लिंगनिरपेक्षता समजून घेताना

लिंगनिरपेक्षता सापेक्ष आहे आणि ती संकल्पना स्त्रीवादाशी निगडीतच आहे, असे वाटते. स्त्रीवाद म्हणजे स्त्रीवर्चस्ववाद नसून समानतेसाठी झगडा होता. मग त्याचेच derivative आणि अर्थविचाराचा प्रभाव, आधुनिकोत्तर काळ यांमुळे व्यक्तीवाद रुजला आणि फोफावला. पण त्याच्या उड्या स्त्रीवादाच्या, स्त्रीशिक्षणाच्या, मतदानासारख्या इतर मूलभूत गोष्टींच्या जिवावर आहेत. बाईपण (किंवा पुरुषपण, if you may) हे जैविक की सामाजिक किंवा किती जैविक आणि किती सामाजिक, याच्या उत्तराशी लिंगनिरपेक्षता त्या त्या व्यक्तिपुरती निगडीत असावीशी वाटते. 'मी' प्रथमत: एक व्यक्ती आहे की एक स्त्री/पुरुष? विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे, त्यामुळे सध्यापुरता काहीच गोष्टींना हात घालता येतो. दुसरे असे, की 'मी'पण शोधणे हेच किती अवघड आहे. तिसरे, नुसत्या गप्पा मारुन काय साध्य होणार? आचरणात असेल तेवढाच आपल्यापुरता त्या विषयाचा आवाका असे वाटते. बाकी निव्वळ दंभ! त्यामुळे फक्त काही उदाहरणे दिली आहेत.

पूर्णतः 'लिंगनिरपेक्ष' असणे ही जराशी रम्य कल्पना वाटते. (आणि तरीही काहीतरी घट्ट धरुन ठेवणे हा मानवी स्वभाव आहे आणि 'दिल को बहलाने के लिये ये खयाल अच्छा है गालिब') आणि काही वर्षांपूर्वी लिंगनिरपेक्ष जग असावे हा आग्रह म्हणा, स्वप्न म्हणा मनी होते हेही कबूल करायला हवे.

कामाच्या ठिकाणी लिंगाधारित भेदभाव हा संतापजनक विषय आहे. पण तरीही तो असतो, दिसतो, जाणवतो, त्याच्याशी दोन हात करावे लागतात आणि भल्याभल्या स्त्रीवाद्यांना स्वतःच्या कार्यालयात, स्वतःच्या हाताखाली पुरुष कर्मचारी हवे असताना (कशासाठी? अनेक व्यवहारिक कारणांसाठी) पाहिले की 'अर्थविचार' हेच एक अंतिम सत्य, अखेर पाय मातीचेच असेही वाटल्याशिवाय राहत नाही. तर ते एक असो.

लिंगसापेक्षतेला दिलेल्या काही छोट्या धडकांबद्दलचे अनुभव शेअर करावेसे वाटतात. काही वर्षांपूर्वी सुदूरपूर्वेच्या देशात एका ज्येष्ठ पदासाठी लोकं शोधत होते. तेव्हा एका ज्येष्ठ जपानी पुरुष उमेदवाराने माझ्याशी 'स्त्री' म्हणून बोलायला नकार दिला. 'मी बायकांशी बोलत नाही असल्या महत्त्वाच्या बाबींमध्ये, तुझ्या बॉसला घेऊन ये', असे सांगितले. मी त्याला 'हा क्लाएंट माझा आहे, बोलायचे असेल तर माझ्याशीच बोलावे लागेल!' असेही सांगितले. उभयपक्षी मनोमनी एकमेकांना लाखोली वाहून आम्ही संभाषण संपवले.

चांगल्या financial controller बाईला, केवळ स्त्री म्हणून, दैनंदिन कार्यालयीन मिटिंगमध्ये सर्वांसाठी चहा करावा लागतो, असे काही जपानी स्त्रियांने सांगितले होते. (नवरा म्हणायचा, 'मी वाट पाहतोय की तुला असे कोणीतरी करायला सांगितले ऑफिसमध्ये, आणि तू चहा ओतलास त्यांच्या अंगावर') त्या हेतुपुरस्सर अमेरिकन कार्यालयांच्या शोधात होत्या, जिथे त्यांना समान वागणूक मिळाली असती. आता त्यांना काय सांगू की, माझ्या सर्वांत मोठ्या अमेरिकन क्लाएंटला सॉफ्टवेअर टेस्टिंगसारख्या लिंगनिरपेक्ष कामासाठीसुद्धा पुरुष उमेदवारच हवा आहे. (मी गंमत म्हणून, खडूसपणे खरंतर, त्या अमेरिकी ग्राहकाला सांगीतले की, हे मला लिहून पाठव. लिहून कदापि येणार नाही हे त्याला आणि मलाही चांगलेच माहित होते. असो. )

गेली काही वर्षे एका अत्यंत पुरुषप्रधान इंडस्ट्रीत काम करते आहे. इथे पदोपदी स्त्रिया भरती करताना होणारे संभाषण चक्रावून टाकते. देशातल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या व्यवस्थापन संस्थांमध्ये सातत्याने उमेदवारांच्या मुलाखती घेताना, त्यातल्या १०-१५ % मुलींचे प्रमाण कुठेतरी अस्वस्थ करते. आपल्याकडे बायकांनी सूचना देताना, काम करताना एका विशिष्ट अलिखित संकेतानुसार वावरावे लागते. फार हुशार दिसलात, पुरुषी पद्धतीने थेट व्यक्त झालात तर गच्छंती, चारित्र्यावर शिंतोडे वगैरे.. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण काहीसे कमी होताना जाणवते आहे. माझी कार्यालयीन कामकाजात व्यक्त होण्याची पद्धत बर्‍यापैकी औपचारिक आणि गोड आहे. नाईलाज आहे! नशीबाने वापरलेल्या जहाल शब्दांची तीव्रता लोकांना जाणवत नाही आणि मुळात कोणाला मुद्दाम दुखावण्याचा स्वभाव नाही. हसण्यावारी नेऊन लोकांच्या गळी उतरवावे लागते. खरंतर असे वागणे मला अजिबात आवडत नाही. पण ये कॉर्पोरेट है बबुआ. इथले संकेत पाळावे लागतात. Gender stereotypes in communication styles abound here !

संसारात आणि मैत्रीत मात्र हे मी कटाक्षाने करत नाही. केले तर कुटुंबातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना हुश्श होईल. पण जगाच्या अंतापर्यंत 'भांडा सौख्यभरे' ही कार्यप्रणाली मला आवडते आणि मानवते. तिथे जरा मोकळा श्वास घेता येतो.

कार्यालयीन कामकाज, स्वत:च्या कामाबाबत जिव्हाळ्याने बोलणे, मुळात त्याबद्दल सिरीयसली वाटणे हे लिंगनिरपेक्ष आहे? मला बरंच काही वाटतं माझ्या कामाबद्दल, कॉर्पोरेट राजकारणाबाबत, जगाच्या इतिहासाबाबत आणि अभ्युदयाबाबत, मानवी आयुष्याबाबत, चंद्रसूर्यतारेवार्‍यांबाबत, पण व्यक्त व्हायची सामाजिक मुभा नाही आणि खूप पूर्वी कौटुंबिक मुभाही नव्हती. मला पुस्तकं वाचायची मुभा होती पण त्यात गुंतायची नव्हती. 'काही झालं तरी मुलगी आहे. पुढे कसं होणार हिचं' असे सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना वाटायचे.

It intimidates people terribly when women express opinions on the grand scheme of things in the world, not to mention irritates them to no end. So one had to tone it down. मातोश्री अजून म्हणतात ' तू फार कोरडेपणाने वागतेस, बाबांच चालून गेलं, तुझं नाही चालणार. बायकांनी असे वागून चालत नाही'. हे जरा जास्तच लिंगनिरपेक्ष वागणं आहे, असे बर्‍याच जणांना वाटते एकूणात. माझा अनुभव असा आहे की, चालतं व्यवस्थित. घरातल्या प्रत्येक तपशिलात 'माझ्याशिवाय' पान हलत नाही, असा कसलाच गोड गैरसमज नाही, घरातली प्रत्येक छोटी गोष्ट कंट्रोल करणे वगैरे होत नाही माझ्याच्याने. काSSही नुकसान होत नाही. हक्कं थोडे सोडायचे. थोडा विचार प्रत्येकाने करायचा. हो, याची किंमत मोजावी लागते. असे काहीच सहजासहजी होत नसते. संसारात होताहोईल तो लिंगनिरपेक्षता ठेवणे हा प्रयत्न आम्ही दोघंही करतो. अमूक एक काम मी करते म्हणून ते माझेच असे अजिबात नाही आणि अमूक एक काम तो करतो म्हणून त्याचेच, असेही काही नाही. काही गोष्टी अजिबात माहीत करुन घ्यायच्या नाहीत, हे तत्त्व आम्ही दोघेही पाळतो. टीका माझ्या वाट्याला जास्त येते, ती यायचीच! (टीकेने हताश होते, तेव्हा 'कुठे गेला होता राधासुता तुझा तो धर्म?' अशी मी स्वतःलाच आठवण करुन देते.) एवढ्या सगळ्या मध्यमवर्गीय (अधिक विशेषण लावायचा मोह आवरेला आहे. हुर्रे !) विचारधारांत आपले शांतपणे आनंदाने जगायचे, हेही रम्य स्वप्नच आहे. आमच्या लेखी छोटासा असणारा प्रत्येक दगड हा थेट कुठल्यानाकुठल्या अलिखित लिंगाधारित परंपरेच्या मोहोळाला लागतोच. त्यामुळे दंश आणि दाह अपरिहार्य. आणि आमच्या सामान्य आयुष्यात एवढा संघर्ष लिहिला आहे, तर मोठ्या लढायांचे त्रैराशिक मला मांडताच येत नाही. Those who can... do असेच करायचे, सध्यातरी असे ठरवले आहे. पाहूयात.

आईपणात लिंगनिरपेक्षता आचरताना मलाच जड जायचे. पण सुदैवाने नवर्‍याने पालकत्व इतके चांगले निभावले की, त्या तथाकथित लिंगनिरपेक्षतेवर माझाच पुन्हा विश्वास बसला. किंबहुना अपत्याखातर आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आमच्यातल्या लिंगाधारित भूमिका जाणता अजाणता अधिक शिथील झाल्या असेच म्हणावे लागेल. मुलगी लहान बाळ होती तेव्हा आम्ही तिला हसवायच्या, हमखास झोपवायच्या, शांत करायच्या टिपा एकमेकांना सांगायचो, अजूनही सांगतो.

अलीकडेच एक बरीच कठीण गोष्ट करावी लागली. दूरदेशी बदली झाली. तेव्हाही लिंगाधारित भूमिकेला, अपेक्षांना छेद देताना कसोटी लागली अक्षरश:. आम्ही दोघंही ठाम आहोत, काही ज्येष्ठ कुटुंबियांचे प्रॅक्टिकल पातळीवर उपकार आहेत म्हणून निभाव लागतो, नाहीतर कठिण होते.

कुसुमाग्रजांचा मौसम आहे, तेव्हा त्यांच्याच शब्दात लिंगनिरपेक्ष मैत्रीबाबत सांगायला हवे.
नात्यास अपुल्या, नाव देऊ नकोस काही
सार्‍याच चांदण्यांची, जगतास जाण नाही
व्यवहारकोविदांचा, होईल रोष होवो
व्याख्येतुनी त्यांची, प्रज्ञा वहात जाई

बहुत काय बोलावे ? मित्रमैत्रिणींशिवाय हे आयुष्य काय कंटाळवाणे झाले असते. अगदी पूर्णपणे लिंगनिरपेक्ष मैत्री असते की नाही काय माहीत. पण कमी- लिंगसापेक्ष- मैत्री मी निश्चित अनुभवली आहे.
शब्दमर्यादा !!

- रैना

प्रतिसाद

मस्त फ्लो !! आवडलंच लिखाण !!

रैना,

सुंदर लेख. तुमचे विचार अगदी योग्य शब्दांत पोहोचले.

लेखाचा रोख लिंगनिरपेक्षतेपेक्षा स्त्रीपुरुषसमानत्वाकडे आहेसे वाटते. माझ्या दृष्टीने लिंगनिरपेक्षता अमूर्त संकल्पना आहे, तर स्त्रीपुरुषसमानता हा एक मूर्त दृष्टीकोन आहे. त्यामुळे आपला लेख प्रत्यक्षदर्शी वस्तुस्थितीवर (practical reality) नेमका प्रकाश टाकतो.

लेखातल्या भेदभावाच्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. मला त्या नव्या नाहीत. मात्र ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना तोंड देता ते कौतुकास्पाद आहे. याबद्दल आपलं अभिनंदन.

आ.न.,
-गा.पै.

लेखातला अगदी प्रत्येक शब्द..प्रत्येक विचार पटला...पुढेही वाचायला आवडेल ह्याच अनुशंगाने :)

अभिप्रायासाठी सगळ्यांची आभारी आहे. :-)
तुम्हाला खरंच आश्चर्य वाटले हे वाचून मलाच आश्चर्य वाटले. अजून इथे बाकीच्या गोष्टी लिहील्याच नाहीत.

आर्क- परिस्थितीच्या रेट्याबद्दल अगदी पटले. 'मिटुन घेणे'. शब्दप्रयोगच पुरेसा बोलका आहे.
दीपक- इंट्रेस्टिंग. पुरुषाने लिहीला आहे असे वाटणे. नंतर नक्की काय फरक पडला? पटले की पटले नाही?
भरत- खरंय तुमचं निरीक्षण.
कुठल्याही जमातीचा पुरुष हे बोलु शकतो किंबहुना बोलताना ऐकले आहे >>> अनुमोदन सिंडे.
बरेचदा स्वत:ची वागणूक, स्वतःच्या अपेक्षासुद्धा तपासून घ्यायची गरज भासते.>> खरंय मेधाताई.
स्त्रीवादाचा परिणाम म्हणून पुरुषालाही माणूस म्हणून जगता यायला हवे या मुद्द्याशी सहमत, भरत.>> अनुमोदन भरत, मृदुला.
कित्येकजण कसरत करायच्या अगोदरच हार मानताना पाहिलेत.>> हो ना अरुंधती.