आयुर्वेदाची बलस्थाने आणि आयुर्वेदासमोरील आव्हाने

आयुर्वेद (आयु:+ वेद) म्हणजे आयुष्याविषयीचे ज्ञान. हे ज्ञान असणे वा मिळवणे म्हणजेच उत्तम जीवन जगण्याचा मार्ग आहे. आयुर्वेदाचा पायाच शरीर आणि सृष्टीतील साधर्म्याचा विचार यांवर बेतलेला आहे. त्रिदोष, सप्तधातू व मुख्यत्वेकरून पंचमहाभूते हे मूलभूत सिद्धांत असलेल्या आयुर्वेदीय चिकीत्सेची व्याप्ती खूप मोठी आहे.'स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनं च |' म्हणजेच रोग होऊच नये म्हणून शरीराची प्रतिकार क्षमता वाढवणे, तसेच एका रोगाचा उपचार करताना नवीन रोग निर्माण होणार नाही याची काळजी घेणे. या उपचारपद्धतीत रोगाचे निदान होणे जेवढे महत्त्वाचे, त्याहूनही महत्वाचे आहे रोगास कारणीभूत ठरणारे घटक शोधणे. आयुर्वेदात फक्त रोगाचाच विचार न करता रुग्णाच्या शरीराचाही प्रामुख्याने विचार केला जातो. म्हणूनच चिकित्सा ही रोग आणि रुग्ण अशा दोघांची असते.

आयुर्वेदाबद्दल जनसामान्यात असलेले समज-गैरसमज -

१. गुण यायला लागणारा वेळ - कोणतीही उपचार पद्धती असो, जर रोगाची मूळे खोलवर पसरलेली नसतील तर रोग लवकर बरा होणारच. आयुर्वेदात प्रत्येक व्याधीच्या सहा अवस्थांचे (levels) वर्णन केले आहे. तशाच अवस्था थोडयाफार फरकाने इतरही उपचारपद्धतींत आहेत. यातील सुरुवातीच्या (early sign of disease) काळातच, 'catch them young' या धर्तीवर उपाय झाले तर रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढते. रोगाची पातळी, रुग्णाची शारीरिक आणि मानसिक स्थिती, त्याचे वय, बाह्य वातावरण यां सगळ्यांवर उपचाराचा कालावधी ठरतो. या सर्वांबरोबरच जर रुग्णाचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अपेक्षेपेक्षा लवकर गुण येतो.

२. पथ्यापथ्य - आग लागली की त्याचा स्रोत प्रथम बंद करून मग ती योग्यप्रकारे विझवली जाते. पथ्यापथ्याचेही तसेच आहे. जर रोगास कारणीभूत ठरणार्‍या हेतूंना बांध घातला तर रोगाची तीव्रता कमी होते. आगीत तेल ओतल्यावर जशी आग भडकते तसेच कुपथ्यांचे प्रमाण वाढले की उपचारांचा वेग मंदावतो.

३. एकाचे औषध दुसर्‍याने घेऊन चालते - आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तीसापेक्ष असते. एकाला उपयोगी पडणारे औषध कदाचित दुसर्‍याला त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच कधीही ते वैद्यकीय देखरेखीनुसारच घ्यावे.

४. आयुर्वेदोक्त रसकल्पांचे दुष्परिणाम? - आयुर्वेदिय औषधांचे भैषज्यकल्प (फक्त वनस्पतीजन्य औषधे) आणि रसकल्प (वनस्पतिजन्य द्रव्यांबरोबरच धातू - metals - किंवा प्राणिज पदार्थ वापरून तयार केलेली औषधे) असे दोन प्रकार आहेत. बरीचशी आयुर्वेदिक औषधे भैषज्यकल्प असतात. रसकल्पातील औषधे मूळ द्रव्यावर अनेक पद्धतशीर प्रक्रिया करून सिद्ध केल्यामुळे मूळ पदार्थाचे रासायनिक गुणधर्म पूर्ण बदलतात व ते पदार्थ शरीरसात्म्य (एकरूप) होतात. म्हणजेच त्या औषधातील घातक घटकांचे अस्तित्व नगण्य झाल्यामुळे त्याची विषाक्तता (toxicity) नाहिशी होते.

५. औषधाची एक्स्पायरी डेट - आयुर्वेदीय औषधांना समाप्ती तिथी (एक्स्पायरी डेट) असते. ठरावीक काळानंतर त्यांचा नक्कीच प्रभाव कमी होतो. म्हणून ही तारीख लिहीणे औषधिनिर्मात्यांना बंधनकारक आहे.

2013_HDA_niramay_ayurved_toshavi.JPG

आयुर्वेद चिकित्सा प्रणाली सुमारे ३००० वर्षे जुनी आहे, म्हणून त्यातील निरीक्षणे, संदर्भ आणि प्रयोग तितकेच जुने आहेत. या शास्त्राचे जतन आणि अभ्यासपूर्ण प्रसार व्हावा म्हणून CCIMच्या (Central Council of Indian Medicine) आधिपत्याखाली अनेक महाविद्यालये व संशोधन संस्था सुरू झाल्या. १९५९मध्ये भारत सरकारने Drug and Cosmetic Actच्या अंतर्गत आयुर्वेदिक औषधांचा समावेश केला. नंतर CCRASची (Central Council for Research in Ayurvedic Sciences) स्थापना झाल्यावर आयुर्वेदातील संशोधनाला अधिक चालना मिळाली. पदव्युत्तर शिक्षण घेताना संशोधन अनिवार्य केले आहे. विशिष्ट व्याधी व व्याधी-संप्राप्ती (process of development of disease) यांवर बरेच संशोशन झाले आहे. त्याचबरोबर औषधी वनस्पतींचे गुणधर्म तपासणे, औषधांच्या गुणवत्तेचे निकष ठरवणे आणि विविध औषधी द्रव्यांचे पेटंट मिळवणे यांसाठी विविध संस्था कार्यरत आहेत - उदाहरणार्थ, BHU (Banaras Hindu University), AYUSH (Department of Ayurveda, Yoga & Naturopathy, Unani, Siddha and Homeopathy), गुजराथ युनिवर्सिटी-जामनगर, MUHS (Maharashtra University of Health Sciences), तसेच FRLHT (Foundation for Revitalisation of Local Health Tradition).

आयुर्वेदासमोरील आव्हाने -

१. बाजारात येणार्‍या नव्या औषधांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन (quality control) होणे गरजेचे आहे.

२. आयुर्वेदातील मूळ संहिता संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत. त्याची स्थानिक भाषांतरे उपलब्ध आहेत. या भाषांतरांत सुसूत्रता यायला हवी.

३. तज्ज्ञ वैद्यांनी स्वतः केलेल्या प्रयोगांच्या नोंदी जतन करून ठेवाव्यात. हे ज्ञान स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांना उपलब्ध करून देण्यास त्यांना उद्युक्त केले पाहिजे.

४. वाढत्या जंगलतोडीचा परिणाम म्हणून अनेक वनस्पती मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठी औषधी वनस्पतींची मोठया प्रमाणात लागवड करायला हवी.

५. जंगलातील स्थानिक आदिवासी (जेथे आजही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत) ते झाडपाल्याचाच वापर आहार, औषध व जीवनसामुग्री म्हणून करतात. त्यांच्याकडून नवनव्या वनस्पतींची माहिती मिळवून बेसिक रिसोर्सेस वाढवता येतील.

६. आयुर्वेदातील संशोधनास वेग न येण्यामागची मुख्य अडचण म्हणजे उपलब्ध निधीची कमतरता. ती उणीव भरून काढून भारतात हे कार्य अधिक जोमाने व्हायला हवे.

आता भारतात पुष्कळ रुग्णालयांत आयुर्वेदविभाग चालू झालेले आहेत. हृदयरोग, कॅन्सर, एड्स्, मधुमेह यांसारख्या व्याधींवर वेगवेगळ्या उपचारपद्धतींचे एकत्रितपणे संशोधन सुरू आहे. आता पाश्चात्त्य देशांतसुद्धा, WHO (World Health Organization), NCCAM (National Center for Complimentary and Alternative Medicine), American Botanical Council यांसारख्या संस्थांनी यात पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.

वैद्यकीय शिक्षणात घेतलेल्या शपथेनुसार रुग्णासाठी हितकर आहे त्याचा उपयोग योग्य त्या वेळी, योग्य त्या प्रकारे रुग्णाच्या कल्याणासाठीच व्हावा, हे धोरण सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी ठेवल्यास खर्‍या अर्थाने हे म्हणणे सार्थ होईल की -

"इथे नित्य व्हावे, सुखी सर्व जीव,
इथे आयु-आरोग्य नांदो सदैव,
सदानंद, मांगल्य लाभोत सर्व,
नसो दु:ख कोणा, असो शांती सर्व."

वैद्य. तोषवी
B.A.M.S.,
P.G diploma in Panchakarma.

ऋणनिर्देश -

Central Council of Indian Medicine
AYUSH
CCRAS
आयुर्वेद रिसर्च जर्नल, गुजराथ युनिवर्सिटी
MUHS
WHO collaborating centers for traditional medicine
osteoarthritis-csir-claims-it-has-a-safer-ayurvedic-remedy
KEM hospital Ayurved research

डिस्क्लेमर - लेखाचा उद्देश केवळ आयुर्वेदाविषयी अधिक माहिती व्हावी एवढाच आहे. म्हणूनच औषधांची नावे आणि उपचार येथे कटाक्षाने टाळले आहेत. रुग्णांनी त्यांचे उपचार आपापल्या वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत.

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

लेख अधिक नेटका व्हावा म्हणून वेळोवेळी लागेल ते सहाय्य केल्याबद्दल मायबोलीकर 'शुगोल' चे मनापासून आभार!

थोडक्यात छान माहिती दिलीत

डिस्क्लेमरसकट पुर्ण लेख आवडला !

थोडक्यात पण माहितीप्रद.

चांगली माहिती पण खूपच छोटा वाटला लेख.

लेख छान झाला आहे ..

भारती +१ ..

चाचणी पोस्ट