चुळूकझुळूक आवाजानं तिला जाग आली. पत्र्याच्या भिंती, छत आणि दारसुद्धा पत्र्याचंच. तिनं हात कडीजवळ नेला, तसा तिच्या आरपार पसरलेल्या एकटेपणात खडखडाट झाला. थरथरत्या हातानं तिनं दार उघडलं. वयाच्या ओझ्यानं वाकलेलं शरीर हातातल्या काठीनं तोलत ती बाहेर आली. गार वार्यानं तिच्या सुरकुतलेल्या कातडीवर टिंबांची नक्षी भरली होती. अंगावरच्या धुडक्यासोबत केसांची चांदी सावरत आभाळभर पसरलेल्या देवांना तिनं नमस्कार केला.
"बाई सकाळं सकाळं माहा झाडण्याचा पाटं
माह्या दारावून जाते सुर्व्यादेवाची गं वाटं "
वर्षानुवर्षं घोकलेली जात्यावरची ओवी गात ती अंगणात आली. दिवसभरात अशा कितीतरी ओव्या ती नकळत म्हणून जायची. आयुष्याच्या जात्यालाही गाण्याची सोबत असली की अवघड क्षणांचंही हसत पीठ करता येतं.
"उठलीस गोदाई?" शेजारच्या अंगणात सडा घालणार्या सरस्वतीनं तिला विचारलं.
कधीकधी आत इतकी वादळं असतात की बाहेरची कुठली झुळूक जाणवतसुद्धा नाही. सरस्वतीचा प्रश्न गोदाईच्या कानावर आदळून तसाच अंगणात विरून गेला. या अंगणात असे असंख्य प्रश्न होते. कधीमधीच एखादं उत्तर खळकन तिच्या पापण्यांतून अंगणात ओघळायचं. नाहीतर सगळे प्रश्न तसेच...
तिच्या आयुष्यासारखे... उत्तराच्या प्रतीक्षेत.
"माझंबी आंगान उसं वलं कर ओ माय", बराच वेळ उभं राहून ती सरस्वतीला म्हणाली.
"हे काय सांगाय हवं, तू उल्शी बा़जूला सर, आत्ता टाकते."
"सनामधी सनं बाई, दिवाळीचा आगुचरं
राहू दिला नाई कुटं सांदी कोपर्याला केरं"
अजून एक ओवी झोकून गोदाई चटकन बाजूला सरकली. सरस्वतीनं तिच्याही अंगणात सडा घालण्यास सुरूवात केली. गाईच्या शेणाचा दरवळ मातीत झिरपू लागला.रखरखीत वाळवंटात कधीतरी पावसाची सर बरसावी आणि वाळूचा कणकण जन्माची तृषा भागवण्यासाठी आतूर व्हावा तसं आसुसून माती शिंपण अंगावर घेत होती.
रंगागंधात माखलेली दिवाळीची ती पहिली पहाट. गोदाईनं अशा कितीतरी दिवाळ्या अनुभवल्या होत्या. खरंतर दिवाळी प्रत्येक वेळी वेगळी, पण तिला कशाचंच नवल नव्हतं.
"माही सुमीबी असाच सडा घालायची", सडा बघता बघता गोदाई पुटपुटली.
"औंदा येणार हाय का सुमाक्का?" सरस्वतीनं विचारलं.
"भिमीचा सुदम्या गेलाय काल चिचपूरला. त्याला म्हणलंय, तिला सांग बाबा, का माह्या दिवा काय म्होरल्या दिवाळी पोहत र्हात नाई. तवा भेटाया ये लगोलग. आन येता येता घेऊनच ये म्हणलंय."
"सरशे, आवारलं नाई का आजून?"
सासूचा आवाज ऐकल्यावर झरझर सडा आटोपून सरस्वती तिच्या घरात निघून गेली. त्या ओल्या आणि हिरव्याजर्द अंगणाकडे बघून गोदाईला जुने दिवस आठवू लागले.
परकरी वयात झालेलं लग्न. तेव्हाही माप ओलांडायला उंबरा नव्हता घराला आणि आताही - पन्नासपंचावन्न वर्षांनी तीच अवस्था. कुंकवाचा रंग तर केव्हाच उडाला होता. मागोमाग कर्ती झालेली दोन्ही मुलंही देवानं नेली. काळाच्या पावसानं कोसळावं तरी किती एखाद्या घरावर? झोपेतच भिंतीखाली गुडूप झाली होती दोघं. त्या पडलेल्या भिंती उभ्या करायला आधाराचा हात असा उरलाच नव्हता तिला. शेजार्यापाजार्यांनी बांधून दिलेल्या पत्र्याच्या खोलीत तिची गुजराण चालली होती. वाटणीचं एकरभर शेत वाट्यानं लावून त्यातून मिळंल त्यात दिवस ढकलत होती ती. रक्ताचं असं एकच नातं उरलं होतं..... सुमन. तिची एकुलती एक लेक. तीही यायची ते फक्त दिवाळसणाला. आणि आता प्रपंचात इतकी अडकली होती की गेली पाचेक वर्षे तिला आईकडे बघायलाही उसंत नव्हती. या दिवाळीला तरी तिची भेट व्हावी एवढी एकच आशा आज तिच्या मनात भिरभिरत होती.
दगडाला लावलेल्या दोन गोवर्या घेऊन तिनं चूल पेटवली. कळकटलेल्या एका पातेल्यात पाणी चुलीवर चढवलं. फुकणीनं गोवर्याची खांडं पुढं सारली आणि तिथलीच राख हातावर उचलून बोळक्यात उरलेले चार दात घासू लागली.
"आये, राखंनं दात घासू नई आसं सांगत व्हता मास्तर."
"त्याला काय जातंय सांगाया? मिसरीची बाटली घ्याया सरकारी पगार लागतो म्हणाव. हितं हाय का खडकू?"
तोंडातल्या गुळणीसोबत सुमीचे आठवलेले शब्द तिनं बसल्या जागेवरूनच थुंकून दिले. गुढघ्यावर हात टेकवून उठत तिनं हातानं आधण उचललं. पक्कड अशी तिला कधी लागलीच नाही.
''तुहा हात नाई भाजत?"
"तुज्यावून ल्हान व्हते तवापासून वळकीती ही चूल मला. अशा मोप भाकर्या उलाटल्यात हितं. मंग भाजीन कशी?"
"मला तं काथवटीतून तव्यापोहत पचत न्हाई, आही लागती मधीच"
"हा.. आन मंग नवर्याला काय खाऊ घालशीन?"
"पीठ"
"आत्ता..!"
चुलीपुढच्या आठवणी घेऊन गोदाई कुडाच्या न्हाणीत आली. धोंडीपुढं पातेलं ठेवलं आणि पदर सोडू लागली..
"पदरकरीन म्हंजी काय इचारत व्हती नव्हं? आता कळ्ळं?
घे... हे हाळद-धनं घातल्यालं दूध घे. बरं वाटलं प्वाटात"
"आगं पण हे कुठून आणलं?"
"शितीकून दूध आणलं. भिमीकून धनं. आता घरात काई नसलं म्हून दुखणं उंबर्याबाहीर र्हातंय व्हय? आन आता हुंदडायचं थांबीव. शानी झालीयास..."
गडूच्या बुडबुडीनं गोदाई भानावर आली. जमेल तसं पाणी अंगावर रिचवून ती घरात आली. कोपर्यातल्या पेटीतून ठेवणीतलं पातळं काढून अंगाभोवती गुंडाळू लागली.
"हे लुगडं तुला लई झ्याक दिसतंय..."
"लाडीगुडी लावू नगं. काय हाय ते बोलं."
"धा पैशे दे ना."
"नाईत माह्याजवळ. आन लई गोळ्या चाकलेट चावू नगसं... दात किडत्याल."
"पेन्शिलीला लागत्यात."
"आसं व्हय, थांब बगते .... आगं आगं ... थांब, वरूटा निसटंल."
आठवणींच्या निर्यांची वळकटी पदराचा पिळ देत तिनं पोटावर आवळली आणि फुटून गेलेल्या आरश्याच्या उरलेल्या तुकड्यात ती चेहरा न्याहाळू लागली. पुसून गेलेल्या कुंकवाची मागं उरलेली पांढरी खूण. वर्षांमागून चढत आलेली एकएक सुरकुती आणि काळानं नेलेलं नसानसातलं चैतन्य. इवल्याशा काचेत जेवढं दिसेल तेवढं बघून तिनं ती काच फळीवर ठेवली. माठातलं पेलाभर पाणी घशाखाली ढकललं आणि चहा ठेवणार तोच बैलगाडीचा आवाज तिच्या कानावर आला. अंधारल्या आभाळात वीज चमकून जावी तशी आनंदाची लकेर काळीज चिरत गेली. लगबगीनं उठून ती बाहेर आली.
तिचं अंगण सोडून गाडी पुढे गेली होती. कोणीतरी अवघडलेली लेक गाडीत दिसत होती. असंच कधीतरी सुमनही बाळंतपणासाठी आली होती. बाळंत होईपर्यंत तिला कायकाय खाऊ घालू असं गोधाईला झालं होतं. घरात होतं नव्हतं त्याचा घास करून तिनं लेकीला खाऊ घातला होता. ज्या रात्री सुमन बाळंत झाली त्या रात्रीतर तिच्या पायाला उसंत नव्हती. गावातल्या सगळ्या सुइणींना घरी जाऊन जाऊन बोलावलं होतं. आठवलेल्या सगळ्या देवांना नवस करून झाले होते. लेक सुखरूप मोकळी व्हावी म्हणून अंधार तुडवत गावातल्या देवांचे अंगारे तिनं स्वतः जाऊन आणले होते. एकएक करून सगळे सुमनला लावलेही होते. चुलीवर आधण घालून ती सारखी येरझरा घालत होती. सुमनच्या किंकाळीसोबत बाळाचा आवाज ऐकून ती हुरळून गेली होती. डोळ्यांतून पाणी आणि ओठांवर हसू अशा विचित्र अवस्थेत ती राहूनराहून आभाळाला हात जोडत होती. सुमन होती तोवर तिनं तिला काही करू दिलं नाही. मायलेकरांच्या सेवेत दमून ती कधी झोपायची तिलाही कळत नव्हतं. आणि तशात कधी बाळ रडायला लागलं तर दचकून उठायची. त्याला झोका देतदेत पहाट झाली तरी अंग टाकायची नाही. गोठवणार्या थंडीत पहाटे उठून शेगडी करायची. कोळश्यासाठी कधी या शेजारणीचं, कधी त्या शेजारणीचं दार झिजवायची. सव्वा महिना तिनं सुमनला बाजेखाली उतरू दिलं नाही. खाणंपिणं, धुणंपुसणं, सगळंसगळं केलं. पाठवणी केली तेव्हा व्याह्यानं साडी घेतली नाही म्हणून रुसली नाही. स्वत:च्या पैशाचं पातळं नेसून लेकीचं नाव करत मिरवली. गाडी दूर जाईपर्यंत एक चित्रपट तिच्या डोळ्यापुढे सरकून गेला.
"देवा सुकरूप मोकळी कर रं बाबा!" त्या अनोळख्या लेकीसाठी साकडं घालून गोदाई अंगणातल्या भेंडीखाली विसावली.
"वचनामधी सुनंच्या, गोतं इसरलं ल्योकं
जीवाभावाला असावी, पोटी एकतरी लेकं"
बैलगाडीच्या धुराळ्यात गोदाईची ओवी धूसर झाली. ती पुन्हा आपल्या एकटेपणाच्या कोषात येऊन वाट पाहू लागली. म्हातारपण सुखात जायलाही नशीबच लागतं. पंख फुटले की घरटं सोडून पिलं उडून जातात. जाणारच. पण पंख झडलेल्या पाखरांना ना घरटं सोडता येत, ना कुठे उडता येत. असंच एक पाखरू आपल्या पिल्लाची वाट पाहत होतं ...
सूर्य कलून चालला होता. उपाशी असलेल्या पोटाची जाणीवही नसलेल्या गोदाईला भूक होती ती केवळ तिच्या लेकीला बघण्याची. जरा वेळानं दुरून येणारा सुदम्या तिला दिसला. तिचा चेहरा उजळला. सर्व शक्तीनिशी ती उठली. कधी टाच वर करून तर कधी डोळ्यावर तळहाताची सावली धरून ती त्याच्या आजूबाजूला पाहू लागली... हळूहळू सुदम्या जवळ येत होता. हळूहळू तिचा चेहरा उतरत होता.. सुदम्या जवळ येताच तिनं विचारलं
"सुमी न्हाई आली?'
"न्हाई. म्हंली सनसुद सोडून मालक न्हाई येऊ देनार. आईला म्हनाव दिवाळी झाली की येईन."
हाच निरोप गेली पाच दिवाळ्या गोदाई ऐकत होती.
खिशातून पाचशेची नोट काढून सुदम्यानं तिच्या हातावर ठेवली.
"सुमीनं दिल्यात."
तिनं एकवार नोटेकडं आणि एकवार सुदम्याकडं बघितलं.
"तुह्याकडंच ठेव बाबा, माह्या मयताला व्हतील," असं म्हणून तिनं पाठ वळवली.
"ल्योकं पाजीतोया पाणी, सून गंगेमदी उभी
कशी आजून येईना, लेक संसाराची लोभी "
सवयीनं तोंडात आलेल्या ओवीला हुंदक्यांसोबत बांधून गोदाई खोलीत निघून गेली.
- शाम
प्रतिसाद
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम चित्रदर्शी कथा. भिडली
अप्रतिम चित्रदर्शी कथा. भिडली मनाला. साधेपणानं सौंदर्य आणि गोडवा आणलाय कथेला>>+1
काय सुंदर कथा आहे रे. एकदम
काय सुंदर कथा आहे रे.
एकदम काळजाला हात घातलास...
खुप दिवसात एव्ह्डी सुंदर कथा वाचली नव्हती.
अत्यंत सुंदर! गोदाई
अत्यंत सुंदर! गोदाई डोळ्यांसमोर उभी राहिली आणि डोळ्यांत पाणी देऊन गेली. ओव्या तर अप्रतिम!
सुरेख!!!!!!!!!!!!!!!!!!
सुरेख!!!!!!!!!!!!!!!!!!
सुरेख !!!!
सुरेख !!!!
आवडली कथा..............
आवडली कथा..............
surekh lihiliye katha.
surekh lihiliye katha. avadali
कथा आवडली. गोदाई डोळ्यांसमोर
कथा आवडली.
गोदाई डोळ्यांसमोर उभी राहिली आणि डोळ्यांत पाणी देऊन गेली >> +१
सुरेख कथा. तुमचं लिखाण
सुरेख कथा. तुमचं लिखाण नेहेमीच खूप आवडतं. एक्दम खरं खुरं आणि तळातून आलेलं असतं.
खूप आवडली. एकदम मनाला भिडणारं
खूप आवडली. एकदम मनाला भिडणारं लिहीता तुम्ही.
खूपच आवडली. ओव्यांनमधून ते ते
खूपच आवडली. ओव्यांनमधून ते ते भाव अगदी छान प्रगटलेत आणि भिडलेतही. वा!
अतिशय सुंदर! मन जड झाले.
अतिशय सुंदर! मन जड झाले.
खूपच आवडली.
खूपच आवडली.
खूप खूप आवडली. काळजाला
खूप खूप आवडली. काळजाला भिडणारी अगदी.
मस्त
मस्त
वा सुरेख लिहिली आहे कथा..
वा सुरेख लिहिली आहे कथा.. ओव्यादेखील चपखल.. अश्या भाषेत, ओव्यात लिहायला अशी आयुष्यं बघितलेली असावी लागतात, अशी भाषा जगलेली असावी लागते. एकदम ओरिजिनल!!
गोदाईचं जगणं भिडलं - सुंदर
गोदाईचं जगणं भिडलं - सुंदर कथा.
सुंदर .. कथा तर मस्तच लिहीली
सुंदर .. कथा तर मस्तच लिहीली आहे पण ओव्यांनीं जिंकलं .. :)
सगळ्या प्रतिसादक आणि वाचकांचे
सगळ्या प्रतिसादक आणि वाचकांचे खूप खूप आभार...
ओव्या अप्रतिम . कथा तर अगदी
ओव्या अप्रतिम . कथा तर अगदी मनाला भिडणारी !
सुंदर कथा !!!
सुंदर कथा !!!
सुंदर. आवडलीच.
सुंदर. आवडलीच.
आवडली. वातावरणनिर्मिती
आवडली.
वातावरणनिर्मिती जबरदस्त आहे.
पहिल्या चार वाक्यांमधेच पकड घेतली.
ओव्या तर एक-नंबर!