माती आणि घन


ल्याली रेशमाचा शालू, मनी हळदली माती
कुणी रानवट घन तिला लाभला सांगाती
खुल्या आभाळमंडपी शुभमंगल जाहले
घननीळ गीत त्यांचे रानावनात घुमले


दोन जीव वेगळाले, परी झाले एकतान
दोन देहांच्या कुडीत वसे एक पंचप्राण
निसर्गाच्या राउळात असे अद्वैत जुळले
घननीळ गीत त्यांचे रानावनात घुमले


ओल्या मातीच्या कुशीत वाढे बियाणे जोमाने
घन संस्काराचा त्यासी दृढ सिंचतो प्रेमाने
वात्सल्याची निगराणी पान-फूल बहरले
घननीळ गीत त्यांचे रानावनात घुमले


कुणा माळियाने केले फूल राजासी हवाली
वेडे रमले मजेत दूर देशीच्या महाली
घन झाला वेडापिसा दंव डोळ्यात दाटले
घननीळ गीत त्यांचे रानावनात घुमले


माती हासली करुण समजावी ती घनाला
का रे होऊनिया रुष्ट देसी क्लेश तू मनाला
बघ गंध तुझा-माझा फूल लेऊनिया गेले
घननीळ गीत त्यांचे रानावनात घुमले


वाऱ्यावर पसरू दे त्याची बात चहुदिशी
ठेऊ उरात सानंदे सान आस इतुकीशी
नव्यानेच आरंभूया सारे जुन्या जगातले
घननीळ गीत त्यांचे रानावनात घुमले


घन मातीत भिनला माती घनमय झाली
अशा अनोख्या संगमी भावसुमने फुलली
स्नेह, मायेच्या मंदिरी नव बीज अंकुरले
घननीळ गीत त्यांचे रानावनात घुमले

@Sampada
related1: 

HDA2014_greenseparator.jpg

HDA2014_rangolee12.jpg

HDA2014_greenseparator.jpg
रूपाली परांजपे
Roopali
रूपाली परांजपे न्यू जर्सी (अमेरिका) येथे वास्तव्यास असून निवेदन, अभिनय, काव्यवाचन, नाट्यवाचन या विविध प्रकारांत निपुण आहेत. पुणे आकाशवाणीवर कलाकार म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रमांतून सहभाग घेतला आहे. 'आगळी अशी कृष्णगाथा' या श्रीकृष्णचरित्रावर आधारित काव्यमालिकेची सहलेखिका, 'सती शिवांगी' या नृत्य-नाट्य संगीतिकेची सहलेखिका, 'वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा' - कवीवर्य कुसुमाग्रजांच्या लेखनावर आधारित दृक्‌श्राव्य कार्यक्रमाची सहलेखिका, 'तुमच्या आमच्या घरची गोष्ट' या संगीत एकांकिकेची सहलेखिका अशा विविधांगी लेखनाचा त्यांना अनुभव आहे. मायबोली दिवाळी अंकातून त्यांनी सातत्याने काव्यलेखन केले आहे.

HDA2014_greenseparator.jpg

प्रतिसाद

रुपाली, सुरेख!

सुरेख कविता. मागच चित्रही सुंदर आहे.

सुंदर कविता.

छान कविता.
शेवटचं कडवं सर्वात छान वाटलं.

कविता मस्त!
शेवटचं कडवं विशेष आवडलं :)

बॅकग्राऊंडचा काही प्रमाणातला रंग आणि फॉण्टचा रंग सारखा असल्याने मधे मधे त्रास झाला कविता वाचायला :(
पण स्वतंत्ररित्या बॅकग्राऊंड मस्तय :)

सहज, सुंदर..!