एक होता काऊ

एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला
मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ

एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट

एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस

एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
तुझे नाव काय?, तुझे नाव काय?, तुझे नाव काय?

एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले
मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक कोकिळा फांदीवरती

एक कोकिळा फांदीवरती झोके घेऊनी गाणे गाई
आणिक माझ्या पूर्वस्मृतींना गंध बावरा मोहर येई॥धृ॥
आशीच झुलले होते मीही गीत आळवीत प्रेम रसाचे
प्राशन केले होए तूही प्रीतीमधल्या सोमरसाचे
वसंतातले हळवे पाणी तुझ्या गीताने कंपित होई
आणिक माझ्या पूर्वस्मृतींना गंध बावरा मोहर येई॥१॥
शीळ वाजवित हलके येतो अजून ही रे वारा झुळझुळ
भास होतसे आला तूही क्षणभर होते माझी चुळबुळ
डोळे मिटुनी कल्पनेत मी तुझ्या रूपाला चुंबुन घेई
आणि माझ्या पूर्वस्मृतींना गंध बावरा मोहर येई॥२॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एका तळ्यात होती

एका तळ्यात होती बदकें पिलें सुरेख
होतें कुरुप वेडें पिल्लूं तयांत एक

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळें तें वेगळें तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हंसून लोक
आहे कुरुप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळें रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जें तें तयास टोंची दावी उगाच धाक
होतें कुरुप वेडें पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतू पिल्लास त्या कळालें
भय वेड पार त्याचें वार्‍यासवे पळालें
पाण्यात पाहतांना चोरुनियां क्षणैक
त्याचेच त्या कळालें, तो राजहंस एक

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एकाच या जन्मी जणू

एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे,
जातील सार्‍या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे,
नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी,
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या,
फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी,
या वाहणार्‍या गाण्यातूनी
लहरेन मी, बहरेन मी
क्षितीजातूनी उगवेन मी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक वेस ओलांडली

एक वेस ओलांडली, गाव एक दूर राहिले
एकट्याच वाटेस ह्या, दिशांनीच सांभाळले ||धृ||

इथेच मध्येच क्षणैक उगाच का मी थांबलो?
सावलीत माझिया एकटा विसावलो, पुन्हा उन्हात चाललो
एक वेस ओलांडली, गाव एक दूर चालले...

उसासे फुलांचे, खुलासे सलांचे का मी ऐकतो?
मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो, पुन्हा मनात भंगतो
पावलास स्पर्श सांगतो, गाव दूर दूर थांबले...

संपल्या जुन्या खुणा जरी, नवा ठसा दिसे
प्रवासी पुन्हा हाच खेळ संचिती असे
एक वेस ओलांडता, गाव नवे दिसू लागले...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं
राजा मदन हसतोय कसा, की जीव माझा भुलला गं
ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येती मला, की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू
हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं र्‍हाऊ
का? ... बघत्यात !

रेशीम विळखा, घालुन सजना, नका हो कवळून धरू
लुकलुक डोळं, करुन भोळं, बगतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं

डोळं रोखून, थोडं वाकून, झुकू नका हो फुडं
गटर्गुम गटर्गुम करून कबूतर बघतंय माज्याकडं
लई दिसानं सखे, आज ह्यो धागा जुळला गं

बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता, बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं ?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एकतारी गाते

एकतारी गाते,
गाते गीत विठ्ठलाचे
वाळवंटी ध्वजा
ध्वजा वैष्णवांची नाचे

मराठीचा बोल
बोल जगी अमृताचा
ज्ञानियांचा देव
देव ज्ञानदेव नाचे

नाचे चोखामेळा
मेळा नाचे वैष्णवांचा
नाचे नामदेव
देव कीर्तनात नाचे

अनाथांचे नाथ
नाथ माझे दीनानाथ
भाग्यवंत संत
संत रुप अनंताचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक धागा सुखाचा

एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे

पांघरसी जरी असला कपडा
येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करीसी नाटक, तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची
रंगीत वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे

या वस्त्रांते विणतो कोण
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकर्‍याचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एकदाच यावे सखया

एकदाच यावे सखया, तुझे गीत कानी
धुंद हो‍उनी मी जावे, धुंद त्या सुरांनी

असा चंद्र कलता रात्री, रानगंध यावा
सर्व भान विसरुन नाती, स्पर्श तुझा व्हावा
पुन्हा गूज अंतरिचे हे कथावे व्यथांनी

एकदाच वाटेवर या तुला मी पहावा
भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा
असा शांत असता वारा, रानपक्षि गावा
शब्दरूप प्रतिमा बघुनी जीव विरुनि जावा
स्वप्न हेच हृदयी धरिले खुळ्या आठवांनी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक फुलले फूल

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले

मंद अगदी गंध त्याचा, मंद इवले डोलणे
साधले ना, मुळीच त्याला नटुनथटुनी लाजणे
कोवळे काळिज त्याचे परि कुणासी मोहिले

त्या ’कुणा’ला काय ठावे, या फुलाची आवडी
तो न आला या दिशेला, वाट करुनी वाकडी
या फुलाला मात्र दिसली, दुरुन त्याची पाऊले

एक दुसरे फूल त्याने, खुडुन हाती घेतले
या फुलाचे जळून गेले, भाव अगदी आतले
करपली वेडी अबोली, दुःख देठी राहिले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: