घाल घाल पिंगा

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्ष झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आचवलं ||

फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकलेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंग हुंगुनिया करी कशी गं बेजार ||

परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुल वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय ||

आले भरून डोळे पुन्हा गळाही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ५वा : इयत्ता ५वी

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ५ वीच्या कविता!...

या भागात आपण भावकवी म्हणून ओळखले जाणारे कवी कृष्णाजी बळवंत निकुंब उर्फ कृ. ब. निकुंब यांनी लिहिलेली 'घाल घाल पिंगा वाऱ्या ......' ह्या कवितेला वेगवेगळ्या कालखंडात तीन वेगळ्या संगीतकारांनी तीन वेगळ्या गायिकांकडून गाऊन घेतले आहे. कालखंड वेगळा असल्याने तिन्ही गाण्याची चाल आणि गायकीतील फरक जाणवतो. आपल्यासाठी ही तिन्ही गाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. (इंटरनेटवर प्रथमच ही तिन्ही गाणी एकत्र ऐकावयास मिळत आहेत. ही गाणी मिळवून देण्याकरीता मला आपल्या सारख्या रसिक श्रोत्यांकडून खूप मदत झाली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद). गाण्याच्या प्रसिद्धीचे अचूक वर्ष माहीत नसल्याने गाण्यांचा काही विशिष्ट क्रम लावता आला नाहीय.

पहिले गाणे आहे, बालभारतीने १९६५ मध्ये काढलेल्या ध्वनिमुद्रिकेवरील गाणे. गायिका आहेत फैयाज यानी मुले संगीतबद्ध केले आहे वसंत देसाई यांनी. (इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध)
दुसरे गाणे आहे, संगीतकार कमलाकर भागवत यांचे आणि मधुर आवाजात गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी. हे गाणे जास्त प्रसिद्ध आहे.
तिसरे गाणे आहे, जुन्या काळातील गायिका कालिंदी केसकर यांनी गायलेले आणि संगीत दिले आहे ए. पी. नारायणगावकर यांनी.

आपला अभिप्राय नक्की कळवावा.
चारुदत्त सावंत.
तळेगाव दाभाडे - ८९९९७७५४३९

https://charudattasawant.com/2021/09/12/balbharati-poem-songs-5/