एका तळ्यात होती

एका तळ्यात होती बदकें पिलें सुरेख
होतें कुरुप वेडें पिल्लूं तयांत एक

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळें तें वेगळें तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हंसून लोक
आहे कुरुप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळें रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जें तें तयास टोंची दावी उगाच धाक
होतें कुरुप वेडें पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतू पिल्लास त्या कळालें
भय वेड पार त्याचें वार्‍यासवे पळालें
पाण्यात पाहतांना चोरुनियां क्षणैक
त्याचेच त्या कळालें, तो राजहंस एक

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

श्रीनिवास खळे यांच्यावरील 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे हे गाणे 'लक्ष्मीपूजन' या चित्रपटासाठी म्हणून लिहीले गेले होते, पण दुर्दैवाने तो चित्रपट पूर्ण झालाच नाही.