देणे तुझे ...

नको देऊ आणा-भाका नको शपथा वचने
मागितल्या विना मिळाले ते जपायचे आनंदाने

आनंदाने मन भरे नाही विषादाची छाया
गंधकोष प्रफुल्लित तूच दिला रिझवाया

रिझवाया सांजवेळी गाती स्मृतींची पाखरे
तुझ्या वस्तीतून आले सप्तरंगी भास सारे

भास सारे नक्षत्रांचे नभी रेखिती रांगोळी
तुझ्या नावे गुंफियल्या लक्ष मोतियांच्या ओळी

ओळी उतरल्या पानी दव रोमांच अधरी
रान तमाचे उजळी तुझा फुलोरा केशरी

केशरात हळदून पुन्हा उमलावे वाटे
कनकाचा साज तुझा ल्यावा एकदा पहाटे

पहाटेस फुलायचा माझा अपुरा प्रयास
नजरेत हासू तुझ्या, कानी हळू बोललास

बोलसी तू, "रातराणी ! सखे आता मिटायाचे
प्राक्तनात लिहीले जे तेवढेच मिळायाचे"

2013_HDA-Rangoli-denetujhe.jpg

- रूपाली परांजपे

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

छान कविता आणि छान फोटो!

रातराणीचं मनोगत इतक्या सुंदर शब्दात , कवितेच्या आकृतीबंधात ! खूप आवडली कविता.

छानच.

शेवटच्या ३ द्वीपदी विशेष.

छान आहे. आवडली

छानच कविता.

केशरात हळदून पुन्हा उमलावे वाटे
कनकाचा साज तुझा ल्यावा एकदा पहाटे
-- ह्यातील रंग आणि कल्पनासंगती आवडली.
सुंदर कविता!
जयन्ता५२

एकच नंबर् !!

रातराणीचं मनोगत इतक्या सुंदर शब्दात , कवितेच्या आकृतीबंधात ! >>+1

ओळी उतरल्या पानी दव रोमांच अधरी
रान तमाचे उजळी तुझा फुलोरा केशरी >>> क्या बात है..

फारच सुरेख कविता .....