लिंगनिरपेक्षता समजून घेताना

लिंगनिरपेक्षता सापेक्ष आहे आणि ती संकल्पना स्त्रीवादाशी निगडीतच आहे, असे वाटते. स्त्रीवाद म्हणजे स्त्रीवर्चस्ववाद नसून समानतेसाठी झगडा होता. मग त्याचेच derivative आणि अर्थविचाराचा प्रभाव, आधुनिकोत्तर काळ यांमुळे व्यक्तीवाद रुजला आणि फोफावला. पण त्याच्या उड्या स्त्रीवादाच्या, स्त्रीशिक्षणाच्या, मतदानासारख्या इतर मूलभूत गोष्टींच्या जिवावर आहेत. बाईपण (किंवा पुरुषपण, if you may) हे जैविक की सामाजिक किंवा किती जैविक आणि किती सामाजिक, याच्या उत्तराशी लिंगनिरपेक्षता त्या त्या व्यक्तिपुरती निगडीत असावीशी वाटते. 'मी' प्रथमत: एक व्यक्ती आहे की एक स्त्री/पुरुष? विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे, त्यामुळे सध्यापुरता काहीच गोष्टींना हात घालता येतो. दुसरे असे, की 'मी'पण शोधणे हेच किती अवघड आहे. तिसरे, नुसत्या गप्पा मारुन काय साध्य होणार? आचरणात असेल तेवढाच आपल्यापुरता त्या विषयाचा आवाका असे वाटते. बाकी निव्वळ दंभ! त्यामुळे फक्त काही उदाहरणे दिली आहेत.

पूर्णतः 'लिंगनिरपेक्ष' असणे ही जराशी रम्य कल्पना वाटते. (आणि तरीही काहीतरी घट्ट धरुन ठेवणे हा मानवी स्वभाव आहे आणि 'दिल को बहलाने के लिये ये खयाल अच्छा है गालिब') आणि काही वर्षांपूर्वी लिंगनिरपेक्ष जग असावे हा आग्रह म्हणा, स्वप्न म्हणा मनी होते हेही कबूल करायला हवे.

कामाच्या ठिकाणी लिंगाधारित भेदभाव हा संतापजनक विषय आहे. पण तरीही तो असतो, दिसतो, जाणवतो, त्याच्याशी दोन हात करावे लागतात आणि भल्याभल्या स्त्रीवाद्यांना स्वतःच्या कार्यालयात, स्वतःच्या हाताखाली पुरुष कर्मचारी हवे असताना (कशासाठी? अनेक व्यवहारिक कारणांसाठी) पाहिले की 'अर्थविचार' हेच एक अंतिम सत्य, अखेर पाय मातीचेच असेही वाटल्याशिवाय राहत नाही. तर ते एक असो.

लिंगसापेक्षतेला दिलेल्या काही छोट्या धडकांबद्दलचे अनुभव शेअर करावेसे वाटतात. काही वर्षांपूर्वी सुदूरपूर्वेच्या देशात एका ज्येष्ठ पदासाठी लोकं शोधत होते. तेव्हा एका ज्येष्ठ जपानी पुरुष उमेदवाराने माझ्याशी 'स्त्री' म्हणून बोलायला नकार दिला. 'मी बायकांशी बोलत नाही असल्या महत्त्वाच्या बाबींमध्ये, तुझ्या बॉसला घेऊन ये', असे सांगितले. मी त्याला 'हा क्लाएंट माझा आहे, बोलायचे असेल तर माझ्याशीच बोलावे लागेल!' असेही सांगितले. उभयपक्षी मनोमनी एकमेकांना लाखोली वाहून आम्ही संभाषण संपवले.

चांगल्या financial controller बाईला, केवळ स्त्री म्हणून, दैनंदिन कार्यालयीन मिटिंगमध्ये सर्वांसाठी चहा करावा लागतो, असे काही जपानी स्त्रियांने सांगितले होते. (नवरा म्हणायचा, 'मी वाट पाहतोय की तुला असे कोणीतरी करायला सांगितले ऑफिसमध्ये, आणि तू चहा ओतलास त्यांच्या अंगावर') त्या हेतुपुरस्सर अमेरिकन कार्यालयांच्या शोधात होत्या, जिथे त्यांना समान वागणूक मिळाली असती. आता त्यांना काय सांगू की, माझ्या सर्वांत मोठ्या अमेरिकन क्लाएंटला सॉफ्टवेअर टेस्टिंगसारख्या लिंगनिरपेक्ष कामासाठीसुद्धा पुरुष उमेदवारच हवा आहे. (मी गंमत म्हणून, खडूसपणे खरंतर, त्या अमेरिकी ग्राहकाला सांगीतले की, हे मला लिहून पाठव. लिहून कदापि येणार नाही हे त्याला आणि मलाही चांगलेच माहित होते. असो. )

गेली काही वर्षे एका अत्यंत पुरुषप्रधान इंडस्ट्रीत काम करते आहे. इथे पदोपदी स्त्रिया भरती करताना होणारे संभाषण चक्रावून टाकते. देशातल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या व्यवस्थापन संस्थांमध्ये सातत्याने उमेदवारांच्या मुलाखती घेताना, त्यातल्या १०-१५ % मुलींचे प्रमाण कुठेतरी अस्वस्थ करते. आपल्याकडे बायकांनी सूचना देताना, काम करताना एका विशिष्ट अलिखित संकेतानुसार वावरावे लागते. फार हुशार दिसलात, पुरुषी पद्धतीने थेट व्यक्त झालात तर गच्छंती, चारित्र्यावर शिंतोडे वगैरे.. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण काहीसे कमी होताना जाणवते आहे. माझी कार्यालयीन कामकाजात व्यक्त होण्याची पद्धत बर्‍यापैकी औपचारिक आणि गोड आहे. नाईलाज आहे! नशीबाने वापरलेल्या जहाल शब्दांची तीव्रता लोकांना जाणवत नाही आणि मुळात कोणाला मुद्दाम दुखावण्याचा स्वभाव नाही. हसण्यावारी नेऊन लोकांच्या गळी उतरवावे लागते. खरंतर असे वागणे मला अजिबात आवडत नाही. पण ये कॉर्पोरेट है बबुआ. इथले संकेत पाळावे लागतात. Gender stereotypes in communication styles abound here !

संसारात आणि मैत्रीत मात्र हे मी कटाक्षाने करत नाही. केले तर कुटुंबातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना हुश्श होईल. पण जगाच्या अंतापर्यंत 'भांडा सौख्यभरे' ही कार्यप्रणाली मला आवडते आणि मानवते. तिथे जरा मोकळा श्वास घेता येतो.

कार्यालयीन कामकाज, स्वत:च्या कामाबाबत जिव्हाळ्याने बोलणे, मुळात त्याबद्दल सिरीयसली वाटणे हे लिंगनिरपेक्ष आहे? मला बरंच काही वाटतं माझ्या कामाबद्दल, कॉर्पोरेट राजकारणाबाबत, जगाच्या इतिहासाबाबत आणि अभ्युदयाबाबत, मानवी आयुष्याबाबत, चंद्रसूर्यतारेवार्‍यांबाबत, पण व्यक्त व्हायची सामाजिक मुभा नाही आणि खूप पूर्वी कौटुंबिक मुभाही नव्हती. मला पुस्तकं वाचायची मुभा होती पण त्यात गुंतायची नव्हती. 'काही झालं तरी मुलगी आहे. पुढे कसं होणार हिचं' असे सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना वाटायचे.

It intimidates people terribly when women express opinions on the grand scheme of things in the world, not to mention irritates them to no end. So one had to tone it down. मातोश्री अजून म्हणतात ' तू फार कोरडेपणाने वागतेस, बाबांच चालून गेलं, तुझं नाही चालणार. बायकांनी असे वागून चालत नाही'. हे जरा जास्तच लिंगनिरपेक्ष वागणं आहे, असे बर्‍याच जणांना वाटते एकूणात. माझा अनुभव असा आहे की, चालतं व्यवस्थित. घरातल्या प्रत्येक तपशिलात 'माझ्याशिवाय' पान हलत नाही, असा कसलाच गोड गैरसमज नाही, घरातली प्रत्येक छोटी गोष्ट कंट्रोल करणे वगैरे होत नाही माझ्याच्याने. काSSही नुकसान होत नाही. हक्कं थोडे सोडायचे. थोडा विचार प्रत्येकाने करायचा. हो, याची किंमत मोजावी लागते. असे काहीच सहजासहजी होत नसते. संसारात होताहोईल तो लिंगनिरपेक्षता ठेवणे हा प्रयत्न आम्ही दोघंही करतो. अमूक एक काम मी करते म्हणून ते माझेच असे अजिबात नाही आणि अमूक एक काम तो करतो म्हणून त्याचेच, असेही काही नाही. काही गोष्टी अजिबात माहीत करुन घ्यायच्या नाहीत, हे तत्त्व आम्ही दोघेही पाळतो. टीका माझ्या वाट्याला जास्त येते, ती यायचीच! (टीकेने हताश होते, तेव्हा 'कुठे गेला होता राधासुता तुझा तो धर्म?' अशी मी स्वतःलाच आठवण करुन देते.) एवढ्या सगळ्या मध्यमवर्गीय (अधिक विशेषण लावायचा मोह आवरेला आहे. हुर्रे !) विचारधारांत आपले शांतपणे आनंदाने जगायचे, हेही रम्य स्वप्नच आहे. आमच्या लेखी छोटासा असणारा प्रत्येक दगड हा थेट कुठल्यानाकुठल्या अलिखित लिंगाधारित परंपरेच्या मोहोळाला लागतोच. त्यामुळे दंश आणि दाह अपरिहार्य. आणि आमच्या सामान्य आयुष्यात एवढा संघर्ष लिहिला आहे, तर मोठ्या लढायांचे त्रैराशिक मला मांडताच येत नाही. Those who can... do असेच करायचे, सध्यातरी असे ठरवले आहे. पाहूयात.

आईपणात लिंगनिरपेक्षता आचरताना मलाच जड जायचे. पण सुदैवाने नवर्‍याने पालकत्व इतके चांगले निभावले की, त्या तथाकथित लिंगनिरपेक्षतेवर माझाच पुन्हा विश्वास बसला. किंबहुना अपत्याखातर आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आमच्यातल्या लिंगाधारित भूमिका जाणता अजाणता अधिक शिथील झाल्या असेच म्हणावे लागेल. मुलगी लहान बाळ होती तेव्हा आम्ही तिला हसवायच्या, हमखास झोपवायच्या, शांत करायच्या टिपा एकमेकांना सांगायचो, अजूनही सांगतो.

अलीकडेच एक बरीच कठीण गोष्ट करावी लागली. दूरदेशी बदली झाली. तेव्हाही लिंगाधारित भूमिकेला, अपेक्षांना छेद देताना कसोटी लागली अक्षरश:. आम्ही दोघंही ठाम आहोत, काही ज्येष्ठ कुटुंबियांचे प्रॅक्टिकल पातळीवर उपकार आहेत म्हणून निभाव लागतो, नाहीतर कठिण होते.

कुसुमाग्रजांचा मौसम आहे, तेव्हा त्यांच्याच शब्दात लिंगनिरपेक्ष मैत्रीबाबत सांगायला हवे.
नात्यास अपुल्या, नाव देऊ नकोस काही
सार्‍याच चांदण्यांची, जगतास जाण नाही
व्यवहारकोविदांचा, होईल रोष होवो
व्याख्येतुनी त्यांची, प्रज्ञा वहात जाई

बहुत काय बोलावे ? मित्रमैत्रिणींशिवाय हे आयुष्य काय कंटाळवाणे झाले असते. अगदी पूर्णपणे लिंगनिरपेक्ष मैत्री असते की नाही काय माहीत. पण कमी- लिंगसापेक्ष- मैत्री मी निश्चित अनुभवली आहे.
शब्दमर्यादा !!

- रैना

प्रतिसाद

>>आमच्या लेखी छोटासा असणारा प्रत्येक दगड हा थेट कुठल्यानाकुठल्या अलिखित लिंगाधारित परंपरेच्या मोहोळाला लागतोच. त्यामुळे दंश आणि दाह अपरिहार्य. >> सत्य.

सुरेख लिहिलेस.

छान लेख :)

लिंगनिरपेक्षता सापेक्ष आहे आणि ती संकल्पना स्त्रीवादाशी निगडीतच आहे, असे वाटते. >> जियो! बाकीचा लेख वाचायची गरजच नाही खरं तर..!

सुंदर लिहिलेस. अगदी प्रॅक्टिकल. :)

आमच्या लेखी छोटासा असणारा प्रत्येक दगड हा थेट कुठल्यानाकुठल्या अलिखित लिंगाधारित परंपरेच्या मोहोळाला लागतोच. त्यामुळे दंश आणि दाह अपरिहार्य. >>> मोजक्या आणि नेमक्या शब्दांत सार मांडलं आहेस.

लेख आवडला.
कामाच्या ठिकाणचे अनुभव वाचून (चहा, स्त्रीयांशी न बोलणारा जपानी) अक्षरश: हादरले !!

पूर्णच लेख आवडला. सुंदर!!

छान लेख.
म्हणजे फक्त भारतच मागासलेला आहे असे नाही, तर.

रैना, सुंदर लेख, इतका आवडला की परत परत वाचला..
तुझ्या कामाच्या ठिकाणाचे अनुभव वाचुन वाईट वाटल..

कामाच्या ठिकाणचे अनुभव वाचून आश्चर्य वाटल. लेख नेहमीसारखाच भारी लिहिला आहेस , आवडला.

रैना, छान लेख !

रैना, मला आपलं वाटायचं कामच्या ठिकाणी लिंगनिरपेक्षता जास्त आणि कौटुंबिक बाबतीत कमी असेल. आता तुम्हाला हे उलट अनुभवायला येतंय (अनुभवाला आकार देण्यात आपला वाटा असतो हे लक्षात घेऊन) हे त्यातल्यात्यात चांगलं की वाईट ?

स्त्रीवादाचा एक अपेक्षित परिणाम म्हणजे पुरुषालाही पुरुषपणातून मुक्ती मिळून माणूस म्हणून जगता यायला हवे. (?)

सुंदर लेख रैना. कामाच्या ठिकाणी गोड आणि कॉर्पोरेट हे अगदी पटले. माझ्या ऑफिसातील गोड वागणारी आणि खूप काम करून घेऊन, हाय अचीवर असणारी एक एक्झेक मी आदर्श ठरवली आहे. :-)

घरी हवे तसे वागता येते, पण कामाच्या ठिकाणी प्रॅक्टिकल वागावे लागते, तत्त्वे जरा मुरडून, गुंडाळून ठेवावी लागतात हा मुद्दा अगदी भिडलेला आहे.

स्त्रीवादाचा परिणाम म्हणून पुरुषालाही माणूस म्हणून जगता यायला हवे या मुद्द्याशी सहमत, भरत.

मस्त लिहिले आहेस रैना.
पालकत्व निभवताना लिंग निरपेक्षता ही अगदी तारेवरची कसरत आहे . आम्ही सर्व प्रकारच्या ज्येष्ट नागरिकांच्या दैनंदिन सहभागापासून ( कोण ते हस्तक्षेप म्हणतंय ? ) दूर आहोत तरी ही कसरत चुकत नाही. बरेचदा स्वत:ची वागणूक, स्वतःच्या अपेक्षासुद्धा तपासून घ्यायची गरज भासते.

घरातल्या प्रत्येक तपशिलात 'माझ्याशिवाय' पान हलत नाही, असा कसलाच गोड गैरसमज नाही, घरातली प्रत्येक छोटी गोष्ट कंट्रोल करणे वगैरे होत नाही माझ्याच्याने.>>>>>प्रचंड फायदेशीर!
वर्षानुवर्षे चालत आलेली मानसिकता [ स्त्री आणि पुरूष दोघांची]बदलणे आवश्यक!
फार सुंदर लिहिले आहेस रैना!

छान लिहिले आहेस रैना!
>>आमच्या लेखी छोटासा असणारा प्रत्येक दगड हा थेट कुठल्यानाकुठल्या अलिखित लिंगाधारित परंपरेच्या मोहोळाला लागतोच. त्यामुळे दंश आणि दाह अपरिहार्य. >> अगदी अगदी!

दंश आणि दाह अपरिहार्य >>> :) लेख आवडला. शिर्षकास साजेसे लिहिले आहेस.

ऑफिसमध्ये/इतरत्र 'घरकाम ही बायकांची जबाबदारी आहे' अशी वाक्य ऐकली ती तिळपापड होतो. ह्यात अशियन/अमेरिकन/अफ्रिकन असा काही भेदभाव नाही. कुठल्याही जमातीचा पुरुष हे बोलु शकतो किंबहुना बोलताना ऐकले आहे. सॉरी पुरुषच नाही तर बाया पण बोलतात बर्का असं. मग तर अजून संताप होतो.

'तू मॅटर्निटी साठी तीन महिने- एक क्वार्टर- नव्हतीसच म्हणून तुझा प्रमोशनसाठी विचार केला नाही' असे निर्लज्ज उत्तर देणार्‍या अमेरिकन मॅनेजरला एच आर समोर खेचून त्याच्याच प्रमोशनवर गदा आणलेली एक भारतीय बाई माझ्या माहितीत आहे. दर वेळी गोड बोलून, पॉलिटिकली कर्रेक्ट राहून चालत नाही. आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजेच.

कामाच्या ठिकाणचे अनुभव वाचून सखेदाश्चर्य वाटलं आणि तुमचा पालकत्वाचा अनुभव वाचून आनंद झाला.
लिंगनिरपेक्षता हा(ही) बायनरी कन्सेप्ट नाही. ती अखेर एक मोजपट्टी आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत / वयात / काळात / बाबतींत आपले आपणही या स्केलवर मागेपुढे होत असतो. डोळे उघडे ठेवून माणूसकी जागी ठेवणं हे एकच उत्तर. :)

छान लेख रैना! :)

'अर्थविचार' हेच एक अंतिम सत्य, अखेर पाय मातीचेच असेही वाटल्याशिवाय राहत नाही.>>>>> एकदम बरोबर. :)

प्रॅक्टीकल विचार आहेत म्हणून लेख आवडला.

छान लेख.

भांडवलशाहीच्या(चंगळवादाच्या),परिस्थीतीच्या रेट्यामुळे काही सामाजिक/कौटुंबिक बदल नैसर्गिक रित्या होत असतात,त्याला स्त्रीवादाचे,लिंगनिरपेक्षतेचे झबले आपण उगीचच घालतो.म्हणुन स्त्रीवादावर जाणीवपुर्वक ,प्रामाणिकपणे काम करणार्‍यांचे महत्व कमी होत नाही.(माझ्या आइवडीलांनी त्यांच्या अर्थिक कुवतीनुसार मुलांची संख्या मर्यादीत ठेवली ,कमी लोकसंखेमुळे पर्यावरणाचे होणारे संरक्षण असा उदात्त हेतु होता असे म्हणने खोटेपणा होइल .पण मग त्यांच्या परीस्थीतीने लादलेल्या योग्य निर्णयाचे कौतुकच नाही असे पण नाही ना होत, तसेच काहीसे)
It intimidates people terribly when women express opinions on the grand scheme of things in the world, not to mention irritates them to no end. So one had to tone it down.>> हम्म तरुणपणी त्रास होतो,पुढे योग्य वेळी आतुन मिटुन घ्यायला शिकतो आपोआप.पण हेच लोक पुढे हातात त्यांच्या पेक्षा जास्त पैसा आला किंवा अधिकाराने वरच्या पदावर असलो की आपण सहज केलेले विधानही गांभिर्याने ऐकतात असापण अनुभव आहे.
'अर्थविचार' हेच एक अंतिम सत्य :)

रैना, लेख आवडला. अभिनंदन.

शब्दमर्यादा !!
>>> बेस्ट!! :)
पटलं हे...

लिखाणही छान.

नुसत्या गप्पा मारुन काय साध्य होणार? आचरणात असेल तेवढाच आपल्यापुरता त्या विषयाचा आवाका असे वाटते. बाकी निव्वळ दंभ!>>>>>

सुरेख रैना :) आवडला तुमचा लेख.

वा!! लेख तर आवडलाच.... लिहिता लिहिता उगाच थांबलीस असे वाटले.
कामाच्या ठिकाणचे अनुभव वाचून आश्चर्य वाटले नाही, कारण असे / अशा प्रकारचे कॉर्पोरेट अनुभव इतर काही मैत्रिणींच्या तोंडून ऐकलेत. आणि त्या प्रगत देशातील प्रगत वातावरणात नोकर्‍या करणार्‍या स्त्रिया आहेत.
कौटुंबिक पातळीवरील लिंगनिरपेक्षतेबद्दल वाचून जाणवले की आजूबाजूच्या अनेक जोडप्यांना, तरुण आईबाबांना ही तारेवरची कसरत करावी लागते. कित्येकजण कसरत करायच्या अगोदरच हार मानताना पाहिलेत. आणि कितीतरीजणांना असे काही असू शकते याची जाणीव जरी झाली तरी खूप आहे असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे.

रैना,
खुप मस्त लेख. आवडला, भावला आणि पटला सुद्धा!
खरंतर असे वागणे मला अजिबात आवडत नाही. पण ये कॉर्पोरेट है बबुआ >>> खरय! स्वानुभवावरुन!

नमस्कार रैना:

सुंदर, मनमोकळ्या, मुक्तछंद लेखाबद्दल धन्यवाद.

काही सूचना देऊ का? लिंगनिरपेक्ष आहेत :)

१. >>>>>>>कार्यालयीन कामकाज, स्वत:च्या कामाबाबत जिव्हाळ्याने बोलणे, मुळात त्याबद्दल सिरीयसली वाटणे हे लिंगनिरपेक्ष आहे? मला बरंच काही वाटतं माझ्या कामाबद्दल, कॉर्पोरेट राजकारणाबाबत, जगाच्या इतिहासाबाबत आणि अभ्युदयाबाबत, मानवी आयुष्याबाबत, चंद्रसूर्यतारेवार्‍यांबाबत, पण व्यक्त व्हायची सामाजिक मुभा नाही आणि खूप पूर्वी कौटुंबिक मुभाही नव्हती. मला पुस्तकं वाचायची मुभा होती पण त्यात गुंतायची नव्हती. 'काही झालं तरी मुलगी आहे. पुढे कसं होणार हिचं' असे सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना व>>>>>>><<<<<<<<<<

वरील परिच्छेदाबद्दल थोडेसे : जग गेलं तेल लावत! तुझ्या मनाला जे योग्य आहे असं वाटतंय ते आणि तेच कर!! याबद्दल माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा शेअर करतोय. ऐक! दीपिका मुरकुटे माझी कॉलेजमधली एक छानपैकी मैत्रिण होती. आम्ही डिप्लोमा इंजिनियरिंग एकत्र केलं. पुढे आम्ही आमच्या वेगवेगळ्या मार्गाने गेलो. ती ग्लॅक्सोत असतानाची घटना: ती सुपरवायजर होती. १९९०-१९९१ साली. तिला वरिष्ठांनी ती मुलगी असल्याने दिवसाच ड्युटी कर म्हणून सांगितले. ही भांड भांड भांडली की का म्हणून तुम्ही मला रात्रपाळीला काम करुन देत नाही, माझ्यात काय कमी आहे म्हणून! मॅनेजमेंट पर्यंत प्रकरण गेलं. सार्‍यांनी हर तर्‍हेनं समजावलं की फॅक्ट्री अ‍ॅक्ट प्रमाणे त्यांना महिलांना संध्याकाळी सात नंतर कामावर थांबून ठेवता येणार नाही म्हणून......... त्यावर ही बया म्हणते की तुम्ही कायदा बदला !!! होतीच तशी आमची दीपिका डॅशिंग ! पण शेवटी पूर्ण मॅनेजमॅटने अक्षरशः व्यक्तिगत पातळीवर घरी वगैरे येऊन समजूत काढली की त्यांची काही हरकत नाहिये, पण आंतरराष्ट्र्रीय पातळीवरील कायदे त्यांना पाळावेच लागतील. हिने समजूतदारपणे भांडण मिटवले. नोकरी सोडली. स्वतःची इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग फर्म सुरु केली !! आता या मॅडम कॅनडात आहेत. :) पुढे (अगदी आता आता - २००४-२००६ मध्ये) तिला हवा तसा कायदा आलेला आहे..... पण ती इथे नाहिये. आम्ही तिला खूप म्हणजे खूपच मिस करतो. असो.

२. माझ्या मते पुरुष किंवा स्त्री प्रधानता समाजात असणं-नसणं हे त्या समाजाला काय हवं आहे यावर अवलंबून आहे. जर एखाद्या समाजाला नकोच असेल समानता, तर तुला-मला वाटून काय उपयोग ? कॉर्पोरेट जगच कशाला? किती स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात स्वतःहून पुढे येताहेत? हेच आपले दुर्दैव आहे. स्त्रियांनी माझ्या मते थोडं डॅशिंग व्हायला हवं. योग्य वाटते ते वेळोवेळी पटावून द्यायला हवं. असो.

३. माझ्या बायकोबद्दल एक उदाहरण: लग्न १९९९ साली झाले त्यावर्षीची घटना......... ती कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये त्यांच्या वेगवेगळ्या कोर्सेसना अ‍ॅडमिशन्स द्यायची व काऊन्सेलिंग करायची....... अनेक प्रकारचे फोन येत.......... एकदा एकाने हद्द केली: सारखा सारखा फोन करुन विचारु लागला की तुम्ही इंटरकोर्स शिकवता का म्हणून!! हिच्या आधी डोक्यावरुन गेलं की हा कुठ्ल्या कोर्सबद्दल चौकशी करतोय?! जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा पुढच्या कॉल च्या वेळी तिने त्या व्यक्तीला नाव वगैरे विचारुन घेतले व "तुम्हाला कुठली बॅच हवी आहे? आमच्याकडे सकाळी ९ ते १० व संध्याकाळी ६ ते ७ अशा दोन बॅच आहेत" असे सांगितले!! त्यापुढे तो फोन कधीच आला नाही. तिच्या तडफेचे कौतुक झाले. स्त्रिया अशा प्रसंगांत घाबरुन जातात तिथेच त्यांचे चुकते. ती मला आवडली यातले हे एक कारण आहेच.

४. आपल्याला वाटते तेवढ्या काही गोष्टी वाईट (किंवा चांगल्याही) नसतात. आणि स्त्री किंवा पुरुष असा प्रश्न फार महत्त्वाचा नसतोच. प्रश्न हाच असतो कुठ्ल्याही प्रसंगात की जास्तीत जास्त लोकांचा त्यात फायदा आहे की नाही. एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवावा लागतोच. कितीतरी वेळा आपल्याला कल्पनाही नसते की यश आपल्या दरवाजापर्यंत येऊन परत गेले आहे!! तेव्हा ऑल्वेज गेट गोईंग!

५. शेवटी जाता जाता आणखीन एक गंमत! मी रैना म्हणजे (कदाचित सुरेश रैना हे नाव डोक्यात बसल्यामुळे असेल) कोणी पुरुष आहे असे समजलो होतो! तुझा (वाटल्यास, "तुमचा"!) लेख वाचून कळले (चवथ्या परिच्छेदात!) की तू एक स्त्री आहेस! आणि मी पुन्हा वर जाऊन पुन्हा लेख वाचून काढला.. आणि एक गोष्ट पुन्हा जाणवली की "पुरुषाने हा लेख लिहिला आहे" असे समजून तुझा लेख वाचताना नि नंतर "स्त्रीने लिहिला आहे" असे समजून वाचताना (अधिक करुन पहिला परिच्छेद) एकाच लेखात फरक जाणवला!! म्हणजे पर्स्पेक्टिव्हचा फरक म्हणा की आणखी काही. माहिती नाही, पण असे झाले खरे.

सुंदर लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

मस्तच! खूप प्रामाणिक, प्रॅक्टिकल.

अगदी मनातल!

रैना, छान, आवडला लेख :)

अगदी सहजतेने मांडलेत विचार. लेख आवडला.
कामाच्या ठिकाणचा अनुभव खरंच खेदजनक आहे.