तू जपून टाक पाऊल जरा

तू जपून टाक पाऊल जरा, जीवनातल्या मुशाफिरा ॥ ध्रु ॥

हवे तुला ते नच तुजपाशी, मिळे न ते का व्यर्थ धुंडिशी
गांठ अखेरिस यमाबरोबर, भुलू नको हा मंत्र जरा ॥ १ ॥

पापपुण्य जे करशिल जगती, चित्रगुप्त मागेल पावती
पापाइतुके माप ओतुनी, जे केले ते तसे भरा ॥ २ ॥

जीवन सुखदु:खाची जाळी, त्यात लटकले मानव कोळी
एकाने दुसर्‍यास गिळावे, हाच जगाचा न्याय खरा ॥ ३ ॥

अथांग सागर अवती भवती, सौख्य शोक दों तीरावरती
तुला हवे ते जया दिशेने, उचल टाक पाऊल जरा ॥ ४ ॥

चौर्‍यांचीच्या पडल्या गाठी, बालक होतिल जरठ शेवटी
तारुण्याच्या उन्मादाने, विसरतोस का तुझी जरा ॥ ५ ॥

हवास तोवर तुला जवळतिल, गरज संपता दूर लोटतिल
ओळखून ही रीत जगाची, रहा जवळ लांबून जरा ॥ ६ ॥

दानव जगती मानव झाला, देवाचाही दगड बनवला
कॊण कोठला तू तर पामर, चुकुन तुझा करतील चुरा ॥ ७ ॥

निरोप जेव्हा येइल वरचा, तेव्हा होशिल सर्वाघरचा
तोवर तू या रिपू जगाचा, चुकवुनि मुख दे तोंड जरा ॥ ८ ॥

मृगजळॆ सगळे तुझिया पुढती, तहानला तू तयामागुती
पाण्यातच तू पाण्यावाचुन, व्याकुळ रे होशिल पुरा ॥ ९ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

आज सकाळी हे गाणे ऐकले ...जीवनाचे अगदी यथार्थ वर्णन करणारे ...........
भालजींच्या स्वर्गीय आवाजातली अवीट गोडी आणि अनामिक जादू निराळीच !