'डुप्लिकेट' लोकशाही


बबन्यानं दुकानाचं दार आपल्याकडे ओढून कुलूप,कडी काढली. दुकान उघडून मेजावर, खुर्चीवर आणि सामानावर फडकं मारुन तो फतकल मारीत लाकडाच्या खुर्चीत बसला. आज दुकान उघडायला जरा उशीरच झाला होता. आपलं रोजचं गिऱ्हाईक लांब असलेल्या दुसऱ्या दुकानात गेलं की काय अशी शंकाही त्याच्या मनात आली. पण लगेच त्याच्या दुसऱ्या मनानं त्याची शंका खोडून काढली, कारण त्या दुकानात उधारी चालत नसे. बबनराव बऱ्यापैकी उधारी ठेवत म्हणून गावकरी त्यांच्याच दुकानात जास्त जात. दुकान उघडायला उशीर झाला तरी जरा कळ काढतंच असत.


आता खेड्यातलं दुकान म्हणल्यावर त्यात विकायला दुसरं काय असणार? साखऱ्या अन् पत्ती. पण नाही, बबन्यानं साखर, पत्तीपासून ते पार पेट्रोल आणि मोबाईल रीचार्जपर्यंत सगळं ठेवलं होतं. नुसत्या साखऱ्या अन् पत्तीनं घर चालवायचं कसं? बबन्या खुर्चीत बसतो न बसतोय तोवरच त्याची भोवनी दारात हजर होती.


"काय बबनराव, लई उशीर केला दुकान उगडायला?" आल्या आल्या शंकरआपाच्या बंड्यानं विचारलं.
"हां, जरा उशीरच झाला बग." बंड्याचा रोजचा खुराक 'सूर्य छाप'ची पुडी काढत बबन्या बोलला.
"जरा लवकर उगडत जा की राव, कामं खोळंबत्यात 'सकाळची'!" एवढं बोलून बंड्यानं शर्टाच्या खिशातून पाचशेची नोट काढली.
बबन्या 'सकाळची' कोणती कामं हे उमजून मान हलवत होता. बंड्याने नोट काढली तसा तो बोलला.
"चिल्लर दे रे, चिल्लरची लय बोंब हाये बग."
"आरं म्या तरी कुटनं आणू रं, न्हायी की चिल्लर." बंड्या खिसे चाचपत बोलला.
"आरं भवनीच तुज्या हातून हाये आज. बग असतेल." बबन्या आशाळभूत नजरेने बंड्याकडे बघत होता. त्याचा एक दंडक होता. एरव्ही कितीही उधारी होऊ द्या पण भोवनीच्या वेळेस तो रोख पैसे घ्यायचा. भोवनीला उधारी केली की त्या दिवशी धंदा चांगला होत नाही असा त्याचा समज होता आणि हे माहीत असल्यामुळेच बंड्यानं जाऊन कुठूनतरी दहा रुपये आणून बबन्याच्या हातात एकदाचे टेकवले.


बंड्या गेला अन् पकाभाऊ बिड्या घ्यायला आले. आले तसे त्यांनी हजाराची नोट पुढं करून बिड्यांचं बंडल मागितलं.
"पकाभाऊ धा रुपायच्या बंडलाला हजाराची नोट व्हय?" बबन्या करवादला.
"आरं चिल्लर न्हायी की." पकाभाऊ खोलवर खिशात हात घालत बोलले.
"बरं, ऱ्हाउद्या आता, पुन्ना द्या." बबन्या उधारीची वही काढत बोलला.
"हां बराय, टिपून ठेव बाबा. परत इसरायचो म्या." असं म्हणून ते घाईघाईत निघून गेले.


अजून एकदोन गिऱ्हाईकांसोबत वरील वाक्यांचीच उजळणी झाली तसं बबन्या विचारात पडला.
"ह्याच्या बायला, काय सगळ्यास्नीच घबाड गावलं का काय?, कोण पण येतंय अन् हजार, पाचशेची नोट काडतंय. ते आप्याचं बंड्या, खिशात कदी दमडा नसतो त्येच्या. उधारी झाली की बापाकडनं मागून धा, पाच रुपये हातावर टेकवतंय अन् आज त्यानं पण पाचशेची नोट काडावी?"


असे काहीसे आश्चर्याचे भाव बबन्याच्या चेहऱ्यावर होते, तेव्हाच पक्यानं दुकानात पाय टाकला.
बबन्याने वासलेला 'आ' त्याने आपल्या डाव्या हाताने हनवटी वर करून मिटवला अन् आपली टकळी चालू केली.
"काय बबनराव, आज गिराईक जंक्शन दिसतंय!"
"अरं गिराईक हाय माइंदळ पण त्याच्या बायला सगळं उसनवारीच हाये की रं."
"उसनवारी कामून गड्या? कालच तर विलेक्शन झालेत की?" पक्या 'अर्थ'पूर्ण नजरेने बबन्याकडे बघून गालात हसत होता. त्याची नजरच अशी बेरकी होती की त्याला काय म्हणायचं होतं ते बबन्याला बरोब्बर कळलं. अन् मघाशी पडलेलं कोडं देखील त्यासरशी सुटलं.


"अरं त्याच्या बायला तरीच म्या म्हनलं, कोणी येतोय हजार, पाचशेचीच नोट काडतोय. ज्याच्या खिशात रुपया सापडायचा नाही ते लोकं आज हजाराची नोट काडतायत. काल विलेक्शन झालेत नायी का?"
बबन्या स्वतःशीच बोलल्यासारखं बोलला अन् एकदम भानावर येउन तो पक्याला उद्देशून बोलला, "पकाभाऊ, बरं झालं तुमी आलात अन् हे कोडं सुटलं. नायी तर म्या असाच बसलो असतो इचार करत. हे घ्या तुमाला गोवाची पुडी आपल्याकडनं, कोडं सोडिवल्याबद्दल." असं म्हणून त्याने एक पुडी पक्याच्या हातावर ठेवली.

HDA2014_Vote.jpg

कालच विधानसभेचे इलेक्शन झाले होते. शेजारच्या उंबरा गावचेच आमदार साहेब या वेळेस परत उभे होते. नव्याण्णव किलोचे हे आमदार आसपासच्या भागामध्ये बरच 'वजन' राखून होते आणि तेच निवडून येणार अशी शक्यता नाही तर खात्रीच त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. आमदारांनी पण काही कमी खर्च केला नव्हता. कार्यकर्त्यांना गाड्या म्हणू नका, गाडीचा पेट्रोल भत्ता म्हणू नका, रोजचा अलाउन्स म्हणू नका. झालंच तर रात्रीची सोय म्हणून रांजणभरून देशी अन् चकण्याला मीठ आणि फरसाण अशी सगळी व्यवस्था त्यांनी प्रचाराच्या दरम्यान केली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इलेक्शनच्या आदल्या दिवशी एका मताला हजार रुपये प्रमाणे जवळपास एक, सव्वा करोड रुपये वाटल्याची कुजबूज साऱ्या गावानं ऐकली होती. आमदार साहेबांना पण निवडून येण्याची पक्की खात्रीच होती अन् ते मुंबईला जाण्याच्या तयारीला देखील लागले होते.


"बरं काय देऊ बोला." बबन्याने पुढे विचारलं.
"आपल्याला एकाने काय होतंय बबनराव, द्या पन्नासाची माळ." असं म्हणून त्यानं खिशातली हजाराची नोट काढून बबन्यापुढे धरली.
हजाराची नोट बघून प्रथम बबन्याच्या कपाळावर आठी चढली पण लागलीच दोघेही हसत सुटले.

HDA2014_blackseparator.jpg

खुळेवाडीत जशी चिल्लरची बोंब होती तशीच काहीशी परिस्थिती आमदार साहेबांच्या कृपेने पंचक्रोशीतील गावांमध्ये होती. त्यातून तालुक्याचे गावही सुटले नव्हते. एक दोन दिवस चिल्लरची वाट बघून तसच लोकांकडे पैसे असूनही गावावरची आपली उधारी वाढत चाललेली न बघवल्यामुळे तिसऱ्या दिवशी बबन्यानं दुकान भावाच्या हवाली करून, काखेत पिशवी मारून थेट तालुक्याची बँक गाठली. बँकेतला कॅशिअर ओळखीचाच होता. जायचं अन् पाचएक हजार रुपयांची चिल्लर घेऊन यायचं असा साधा हिशेब त्याने मनाशी लावला होता. पण झालं भलतंच. बबन्याने कॅशिअरकडे चिल्लरसाठी विचारून पाच हजार रुपये काउंटरच्यावर आलेल्या हातात दिले अन् तो आपल्या गावातल्या वसुलीचे स्वप्न पाहत उभा राहिला.


"काय बबनराव, आज अगदी कोऱ्या करकरीत नोटा?" कॅशिअरने एक नोट निरखत विचारलं.
"हा खरंय." त्याचं बोलणं बबन्याने हसून साजरं केलं.
"काय एटीएममधून काढले काय पैसे?"
"अं... न्हायी, आपलं ते... व्हय. "
"अच्छा! कुठल्या एटीएममधून काढले?"


बबन्याला काही कळत नव्हतं की आज कॅशिअर एवढी चौकशी का करतोय? याआधीही बबन्याने चिल्लर करून नेले होते. ओळख असल्यामुळे काय, यायचं अन् फक्त कशी कशी चिल्लर पाहिजे ते सांगायचं. जर असतील तर देतात असा त्याचा आजपर्यंतचा अनुभव होता. पण आज हे भलतंच काहीतरी होतं.


या विचारांत असतानाच कॅशिअरने परत विचारलं, "कुठल्या एटीएममधून काढले?"
"येटीएममदून न्हाई, यका दोस्तानं दिलते."
"कोणाकडनं भेटले तुम्हाला?"
"सायेब झालया तरी काय?" बबन्याने अगदी न राहवल्यामुळे शेवटी विचारलंच.
साहेब अजून नोटा निरखून बघतच होता. आता त्याच्या मागे अजून एकदोघं सोबतीलाही होते अन् त्याच नोटा बघून आपापसात काहीतरी कुजबुजत होते.


"बबनराव या नोटा डुप्लिकेट आहेत." कॅशिअर एक दीर्घ नि:श्वास टाकून बोलले. ते ऐकून बबन्याचा चेहरा पांढराफटक पडला. आता आपल्याला पोलिसात देतील याची भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरीही न उमजून त्याच्या तोंडून शब्द गेलेच.
"म्हंजी?"
"अहो या नोटा नकली आहेत, कोणीतरी खऱ्या म्हणून तुम्हाला दिल्यात." असं म्हणून त्यांनी दोन्ही हात नोटेच्या मधोमध घेऊन ती फाडणार, तेवढ्यात बबन्या ओरडला.
"वो सायेब, अवो काय करताय?"
"अहो ही नकली नोट आहे. आम्हाला वरून तसे आदेश असतात नकली नोटा फाडून टाकायच्या म्हणून."
"पर अवो माजे पैशे कोन देईल मंग भरून."
"अहो त्यात आम्ही काही करू शकत नाही. बरं थांबा, मला हा शिक्का तर मारावाच लागेल या नोटेवर." असं म्हणून त्यांनी एक लाल शाई असलेला `नकली नोट' असा शिक्का त्या नोटेवर मारला.
"अवो पर मंग ती नोट कोण घ्यायचा न्हाई की!" बबन्या एवढं बोलेपर्यंत कॅशिअरने आपलं काम चोख केलं होतं.
नोटांकडे बघून बबन्या बोलला, "अवो सायेब आता ही नोट कोन घेईल आमच्याकडून असा शिक्का मारल्यावर? "
"अहो त्या नकली आहेत आणि तुम्ही पण सरकारला मदत करायला पाहिजे अशा नोटा फाडून." कॅशिअर मान खाली घालून काहीतरी लिहितच बोलला.
"पर अवो आमचे पैशे बुडले की याच्यात."
"हे बघा, मी काहीही करू शकत नाही. एक काम करा, त्या तिकडे माणसं दिसतायत का कोपऱ्यात? म्यानेजर साहेब येण्याची वाट पाहतायेत. तिकडे उभे रहा. त्यांना सांगून सांगून दमलोय! आम्ही यात काही करू शकत नाही. तुम्हांलाही तेच सांगतोय. ते सगळे 'नकली'वालेच आहेत."

"काय?" बबन्या जोरात ओरडला.

"अहो नाही तर काय? फुकटची डोकेदुखी आहे. कालपासून जवळपास एक लाख रुपयांच्या नकली नोटा बँकेत आल्यात आणि बाकीही बँकांत हीच अवस्था आहे." कॅशिअरने सगळी परिस्थिती सांगितली.
बबन्या त्या उभ्या असलेल्या समदु:खी लोकात मयताला आल्यासारखा येउन उभा राहिला. त्यांच्यात त्याला एकदोघे बाजूच्या गावामधलेदेखील दिसले. पण कोणी ओळख दाखवत नव्हते. त्याच्या गावचं मात्र कोणी नव्हतं.

"काय तुमची पण नकलीच का?" एकाने बबन्याला "चांगले होते नाही बिचारे?" च्या थाटात विचारलं.
"व्हय, तुमचे किती व्हते?" बबन्याने उलट प्रश्न केला.
"धा हजार."
"माजे पाच." न विचारताही बबन्याने उत्तर दिलं. नकलीवाल्यांमध्ये कोणी चिल्लर करायला बँकेत आले होते; कोणी कशाकशाचे हप्ते भरायला अन् एखादा बँकेत पैसे ठेवायला.


लवकरच म्यानेजर आले. ते आल्याआल्या जमलेल्या लोकांनी त्यांना घेरलंच. एकच गलका उडाला. जो तो त्यांना विचारू लागला. आमचे पैसे वापस द्या असं म्हणू लागला. नुसता गोंधळ माजला होता. नाही म्हणलं तरी पंधरावीस लोकंतरी असतील. काही शहाण्या लोकांनी उगा अब्रू चव्हाट्यावर यायची, नाहीतर पोलीस पकडून न्यायचे या भीतीने गपगुमान काढता पाय घेतला होता; नाहीतर संख्या अजून वाढली असती. म्यानेजर साहेबांचं म्हणणं पडलं की मी ही गोष्ट वरच्या बँकेला कळवली आहे. त्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. लोकं म्यानेजर साहेबांचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते "'आमचे पैसे परत द्या. नाहीतर बदली दुसरे पैसे द्या." असंही म्हणत होते. नुसता गोंधळ चालू होता. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. बँकेचा सिक्युरिटी गोळी नसलेली बंदूक खांद्याला अडकवून लोकांना हातानं पाखरं हुसकावल्यासारखं बाहेर काढत होता, पण लोक काही ऐकत नव्हते. ते त्याच्या डावीउजवीकडून परत येत होते.


असा सगळा गोंधळ चांगला पंधरावीस मिनिटे चालू होता. एकाएकी पोलिसांची गाडी येउन बँकेबाहेर थांबली. कोणीतरी ओरडलं, "पोलीस आले, पोलीस आले." एक क्षणभर शांतता पसरली. पण परत गोंधळ सुरू झाला. लोक पटापट बाहेर येऊ लागले. कोणी पोलिसाच्या भीतीने पळू लागलं. कोणीतरी बँकेतूनच पोलिसांना फोन केला होता, असं आल्या आल्या एका हवालदारानेच सांगितलं. त्याच हवालदाराने (सगळे शांत झाले होते तरीही) एकदा सगळ्यांना 'शांत रहा' असा हात वर करून दम दिला आणि म्यानेजर साहेबांना काय प्रकार झाला ते विचारलं.
म्यानेजरनी सगळी परिस्थिती पोलिसांना सांगितली. पोलीस जेव्हा जमावाकडे वळले तेव्हा त्या जमावात फक्त बबन्या आणि अजून चारच माणसं राहिली होती. बाकीच्या लोकांनी पोलीसांची झंझट नको म्हणून गपगुमान काढता पाय घेतला होता.


त्या प्रमुख हवालदाराने बबन्यालाच विचारलं,
"काय रे, नाव काय तुझं?"
"अं… बबन्या, आपलं …बबन."
"किती व्हते पैशे?"
"पाच हजार."
"तुला कोणी दिलते?"
"दोस्तानं दिलते."
"कोण दोस्त, त्याला कोणी दिले?"
"म्हाईत न्हाई."
"दोस्त कोण म्हाईत न्हाई व्हय रे?"
"न्हाई … ते आमच्या गावचा टेलर, रम्या"
"काठीकवडे याची जबानी घ्या." असा हुकूम सोबतच्या शिपायाला देऊन ते बाकीच्यांकडे वळले.
बबन्यासोबत इतरांच्याही जबान्या झाल्या. पोलीस-स्टेशनला जाऊन एफायार देखील दाखल केली गेली अन् बबन्या शिक्के मारलेल्या नोटा घेऊन विचारातच गावाकडे परतला.

HDA2014_blackseparator.jpg

बबन्याला कळत नव्हतं, की आपण चांगलं केलं का वाईट केलं. एक मन म्हणत होतं चांगलंच झालं. त्याला असंही वाटत होतं की आपण असल्या प्रकरणात फसायला नको होतं आणि पुन्हा आपण रम्याचं नाव घेऊन त्याचा रोष अंगावर ओढून घेतला आहे. आता तोही आपल्याला सोडणार नाही. पण आपल्याकडे इलाजच नव्हता. एकदा आपण पोलिसापुढे दोस्ताचं नाव घेतलं. परत आपण जबान बदलली असती तर ते आपल्यालाच जड गेलं असतं. कदाचित मारही पडला असता. पण गावातील एकंदर वातावरण पाहिल्यावर त्याच्या जिवात जीव आला.


खुळेवाडीतदेखील सगळ्यांच्या कानावर डुप्लिकेट नोटांच्या गोष्टी येतंच होत्या. पण खरी मजा दुसऱ्या दिवशी आली जेव्हा पेपरात जिल्हा-विशेष पानावर ठळक मोठी हेडलाईन आली. 'राजापूर तालुक्यात डुप्लिकेट नोटांचा सुळसुळाट' . बातमीमध्ये खुळेवाडीच्या बबन्याचंदेखील इतर चौघांसोबत नाव होतं. मग काय म्हणता! बबन्याचा भाव रातोरात त्याच्या मालापेक्षाही वधारला. कालपरवापर्यंत 'बबन्या' म्हणणारे आज 'बबनराव' म्हणू लागले. जो तो यायचा आणि बबन्याला विचारायचा, "काय राव कसं कसं झालं? सांगा की जरा."


मग काय, बबन्याची कळी खुलायची आणि सगळी हकीकत मीठ, मिरची, कांदा, तेल, हळद जे (दुकानात) आहे नाही ते लावून सांगायचा. काही दिवस बबन्याला त्याच्या 'माला'सकट भरपूर डिमांड आली होती. पण बबन्याची उधारी मात्र वाढत होती. एखादा यायचा आणि त्याच्याकडून असलीनकली किस्से ऐकून; त्याच्याशी जरा गोड बोलून उधारी वाढवायचा. बबन्याने पैशाचं विचारलंच तर हजाराची नोट पुढे करायचा. बबन्या कसला हजाराच्या नोटेला हात लावतोय! त्यानं हजार अन् पाचशेची धास्तीच घेतली होती आणि याचा फायदा गाववाले घेत होते. बघता बघता दिवस जात होते आणि बबन्याची उधारी वाढत होती.


खुळेवाडीत हे हाल होते तसेच काहीसे इतरही गावांमध्ये होते, आमदारसाहेबांच्या संपूर्ण तालुक्यात 'डुप्लिकेट'चाच बोलबाला होता. तालुक्यात आणि इतरही गावांमध्ये कोणीही हजारपाचशेची नवीन नोट घेत नव्हतं, काय सांगावं 'डुप्लिकेट' असेल तर!


'नव्या नवरीचे नऊ दिवस' संपले आणि बबन्याला कोण विचारीना झालं. काही हितचिंतक त्याच्या चिंता वाढवू लागले.
"कशाला या फंदात पडलास बाबा? पोलिसांचा नाद करु नये शान्या मानसानं."
"मोट्या मानसांचा हात असतोय असल्या पर्करणात. आपण उगी साक्षीबिक्षी देत फिरू नये. उगा पुना आपल्याच अंगलट येतंय." अशी बोलणी बबन्याच्या कानी पडू लागली. तो आता चांगलाच वैतागला होता. कारण उधारी वसूल होत नव्हती आणि माल भरायला जवळचे पैसेही संपले होते. त्यात आता लोक मनात काहीबाही भरवू लागले होते.

HDA2014_blackseparator.jpg

आणि अशातच एके दिवशी सकाळी सकाळी दोन शिपाई आणि एक हवालदार भरून आलेली जीप मारुतीच्या देवळासमोर थांबली. उतरल्याबरोबर त्यांनी बबन्याचं घर विचारलं. एका पोरानं ते आपलं कर्तव्य मानून चोख काम केलं आणि सगळ्यांना बबन्यासमोर आणून उभं केलं.
हातातली फायबरची काठी गोल फिरवत त्याच प्रमुख हवालदाराने विचारलं, "बबन खूळवाडकर तूच का रे?"


पोलिसांना समोर बघून बबन्याची बोबडीच वळली. क्षणभर त्याला काहीच कळलं नाही.
"अ…… व्हो." बबन्या अडखळत कसं तरी बोलला.
"तुला त्या डुप्लिकेट नोटा कोणी देलत्या म्हणला?" हवालदाराच्या आवाजात जरब होती.
"टेलरनं. रम्या नावंय त्याचं." बबन्या परत अडखळत बोलला.
"चल! घर दाखव त्याचं." अस म्हणून त्यांनी बबन्याला दुकानाच्या बाहेर काढला.
"बायला! काहीच मेळ लागंना झालाय. कुटनं आल्या एवढ्या नोटा ते चार लोकांच्या चौकशा करून झाल्या पण अजून काही धागेदोरे जुळंना झालेत." बबन्या बाहेर आल्यावर त्याला उद्देशून हवालदार बोलला.
आतापर्यंत गावात पोलीस आल्याची बातमी कळलीच होती. देवळासमोर अर्धं गाव जमा झालं.
लोकांमध्ये कुजबूज चालूच होती. कोण म्हणत होतं, "आता बबन्याला पकडून नेतेत." तर कोणी "अरं नुसती चौकशी हाये ही." असं बोलत होते. तर कोणी सरळ पोलिसांनाच विचारण्याचं धाडस करत होते.
पोलीस बबन्याला घेऊन रम्याच्या घराकडे निघाले तसं काही मानसं, पोराटोरांची वरातही त्यांच्या मागून निघाली.


घर जवळ आलं. हवालदाराने बबन्याला दार वाजवण्याची खूण केली, त्याप्रमाणे बबन्याने दार वाजवलं.
दार रम्यानंच उघडलं. रम्या दिसल्या दिसल्या बबन्याने नाव उच्चारण्याच्या आधीच हवालदाराने रम्याला धरला.
"डुप्लिकेट नोटा छापतो व्हय रे?" असं म्हणून एक कानाखाली ठेऊन दिली आणि मग विचारलं, "मशीन कुठाय सांग."
"कोणच्या नोटा सायेब, कसली मशीन?"
"ज्या नोटा तू याला दिलत्यास." बबन्याकडे बोट करून हवालदार बोलला.
"सायेब त्या नोटा म्या येटीएममदनं काडल्या व्हत्या."
"खरं सांग इथंच सगळं, स्टेशनला गेल्यावर लई महाग पडंल." गचांडी धरून हवालदार ओरडला.
"खरंच सांगतूय वो, म्या न्हाई छापल्या."
"मग कोणी छापल्या?"
"मला काय म्हाईत. "
"काठीकवडे याला घेऊन चला आपल्या सोबत, हा असा न्हाई ऐकायचा." असं म्हणून हवालदाराने वरात आल्या पावली परत जीपपर्यंत चालवली. पोलिसांनी रम्याच्या मुसक्या बांधल्या होत्या अन् त्याला पुढं पुढं ढकलत नेत होते. बबन्या मोकळाच होता.


हवालदाराचा चेहरा उजळलेला होता. काहीतरी पुरावा हाती लागला आहे हे हवालदाराचा चेहराच सांगत होता.
पोलिसांची जीप आल्यामार्गाने धुरळा उडवत परत गेली. फक्त दोन लोकं जास्त घेऊन गेली, बबन्या आणि रम्या.
रम्या पेशाने टेलर पण गुंड प्रवृत्तीचा होता. गावातील भांडणात त्याचा सक्रीय सहभाग असायचा. एकाच्या डोक्यात काठी घातल्यामुळे तो आठ दिवस पोलीस कोठडीतही जाऊन आला होता. भावकीच्या भांडणात तो नेहमी पुढं असायचा. रम्याच्या ओळखीही जबर होत्या. आमदार-खासदार लोकांपर्यंत रम्याची ओळख होती; तसंच सराईत गुंड, घरफोडेही त्याला ओळखत. त्यामुळे गावातील लोक त्याच्याशी वैर नकोच म्हणायचे. नोटा छापण्यात याचा हात असू शकतो अशी शंका हवालदाराला येणं हे साहजिकच होतं.


खरंतर रम्या घरी नाही असं बबन्याला वाटत होतं. कारण बबन्या त्याच्या घरी एकदोन वेळेस आला होता. त्याला हेच सांगायचं होतं की, मी तुझं नाव पोलिसांना अनावधानाने सांगितलंय त्यामुळे तू कुठे तरी पळून जा. पण रम्या भेटला नव्हता. रम्याच्या बायकोने 'ते गावाला गेलेत' सांगितलं होतं. पण आज रम्याला घरी बघून बबन्यालाही आश्चर्य वाटलं होतं. काल रात्रीच रम्या गावाहून परतला होता.


रम्याला पोलिसांनी धरला ही खबर हा हा म्हणता आसपासच्या गावात पोचली. इकडे आमदारांच्या गोटातही पोचली; अन् आमदार आणि त्यांचा उजवा हात असलेला बाबू यांची पाचावर धारण बसली. रम्या आणि बाबू जानी दोस्त. दोघांनी बरीच चांगलीवाईट कामे सोबतीने केली होती आणि बाबूमुळेच रम्याच्या ओळखी वाढल्या होत्या.

HDA2014_blackseparator.jpg

रम्याला पकडला हे समजल्यापासून आमदाराच्या पोटात मळमळायला लागलं होतं. सगळं रम्याच्या पोटातच राहतंय का रम्या ओकतोय याचीच चिंता त्यांना लागून राहिली होती. तशी तर त्यांची तब्येत नकली नोटा पकडल्यापासूनच बरी नव्हती. आज कधी नव्हे ते बाबूवर चिडले होते.

HDA2014_Paksha Karyalay.jpg


"तुला सांगत व्हतो हे असले धंदे नको मनून, पर आमचं येकायचंच न्हाई ना!" अंगणात येरझारा घालत ते बाबूवर उखडले.
"पर दादा, तुम्हीच तर म्हणले व्हते, इलेक्शनला पैशे न्हायीत मनून; कुटूनबी आना."
"हो, पण माजं मननं आपलं नेहमीपरमानं कोणाला तरी धरायचा, काहीतरी मंजूर करून पैशे उकळायचे."
"अवो त्यो बुवा मनला की कोणाला काईबी कळणार न्हाई, तुमी बिंदास वाट्टेल तेवढे घाणे काढा."
"अवो, घाणे काडायला ते काय जिलबी, भजे हेत का? ते मनला अन् तुमी ऐकलं. तुमी थांबलेबी कवा तर कागद संपल्यावर; शब्बास रे पठ्ठे!"
"आता मंग! तसला कागुदच कुटं भेटणा झाल्यावर कसं करणार?" बाबू निरागसपणे बोलला.
"लई शाना हाईस; ते मरूद्या. जरा आता रम्याकडं ध्यान द्या, ते काहीबी वकायला नायी पाइजेल अन् त्याला काहीपण करून भायेर काडा. " एवढं बोलून आमदार परत येरझारा घालू लागले. आमदाराचा निरोप घेऊन बाबू रम्याला बाहेर काढण्याच्या खटपटीला लागला.


रम्याला घेऊन पोलीस स्टेशनला आले आणि आल्याआल्या त्यांनी धुलाई सुरु केली. पण रम्यापण काही कच्या गुरूचा चेला नव्हता. तोपण बारा गावचं पाणी प्यालेला होता. तो पोलिसांना ताकास तूर लागू देईना. तो एवढंच म्हणायचा की "म्या येटीअममदनं काडले". रम्याला ठाऊक होतं की बाबू काहीही करून आपल्याला बाहेर काढणार, फक्त अजून थोडी कळ सोसावी लागेल.


पण रम्या आणि बाबूचं नशीब तेवढं जोरावर नव्हतं, जेवढं पोलिसांचं होतं. दुसऱ्याच दिवशी रम्याला थर्ड डिग्री लावल्यावर काही टिकाव धरता आला नाही. सगळं उलटून तो मोकळा झाला. रम्यानं जबानी दिल्यावर पोलिसांनी पटापट सूत्रं हलवली अन् बाबूच्या नावाने अटक वारंट निघालं. पण बाबूला ही खबर लागताच तो परागंदा झाला होता आणि पोलिसांना सापडण्याचं नाव घेत नव्हता. खरे गुन्हेगार सगळ्यांच्या नजरेसमोर आले होते अन् गावकरी बाबू आणि आमदाराला डुप्लिकेट नोटा दिल्या म्हणून शिव्या घालत होते. एक गोष्ट मात्र खरी होती की पुन्हा गावात बबन्याचा भाव त्याच्या मालासकट वाढला होता. जो तो बबन्याचं कौतुक करू लागला. बबन्यामुळंच सगळे पकडले गेले म्हणू लागला. पण त्याच्या मनात काही वेगळंच होतं. बबन्या आतून भेदरला होता. त्याला माहीत होतं, बाबू काही आपल्याला सोडणार नाही आणि गावात जर आपल्या नावाची अशीच चर्चा चालू राहिली तर तो अजूनच भडकेल. त्यामुळे बबन्याने हवापालट म्हणून गावातून पोबारा केला.


एकदोन दिवस गेले, गावातील बबन्याची चर्चापण आता बऱ्यापैकी कमी झाली होती. लोकं आता निकालाचीच चर्चा करत होते. तालुक्याचंच काय, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राजापूर मतदारसंघावरच होतं. 'डुप्लिकेट'वाले जुने आमदारच येणार, का लोकांना सत्तापालट पाहिजे - याचा निकाल दोन दिवसांवरच येऊन ठेपला होता. अन् निकालाच्या आदल्या दिवशीच पोलिसांनी बाबूला मुद्देमालासकट धरला अशी बातमी पेपरला आली. बाबू नोटा छापायची मशीन समुद्रात टाकून द्यायला मुंबईला चालला होता. वाटेतच पोलिसांनी धरला. ती मशीनही इम्पोर्टेड होती आणि बाबूने एका अमेरिकन माणसाकडून ती घेऊन तब्बल दोन करोड चाळीस लाख रुपये आत्तापर्यंत छापले होते. त्यातले बरेचसे इलेक्शनच्या कामामध्ये वाटले होते.


निकाल लागून आठ दिवस झाले. तसं बबन्या आपल्या गावाकडे निघाला. आत्तापर्यंत सगळं स्थिरस्थावर झालं असेल, असा अंदाज त्याने बांधला होता. वेशीवरच त्याला सुताराचा पक्या भेटला.


"काय पक्या कुणीकडं?" बबन्याने त्याला विचारलं.
"म्या व्हय, चाललोय राजापूरला अन् शाना असशील तर तू पण चल."
"का रं, असं का म्हनतुयास?" बबन्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"अरं, ते बाब्या जामिनावर सुटलंय आणि पोलिसात केस करणाऱ्याच्या मागं हाये."


बबन्या काय समजायचं ते समजला आणि आपल्या गावची वाट चालू लागला.


खरं होतं, बाबू सुटला होता कारण जुने आमदारच परत निवडून आले होते. अखेर विजय 'डुप्लिकेट' लोकशाहीचाच झाला होता.

related1: 

HDA2014_BrownSeparator.jpgHDA2014_laxmeepoojan.jpg

HDA2014_BrownSeparator.jpg

HDA2014_BrownSeparator.jpg
विशाल मधुकर चंदाले
HDA_14_vishalchandale.jpg
विशाल मधुकर चंदाले हे मूळचे परभणीचे असून सध्या पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. त्यांना वाचनाची, लेखनाची आवड आहे. तसेच काही समाजकार्य करणाऱ्या संघटनांचे ते कार्यकर्ते आहेत.

HDA2014_BrownSeparator.jpg
चारचाकी गाडी हवी आहे
पुणे परिसरातील बिना डेंटची जुनी कार हवी आहे.
शक्यतो प्रथम मालक हयात असलेली. एजंट क्षमस्व!
बढाया नको. आमचा फिटर आणून गाडी कशी आहे ते ठरवू.
टू व्हीलरवाले संपर्क करू नका. लेडी टू-व्हीलर असल्यास मेल आयडीवर संपर्क साधा - binadent@gmail.com

HDA2014_BrownSeparator.jpg

प्रतिसाद

बरी म्हणावी इतकी (च) ,पु ले शु

आवडली.

आवड्ली.. :)

नाही आवडली. शेवट खूप गुंडाळला.

वास्तव हेच आहे. कथा आवडली. पण अजून खुलवता आली असती ..

विशाल, कथेचा विषय सुरेख आहे आणि फुलवलीयेही चांगली. पण खरं सांगू? कथेचा 'बाज' शेवटपर्यंत राखला नाहीये... आणि शेवटही अकस्मात घडलाय. धक्का तंत्राचा उद्देश असेल तर... तितकासा 'धक्का' बसला नाहीये.
पण तुमची शैली छान आहे... लिहीत रहा... वाचायला आवडेल

पराग, जाई सहमत.
दाद, अनेक धन्यवाद.
बरीच गडबड झालीय लिहिताना, तरीही गोड मानून घेतलीत; सर्वांचे आभार.
पुढील प्रयत्न नक्कीच चांगला असेल.

आवडली.

आवडली कथा. वेगळा विषय, छान मांडणी.

कथा कल्पना छान आहे .. पण मध्ये मध्ये मराठीच्या पुस्तकातला धडा आहे असंही वाटतं .. तसंच चित्रंही कथेला अनुसरून वाटत नाही ..

ही कथा खूप नाही भावली.

पण कथेच्या अंकातील मांडणीसाठी शाबासकी देईन. कथेच्या पार्श्वभूमीवर हजाराची नोट ठेवण्याची कल्पना मस्त आहे.