स्फुर्तिगीत

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे............. IIधृII

जगी जे हिन अतिपतित
जगी जे दिन पददलित
तया जाऊन उठवावे
जगाला प्रेम अर्पावे.............II१II

सदा जे आर्त अतिविकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे
जगाला प्रेम अर्पावे............II२II

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे
जगाला प्रेम अर्पावे...........II३II

प्रभुची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे
जगाला प्रेम अर्पावे..........II४II

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

बहु असोंत सुंदर संपन्न

बहु असोत सुंदर संपन्न कीं महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ ध्रु ॥

गगनभेदि गिरिविण अणु नच तिथे उणे
आकांशापुढति जिथें गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणें
तेथ अडे काय जलाशय-नदांविणे ?
पौरूषासि अटक गमे जेथ दु:सहा ॥ १ ॥

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगारें
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळिं नुरे
रमणीची कूस जिथें नृमणिखनी ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा ॥ २ ॥

नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेंही शौर्य मावळे
दौडत चहुंकडुनिं जवें स्वार तेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ॥ ३ ॥

विक्रम वैराग्य एक जगिं नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरें यत्किर्ती अशी विस्मयवहा ॥ ४ ॥

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि देत अंतरी ठसो
वचन लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्ममर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणिं हि असे स्पॄहा ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: