दिल्या घेतल्या वचनांची

दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे ॥ ध्रु ॥

बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यांत
ह्रुदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळ्या बकुळफुलांची, शपथ तुला आहे ॥ १ ॥

शुभ्र फुले रेखित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, " चंद्रोत्सव हा, सावळ्या भुईचा"
फुलांतल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे ॥ २ ॥

भुरभुरता पाउस होता, सोनिया उन्हांत
गवतातुंन चालत होतो, मोहुनी मनांत
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे ॥ ३ ॥

हळूहळू काजळतांना, सांज ही सुरंगी
तुझे भास दाटुनि येती, असे अंतरंगी
या उदास आभाळाची, शपथ तुला आहे || ४ ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: