भावभोळ्या भक्तीची मी एकतारी

भावभोळ्या भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी ॥ ध्रु ॥

काजळी रात्रीस होसी तूंच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले, तुझ्या ही आज दारी ॥ १ ॥

भाबडी दासी जनी गातांच गाणी
दाटुनी आले तुझ्या डोळ्यांत पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी ॥ २ ॥

शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होतां दिव्य झाली
वैभवाचा साज नाही, मी भिकारी ॥ ३ ॥

अंतरीची हाक वेडी घालते रे
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी माझी व्यथा ही, तूच सारी ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: