्या आतच विभाने तिथून पळ काढला होता. सदाने माईला स्पष्टपणे सांगितले की ती खणखणीत बरी होई पर्यंत तो लग्नाचा विचार करणार नाही. विभाचा उल्लेख निघाला नाही कारण बहुदा सर्वांनी ते गृहीत धरले असणार. सदाचे काम खूप वाढले होते. आता सदाला गिर्‍हाईकांकडून मान मिळू लागला होता. बाजारात तेजी होती, लोक त्याला सल्ला विचारू लागले होते आणि सर्वांची पैसे मिळवण्याची एकच झुंबड उडाली होती. एके दिवशी संध्याकाळी शिलोत्री त्याला म्हणाला “ऑफिस सुटल्यावर वेळ आहे का? तुझी कोणाशी तरी ओळख करून द्यायची आहे.“ सदाला सांगावेसे वाटले की “बाबारे माझे लग्न ठरवायच्या भानगडीत पडू नकोस, मी अगोदरच ठरवले आहे.” आणि मग सदाला त्याच्याच या विचाराचे आश्चर्य वाटले. तो विभाचा विचार करत होता पण त्याने तिचा होकार आहे का हे कधीच विचारले नव्हते. सदा शिलोत्रीला फक्त 'हो' म्हणाला आणि कामात गुंतला. सदा आणि विभाचा रोमांस काही आगळा वेगळा नव्हता आणि त्या दोघांनाही मुंबईतील कितीतरी निम-मध्यम कुटुंबातील प्रेमी युगुलं एकमेकांच्या सहवासासाठी काय काय प्रयास करतात याची कल्पना नव्हती. त्यांचे प्रेम हे कधीतरी चौपाटीवर फिरायला जाणे आणि भेळ खाणे याच्या व्यतिरिक्त उडपी हॉटेलात एका प्लेटमध्ये दोघांत वाटून मसाला डोसा खाणे इथपर्यंत मर्यादित होते. चालताना त्यांचा एकमेकांना चुकून स्पर्श झालाच तर काही काळ त्यांच्यातले अंतर वीतभर जास्तच होई. कोणालाही त्यांच्यात प्रेम आहे का नुसती मैत्री असा संभ्रम पडला असता.

शिलोत्रीने टॅक्सी ड्रायव्हरला कुलाब्याला टॅक्सी घ्यायला सांगितले. अजूनही तो कोणाला भेटायचे आहे याबद्दल बोलला नव्हता. सदाची उत्सुकता वाढली होती पण सदाने गप्प राहायचे ठरवले. शिलोत्रीने टँक्सी एका अलिशान बार समोर थांबवली. सदा चुपचाप शिलोत्रीच्या मागोमाग बारमध्ये शिरला. त्याला बार मधले वातावरण पूर्णपणे अनोळखी होते.

बारमध्ये उजेड मंद होता आणि त्यामुळे सदाने प्रथम दोघांना ओळखले नाही पण नंतर लगेच त्याच्या लक्षात की शिर्के आणि मुसाभाई बसले आहेत. त्याला बघून मुसाभाई म्हणाले “ आओ, बैठो सदाभाऊ. अच्छा हुआ तुम आये.“ शिलोत्रीने त्याला बसण्याचा इशारा केला . ते दोघे शिर्के आणि मुसाभाईंच्या समोर सोफ्यावर बसले. मुसाभाईने विचारणा केली “ क्या लोगे ? बियर वगैरा ?”
शिलोत्री हसून म्हणाला “ साहेब तुम्हाला माहिती आहे, आपण कशावर खुश असतो. पण आपल्या मित्राला सरबत किंवा कोकाकोला चालेल, इथली स्पेशालिटी.”
सदाला आपण मुसाभाईला का भेटतो आहोत आणि ते सुद्धा ऑफिसच्या बाहेर आणि बारमध्ये याचा उलगडा झाला नव्हता. पण वेटर गेल्यावर मुसाभाईने लगेचच विषयाला हात घातला. त्यांच्या हिंदीतील लांबलचक एकतर्फी बोलण्याचा सारांश असा होता. मुसाभाईंचे अनेक उद्योग होते आणि दुबई पासून वेरावळ पर्यंत त्याचे जाळे पसरले होते. त्यांच्या उद्योगातून त्यांना खूप उत्पन्न होत असे पण सर्व नगद म्हणजे कॅशमध्ये. बरीच वर्षे ते आलेल्या उत्पन्नाची प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत पण आता त्यात फारसा काही दम उरला नव्हता म्हणून त्यांना शेअर बाजारात जास्त पैसे गुंतवायचे होते. त्यासाठी त्यांना सदाभाऊची मदत हवी होती. सदाने शिलोत्रीकडे पाहून विचारले, “पण मेहेता साहेब स्वतः मुसाभाईंचा अकाऊंट बघतात नं?" त्यावर मुसाभाईनी त्याला माहिती पुरवली की मेहेतासाहेब आता निवृत्त होत आहेत आणि किरीटभाई सर्व धंदा सांभाळणार आहेत पण किरीटभाई कॅश व्यवहार करायला तयार नाहीत. वर मुसाभाईनी सारे गुंतवलेले पैसे किरीटभाईनी परत दिलेत. मुसाभाई म्हणाले “ऐसी तेजीमे बाजारके बाहर रहेंगे तो कमायेंगे कब?”

सदाला अजूनही उलगडले नव्हते की मुसाभाई हे सारे त्याला का सांगताहेत. तो काही किरीटभाईला सांगू शकत नव्हता. त्याने उरलेले सरबत एका घोटात पिऊन टाकले. इथले सरबत शेवटी कडवट लागले आणि त्याला कळले की त्यात नक्की काहीतरी मिसळले आहे. पण आता त्याला खूप छान वाटत होते आणि मुसाभाई सारखा मोठ्ठा माणूस त्याला एवढ्या आदराने आपला प्रॉब्लेम सांगत होता. सदा मुसाभाईंकडे पाहून म्हणाला, "मग तुम्ही काय करणार आहात?" सदाच्या बुद्धीला एवढे कळून चुकले होते की मुसाभाईंच्या प्लॅनमध्ये त्याचा काही तरी भाग आहे. आता शिलोत्रीने पुढाकार घेतला. तो म्हणाला “अगदी सोपे आहे. मुसाभाई तुला रक्कम देतील ती तू शेअरमध्ये गुंतवायची आणि त्यातून झालेल्या फायद्यातील पंचवीस टक्के फायदा तुझा."

सदाला विजेचा धक्का बसावा तसे झाले. त्याने दबलेल्या स्वरात विचारले “किती पैसे गुंतवायचे आहेत?” मुसाभाई म्हणाले, “ज्यादा नाही. एक वीस पंचवीस लाख. नंतर बाजार तेज असेल तर आपण एक दोन पेटी पण करू शकतो." सदाला पेटी म्हणजे काय ते कळणार नाही या जाणीवेने शिलोत्री म्हणाला, “म्हणजे एक दोन कोटी." सदाला आपण खूप वेळ बाथरूमला गेलो नाही याची जाणीव झाली. काहीतरी बोलायचे म्हणून तो म्हणाला "शिलोत्री, तुम्ही का नाही करत मुसाभाईंना मदत?"

“अरे हट! मी एक साधा कारकून. मॅट्रिक नंतर शिकलो नाही. कधी मुसाभाई सारख्यांनी दिली तर विलायती पिणार." शिलोत्रीने हातातला ग्लास वर करून दाखवला. त्याला चढली असली तरी तो हृदयातून बोलत होता. “पांढरपेशे म्हणून गुत्त्यात जाता येत नाही. मन मारून जगतो. रविवारी मटण आणून खाण्यात धन्य मानतो. मी काय करणार ****?” सदाला शिलोत्री आता रडतो की काय असे वाटले. तेवढ्यात मुसाभाईने आपल्या जड झालेल्या आवाजात कारण मीमांसा केली. “तुम्ही साले मराठी लोक, पैशाला खूप भिता. पैशाला भ्यालावर पैसा दूर जातो. पैशाला रखैल प्रमाणे नाचवा, मग बघा कसा तुमच्या मागे धावत येतो. वो मेहता, पैसे को भगवान मानता है और तुम लोग भूत! दोनो गलत हो. पैसा रखैल है. आज है कल नही. मगर जब तक है, अपने मर्जी से नाचना चाहिये.“

आतापर्यंत शिर्के काही बोलला नव्हता, सदा त्याच्याकडे पाहून म्हणाला “पण शिर्केसाहेब आहेत नं?“ त्यावर मुसाभाई शिर्केची पाठ थोपटून म्हणाले “अरे, ये तो हमारा पार्टनर है ही. पण त्याच्या डोस्क्यापेक्षा त्याचा हात जास्त चालतो." नंतर सदा कडे बघून म्हणाले “शिर्केसे पुछो, अपना पार्टनर बननेके पहेले वो क्या था और अब क्या है!” मुसाभाईना आता सुसंगत बोलणे अतिशय जड होऊ लागले होते. ते उठून उभे राहिले आणि म्हणाले "सदाभाऊ सोचके बताओ. ऐसा चान्स बार बार नही आता. पंधरा साल के बाद तुम्हारा शिलोत्री ना बने !" त्यांनी शिर्केला बिल भरण्याचा इशारा केला आणि उठून बारच्या दरवाज्यातून मागे न वळून बघता निघून गेले. सदा आणि शिलोत्रीनी शॉक बसल्याप्रमाणे न बोलता आपापल्या घराची वाट धरली.

पुढचा आठवडा खूप गडबडीचा गेला. बाजारात अचानक तुफान तेजी आली आणि सगळ्यांना एकाच वेळी शेअरमध्ये पैसे गुंतवावेसे वाटू लागले होते. सदाच्या कामाचा भार वाढला होता आणि मुसाभाईंची भेट काहीकाळ तो विसरला. माईला खूप बरे वाटेना म्हणून अ‍ॅडमिट केले आणि दोन दिवस ग्लुकोज वर ठेवले. माई हट्ट करून घरी आली. दादाने रजा टाकली होती. शनिवारी चिटणीस घरी आले. दारातूनच चिटणीसांनी गर्जना केली “वहिनी अभिनंदन!” माई आत बिछान्यावर होती. दादा आणि सदा पुढे झाले. चिटणीसानी हातावर पेढ्याचा पुडा ठेवला आणि तोंडासमोर किल्ली नाचवली “ही घ्या तुमच्या फ्लॅटची चावी. तुम्ही लकी आहात कारण तुम्हाला वरचा मजला तर लॉटरीत मिळालाच आहे त्यावर शेजारचा अजून मोकळा आहे. एक मेंबर कमी पडतो म्हणून बँकेबाहेर लिलाव करावयाचा ठरवले आहे. तुम्हाला सदाच्या नावाने घ्यायची संधी आहे. मग कधी जाताय नवीन फ्लॅट बघायला?” दादा पेढे पुढे करत म्हणाला ‘मी काही इतक्यात जाऊ शकत नाही पण सदा जाईल.” विभा खूप उल्हसित आवाजात म्हणाली “मी पण जाऊ?” सदा काही बोलायच्या आताच माईचा ओढलेला आवाज आला “अरे सदा, विभाला पण घेऊन जा घर पाहायला. बिचारी माझ्यामुळे कितीतरी दिवस बाहेर सुद्धा पडली नाही." सदाने विभाकडे पाहून होकारार्थी मान डोलावली “उद्या सकाळी!” दादा म्हणाला “गणपतीचा फोटो घेऊन जा लावायला.”

चिटणीस बोलले “अरे मी निघतो आता आणि सदा उद्या जातोस तर ही शेजारच्या फ्लॅटची चावीपण घे. मला सोमवारी ऑफिसमध्ये मिळाली तरी चालेल.”

विभा जरुरीपेक्षा लवकर घरी आली आणि तिने माईची सारी औषधे नीट ओळीत मांडून माईला पुन्हा पुन्हा कुठले औषध कधी घ्यायचे ते समजून सांगितले. विभा तिच्या सर्वात सुंदर साडीत आली होती. स्टेशनच्या बाहेर पडताच सदाने तिला छान वासाचा गजरा घेऊन दिला आणि मग त्यांनी ऑटो घेतली. इमारतीत कोणीच राहायला आले नव्हते. गेटवर एक रखवालदार होता. दादाचा फ्लॅट वरच्या मजल्यावर होता. फ्लॅट उघडताच नवीनच केलेल्या रंगाचा वास आला. सदाने पुढे जाऊन खिडकी उघडली आणि वार्‍याची छान झुळूक आली. सदा विभाशी बोलण्यासाठी मागे वळला, विभा अगदी जवळ उभी होती. विभाच्या गजर्‍याचा सुगंध धुंद करणारा होता. सदाने विभाला मिठीत घेतले, कित्येक वर्षांचा संयम तुटला आणि त्यांची काया आणि मने एक झाली.

सदाला आणि विभाला शेजारचा फ्लॅट अतिशय आवडला. मधली भिंत काढली तर केवढे मोठ्ठे घर होईल याच्या कल्पनेने विभा प्रफुल्लित झाली पण आपल्या आवाक्याबाहेर आहे हे जाणवताच लगेच हिरमुसली पण झाली. सदा तिला म्हणाला, “पाहीन काही जमते का !”

सदाने मुसाभाईंचा प्रस्ताव मान्य केला आणि तत्परतेने शिलोत्री वीस लाख रुपये घेऊन आला. पैशाबरोबर सदाच्या सहीसाठी काही पेपर सुद्धा. सदाला एवढे पैसे एकत्र पाहून घाम फुटला आणि त्यानी शिलोत्रीला सांगितले “तुम्हीच पहा आता पुढे काय करायचे ते.” शिलोत्रीने काही कागद त्याच्या पुढे केले आणि म्हणाला “सदाभाऊ, हे पेपर जरा सही करा. काही नाही, दोन हुंड्या आहेत पैसे मिळाल्याच्या. मुसाभाई म्हणालेत - एक रसीद तो जरुरी है ना !” सदा या प्रकाराने इतका प्रभावित होता की त्याने निमुटपणे कागदांवर सही केली. शिलोत्री डोळे बारीक करून सदाला म्हणाला “पैसे तुझ्याकडे आहेत म्हणून ठीक, नाहीतर मी म्हणतो की मराठी माणसाने भागीदारी करू नये. अर्थात मुसाभाईचा बिजनेस काही का असू दे, माणूस बरा आहे.”

बाजार तेज होता आणि सदाला एक गोष्ट कळत होती की मोतीवाला खूप हुशारीने शेअरमध्ये गुंतवणूक करत. कितीतरी लोक मोतीवाला कुठल्या शेअरमध्ये गुंतवतात हे जाणून घेण्याची धडपड करत पण किरीट भाईने सर्वाना ताकीद दिली होती की कोण गिर्‍हाईक कुठली गुंतवणूक करते हे दुसर्‍या गिर्‍हाईकाला किंवा बाहेर कुणालाही कळता कामा नये. कालच बिल नेऊन पोचवताना सदाला कळले होते की मोतीवालानी एका “विनटेक” नावाच्या शेअरमध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे. सदा स्वता:शी हसला आणि त्यानी मुसाभाईंनी दिलेले पैसे “विनटेक” मध्ये गुंतवायचा निर्णय घेतला.

शेअर बाजाराची घोड दौड सुरू होती. पैशांचा पाऊस पडत होता. निदान सर्वांना तसा भास होत होता. आजूबाजूची माणसे लाखो आणि कराडोपती झाल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. सगळी कडे शेअर बाजारच्या चर्चा होत होत्या. सदाचे काम खूप वाढले होते. ज्या ज्या गिर्‍हाईकांकडे तो बिल पोचवायला किंवा चेक घ्यायला जाई ते सदाला शेअर गुंतवणुकीत पारंगत आहे असे समजून प्रश्न विचारीत आणि सदा बाजारात ऐकू येत असलेल्या आणि चर्चेत असलेल्या शेअरची नावे सहजपणे उजळत असे. पूर्वी त्याच्याकडे एक डिलीवरी बॉय समजून बोलणारे शेट लोक आता समोर बसवून चहा किंवा थंड पेय देऊ करत व त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत. शिलोत्री मुसाभाईंचे आणखी काही पैसे घेऊन आला. मुसाभाई महिनाभर दुबईला गेले होते. त्यांचा महत्त्वाचा माल दुबईहून येणार होता. सदा शिलोत्रीला म्हणाला “तुम्ही 'हो' म्हणत असाल, तर हे पैसे मी ठाण्याच्या फ्लॅटसाठी भरतो. विनटेक खूप चढला आहे आणि भागीदारीत माझा वाटा आता या पैशांएवढा होईल. नाहीतर फ्लॅट हातचा जाईल.“ शिलोत्री म्हणाला, ‘सदा मी काय सांगणार. हुंडी तू सही केली आहेस आणि तुला फायदा होतोय. त्याचे काय करायचे ते तूच पहा. पण आज आपल्याला ड्रिंक हवे.”

माईचा आजार बळावला होता. डॉक्टरनी तिला टीबी झाल्याचे निदान केले आणि फुफ्फुसे खूप अशक्त आणि निकामी झाल्याची चिंता व्यक्त केली होती. दादा हल्ली म्हातारा झाल्यासारखा दिसत होता. अंगावरचे कपडे त्याला ढगळ झाल्याचे जाणवत होते. अचानक दोन दिवस विभा पण बरी नव्हती. तिला उलट्या होत होत्या. माईने तिला लिंबू सरबत घ्यायला किंवा लिंबाचे लोणचे चाखायला सांगितले. माईला वाटले की विभाला बहुतेक पित्ताचा त्रास होत असावा. विभाला लोणचे खूप आवडत असे. तिने लोणच्याच्या बरणीकडे धाव घेतली.

बाजारात बातमी पसरायला अगदी थोडा वेळ लागला. शेअरच्या किमती अचानक गडगडल्या होत्या. काही शेअर तर विकले पण जात नव्हते. शेवटी बाजारातील पसरलेल्या गोंधळामुळे आणि भीतीमुळे बाजार बंद केला गेला होता. सदा आणि शिलोत्री नुसते गिर्‍हाइकांचे फोन घेण्यात गुंतले होते तेंव्हा मध्ये विभाचा फोन आला.
“केंव्हाची तुला फोन करायचा प्रयत्न करते आहे पण फोन एंगेज येतोय,“ सदा काही बोलायच्या आताच विभा म्हणाली “माईना हाँस्पिटलमध्ये हलवले आहे. आता ऑक्सिजनवर आहेत. मी तिथूनच बोलतेय, लगेच ये.” तो काही बोलायच्या आताच तिने घाईत फोन बंद केला. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये दादा बरोबर गेले होते. माई ऑक्सिजन आणि ग्लुकोजवर होती. डॉक्टरांनी तिच्यात सुधारणा झाल्याचे सांगितले. दादा फारसा बोलत नव्हता. विभा त्यांच्यासाठी डबा आणत होती पण दादाने फारसे काही खाल्ले नाही. तो हल्ली फार कृष दिसायला लागला होता. तिसर्‍या दिवशी संध्याकाळी शिलोत्री हॉस्पिटलमध्ये आला.
“सदा अरे तू ऑफिसमधून अचानक नाहीसा झालास, किती शोधला तुला! घराला पण कुलूप. शेवटी आज विभा भेटली आणि माई हॉस्पिटलमध्ये आहेत ते कळलं. एक फोन नाही का करता आला?" शिलोत्रीचा प्रश्न योग्य होता. शिलोत्री पुढे म्हणाला ‘सदा फार मोठ्ठा गफला झालाय. विनटेक शेअर पुरा कोलमडलाय. त्या कंपनीच्या मालकाला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाली आणि शेअरमध्ये शंभराचे पाच रुपये राहिले. “सदाला दरदरून घाम फुटला आणि त्याच्या घशातून आवाज फुटेना. तो कसाबसा म्हणाला, “पण मोतीवाला ......” शिलोत्री उद्गारला “अरे, ज्या दिवशी बाजार गडगडला त्या दिवशी मोतीवाला सर्व शेअर विकून मोकळा झाला आणि ते सुद्धा फायद्यात!"

सदाच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि तो म्हणाला, “इथे नको, बाहेर हॉटेलमध्ये जाऊन बोलू.”
सदाच्या अवतीभोवतीचे सगळे जग उलटेपालटे झाले होते. पंचवीस लाखांहून अधिक रक्कम हवेत विरून गेली होती. सदाला आयकर ऑफिसरची दोन आठवड्यात भेटायला येण्याची नोटीस खाकी लिफाफ्यात आली होती. मुसाभाई एका आठवड्यात दुबईहून येणार होते. त्यांनी शेअर बाजार गडगडल्याची बातमी ऐकून फोन केला होता पण शिलोत्रीने वेळ मारून नेली होती. आता सदाच्या डोळ्यापुढे काळोखाशिवाय काही नव्हते. आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला.

माईला दोन दिवसांनी घरी आणले. सदाने दादाला किंवा विभाला कसलाही संशय येऊ दिला नव्हता. त्याने आपला राजीनामा ऑफिसमध्ये पाठवून दिला, आपण मुंबई सोडून गावी जात असल्याचे कारण दिले. शिलोत्रीला संध्याकाळी बारमध्ये बोलावले. इतर कोठेही शिलोत्री त्याला भेटेल का नाही याची सदाला शंका होती.

शिलोत्रीने बातमी आणली की ब्रोकर बाटलीवालाने आत्महत्या केली आणि कितीतरी लोक दिवाळखोर झाले. सदाला या बातम्यांमुळे अजिबात दिलासा मिळत नव्हता. तो शिलोत्रीला म्हणाला “मला आत्महत्या करण्याचा धीर होत नाही आणि मी कितीही म्हटले की अगदी कातडी झिजेपर्यंत नोकरी करून मुसाभाईचे पैसे फेडतो तरीही या जन्मी ते शक्य नाही. मी पळून जायचा निर्णय घेतला आहे. किरीटभाईने माझा पासपोर्ट बनवला होता दुबईत इन्व्हेस्टरना भेटायला जाण्यासाठी पण ते एकटेच गेले, आता हाच पासपोर्ट उपयोगी येणार असे दिसते.”

“ पण दादा, माई आणि विभाचे काय?" शिलोत्री नरम आवाजात बोलला .

“आत्तापुरते तरी मी कामासाठी दोन आठवडे बंगलोरला जातो हे सांगून घराबाहेर पडलो आहे. पुढे काय, विभा तिला योग्य असा माणूस पाहून लग्न करेल आणि मला विसरेल. दादा रिटायर होणार आहे तो माईची काळजी घेईल. मला नोकरी मिळालीच तर मी पैसे पाठवेन. आत्ता तरी काही सांगता येत नाही. जर सर्व शांत झाले तर पुढे पाहू." सदा मान खाली घालून म्हणाला पण त्याला त्याच्या बोलण्यातलं फोलपण जाणवलं.

“मला खूप भीती वाटतेय,“ शिलोत्री एका घोटात कडवट पेय घशाखाली घालत म्हणाला “मुसाभाई पोलिसात हुंडीच्या आधाराने फसवणुकीची तक्रार तर करू शकतील पण त्यांचा शिकारी कुत्रा शिर्के तुझ्या मागावर पाठवतील हे नक्की. एवढे मोठे नुकसान ज्यांना शेअर बाजारात फक्त नफा दिसतो त्यांना पचवणे कठीण असते, वर ही डेंजर माणसे. हे लोक बिल्डर आणि फिल्म प्रोड्युसरना देखील सोडत नाहीत." आत्ता पर्यंत सदाने हा सर्व विचार करून झाला होता आणि शिलोत्री काही नवीन विश्लेषण करत नव्हता.

“शिलोत्री, मला तुमची मदत हवी. एक तर प्लीज दादा आणि माईकडे लक्ष ठेवा. पैशांची नाही तरी दादाला आधाराची गरज भासेल. दुसरे म्हणजे, मला कोणता तरी विसा आणि तिकीट करून द्या. मी आता पुण्याला जाऊन एका छोट्या आडवळणाच्या हॉटेलमध्ये लपणार आहे. विसा झाला की अथवा विसा पुरता मी मुंबईला येईन. माझ्यासाठी तुम्ही एवढे करू शकाल?.” सदाने डोळ्यातले येणारे अश्रू न थांबवता शिलोत्रीच्या पायांना स्पर्श केला.

त्यानंतर दोन आठवडे निघून गेले. शिलोत्रीने खरच खूप धडपड करून आणि ओळख वापरून त्याला विसा आणि तिकीट करून दिले होते. सदा न्यूयॉर्कला चालला होता आणि त्याला विमानतळावर अंधारातच निरोप देताना शिलोत्रीने सांगितले की शिलोत्रीची नोकरी गेली होती आणि सदावर अटकेचे वॉरंट नुकतेच जारी झाले होते आणि पोलीस त्याचा लवकरच सगळीकडे शोध घ्यायला लागण्याची शक्यता होती. वॉरंटमुळे आता घरी सर्व कळणार या विचारामुळे दादा किंवा विभाला फोन करण्याचा विचार त्याने दूर सारला.

विमानाने टच डाऊन केले आणि सदा भानावर आला. विमानाच्या ब्रेकचा आवाज त्याला खूप कर्कश वाटला. त्याच्याकडे फक्त केबिन बॅग होती त्यामुळे बाहेर पडायला फक्त इमिग्रेशनमध्ये जो वेळ लागेल तेवढाच.

अमेरिकेत उतरल्यानंतर त्याची चौदा वर्षे कशी गेली हे त्यालाच माहीत होते. त्याचा हा अनुभव एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा होता. न्यूयॉर्कच्या विमानात त्याची ओळख शेजारी बसलेल्या हरिदासानींशी झाली होती. अमेरिकेत तो नोकरीच्या शोधात जात आहे हे सहजगत्या कळल्यावर हरिदासानींनी त्याला दुसरे काही न विचारता नोकरीची ऑफर दिली होती. न्यूयॉर्कला उतरल्यावर हरिदासानींनी सदाचे तिकीट काढले आणि ते दोघे दुसर्‍या विमानात बसून रवाना झाले. सदाला आपण कुठे जात आहोत हे पण माहीत नव्हते, पिट्सबर्गला पोचून हरिदासानींच्या गाडीत बसल्यावर त्याला कळले पण त्याला काही फरक पडत नव्हता. हरिदासानींचे एक दुकान होते ज्याला अमेरिकेत ग्रोसरी स्टोर म्हणत. पोहोचताच हरिदासानींनी त्याचा पासपोर्ट मागून घेतला. ते म्हणाले “इथल्या लोकल ऑफिसरला दाखवायचींगरज पडू शकते." सदाचे नरकातले वास्तव्य तेथेच सुरू झाले.

advs 1.1 - Mul kalpanaa net_f.jpg

दुकानाच्या मागच्या बाजूला एक अडगळीची जागा होती ती त्याला मिळाली . सदाने तेथेच साफसफाई करून आपल्या झोपण्याची व्यवस्था केली. दोन वेळचे हरिदासानीच्या घरातून आलेले जेवण आणि बारा तास दुकानात श्रम हेच त्याचे काही वर्षे जीवन होते . त्याच्या सारखी आणखी दोन माणसे दुकानात होती पण ती अशिक्षित होती. पहिल्या दिवशीच सदाचा सँडी डेव झाला होता आणि काही दिवसातच तो एक बेकायदेशीर रहिवासी म्हणून इतर अनेक देशातील असंख्य माणसांप्रमाणे अमेरिकेत चकार शब्द न काढता राहू लागला.

सदा पहिले काही आठवडे त्याच्यावर ओढलेल्या आपत्तीने इतका भांबावून गेला होता की हरिदासानींच्या तुरुंगावजा दुकानाचा त्याला आधार वाटू लागला होता. हरिदासानींची त्याच्यावर बारीक नजर होती त्यामुळे त्याला कामाशिवाय कोणतेही स्वातंत्र्य घेणे शक्य नव्हते पण जेंव्हा ते बाहेगावी गेले तेव्हा त्यांच्या बायकोच्या अपरोक्ष सदाने मुंबईला शानभागांकडे फोन केला आणि सदाचा मित्र म्हणून चौकशी केली तेव्हा त्याला माई वारल्याचे कळले. सदाला अतिशय दु:ख आणि आपण केलेल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप झाला. विभा गोव्याला आईकडे गेल्याचे कळले आणि सदाला पोलीस शोधताहेत व तो फरारी आहे ही वरची बातमी शानभागकाकूनं आपणहून सांगितली. सदाचे विश्व उध्वस्त झाले होते आणि आता मागे फिरून पाहण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. आपल्या वागण्याची सदाला घृणा आली. माईची आणि दादाची सेवा करण्याऐवजी आपण माईच्या मृत्यूला नाही तरी मृत्यू लवकर ओढवण्यास जबाबदार आहोत हे सदाला कळत होते. ज्या दादानी त्याच्यासाठी त्याग केला आणि मुलासारखे वाढवले त्याला उतारवयात सुख देण्याऐवजी अपमान आणि मनस्ताप दिला याची सदाला शरम वाटत होती. विभा - जी त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती तिला उघड्यावर टाकून आपण पळपुट्यासारखे सोडून आलो अशा लाजिरवाण्या भावनेने सदाला रडू फुटले.

वर्षे निघून गेली होती आणि सदा रोडावला होता, डोक्यावरचे केस कमी झाले होते आणि तो जरुरीपुरते बोलत असे. हरिदासानींकडे त्याचे खुपच हाल झाले. त्यांच्या घरचे उरलेले अन्न खाऊन आणि बारा ते चौदा तास शारीरिक काम करून त्याचे मन आणि शरीर सुन्न झाले होते. पण अचानक एक दिवस जेंव्हा हरिदासानींच्या बायकोने शिवीगाळ करत हातातली वस्तू फेकून त्याला मारली तेव्हा तो तडक बाहेर पडला आणि दिशाहीनपणे भटकू लागला होता. काही दिवस कधी गॅस स्टेशनवर तर कधी दुकानातून कामे केल्यावर त्याच्या हाती गुजराती पत्रिका लागली होती आणि त्यात एका डॉक्टरला गुजराती जाणणारा सहाय्यक हवा अशी जाहिरात होती. सदाने शिकागोला जाणारी ग्रेहाऊंड बस घेतली आणि डॉक्टर मयंक पटेल यांच्या कडे येऊन पोहोचला.

डॉक्टर मयंक पटेल व्हील चेअरवर बसून बाहेर आले आणि त्यांच्या पत्नी गीताबेन - ज्यांचे नाव त्याला नंतर कळले - त्यांच्या बरोबर होत्या. त्या दोघांना पाहून सदाला दादा आणि माईची आठवण झाली होती. दोन तीन जुजबी प्रश्न गुजरातीत विचारून डॉक्टर पटेलनी त्याला ताबडतोब ठेऊन घेतले. त्यांचे घर एका मोठ्या प्रॉपर्टीवर होते. डॉक्टर पटेल सदाहून दहा बारा वर्षांनी तरी मोठे असावेत. त्यांना पूर्ण टक्कल होते आणि डोळ्यावर गांधीजी घालत तसा चष्मा होता. त्यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांचे कमरेखालील शरीर अचेतन झाले होते. डॉक्टर पटेल वेरावळहून एक शिकाऊ डॉक्टर म्हणून शिकागोला आले. त्यांच्या पत्नी गीताबेन पण त्यांच्या बरोबर होत्या. गीताबेनना गुजराती सोडून दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. त्या दोघांना मुलबाळ झाले नाही. डॉक्टर पटेल त्यांना अर्धांगवायू होई पर्यंत एक मोठे नावाजलेले डॉक्टर होते. सदाला त्यांची माहिती हळूहळू कळत गेली. गीताबेन स्वतः जेवण बनवत आणि डॉक्टरांना खाऊ घालत. या व्यतिरिक्त बाकी सारी घराची जबाबदारी सदावर पडली होती. संध्याकाळी डॉक्टरांना फिरवून आणायला लागे. फोन घेण्यापासून हिवाळ्यात बर्फ काढण्याची गाडी फिरवणे आणि उन्हाळ्यात लॉनवरील गवत शेकरणे या सर्व गोष्टी सदाने ताब्यात घेतल्या होत्या. आठवड्याला कार गॅरेजमधून बाहेर काढून तो ग्रोसरी स्टोअरला जात असे. सदाच्या न कळत तो दादा आणि माईच्या न केलेल्या सेवेची उणीव तो डॉक्टर पटेल आणि गीताबेन यांच्या सेवेने भरून काढू लागला होता. “सदाभाई“ला सुद्धा डॉक्टर पटेल आणि गीताबेन आपला मानू लागले आणि कालांतराने जशी डॉक्टर पटेल यांची प्रकृती खालावत गेली तसे सदाभाईकडे त्यांचे बँकेचे काम आणि आर्थिक व्यवहारपण आले.

मुंबईला परतण्याचा विचार सदाने केंव्हाच सोडून दिला होता. मुंबईत दादा शिवाय आता कोणी राहिले नव्हते आणि तो परत जाऊन तरी मनस्तापाशिवाय दादाला काय देणार होता? तरीही त्याला विभा, दादा आणि माईची आठवण आल्याशिवाय एकाही दिवस गेला नाही. दर दिवाळीला तो एक भेट कार्ड सँडी डेवच्या नावाने घरी पाठवत असे. त्यावर सँडी डेवचा शिकागोतील पत्ता आणि फोन नंबर लिहिलेला असे. का कोण जाणे त्याला अंधुक अशी आशा वाटे की जर विभा दादाची चौकशी करायला घरी आलीच आणि तिला हे कार्ड मिळाले तर ती सँडी डेव हे नाव पाहून त्याचे उत्तर देईल अथवा फोन करेल. पण त्यालाच या अतिरंजित कल्पनेचे हसू येई. विभा आता खूप दूर गेली असेल. तिचे लग्न होऊन ती आपल्या कुटुंबात सुखी असेल आणि दादाला हा सँडी डेव कोण हे कळणार पण नाही या विचारांनी तो निराश सुद्धा होई. पण अचानक दोन दिवसांपूर्वी त्याला फोन आला होता आणि फोनवरून एका स्त्रीने सँडी डेव आहेत का असा मराठीत प्रश्न विचारला होता. सदा आवाज ऐकून स्तब्ध झाला आणि त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेत पडला “ विभा!"

कितीतरी पळ आणि युगे त्या स्तब्धतेत गेली असतील असे सदाला वाटले पण तरीही इतक्या वर्षांच्या ताटातुटी नंतरसुद्धा त्याला विभा जवळच उभी आहे असे वाटले. त्याची तंद्री विभाच्या हुंदक्याने भंग पावली. तो एका अपराध्यासारखा गप्प होता आणि त्याच्याकडे कोणतीच सफाई नव्हती. त्याला विभाचा रडवेला आवाज ऐकू आला “सदा, दादा गेले आम्हाला सोडून!” आणि विभा हमसाहमशी रडू लागली. सदाच्या डोळ्यातून मूक अश्रू ओघळू लागले.

भावनांना थोडा आवर घालून विभाने थोडक्यात सांगितले की दादा संध्याकाळी गेले आणि सर्वजण अग्नी द्यायला भाऊमामा येण्याची वाट पाहत आहेत. सदाने “मी येतोय,” एवढेच उद्गार काढले होते आणि परत परत येण्याऱ्या हुंदक्यांना आवरताना विभाने फोन बंद केला होता. सदाने एक केबिन बॅग भरली आणि खिशात पैसे टाकून आणि डॉक्टर पटेल यांचा पासपोर्ट घेऊन तो घरा बाहेर पडला. जाताना गीताबेनला आपला एक जुना मित्र भारतातून न्यूयॉर्कला येत आहे आणि त्याला भेटायला आपण जात आहोत असे सांगितले. गीताबेननी विचारल्यावर आठ एक दिवसात परत येईन असे सांगितले. गीताबेनचे समाधान झाले का नाही हे पाहण्यासाठी सुद्धा तो थबकला नाही.

सदाने एअरपोर्टवर जाऊन प्रथम वॉशरूममध्ये डोक्यावरचे उरलेसुरले केस भादरले आणि डॉक्टर पटेल यांचा गोल चष्मा घातला. अंगावर त्यांचाच सुट चढवला आणि आरशात पाहिले. डॉक्टर मयंक पटेल सदा एवढे गोरे नव्हते पण त्यांच्या पासपोर्टवरील जुन्या फोटोत हा फरक कळणे शक्य नव्हते. सदाचे समाधान झाले. त्याची पहिली परीक्षा न्यूयॉर्कमध्येच इमिग्रेशन चेकला होती या विचाराने त्याला अकारण थोडा धीर आला.
मुंबईत तर त्याला इमिग्रेशनमधून बाहेर पडायला काहीच अडचण आली नाही. ऑफिसरने एक क्षण त्याच्याकडे पाहिले आणि आणि हिंदीत विचारले “ छुट्टी मनाने आये हैं?” त्यावर तो गुजरातीत उद्गारला “मेडिकल कॉन्फरंसमाटे टॉक छे”.

सदाने त्याचा पासपोर्ट परत घ्यायच्या अगोदरच ऑफिसर त्याला विसरून रांगेतील पुढच्या माणसाकडे पाहत होता.

टॅक्सीत बसल्यावर त्याला वास्तवाची जाणीव विजेच्या झटका बसल्या प्रमाणे झाली. चौदा वर्षात मुंबई बदलली होती. एअरपोर्ट, रस्त्यावरच्या नवीन गाड्यांची गर्दी सगळे कसे अमेरिकेप्रमाणे होते. त्याच्या मनात विचार आला, माणसे सुद्धा बदलली असतील का? रस्त्यावर इतक्या रात्री सुद्धा वर्दळ होती, सर्व ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई केली होती, सदाने टॅक्सीड्रायव्हरला पत्ता सांगितला आणि विचारले किती वेळ लागेल पोहोचायला तेंव्हा उत्तर आले, ‘साहब, पैंतालीस मिनट तो जरूर लग जायेंगे! “

सदाने टॅक्सी चाळी समोरच्या गल्लीत थांबवली आणि त्याची एकुलती बॅग घेऊन तो टँक्सीतून उतरला. चौदा वर्षांच्या अज्ञातवासानंतर सदा आपल्या घरी परत आला होता. त्याच्या जन्मापासूनच्या सार्‍या आठवणी या चाळीशी निगडीत होत्या. त्याने आशाळभूतपणे वर पहिले, आळीत माई त्याची वाट पाहत उभी असलेली दिसते का!

जवळजवळ साडेअकरा वाजत आले होते आणि चाळीत सामसूम होती. एकाच प्रकारचे लाल कंदील प्रत्येक मजल्याच्या आळीत लावल्याने चाळ उठून दिसत होती. खाली रस्यावर काही तरुण मुले गप्पा मारत बसली होती पण कोणी त्याला ओळखणे शक्य नव्हते. सदा जिना चढून वर गेला. कंदिलाच्या लाल प्रकाशात प्रत्येक घराचे दरवाजे उजळून निघाले होते. तो आपल्या घराच्या दरवाज्यापुढे येऊन थबकला. घरात कोणी असेल का आणि दरवाजा कोण उघडेल याचा त्याने अंदाज बांधायचा प्रयत्न केला पण त्याच्या ध्यानी भाऊमामा व्यतिरिक्त कोणी येईना. त्याला क्षणभर वाटले की प्रथम वरच्या मजल्यावर विभाच्या घरी जावे पण रात्र खूप झाली होती. त्याच्या मनात विचार आला की भाऊमामा आता खूप म्हातारा झाला असेल आणि त्याला ओळखणार पण नाही. वर विभा शिवाय तो येण्याची शक्यता कोणाला माहीत असणारही नाही!’ धीर करून त्याने दरवाजा ठोठावला. सदाला फार काळ वाट पाहायला लागली नाही, दरवाजा उघडला आणि सदा चौदा वर्षा नंतर विभासमोर उभा होता.

सदाला अज्ञातवासाच्या काळात माई, विभा आणि दादाची आठवण जरी न चुकता येई तरी त्यांच्या प्रतिमा धूसर होत गेल्या होत्या. विभाची खूण म्हणून तिचे विस्मयतेने त्याच्याकडे पाहणारे काळेभोर डोळे त्याच्या मनाच्या पटलावर येत आणि त्या डोळ्यांचे आपण अक्षम्य अपराधी आहोत ही लाजिरवाणी भावना त्याला वाटून तो त्या डोळ्यांपासून दूर होत असे. आणि आता त्याच्यासमोर तेच डोळे प्रश्न चिन्ह घेऊन उभे होते.

“कोण हवंय तुम्हाला? “ विभाने प्रश्न केला. तिच्या विस्कटलेल्या केसात पांढरे केस कंदिलाच्या उजेडात ठळकपणे दिसत होते. पण ती विभाच होती. सदाचा घसा दाटून आला. मग त्याच्या लक्षात आले की त्याच्या चेहेर्‍यावर अंधार आहे. त्याने चष्मा काढला आणि एक पाउल पुढे टाकले. “विभा, मी सदा!" एका क्षणात विभाच्या डोळ्यात त्याला ओळख दिसली. विभाने हुंदका पदराने आवरत सदाला वाट दिली आणि तो आत शिरला. विभाने त्याला खुर्चीवर बसायची खूण केली. समोर भिंतीला टेकून दादाचा फोटो होता. फोटोला फुलांचा हार आणि बाजूला समई पेटवली होती. “दादा किती म्हातारा आणि कृष दिसतोय,” सदाच्या मनात आले.

“अंत्यसंस्कार परवाच उरकला." विभा हळू आवाजात बोलली “भाऊमामा थांबायला तयार नव्हते. त्यांचा तुझ्यावर खूप राग आहे."
“मी समजू शकतो." सदा अपराधी माणसा सारखा बोलला.
“अक्षयने अग्नी दिला” विभा म्हणाली “त्याची गेल्याच वर्षी मुंज झाली, भाऊमामानी केली.”
“अक्षय?” सदाच्या तोंडून न कळत बाहेर पडले.
“अरे हो, एक मिनिट थांब, मी अक्षयला उठवते!" विभा तो बोलायच्या आतच खोलीत गेली. थोड्या वेळाने तिच्या पाठीमागे अक्षय आला. झोपेतून उठवल्यामुळे अक्षय डोळे चोळत होता. विभा म्हणाली “राजा, मोठयांना नमस्कार करायचा असतो!" अक्षयने सदाकडे न पाहता त्याला वाकून नमस्कार केला. सदा आशीर्वाद द्यायची रीत सुद्धा विसरला होता पण लक्षात आल्यावर घाईने तो म्हणाला “शतायुषी भव!" अक्षयने झोपण्यासाठी आतल्या खोलीत पळ काढला.

“आपल्याच शाळेत जातो, विद्यामंदिरमध्ये. आठवीत आहे. वर्गात पहिला येतो!" विभा कौतुकाने बोलली “दादा नेहमी म्हणत, सदाहून हुशार निघणार आणि खूप शिकणार.” विभाला हुंदका अनावर झाला आणि ती रडू लागली.

सदाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला त्याच क्षणी जीव द्यावा असे वाटले. तो अतिशय कमकुवत स्वरात बोलला “पण मी अमेरिकेहून फोन केला तेंव्हा तू गोव्याला आईकडे गेल्याचे कळले आणि मी पूर्ण निराश झालो.” सदाच्या बोलण्यात आता कुठलाच आत्मविश्वास उरला नव्हता. त्याला अतिशय मोठी चूक केल्याचे ध्यानात आले होते.

“ हो!" विभा म्हणाली “ तू अचानक निघून गेल्यावर मी घाबरून गेले आणि माईना सर्व काही सांगितले. माई स्वतःच खूप खचलेल्या होत्या पण त्यांनी धीर करून भाऊ मामाला बोलावले. तुझा फोटो आणि सुपारी पाटावर ठेऊन भाऊ मामाने आपले लग्न लावले आणि कागद तयार केले म्हणून अक्षयला वडिलांचे नाव तरी मिळाले आणि मला ....” परत विभाला रडू अनावर झाले.

“माझे दुर्भाग्य की माई गेल्या तेंव्हा मी त्यांच्या उशाशी नव्हते, पण आईला या सर्व गोष्टींची कल्पना नाही. तिला वाटले की माईच्या प्रकृतीमुळे आपण रजिस्टर लग्न केले.”

एवढ्यात दारावर थाप आली आणि विभा दार उघडायला पुढे झाली. डोळे पदराने टिपून तिने दार उघडले तेव्हा दारात पोलीस गणवेशातील अधिकारी उभा होता. आत पाउल टाकून तो म्हणाला “मिसेस देव, मी इन्स्पेक्टर वेर्णेकर मीच तुमचा कॉल घेतला होता आणि दोन दिवस वॉच ठेऊन होतो. हेच का ते मिस्टर देव?"
सदाला आणखी एक धक्का बसायचा होता. तो पुटपुटला “विभा तू?"

विभा म्हणाली “हो सदा, मीच इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला की तू येण्याची शक्यता आहे. सदा, आता तुझ्या शिवाय मी आणि अक्षय जगू शकत नाही. आतापर्यंत दादांनी धीर दिला पण ते सुद्धा या जगात राहिले नाहीत. आम्हाला तू आहेस तसा पाहिजे आहेस आणि मी तर तुझ्यावर निस्सीम प्रेम केलयं. आम्ही तुझी वाट पाहू, आपण पुन्हा एकत्र येऊ. यापेक्षा आणखी मला काही नको. मला भीती वाटत होती की तू पोलीसांच्या भीतीने परत निघून जाशील." विभाला पुन्हा रडू फुटले.

“चला मिस्टर देव,“ इन्स्पेक्टर वेर्णेकर म्हणाले. सदाने आपला पासपोर्ट पुढे केला तो चाळून सदाला परत देताना इन्स्पेक्टर वेर्णेकर समजुतीच्या स्वरात बोलले “साहेब, मी तुम्हाला अटक करण्याचे नवीन वारंट घेऊन आलो आहे. तुमच्यावर आणखी एका नवीन गुन्ह्याची नोंद करायला मला भाग पाडू नका. जर तुम्हाला खोटा पासपोर्ट दाखवायचा असेल तर तो कोर्टात दाखवा पण मला खात्री आहे की अशी घोडचूक पुन्हा तुम्ही करणार नाही. तुम्हाला ओळखणारे आणखी साक्षीदार आहेत.“

इन्स्पेक्टर वेर्णेकरांनी हाक मारली, “मुसाभाई, पुढे या."
दरवाज्यातून मुसाभाई आणि शिर्के डोकावले. मुसाभाई खूप वयस्कर दिसत होते. ते म्हणले “काय सदाभाऊ, खूप वेगळे दिसायला लागले अमेरिकेला गेल्यावर?” सदाने मुसाभाईंना नमस्कार केला आणि इन्स्पेक्टर वेर्णेकरांना तो म्हणाला “चला इन्स्पेक्टर साहेब. रात्र खूप झाली आहे. तुम्हा लोकांना तिष्ठत ठेवणे योग्य नाही.”

विभाकडे पाहून सदा हसून बोलला “विभा, येतो मी. अक्षयला माझ्यातर्फे दिवाळीची भेट घे. हो आणि दादा गेला असला तरी त्याला त्याच्या मनासारखे फटाके वाजवू दे. दादाला बरे वाटेल."

अचानक जुना सदा पाहून तिच्या नकळत विभाच्या चेहेर्‍यावर एक मंद स्मित उमटलं आणि तिच्या मनावरचं सारं मळभ दूर झालं.

सदा पोलीस जीपमध्ये बसला तेंव्हा त्याला रात्र दिव्यांनी उजळून निघाल्यासारखी वाटली आणि त्याच्याही मनावरचे कित्येक वर्षांचे दडपण जाऊन कसल्यातरी जोखडातून मुक्त झाल्याची भावना त्याला झाली.

- प्रकाश कर्णिक

प्रतिसाद

आवडली

छान आहे.

छान, आवडली.

थोडी फिल्मी झाली आहे. पण तुमची पात्रे नेहमी लक्षात राहतात.

अत्यंत वेधक कथा. उत्तम पात्रयोजना. प्रगल्भ लेखन. मध्यंतरीचा बारमधील शिलोत्री, सदा, व मुसा यांचा भाग कंटाळवाणा वाटला पण एरवी कथासूत्र वेगवान. विभा, माई, व दादा, सदा, ही पात्रे उठावदार झाली आहेत. कथालेखन उच्च दर्जाचे. संपादक व लेखक यांचे खास अभिनंदन.

कथा मनाला चटका लावून जाणारी आहे आणि शेवट ह्रुदयस्पर्शी झाला आहे. खूप आवडली.

विलक्षण आहे गोष्ट . आवडली. शेवट चांगला केला आहे. :)

छान आहे. आवडली :)

शेवट खास केलाय.. :)

आवडली

दीर्घकथा म्हणावी एवढी मोठी झाली आहे पण कुठेही कटाळ्वाणी होत नाही. वाचनीय व दिवाळी अंकात शोभेल अशी कथा.

आवडली..

सुरुवातः
पात्रांच्या प्रस्तावनेत बराच वेळ लागला. रिझर्व कोट्याचा शेरा कळला नाही.

मध्यंतरः
खुपच प्रेडिक्टेबल वाटले.
शेअर बाजारतली तेजी, मुसाचे काळे धंदे आणि त्यातला पैसा, मग शेअर बाजारातला क्रॅश.
शेअर बाजाराचा बागुलबुवा परत एकदा उभा केल्यासारखे वाटले.

शेवटः
एक आदर्शवादी शेवट केल्यासारखा वाटला .

आपला प्रतिसाद मुद्देसूद वाटला. धन्यवाद.
सर्व वाचकांचे कथा वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
प्रकाश कर्णिक

छान आहे.. आवडली.

छान आहे .. एकदम मताठमोळी ..

शेअरबाजार कोसळण्याचा भाग प्रेडिक्टेबल होता. सदाला अमेरिकेत जाऊन काही करता आले नाही, असे वाटले. शेवट प्रयत्नपूर्वक केल्यासारखे वाटले. कथेपेक्षा कथानक वाटले.

कथा आवडली.

या कथेत दाखवलेला काळ तसा जुना आहे. म्हणजे चाळी, नाकासमोरुन चालणारे लोक, साडी नेसुन कॉलेजला जाणे वगैरे.
इथे हे लिहायचे कारण म्हणजे तसेच गुप्तहेर या कथेच्या बाबतीतही वाटले होते.

हो. आपलं निरिक्शण अगदी योग्य आहे. लिहिताना सुद्धा माझ्या नकळत झालं. माझी "संशयित" ही नविन दीर्घकथा वाचुन या कथेच्या पिरिअड बद्दल काय वाटत ते जरुर लिहा.

very nice story, i used to read diwali ankh long long time back and after 12 yrs reading the stories made me feel nostalgic, thanks for keeping the same high standards. good job everybody.