सर्वप्रथम या विषयासाठी संयुक्ताचे आभार! आपण स्वतःचा वा दुसर्या व्यक्तीचा लिंगनिरपेक्ष विचार करु शकतो का, हा अनेक स्तर असलेला गुंता आहे आणि तो; आपण स्वतः, समोरची व्यक्ती, त्याचं-आपलं वय, नातं, हुद्दे अशा अनेक धाग्यांनी बनलेला आहे. हे या गोंधळाचे विश्लेषण नव्हे, तर त्याचे नुसते अवलोकन आहे.
एखादी व्यक्ती कशाप्रकारे भिन्नलिंगी व्यक्तीकडे पाहते, यावर सर्वात मोठा प्रभाव आपल्या पालकांच्या एकमेकातील नात्याचा असतो. माझी आई कायमच तिच्या माहेरी आणि सासरीही ’डिसिजन मेकर’ भूमिकेत होती आणि हे बाबांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले होते. स्त्री-पुरूष समानतेवरील भाषणे किंवा समुपदेशन जे साध्य करु शकणार नाही तो संस्कार त्यांचे सहजीवन सतत पाहताना माझ्यावर नक्कीच झाला.
मैत्रीचे म्हणाल तर माझ्या बाबतीत टिनएजमधलीच मैत्री पूर्णपणे लिंगनिरपेक्ष होती. 'ओह, हा मित्र नाही मैत्रीण आहे, हीच्या समोर असे वागा, हे बोला, ते बोलू नका, 'डिसेंट' राहा' इ. विचार माझ्या मनात कधीही आले नाहीत. पण मी हेही पाहिले आहे की, बहुतांश मुलींना हे चालत नाही. त्यांच्या मनात मुलाने-पुरुषाने जसे वागावे याचे जे कंडीशनिंग असते, याची पूर्तता झाली नाही तर त्या दुखावतात आणि दुरावतात.
या जंजाळातून टिकून राहिल्या फक्त दोन! मी जसा आहे तसा मला वागू देण्यात माझ्या या मैत्रिणींचा तितकाच वाटा आहे. कुठलाही मुखवटा न घालता मला त्यांच्याशी नातं जपता आलं. ही मैत्री अजूनही कायम आहे. मध्येच कधीतरी फोन जातो आणि आम्ही मुख्यतः 'आमच्या'बद्दल बोलतो, फारतर फोन ठेवताठेवता एकमेकांच्या 'कुटुंबा'ची चौकशी! या बोलण्यात कुठलाही विषय वर्ज्य नाही, आध्यात्मिक अनुभूतीपासून लैंगिक जीवनातील अनुभवांपर्यंत सर्व काही.
व्यावसायिक नातेसंबंधात मात्र असा मोकळेपणा अर्थातच नाही आणि नसावाही. कामाच्या ठिकाणी मैत्री व्हावी ही माझी अपेक्षाच नाही. त्यामुळे दिलेले काम टीम म्हणून व्यवस्थित होते आहे का यापलीकडे सहकारी पुरुष आहे की स्त्री या फंदात पडण्याची मला गरज वाटत नाही. कामातील संवेदनशीलता, पारदर्शकता, उरक आणि प्रभावीपणा हा पूर्णतया लिंगनिरपेक्ष आहे . तीच गोष्ट कम्युनिकेशनची. सहकार्यांमधला संवाद एकतर उत्तम असतो वा नसतो, त्यात ते पुरुष आहेत का स्त्री याने फार फरक पडत नाही. सभ्य भाषा आणि बॉडी लँग्वेज ही सर्वांशीच संवाद साधताना वापरायची असते याचे भान हे हवेच. उदा. मी जे विनोद मोकळेपणे माझ्या स्त्री सहकार्यांसमोर सांगू शकत नाही ते कामाच्या ठिकाणी सांगायच्या पात्रतेचे नाहीत हे लक्षात ठेवायला हवे (याचा अर्थ हे विनोद वाईट आहेत असा नव्हे, ती त्यांची जागा नाही इतकेच!). अर्थात असा मोकळेपणा निर्माण झाल्यास केवळ त्या स्त्रिया आहेत एवढ्या कारणाने असे विनोद न सांगणेही तितकेच चूक आहे.
शिक्षक असल्याने या दृष्टीने माझ्या कामातला सगळ्यात काळजीपूर्वक हाताळावा लागणारा भाग म्हणजे विद्यार्थिनी-शिक्षक संबंध. त्यातही मी कायम १४-१८ वर्षे वयोगटाला शिकवीत असल्याने जबाबदारी जास्तच वाढते. शिक्षक-विद्यार्थी संबंध तसेही अधिक मोकळे झाले आहेत आणि म्हणूनच ते मैत्रीचे ठेवत असतानाच त्यांतले अंतर कायम ठेवणे ही कसरत जमवावी लागते. या नात्यात मात्र लिंगनिरपे़क्षता आणता येत नाही, किंबहुना ती मला तरी आणता आलेली नाही. माझे विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्या आर्थिक-सामाजिक वर्गातून येतात तेथे लैंगिक स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात आहे. बहुतेक मुले-मुली आठवीपासूनच डेटिंग करतात. पुन्हा माझा विषय जीवशास्त्र, त्यामुळे त्यातील मेल-फिमेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम, मेनस्ट्रुअल सायकल इ.भाग शिकवताना विषयाचे गांभीर्य राखत मोकळेपणाने चर्चा होईल असे वातावरण तयार करावे लागते. त्यामुळे फार पारंपरिक मनोवत्तीतून या गोष्टी शिकवण्याला काही अर्थ नसतो, हे मला शिकावे लागले. ’व्हॉट इज द बेस्ट एज टू लूज व्हर्जिनिटी’ असा प्रश्न नववीतल्या एका मुलीने भर वर्गात विचारला हा माझ्यासाठी मोठा ’कल्चरल शॉक’ होता. तरीही मनातली खळबळ चेहर्यावर न येऊ देता, शिक्षक म्हणून या प्रश्नाचे समर्पक उत्तर मी देऊ शकलो. या अनुभवाने मला माझ्या मनातील पूर्वग्रह किती बळकट आहेत याचीच जाणीव करुन दिली. अर्थात ते असे एकदम जाणारही नाहीत. नवे अनुभव, लोक, विचार याच्या प्रभावानेच ते बदलतील असे वाटते. या सुरुवातीच्या धक्क्यानंतर मात्र जसजसे मला माझे विद्यार्थी कळत गेले तसा माझा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला. आज माझे माझ्या विद्यार्थिनींबरोबरचे नाते जास्त सहज आहे.
लग्नाआधी आणि नंतरची मिळून १०-११ वर्षे मी आणि माझी बायको एकमेकांना ओळखतो, अगदी ’ओळखून आहे’ म्हणावे इतके! या मुलीशी एकतर लग्न करायचे किंवा कसलेच नाते नको ('जस्ट फ्रेंड्स्'तर अजिबात नाही!) हे मी जेव्हा पक्के केले, त्यावेळी ती एक स्त्री म्हणून सर्वार्थाने मला भावली होती आणि हवी होती हे खरेच. आम्ही आधी मित्र नव्हतोच, होता ते फक्त प्रेमाचा आवेग, अत्यंत शारीर आणि पूर्णपणे लिंगसापेक्ष. मैत्री हळूहळू झाली, वाढत्या जबाबदार्या, निर्णयाचे प्रसंग यातून नात्याची समज आणि उमज आली.
पती-पत्नीच्या नात्यातही एक क्षण असा येतो की ज्यापुढे स्त्री-पुरुषपणाच्या चौकटी मोडून पडतात. स्पर्शात कसलाही उन्माद नाही, नजरेत कोणतीही वासना नाही, सोबती मिठीत आहे आणि आहे केवळ दोन व्यक्तींमधले निखळ नाते. तो क्षण मी अनुभवला आहे!
परवाचा प्रसंग. मी माझ्या मुलाला (वय वर्षे पाच) प्रेमाने जवळ घेऊन ’आय लव्ह यू’ म्हटले. त्यावर तो तत्काळ उत्तरला- ’हे बॉयने बॉयला नसतं म्हणायचं, बॉयने गर्लला म्हणायचे’- मी गपगार! त्याच्या मेंदूत शिरु लागलेली ही लिंगसापे़क्षता चांगली की वाईट हा प्रश्न अजून सुटत नाही आहे!
