"या
वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणांचीही स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याचा संभव आहे. या परिस्थितीला तोंड देणे व त्यावरची उपाययोजना यासाठी आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली आहे."
बोलून होताच सुळयांनी, मुख्य सचिवांनी बैठकीवर एक नजर फ़िरवली व एक दीर्घ श्वास घेतला. तातडीची बैठक बोलावण्यामागे कारणही तसंच होतं. जुलै उलटून गेला तरी राज्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. दुष्काळाचे चटके जाणवायला सुरुवात झाली होती.
"एकदंरीत काय स्थिती आहे?" मुख्यमंत्र्यानी शांततेचा भंग करत विचारलं.
"सर, यावेळी पाऊस महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. धरणांची पातळीही खूप खालावली आहे. पुरेसा पाऊस येत्या पंधरवडयात पडला नाही तर राज्यात दुष्काळ जाहीर करावा लागेल. पेरण्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. चार्याच्या कमतरतेमुळे जनावरांचेही हाल चालले आहेत." पुनर्वसनसचिव अजित सामंतांनी अधिक माहिती दिली.
आत्तापर्यंत शांतचित्ताने ऐकत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या चेहर्यावर प्रथमच एक हलकीशी आठी उमटली.
"आपत्ती निवारण यंत्रणेची काय स्थिती आहे? काय उपाय योजना आहेत?"
"तातडीची योजना म्हणजे पाणी मुख्यत: पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश द्यावे लागतील. शेतीचा पुरवठा तोडावा लागेल. दुष्काळछावण्या,चाराछावण्या उघडाव्या लागतील. रोहयोची कामे काढणे तसेच केंद्राकडून मदत हे ही उपाय आहेत."
"हवामान खात्याकडून काही अंदाज?"
"त्यांचा अंदाज नेहमीप्रमाणे चुकलाच. आता काय ते कमी दाबाचं कारण देतायेत. " कृषीमंत्र्यांच्या या उद्गारांनी सर्वांनीच एक सुस्कारा सोडला.
"ठीक आहे. सामंत, तुम्ही तातडीनं एक तपशीलवार अहवाल द्या. कृषीमंत्री राज्यभर दौरा करुन परिस्थितीची पाहणी करतील. सुळे, तुम्ही तोपर्यत केंद्राकडून पॅकेजच्या मदतीचा पाठपुरावा करा." मुख्यमंत्र्यानी आदेश देत म्हटले.
__________________________________
बैठक आटोपली तसं सामंतांना तनवाणीने गाठलं. तनवाणी एक अजब वल्ली होता. ठेकेदारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. पण ती ठेकेदारी कोणत्या क्षेत्रात असावी याला काही सुमार नव्हता. थेट बांधकामापासून ते रॉकेल चारा पुरवठयापर्यंत त्याचा संचार कुठेही असे. कंत्राट मिळवण्याचं त्याचं कौशल्य वादातीत होतं. त्यासाठी सामदामदंडभेद वापरणे हा त्याच्या डाव्या हातचा मळ होता.
केबिनमध्ये शिरल्याशिरल्या त्याला पाहून सामंतांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. 'हा इथं कशाला तडमडला? मानेनं खबर दिली असणार. मंत्रीमंडळाच्या बैठकीची खबर एकवेळ मंत्र्यांना नसेल पण ह्या लोकांना लगेच लागते' सामंत मनोमन वैतागले.
"नमस्कार सामंतसाहेब, कसे हाय? सगळीकडे ठीक छे?" तनवाणीनं गुजरातीमिश्रित मराठीत विचारलं.
"हो, ठीकच. काय काम आहे बोला?" सामंतानी तुटक उत्तर दिलं.
"तुमी असल्यावर सगळं ठीकच असणार म्हणा. काळजीचं काय कारण!!! बाकी आज मीटिंग झाली, बराबर ना??"
"हो. बरं तुमचं काय काम??"
"काय नाय . आपलं नेहमीचंच . काय काम वगैरे असेल तर आपली याद ठेवा. सगळी कॉन्ट्रॅक्ट घेतो आपण." तनवाणीचा तुपाळ चेहरा आता फुलू लागला होता.
"हे बघा जे काय ठरलं आहे ते सगळ्यांना वेळ आल्यावर कळेल तेव्हा तुम्हालाही कळेल . या आता तुम्ही."
तनवाणीचा चेहरा आक्रसला. अजित सामंत या व्यक्तिमत्वाबद्दल ऐकलेले आता खरे होण्याची चिन्ह दिसू लागली होती. तरीही चिवट व्यापारी वृत्ती गप्प बसू देत नव्हती.
"ते ठीकच. आपल्याला सांगून बघितलं. कसंय, आपली माणसं असली की सगळ्यानांच बरं पडतं. आम्हांला तुम्हांला गवर्मेंटला. नाय का?"
"तनवाणी निघा तुम्ही आता. माने!!" सामंत जवळजवळ ओरडले.
"अरे निघतो सायेब आमी. चिडू नका, आठवण ठेवा म्हणजे झालं" तनवाणीनं थोड्या रागातच म्हटलं.
तो गेल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. या मानेला एकदा चांगलं झापलं पाहिजे. त्यानेच सांगितलं असणार. परत कधी हिंमत करणार नाही. सामंतांनी मनाशीच ठरवलं.
______________________________
घड्याळ्याने सहाचे टोले दिले. तेव्हा सामंत भानावर आले. दिवस फायली निपटण्यात कसा निघून गेला हे त्यांचं त्यांना कळलंच नाही. नोटिंग टू बी सीन , रिमार्कड कितीतरी.
"आता निघायला हवं. नीताची आणि पूर्वाची बाहेर जायची वेळ झालीय. आशिता आली असेल शाळेतून. आटपायला हवं. " ड्रायव्हरला फोन करुन गाडी काढायची सूचना त्यांनी केली.
पोर्चमधून गाडी बाहेर पडली. दिवसभर एसीच्या कृत्रिम हवेने आंबलेल्या शरीराला बाहेरच्या हवेची झुळूक मिळताच सामंत सुखावले.
अजित प्रभाकर सामंत..... १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी. मेकॅनिकल ईंजिनीअरिंग करुन युपीएससीत टॉप करणारे. देशसेवा फक्त स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत वा मॅगझीनपुरती मर्यादित नसते याचं भान ठेवणारे. मेहनतीने, मेरिटने पुनर्वसनसचिव पदापर्यंत पोहोचलेले. सेवा कारकिर्दीत लक्षणीय वाटाव्या अशा बर्याच कामगिर्या गाठीशी होत्या. कडक शिस्तीचे अधिकारी असा नावलौकिक मिळवणारे.
_________________________________________
गाडी बंगल्याच्या आवारात शिरली. तेवढयात नीता आणि पूर्वा बाहेर आल्या. निघण्याच्या गडबडीत दिसत होत्या. "आलात वेळेवर ते बरं झालं बाई. म्हटलं लक्षात राहतंय की नाही. आम्ही दोघी जरा बाहेर जातोय. आशिता आलीय शाळेतून. आम्हाला उशीर होईल. तुम्ही जेवून घ्या. लक्ष्मणला सांगितलंय तसं." नीतानं जायच्या गडबडीत सूचना केली.
जेवणं आटोपली. त्यात नेहमीप्रमाणे आशिताला जेवणासाठी लाडीगोडी लावण्याचा कार्यक्रम पार पडला. लक्ष्मण आवराआवरीच्या तयारीला लागला. सामंत बाल्कनीत आरामखुर्ची टाकून जरा रेलले. खुर्चीत पडल्या पडल्या पुस्तक वाचणं, फायली चाळणं हा त्यांचा रात्रीचा उद्योग होता. आजही वाचायला घेणार तोच आशितानं पाठून डोळे बंद केले."अगं बाई, आज झोपायचं नाही का? उद्या शाळा आहे ना? सामंतांतला आजोबा स्वरात डोकावत होता.
"बघा ना ग्रँपा, आज झोपच येत नाहीये. कंटाळा आला. आपण पत्ते खेळूयात का?
"अगं, तुझी आई आणि आजी आली आणि आपल्याला खेळताना बघितलं तर ओरडा बसेल की आपल्याला."
" पण मला काही झोप येत नाहीये."
"मग काय करावं आता बरं??"
"मला एखादी गोष्ट सांगा ना, आजी सांगते तशी."
"गोष्ट आणि मी? नाही गं बाई !!! ते माझं डिपार्टमेंट नाही. तुझ्या आजीला चांगलं जमतं ते. तिलाच येऊ दे."
"नाही,नाही, मला तुमच्याकडूनच ऐकायची आहे गोष्ट."
"अगं पण मला खरंच येत नाही गोष्ट . कसं सांगणार तुला?"
"कोणतीही सांगा, नेहमी नेहमी आजीच का म्हणून??, तुमच्या लहानपणाची सांगा ना एखादी गोष्ट."
"माझ्या लहानपणाची? वेडाबाईच आहेस!! "
"नाही, मला ऐकायचीच आहे तुमच्याकडून गोष्ट."
"बरं सांगतो. ऐक आता."
" माझं लहानपण गावात गेलं. गेल्यावर्षी आपण सगळे मिळून गेलो ते गाव तू बघितलं आहेस. आवडलं का तुला?
"हो, मला फार आवडलं. रेड सॉईल. मँगो ट्रीज. वेगळंच आहे. खूप मजा आली होती तिकडे. पण ग्रँपा, आपण गेल्या वर्षी नाही लास्ट टू लास्ट ईयरला गेलो ते गाव वेगळंच होत ना?"
"होय ग!! ते गाव घाटावरचं . तू वसूच्या गावाबद्दल बोलतेस ना??
"हो तेच."
"अगं तो पडला घाटावरचा भाग!!!!. आपलं गाव कोकणातलं. त्याच गावात माझा जन्म झाला. माझी शाळाही तिथलीच बरं. "
"ओह रिअली? खूप मजा करत असाल ना?"
"मजा?? खूप मजा करायचो. आंबे काढायचो. पोहायला जायचो. खेळायचो. मज्जाच मज्जा. माझं लहानपण तुझ्यापेक्षा फार वेगळं होतं. आमच्या वेळी टिव्ही,नेट नव्हते. मी उठायचो सकाळी लवकर. अण्णांची, तुझ्या पणजोबांची शिस्तच तशी होती. सकाळचं आटोपलं की गाईचं दूध काढणं, अंगण झाडणं, वगैरे काम मी आणि वसू मिळून करायचो. तोवर तुझी पणजी म्हणजे माझी आई मस्त पैकी चहा आणि भाकरी आणून द्यायची" सामंतांचं मन आठवणीनं गहिवरलं.
"यू मीन मिल्किंग काऊ?? यू आर ग्रेट!! तुम्ही घाबरायचा नाहीत???"
"घाबरायचं कशाला?? गोदीचा तर मी आवडता होतो. माझा हात ती बरोबर ओळखायची. "
"मग पुढे??"
"पुढे काय!! मग आम्ही शाळेत जायचो. पिशवी आणि बसायचं फडकं घेऊन. शाळेत बाक नसायचे तेव्हा. टिफीन वगैरे भानगड नसायची. वही मिळायची एका पैशाला. पेन्सिल जपून वापरायचो . अण्णांचा तसा दंडकच होता. बर्वे मास्तर होते सातवीपर्यत. तेच सगळे विषय शिकवायचे. पुढे आठवीला कोल्हापुरात शिकायला गेलो. दहावीपर्यत तिथेच शिकलो. "
"हाऊ बोरींग!! आमचे डिसूझा सर अर्धा तास शिकवतात तेव्हाच किती कंटाळा येतो. मग सुट्टीत तुम्ही काय करायचा??"
"सुट्टीत !!! सुट्टीत तर डबल मजा असायची. तू पाहिलं आहेसच. आतासारखे तेव्हा टिव्ही नसायचे. पण निसर्ग होता सोबतीला. पावसाळ्यात काही वेळेला शाळा बंद असायची. तेव्हा घरीच. उन्हाळ्यात मात्र धमाल करायचो. दिवसभर भटकणं, हुंदडणं . आंबे, कैर्या, करवंदं ,काजू हेच खाणं असायचं आमचं तेव्हा. उन्हं तर मी म्हणायची अशावेळेला. नदीवर जायचो पोहायला. किती बरं वाटायचं." सामंत अगदी रमून गेले होते.
"वॉव, तुम्हाला समर अॅक्टिव्हिटी नसायच्या शाळेतल्या. सो कूल!!!"
"नसायच्या. सुट्टी संपेतोवर शेतीची कामं सुरु व्हायची. पहिली जमीन भाजायची. नीट निस्तरुन घ्यायचं. आपल्याकडे नदी आहे त्यामुळे पेरण्याही व्हायच्या. नंतर पाऊस बघून २१ दिवसांनी लावण्या करायच्या. चिखलात मजा यायची. मग वाट पाहायची रोप पिकायची. मग कापणी आणि मग शेवटी झोडणी. मग भात तयार !!!!
"मजा येत असेल ना?" आशिताने उत्सुकतेनं विचारलं.
"होय गं . ती कामं नव्हती नुसती. आमचं सर्वस्व होतं. भाजणी केल्यानंतर आम्ही पावसाची वाट पाहायचो. तो यावा, आपल्या पाठीवर पाणी बरसवावं, झालेली काहिली शांत करावी, यासाठी डोळे लावून बसायचो. पहिला पाऊस वेड लावणारा असायचा. टपोर्या थेंबांनी मनात आश्वस्तपणा यायचा. मातीचा छान वास सुटायचा अशा वेळेला. तो धुंदपणा बेचैन करायचा. नंतरच्या पावसात ती मजा नाही. पहिला पाऊस वेगळा असतो. आई मुद्दाम पाठवायची भिजायला. घामोळी जावीत म्हणून. आणि हा पाऊस अचानक यायचा. कितीही तयारी केलेली असली तरीही ऐनवेळी धांदल उडायची. पण त्याच्या दुपटीनं बरं वाटायचं. कधी कधी त्याला उशीर व्हायचा. खूप वेगळं वाटायचं अशा वेळेला. करमायचंच नाही. गावातले सगळे आकाशाकडे डोळे लावून असायचे. " सामंतांच्या आठवणीचे पदर उलगडत होते.
त्यांना आठवू लागला होता दहावीनंतरचा पाऊस. दहावी झाल्यानंतर अण्णांनी त्यांना मुंबईत शिकायला पाठवायचं कबूल केलं होतं. शेतीची प्राथमिक कामे अजितने नेहमीच्याच उत्साहाने पार पाडली होती. पण पावसाचा अजून पत्ता नव्हता. गावातले सगळे आतल्या आत बेचैन झाले होते. चुकचुकल्यासारखं वाटत होतं. अजितही मनातून अस्वस्थच होता. पावसाची दूरवरही कुठलीच चिन्हं नव्हती. पेरते व्हा ची सुचवणी वाया गेली होती. केशवेश्वराला जलाभिषेक करायला हवा असं तात्याभटजी आडून आडून सुचवायला लागले होते. बर्याच जणांना ते मान्य करावंसंही वाटत होतं.
अशातच अजितची मुंबईला जाण्याची तारीख जवळ येत होती. पण का कोण जाणे आधी वाटलेली उत्सुकता नंतर वाटेनाशी झाली. काहीतरी राहिलंय असं सारखं वाटत होतं. तिकडे काका मुंबईची एस्टी हव्या त्या तारखेला मिळेल का या काळजीत बुडाले होते. कामावर हजर व्हायची तारीख जवळ यायला लागली. सगळं काही कोंदटून गेल्यासारखं झालं.
दिवस उलटत होते. पावसाचं मात्र नामोनिशाण नव्हतं. मधेच आभाळ भरल्यासारखं वाटे. ढग दाटून येत. पाण्याची सर मात्र जमिनीला बगल देऊन जाई. म्हातारी कुशाआत्या कडाकडा बोटं मोडी. ढगाचा काळेपणा सर्वांच्या चेहर्यावर आता दिसू लागला. उदासपण सर्वत्र भरुन राहिलं.
अशातच अजितच्या जाण्याची तारीख जवळ येऊन ठेपली. आईनं सगळी तयारी आधीच केलेली. संध्याकाळची चार वाजताची एस्टी होती. दुपारी जेवण आटोपताच काकांची लगबग चालू झाली. तालुक्याला जावं लागणार होतं. अजितला आता खर्या अर्थाने दाटून आल्यासारखं झालं. सगळं काही इथेच सोडून जावं लागणार होतं. आई, अण्णा, वसू, शाळा, मित्र, आंबे, करवंदं, नदी, झोके, रान, झाडं, पाऊस आणि इतरही बरंच काही. काय करावं ते मात्र लक्षात येत नव्हतं.
घरातल्यांचा निरोप घेतल्यावर काका, अजित आणि अण्णा तालुक्याच्या वाटेला लागले. वाटेतली ओळखीची ठिकाणं भरभर मागे पडत होती. झाडं, रस्ते तिथेच राहत होते. अजित पुढेच जात होता. शेवटी एस्टी स्टँडला तिघेही येऊन पोचले. पण उदासपण मात्र अजूनही कायम होतं. वेळ झाली तसं अण्णांनी अजितला नीट वाग , इकडची काळजी करु नकोस असं काही बोलून पोटाशी धरलं. काकांशी थोडावेळ बोलून घेतलं.
मास्तरांनी बेल वाजवली. निघण्याची वेळ आली. पण अजितचं रिकामपण तसंच राहिलं. काहीतरी राहिलंय असं सारखं वाटत राहिलं. अण्णांचा निरोप घेऊन तो गाडीत चढला. खिडकीपाशी त्याला बसवून काकांनी निवांतपणे पानाची पिशवी उघडली.
अजितने खिडकीतून बाहेर बघितलं. सगळीकडे रखरखीत, तापलेली जमीन, तापलेले ऊन, माणसंही तापलेलीच.आतून बाहेरुन. काहीतरी हवं होतं शांत करायला.
अचानक परत दाटून आलं. काळोखी पसरली. गर्दीच झाली आकाशात. पण अजितला वाटलं हे फसवंच. चकवा असतो तसा, कितीही फिरलं तरी शेवटी तिथेच आणून सोडणारा.
ढग येतात. दाटी करतात. निघून जातात. काही होत नाही. जत्रेतला जादूगार करतो तसा. खेळ दाखवत, आपण हसतो, थोडावेळ भुलल्यासारखं होतं. नंतर सर्व शांत शांत...........................
अजितनं हाताची कूस निराशेनं बदलली. तेवढयात बदाबदा पाण्याचे थेंब काचेवर जमू लागले.त्याने बाहेर पाहिलं तर पाणी कोसळू लागलं होतं. आवेग प्रचंड होता. कितीएक दिसांची ताटातूट भरुन काढण्यासाठी पाऊस झेपावत होता. तापलेली जमीन शांत होत होती. झाडझडोरा स्वच्छ होत होता. अंगावरची धूळ झटकली जात होती. जळमटं निघत होती. काहीतरी गवसलं होतं. लोकांची एकच धांदल उडाली. आडोशाची गर्दी वाढत चालली. सुखावल्यासारखं झालं सगळ्यांना. वातावरण चैतन्यानं न्हाऊन निघालं.
अजितला अचानक भरल्यासारखं झालं. काहीतरी सापडलंय आपल्याला, हरवलेलं परत गवसलंय याचा आनंद मावत नव्हता. अशातच मातीचा चिरपरिचित गंध नाकाला जाणवू लागला. त्याला भुलल्यासारख झालं. उचंबळून आलं. एकदम लपाछपीच्या डावात राज्य आलेल्याने बाकीच्या सगळ्यांना शोधून काढून साईसुट्यो करावा आणि निश्वास सोडावा असं वाटलं त्याला. जे हरवल्यासारखं वाटलं ते अखेर परत आलं. कडकडून भेटलं. तो मृद्गंध परत आला. तो आहे त्याची खात्री करुन देण्यासाठी. चित्तवृत्ती बहरुन आल्या. अचानक प्रसन्न वाटू लागलं त्याला.
मळभ पार धुवून निघालं. निश्चिंत मनाने अजित पुढे जायला निघाला.
____________________________________________________________
आशिताचा हात गळ्याभोवती पडला तेव्हा सामंत आठवणीतून जागे झाले. एवढया वेळात ते मनाने पार रमून गेले होते. समोर पाहिलं तर आशिता पेंगुळली होती. सामंत मनाशीच हसले. "खूप मागे जाऊन आलो आपण, कळलंच नाही आपल्याला. या आठवणी पुरचुंडीतल्या पोह्यासारख्या आहेत. पुरवून पुरवून खाता येतात." खुर्चीतून उठता उठता त्यांनी विचार केला.
__________________________________________________________
आशिताला तिच्या खोलीत सोडून ते परत बाल्कनीत आले. आता त्यांना का कोण जाणे बेचैन वाटू लागलं. कामाच्या फायली चाळण्याच्या प्रयत्न केला तरी त्यात मन लागेना. काहीतरी शिल्लक आहे अशी भावना मनात येऊ लागली. थोडं फिरुन पहावं म्हणून येरझार्या घालू लागले. काय होत आहे ते कळेना. नीताला फोन लावावा तर उगाच त्यांना काळजी वाटेल म्हणून त्यांनी ते रहित केलं. दिवसभराचा शीण आता अंगावर यायला लागला. उद्याच्या कामातही मन लागेना. निमूटपणे ते आराम खुर्चीत बसून राहिले. कधी त्यांचा डोळा लागला हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
हवेच्या थंडगार झोताने त्यांना जाग आली. बाहेर काळोख आरामात पसरला होता. उठून बसत त्यांनी आपला चष्मा पुसला. आणि आत जायला ते वळले.तेवढयात त्यांना झाडाची सळसळ ऐकू आली. पाहिलं तर जमीन भिजकी झालेली दिसली. पाण्याचा टपटप घनगंभीर असा आवाज ऐकू आला.आणि त्याचवेळी तो तोच चिरपरिचित मृद्गंध पुन्हा अनुभवायला मिळाला. धावतच ते बाहेर आले. तो मनभावन असा मृद्गंध त्यांनी श्वासात भरभरुन घेतला. बेचैनी, अस्वस्थता कुठच्या कुठे पळून गेली. चित्तवृत्ती पुन्हा प्रसन्न झाल्या. एक प्रकारचा आश्वासकपणा, दिलासा त्यांना परत भेटला. समोरचा पाऊस डोळ्यांवाटे पाझरु लागला. जन्मोजन्मीचा जिवलग भेटावा तसं त्यांना झालं. त्या तृप्तीच्या आनंदाने त्यांना पुरतं भारुन टाकलं.
आत टेबलावरच्या मदतीच्या उघड्या फायलीकडे पाहिलं. समाधानाने ती फाईल त्यांनी मिटून टाकली. त्या फायलीची गरज आता त्यांना पडणार नव्हती. त्यावर्षी तरी................
- जाई.साहित्ययात्री
प्रतिसाद
आवडला. एक अगदी साधा अनुभव पण
आवडला. एक अगदी साधा अनुभव पण तो दुसर्यांदा आलेला त्यामुळे भावला.
- बापू.
कथा आवडली. पण त्या
कथा आवडली. :)
पण त्या तनवाणीच्या प्रसंगाचा नंतर काहीच संदर्भ लागला नाही असे वाटले.
छान कथा आहे.
छान कथा आहे.
ठीकठाक वाटली.
ठीकठाक वाटली.
कथा उलगडण्याचं कसब आहे
कथा उलगडण्याचं कसब आहे नक्की.... पण तरीही ही कथा समोर घडत नाहीये. सगळे दुवे सांधत नाहीयेत.
जाई, ह्या कथेचं बी़ज म्हटलं तर इवलं पण म्हटलं तर अगदी सशक्तं... पण फुलवरा सगळ्याच बाजूंनी साधला नाहीये, गं.
एक छान प्रयत्नं, पण.
छाने. पण त्या तनवाणीच्या
छाने.
पण त्या तनवाणीच्या प्रसंगाचा नंतर काहीच संदर्भ लागला नाही असे वाटले. >>> +१
वा जाई ! छानच लिहिलं आहेस,
वा जाई ! छानच लिहिलं आहेस, काही सुटे दुवे राहिले तरी वातावरणनिर्मिती अन पावसाबद्दलची तीच ती जुनी अनिश्चिती , त्याच्या येण्याचं तेच ते सुखदाश्चर्य दोन्ही अनुभवांमध्ये प्रभावीपणे आलंय.
'त्यावर्षी तरी' या शेवटात सर्व दुष्काळनियोजन प्रयत्नांच्या मर्यादा कशा पावसाच्या आगमनाने स्पष्ट होतात हेही जाणवलं.
कथा बरी आहे पण त्या तनवाणी चा
कथा बरी आहे पण त्या तनवाणी चा काही अर्थ नाही लागला.
दाद ला अनुमोदन...
दाद ला अनुमोदन...
शेतकर्याचा मुलगा ते राज्याचा
शेतकर्याचा मुलगा ते राज्याचा सचिव या प्रवासात कायम राहिलेल्या पाऊस लांबल्याने झालेली कासाविशी आणि उशिराने का होईना आलेल्या पावसाने झटकलेली काळजीची धूळ या गोष्टी समर्थपणे कथेत उतरल्यात. सचिव पातळीवरच्या अधिकार्याला सहाच्या ठोक्याला ऑफिस सोडता येणं आणि पावसांच आगमन झालं एवढ्याने पुनर्वसनाच्या फायलीची गरज न वाटणे हे पटले नाही. तरीही आवडली कथा.
सर्व प्रतिसादकांचे आभार
सर्व प्रतिसादकांचे आभार
आधी वाचली होती. आता परत
आधी वाचली होती. आता परत वाचली, मस्तच.