बगळ्यांची माळ फुले

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?

छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात

त्या गांठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात

हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमलापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यात

तू गेलिस तोडुनि ती, माळ सर्व धागे
फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

बनात आली बहार पिवळी

बनात आली बहार पिवळी उगाच हरिणी बावरली
उत्सव येता नवनवतीचा नव्हाळ काया कस्तुरली॥धृ॥
दरवळणारा पहाट वारा निळ्या आभाळी हवा उडे
मावळतीला चंद्र केशरी क्षितिजावरती रंग चढे
रूप पहाते पहाट पवळी प्रभा जळावर अंथरली॥१॥
उत्सव भरता प्रीत फुलांचा दिसू लागते स्वप्न तिला
पैंजण बांधुनी पहाट येते झर्‍यात झुलते नृत्यकला
प्राण सख्याच्या स्पर्शासाठी चंदन राई थरथरली ॥२॥
जळात शिरण्या अधीर जाहली मनात फुलती आठवणी
चैतन्याची लहर उजळते दुरून घालतो साद कुणी
नवीन दिवस हा घेऊनी आला वन वेळुतुन मुरली॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

बहु असोंत सुंदर संपन्न

बहु असोत सुंदर संपन्न कीं महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ ध्रु ॥

गगनभेदि गिरिविण अणु नच तिथे उणे
आकांशापुढति जिथें गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणें
तेथ अडे काय जलाशय-नदांविणे ?
पौरूषासि अटक गमे जेथ दु:सहा ॥ १ ॥

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगारें
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळिं नुरे
रमणीची कूस जिथें नृमणिखनी ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा ॥ २ ॥

नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेंही शौर्य मावळे
दौडत चहुंकडुनिं जवें स्वार तेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ॥ ३ ॥

विक्रम वैराग्य एक जगिं नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरें यत्किर्ती अशी विस्मयवहा ॥ ४ ॥

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि देत अंतरी ठसो
वचन लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्ममर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणिं हि असे स्पॄहा ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: