बहु असोत सुंदर संपन्न कीं महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ ध्रु ॥
गगनभेदि गिरिविण अणु नच तिथे उणे
आकांशापुढति जिथें गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणें
तेथ अडे काय जलाशय-नदांविणे ?
पौरूषासि अटक गमे जेथ दु:सहा ॥ १ ॥
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगारें
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळिं नुरे
रमणीची कूस जिथें नृमणिखनी ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा ॥ २ ॥
नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेंही शौर्य मावळे
दौडत चहुंकडुनिं जवें स्वार तेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ॥ ३ ॥
विक्रम वैराग्य एक जगिं नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरें यत्किर्ती अशी विस्मयवहा ॥ ४ ॥
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि देत अंतरी ठसो
वचन लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्ममर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणिं हि असे स्पॄहा ॥ ५ ॥