नाट्यगीत

चांदण्याची रोषणाई मी कधी ना पाहते

चांदण्याची रोषणाई मी कधी ना पाहते
मी सुधेच्या सागरी त्या, नाहते, पण नाहते

मी न बघते आमराई, फुलवरा चैत्रातला
कोकिळेचे गीत, पण, मी काळजाने ऐकते

रंग-रेषा ताटव्यांतील, पारख्या सार्‍या मला
मोहिनी गंधातुनी ती, जीवनावर वाहते

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चांद भरली रात आहे

चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्‍याच्या पाकळ्यांची मख्मली बरसात आहे

मंद वाहे गंध वारा, दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातून जीवनौका जात आहे

ना तमा आता तमाची, वादळाची वा धुक्याची
आजला हातांत माझ्या साजणाचा हात आहे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जय शंकरा गंगाधरा

जय शंकरा, गंगाधरा
गौरीहरा गिरिजावरा
विपदा हरा शशीशेखरा ||धृ.||

विष प्राशुनी जगतास या
दिधली सुधा करुणाकरा ||१||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जय गंगे भागीरथी

जय गंगे भागीरथी
हर गंगे भागीरथी
चिदानंद शीव सुंदरतेची
पावनतेची तू मूर्ती ||धृ.||

जगदाधारा तव जलधारा
अमृत मधुरा कांतीमती
शंकर शंकर जय शीवशंकर
लहरी लहरी त्या निनादती ||१||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नको विसरू संकेत मीलनाचा

नको विसरू संकेत मीलनाचा
तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा

दिवस मावळता धाव किनार्‍याशी
तुझे चिंतन मी करीन तो मनाशी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देवाघरचे ज्ञात कुणाला

देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम
कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम

मी निष्कांचन निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

या इथे जाहला संगम दो सरितांचा
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
सहवास संपता डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घाई नको बाई अशी

घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला
देते जलसंजीवन बंधुजीव आसुसला
नको नको घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला

कळे न काही आज असा का अशोक हिरमुसला
थांब जरा मंदारा, विसरले न मी तुला
नको नको घाई नको...

पिऊनी चांदणेसरात चांदरात ओसरता
खुणावित मधुनलिनी बोलविती हळुच मला
नको नको घाई नको...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निघाले आज तिकडच्या घरी

निघाले आज तिकडच्या घरी ॥ ध्रु ॥

एकदांच मज कुशीत घेई, पुसुनि लोचने आई
तुझी लाडकी लेक आपुले, घरकुल सोडुनि जाई
तव मायेचा स्पर्श मागते, अनंत जन्मांतरी ॥ १ ॥

पडते पाया तुमच्या बाबा, काय मागणे मागू ?
तुम्हीच मज आधार केवढा, कसे कुणाला सांगू
या छत्राच्या छायेखालुन सातपावली करी ॥ २ ॥

येते भाऊ, विसर आजवर, जे काही बोलले
नव्हती आई, तरिही थोडी रागावुन वागले
थकले अपुले बाबा आता, एकच चिंता उरी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

उठी उठी गोपाला

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला

पूर्व दिशेला गुलाल उधळुन, ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि, अवघे गोधन गेले यमुनेला

धूप दीप नैवेद्य असा हा षडोपचार चालला
रांगोळ्यानी सडे सजविले, रस्त्यारस्त्यातून

सान पाउली वाजति पैंजण छुन छुन्न छुन छुन
कुठे मंदिरी ऐकू येते, टाळांची किणकिण

एकतानता कुठे लाविते एकतारिची धून
निसर्गमानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला

राजद्वारी घडे चौघडा शुभ:काल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: