ती, तो आणि... थोडासा उशीर!!!

"ए ते बघ तिथे ते आजी-आजोबा. खी खी खी खी."
रस्त्यावरून जाताजाता एक पोरगी त्या दोघांकडे पाहून तिच्या हीरोच्या कानात हळूच कुजबुजली. तिचं कुजबुजणं त्या दोघांना ऐकू जाईल इतपत मोठ्या आवाजातलं होतं, हे तिच्या हीरोला जाणवलं आणि किंचित घाईनं तिला दूर घेऊन जाताजाता ते दोघंही मनमुराद खिदळताना त्या दोघांनीही पाहिले. तो हसला. ती मात्र काहीशी कावरीबावरी झाली. तिच्याकडे पाहून तो पुन्हा हसला.

2013_HDA-Ti_to_AniThoDasaUshir.jpg

"काय हे? आतातरी ऊठ ना इथून. थट्टेचा विषय होतोय आपण कळतंय ना? काय तर अचानक सुचलंय आज इतक्या वर्षांनी या जागी यायचं."
तो पुन्हा हसला.
"अरे मी चेष्टा करतेय का? चल ना इथून. कसंतरीच होतंय मला इथं."
"काही होत नाही गं. छान वाटत नाहीये तुला इथे? बघ ना ही जागा... किती वर्ष झाली! अजूनही तशीच आहे. आजूबाजूची वस्ती वाढली. आख्खं शहर पालटून गेलं. पण ही जागा मात्र आपली वाट बघत वर्षानुवर्षं एकाच जागी थांबून राहिल्यासारखी... अगदी तश्शीच! गंमत नाही वाटत तुला?"

तिची नजर समोर पसरलेल्या चिमुकल्या नदीपात्रावरून पाखरासारखी भिरभिरत राहिली. नाही म्हटलं तरी काहीशी रया गेल्यासारखी वाळली होती नदी. तेव्हाचा तो खळाळता तरुण प्रवाह आता नुसता शांतच नाही तर अशक्त झाला होता. त्याचंही वय झालंच होतं की. वयपरत्वे व्हायचंच!
’ही नदी.... इतकी वर्षं... खरंच आमची वाट पाहत होती? हिला ठाऊक होतं आम्ही पुन्हा येणार ते? ओळखलं असेल हिनं आम्हांला?’
ती गालातच हसली.
’मला नाही तरी याला नक्की ओळखलं असेल. एकदा याला भेटलेल्याला विसरणं शक्य आहे का?’

"बघ हसलीस ना? आहे ना गंमत?"
ती पुन्हा भानावर आल्यासारखी त्याच्यावर चिडली.
"ही... ही गंमत दाखवायला आणलंस तू मला इथे? अरे आजूबाजूला सगळे तरुण प्रेमवीर बसलेत इथं एकमेकांना लुचत. आपलं वय आता अशांना नावं ठेवण्याचं. यांच्यात आपण बसणं आता बरं दिसतं का? निघूयात ना इथून."
"ए...." तो काहीसा वैतागलाच.
"कसली म्हातारी आहेस यार तू. हे काय लॉजिक आहे? इथे कुठे पाटी लावलीये का ’फक्त तीस वर्षांच्या आतील मुलामुलींसाठी’ म्हणून? इतक्या वर्षांनी इथं आलोय. आपण दोघंच आहोत. तीच नदी... तोच पूल... तेच संध्याकाळचं सावळसर वातावरण.... तोच मी, तीच तू... मला वाटलं छान नॉस्टॅल्जिक होशील. हळूहळू मी तुझा हात हातात घेईन... मग आपण काहीतरी रोमँटिक...."
"तुला काय वेड लागलंय का आनू?" डोळे मोठ्ठे करून त्यात जगभरातला अविश्वास साठवून ती त्याच्याकडे बघत होती. तिचा मस्त गालगुच्चा घ्यावा, असं त्याला मनापासून वाटलं त्या क्षणी. पण खरंच तसं केलं असतं तर भांबावून सरळ उठून चालू लागली असती ती. जरा दमानं घ्यायला हवं.
"बघ, कसली छान दिसतेयस तू माहितीये का तुला?" तो नेटानं म्हणाला.
"आचरटपणा पुरे झाला हं आनू." ती किंचित लाल झाली. सुरकुतल्या गालांवर ती लालसर छटा दगडांतून वाहणार्‍या प्रवाहाच्या तरंगांवर संधिप्रकाश सांडावा तशी वाटली त्याला. "व्वा!!!" तो बोलून गेला आणि ती चटकन उठू लागली. त्यानं झपाट्यानं तिचा हात धरला. हात धरल्यावर ती आणखीनच घाबरली. सोडवू लागली. आजूबाजूच्या काही फुलपाखरांच्या थव्यांचं या लघुनाट्याकडे लक्ष गेलं आणि काही कुजबुजण्याचे, काही किणकिणत्या हसण्याचे आवाज उठले. शरमून जाऊन ती पुन्हा खाली बसली. त्यानं हात सोडला. आता तिचा पारा चांगलाच चढला होता.

"कसली नतद्रष्ट लक्षणं सुचताहेत तुला? अरे वय काय आपलं. आपण करतोय काय... कशाचा कशाला काही मेळ? जरातरी भान ठेवावं रे. ज्या ज्या वयात जे जे करायचं होतं ते ते करून झालं ना आपलं? मग आता काय त्याचं? दिवसभर छान मजा केलीच ना आपण आज. पुन्हा जुने दिवस वगैरे आठवायचे.... अनुभवायचे. मीपण तुझ्या आग्रहाखातर तू म्हणशील ते ते केलं. पण हे नको रे. मला भयंकर ऑकवर्ड होतंय रे आनू."
तो एकदम शांत झाला. काही क्षण नदीपात्रात उगाचच उमटून नाहीशा होणार्‍या तरंगांकडे पाहत स्वतःशीच पुटपुटल्यासारखं तो तिला म्हणाला, "पिया, आज किती दिवसांनी... नव्हे महिन्यांनी... कदाचित वर्षांनी... तू मला ’आनू’ म्हणून हाक मारतीयेस... माहितीय?"
तिनं एकदम दचकून पाहिलं त्याच्याकडे. त्याची नजर अजूनही नदीवर तरंगणारी.
’खरंच की... शेवटची कधी मी याला ’आनू’ म्हणून हाक मारली होती? मुळात मी शेवटची याला हाकच कधी मारली होती?’ - ती बावचळली. पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या नजरेत आता तरंगत होती एक नदी!

तीही शांत झाली. काही क्षण असेच हुरहुरत्या चाहुलीनं न बोलता निघून गेले.

आनंद आणि प्रिया! दोघं आज जवळजवळ चाळीस वर्षं एकमेकांना ओळखत होते. लग्नाआधी... लग्नानंतर... मिळून. दोघंही आपापल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवून प्रतिष्ठित झालेले. दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअर. नामांकित कंपनीत बढतीच्या एकएक पायर्‍या चढत आपापल्या ठिकाणी उच्च स्थानावर पोचलेले. दोघांच्या संसारांत लक्ष्मी पाणी भरत होती. भरपूर सुबत्ता आणि त्या संपदेला जपण्यात, वाढवण्यात आणि तिचा उपभोग घेण्यात व्यग्र.... ती आणि तो!

आता दोघंही खरंतर रिटायर्ड. पण तरीही झेपतंय तोवर काही ना काही काम करावं म्हणून आनंद कंपनीत जायचाच. त्याची कंपनीतली पोझिशनच अशी की त्याला कोण रोखणार? प्रियाने घरीच कन्सल्टन्सी चालू केलेली. दोघंही स्वतःला पूर्वीइतकेच व्यग्र ठेवण्यात आकंठ गढलेले! कामाप्रती निष्ठा की स्वतःला सामोरं जावं लागण्याची भीती?

"चना चोsssssर गर्र्म.... चना चोsssssर गर्र्म...." हाक कानावर पडली तशी दोघंही भानावर आले. कळकट कपड्यातल्या, मानेवरून पोटावर बांधलेल्या पोटलीत चनाचोरचं साहित्य घेऊन फिरणार्‍या पोर्‍याला पाहून प्रिया फस्सकन् हसली. आनंदने तिच्याकडे पाहिलं.
"हा पोर्‍या... त्या चणेवाल्या ढेरूकाकांचा पोरगा असेल का रे? तस्साच काळा कुळकुळीत आहे बघ ना... ’रंग गेला तर पैसे परत’ कॅटेगरी!" प्रियाने विचारलं आणि पुन्हा फस्सकन हसली. आनंद काही क्षण तिच्या हसण्याकडे पाहत राहिला. मग नकळत त्यानं त्या कळकट पोर्‍याकडे नजर टाकली आणि तोही हसायला लागला. आजूबाजूच्या कबूतरांच्या जोड्यांचे ’ध्यान’ त्या दोघांच्या खिदळण्याने भंग पावले आणि काही त्रासिक कटाक्ष त्यांच्या दिशेनं धाडले गेले. चनाचोरवाला पोरगाही थबकला बिचारा. पण ते दोघं मनमुराद हसून झाल्यावरच थांबले.
"चनाचोर खाणार तू?" हसू आवरल्यावर आनंदने विचारले.
"चनाचोर?" त्या पोर्‍याचा कळकट अवतार... हायजिन... वगैरे गोष्टी प्रियाच्या नजरेसमोर चटकन चमकून गेल्या...
आणि मग आठवले ढेरूकाका! दोन रुपयांचे खारे शेंगदाणे.... कधी काबुली चणे... तिखट-मीठ, कांदा आणि वरून लिंबू पिळून. दोघांत एक. देताना ढेरूकाकांचं न चुकता म्हणणं... ’खावा तर खरं... परत मांगाल!" ते ’मांगाल’ आजही तसंच स्पष्ट ऐकू येतं कानात. त्या काकांची त्या शब्दावरून भरपूर टर उडवली!
"हो. घेऊयात. दोघांत एक."
आनंद मनापासून हसला. जणू मधल्या काही सेकंदांत तिचे विचार कुठेकुठे फिरून आले ते पाहिलंच होतं त्यानं!

"दोन घ्या की सायब! खाऊन तर बगा.... परत मांगाल!" चनाचोरचा कागदी पुडा प्रियाकडे सोपवताना तो पोरगा म्हणाला आणि एकमेकांकडे पाहून ते दोघं अशक्य हसू लागले. आजूबाजूच्या कबुतरांचा पुन्हा ध्यानभंग झाला आणि चनाचोरवाल्याचं रूपांतर प्रश्नचिन्हात झाले.

त्या सगळ्यांना तसंच सोडून ते दोघं हसतच रस्त्याच्या पलीकडे उभी केलेल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसले आणि ड्रायव्हरनं गाडी काढली तेव्हा नदीकाठी बसलेली सगळी कबुतरं एकजात माना वळवून त्यांच्याकडेच बघत होती.

गाडीत रेलून बसून चनाचोर चवीचवीने चघळणार्‍या प्रियाकडे बघत आनंद म्हणाला....
"पिया...."
"अं..."
"कसा काय गेला आजचा दिवस?"
मान वर करून आनंदकडे बघत प्रिया छानसं खट्याळ हसली. ही अजूनही तशीच हसते की... आनंदच्या मनात तरळून गेलं.
"दुपारचा तो मॅटिनी शो भयंकर होता. कसला वाईट होता तो पिक्चर! तेवढं सोडलं तर मज्जा आली आज."
"मज्जा आली की नाही? पिक्चर वाईट होता पण इंटर्व्हलमध्ये तो वडापाव काय भारी होता म्हणून सांगू... तू खायला हवा होतास."
"छे! किती अस्वच्छ होतं ते सगळं...! आणि तसंही... फार तिखट सोसवत नाही आताशा." प्रिया हळू आवाजात म्हणाली.
"तू पुन्हा वयाचा उल्लेख केलास पिया. दिवसातून तिसर्‍याचौथ्यांदा! हा फाऊल आहे. आपलं काय ठरलं होतं?"
"जे आहे ते नाकारता येतं का आनू? आणि मला काय बोलतोयस? त्या थिएटरच्या पायर्‍या चढताना तुलाही धाप लागली होती चांगलीच. आणि दिवसभर फिरून आता गुडघेही दुखत असतील. हो ना?"
"हो. दुखताहेत गुडघे थोडेसे. पण ते महत्त्वाचं नाही पिया.... दिवसभराच्या सोहळ्यानंतर गुडघ्यांची आठवण मला आत्ता... तू बोलल्यावर झाली... हे महत्त्वाचं! वय झालंय आता माझंही हे कोण नाकारतंय? पण ते विसरायला काय हरकत होती तुला? एका दिवसापुरतं?"
प्रिया आनंदला काही उत्तर देणार इतक्यात ड्रायव्हरचा प्रश्न आला... "कुठं जायचंय साहेब? बंगल्यावरच नेऊ ना?"
आनंदने प्रियाकडे पाहिलं.
"पिया, कुठे जायचं जेवायला? त्या कॉलेजसमोरच्या ’दुर्गा’मध्ये जाऊयात? भुर्जीपाव... मस्त!"
"काही नको. बस आता. घरी जाऊयात. मी स्वतः करते स्वयंपाक आज. माझाही मूड आलाय." प्रिया हसली.
"आईशपथ... किती दिवस झाले गं तुझ्या हातचं थालीपीठ खाऊन. मस्त थालीपीठ कर. आणि भुर्जीपावपण करूया घरीच. मी मदत करतो तुला. मारुती... रस्त्यात कुठे दुकान दिसतं का बघ रे आणि पाव आण एक लादी..."
"होय साहेब..." आरशातून त्या दोघांकडे बघत मारुती गालात हसत होता.

रात्री बंगल्याच्या गच्चीवर खालीच चटई आणि त्यावर गादी टाकून दोघंजण लवंडले होते. पांढरीशुभ्र चादर टाकून. ती त्याच्या खांद्यावर अलगद विसावलेली. नजरेसमोर पसरलेला प्रचंड काळाभोर कॅन्व्हास आणि त्यावर चांदण्यांची चमकी भुरभुरलेली. बारीकशी चंद्रकोर सगळ्या चुकार चांदण्यांवर जणू नजर ठेवून होती. प्रियाला हॉस्टेलच्या मेट्रन मॅडमची आठवण आली आणि ती खुदकन हसली.
"काय झालं?"
"काही नाही. उगाच."
"असं नाही. आज तरी मनात येईल ते बोलायचं माझ्याशी. एकटंएकटं नाही हसायचं. सांग ना...’
प्रियाने त्याला सांगितलं आणि आनंदही छानसं हसला. हसताहसता त्यानं तिला आणखीनच घट्ट आवळलं.
"आनू..."
"हं..."
"आज खूप खूश आहेस ना?"
"हो! खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मस्त वाटतंय मला. तुला नाही वाटतंय असं?"
"मलापण खूप छान वाटतंय. खरं तर तुला इतकं खूश बघूनच मस्त वाटतंय. अगदी तसंच... तसंच... कॉलेजमधल्यासारखं... नुकतंच प्रेमात पडल्यासारखं... तरुण असल्यासारखं वाटतंय!"
"ये हुई ना ब्बात!" आनंदनं खूश होऊन प्रियाच्या कपाळावर हलकेच ओठ टेकले. प्रिया लाजली.
"पुरे हं आता. संपला दिवस आजचा."
"अजून कुठे संपला? आख्खी रात्र आहे ना अजून." आनंद मिश्किल हसला आणि प्रियानं त्याच्या छातीवर लाडिक चापटी मारली.

मग कितीतरी वेळ आकाशाकडे बघत त्या दोघांच्या गप्पा रंगत होत्या. दिवसभरातल्या सगळ्या गमतीजमतींचा आढावा घेऊन ते दोघं जण खिदळत राहिले. आजचा दिवस त्यांनी आयुष्यातली मधली तीसपस्तीस वर्षं गाळून पुन्हा एकदा जमेल तसा जगून घेतला होता. सकाळी ’रामनाथ’मध्ये मिसळपावचा नाश्ता, मग जुन्या ओळखीच्या चिरपरिचित जागांवर उगाचच भटकंती, दुपारी शहरातल्या सगळ्यांत जुन्या थिएटरमध्ये जो लागला होता तो पिक्चर, टपरीवरचा कटिंग चहा, संध्याकाळचा धुंद नदीकाठ, चनाचोर गरमची जिभेवर रेंगाळणारी चटक, रात्रीचा दोघांनी मिळून केलेला धेडगुजरा स्वयंपाक... थालीपिठावरचा विरघळत जाणारा लोण्याचा गोळा आणि भुर्जीची चटकदार चव.... आणि आता स्वच्छ चांदण्याखाली एसीशिवायच्या गारव्यात एकमेकांच्या कुशीत निरागस विसावणं! स्वर्ग! निव्वळ स्वर्ग!!!
__________________________

डोळ्यांवर ऊन आलं तशी प्रियाला जाग आली. सूर्य बराच वर आला होता. तिनं शेजारी पाहिलं. आनंद तिथे नव्हता. कालचा दिवस आठवून प्रिया हलकेच हसली. पण आनंदच्या रिकाम्या बिछान्याकडे आणि नीट घडी करून ठेवलेल्या पांघरुणाकडे पाहताना हसताहसताच नकळत कुठलीशी वेदनाही तिच्या डोळ्यांतून घरंगळून गेली.

बिछान्यावरून हळुवार उठून ती जिना उतरून बंगल्यात आली. स्वयंपाकघरात आनंदची चाहूल लागली. अजून कोण होतं त्या घरात ज्याची चाहूल लागावी? पण इतक्या वर्षांनी एकमेकांची अशी आवर्जून ’चाहूल घेणं...’ खरंच... खरंखुरं आयुष्य या छोट्याछोट्या गोष्टींतच असतं. फार उशिरा लक्षात आलं. त्याच्याही अन् माझ्याही!

"या या मॅडम.... बंदा हाजिर है| गरमागरम चाय और नाश्ता!"
समोर टेबलवर वाफाळत्या चहाचे दोन कप ठेवता ठेवता आनंद म्हणाला. टेबलवर मस्त ऑम्लेट तिखटमीठ भुरभुरवून मांडलेली होती. शेजारी टोस्ट. आणि बटरसुद्धा. तिच्या नाश्त्याच्या आधी घ्यायच्या गोळ्यासुद्धा तिथेच ठेवल्या होत्या.

"याची काही गरज नव्हती आनंद. मला का नाही उठवलंस?"
त्याची मान खाली गेली. स्वतःशीच पुटपुटल्यासारखं तो म्हणाला, "’आनू’ नाही म्हणालीस...पिया!"
तिनं ऐकलं. पण काही न बोलता ती सकाळची आन्हिकं उरकायला गेली. टेबलवर चहाच्या कपांतून निघणार्‍या वाफेच्या वलयांतून धूसर अस्थिर दिसणार्‍या त्यांच्याच संसाराकडे पाहत तो विमनस्क बसून राहिला.... तिथेच... तिचीच वाट बघत.

नाश्ता शांततेतच झाला.
त्यानं विचारलं तिला... "जमलं का गं मला?"
ती म्हणाली. "होतर! छानच झालेला नाश्ता. आणि चहाही अगदी हवा तस्सा!"
तो विमनस्क हसला. खरंतर त्याला जमलेलं नव्हतंच काही. त्याला ठाऊक होतं. त्याच्या डोळ्यांत पाणी तरंगलं.
"तू... तुझं नक्की काय ठरलंय पिया...."
प्रियानं चमकून आनंदकडे पाहिलं. हा प्रश्न अपेक्षित होताच की तिला....
ती हळूच म्हणाली, "माझा निर्णय झालाय आनंद!"
"अगं पण...." आनंद आता अगतिक झाला होता. "पिया.... आता या वयात मला एकटं सोडून का जायचंय तुला? मान्य आहे मी चुकलो. संसार असा आपला झालाच नाही कधी. तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला मला फुरसत झाली नाही. हिंडलो फार आपण.. अगदी दुनियाभर! पण तुझ्यासोबत चार पावलं हिरवळीवरून चालण्यातली गंमत विसरून गेलो मी. कशाचा तरी पाठलाग करताना पहाटेचं धुकं, रात्रीचं चांदणं, मोगर्‍याचा गजरा, मखमली रेतीवर एकत्र उमटलेली पाउलं वगैरे गोष्टी कधी आयुष्यातून रद्दबातल झाल्या ते समजलंच नाही गं. तुला हे सगळं हवं होतं... माझ्याकडून, माझ्यासोबत... मला समजलं नाही गं... " बोलताबोलता आनंद थांबला. त्याचा कंठ भरून आला होता. प्रिया अजूनही शांतच होती.

"मीही एक निर्णय घेतला आहे पिया. तुला आता या वयात माझ्यापासून वेगळं व्हायचंच असेल तर.... ठीक आहे! पण माझा निर्णय ऐकून जा. कंपनीचा 'वाईस प्रेसिडेंट' म्हणून कॅनडात जॉईन होण्याची ऑफर मी आज सकाळीच फोन करून नाकारली आहे. मी आता निवृत्ती उपभोगणार आहे. तू गेल्यावर हा बंगला विकून वृद्धाश्रमात राहायला जाणार. इतक्या वर्षांत जे जे करायचं राहून गेलं... त्यातलं जे जे आता करता येईल ते ते सगळं करणार! पण...." आनंद पुन्हा शांत झाला. खालच्या मानेनं टेबलवर उगाचच रेघोट्या ओढत काही क्षण भयंकर शांततेत गेले.

"पण.... तुझ्यासोबत मनाजोगता संसार करण्याची इच्छा अखेरपर्यंत अपुरी राहील पिया! ही खंत शेवटापर्यंत पाठ सोडणार नाही."
दोन थेंब घरंगळून टेबलवर सांडले. आनंद जागेवरून उठला आणि जाण्यासाठी वळला.

’काय झालं?’आनंदनं दचकून वळून मागे पाहिलं.
सगळे समुद्र डोळ्यांत साठवून आणि लोखंडाचं बळ मुठीत सामावून ती त्याचं मनगट धरून उभी होती....
"तुला खरोखरच जमलंय आनू.... आपल्याला... आपल्या दोघांनाही... आता खरंच जमतंय! फक्त.... फक्त थोडा उशीर झाला खरा!"

तिच्या डोळ्यांतल्या समुद्राला उधाण आलेलं आणि तो गोंधळलेला...
’जमेल... आपल्या दोघांनाही जमेल... पुन्हा एकदा... डाव मांडूयात?’
____________________________

तो आणि ती... नव्या कोर्‍या त्यांच्या संसारात आता मनापासून रमले आहेत. जरा घाईत असतात हल्ली... कमी वेळात त्यांना खूप काळ जगायचा आहे! नदीच्या काठी कुणी आजीआजोबा खेटून बसलेले दिसले तुम्हांला तर हसू नका बरं कधी!!!

- मुग्धमानसी

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

कथेची कल्पना छान आहे पण सुरुवातीचे दोन-तीन परिच्छेद आणि फोटो पाहून काहीतरी वेगळंच चित्र उभं राहिलं होतं मनात ... एकदम अपेक्षाभंग झाल्यासारखं वाटलं :)

क्यूट आहे कथा.

@सशल - चनाजोर वाल्याचे वडील काल्पनिक नाहियेत. तरूणपणी हे दोघं ढेरूकाकांकडून चनाजोर घ्यायचे.

आवडली :)

धन्यवाद!