नोबल ईज ही हू नोबल डज

हा लेख लिहिला जातो आहे, तो नोबेल पारितोषिकांचा महिना आहे. भौतिकशास्त्र, इकॉनॉमिक्स इत्यादी विषयांमध्ये नोबेल हे त्यात्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामाकरता दिले जाते (गणितात नोबेलऐवजी 'फिल्ड पारितोषिक' दिले जाते). अर्थातच नोबेल मिळवणे सोपे नाही हे वेगळे सांगणे न लागे. कधीकधी या पारितोषिकांबद्दल (इतर सर्व गोष्टींप्रमाणेच) वादविवाद निर्माण होतात (या वेळचे इकॉनॉमिक्सचे तिघांना दिले गेले ज्यांच्या थिअर्‍या एकमेकांना पूरक नाहीत). एक पारितोषिक जास्तीत जास्त तिघांमध्ये विभागून देता येते (या वेळचे हिग्जच्या शोधाकरताचे दोघांनाच दिले गेले. L.H.C. या संस्थेलापण द्यायला हवे होते, असे अनेकांचे म्हणणे आहे). मरणोत्तर दिले जात नाही (म्हणूनच हा हिग्ज कण हा 'द' हिग्ज कण आहे की नाही, याचा पूर्ण तपास व्हायच्या आधी तोच गोड [पार्टिकल] मानून आयुष्याच्या नवव्या दशकात असलेल्या चिरतरुण प्रोफेसर पीटर हिग्जना दिले गेले, असे काही खोडसाळ लोकांचे म्हणणे आहे) एकदा तुमचे नाव शक्यतांच्या यादीत गेले, की अनेक वर्षं तसेच राहते आणि अनेक दशकांपर्यंत जाहीर केले जात नाही (तुमचे असल्यास तुम्हांला नोबेल मिळेपर्यंत किंवा तुम्ही मरेपर्यंत कळण्याची शक्यता नाही).

पण हा लेख नोबेल पारितोषिकांबद्दल नाही. खुद्द नोबेलबद्दलही नाही. हा आहे नोबेल पारितोषिकाचा बहुमान चक्क दोनदा मिळालेल्या एका व्यक्तीबद्दल. (पुढे वाचण्याआधी दोन मिनिट थबकून ओळखून/आठवून पाहा असे कोण असू शकेल ते). अशा तब्बल चार (!) व्यक्ती आहेत (रेड क्रॉस - ३ आणि शरणागतांकरताचे U.N. High Commission - २ या संस्थांना वगळून). फ्रेडरीक सॅंगरला दोनदा रसायनशास्त्रात (एकदा त्यातील अर्धे - म्हणजे विभागून), जॉन बारडीनला दोनदा भौतिकशास्त्रात (दोन्ही वेळा एक-तृतियांश), मेरी क्युरीला एकदा भौतिकशास्त्रात (एक-तृतियांश), तर एकदा रसायनशास्त्रात (अख्खं). विज्ञानाच्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये नोबेल मिळवणारी ती एकमेव व्यक्ती. हा लेख आहे तो उरलेल्या चौथ्या व्यक्तीबद्दल, लायनस पाव्लिंगबद्दल. तो एकटा असा आहे, ज्याला दोन्ही वेळा एकट्याला पारितोषिक मिळाले. एकदा रसायनशास्त्राकरता (१९२०मध्ये सुरू झालेल्या क्वांटम केमिस्ट्रीमधील कामासाठी १९५४मध्ये) आणि एकदा चक्क शांतता पुरस्कार (१९४६ साली सुरू केलेल्या युद्धविरोधी अ‍ॅक्टीविझमबद्दल १९६२मध्ये). त्याची डी.एन.ए.च्या स्ट्रक्चरच्या शोधाकरताही वॉटसन आणि क्रीकबरोबर चढाओढ होती, पण ते एक स्वतंत्र प्रकरण आहे. अर्थातच हा लेख त्या दोन नोबेल पुरस्कारांबद्दल नाहीच, पण त्या सालांचा कदाचित उपयोग होईल.

पाव्लिंग (खूप) हुशार होता, यात शंकाच नाही. त्याच्या रसायनशास्त्रातील कामामुळे एका नव्या उपशाखेचा जन्म झाला. पण १९४१ साली त्याला किडनीचा त्रास होऊ लागला (nephritic syndrome). तसे असताना थॉमस अ‍ॅडीस या नेफ्रॉलॉजिस्टने त्याला सुचवले, की मीठ कमी करण्याबरोबर मल्टीव्हिटॅमिन घे, तुला बरे वाटेल. लायनसने तसे केले आणि त्याला बरे वाटले.* मग त्याने त्याचा थोडा प्रसार केला आणि तत्सम इतर गोष्टींवर वाचन, मनन आणि लिखाण केले. १९६६च्या एका भाषणात अजून बरेच काम करण्याकरता २५ वर्षे जिवंत रहायला आवडेल, असे म्हटले (तेव्हा त्याचे वय होते ६५). श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या इर्वीन स्टोन नामक बायोकेमिस्टने पत्र लिहून लायनसला कळवले, की त्याने रोज ३ ग्रॅम व्हिटॅमिन सी घेतल्यास तो २५ वर्षे सहज जगेल. 'डॉ.' स्टोन या महाशयांची डिग्री मेडिकल नव्हती. पाव्लिंगने मात्र भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी घेणे सुरू केले, त्यामुळे त्याला बरे वाटले, त्याला नेहमी असणारा सर्दीचा त्रास गायब झाला, आणि त्याने आपला डोस हळूहळू १८ ग्रॅम रोज पर्यंत वाढवला ('रेकमेंडेड' डोसच्या ३०० पट). [१९६४मध्ये कॅलटेक सोडून लायनस सँटा बार्बराला गेला होता. नंतर १९६७मध्ये सॅन डिएगोला, तर १९६९मध्ये स्टॅनफर्डला].

2013_HDA_noble_aschig.jpg

स्वत:पर्यंत तो व्हिटॅमिन सी घेणे राहू देता, तर हरकत नव्हती. पण त्याने त्यावर पुस्तके लिहिण्याचा सपाटा लावला. 'व्हिटॅमिन सी खा आणि सर्दी पळवा', 'फ्लू पासून वाचायचे आहे? व्हिटॅमिन सी खा' यासारखी (ही नव्हे) सनसनीखेज नावे असलेली पुस्तके. त्याच्यासारख्या नावाजलेल्या व्यक्तीचा सल्ला जनता कशी डावलणार? व्हिटॅमिन्सचा खप हां हां म्हणता खूप वाढला. खरेतर अनेक दशकांपूर्वीच झालेल्या संशोधनात व्हिटॅमिन सी घेण्याचा आणि सर्दी होण्या - न होण्याचा संबंध नाही, हे दाखवले गेले होते. लायनसच्या दाव्यानंतर आणखी प्रयोग केले गेले. 'व्हिटॅमिन सी'चा उपयोग प्लसेबोपेक्षा जास्त नाही, याची पुन:प्रचीती या प्रयोगांमधून आली. पाव्लिंगने मात्र 'व्हिटॅमिन सी'चा प्रचार आणि प्रसार थांबवला नाही. त्याला सर्दी होत नव्हती, असे नाही. पण तसे झाले की अ‍ॅलर्जीज आहेत म्हणून तो ते धुडकावून लावी. जेव्हा या प्रकाराला डॉक्टरांकडून असलेला विरोध वाढला तेव्हा तर त्याने असे म्हणणे सुरू केले, की व्हिटॅमिन सी घेतल्याने कॅन्सरपण बरा होतो. 'व्हिटॅमिन सी'चे दुष्परिणाम नसतात, असे ही लायनस छातीठोकपणे सांगायचा. [त्याच्या पत्नीचा मृत्यू पोटाच्या कर्करोगाने झाला.]

अशातच ग्लासगोमधील कोण्या डॉक्टरने त्याला सांगितले, की त्यांनी व्हिटॅमिन सी कॅन्सर रुग्णांना देण्याचा प्रयोग केला आणि खरेच त्या रुग्णांना इतरांपेक्षा बरे वाटले. लायनसने अत्यानंदाने यावर एक पेपर लिहून 'नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स'ला पाठवला. त्यांनी तो प्रकाशित न करता परत पाठवला. चौकशीअंती असे आढळले, की ग्लासगोतील त्या इस्पितळात त्यातल्या त्यात सुदृढ लोकांनाच व्हिटॅमिन सी देण्यात आले होते. लायनस मात्र नियतकालिकांमध्ये व्हिटॅमिन सी वापरून कॅन्सर बरे करण्याबाबतचे गोडवे गातच राहिला. आता तर त्याने इतरही सप्लिमेण्ट्सबद्दल संशोधनाविना बोलणे सुरू केले. अशा वेळी आपल्याला अनेकदा दिसते तसेच होऊ लागले - कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांचे आप्त आशेचा किरण दिसल्यागत या ट्रीटमेण्ट्सची त्यांच्या डॉक्टरांकडे मागणी करू लागले. यावर मग मेयोनी अजून एक चाचणी केली व दाखवले की 'व्हिटॅमिन सी'ने काही फरक पडत नाही. आता पाव्लिंग म्हणू लागला, की आधी केमोथेरपी झाली असेल, तर अशा रुग्णांना फायदा होत नाही. म्हणजे नुसतेच मी म्हणतो तसे काही करू नका, तर फक्त तसेच करा. (Sounds familiar?) मग तशीही एक चाचणी केली गेली. पुन्हा काही फरक नाही. त्या डॉक्टरांनी खोटे रिपोर्टस् बनवले म्हणून पाव्लिंग वकिलांकडे गेला. त्याच्या वकिलांनी केसला वजन नाही, असे सांगून त्याला कोर्टात जाण्यापासून परावृत्त केले.

पाव्लिंगचा हेकेखोरपणा सुरूच होता. व्हिटॅमिन सीसोबत त्याने लोकांना व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन ए, सेलेनियम इ. गोष्टी प्रचंड डोसेसमध्ये घ्या, असे सांगणे सुरू केले. का? तर त्यामुळे ताप, डायबिटीस, आर्थ्रायटिस, टिटॅनस, खोकला, अल्सर, फ्रॅक्चर, सर्पदंश आणि इतर अनेक गोष्टी बर्‍या होतात. एड्ससुद्धा व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेण्ट्सच्या परिणामकारकतेतून सुटला नाही. विश्वास ठेवणारे ठेवत होते, व्हिटॅमिन पुरवणारे पुरवत होते. अनेक खिसेभरुंनी त्याची री ओढणे सुरू केले. काही अल्टरनेट मेडिसिनवाले डॉक्टरपण त्याला सपोर्ट करू लागले. मग जाहिरातींमधून अशा डॉक्टरांचे दाखले दिले जात. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असलेली अॅण्टी-ऑक्सिडंट तत्त्वं कृत्रिमरीत्या दिली तर तोच फायदा मिळायला हवा, असे वरवर वाटले तरी तसे मुळीच नसते. खरं तर संशोधनाअंती दिसून आले आहे की अशा गोष्टींचे मोठे डोस घेतल्यास फुफ्फुसांचा कर्करोग आणि हृदयविकार व्हायची शक्यता जास्त असते. हे संशोधन १९९४चे. त्या साली लायनस पाव्लिंगचे देहावसान झाले - प्रोस्ट्रेटच्या कर्करोगानेच. पण व्हिटॅमिन पॅथीचे नाही. त्यानंतर झालेल्या अनेक अभ्यासांमध्ये मोठ्या प्रमाणात सप्लिमेण्ट्स घेण्याचे धोके दिसून आले आहेत (उदा. वेगवेगळे कर्करोग बळावणे). थेट अन्न खाण्यातून मिळणारे फायदे तीच तत्त्वं असलेल्या पूरकांद्वारे मिळवल्यास त्याचा फायदा होत नाही, हा थेट निष्कर्ष आहे. व्हिटॅमिन्सना फूड अॅंड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनची (F.D.A.) 'औषध' म्हणून मान्यता नाही. मात्र व्हिटॅमिन इंडस्ट्रीचे व्यवहार २०१०मध्ये ७० बिलियन डॉलर्सच्या घरात होते.

माझी डॉक्टरेट मेडिकल प्रकारची नाही. शिकलेल्या भौतिक/रसायन/जीवशास्त्रातून मला शरीराबद्दल, त्यातील जीव-रासायनिक बदलांबद्दल आणि सूक्ष्मपातळीवरील आण्विक बलांबद्दल मात्र थोडेफार नक्कीच कळते. आणि अर्थातच थोडाफार कॉमन-सेन्स आणि थोडे लॉजिक. मला शक्य झाल्यास एवढे ठसवायचे होते, की एखादी गोष्ट कोणी नावाजलेली व्यक्ती सांगते म्हणून मानायला नको. सांगितली जात असलेली गोष्ट किती विज्ञाननिष्ठ आहे, त्यावर किती प्रयोग झाले आहेत आणि नसल्यास का नाही या सर्व बाबींचा तपास करायला हवा. अल्टरनेट मेडिसिनचे आपले स्थान आहे, पण ते जीवनदायी मॉडर्न मेडिसिनऐवजी वापरणे कितपत योग्य आहे? प्राचीन, नैसर्गिक, ऑर्गॅनिक अशा शब्दांना न भुलता उपचारांबाबत उघड्या मनाने निर्णय घेता यायला हवा. घाईघाईने तपास न करता उपचारांबाबत निर्णय घेणे खचितच हानिकारक ठरू शकते. अनेकदा अगतिकतेमुळे आणि रूढ उपाय थकल्याने लोक तपास न करता वेगळे उपाय वापरून पाहतात. अशाच वेळी त्यांच्यामुळे अपायसुद्धा होऊ शकतो, हे लक्षात ठेवायला हवे. खासकरून केवळ कुणाच्या अनुभवावरून एखादी गोष्ट सिद्ध होत नाही, हेही समजून घ्यायला हवे. आपली तब्येत सर्वात मौल्यवान गोष्टींपैकी एक. शरीराच्या मरम्मतीकरता त्याला अनुरूप आदरयुक्त महत्त्व देणे गरजेचे आहे. आपल्या आणि आपल्या आप्तांच्या.

References:
Do You Believe in Magic? by Paul Offit: http://www.amazon.com/books/dp/0062222961

Pauling's Nobel lecture from 1954: http://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1954/pauling-...
Paulings Nobel lecture from 1962: http://www.nobelprize.org/nobel_prizes/peace/laureates/1962/pauling-lect...

Wikipedia entries:
Linus Pauling: http://en.wikipedia.org/wiki/Linus_Pauling
Ascorbic Acid: http://en.wikipedia.org/wiki/Ascorbic_acid
Megavitamins: http://en.wikipedia.org/wiki/Megavitamin_therapy

Intravenous Vitamin C: http://www.medpagetoday.com/CelebrityDiagnosis/41227
Vitamin Industry: http://www.reportlinker.com/ci02037/Vitamin-and-Supplement.html
Which vitamins not to take: http://www.forbes.com/sites/stevensalzberg/2013/10/07/the-top-five-vitam...

- आशिष महाबळ (Aschig)

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

त्याच्या पत्नीचा मृत्यूप्रोस्टेटच्या कर्करोगाने झाला.

काहितरी प्रिंटींग मिस्टेक आहे.

आणि तो ही विथ ऑल हिज बिलीफ नव्वदी पार करूनच गेला की हो.
आणखीन काय पाहिजे? ;)

शास्त्रज्ञ स्वतःच्या थिअरीच्या प्रेमात पडतात, भावनेच्या भरात वाहवत जातात, कायमच लॉजिकली विचार करत नाहीत हे पॉलिंगच्या कथेवरुन समजते. विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्याबद्दलच्या स्टिरिओटाईपला छेद देण्यासाठी हे उदाहरण वर्गात अनेकदा दिले आहे.

साती/पळस, चुक नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
बदल करण्यात आला आहे.

झकास लेख. विटॅमिन-सी च्या क्लिनिकल ट्रायल्स चे मेटा अनॅलिसिस प्रसिद्ध झाले आहे. त्यातूनही हा दावा फोल असल्याचे दिसून आले आहे.

उत्तम लेख आणि सार त्याहून अधिक महत्त्वाचं.

मस्त लेख!

सुंदर लेख ......

तुमचा पॉइंट कळला. पण एकूण लेख मायबोलीवरील चालू घडामोडी किंवा तत्सम ग्रूपमधल्या एखाद्या बाफच्या प्रस्तावनेसारखा झाला आहे.

:)

इंटरेस्टींग माहिती ..

(माझ्या जुन्या ऑफीसमधल्या "फेश आऊट ऑफ कॉलेज" पोरींनां फार सवय होती कणकण, फिव्हरीश वाटू लागलं, सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसायला लागली की व्हिटॅमिन सी चे इलेक्ट्राल सारखे पाऊचेस् पाण्यात मिसळून प्यायची .. त्याने खरंच काही होतं का हा मला कायम प्रश्न पडायचा .. :))

लेखाचा पॉइंट समजला

>> प्राचीन, नैसर्गिक, ऑर्गॅनिक अशा शब्दांना न भुलता उपचारांबाबत उघड्या मनाने निर्णय घेता यायला हवा.
आणि हे वाक्य वाचल्यावर लिहीण्यामागचा अजेंडा सुद्धा ;)