शेवटी एवढचं म्हणेन की मी पुरुष असल्याचे माझे भान कधीही जात नाही आणि समोरची व्यक्ती स्त्री असल्यास त्याचेही. यात माझे पालक, मैत्र, समाज या सगळ्याचाच वाटा आहे. हे काहीवेळा अनावश्यकही आहे, व्यक्तीला व्यक्ती म्हणूनच ओळखा वगैरे पटतं, पण मनाची घडण इतक्या सहज बदलत नाही. दिल है के मानता नहीं!
- आगाऊ
प्रतिसाद
लेख फारसा आवडला नाही. हा विषय
लेख फारसा आवडला नाही. हा विषय जसा गुंतागुंतीचा आहे तशीच गुंतागुंत मनात असल्यासारखं वाटलं. लेखात प्रवाहीपणा वाटला नाही.
>>कामाच्या ठिकाणी मैत्री व्हावी ही माझी अपेक्षाच नाही. त्यामुळे दिलेले काम टीम म्हणून व्यवस्थित होते आहे का यापलीकडे सहकारी पुरुष आहे की स्त्री या फंदात पडण्याची मला गरज वाटत नाही. कामातील संवेदनशीलता, पारदर्शकता, उरक आणि प्रभावीपणा हा पूर्णतया लिंगनिरपेक्ष आहे .
प्रचंड सहमत. सहकारी पुरुष आहे की स्त्री यात काहीच फरक पडत नाही आणि पडूही नये.
>>तीच गोष्ट कम्युनिकेशनची. सहकार्यांमधला संवाद एकतर उत्तम असतो वा नसतो, त्यात ते पुरुष आहेत का स्त्री याने फार फरक पडत नाही. सभ्य भाषा आणि बॉडी लँग्वेज ही सर्वांशीच संवाद साधताना वापरायची असते याचे भान हे हवेच.
माझे काही पुरुष सहकारी आहेत ज्यांच्याशी माझे अत्यंत चांगले संबंध आहेत. मैत्री आहे की नाही सांगता येणार नाही कारण कामाव्यतिरिक्त फारसं कधी संभाषण झालेलं नाही. ऑफिसमधे आल्यावर ते माझ्या आधी आले असतील तर माझ्या जागेकडे जाताना सहज कधीकधी एका-दोघांच्या पाठीवर थाप मारत "Howdy" छाप काहीतरी बोलून मी पुढे माझ्याजागेवर जातो तसंच तितकेच चांगले संबंध असलेल्या आमच्या महिला टीममेंबर्सशी वागू शकतो का? नाही!! स्त्री म्हणून तेवढं अंतर राखावंच लागतं. याचा अर्थ अशी थाप मारणे ही बॉडी लँग्वेज सभ्य नाही असा होतो का? अर्थातच नाही!!
>>उदा. मी जे विनोद मोकळेपणे माझ्या स्त्री सहकार्यांसमोर सांगू शकत नाही ते कामाच्या ठिकाणी सांगायच्या पात्रतेचे नाहीत हे लक्षात ठेवायला हवे (याचा अर्थ हे विनोद वाईट आहेत असा नव्हे, ती त्यांची जागा नाही इतकेच!). .
काही झेपलं नाही. कामाच्या ठिकाणी पुरुष सहकार्यांबरोबर आम्ही अनेकदा काही विशिष्ठ विनोद शेअर करतो - जे स्त्री सहकार्यांबरोबर सहसा शेअर करता येत नाहीत. मग ते केवळ स्त्री सहकार्यांना चालणार नाहीत म्हणून कामाच्या ठिकाणी सांगायच्या पात्रतेचे नाहीत असं समजायचं? अतर्क्य आहे!!
कधी कधी आम्ही पुरुष सहकारी कँटिनात गप्पा मारत असताना काही महिला कर्मचारी "आम्हाला पण घ्या की तुमच्यात.......डोंट्यु वरी अबाऊट नोन्व्हेज स्टफ, प्लीज कंटिन्यु" असंही म्हणतात. आणि आम्ही तसले विनोद शेअर केल्यावर त्यांच्या मते "फारच ग्रोस" नसतील तर सातमजली हसतातही. आता याला काय म्हणाल?
>>अर्थात असा मोकळेपणा निर्माण झाल्यास केवळ त्या स्त्रिया आहेत एवढ्या कारणाने असे विनोद न सांगणेही तितकेच चूक आहे.
अगदी सहमत. शेवटी कामाच्या ठिकाणी आपण इतरांशी कितपत rapport (याला मराठी प्रतिशब्द आठवला नाही) शेअर करतो त्यावर सगळं अवलंबून असतं. असंही असू शकतं की एखाद्या स्त्री सहकार्याशी तुमचा चांगला rapport असेल तर तिला तुम्ही कसलेही विनोद केलेले चालू शकतात पण दुसर्या एखाद्याशी तसा rapport नसेल तर त्याने केलेले चालणार नाहीत. मी आधी म्हटल्याप्रमाणे बर्यापैकी गुंतागुंत असलेला विषय आहे.
जबरी ! नेहमीप्रमाणेच.
जबरी ! नेहमीप्रमाणेच.
आगाऊ, अभिनंदन ! तुम्ही
आगाऊ,
अभिनंदन !
तुम्ही बर्याच प्रमाणात लिंगनिरपेक्षता अॅचिव्ह केलेली आहे असे तुम्ही दिलेल्या अनेक उदाहरणांवरून जाणवले.
लेखाचा सूर 'मला जमले, पण बाकीच्यांना जमेल असे नाही' असा वाटला.
मात्र हा लेख पूर्णपणे लिंगनिरपेक्षतेशी निगडीत आहे याबद्दल पुन्हा अभिनंदन
-'बेफिकीर'!
टीन एज मधल्या मैत्रीबाबत
टीन एज मधल्या मैत्रीबाबत विचार पटला. मलाही तशाच वातावरणात वाढवले गेले.
पुढे आयूष्यात अनेक मैत्रिणी जोडताना, हि स्त्री आहे, असा विचार माझ्या
आणि त्या स्त्रीच्या मनातदेखील कधी आला नाही. आजही, अनेक वर्षे ही नाती
कायम आहेत.
अंकाच्या मुपृवर क्लिक करताना
अंकाच्या मुपृवर क्लिक करताना मी विचारच करत होते की आगावाचा लेख असेल का?
त्यामुळे दिलेले काम टीम म्हणून व्यवस्थित होते आहे का यापलीकडे सहकारी पुरुष आहे की स्त्री या फंदात पडण्याची मला गरज वाटत नाही >>> हे पटलंच.
पती-पत्नीच्या नात्यातही एक क्षण असा येतो की ज्यापुढे स्त्री-पुरुषपणाच्या चौकटी मोडून पडतात. स्पर्शात कसलाही उन्माद नाही, नजरेत कोणतीही वासना नाही, सोबती मिठीत आहे आणि आहे केवळ दोन व्यक्तींमधले निखळ नाते. तो क्षण मी अनुभवला आहे! >>> अप्रतिम शब्दांत मांडला आहेस हा क्षण. :) वाचल्यावर जाणवलं की येस्स, हे मी देखील अनुभवलेलं आहे.
छान, प्रामाणिक लिहिलं आहेस
छान, प्रामाणिक लिहिलं आहेस आगाऊ, आवडलं. :)
<<हे या गोंधळाचे विश्लेषण
<<हे या गोंधळाचे विश्लेषण नव्हे, तर त्याचे नुसते अवलोकन आहे. >>
यातच सगळं काही आलं. या प्रचंड गुंतागुंतीच्या विषयाला हात घालणार्या संपादक आणि लेखक मंडळींचं कौतुक.
<एखादी व्यक्ती कशाप्रकारे भिन्नलिंगी व्यक्तीकडे पाहत>
हे वाचताना लिंगनिरपेक्ष विचार केवळ भिन्नलिंगी व्यक्तीच्या बाबतीतच असावी का? (जर मला भाऊ-बहिण दोघे असतील तर ते दोघे माझे केवळ भावंड असतात की त्यातही भाऊ/बहीण असा फरक असतो? आईवडील हे केवळ पालक असतात के त्यांच्या आईपणात आणि वडीलपणात फरक असतो?) तसेच अन्य व्यक्तीच्या बाबतीतच असावा का? असे प्रश्न मनात उमटले.
>> आगावाचा लेख असेल का? + १
>> आगावाचा लेख असेल का?
+ १ :-) छान लिहीलंयस आगावा. शेवटच्या परिच्छेदाला अनुमोदनच!
लेख आवडला. विचार पटले आणि
लेख आवडला. विचार पटले आणि पुष्कळसे, आपल्यालाही असेच वाटते असे वाटले.
लेख आवडला आगाऊ.
लेख आवडला आगाऊ.
सुरेख लेख आगावू!
सुरेख लेख आगावू!
आगावा, सुरेख लेख :)
आगावा, सुरेख लेख :)
आगाऊ, तुमचे लेखन नेहमी फार
आगाऊ, तुमचे लेखन नेहमी फार प्रामाणिक असते निदान मला तरी तसे वाटते. हे पण अपवाद नाही. तरी लेखाची सुरुवात आणि शेवट थोडे परस्पर विरुद्ध वाटले- तुमची (अजून टिकलेली) टीन एज मैत्री आणि 'दिल है की मानता' ही कमेंट.
रच्याकने, आमचे जीवशास्त्राचे शिक्षक इतके समजुतदार असते तर हा विषय अजून आवडला असता असे वाटले. दुर्दैवाने अतिशय पांचट विनोद (? :राग: ) करत आमच्या सरांनी हा विषय शिकवला (? :राग: )
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला.. :)
लेख आवडला.. :)
छान लिहीलय आगाऊ. अगदी नेमकं
छान लिहीलय आगाऊ. अगदी नेमकं आणि मुद्देसूद. :)
सुंदर लेख! फार आवडला.
सुंदर लेख! फार आवडला.
आगावा,छान लिहिलयस, आवडला लेख.
आगावा,छान लिहिलयस, आवडला लेख.
दुर्दैवाने अतिशय पांचट विनोद
दुर्दैवाने अतिशय पांचट विनोद (? :राग: ) करत आमच्या सरांनी हा विषय शिकवला (? :राग: ) >>> :(
मला हा लेख सर्वात जास्त
मला हा लेख सर्वात जास्त आवडला.
नेहमीप्रमाणेच आवडला रे.. मस्त
नेहमीप्रमाणेच आवडला रे.. मस्त उलगडून दाखवलायस विषय.
लेख आवडला! ’व्हॉट इज द बेस्ट
लेख आवडला!
’व्हॉट इज द बेस्ट एज टू लूज व्हर्जिनिटी’ >> नक्की काय उत्तर दिले ते वाचायला आवडेल.
सर्वांना धन्यवाद! माझ्या
सर्वांना धन्यवाद!
माझ्या मनातील खळबळ शक्य तितक्या स्पष्ट्पणे मांडायचा प्रयत्न केला तो आवडतो आहे याचे समाधान आहे.
हा विषय जाहिर झाल्यापासूनच जे सार्वत्रिक गोंधळाचे वातावरण तयार झाले तेच यावरची खरी प्रतिक्रिया आहे!
@सिंडरेला- भिन्नलिंगी व्यक्तीशी मैत्री हा लिंगनिरपेक्षतेवरील चर्चेतला केवळ एक मुद्दा झाला, तिथे तसा विचार करु शकत असलो तरी तो सर्व परिस्थितीत जमत नाही हाच तर घोळ आहे!
@ बी- ते उत्तर काहीसे असे होते - 'बायॉलॉजिकली अँड अॅज पर्सनल डीसिजन यू कॅन लूज इट व्हेन यू वाँट, बट धीस इज नेव्हर अ पर्सनल ऑर बायॉलॉजिकल डीसिजन अलोन. यूअर पेरेंट्स, सोसायटी इव्हन रिलिजन डू इन्फ्लूएन्स इट, अँड यू शुड टेक द डिसिजन कंसिडरिंग ऑल धिस. मोअरओव्हर डू नॉट गेट इन इट ओनली ड्यू टू यूअर इमोशन ऑर पॅशन, प्लीज यूज युअर ब्रेन!'
असो सेक्स एज्युकेशन किंवा अगदी स्पेसिफिक बोलायचं तर 'अवेअरनेस अबाऊट से़क्शुअॅलिटी' हा विषय नंतर कधितरी!
प्रामाणिक आणि पारदर्शी लेख!
प्रामाणिक आणि पारदर्शी लेख! खूप आवडला.
अगदी प्रामणिक लेख! चांगला
अगदी प्रामणिक लेख! चांगला वाटला वाचायला.
लेख आवडला!!
लेख आवडला!!
आगावा, लेख आवडला. :)
आगावा, लेख आवडला. :)
पती-पत्नीच्या नात्यातही एक क्षण असा येतो की ज्यापुढे स्त्री-पुरुषपणाच्या चौकटी मोडून पडतात. स्पर्शात कसलाही उन्माद नाही, नजरेत कोणतीही वासना नाही, सोबती मिठीत आहे आणि आहे केवळ दोन व्यक्तींमधले निखळ नाते. तो क्षण मी अनुभवला आहे!>>>>>>>>>
अप्रतिम! वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर अश्या निखळ नात्याची प्रत्येकालाच गरज असते, ती गरज स्वतःपुरती कोण किती अॅक्सेप्ट करतो हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. आपल्या नशीबाने आपल्या साथीदाराकडून असे निखळ नाते अनुभवता येणारी आपल्यासारखी काही मोजकी मंडळी सोडली तर बरेचदा या बाबतीत निराशाच पदरी येते.. पती पत्नीच्या नात्यात नकळत एक पोकळी निर्माण होते जी सहजा सहजी भरून निघत नाही आणि अशाच एका हळव्या क्षणी समजून घेणार्या एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीकडे तो मनुष्य खेचला जाऊ शकतो. तिथे समोरची व्यक्ती मित्र आहे का मैत्रिण हा मुद्दा खरंतर गौण असतो तिथे असते फक्त एका अंडरस्टँडिंगची गरज. तिथे लिंगसापेक्षता/निरपेक्षता वगैरे प्रकार डोक्यात सुद्धा नसतो. स्पर्श ही पराकोटीची अभिव्यक्ती आहे असं जर मान्य करायचं म्हटलं तर मनात असलेली निखळ नात्याची गरज एखादा मनुष्य त्याच्या आयुष्यात आलेल्या त्या भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर स्पर्शाच्या माध्यमातून भागवू शकतो, त्यात शारीर असं काही नसावं अॅट टाईम्स... ती फक्त मानसिक गरज असावी असं मला वाटतं.... पण या नात्यातला निखळतेला समाजमान्यता नाही. त्याकडे लिंगसापेक्षतेनेच पाहिलं जातं. एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते हा डायलॉग सार्थ ठरवला जातो.
>>पती-पत्नीच्या नात्यातही एक
>>पती-पत्नीच्या नात्यातही एक क्षण असा येतो की ज्यापुढे स्त्री-पुरुषपणाच्या चौकटी मोडून पडतात. स्पर्शात कसलाही उन्माद नाही, नजरेत कोणतीही वासना नाही, सोबती मिठीत आहे आणि आहे केवळ दोन व्यक्तींमधले निखळ नाते. तो क्षण मी अनुभवला आहे!>> अगदी अगदी.
लेख अतिशय आवडला!! :)
लेख अतिशय आवडला!! :)
>>पती-पत्नीच्या नात्यातही एक
>>पती-पत्नीच्या नात्यातही एक क्षण असा येतो की ज्यापुढे स्त्री-पुरुषपणाच्या चौकटी मोडून पडतात. स्पर्शात कसलाही उन्माद नाही, नजरेत कोणतीही वासना नाही, सोबती मिठीत आहे आणि आहे केवळ दोन व्यक्तींमधले निखळ नाते. तो क्षण मी अनुभवला आहे!>> मीही अनुभवला आहे. त्यावेळी मी ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड असतो. :)
इथे सानीच्या लेखाची आठवण काढणे साहजिक आहे:
<<<<<एका विशिष्ट व्यक्तीबाबतची शारिरीक उत्सुकता संपली की फक्त तिच्याशी मानसिक ओळख होऊ शकेल >> >>> - सानी.